
स्वित्झर्लंडमधील मोलेसन डोंगरखो-यात व्यावसायिक गिर्यारोहक सॅम्युल मेटझगर साहसी थरार करताना.
Archive for October, 2014
0
त्या’ डॉक्टरांचे हात तोडेन!

पाटणा-‘गरीबांवर उपचार करण्यास डॉक्टरांनी टाळाटाळ केली किंवा हलगर्जीपणा केला तर त्या डॉक्टरांचे हात तोडून टाकेन,’ अशी धमकी बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनी दिली आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच असे वक्तव्य केल्यामुळे राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील पाकरी दयाल येथे एका रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ‘लोकांनी बोगस डॉक्टरांकडे जाण्याचे टाळावे, त्याऐवजी सरकारी रुग्णालयात जावे, असे सांगून ते म्हणाले, ‘सरकारी रुग्णालयात डॉक्टर उपस्थित नसल्यास, औषधांची सोय नसल्यास किंवा आरोग्य तपासणीची सुविधा नसल्यास थेट जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांकडे तक्रार करा. तिथे तुमच्या तक्रारीचे निवारण न झाल्यास मला पोस्टाने कळवा. मी तत्काळ कारवाई करीन. गरीबांच्या जिवाशी खेळणाऱ्या कुठल्याही डॉक्टरला सोडणार नाही.’
यावेळी त्यांनी आपल्या कठोर स्वभावाचीही आठवण उपस्थितांना करून दिली. ‘मी पाटणा येथील औषध घोटाळ्याचा शोध लावला, त्यावेळी अनेक अधिकाऱ्यांना घरी बसवलं. तसंच पीएमसीएच घोटाळ्याबाबतही कडक पावलं उचलली होती,’ असं त्यांनी सांगितलं.
0
व्हिडिओ शेअरीमध्ये फेसबुक अव्वल

न्यूयॉर्क- व्हिडिओ शेअरीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या युट्यूबला फेसबुककडून येणा-या काळात धोका निर्माण झाल्याचे एका संशोधनातून पुढे आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून फेसबुकवर व्हिडिओ शेअरीग करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे काही काळातच फेसबुक युट्यूबला मागे टाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गेल्या वर्षभरात एक लाख ८० हजार पोस्ट आणि २० हजारहून अधिक फेसबुक पेजेसचा अभ्यास केल्यानंतर हा निकर्ष काढण्यात आला आहे.
इंटरनेट युझर्स व्हिडिओ थेट फेसबुकवर अपलोड करत आहेत. याचाच अर्थ असा होतो की युझर्स युट्यूबपेक्षा व्हिडिओ शेअर करण्यासाठी फेसबुकला प्राधान्य देत आहेत.
युट्यूबसाठी ही धोक्याची घंटा आहे. यामुळे युट्यूबवरील व्हिडिओ शेअरिंगचा काही टक्का फेसबुककडे वळू शकतो. सप्टेंबर महिन्यात एक बिलियन व्हिडिओ अपलोड झाल्याचे फेसबुकने म्हटले आहे.
0
जयललिता तुरुंगातून बाहेर

बंगळूरु – सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांचा जामीन मंजूर केल्यानंतर बंगळूरुच्या विशेष न्यायालयाने त्यांच्या सुटकेचे आदेश दिले होते. शनिवारी दुपारी जयललिता कारागृहाबाहेर येताच अण्णाद्रमुकच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. मागच्या वीस दिवसापासून त्या तुरुंगात बंद होत्या.
न्यायालयाच्या आदेशानुसार जयललिता यांनी दोन कोटी रुपयांचा जातमुचलका भरण्यास तयारी दर्शवल्याने विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती जॉन मिशेल कुन्हा यांनी हे सुटकेचे आदेश दिले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची एक प्रतही जयललिता यांच्या वकिलांनी विशेष न्यायालयासमोर सादर केली होती.
जयललिता यांचे निकटवर्तीय शशिकला आणि नातेवाईक सुधाकरन आणि इरावरसी यांनीही जामिनाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केल्याने त्यांच्याही सुटकेचे आदेश देण्यात आले आहेत. दुपारनंतर जयललिता तसेच इतर तिघांचीही तुरुंगातून सुटका करण्यात येईल.
२७ सप्टेंबर रोजी ६६.६५ कोटी रुपयांच्या बेहिशोबी मालमत्तेप्रकऱणी जयललिता यांना विशेष न्यायालयाने चार वर्षांचा तुरुंगवास तसेच १०० कोटींची शिक्षा ठोठावली होती. त्यानंतर त्यांनी जामीनासाठी कर्नाटक उच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती. तेथेही याचिका फेटाळून लावल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. अखेर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती देत त्यांना दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला
0
निकालाला उरले काही तास

मुंबई – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर व्हायला काही तासांचा अवधी उरला आहे. अनेक अंगांनी वैशिष्टयपूर्ण ठरलेल्या या निवडणुकीच्या निकालाकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
दोन दशकानंतर महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवल्याने राज्यात कोणाची किती ताकत आहे ते स्पष्ट होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचे शेवटचे ४८ तास उरले असताना, युती-आघाडी तुटली आणि वर्षानूवर्षाचे मित्र स्पर्धक म्हणून परस्परांसमोर उभे ठाकले.
प्रचाराच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपामध्ये विकासाचे मुद्दे बाजूला सरल्याचे दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात वीसहून जास्त सभा झाल्या. यापूर्वीचे पंतप्रधान एका राज्याच्या निवडणुकीत कधीही इतके सक्रीय झाले नव्हते.
पंचरंगी लढत असलेल्या महाराष्ट्रात मतदार कुठल्या एकापक्षाच्या हाती सत्तेच्या चाव्या सोपवणार की, पुन्हा युती-आघाडी करण्याचा कौल देणार ते उद्या स्पष्ट होईल.
महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची मतमोजणी रविवार १९ ऑक्टोबरला होणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघ आणि हरयाणातील ९० मतदारसंघात पार पडलेल्या मतदानाची मोजणी प्रक्रिया रविवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरु होईल.
विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्टात ६३.१३ टक्के मतदान झाले तर हरयाणात ७६.५४ टक्के इतके विक्रमी मतदान झाले. महाराष्ट्रातील २८८ केंद्रांवर ही मतमोजणी पार पडणार आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत निकालाचे चित्र स्पष्ट होईल. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानासोबत १५ ऑक्टोबरला बीड लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही मतदान झाले होते. त्याचाही निकाल रविवारीच स्पष्ट होणार आहे.
दोन दशकानंतर राज्यात प्रथमच सर्वच पक्षांनी स्वबळावर निवडणूक लढवली. भाजपने या निवडणुकीत २८० उमेदवार तर बसपा २६०, सीपीआय ३४, सीपीएम १९, काँग्रेस २८७, राष्ट्रवादी २७८, शिवसेना २८२ आणि मनसेने २१९ उमेदवार रिंगणात उतरवले होते. २८८ जागांसाठी सुमारे चार हजार ११९ उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.
हरयाणातीलही ९० जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर होणार आहेत. रविवारी दुपारी अथवा संध्याकाळपर्यंत हरयाणतील निकालाचे चित्र स्पष्ट होईल. ९० केंद्रांवर ही मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत हरयाणातील एक हजार ३५१ उमेदवार रिंगणात होते. भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सर्व विधानसभा मतदारसंघातून आपले उमेदवार रिंगणात उतरवले होते तर आयएनएलडीने ८८ उमेदवार, बसपाचे ८७, एचजेसी ६५, सीपीएम १७, सीपीआय १४, २९७ नोंदणीकृत पक्षाचे उमेदवार तर ६०३ अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली.
२००९ मधील हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ४० जागांवर विजय मिळवला होता. तर आयएनएलडीने ३१, भाजप ४, एचजेसीने सहा, एसएडी आणि बसपाने प्रत्येकी एक तर सात अपक्ष उमेदवारांनी विजय मिळवला होता.
0
बसपाचे तीन नगरसेवक काँग्रेसला पाठींबा

यवतमाळ : बहुजन समाज पार्टीच्या तीन नगरसेवकांनी काँग्रेस, पिरीपा मित्र पक्षाचे उमेदवार राहुल ठाकरे यांना आपला पाठींबा दिला. नगरसेवक पंकज मेश्राम, विद्यमान शिक्षण सभापती ज्योती आडे, नगरसेवक हरिश पिल्लारे या तिननगरसेवकांसह भाजपा नगरसेविका मिना मसराम यांचे पती राहुल मसराम यांचा समावेश आहे. बसपा नगरसेवकांनी विनाअट पाठींबा दिल्याने राहुल ठाकरेंची बाजू भक्कम झाली आहे.बसपाचे संगटन वाढविण्यासाठी आम्ही जीवाभावाने काम केले. मात्र पक्षश्रेष्ठी व स्थानिक नेतृत्त्वाने कधीही सन्मान केला नाही. परिणामी पक्षाच्या कार्यपद्धतीला कंटाळून हा निर्णय घेतल्याचे त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. काँग्रेसचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाचा सन्मान करणारा व धर्मनिरपेक्ष विचारांना बळ देणारा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बसपाच्या तीन नगरसेवकांसह भाजपा नगरसेविकांच्या पतीच्या पाठींब्यामुळे राहुल ठाकरे यांची बाजू भक्कम झाली आहे.
0
काँग्रेसच्या कार्यकाळात देशाचा विकास – दिग्विजयसिंह

यवतमाळ – काँग्रेसला भ्रष्टाचारी संबोधणाºयाभाजपने अच्छे दिनाचे स्वप्न दाखवून जनतेचा भ्रमनिरास केला आहे. काँग्रेसच्या कार्यकाळातच देशाचा विकास झाला असून त्याचे श्रेय लाटण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत असल्याचा आरोप काँग्रेस कमिटीचे जनरल सेक्रेटरी दिग्विजयसिंह यांनी केला. येथील काँग्रेस कमिटीच्याजिल्हा कार्यालयात आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.
यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राहुल ठाकरे यांच्या प्रचारार्थ ते आले होते.गेल्या साठ वर्षात काँग्रेसने देशाचे वाटोळे केले असल्याचे आरोप भाजप करीत आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरीके त भारत मजबूत आणि विकसित देश असल्याचे बोलतात. मग चार महिन्यात देशाचा विकास झाला का असा प्रश्न दिग्विजयसिंहयांनी उपस्थित केला. धर्माच्या नावावर देशाचे तुकडे करून जातीय तेढ निर्माण करण्याचे काम भाजप करीत असून, त्याला खतपाणी घालण्याचे काम संघ करीत आहे. पंतप्रधान मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत लोकांना उल्लू बनविण्याचे काम करीत असल्याची तोफ डागली. गुजरात विकासाचे मॉडेल म्हणून मिरविण्यात येत आहे. कारण त्याचा प्रचार तसा करण्यात आला. प्रत्यक्षात मात्र महाराष्टÑ गुजरातपेक्षा कितीतरी पटीने समोर आहे. संघ आपली विचारधारा वाढविण्याऐवजी मोदीरिझ्यम वाढवित आहे. महाराष्टÑात काँग्रेस राष्टÑवादी काँग्रेसच्या दबावातून मुक्त झाली असून, काँग्रेसच विकास करणारा पक्ष असल्याचे दिग्विजयसिंह म्हणाले. यावेळी प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे, आ. हरिभाऊ राठोड उपस्थित होते.
0
६ लाखाची देशी दारू जप्त
उत्पादन शुल्कच्या १०७ धाडी, ५७ आरोपींना अटक
यवतमाळ – निवडणुकीच्या अनुषंगाने अवैध मद्य विक्रीवर प्रतिबंध घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने आरंभलेले धाडसत्र सुरुच असून गेल्या दोन दिवसात दोन वेगवेगळ्या धाडीत देशी दारुचे ५९ बॉक्स म्हणजे २८३२ बॉटल्स जप्त करण्यात आले आहे. आचारसंहिता लागल्यानंतर या विभागाने धडक मोहिम राबविले असून त्याअंतर्गत आतापर्यंत १०७ धाडी घालून ५७ आरोपींना अटक केली, तर ६ लाख २३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
काल प्राप्त झालेल्या गुप्त माहितीवरून या विभागाच्या पथकाने सापळा रचुन डोंगरखडा ते राळेगाव रोडवर मजरा गावाच्या शिवारात भरधाव वेगाने जात असलेल्या वाहनाचा ५ किलोमीटर अंतरापर्यंत पाठलाग करून ८ देशी दारुचे बॉक्स आरोपींकडून जप्त केले. मोटर सायकलसह आरोपी नंदकिशोर जयस्वाल, पवन दडमल यांना अटक केली. आज अशाच प्रकारच्या गुप्त माहितीवरून राळेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत असलेल्या कोपरी या गावाच्या हद्दीत एका घरी धाड टाकून देशी दारुचे ५१ बॉक्स जप्त केले. तसेच आरोपी गजानन मारोती पराते व गजानन किसनाजी कुचनकार यांना अटक करण्यात आली. या दारूची किंमत ७६ हजार इतकी आहे. नजीकच्या काळात जिल्ह्यात केलेली जप्तीचीही सर्वात मोठी कारवाई आहे.
प्रथम दर्शनी सदर दारू साठा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारांना वाटप करण्यासाठी पुरविण्यात येणार होता असे आढळून आले आहे. निवडणूकीस अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने ठिकठिकाणी उत्पादन शुल्क विभागाने पथके नेमले असून अवैध मद्य विक्रीवर करडी नजर ठेवली जात आहे. निवडणूक काळात आचारसंहिता लागल्यानंतर आतापर्यंत १२०७ लिटर देशी दारु, २८ लिटर विदेशी दारु, ४५ लिटर बियर, ५५० लिटर हातभट्टी, १२,५२७ लिटर मोहाफुल सडवा जप्त करण्यात आला आहे. तसेच १ मारोती ओमनी, १ मारोती ८०० व १ मोटरसायकलचा समावेश आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी १०७ धाडी घालून ५७ आरोपींना अटक केली तर ६ लाख २३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही अधीक्षक पराग नवलकर यांच्या मार्गदर्शनात निरिक्षक ए.बी. झाडे, ए.एम झुमडे, सुबोधकुमार केडीया, दुय्यम निरिक्षक उमेश शिरभाते, ए.पी. चिटमटवार, सहाय्यक दुय्यम निरिक्षक आर.एम.राठोड तसेच कर्मचारी एस.जी.घाटे, एम.पी.शेडे, ए.पठाण, एम.जी.रामटेके, संदीप मनवर, प्रविण मसराम, साठे, बळीराम मेश्राम, डी.बी.पेंदोर आदी सहभागी झाले होते.
0
भाजपने शिवसेना संपवली असती – उद्धव ठाकरे

मुंबई – शिवसेनेचा २०१६ मध्ये सुवर्णमहोत्सव आहे हा सुवर्णक्षण शिवसेनेचा मुख्यमंत्री साजरा करेल. या सोहळ्यापर्यंत महाराष्ट्रात किमान ५० योजना आम्ही पूर्ण करणार, अशी ‘ती’ महत्वाची घोषण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील जाहीर सभेत केली. भाजपशी या निवडणुकीत युती केली असती तर शिवसेना संपली असती, असा हल्लाबोलही उद्धव यांनी केला. सभेचा शेवट करताना उद्धव आणि आदित्य यांनी जनसमुदायासमोर नतमस्तक होत ‘तुमच्या प्रेमाचा मी कधीही उतराई होऊ शकत नाही’, अशा भावना व्यक्त केल्या.
‘वेडात मराठे वीर दौडले साथ’, असे म्हणून चालणार नाही आता ‘वेडात मराठे वीर दौडले एकसाथ’ असा नारा देत अंगार दाखवा आणि महाराष्ट्रावर भगवा फडकवा. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करणारा. पुढच्या दोन वर्षात उद्याचा महाराष्ट्र कसा असेल हे मी दाखवून देईन. माझी लढाई महाराष्ट्रासाठी आहे. तुम्ही मला प्रेम द्या, तुमचा विश्वसघात होणार नाही याची हमी मी देतो’, अशी सादही उद्धव यांनी महाराष्ट्रातील जनतेला यावेळी घातली.
मोदींच्या सभेला गुजरामधून माणसे आणली!
उद्धव यांच्या भाषणात मोदी आणि भाजपच मुख्य लक्ष्य होतं. सुरुवातीलाच त्यांनी मोदींच्या बोरिवलीतील सभेला गुजरातमधून बसेस भरभरून माणसे आणली गेल्याचा आरोप केला. आजपर्यंत आमचं प्रेम अनुभवलंत आता शिवसेनेच्या अंगाराची धग सोसा, असा इशाराही उद्धव यांनी भाजपला दिला.
0
कॉंग्रेसची भाजपविरुद्ध आयोगात तक्रार

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दौऱ्यात न्यू यॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे केलेल्या भाषणाचा भाजप निवडणूक प्रचारासाठी वापर करत असल्याची तक्रार कॉंग्रेसतर्फे निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. पंतप्रधानांच्या शासकीय दौऱ्यातील भाषणाचा निवडणूक प्रचारासाठी वापर करत असल्याबद्दल आक्षेप घेत ही तक्रार करण्यात आली असल्याची माहिती कॉंग्रेसमधील सूत्रांनी दिली. प्रदेश कॉंग्रेसने राज्य तसंच केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ही तक्रार दाखल केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यू यॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअरवर केलेलं भाषण सध्या विविध न्यूज चॅनेल्सवर दाखविण्यात येत आहे. भाजपतर्फे अशा प्रकारची जाहिरात देण्यात आलेली आहे. लोकसभेत विविध नेत्यांनी केलेली भाषणं निवडणूक काळात प्रचारादरम्यान दाखविण्यावर बंदी असताना शासकीय दौऱ्यातील पंतप्रधानांच्या भाषण दाखविण्यावर कॉंग्रेसने आक्षेप घेतला आहे.
0
पाकिस्तानच्या गोळीबारात पाच ठार, ३४ जखमी
श्रीनगर – सीमावर्ती भागात पाकिस्तान भारतीय सुरक्षा चौक्यांबरोबर नागरी वस्त्यांनाही लक्ष्य करत आहे. सोमवारी पहाटे पाकिस्तानने जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर केलेल्या गोळीबारात पाच गावक-यांचा मृत्यू झाला असून, ३४ जण जखमी झाले आहेत.जम्मूमधील अर्णिया सेक्टरमधील भारतीय चौक्या आणि नागरी वस्त्यांवर पाकिस्तानी रेंजर्सनी अंदाधुंद गोळीबार करताना उखळी तोफांचाही मारा केल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्या प्रवक्त्याने दिली.
रविवारी रात्री दहा वाजल्यापासून पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार सुरु आहे. पाकिस्तानने छोटया, स्वयंचलित शस्त्रांसह उखळी तोफांचा वापर केला. सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी या गोळीबाराल चोख प्रत्युत्तर दिले. अजूनही या भागात दोन्ही बाजूंकडून गोळीबार सुरु आहे.
पंचवीस जखमींना जम्मूच्या जीएमसी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबारात अनेक घरांचे नुकसान झाले आहे असे पोलिस पथकाचे नेतृत्व करणा-या सिंह यांनी सांगितले. गोळीबार सुरु असताना, सिंह यांच्या नेतृत्वाखाली पोलिस पथक धोका पत्करुन घटनास्थळी पोहोचले व जखमींना रुग्णालयात हलवले.
सीमावर्ती भागातील नागरीकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. गोळीबारात भारताचा एकही जवान जखमी झाला नसल्याची माहिती बीएसएफच्या प्रवक्त्याने दिली. मागच्या चार दिवसात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याची ही अकरावी वेळ आहे.
0
डॉ. रविंद्र देशमुख यांचा झंझावात
यवतमाळ – यवतमाळ विधानसभा मतदार संघातून शेतकरी कामगार विकास आघाडी तर्फे आपली उमेदवारी कायम ठेवणाºया डॉ. रविंद्र देशमुख यांच्या प्रचाराचा झंझावात शहरी व ग्रामीण भागात जोर धरत आहे.
३० वर्षाच्या कामगार चळवळीचा अनुभव, विविध संघटनांचा पाठींबा, व्यापक जनसंपर्क ह्या डॉ. रविंद्र देशमुख यांच्या जमेच्या बाजु आहेत. या शिवाय सहकार क्षेत्रामधील त्यांचा २० वर्षाचा अनुभव व सहकार क्षेत्रातील त्यांच्या संपर्कात असलेली मंडळी त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्य करण्याच्या मानसिकतेत आहे. त्यामुळे एक प्रमुख दावेदार म्हणून डॉ. रविंद्र देशमुखांचे नाव पुढे येत आहे. यवतमाळ विधानसभा मतदार संघात बाहेरच्या मतदार संघातील प्रमुख उमेदवार तसेच वारंवार हार पत्करुन पुन्हा नशिब अजमाविणारे उमेदवार प्रमुख पक्षांनी उभे केल्याने मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात क्षोभ निर्माण झाला आहे. त्यामुळे या सुप्त असलेल्या नाराजीला तोंड फुटत आहे. या दृष्टीने चळवळीचा भक्कम वारसा लाभलेले डॉ. रविंद्र देशमुख यांना मदत करणार आहे.
0
बसपा उमेदवारावर खोटे गुन्हे नोंदविणार्यावर कारवाई करण्याची मागणी
यवतमाळ : बहुजन समाज पार्टीचे यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार मो.तारीक मो. शम्मी आणि त्यांच्या भावावर दाखल खोटे गुन्हे नोंदविणार्यांवर कारवाई करावी तसेच या दोघांवरील गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली असल्याचे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
स्थानिक प्रस्थापित पुढार्यांनी अधिकाराचा गैरवापर करत पोलीस विभागातील अधिकार्यांना हाताशी धरून शम्मी यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून घेतले. हा प्रकार राजकीय वाद निर्माण करणारा आहे. निवडणूक काळात उमेदवार आणि पक्ष कार्यकर्त्यांना मानसिक त्रास देण्याचा हा प्रकार असल्याचे यावेळी सांगितले. न्याय न मिळाल्यास आंदोलनात्मक पवित्राही घेतला जाईल, असे यावेळी सांगण्यात आले. पत्रपरिषदेला मो.तारिक मो.शम्मी, राजा गणवीर, शंकर धनकुलवार, प्रदेश सचिव पंडित दिघाडे आदी उपस्थित होते.
0
मतदारांना प्रलोभने दिल्यास तक्रार नोंदविण्यासाठी टोल फ्री क्रमांक
यवतमाळ – विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार अथवा सामान्य नागरीकांना आपल्या तक्रारी तथा सुचना नोंदविता याव्या म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
निवडणुकीदरम्यान मतदारांना प्रलोभने दिली जाण्याची शक्यता आहे. मतदानाचा दिवस जवळ आल्यानंतर मतदारांना पैसे, भेटवस्तू अशा प्रकारची आमिषे दाखविली जातील. असा प्रकार उघडकीस आल्यास किंवा प्रत्यक्ष पाहण्यात आल्यास नागरीकांना ०७२३२-२३९७००, २५५०७७, २४०७२० या टोल फ्री क्रमांकावर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच निवडणूकीच्या कालावधीत अवैध दारू विक्री, संशयीत वस्तू किंवा शस्त्रास्त्रे इत्यादीबाबी आढळल्यासही वरील क्रमांकावर कळविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेससोबत १२ पक्ष जुळले
यवतमाळ -विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदिप बाजोरीया यांना विजयी करण्यासाठी व धर्मनिरपेक्ष मताचे विभाजन होऊ नये यासाठी राज्यातील १२ पक्ष राष्ट्रवादी काँग्रेससोबत जुळल्याची माहिती प्रवक्ता सुरेश चिंचोळकर यांनी दिली.
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (एकतावादी)चे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे, रिपब्लिकन पार्टी (धर्मनिरपेक्ष – कर्मवीर दादासाहेब गायकवाड) चे राष्ट्रीय अध्यक्ष पी. के. गायकवाड, राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे, रिपब्लिकन आॅफ इंडिया (एस) चे अध्यक्ष सुरेश वाघमारे, ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे दिनेश गोडवाटे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे काकासाहेब खंबाळकर गट, दलित पँथरचे सुखदेव (तात्या) सोनवणे, रिपब्लिकन क्रान्ती सेनेचे संजय गंगावणे, ख्रिश्चन कम्युनिटी वेल फेअर कौंसील आॅफ इंडिया चे जोसेफ लॉरेन्स मलबारी, भारतीय होलार समाज संघाचे माणिक भंडगे, महाराष्ट्र परिवर्तन सेनेचे अध्यक्ष धनराज थोरात, महाराष्ट्र बॅन्ड कलाकार उत्कर्ष संघटनेचे विजय खंडागळे या पक्षाच्या अध्यक्षांनी आपला पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसला जाहीर केला आहे. जिल्ह्यातील या पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी फिरत आहे. यवतमाळ विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार संदीप बाजोरीया यांच्या प्रचारार्थ बाराही पक्षाचे पदाधिकारी विविध भागात पोहोचले असल्याची माहिती पक्षाचे प्रवक्ता सुरेश चिंचोळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून
यवतमाळ – वडगावजंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाºया चिचघाट येथे एका इसमाने सुरीने वार करून पत्नीचा खून केल्याची घटना दसºयाच्या दिवशी ३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता घडली.
अनिता विजय राठोड (३५) असे मृत महिलेचे नाव आहे. १९९५ मध्ये आरोपी विजय नारायण राठोड (४३) रा. किन्हाळा याच्यासोबत तिचा विवाह झाला असून तीन मुले आहेत. विजय हा पत्नी अनिताच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्यासोबत सतत वाद करीत होता. २ आॅक्टोबर रोजी भावाच्या मुलाचा जावळे काढण्याचा कार्यक्रम असल्याने ती तिन्ही मुलांना घेऊन माहेरी चिचघाट येथे आली होती. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर दसºयाच्या दिवशी आरोपीने पत्नीला घरी चालण्याची विनंती केली. मात्र तिने नकार दिल्याने तो एकटाच किन्हाळा येथे परत गेला. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता तो चिचघाट येथे आला आणि झोपून असलेल्या पत्नी अनिताच्या छातीवर व बरगडीवर सुºयाने सपासप वार करून गंभीर जखमी केले. यावेळी नातेवाईकांनी तिला यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाला. या घटनेची वार्ता गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळासह रुग्णालयात धाव घेतली. पुनाजी सवाई जाधव (६५) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वडगाव जंगल पोलिसांनी आरोपी विजय राठोड याच्याविरूद्घ भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस निरीक्षक गजानन खारडे यांनी तपासचक्रे फिरवून आरोपीस अटक केली. त्याला न्यायालयात हजर करून ६ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळवून या घटनेत वापरेला सुरा जप्त केला.
0
दुर्गादेवी विसर्जनादरम्यान युवकाचा खून
यवतमाळ – दुर्गादेवीच्या विसर्जनादरम्यान नाचण्याच्या वादातून युवकाचा खून करण्यात आल्याची घटना गुरुवारी रात्री १० वाजता दरम्यान चमेडीयानगरात घडली. धनराज पचारे (२६) रा. डोर्लीपुरा, असे मृताचे नाव आहे.
गुरुवारीरात्री दरम्यान दुर्गादेवीच्या विसर्जनासाठी मिरवणूक निघाली असताना धनराज व शंकर नेवारे या दोघात नाचण्याच्या कारणातून वाद निर्माण झाला. या वादाचा वचपा म्हणून शंकर नेवारे या युवकाने धनराजला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. याप्रकरणी राहुल अभिमान पचारे याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून शंकर नेवारे (१९)रा. डोर्लीपुरा याच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहे.
0
निंगनूर येथे ४५ गावातील आदिवासी बांधवांची सभा

विजय खडसेंच्या प्रचारार्थ मोघेंचे मार्गदर्शन
उमरखेड – येथील काँगे्रसचे उमेदवार विजय खडसे यांच्या प्रचारार्थ राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांची सभा निंगनूर येथे पार पडली. सभेला मतदारसंघातील उपस्थित ४५ गावातील आदिवासी बांधवांशी मोघे यांनी संवाद साधला.
काँग्रेसने आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. आदिवासींना शिक्षणाच्या प्रवाहात आणले, असे यावेळी बोलताना मोघे म्हणाले. काही जातीयवादी पक्ष आरक्षणाच्या माध्यमातून आदिवासी व इतर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. उमरखेड मतदारसंघात लोकसभा निवडणुकीत जनतेने काँग्रेसला बळ दिले, तीच ताकद विधानसभा निवडणुकीत पक्षाचे अधिकृत उमेदवार विजय खडसे यांच्या पाठीशी राहून द्यावी, असे आवाहनही यावेळी मोघे यांनी केले. या बैठकीला खरबी, दराटी, परोटी, गाडीबोरी, जेवणी, अमडापूर, चिखली(वन), जवराळा, येरडी, भवानी, एकंबा आदी ४५ गावातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















