
करंदिघी – तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर मतांचे राजकारण करत असल्याच्या नरेंद्र मोदींच्या आरोपावर ममता यांनी सोमवारी चोख प्रत्युत्तर दिले. रक्ताने हात माखलेल्या लोकांनी देशाबद्दल बोलूच नये अशी बॅनर्जी यांनी मोदींवर नाव न घेता टीका केली. उत्तर दिनापूर येथील सभेदरम्यान त्या बोलत होत्या.
अटलबिहारी वाजपेयींचे सरकार असताना तृणमूल काँग्रेस केंद्र सरकारमध्ये सहभागी होता. तसेच गुजरातमध्ये झालेल्या दंगलीला त्यावेळी कोणीही समर्थन केले नव्हते असे त्यांनी म्हटले.मी कधीही हिंदू मुस्लिम यांच्यात फूट पडू देणार नाही. भाजपकडे जरी मोठ्या प्रमाणात निधी असला तरी पश्चिम बंगालमध्ये त्यांना एकही जागा मिळणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
Archive for April 11th, 2014
0
रक्ताने हात माखलेल्या लोकांनी देशाबद्दल बोलू नये- ममता
0
उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या (१२ एप्रिल) शनिवारी होणार आहे. या टप्प्यात चार राज्यातील सात लोकसभेच्या जागांवर मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया सात एप्रिल रोजी सुरु झाली होती. १० एप्रिल रोजी तिस-या टप्प्यातील मतदान झाले असून या तिन्ही टप्प्यात मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे दिसून आले आहे. चौथ्या टप्प्यात गोवा, आसाम, त्रिपूरा आणि सिक्कीम या चार राज्यातील सात जागांवर मतदान होणार आहे. या सात जागांवर ७४ उमेदवार उभे आहेत. गोव्यात लोकसभेच्या केवळ दोनच जागा असून या ठिकाणी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या ठिकाणी काँग्रेस, भाजप, सीपीआय आणि अन्य प्रादेशीक पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. उत्तर गोव्यातून भाजपचे विद्यमान खासदार श्रीपाद नाईक हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याच्या विरोधात काँग्रेसकडून रवी नाईक तर आपने दत्ताराम देसाई हे प्रमुख उमेदवार आहेत.दक्षिण गोव्यात काँग्रेसने विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या ऐवजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड याने उमेदवारी दिली आहे. त्याच्याविरोधात भाजपकडून नरेंद्र सवाईकर आणि आपचे स्वाती केरकर हे प्रमुख उमेदवार आहेत.सिक्कीममधील लोकसभेच्या एका जागेबरोबरच विधानसभेच्या ३२ जागांसाठी मतदान होणार आहे. आसाममधील दुस-या टप्प्यात तीन मतदारसंघात मतदान होणार आहे. आसाममध्ये याआधी पाच लोकसभा मतदारसंघात सात एप्रिल रोजी मतदान झाले होते. तर त्रिपुरामध्ये एका जागेसाठी मतदान होणार आहे. राज्यात लोकसभेच्या दोन जागा असून सात एप्रिल रोजी येथे पहिल्या टप्प्यात मतदान झाले होते.
0
रॉकस्टार नंदू भेंडे यांचं निधन

मुंबई – मराठीतील पहिले रॉकस्टार नंदू भेंडे (मूळ नाव सदानंद) यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. मराठी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे आणि डॉ. आशा भेंडे यांचे ते चिरंजीव होते.
७०च्या दशकात मराठी संगीतप्रेमींना नाट्यसंगीतानं, भावसंगीतानं वेड लावलं होतं. त्या काळात नंदू भेडे यांनी रॉक म्युझिक मराठीत आणलं होतं. जोश, जल्लोषानं भरलेलं हे संगीत तरुणाईला आवडलं आणि त्यांनी त्या तालावर ठेकाही धरला. ‘तीन पैशाचा तमाशा’ या नाटकातील अंकुशच्या भूमिकेतून नंदू भेडेंनी रसिकांवर आपली छाप पाडली होती. अगदी, पु. ल. देशपांडे यांनीही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती. नंदू भेंडे यांनी व्हेलवेट फॉग, सेव्हेज एन्काउंटर आणि ऑटोमिक फॉरेस्ट या बँडमध्ये गाणी गायली होती. त्याचप्रमाणे ‘जिझस क्राइस्ट सुपरस्टार’ या नाटकांमधील त्यांची भूमिकाही जबरदस्त गाजली होती. १९८० मध्ये नंदू भेंडेंनी ‘डिस्को डान्सर’ या हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं होतं आणि ते ‘गोल्ड डिस्क’चे मानकरी ठरले होते. आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पी लहरी यांच्यासोबतही त्यांनी काम केलं होतं. नंदू भेंडे यांचे अनेक अल्बम जुन्या संगीतप्रेमींनी संग्रहात ठेवलेत. सोनी टीव्हीवरची चमत्कार, दूरदर्शनवरील चंद्रकांता, झी टीव्हीवरची जिना इसी का नाम है, दायरे यासारख्या काही मालिकांनाही त्यांनी संगीत दिलं होतं.रॉकमध्ये मराठी माणसाचा झेंडा पहिल्यांदा फडकवणा-या नंदू भेंडे यांच्या निधनाबद्दल संगीतवर्तुळात दुःख व्यक्त होतंय.
0
केजरीवाल घेणार ‘डॉन’चा पाठिंबा

नवी दिल्ली – एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना वाराणसीत कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्याचा चंग आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी बांधला आहे. त्यासाठी केजरीवालांनी ‘वाराणसीचा डॉन’ म्हणून ओळखले जाणारे मुख्तार अन्सारी यांच्याशी हातमिळवणीचे संकेत दिले आहेत. मोदी आणि गांधींना हरवण्यासाठी जो कोणी आम्हाला पाठिंबा देईल, त्याला सोबत घेऊ,’ असं केजरीवालांनी म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघात केजरीवालांनी मोदींना आव्हान दिले आहे. मोदींच्या हिंदुत्ववादी प्रतिमेमुळे केजरीवालांची खरी भिस्त मुस्लिम मतांवर आहे. वाराणसीतील मुस्लिम धर्मगुरूंनीही शाही इमामांचे आवाहन धुडकावून केजरींना पाठिंबा दिला आहे. त्यातच गेल्या वेळी येथून निवडणूक लढणारे मुख्तार अन्सारी यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने केजरींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता केजरीवालांनी अन्सारी यांच्या कौमी एकता दलाचा थेट पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न चालवले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्तार अन्सारी यांचे बंधू व कौमी एकता दलाचे अध्यक्ष अफझल अन्सारी आणि केजरीवाल यांच्यात यासंदर्भात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मुख्तार ‘आप’ला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केजरीवाल यांच्या पक्षाचा वाराणसीत कोणताही प्रभाव नाही. त्यांची स्वतंत्र अशी व्होटबँक नाही. मात्र, अन्सारी यांचा पाठिंबा मिळाल्यास चार लाख मुस्लिम मतांच्या बळावर मोदींशी थेट लढत देता येईल, असा विश्वास त्यांना आहे. हेच गणित लक्षात घेऊन त्यांनी कोणाचाही पाठिंबा चालेल, असा प्रचार सुरू केला असल्याचे मानले जात आहे.
0
अल्पवयीन मुलीवर बलात्कार

भिवंडी – भिवंडी तालुक्यातील दलोडे येथील एका पोल्ट्री फॉर्ममध्ये काम करणाऱ्या नराधम तरुणाने वीट भट्टीवर काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला ताडी पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला गणेशपुरी पोलिसांनी अटक केली आहे.
१४ वर्षीय पीडित मुलगी आपल्या मावशीसोबत वीट भट्टीवर काम करण्यासाठी आली होती. तिथेच जवळ असणाऱ्या पोल्ट्री फॉर्ममध्ये काम करणाऱ्या कमलाकर जाधव (२६) याच्याशी तिची ओळख झाली. कमलाकर जाधव याने तिला ताडी देऊ केली जसजसा ताडीचा अंमल तिच्यावर चढू लागला त्यानंतर त्याने जबरदस्तीने बलात्कार करुन तो फरार झाला. पीडित तरुणीने घरी परतल्यानंतर घडला प्रकार कुटुंबीयांनाच्या कानावर घातला. पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना तात्काळ गणेशपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत बलात्कारी कमलाकरच्या मुसक्या आवळल्या.
0
नक्षली हल्ल्यात जवान शहीद

नागपूर – गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी येथे मतदान यंत्रांची वाहतूक सुरू असताना शंभरहून अधिक नक्षलवाद्यांनी तेथील निवडणूक यंत्रणेच्या ताफ्यावर जोरदार हल्ला चढवला. अंदाधुंद गोळीबारात एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. तर अन्य पाच जवान जखमी झाले आहेत.
गिरीधर आत्राम असे शहीद जवानाचे नाव असल्याचे सांगण्यात येते आहे. तर रमेश पुंगटी, संदीप कोडावे, प्रकाश चिकराम, अरूण बुरशे, मुरलीधर भलावी, अशी जखमी जवानांची नावे सांगण्यात येत आहेत. जखमी जवानांना ऑरेंज सिटी नावाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
0
यवतमाळ-वाशिम मतदारसंघात ५८.८० टक्के मतदान

यवतमाळ : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी काल झालेल्या निवडणूकीत ५८.८० टक्के इतके मतदान झाले. सर्वाधिक मतदान राळेगाव विधानसभा मतदारसंघात झाले असून या मतदारसंघाची मतदानाची टक्केवारी ६५.३२ इतकी आहे.
जिल्ह्यात एकूण १७ लाख ४ हजार २३८ इतके मतदार असून त्यापैकी १० लाख ३१ हजार ५३३ इतक्या मतदारांनी मतदानाचा अधिकार बजावला. त्यात पुरुष ५ लाख ६४ हजार २७६ तर ४ लाख ६७ हजार २५७ स्त्री मतदारांचा समावेश आहे. वाशिम विधानसभा मतदारसंघात १ लाख ८३ हजार १४६ इतके मतदान झाले असून या मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी ५७.७२ इतकी आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघात १ लाख ५० हजार १५४ (५३.४१टक्के), राळेगाव विधानसभा मतदारसंघात १लाख ७२ हजार ६३३ (६५.३२ टक्के), यवतमाळ विधानसभा मतदारसंघात १ लाख ७८ हजार ५०८ (५४.१८ टक्के), दिग्रस विधानसभा मतदारसंघात १ लाख ८५हजार ९२४ (६४.४६ टक्के) तर पुसद विधानसभा मतदारसंघात १ लाख ६१ हजार १६८ (५८.९१ टक्के) इतके मतदान झाले. राळेगाव पाठोपाठ दिग्रस मतदारसंघात ६४. ४६ इतके मतदान झाले. उवर्रीत चार विधानसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी ही ६० टक्केच्या आत राहीली.









