
रत्नागिरी – मुंबई-गोवा महामार्गावरील खेडजवळील भोस्ते घाटामध्ये शनिवारी मध्यरात्री रसायनाने भरलेला एक टॅंकर दरीत कोसळला. हा टॅंकर कोसळल्यानंतर दोन ते तीन स्फोट झाले. या स्फोटाचे आवाज काही कि.मी.पर्यंत ऐकू आले. मोठे स्फोटाचे आवाज झाल्याने परिसरात घबराट पसरली होती. या दुर्घटनेत टॅंकर चालकाचा मृत्यू झाला.
खेड, चिपळूण आणि लोटे एमआयडीसीमधील अग्निशमन दलाच्या गाडयांनी घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणली. या दुर्घटनेनंतर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक काही तासांसाठी विस्कळीत झाली होती. आग आता विझवली असली तरी, वायूगळती थांबलेली नाही. घरडा कंपनीचा हा टॅंकर असून, कंपनीच्या तज्ञांनी घटनास्थळाला भेट देऊन टॅंकरची पाहणी केली.
मुंबई-गोवा महामार्ग सध्या कोकणात जाणा-या चाकरमान्यांमुळे व्यस्त महामार्ग बनला आहे. गणपतीच्या पहिल्या दिवशीही मोठया संख्येने चाकरमानी कोकणात जात होते. या अपघातामुळे त्यांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. दरम्यान गणेशोत्सवात मोठया संख्येने चाकरमनी कोकणात जातात त्यामुळे रस्ते अपघात टाळण्यासाठी जड वाहनांना या मार्गावर बंदी असताना, ज्वलंत रसायनाने भरलेला हा टॅंकर इथे कसा आला असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
Archive for August, 2014
0
खेड टॅंकर दरीत कोसळून स्फोट
0
बस दरीत कोसळून १८ जण ठार

शिमला – हिमाचल प्रदेशातील किन्नूर जिल्ह्यात गुरुवारी खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात २३जण ठार झाले तर २० जण जखमी झाले.
३५ प्रवाशांना घेऊन ही बस हिमाचल प्रदेशातील कल्पाच्या दिशेने निघाली होती. यावेळी रोहतृंग गावातील ४०० फूट खोल दरीत ही बस कोसळली. या अपघातात १६ जण जागच्या जागी ठार झाले तर इतर सात जणांचा उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. मृतांमध्ये बसचालक आणि वाहकाचाही समावेश आहे.
या अपघातात जखमी झालेल्या २० जणांना तेथील जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती किन्नूर उपायुक्त डी.डी. शर्मा यांनी दिली. बसमधील प्रवासी हे जवळील सांग्ला गावातील रहिवासी होते. मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला असून जिल्हा प्रशासनाला जखमींना संपूर्णपणे मदत आणि आवश्यक त्या आरोग्यसुविधा पुरविण्याचे आदेश दिले आहेत.
0
सायबर कॅफेत प्रेमीयुगलांची रासलीला ; तीन तरूणीसह पाच तरूणांना अटक

यवतमाळ – आर्णी मार्गावरील सत्यसाईज्योत मंगल कार्यालयासमोर असलेल्या फे्रंडस सायबर कॅफेत अश्लील चाळे करणाºया तीन महाविद्यालयीन तरूणीसह पाच तरूणांना एसडीपीओंच्या पथकाने धाड टाकुन अटक केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तरूण, तरूणींना ताब्यात घेतले तेव्हा अख्खे शहर त्यांना बघण्यासाठी आले होते.
शहरातील व लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात चालणारे हाय प्रोफाईल कुटंनखाने चर्चेचा विषय असताना, शहरातील अनेक सायबर कॅफे, लॉज मध्ये प्रेमीयुगलांची रासलीला खुलेआम सुरू आहे. यामध्ये सायबर कॅफेत हा प्रकार सर्रास सुरू आहे. पोलीस प्रशासन गेल्या महिन्याभरपासून या प्रकरणाचा मागावा घेत आहे. आर्णी रोडवर असलेल्या फ्रेंडस सायबर कॅफेत महाविद्यालयीन तरूणी व तरूण अश्लील चाळे करीत असल्याची गोपनिय माहीती आज दुपारी एसडीपीओ राहुल मदने यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार एसडीपीओ व वडगाव पोलीसांनी सांयकाळी ६ च्या सुमारास सायबर कॅफेवर धाड टाकली. यावेळी सायबर कॅफे सुरू होते. आतील रूममध्ये पडद्याआड तरूण तरूणींचे अश्लील चाळे सुरू होते. पोलिसांनी सायबर कॅफेचे शेटर बंद करून तीन मुलीसह पाच मुलांना ताब्यात घेतले. त्यांना वडगाव पोलिस ठाण्यात आणण्यात आणले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. सायबर कॅफेला पोलीस खात्याने अनेक नियम आखून दिले असताना, नियमांना डावलून सायबर कॅफे लॉजींगचा व्यवसाय चालवित आहे. या प्रकरणात पोलीस काय कारवाई करते याकडे शहरवासींयाचे लक्ष लागले आहे.
0
वीज पडल्याने सहा ठार, १९ जखमी

यवतमाळ – जिल्ह्यात दीर्घ विश्रांतीनंतर परतलेला पाऊस विजेचे तांडवनृत्य करीत बरसत असल्याने दोन दिवसात जिल्हा हादरला आहे. बुधवारी घाटंजी तालुक्यात वीज पडल्याने चार जणांचा बळी गेल्यानंतर आज गुरुवारीही पुसद उपविभागात वीज पडल्याने सहा जणांना प्राण गमवावे लागले. याशिवाय जिल्ह्यात विविध ठिकाणी वीज कोसळल्याने १९ जण जखमी झालेत. महागाव तालुक्यातील करंजखेड, टेंभी, करंजखेड तांडा, वडद (मुडाणा) येथे विजेच्या तांडवनृत्यात तिघांचा मृत्यू झाला. पुसद तालुक्यातील माळ आसोली व माणिकडोह येथे दोघांचा तर उमरखेड तालुक्यातील धनज येथे वीज पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.
आज दुपारी एक ते दोनच्या सुमारास जिल्ह्यात बहुतांश भागात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. यावेळी महागाव तालुक्यातील टेंभी येथे शेतात पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या रेखा विलास शिंदे (४०) रा. वेणी (बु.) या झाडाखाली उभ्या होत्या. अशातच झाडावर वीज पडल्याने त्या जागीच ठार झाल्या. त्यांच्यासोबत असलेली सुमन दिगांबर वानखेडे रा. टेंभी ही महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.
दुसºया घटनेत करंजखेड येथील दत्तराव भांगे यांच्या शेतात वीज कोसळली. यामध्ये गजानन रामचंद्र जाधव (२४ ), संतोष राघो दातकर (२५) हे जागीच ठार झाले. तर बाबाराव कानबा बोरकर (५०), मारोती तुकाराम जाधव (४० ) जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. तिसºया घटनेत करंजखेड (तांडा) येथे वीज पडून अनिता रामराव राठोड, अनू साहेबराव राठोड, मारूबाई सुरेश राठोड, नीता पंडित राठोड, सुरेश थावरा राठोड, सुनील सुरेश राठोड, सती उल्हास राठोड, सुशील विजय राठोड, ताई सुरेश राठोड, बंडू बंशी राठोड हे जखमी झाले. चौथ्या घटनेत वडद (मु.) येथील खंडू उमाजी जटाळे यांच्या मालकीच्या बैलाचाही वीज कोसळून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच टेंभी येथील ग्रामपंचायत सदस्य पंडित वानखेडे, गणेश सुकळकर, सीताराम ठाकरे, पंचायत समिती सदस्य संदीप ठाकरे, सरपंच भरोश चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली.
पुसद तालुक्यातील माळ आसोली येथे दुपारी दीड वाजताच्या सुमारास वीज कोसळून किशोर राठोड (१८) हा ठार झाला. याच तालुक्यातील माणिकडोह येथील तुकाराम सखाराम पवार (५५) हा ही वीज कोसळल्याने ठार झाला. माधव पंडागळे (६०) रा. पांढुर्णा केदारलिंग हा वीज कोसळल्याने गंभीर जखमी झाला. उमरखेड तालुक्यात दुपारी १ वाजता झालेल्या विजेच्या तांडवनृत्यात वत्सलाबाई संभाजी शेळके (४०) रा. धनज ही महिला अंगावर वीज कोसळून ठार झाली. कळंब तालुक्यातील गांधीनगर येथील शाळेच्या छपरावर वीज कोसळल्याने एक विद्यार्थी जखमी झाल्याची घटना घडली. गेल्या दोन दिवसात वीज कोसळण्याच्या घटनेत वाढ झाल्याने जिल्हा हादरला आहे.
0
बहिष्कार, काळ्या झेंड्यांनी गाजला मोदींचा विदर्भ दौरा

नागपूर – मेट्रोच्या भूमिपूजनासाठी विदर्भात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमावर राज्यातल्या आघाडी सरकारने बहिष्कार घातल्याचे आज दिसून आले. मौदा येथे एनटीपीसीच्या वीजनिर्मिती प्रकल्पाचे लोकार्पण आणि नागपूर मेट्रोच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अथवा आघाडी सरकारमधील एकही मंत्री दिसला नाही. नागपूर शहरात मोदी यांना काळे झेंडे दाखविण्यात आले होते. या निदर्शकांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नागपूर आणि परिसरात भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. एनटीपीसीच्या पाचशे मेगावॉटच्या दुसऱ्या युनिटचे लोकार्पण, नागपूर मेट्रोचे भूमिपूजन, पारडी येथे ४६९ कोटी रुपयांचा अंडरब्रिजच्या बांधकामाचा समावेश होता. मात्र या कार्यक्रमांना उपस्थित न राहण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी काल, बुधवारी जाहीर केला होता. सोलापूर येथे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांमध्ये जुगलबंदी रंगली होती. शिवाय हरियाणामध्ये पंतप्रधानांच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री हुड्डा यांच्याविरोधात घोषणा देण्यात आल्या होत्या. या घटनांच्या पार्श्वभूमिवर राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता.
मोदींना काळे झेंडे दाखविले कॉंग्रेसच्या मुख्यमंत्र्यांना अपमानाची वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप करत कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी नागपुरात दोन ठिकाणी मोदींविरोधात निदर्शने केली. कस्तुरचंद पार्कमध्ये मोदींचा कार्यक्रम सुरु असताना जवळच रिझर्व बँक चौकात कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी काही कार्यकर्त्यांसोबत मोदींविरोधात घोषणा देत काळे झेंडे दाखविले.
त्या आधी विमानतळावरून कार्यक्रमाच्या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या गाड्यांचा ताफा चालला असताना माजी मंत्री अनिस अहमद यांनी काळे झेंडे दाखविले होते. नंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटक केली.
0
वीज कोसळून चार ठार

यवतमाळ – घाटंजी तालुक्यातील रायसा व सगदा येथे शेतात वीज पडल्याने दोन महिलांसह दोन मुली ठार झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी चार वाजताचे दरम्यान घडली आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
रायसा येथील शेतकरी विजय बाबाराव मंगाम यांच्या शेतात त्यांची पत्नी गिता विजय मंगाम (३५), परिंदा लक्ष्मण मंगाम (१३) व ममता बाबाराव मंगाम (१४) ह्या कामे करीत होत्या. अशातच दुपारी तीन वाजताच्या सुमारास आकाशात ढगाळ वातावरण तयार होऊन जोरदार पाऊस सुरू झाला. यावेळी वीज कोसळल्याने त्या तिघीही घटनास्थळीच ठार झाल्या. तर पारवा परिसरातीलच सगदा येथे दुपारचे दरम्यान मलकन्ना बंकीनवार यांच्या शेतात वीज पडल्याने मीरा नारायण आदीरकार (५२) ही महिला ठार झाली आहे. या घटनेची वार्ता पसरताच तालुक्यात शोककळा पसरली आहे. याघटनेची माहिती मिळताच तहसीलदार एम.एम. जोरवर, पंचायत समिती सभापती रुपेश कल्यमवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
0
न्यायालयात महिलांचे शोषण, न्यायाधीश निलंबित

मुंबई- मुंबई शहर सत्र आणि दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश एम. टी. गायकवाड यांना महिलांचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून निलंबित केले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रार जनरल शालिनी फनसळकर- जोशी यांनी या वृत्तला दुजोरा दिला आहे.
या महिलेने न्यायालयातच लैंगिक शोषण केल्याचे गंभीर आरोप केल्यानंतर या प्रकरणाची प्राथमिक चौकशी न्यायाधीश एस. डी. तुलनकर यांच्यामार्फत करण्यात आली. यात गायकवाड यांनी संबंधित महिलेचे लैंगिक शोषण केल्याचे तसेच महिलेने केलेल्या आरोपात प्रथमदर्शिनी तथ्य असल्याचे आढळल्याने गायकवाड यांना निलंबित केले आहे. गायकवाड मुंबईतील शहर सत्र आणि दिवाणी न्यायालयातील विशेष नार्कोटीक विभागाच्या न्यायालयात न्यायाधीश आहेत. न्यायालयात काम करणा-या कनिष्ठ कर्मचारी महिलेने गायकवाड यांनी कार्यालयातच गैरवर्तन करुन लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. या महिलेच्या तक्रारीची खातरजमा केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने गायकवाड यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित केले आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गायकवाड यांची विभागीय चौकशीही करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न्यायाधीश तुलनकर यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत कार्यालयातील अन्य काही महिलांनीही गायकवाड हे कार्यालयातील महिला कर्मचा-यांसोबत अनुचित गैरवर्तन करत असल्याचे सांगण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधिशांमार्फत नियुक्त करण्यात येणा-या वरिष्ठ न्यायमुर्तींच्या अध्यक्षतेखाली गायकवाड यांची विभागीय चौकशीही करण्यात येणार आहे.
0
१८ वर्षांनी सापडला ‘त्या’ जवानाचा मृतदेह

श्रीनगर,दि. २० – काश्मीरमधील सियाचीन येथील बर्फाच्छादित प्रदेशात बेपत्ता झालेल्या भारतीय जवानाचा मृतदेह तब्बल १८ वर्षांनी सापडला असून बुधवारी त्या जवानाचे पार्थिव उत्तरप्रदेशमधील मूळगावी नेण्यात आले आहे.
भारतीय सैन्याच्या १५ राजपूत रेजिमेंटमधील हवालदार गया प्रसाद हे १९९६ मध्ये सियाचीन येथे बेपत्ता झाले होते. सैन्याच्या जवानांनी त्यांचा शोधही घेतला पण यात त्यांना अपयश आले. गया प्रसाद हे मुळचे उत्तरप्रदेशमधील मणिपूरी येथील रहिवासी होते. गया प्रसाद यांचे मृत्यू झाल्याचे त्यांच्या कुटुंबीयांना सांगण्यात आले होते. मात्र गया प्रसाद यांचा मृतदेह आढळला नव्हता. ‘माझ्या मुलाचा मृत्यू झाला हे आम्हाला माहित होते. पण त्याच्यावर अंत्यसंस्कार करता आले नाही याची खंत आम्हाला वाटत होती असे गया प्रसाद यांचे वृद्ध वडिल सांगतात. गया प्रसाद यांचे पार्थिव बुधवारी त्यांच्या मुळगावी आणण्यात आले. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी सियाचीनमध्ये पेट्रोलिंग करणा-या जवानांना बर्फात हात दिसला. या जवानांनी थोडे खणले असता बर्फाच्या खाली गया प्रसाद यांचा मृतदेह आढळला. मृतदेहाजवळील ओळखपत्रावरुन गया प्रसाद यांची ओळख पटली. बर्फाच्छादीत परिसर असल्याने मृतदेह दिर्घकाळ टिकून राहतात. या भागात अनेक जवानांचे मृतदेह आढळले आहेत असे सैन्यातील एका अधिका-याने सांगितले. गया प्रसाद यांच्या पश्चात पत्नी रमा देवी, मुलगा सतीश आणि मुलगी मीना आणि मंजू असा परिवार आहे.
आंतरराज्यीय चेकपोस्टचे सहा लाख लुटले पाटणबोरी येथील घटना
यवतमाळ – पाटणबोरी येथून तीन किमी अंतरावर महाराष्टÑ-आंध्रप्रदेश सीमेवर असलेल्या आंतरराज्यीय चेकपोस्टवर जमा झालेली सहा लाख रूपयांची रोकड बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना वाहन अडून दोन युवकांनी लुटल्याची घटना आज मंगळवारी दुपारी घडली.
पाटणबोरीनजीक पिंपळखुटी येथे महाराष्टÑ शासनाचा अत्याधुनिक चेकपोस्ट नाका आहे. तो सद्भाव कंपनीमार्फत चालविला जातो. या चेकपोस्टवर प्रत्येक वाहनचालकाकडून ९० रूपये व अधिक सेवाशुल्क आकारले जाते. तसेच ओव्हरलोड वाहनांकडून दंडही आकरण्यात येतो. येथे दररोज दीड ते पाऊणे दोन लाख रुपये रक्कम जमा होते. ही रक्कम सद्भाव कंपनीचा व्यक्ती दररोज यवतमाळ येथे जाऊन आयसीआयसीआय बँकेत भरणा करतो.
आज मंगळवारीसुद्धा नेहमीप्रमाणे सकाळी १०.१५ वाजता कंपनीतील प्रवीण राऊत (वय २२) रा. यवतमाळ हा युवक ५ लाख ६५ हजार रूपयांची रोकड घेवून यवतमाळला निघाला. चेकपोस्टवरून एका स्कुटीवर तो पाटणबोरी येथे आला. पाटणबोरी येथे आल्यानंतर तेलंगणा बंदमुळे त्याला आंध्रची बस मिळाली नाही. पाटणबोरीकडून पांढरकवड्याकडे जाणाºया एका दोन दुचाकीस्वारांनी त्याला आपल्या वाहनावर घेतले. ढोकीच्या अलीकडे एका बंद ढाब्यामागे सदर युवकांनी गाडी भरधाव वेगाने नेऊन थांबविली. एका युवकाने त्याची बॅग हिसकावली व एकाने त्याला दगडाने डोळ्याजवळ दुखापत केली. प्रवीणला मारहाण करून दोन्ही युवक पांढरकवड्याकडे स्प्लेंडर दुचाकीने पसार झाले. सदर दोन्ही युवक ३० वर्ष वयाचे आहेत. बॅगमध्ये संपूर्ण १०० रुपयांच्या नोटा मिळून ५.६५ लाख रुपये होते. या घटनेची तक्रार पांढरकवडा पोलिस ठाण्यात दिली असून अज्ञात आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल केला.
0
भारतीय क्रिकेट संघाच्या संचालकपदी रवी शास्त्री

नवी दिल्ली – कसोटी मालिकेत इंग्लंडकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाने भारतीय संघ व्यवस्थापनात काही महत्वाचे बदल केले आहेत.
इंग्लंड विरुध्दच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांची भारतीय क्रिकेट संघाच्या संचालकपदी निवड करण्यात आली आहे. या मालिकेत डंकन फ्लेचरच मुख्य प्रशिक्षक असतील. मात्र भारतीय संघाशी संबंधित सर्व निर्णयांमध्ये रवी शास्त्रींचाही सहभाग असेल. या मालिकेपुरता गोलंदाजी प्रशिक्षक ज्यो डॉस आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ट्रेव्हर पेनी यांची जागा संजय बांगर आणि भारत अरुण घेणार आहे. डॉस आणि पेनी यांना या मालिकेत विश्रांती देण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. २५ ऑगस्टपासून सुरु होणा-या एकदिवसीय मालिकेत बांगर आणि भारत अरुण फ्लेचर यांचे सहप्रशिक्षक असतील. २००७ मध्ये बांगलादेश दौ-यात रवी शास्त्री भारतीय संघाचे हंगामी प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक होते. आयपीएलच्या २०१४ च्या हंगामात संजय बांगर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या प्रशिक्षकपदाखाली पंजाब संघाने पहिल्यांदाच आयपीएलची अंतिम फेरी गाठली होती. २०१२ मध्ये ऑस्ट्रेलिया दौ-यात भारत अरुण भारताच्या १९ वर्षाखालील संघाचे प्रशिक्षक होते. बांगर आणि अरुण यांच्याबरोबर आर.श्रीधर क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील.
0
पाकिस्तानातील हवाई हल्ल्यात ४८ अतिरेकी ठार

इस्लामाबाद – पाकिस्तानातील वायव्य भागातील आदिवासी प्रदेशावर लढाऊ विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यात ४८ अतिरेकी ठार झाले आहेत.
उत्तर वाझिरीस्तान आणि खैबर या आदिवासी प्रदेशात या अतिरेक्यांनी आश्रय घेतला होता. या भागात पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यात ४८ अतिरेकी ठार झाल्याची माहिती लष्कर प्रवक्त्यांनी दिली. ‘तीस आणखी अतिरेकी ठार झाले. तसेच नऊ वाहने आणि काही मोटरसायकल या हल्ल्यात नष्ट झाल्याचे त्यांनी सांगितले. याआधी मंगळवारी सकाळी उत्तर वाझिरीस्तान आणि खैबर येथे लपलेले १८ अतिरेकी पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात ठार झाले होते. कराची येथील विमानतळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने उत्तर वाझिरीस्तानमध्ये कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत या कारवाईत ६५० अतिरेकी ठार झाले आहेत.
0
व्हॉट्स अॅप, लाइन, वीचॅट, स्काइप व वाइबर मोफतच

नवी दिल्ली- व्हॉट्स अॅप, लाइन, वीचॅट, वाइबर, स्काइपसारख्या अॅप्सला शुल्क आकारण्याची मोबाईल कंपन्यांची मागणी टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरीटी ऑफ इंडिया (ट्राय) ने फेटाळून लावल्याने हे सर्व अॅप ग्राहकांना मोफत उपलब्ध रहाणार आहेत. फ्री मेसेजिंग अॅप्समुळे मोबाईल कंपन्यांचे मोठे नुकसान होते, ते भरून काढण्यासाठी शुल्क आकारण्याची मागणी मोबाइल कंपन्यांनी केली होती.
व्हॉट्स अॅप, लाइन, वीचॅट, वाइबर, स्काइपसारख्या अॅपमुळे एसएमएस आणि कॉलचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मोबाइल सर्व्हिस देणा-या कंपन्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. हे नुकसान भरून काढण्यासाठी शुल्क आकारण्याची मागणी मोबाइल कंपन्यांनी ट्रायकडे केली होती. या कंपन्यांकडून आकारल्या जाणा-या शुल्काचा काही हिस्सा मोबाइल कंपन्यांना देण्यात यावा आणि काही हिस्सा सरकारने घ्यावा, अशी मागणी या कंपन्यांनी केली होती.हे अॅप निशुल्क असले तरी ते वापरण्यासाठी संबंधित ग्राहकाला मोबाईलमध्ये इंटरनेट वापरणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्राहकाला अतिरिक्त पैसे मोजावे लागतात, असे ट्रायच्या निदर्शनास आले. त्यामुळे मोबाईल कंपन्यांना अतिरिक्त पैसे देण्याचा प्रश्नच येत नसल्याचे ट्रायचे म्हणणे आहे.तर हे फ्री मेसेंजर अॅप्स ज्या टेलिकॉम ऑपरेटर कंपनीचे नेटवर्क वापरतात त्या कंपन्यांना नेटवर्क वापरण्याचे पैसे द्यावेत अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, फ्री अॅप्सवर शुल्क लावण्याची मोबाईल कंपन्यांची मागणी आणि ट्रायकडे प्रस्तावित असलेला प्रस्ताव ‘ट्राय’ने फेटाळून लावला आहे. इस्टंट मेसेजिंगच्या दुनियेतील अल्पावधितच प्रसिद्ध झालेल्या व्हॉटस अॅप, लाइन, वीचॅट, वाइबर, स्काइपसारख्या अॅपने मोबाईल कंपन्यांची झोप उडवली आहे. ब्राझील, भारत, मेक्सिको, रशिया यांसारख्या देशात व्हॉटस अॅप युझर्सची संख्या झपाट्याने वाढते आहे. जगभरात व्हॉट्स अॅपचे दर महिन्याला ४५ कोटी इतेक अॅक्टिव युझर्स आहेत. दर दिवसाला व्हॉट्स अॅपवरुन सुमारे ७० कोटी फोटो आणि १० कोटी व्हिडीओ शेअर केले जातात. याआधी फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक युझर्स असलेल्या फेसबुकला व्हॉटस अॅपने १९ अब्ज डॉलर मोजून खरेदी केले होते.
0
अल्पवयीन मुलांकडून महिलांवर होणा-या अत्याचारात वाढ

नवी दिल्ली – अल्पवयीन मुलांकडून महिलांवर होणारा अत्याचार, बलात्कारांच्या संख्येत गेल्या काही वर्षात मोठी वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलांकडून महिलांवर होणा-या अत्याचारात १३२ टक्क्यांपर्यत वाढ झाल्याचे अहवालात दिसून येत आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या अहवालानुसार २०१३मध्ये अल्पवयीन मुलांकडून महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केल्याच्या घटना घडल्या. २०१३ मध्ये अल्पवयीन मुलांकडून महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण १३२.३ टक्के होते तर विनयभंगाच्या घटनांचे प्रमाण ७०.३ टक्के तर बलात्काराच्या ६०.३ टक्के घटना घडल्या. भारतीय दंड विधानानुसार गुन्हेगार ठरवण्यात आलेली ६६.३ टक्के अल्पवयीन मुले ही १६-१८ वयोमर्यादेतील असतात. २०१३ मध्ये ३१ हजार ७२५ विविध गुन्ह्यांच्या प्रकरणांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश होता तर त्याआधी २०१२ मध्ये हेच प्रमाण २७ हजार ९३६ इतके होते. २०१२ च्या तुलनेत २०१३ मध्ये हे प्रमाण १३.६ टक्क्यांनी वाढले. विविध गुन्ह्यांमध्ये सहभाग असलेल्या एकूण ४३हजार ५०६ अल्पवयीन मुलांपैकी आठ हजार ३९२ ही अशिक्षित आहेत तर १३ हजार ९८४ मुलांनी केवळ प्राथमिक शिक्षण घेतले आहे.
0
फुटबॉल- भारताची विजयी सलामी

गलोर- भारताच्या २३ वर्षाखालील फुटबॉल संघाने मैत्रीपूर्ण मालिकेतील सलामीच्या लढतीत रविवारी पाकिस्तानचा १-० पराभव केला. पहिले सत्र संपायला काही सेकंद बाकी असताना कर्णधार सुनील छेत्रीने केलेला गोल मोलाचा ठरला.
भारताला सामन्यात मिळालेल्या गोलांच्या अनेक संधी पाहता मोठय़ा फरकाने विजय शक्य होता. मात्र भारताचे अन्य फुटबॉलपटू गोल करण्यात अपयशी ठरले. त्यातच ६९व्या मिनिटाला दुस-यांदा पिवळे कार्ड दाखवले गेल्यामुळे रॉबिन सिंगला मैदान सोडावे लागले. त्यामुळे उर्वरित २० मिनिटे १० जणांसह खेळण्याची वेळ यजमानांवर आली. अखेरच्या काही मिनिटांमध्ये कर्णधार कालीमुल्लासह पाकिस्तानलाही गोलच्या दोन संधी होत्या. मात्र भारताच्या बचावपटूंनी अभेद्य बचाव केला. गोलकीपर अमरिंदरनेही काही चांगले ‘सेव्ह’ केले. राल्टे, देसाई यांनीदेखील गोलसाठी काही चांगले प्रयत्न केले.
विजयी प्रारंभासह दोन सामन्यांच्या मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली. मालिकेतीव दुसरी लढत बुधवारी बंगलोर स्टेडियमवरच खेळण्यात येणार आहे. पुढील महिन्यात इन्चॉनमध्ये (दक्षिण कोरिया) होणाऱ्या एशियाडची तयारी म्हणून या दोन सामन्यांकडे पाहण्यात येत आहे. त्यातच भारत सुरुवातीपासून पाकिस्तानविरुद्ध विजयाचा दावेदार राहिला आहे. उभय संघांमध्ये येथील लढतीसह आतापर्यंत झालेल्या ३२ सामन्यांमध्ये भारताचे १९ विजय असून पाकिस्तानचे पाच विजय आहेत.
0
पाकिस्तानचा भारताच्या २० चौक्यांवर गोळीबार

जम्मू – पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असून, रविवारी रात्री पाकिस्तानी सैन्याने जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळील वीस भारतीय चौक्यांवर आणि नागरी वस्त्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात एक गावकरी जखमी झाला आहे.
पाकिस्तानी रेंजर्सनी अर्निया आणि आरएस पूरा सेक्टरमधील भारतीय़ चौक्यांना लक्ष्य केले. पाकिस्तानने स्वयंचलित शस्त्रास्त्रांनी गोळीबार करताना उखळी तोफांचाही मारा केला अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिका-याने दिली. सीमेवर तैनात असणा-या बीएसएफ जवानांनीही स्वयंचलित शस्त्रास्त्रांचा वापर करत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले. रविवारी रात्री सुरु झालेला गोळीबार सोमवारी सकाळी साडेसहा वाजता थांबला. अतार सिंह हा गावकरी या गोळीबारात जखमी झाला. पाकिस्तानने चौक्यांबरोबर नागरी वसत्यांवरही गोळीबार केला. या वर्षात पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यातील हा सर्वात मोठा हल्ला केला. येत्या २५ ऑगस्टला भारत आणि पाकिस्तानमध्ये परराष्ट्र सचिव स्तरावरील चर्चा होणार आहे. त्यापूर्वी पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. मागच्या दहा दिवसात पाकिस्तानने अकरावेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.
0
दहीहंडी उत्सव, ३३ गोविंदा जखमी

मुंबई – दहीहंडी फोडण्यासाठी मनोरे रचताना थरांवरुन कोसळून आतापर्यंत मुंबईतील ३३ गोविंदा जखमी झाले आहेत. त्यातील ३२ गोविदांना केईएम आणि एका गोविंदाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी गोविंदांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी केईएम, सायन आणि नायर रुग्णालयात विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत.
‘बोल बजरंग बली की जय..अरे बोल बजरंग बली की जय’चा गल्लीबोळात घुमणारा नारा, सलामी दिल्यानंतर किंवा हंडी फोडल्यानंतर डिजेच्या तालावर थिरकरणारी पावले, उंचावर बांधलेली हंडी फोडण्यासाठी थरावर थर रचणारा गोविंदा आणि रस्त्यावर थांबून दहीहंडीचा थरार अनुभवणारे सर्वसामान्य हा सारा माहौल आहे मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीतला.
दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात सुरु आहे. गुरुपौर्णिमेपासून कसून सराव करणारी मंडळे लाखो रुपयांचे लोणी असलेल्या हंड्या फोडण्यासाठी बाहेर पडली आहेत. दहीहंडी उत्सवातील बालगोविदांचा सहभाग आणि लाखो रुपयांच्या बक्षीसांसाठी गोविंदा मंडळांमध्ये सुरु झालेली जीवघेणी स्पर्धा यामुळे यंदाचा दहीहंडी उत्सव वादाच्या भोव-यात सापडला होता.
कोपरी ठाणे पूर्व बाजारपेठेतील दहीहंडी महिला गोविंदा पथकाने फोडली..
मुंबई उच्च न्यायालयाने दहीहंडी उत्सवावर निर्बंध आणल्यानंतर काही प्रमुख आयोजकांनी आपल्या हंडया रद्द केल्याने यंदा दहीहंडी उत्सव होणार कि, नाही असा प्रश्न निर्माण झाला होता.
सराव करणारे गोविंदाही निराश झाले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्बंधाना वर्षभराची स्थगिती दिल्यानंतर उत्सवावरील अनिश्चिचतेचे सावट दूर झाले. मात्र बारावर्षाखालील मुलांना थरांवर चढवण्यास घातलेली बंदी कायम असून, डीजेच्या दणदणाटावरही मर्यादा घालण्यात आल्या आहेत. प्रसारमाध्यमांनी गोविंदांच्या सुरक्षेचा मुद्दा लावून धरल्याने यंदा प्रमुख आयोजकांनी गोविंदांच्या सुरक्षेसाठी पावले उचलली आहेत. काही आयोजक वरच्या थरावर जाणा-या गोविंदांना सेफ्टी बेल्ट, हेल्मेट देणार आहेत. त्यामुळे दरवर्षी पेक्षा यंदा जखमी गोविंदाचे प्रमाण कमी असेल अशी अपेक्षा आहे. ठाण्यातील जितेंद्र आव्हाड यांच्या संघर्ष प्रतिष्ठान, वरळीमधील सचिनभाऊ अहिर यांची संकल्प प्रतिष्ठान आणि राम कदम यांची घाटकोपर येथील दहीहंडी या महत्वाच्या हंड्या समजल्या जातात. या हंड्यांमध्ये गोविदांना विक्रम रचण्याचे आव्हान देऊन लाखो रुपयांच्या बक्षीसांचे आमिष दाखवले जाते. यंदाच्या दहीहंडी उत्सवात सुरक्षेच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर पोलिस ठाण्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. याशिवाय गोविंदा पथकांचा उत्साह व मोठय़ा हंड्य़ा पाहण्यासाठी येणा-या नागरिकांची संख्या लक्षात घेता ३० हजार मुंबई पोलिसांसह १२०० होम गार्ड व राज्य राखीव पोलिस दलाच्या चार कंपन्यांचीही मदत घेण्यात येणार असल्याची माहिती उपायुक्त (ऑपरेशन) संजय बारकुंड यांनी दिली.
0
नियोजन आयोग गुंडाळणार! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली : गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला नियोजन आयोग गुंडाळून त्याऐवजी नवीन संस्था निर्माण करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या आपल्या पहिल्या भाषणात लाल किल्ल्यावरून केली. विरोधी पक्षांना सोबत येण्याचे आवाहन करून देशातील जातीय आणि धार्मिक हिंसाचार रोखण्याचे आवाहनही त्यांनी केले. देशवासीयांना उद्देशून केलेल्या आपल्या ६५ मिनिटांच्या भाषणात त्यांनी अहिंसा, स्त्रीभ्रूणहत्या, स्वच्छता, उद्योग अशा विविध विषयांवर भाष्य केले. उत्पादन क्षेत्रावर भर देऊन ‘मेक इन इंडिया’चा नारा देत आयात कमी करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही सांगितले. राज्य सरकारांना सोबत घेऊन देशाला प्रगतिपथावर आणण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
मी देशाचा पंतप्रधान म्हणून नव्हे, तर प्रधानसेवक म्हणून तुमच्याशी बोलायला आलोय, असे सांगत मोदींनी भाषणाची सुरुवात केली. भारताला शेतकरी, कामगार वर्गाने घडवले आहे. भारताच्या वाटचालीत सर्व माजी पंतप्रधानांचे मोलाचे योगदान आहे. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना आणि देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना मी वंदन करतो, असेही मोदी म्हणाले. सरकार सर्व पक्षांना घेऊन पुढे चालत असून, विरोधी पक्षांनी दिलेल्या सहमतीसाठी मोदींनी त्यांचे आभार मानले.
ते म्हणाले की, देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी राज्यांनाही सोबत घेऊ. त्यासाठी गेल्या ६० वर्षांपासून सुरू असलेल्या व्यवस्थेत थोडा बदल करावा लागेल. नियोजन आयोग बरखास्त करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे आगामी काळात नियोजन आयोग बरखास्त करून त्याऐवजी नवीन संस्था निर्माण करू. यात राज्य सरकारलाही स्थान दिले जाईल, अशी शाश्वतीही त्यांनी दिली. ही नवीन संस्था सरकारी-खासगी भागीदारी आणि तरुणांतील ऊर्जेचा योग्य प्रकारे वापर करण्यावर भर देण्यासह नवीन संकल्पना मांडण्यासाठी काम करेल, असेही ते म्हणाले.
0
देवभूमीत पुन्हा पूर, ३० ठार

देहरादून – देवभूमीत पुन्हा एकदा पावसाचा कहर सुरू असून ढगफुटी आणि धोधो पावसामुळे आलेल्या पुरात आतापर्यंत ३० जणांना प्राण गमवावे लागले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, येत्या २४ तासांत उत्तराखंडमध्ये पावसाचा जोर कायम राहिल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
गेल्यावर्षी महाप्रलयाचा तडाखा बसलेल्या उत्तराखंडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पुराने थैमान घातले आहे. भूस्खलनामुळे अनेक रस्ते बंद झाले आहेत. अनेक घरंही मातीच्या ढिगाऱ्यांखाडी दबली आहेत. रस्त्यांवर कोसळलेल्या दरडींमुळे मदतकार्यातही मोठे अडथळे येत आहेत.
पौडी गढवाल जिल्ह्यातील यमकेश्वर क्षेत्राला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. पावसाच्या तडाख्यात या एकाच जिल्ह्यात १४ जण ठार झाले आहेत. आणखीही काही जण दरडींखाली दबले असण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. हरिद्वारमधील हैनपुरी या संपूर्ण गावाला पूराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. गावातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
0
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा हल्ला, दोन जवान शहीद

जम्मू काश्मीरमधील अवतीपोरा येथील भारतीय हवाई दलाच्या अड्ड्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवानांचा मृत्यू झाला.
श्रीनगर- जम्मू काश्मीरमधील अवतीपोरा येथील भारतीय हवाई दलाच्या अड्ड्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सीमा सुरक्षा दलाच्या दोन जवान शहीद झाले. या हल्ल्यात अन्य चार जण जखमी झाले आहेत.
पुलवामा जिल्ह्यातील हवाई दलाच्या या अड्ड्यावरील बीएसएफ जवानांवर दहशदवाद्यांनी आधुनिक शस्त्रांसह गोळीबार केल्याचे अधिका-यांनी सांगितले. हवाई दलाच्या या अड्ड्यावर बीएसएफची १६५वी तुकडी तैनात होती. जखमींना हवाई अड्ड्यावरील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेल्या आठवड्याभरातील दहशतवाद्यांकडून झालेला हा तिसरा हल्ला आहे. याआधी ११ ऑगस्ट रोजी बीएसएफ जवानांच्या बसवर हल्ला करण्यात आला होता. त्यात आठ जण जखमी झाले होते.











