
अॅडलेड, दि. २० – विश्वचषकाच्या उपउपांत्य फेरीमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा सहा गडी आणि ९७ चेंडू राखून सहज पराभव केला आहे. आता सेमी फायनलमध्ये २६ मार्च रोजी कांगारुंची गाठ भारताशी पडणार आहे. कप्तान स्मिथ आणि शेन वॅटसनने प्रत्येकी अर्धशतक झळकावले आणि २१४ धावांचे लक्ष्य लिलया पार केले. वॅटसन व नंतर मॅक्सवेल या दोघांचाही एकेक झेल वहाबच्या गोलंदाजीवर पाकच्या क्षेत्ररक्षकांनी टाकला, अन्यथा सामन्यात अधिक रंगत आली असती. चार बळी घेत पाकिस्तानच्या फलंदाजीचा कणा मोडणा-या हेझेलवूडला समानावीराचा किताब देण्यात आला.
वर्ल्डकपमधील तिस-या क्वार्टर फायनलमध्ये पहिली फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या भेदक मा-यासमोर पाकिस्तानची फलंदाजी कोसळली आणि पाकिस्तानचा डाव २१३ धावांवर आटोपला. ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी २१४ धावांचे माफक आव्हान असले तरी पाकची गोलंदाजी काही चमत्च्याकार करेल का याची उत्सुकता होती.
पाकिस्तानने नाणेेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. परंतु सर्फराज अहमद आणि अहमद शेहजाद ही सलामीची जोडी अवघ्या २४ धावांमध्येच तंबूत परतली. सर्फराज १० तर शेहजाद ५ धावांवर बाद झाला. यानंतर हारिस सोहेल व कर्णधार मिसबाह उल हक या जोडीने पाकचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र मिसबाह ३६ धावांवर असताना बाद झाला. यानंतर हारिस सोहेल ४१ धावांवर बाद झाला. उमर अकमल, शाहिद आफ्रिदीही स्वस्तात माघारी परतले. वहाब रियाझ आणि एहसान आदिल या तळाच्या फलंदाजांनी १६ व १५ धावांची खेळी करत पाकिस्तानला २०० चा टप्पा गाठून दिला. शेवटी ४९.५ षटकांत २१३ धावांवर पाकिस्तानचा डाव संपुष्टात आला.
ऑस्ट्रेलियातर्फे जॉस हॅझलवूडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मिशेल स्टार्क व ग्लॅन मॅक्सवेलने प्रत्येकी दोन तर मिशेल जॉन्सनने एक विकेट घेतली. या सामन्यामध्ये पाकिस्तानचे सर्व फलंदाज झेलबाद झाले. आता ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर नमवत भारत फायनलमध्ये प्रवेश करतो याकडे तमाम भारतीयांचे लक्ष लागले आहे.
Archive for March 20th, 2015
0
पाकिस्तान पराभूत, सेमीफायनलमध्ये भारताची गाठ कागारूंशी
0
शिर्डी संस्थानच्या रुग्णालयात औषधांचा घोटाळा

शिर्डी- श्री साईबाबा संस्थान ट्रस्टच्या साईबाबा रुग्णालयात औषध खरेदीत घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असून याप्रकरणी तीन कर्मचा-यांना निलंबित केले आहे.
मच्छिंद्र थोरात (मटेरीयल मॅनेजर), प्रकाश दिघे (फार्मासिस्ट), आणि दिलीप अदिच्च्या उर्फ शर्मा (स्टोअर मॅनेजर) अशी या तिघांची नावे असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांनी सांगितले.
याप्रकरणी संस्थानकडे तक्रार मिळाल्यानंतर औषधांचा साठा आणि रेकॉर्डची तपासणी केली असता प्राथमिक टप्प्यात औषधसाठा तसेच टेंडरींगमध्येही तफावत असल्याचे आढळून आल्याने या तिघांना निलंबित केले आहे.
श्रीरामपूर येथील स्पिरीट पुरवठा करणा-या कंत्राटदारानेही रुग्णालयात स्पिरीट पोहचवण्यासाठी संस्थानच्या वाहनांचा दुरुपयोग केल्याचेही निदर्शनास आले आहे. संस्थानच्या वार्षिक ताळेबंद तपासणीनंतरच या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे, ते उघड होईल, असेही जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, आरटीआय कार्यकर्ते संदीप कुलकर्णी यांनी याप्रकरणी सखोल चौकशी करण्यास सांगितले आहे. यात हलगर्जीपणा केल्यास उच्च न्यायालयात खटला दाखल करु असे कुलकर्णी यांनी सांगितले.
0
जनता एक्सप्रेस घसरली, ३० ठार

लखनऊ -उत्तर प्रदेशमधील बचारवन रेल्वे स्थानकाजवळ डेहराडून-वाराणसी जनता एक्सप्रेसचे इंजिन आणि दोन डबे रुळावरुन घसरल्याने मोठा अपघात झाला. यामध्ये ३० जण ठार तर १५० जण जखमी झाले.
उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनऊ पासून ५० किमी अंतरावर असेल्या बचारवन रेल्वे स्थानकाजवळ सकाळी सुमारे साडेनऊच्या सुमारास हा अपघात झाला.
अपघातातील मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे लखनऊचे विभागीय आयुक्त महेश गुप्ता यांनी सांगितले. घटनास्थळी रेल्वे अधिकारी दाखल झाले असून बचावकार्य वेगाने सुरु आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे लखनऊ-वाराणसी मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
दरम्यान, या अपघातात मृत झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना रेल्वे प्रशासनाकडूनदोन लाख रुपयांची तर जखमींना ५० हजार आणि किरकोळ जखमींना २० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारकडूनही मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना मदत जाहीर करण्यात आली आहे.
रेल्वे मंडळाचे अध्यक्ष ए.के.मित्तल आणि अजय शुक्ला यांना घटनास्थळी भेट देण्याचे आदेश रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी दिले आहेत.
0
काळ्या पैशासंबंधीचे विधेयक लोकसभेत सादर

नवी दिल्ली- काळ्या पैशाला आवर घालणारे विधेयक शुक्रवारी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत सादर केले. यामध्ये परदेशात काळा पैसा दडवणा-यांवर कायदेशीर कारवाईच्या कडक उपाययोजना असून यात तीन ते १० वर्षापर्यंत तुरुंगवास आणि २५ लाख ते एक कोटी रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
बेनामी परदेशी उत्पन्न आणि मालमत्ता (नवीन कर तरतूद) विधेयक, २०१५ यामध्ये ज्यांच्याकडे परदेशी मालमत्ता आहे अशांना पहिल्या वेळेस तीन ते १० वर्षाची शिक्षा किंवा कर आणि दंड भरून कायदेशीर कारवाईतून सुटण्याचा मार्गही सुचवण्यात आलेला आहे. हे विधेयक मंजूर झाल्यास हा कायदा एक एप्रिल २०१६ पासून लागू होण्याची शक्यता आहे.
0
शाहीर साबळे यांचे वृद्धापकाळाने निधन

मुंबई – “गर्जा महाराष्ट्र माझा” हे गाणे आणि ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमाव्दारे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच शाहीर साबळे यांचे शुक्रवारी परळ येथील रहात्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.
आपल्या शाहीरीतून प्रबोधन करणा-या शाहीर साबळे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतही मोठे योगदान दिले होते.
शाहीर साबळे उत्तम कवी, गीतकार, ढोलकीवादक, नाटककार होते तसेच ते उत्तम गायकही होते. १९२३ साली सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातील पसरणी गावात त्यांचा जन्म झाला होता. मराठी चित्रपट-नाटय सृष्टीतील दिग्दर्शक केदार शिंदे हे शाहीर साबळे यांचे नातू आहेत.











