
पुणे- पाळण्यातून पडू नये म्हणून सुरक्षेसाठी बांधलेली ओढणीच अवघ्या अकरा महिन्यांच्या चिमुरडीच्या जिवावर बेतली. झोपेत चुकून या ओढणीचा चिमुरडीच्या गळ्याला फास लागल्याने तिचा मृत्यू झाला. चिखलीतील जाधववाडी येथे रविवारी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
सौम्या महेश तळोले असे या दुर्दैवी चिमुरडीचे नाव आहे. मे महिन्यात तिचा पहिला वाढदिवस साजरा केला जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच काळाने तिच्यावर घाला घातला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सौम्याच्या आईने सौम्याला आंघोळ घालून पाळण्यात झोपवले होते. नेहमीप्रमाणे झोपेत उसळी मारल्यानंतर सौम्या पाळण्यातून खाली पडू नये यासाठी सौम्याला पाळण्यात ओढणीने बांधून ठेवण्यात आले होते. मात्र, झोपेतच ती खाली सरकत गेली आणि त्यामुळे सौम्याच्या गळ्याला ओढणीचा फास लागला. ओढणीने फास लागलेल्या अवस्थेतच सौम्या पाळण्यातून लटकत असलेल्या अवस्थेत ती घरच्यांना आढळून आली.
Archive for April 28th, 2014
0
आईच्या ओढणीनेच घेतला चिमुरडीचा जीव
0
इजिप्तमध्ये ६८२ जणांना फाशीची शिक्षा

कैरो – इजिप्तमधील न्यायालयाने सोमवारी मुस्लिम ब्रदरहूडचे प्रमुख मोहम्मद बदी आणि त्याच्या ६८२ समर्थकांना फाशीची शिक्षा सुनावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे इजिप्तमधील तणाव आणखी भडकण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी मोहम्मद मोर्सी यांना राष्ट्राध्यक्षपदावरुन हटवल्यापासून इजिप्तमध्ये अशांतता आहे.
पोलिसांवर हल्ला करणे, त्यांची हत्या करणे या आरोपांखाली न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. गेल्यावर्षी १४ ऑगस्ट रोजी मोर्सी समर्थकांनी दक्षिण मिन्यामध्ये एक पोलिस ठाण्यावर हल्ला करुन, पोलिसांची हत्या केली होती. फाशीची शिक्षा सुनावलेल्या ६८२ दोषींपैकी ५० पोलिसांच्या ताब्यात आहेत, काही जण जामिनावर बाहेर आहेत तर, काही फरार आहेत.
न्यायालयाबाहेर शिक्षा ऐकण्यासाठी थांबलेल्या दोषींच्या महिला नातेवाईक फाशीची शिक्षा ऐकल्यानंतर तेथेच चक्कर येऊन कोसळल्या. दुस-या एका प्रकरणात याच न्यायालयाने आज ४९२ दोषींना सुनावलेली फाशीची शिक्षा जन्मठेपेमध्ये बदलली. मागच्या महिन्यात न्यायालयाने ५२९ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती.
0
युरोपात हापूस आंब्यासह भारतीय भाज्यांवर बंदी

लंडन- फळांचा राजा म्हणून केवळ भारतात नव्हे तर संपूर्ण जगात ओळखल्या जाणा-या हापूस आंब्यासह अन्य चार भारतीय भाज्यांवर एक मे पासून युरोपीयन संघटनेतील २८ देशांनी बंदी घातली आहे. हापूससह अन्य भाज्यांवर घालण्यात आलेल्या या बंदीचा भारतीय कायदेतज्ञ आणि व्यापा-यांनी निषेध केला आहे.
यासंदर्भात आयोग्य विषयक समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. २०१३मध्ये युरोपीय बाजारपेठेत भारतातून आयात केलेल्या फळे आणि भाज्यांमध्ये इतर भाज्यांवर प्रादूर्भाव करणारे कीटक आढळल्याने ही बंदी घालण्यात आली आहे. अर्थात समितीने ही बंदी तात्पूर्ती घातल्याचे स्पष्ट केले आहे. यात हापूस आणि आंबा, वांगी, आळू, कारले, पडवळ या भाज्यांचा समावेश आहे. एकट्या इंग्लंडमध्ये दरवर्षी तब्बल १६ दशलक्ष आंब्यांची निर्यात केली जाते. ही बंदी हटवण्यासंदर्भातील पुनः विचार ३१ डिसेंबर २०१५ रोजी घेतला जाणार आहे. या बंदीमुळे लाखो डॉलर्सचा तोटा होण्याचा दावा व्यावसाईकांनी केला आहे. तर दुसरीकडे बंदी घालण्यात आलेली फळे आणि भाज्यांचे प्रमाण हे एकूण निर्यात केल्या जाणा-या भाज्यांच्या तुलनेत केवळ पाच टक्के असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.
0
मामाने केला भाचीवर बलात्कार

बीड : मामाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना बीड शहरात घडली. शहरातील नामदेवनगर भागात राहणाऱ्या चुलत मामाने भाचीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बीड शहरातील नामदेवनगर भागात चुलत मामाने भाचीवर बलात्कार केल्याचे समोर आले आहे. हा मामा आपल्या चुलत बहिणीच्या घरी गेल्या काही दिवसांपासून वास्तव्यास होता. मात्र, घरातील चुलत बहिणीच्या पंधरा वर्षांच्या मुलींवर घरात कुणी नसल्याचे पाहून त्याने अत्याचार केल्याचे पीडित मुलीने आईला सांगितले. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात चुलत भावाविरोधात मुलीवर बलात्कार केल्याचीतक्रार दिली. या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिकतपास पोलिस उपनिरीक्षक आहेत.
0
रामदेव बाबांवर अॅट्रॉसिटी

नागपूर – काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका करताना दलितांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरोधात नागपूरमध्ये अॅट्रॉसिटी अॅक्टखाली दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रामदेव यांना तत्काळ अटक करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे.
नागपूरमधील पाचपावली पोलीस ठाण्यात रामदेव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी लखनऊमध्येही रामदेव यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला असून रामदेव यांच्यावर अटकेची टांगती तलवार फिरू लागली आहे.
राहुल हे दलितांच्या घरामध्ये हनिमून साजरे करण्यासाठी जातात, असे वादग्रस्त विधान रामदेव यांनी केले होते. त्यानंतर रामदेव यांच्याविरोधात देशभरातून दलित बांधवांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. रामदेव यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर लखनऊ जिल्हा प्रशासनाने रामदेव यांच्या राजकीय योग शिबीरांवर १६ मेपर्यंत बंदी घातली आहे. रामदेव यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला असला तरी दलितांचा राग काही शांत झालेला नाही. त्यामुळे हे प्रकरण आणखीनच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अनुसूचित जाती आयोगाची नोटिस
राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगानेही उत्तर प्रदेश सरकारला नोटिस पाठवून रामदेव यांच्यावरील कारवाईची माहिती मागितली आहे. सरकारकडून रामदेव यांच्यावर आतापर्यंत कोणती कारवाई करण्यात आली?, जर कारवाई करण्यात आली नसेल ती का केली गेली नाही?, याचे लेखी उत्तर आयोगाचे अध्यक्ष पी.एल. पुनिया यांनी सरकारकडे मागितले आहे.
0
५ नेव्ही अधिकाऱ्यांना अटक

मुंबई – वांद्र्यातील पबमध्ये महिलेची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी पाच नौदल अधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. गंभीर बाब म्हणजे पबमधील बाउंसर्सनी बेदम चोप देत या रंगेल अधिकाऱ्यांना पबबाहेर हाकलल्यानंतरही या पाचही जणांनी या महिलेचा बोरिवलीपर्यंत पाठलाग केला. महिलेने धाडस दाखवून १०० नंबरवर कॉल केल्याने बोरिवली उड्डाणपूलाजवळच या अधिकाऱ्यांची नशा पोलिसांनी उतरवली.
तीर्थनाथ दिलिपनाथ (२५), आशिष जयकिसन (२९), महेश्वर सिंग (२६), चंदन मिश्रा (२६), श्याम भंडारे (२९) अशी अटक करण्यात आलेल्या पाच अधिकाऱ्यांची नावे असून ते चतुर्थ श्रेणीतील अधिकारी आहेत. रविवारी १२.३० ते पहाटे ४ च्या दरम्यान ही घटना घडली. ही २५ वर्षीय महिला गुजरातमधील बॅंकर असून बिझनेसमन पतीबरोबर पाली व्हिलेज येथील एका पबमध्ये ती आली होती. त्यांच्यासोबत त्यांचे दोन मित्रही होते. या पबमध्ये आधीपासूनच हे पाचही अधिकारी होते व ते दारूच्या नशेत होते. महिलेकडे पाहून अश्लिल शेरेबोजी केल्यानंतर वादाला तोंड फुटले.
महिलेचा पती व शरेबाजी करणाऱ्या अधिकाऱ्यामध्ये प्रथम धक्काबुक्की झाली त्यानंतर त्याचे पर्यवसन हाणामारीत झाले. बिझनेसमन, त्याचे मित्र आणि पाचही अधिकाऱ्यांमध्ये पबमध्येच धुमश्चक्री झाली. त्यानंतर पबच्या बाउंसर्सनी हस्तक्षेप करत रंगेल अधिकाऱ्यांना चोप दिला व पबबाहेर काढले. मात्र हे नाट्य इथेच संपले नाही. दीड वाजताच्या सुमारास हे दाम्पत्य रिक्षाने बोरिवलीकडे जायला निघाले असता पबबाहेर दबा धरून बसलेल्या या पाचही जणांनी दोन रिक्षांमधून त्यांचा पाठलाग केला. जवळपास ४० मिनिटे पश्चिम द्रूतगती महामार्गावर पाठलागाचा हा भयंकर प्रकार सुरू होता. यादरम्यान ज्या रिक्षामध्ये हे दाम्पत्य बसले होते त्यावर लोखंडी रॉडने हल्लेही आले. या प्रकाराने भेदरलेल्या महिलेने १०० नंबरवर फोन केला. त्यानंतर काही वेळातच बोरिवलीच्या कस्तुरबा मार्ग पोलिसांनी आरोपींच्या रिक्षाला गाठले. बोरिवली उड्डाणपूलाजवळ या पाचही जणांना अटक करण्यात आली. त्यानंतर छेडछाडीची घटना खार पोलिसांच्या हद्दीत घडल्याने आरोपींना खार पोलिसांकडे सोपवण्यात आले. रविवारी पाचही जणांना सुट्टीकालीन न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
0
भाऊजी दप्तरी इंग्लिश स्कूलमध्ये उन्हाळी शिबिर

नागपूर – भाऊजी दप्तरी इंग्लिश स्कूलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्यात येते. सदर शाळेने अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती केली असून २०१४-१५ या शैक्षणिक वर्षापासून ५ वा वर्ग सुरू करण्यात येत आहे. केजी ते पाचवी पर्यंतच्या वर्गांना शाळेत प्रवेश देण्यात येत आहे.
शाळेची इमारत ही मातृसेवा संघाजवळ, कोठी रोड महाल या शहराच्या मध्यभागी असून पंडित बच्छराज व्यास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाशी संलग्नित आहे. ही शाळा संपूर्ण इंग्रजी माध्यमाची आहे. या शाळेमध्ये सीबीएसई पॅटर्नप्रमाणे सर्व अॅक्टिव्हीटी घेतल्या जातात. तसेच सर्व सण, उत्सव यांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी ते शाळेत साजरे करण्यात येतात. शाळेची फी अत्यंत माफक आहे. यासोबतच दरवर्षी विद्यार्थ्यांची मोफत तपासणी केल्या जाते. यावर्षी महात्मे नेत्रपेढीतर्फे मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. याशिवाय विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कलाप्रदर्शन, छंद शिबिराचे आयोजन करण्यात येते. यात नृत्य, नाट्य, चित्रकला, हस्तकला, संस्कृत व इंग्रजीचे संभाषण वर्ग, अबॅस्कस आदी उपक्रम राबविण्यात येतात. तसेच विद्यार्थ्यांना दररोज नास्ताही देण्यात येतो. अधिक माहितीसाठी ९५९५३७४०६८, ९९२१७९६७३४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुख्याध्यापिका देऊळवाडकर यांनी केले आहे.









