यवतमाळ – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार अथवा सामान्य नागरीकांना आपल्या तक्रारी तथा सुचना नोंदविता याव्या म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलोभने दिली जाण्याची शक्यता आहे. मतदानाचा दिवस जवळ आल्यानंतर मतदारांना पैसे, भेटवस्तू अशा प्रकारची आमिषे दाखविली जातील. असा प्रकार उघडकीस आल्यास किंवा प्रत्यक्ष पाहण्यात आल्यास नागरीकांना ०७२३२-२३९७००, २५५०७७, २४०७२० या टोल फ्री क्रमांकावर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच निवडणूकीच्या कालावधीत अवैध दारू विक्री, संशयीत वस्तू किंवा शस्त्रास्त्रे इत्यादीबाबी आढळल्यासही वरील क्रमांकावर कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.
Archive for October 4th, 2014
0
मतदारांना प्रलोभने दिल्यास तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक
राष्ट्रवादी काँग्रेससोबत १२ पक्ष जुळले
यवतमाळ -विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदिप बाजोरीया यांना विजयी करण्यासाठी व धर्मनिरपेक्ष मताचे विभाजन होऊ नये यासाठी राज्यातील १२ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेससोबत जुळल्याची माहिती प्रवक्ता सुरेश चिंचोळकर यांनी दिली.
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (एकतावादी)चे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे, रिपब्लिकन पार्टी (धर्मनिरपेक्ष – कर्मवीर दादासाहेब गायकवाड) चे राष्ट्रीय अध्यक्ष पी. के. गायकवाड, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे, रिपब्लिकन आॅफ इंडिया (एस) चे अध्यक्ष सुरेश वाघमारे, ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे दिनेश गोडवाटे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे काकासाहेब खंबाळकर गट, दलित पँथरचे सुखदेव (तात्या) सोनवणे, रिपब्लिकन क्रान्ती सेनेचे संजय गंगावणे, ख्रिश्चन कम्युनिटी वेल फेअर कौंसील आॅफ इंडिया चे जोसेफ लॉरेन्स मलबारी, भारतीय होलार समाज संघाचे माणिक भंडगे, महाराष्ट्र परिवर्तन सेनेचे अध्यक्ष धनराज थोरात, महाराष्ट्र बॅन्ड कलाकार उत्कर्ष संघटनेचे विजय खंडागळे या पक्षाच्या अध्यक्षांनी आपला पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर केला आहे. जिल्ह्यातील या पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी फिरत आहे. यवतमाळ विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संदीप बाजोरीया यांच्या प्रचारार्थ बाराही पक्षाचे पदाधिकारी विविध भागात पोहोचले असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ता सुरेश चिंचोळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून
यवतमाळ – वडगावजंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाºया चिचघाट येथे एका इसमाने सुरीने वार करून पत्नीचा खून केल्याची घटना दसºयाच्या दिवशी ३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.
अनिता विजय राठोड (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. १९९५ मध्ये आरोपी विजय नारायण राठोड (४३) रा. किन्हाळा याच्यासोबत तिचा विवाह झाला असून तीन मुले आहेत. विजय हा पत्नी अनिताच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत सतत वाद करीत होता. २ आॅक्टोबर रोजी भावाच्या मुलाचा जावळे काढण्याचा कार्यक्रम असल्याने ती तिन्ही मुलांना घेऊन माहेरी चिचघाट येथे आली होती. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर दसºयाच्या दिवशी आरोपीने पत्नीला घरी चालण्याची विनंती केली. मात्र तिने नकार दिल्याने तो एकटाच किन्हाळा येथे परत गेला. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता तो चिचघाट येथे आला आणि झोपून असलेल्या पत्नी अनिताच्या छातीवर व बरगडीवर सुºयाने सपासप वार करून गंभीर जखमी केले. यावेळी नातेवाईकांनी तिला यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाला. या घटनेची वार्ता गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळासह रुग्णालयात धाव घेतली. पुनाजी सवाई जाधव (६५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडगाव जंगल पोलिसांनी आरोपी विजय राठोड याच्याविरूद्घ भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक गजानन खारडे यांनी तपासचक्रे फिरवून आरोपीस अटक केली. त्याला न्यायालयात हजर करून ६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळवून या घटनेत वापरेला सुरा जप्त केला.
0
दुर्गादेवी विसर्जनादरम्यान युवकाचा खून
यवतमाळ – दुर्गादेवीच्या विसर्जनादरम्यान नाचण्याच्या वादातून युवकाचा खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजता दरम्यान चमेडीयानगरात घडली. धनराज पचारे (२६) रा. डोर्लीपुरा, असे मृताचे नाव आहे.
गुरुवारीरात्री दरम्यान दुर्गादेवीच्या विसर्जनासाठी मिरवणूक निघाली असताना धनराज व शंकर नेवारे या दोघात नाचण्याच्या कारणातून वाद निर्माण झाला. या वादाचा वचपा म्हणून शंकर नेवारे या युवकाने धनराजला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी राहुल अभिमान पचारे याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून शंकर नेवारे (१९)रा. डोर्लीपुरा याच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे.
0
निंगनूर येथे ४५ गावातील आदिवासी बांधवांची सभा

विजय खडसेंच्या प्रचारार्थ मोघेंचे मार्गदर्शन
उमरखेड – येथील काँगे्रसचे उमेदवार विजय खडसे यांच्या प्रचारार्थ राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सभा निंगनूर येथे पार पडली. सभेला मतदारसंघातील उपस्थित ४५ गावातील आदिवासी बांधवांशी मोघे यांनी संवाद साधला.
काँग्रेसने आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. आदिवासींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले, असे यावेळी बोलताना मोघे म्हणाले. काही जातीयवादी पक्ष आरक्षणाच्या माध्यमातून आदिवासी व इतर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. उमरखेड मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसला बळ दिले, तीच ताकद विधानसभा निवडणुकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार विजय खडसे यांच्या पाठीशी राहून द्यावी, असे आवाहनही यावेळी मोघे यांनी केले. या बैठकीला खरबी, दराटी, परोटी, गाडीबोरी, जेवणी, अमडापूर, चिखली(वन), जवराळा, येरडी, भवानी, एकंबा आदी ४५ गावातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली- आ. ठाकरे

यवतमाळ – काँग्रेसमध्ये सर्वच पक्षातून प्रवेश घेणाºयांची संख्या वाढली असून, स्व. उत्तमराव पाटील यांच्या समर्थकांनी केलेल्या प्रवेशामुळे काँग्रेसची ताकद जिल्ह्यात वाढली आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे यांनी केले. येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात शनिवारी राष्टÑवादी काँग्रेसमधील काही प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून, दादांचे सुपूत्र मनीष पाटील, माजी जि.प. अध्यक्ष प्रफुल्ल मानकर हा गट स्वगृही परतल्याने इतरांनाही पक्षात परतण्याची प्रेरणा मिळाली, असे ठाकरे म्हणाले. यावेळी राकाँचे जिल्हा उपाध्यक्ष विलास राऊत, अरविंद फुटाणे, दिलीप कनाके, सागर इंगोले या राळेगाव तालुक्यातील राकाँ पदाधिकाºयांनी माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी शिवाजी मोघे, वसंत पुरके, संजय देशमुख, विजया धोटे, डॉ. टी.सी. राठोड आदी उपस्थित होते.
0
सक्तीची कर्जवसुली थांबविण्याची मागणी

यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकºयांकडील थकीत कर्जाच्या वसुलीसाठी सक्तीची कारवाई सुरू केली आहे. शेतकºयांची जंगम, स्थावर मालमत्ता जमीन विक्री करून वसुली करण्याची जाहीर नोटीस दिली. ही सक्तीची कर्जवसुली थांबविण्यात यावी, या मागणीचे निवेदन राष्टÑवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाºयांना देण्यात आले आहे.
राज्य शासनाच्या महसूल विभागाने यापूर्वी शेतीशी निवडीत कर्जाची वसुली करण्यात येवू नये, अशा प्रकारचा निर्णय घेतला आहे. तशा सूचना बँकाना देण्यात आलेल्या आहेत. तरी देखील जिल्हा मध्यवर्ती बँकेने सक्तीची कर्जवसुली करण्याचा निर्णय घेतल्याने शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे. जिल्ह्यात शेतकºयांच्या मोठ्या प्रमाणावर आत्महत्या झालेल्या असतानाही शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष करून बँकेकडून करण्यात येणारी कारवाई योग्य नाही. प्रशासनाने सक्तीची कर्जवसुली थांबवून शेतकºयांना दिलासा द्यावा, अशी मागणी जिल्हाधिकारी राहुलरंजन महिवाल यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी संदीप बाजोरीया, माजी जि.प.अध्यक्ष प्रवीण देशमुख, राकाँचे जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले, बाळासाहेब चौधरी, सुरेश चिंचोळकर, आशीष मानकर आदी उपस्थित होते.
0
दीक्षाभूमी : भीम माझा सूर्याची सावली
- नागपूर : होता अंधार युगाचा, आमच्या पावलोपावली… धम्माच्या क्षितिजावर भीम झाला सूर्याची सावली…असे भीमस्तुतीचे गीत ओठांवर सजवून…पंचशीलची पताका खांद्यावर घेऊन ‘जयभीम’च्या जल्लोषात निळ्या पाखरांचे काफिले दीक्षाभूमीवर पोहोचण्याचे सत्र अविरत सुरूच आहे़ शतकानुशतकापासून चालत आलेल्या वर्गव्यवस्थेला जिथे बाबासाहेबांनी मूठमाती दिली ती वैचारिक क्रांतिभूमी कशी असेल याचे काल्पनिक चित्र डोक्यात घेऊन हे अनुयायी देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे येत आहेत व प्रत्यक्ष दीक्षाभूमीचा भव्य स्तूप बघताच ते येथील माती मोठ्या अभिमानाने कपाळी लावत आहेत़ या अनुयायांमध्ये कुणी फेट्यात भाकरी बांधून बसचा प्रवास करीत आलेला मराठवाड्यातील म्हातारा शेतकरी आहे तर कुणी थेट जपानहून विमानात बसून आलेला तरुण अभियंता आहे़ दीक्षाभूमीवर पोहोचणारे असे विविध प्रांतातील व वेगवेगळ्या क्षेत्रातील असले तरी या सर्वांना एका सूत्रात बांधणारा धम्माचा विचार मात्र सारखाच आहे. याच विचाराच्या प्रचार आणि प्रसारासाठी बाबासाहेबांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करण्यासाठी ही सारी मंडळी उन्हातान्हाची पर्वा न करता या पवित्र दीक्षाभूमीवर एकवटली आहे़
0
मोदींच्या विमानात ग्रेनेड!

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तयार असलेल्या एअर इंडियाच्या एका विमानात निकामी ग्रेनेड आढळल्याने सुरक्षा यंत्रणा हादरली आहे. हे विमान पंतप्रधान मोदींच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून सज्ज ठेवण्यात आलं होतं.
इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बोइंग-७४६ हे पर्यायी विमान सज्ज ठेवलं होतं. पंतप्रधानांच्या अमेरिका दौऱ्यासाठी तयार असलेल्या एअर इंडियाच्या जंबो जेटमध्ये ऐनवेळी तांत्रिक समस्या उद्भवली असती तर या बोइंग-७४६ विमानाचा उपयोग करण्यात आला असता. पण अशी वेळ आली नाही. त्यामुळे पंतप्रधानांचा अमेरिका दौरा पूर्ण होताच बोइंग-७४६ या विमानाला पुन्हा प्रवासी वाहतूक सेवेत दाखल करण्यात आलं. बोइंग-७४६ या विमानाला दिल्ली-मुंबई-हैदराबाद-जेद्दा ला पाठवण्यात आलं होतं. जेद्दाला पोहचल्यानंतर सुरक्षा रक्षकांना विमानात बिझनेस क्लासमध्ये हा निकामी ग्रेनेड आढळून आला. पंतप्रधानांसाठी या विमानाचा उपयोग होणार होता, त्यामुळे सुरक्षा यंत्रणा ग्रेनेड मिळाल्याने हादरली आहे. सध्या हे विमान जेद्दामध्येच आहे आणि नियोजित कार्यक्रमानुसार ते कालीकतला रवाना होईल. जेद्दा विमानतळाच्या सुरक्षा यंत्रणेने या विमानाची पूर्ण तपासणी केली आहे आणि त्याच्या उड्डाणाला परवानगीही दिली आहे. पण या विमानात ग्रेनेड आला कसा? याचा तपास अजूनही भारतीय सुरक्षा यंत्रणांना लागलेला नाही. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी ग्रेनेडचा तपास सुरूच ठेवला आहे. गुप्तचर संस्था आणि सतर्क सुरक्षा यंत्रणेमुळे हा निकामी असलेला ग्रेनेड आढळून आला, अन्यथा सुरक्षेच्या दृष्टीने हा अतिशय गंभीर मुद्दा बनला असता.
0
पाटणाः चेंगराचेंगरीत ३३ ठार
वृत्तसंस्था, पाटणा
पाटणा शहरातील गांधी मैदानात काल (शुक्रवारी) दसऱ्यानिमित्त रावणदहनाच्या कार्यक्रमावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत ३३ जण ठार झाले, तर अनेक जण जखमी झाले. मृतांमध्ये वीस महिला, अकरा मुले आणि दोन पुरुष यांचा समावेश आहे.
पाटण्यातील दसरा कार्यक्रमाला बिहारचे मुख्यमंत्री जीतन राम मांझी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर विजेची तार पडली अशी अफवा पसरली आणि घाबरलेल्या लोकांनी पळापळ सुरू केली. या प्रकारामुळे गोंधळ वाढला आणि चेंगराचेंगरीस सुरुवात झाली.
दुर्घटनेची माहिती मिळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा करुन घटनेची माहिती घेतली तसेच मृतांच्या नातलगांना दोन लाख रुपयांची तर प्रत्येक जखमीसाठी ५० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली. बिहारचे मुख्यमंत्री मांझी यांनी मृतांच्या नातलगांना तीन लाख रुपयांची तर प्रत्येक गंभीर जखमीसाठी ५० हजार रुपयांच्या आणि अन्य जखमींसाठी प्रत्येकी २० हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली.
जखमींना पाटण्यातील पीएमसीएच आणि आयजीआयएमएसमध्ये दाखल करण्यात आले आहे. घटनेची तसेच पीडितांबाबतची माहिती देण्यासाठी प्रशासनाने ०६१२-२२१९८१० ही हेल्पलाइन सुरू केली आहे. बिहार सरकारने चेंगराचेंगरीची चौकशी करणार असल्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्रालयाने पाटणातील चेंगराचेंगरीची चौकशी करुन अहवाल सादर करा, असा आदेश बिहार सरकारला दिला आहे.
नागपूर ग्रामीणमध्ये उमेदवारांचा रणकल्लोळ
नागपूर – प्रचारासाठी फारच कमी दिवस उपलब्ध असल्याने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने प्रारंभीच वेग घेतला आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तिथी संपल्याने आता लढवय्यांसाठी मैदान मोकळे झाले आहे.यावेळी युती, आघाडी तुटल्याने संपूर्ण राज्यात पंचरंगी लढतीचे चित्र आहे. त्यामुळे कोण किती पाण्यात आहे, याची प्रचिती निवडणूक निकालातून दिसणार आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशामुळे राज्यातील भाजपा नेत्यांच्या स्वप्नांना बळ मिळाल्याने त्यांना मुख्यमंत्रिपद दिसू लागले आहे. शिवसेनेलाही राज्यात आता आपली ताकद सिद्ध करावी लागणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत भरघोस यश प्राप्त करण्याचे आव्हान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याशी जवळीक साधून राज्यावर भगवा फडकविण्याचे स्वप्न शिवसेना पाहू शकते. पण निवडणूक निकालानंतरच ते स्पष्ट होणार आहे. युती, आघाडी तुटल्याने अनेकांना निवडणूक लढविण्याची संधी मिळाली आहे. पंचरंगी लढतीत कोणाच्या पारड्यात बहुमत येते हे पाहणे रोमांचक ठरणार आहे.
यावेळी काँग्रेस व राष्टÑवादीला अँटी इंकम्बसीचा फटका बसणार आहे. मागील १५ वर्षांपासून सत्तेवर असलेल्या काँग्रेस-राकाँ आघाडीच्या कामकाजावर जनता प्रचंड नाराज आहे. विशेषत: विदर्भातील जनता संतप्त आहे. विदर्भाचा विकास न करता त्यात अनेक अडथळे निर्माण करण्यात आल्याचा वैदर्भीयांचा आरोप आहे. त्यामुळे काँग्रेसचा गड असलेला विदर्भ यावेळेस भाजपाला साथ देण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यातील काटोल, सावनेर, रामटेक, उमरेड, हिंगणा व कामठी विधानसभा मतदार संघात यावेळेस पंचरंगी लढती होत असल्याने याचा फटका कोणाला बसेल व कोणाचे भाग्य फळफळणार हे अतिशय अनिश्चित बनले आहे. प्रत्येकालाच आपण विजयी होण्याचे स्वप्न दिसत असल्याने प्रचार कार्याने वेग घेतला आहे. काही उमेदवारांनी लोकसभा निवडणुकीपासूनच विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली होती. सभा, संमेलने तसेच भूमिपूजनांचे कार्यक्रम घेऊन जनतेला आपल्या कामांची ओळख करून देण्यात येत होती.
सावनेर : केदारांना मोकळे रान?
सावनेर मतदार संघातून अपेक्षेप्रमाणे काँग्रेसची उमेदवारी सुनील केदार यांना मिळाली आहे. येथून उमेदवारी प्राप्त करण्यासाठी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुनीता गावंडे यांनी फिल्डिंग लावली होती. परंतु आघाडी तुटल्याने त्यांच्याही इच्छेवर पाणी फेरले गेले. त्यातच भाजपाचे उमेदवार सोनबा मुसळे यांची उमेदवारी रद्द झाल्याने केदार यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. येथून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा असलेल्या आशिष देशमुख व भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. पोतदार यांना पक्षाने संधी दिली नाही. डॉ. पोतदार यांना तिकीट मिळेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. ही अपेक्षा खरी ठरली असती तर काँग्रेसच्या उमेदवाराला ही निवडणूक निश्चितच कठीण गेली असती. पण तसे घडले नाही.त्यामुळे ही निवडणूक यावेळेसही एकतर्फी होण्याची शक्यता आहे. सुनील केदारांच्या विरोधात उभे असलेले राकाँचे किशोर चौधरी, बसपाचे सुरेश डोंगरे, मनसेचे प्रमोद ढोले व शिवसेनेचे विनोद जीवतोडे हे फारसे तग धरू शकणार नाहीत.
काटोलमध्ये अनिलबाबूंची दमछाक
काटोल विधानसभा मतदार संघात यावेळी राकाँचे उमेदवार अनिल देशमुख यांना तिरंगी लढतीला सामोरे जावे लागणार आहे. यावेळेस भाजपातर्फे आशिष देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आशिष देशमुखांनी सावनेर मतदारसंघातून लढण्याची पूर्ण तयारी केली होती. परंतु महायुती तुटल्याने त्यांना काटोल मतदारसंघातून लढण्याची संधी देण्यात आली. येथे ते आपल्या काकांच्याविरोधात कितपत टिकाव धरू शकतील, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. राकाँचे अनिल देशमुख यांना येथून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व नरखेड पंचायत समितीचे सभापती राजू हरणे यांच्यासोबत खरी लढत द्यावी लागणार आहे.
महायुती तुटल्याने त्याचा फटका बसण्याची शक्यता असली तरी शिवसेनेचे राजू हरणे या तळागाळातील व्यक्तीला शिवसेनेने उमेदवारी दिल्याने यावेळेस शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह असून यावेळी काटोल मतदारसंघावर भगवा फडकविण्याच्या इर्षेने ते झपाटले आहेत. शिवसेनेने आतापर्यंत येथून आयात केलेल्या उमेदवारांना संधी दिल्याने ते अनिल देशमुख यांच्यासमोर टिकाव धरू शकले नव्हते. शिवसेनेची बाहेरची उमेदवारी अनिल देशमुखांच्या पथ्यावर पडत होती. यासोबतच काँग्रेसने उमेदवारी दिलेले दिनेश ठाकरे हे येथून नशिब आजमावत आहे. मनसेचे दिलीप गायकवाड व बसपाचे सुधीर मेटांगळे आणि शेकापचे राहुल वीरेंद्र देशमुख हे नशिब आजमावत आहेत. परंतु खरी लढत शिवसेनेचे राजेंद्र हरणे व राकाँचे अनिल देशमुख यांच्यातच खरी लढत होणार आहे.
हिंगण्यात भाजपासमोर
राकाँचे आव्हान
हिंगणा मतदार संघातून राकाँचे उमेदवार व माजी मंत्री रमेशचंद्र बंग रिंगणात आहेत. त्यांनी आधीपासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मागच्या निवडणुकीत पराभव पत्करावा लागल्यानंतर त्यांनी मतदारसंघाची मोर्चेबांधणी नव्याने केली होती. कार्यकर्त्यांना जोडून स्थानिक पंचायत समिती, जिल्हा परिषद तसेच ग्रामपंचायत स्तरावर पक्षाचे नेटवर्क मजबूत केले आहे. त्यांना यावेळी आपल्या विजयाची खात्री आहे.
भाजपाचे आमदार विजय घोडमारे यांचे तिकीट कापून यावेळी समीर मेघे यांना उमेदवारी दिली आहे. परंतु यामुळे विजय घोडमारे यांनी कोणतीही नाराजी व्यक्त न करता पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या प्रचारकार्यास वाहून घेतले आहे. त्यामुळे राकाँचे उमेदवार रमेशचंद्र बंग यांना भाजपाचे समीर मेघे तगडे आव्हान देतील, असे चित्र आहे. यासोबतच येथून मनसेचे किशोर सरायकर हे नशीब आजमावत आहेत तर शिवसेनेकडून माजी खासदार प्रकाश जाधव व काँग्रेसच्या कुंदा राऊत मैदानात आहेत. मात्र खरी लढत ही राकाँ व भाजपा उमेदवारांमध्येच होणार आहे.
रामटेकमध्ये तिरंगी लढत
रामटेक मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल मागील चार टर्मपासून विजयी होत असले तरी यावेळेस त्यांना कठीण संघर्ष करावा लागणार आहे. काँग्रेसची तिकीट मिळण्याच्या अपेक्षेत गावोगावी प्रचार करणाºया अमोल देशमुखांना काँग्रेसने ठेंगा दाखविल्यानंतर ते आता राकाँकडून निवडणूक लढवित आहेत. काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांना उमेदवारी दिली आहे तर भाजपाने डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांना उमेदवारी देऊन शिवसेनेच्या उमेदवाराला आव्हान दिले आहे. मागील वर्षी गोंगपा या पक्षाकडून लढून रेड्डी यांनी चांगली मते घेतली होती. त्यांचे रामटेक मतदार संघात समाजकार्य असल्याने तसेच भाजपाच्या पाठबळाने ते यावेळी आशिष जयस्वाल यांना चांगलीच टक्कर देण्याच्या स्थितीत आहेत. भाजपा-शिवसेना युती असल्याने आशिष जयस्वाल यांना चार वेळा सहज विजय मिळवता आला. परंतु यावेळेस त्यांना मिळालाच तर निसटता विजय मिळण्याची शक्यता आहे. मनसेचे योगेश वाडिभस्मे व इतर अपक्ष मैदानात असले तरी शिवसेनेचे आशिष जयस्वाल, भाजपाचे डी. मल्लिकार्जुन रेड्डी व राकाँचे अमोल देशमुख यांच्यातच तिरंगी लढत होणार आहे.
उमरेडमध्ये एकतर्फी निवडणूक
उमरेड विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने येथील समीकरणे पार बदलली आहेत. परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातून भाजपाने आपले स्थान बळकट करीत सुधीर पारवे यांना गेल्या वेळी विजयी केले होते. यावेळीही भाजपाने विद्यमान आमदार सुधीर पारवे यांनाच संधी दिली आहे. तर काँग्रेसने संजय मेश्राम यांना उमेदवारी दिली आहे. यासोबतच अपक्ष म्हणून राजू पारवे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. राष्टÑवादी काँग्रेसने रमेश फुले यांना उमेदवारी दिली आहे. परंतु येथून भाजपा उमेदवाराविरोधात इतर पक्षांना तगडा उमेदवार देता न आल्याने येथील निवडणूक एकतर्फी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कामठीत सरळ लढत
कामठी मतदारसंघात यावेळी भाजपाने विद्यमान आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली आहे. बावनकुळे यांनी विजयाची हॅटट्रिक केली आहे आणि यावेळी चौथ्यांदा निवडणूक जिंकतील अशी त्यांचा कार्यकर्त्यांना आशा आहे. यावेळी काँग्रेसने त्यांच्याविरोधात राजेंद्र मुळक यांना उमेदवारी दिली आहे. मुळक यांनी नागपुरातील पश्चिम मतदार संघातून उमेदवारी मिळविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना पक्षाने कामठी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे आदेश दिले. काँग्रेसकडून आधी इच्छुक असलेले सुरेश भोयर यांनी बंड करीत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु राजेंद्र मुळक यांना त्यांची समजूत काढण्यात यश आले आहे व ते आता मुळक यांच्यासोबत प्रचार करीत आहेत. यामुळे यावेळी कामठी मतदारसंघात भाजपा व काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत होणार आहे. यात शिवसेनेचे तापेश्वर वैद्य, राकाँचे डॉ. महेंद्र लोधी यांना मिळालेल्या मतांवर विजयाचे गणीत ठरणार आहे. काँग्रेसला बरिएमंच्या सुलेखा कुंभारे यांच्या नाराजीचा फटका बसण्याची शक्यता आहे.नुकताच त्यांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यामुळे भाजपाचे पारडे अधिक जड झाले आहे. राजेंद्र मुळक नसते तर बावनकुळे यांना सहज विजय मिळाला असता. मुळकांमुळे त्यांना थोडी जास्त मेहनत करावी लागेल एवढेच. काँग्रेसचे उमेदवार त्यांच्यासमोर कितपत आव्हान निर्माण करतात, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
’ सुरेश चरडे
९५९५५२९०८०











