
कल्याण,(महाराष्ट्र न्यूज नेटवर्क,सतिष राठोड)
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या कर विभागाने ज्या बिल्डरांनी पाणीपट्टी भरलेली नाही अशा बिल्डरांच्या विरुध्द कार्यवाही सुरु केली आहे.मनपा ने बिल्डरांना नोटिस दिली असुन त्या नोटिसमध्ये लिहीले आहे की, पाणीपट्टी नाही भरली तर बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी पाणीचे सप्लाय बंद करण्यात येईल व बांधकामाची परवानगी घेण्यासाठी अर्धा कर भरावे लागेल.मनपाने या जाहीर केलेल्या यादीत नामवंत बिल्डरही आहेत.
कर वसुल करण्यासाठी मनपा ने अभय योजना सुरु केली असुन,त्यात ९८ करोड रुपयांची वसुली केली आहे.पण या योजनेत बिल्डरांचा फारसा योगदान मिळाले नाही.मनपाच्या या निर्णयामुळे बिल्डरांमध्ये गोंधळाचे वातावरण पसरले आहे.मनपाने नोटिस दिलेल्या कल्याणचे नामवंत बिल्डररांची यादी…..
– निर्मल लाइफ स्टाइल – सचिन देशमुख, सुरेश वाधवा.
– माइल्टोन – शयरीकांत शितोळे, जोहर झोझवाला, अंजना चव्हाण, पुंडलिक मिरकुटे.
– राईसी डेव्हलपर्स – मनोज कुमार पुनामिया, लता पुनामिया, संदिप कुमार सिंग, शंकर म्हात्रे, अशोक शिंदे, मोहम्मद यूसुफ असे अनेक नामवंत बिल्डरांचे नाव समाविष्ट आहेत.
मनपाने सांगितले की,या बिल्डरांनी लवकरात लवकर बाकी असलेली रकम भरावे,नाही तर मनपा कडून कार्यवाही करण्यात येईल.
Archive for March 23rd, 2015
0
केडीएमसी कडून बिल्डरांना नोटिस
0
एकाच कुटुंबातील तिघींची निघृण हत्या
बुलडाणा- बुलडाणा जिल्हयातील सावणा येथे सासू, पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलीचा निर्घृण खून करुन संतोष भाडाईत हा नराधम फरार झाला आहे. चिखली तालुक्यातील सावणा येथे ही दुर्दैवी घटना घडल्याचे मंगळवारी उघडकीस आले. विमल बळीराम गाढवे, गीता संतोष भाडाईत आणि आरती संतोष भाडाईत अशी मरण पावलेल्या तिघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, विमल गाढवे यांची मुलगी गीता हीचा १० वर्षांपुर्वी तालुक्यातील इसोली येथील संतोष भाडाईत याच्याशी विवाह झाला होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून गीता आणि संतोष हे गीताच्या आईकडेच राहत होते. संतोष आणि गीताला आठ वर्षांची आरती नावाची मुलगी होती.
सोमवारी रात्रीच्या वेळी घरातील सर्वजण झोपलेले असताना संतोष याने या तिघांची निर्घृण हत्या केली व तो पसार झाला. विमल आणि त्यांची मुलगी बाहेर येत नसल्यामुळे मंगळवारी सकाळी शेजारी त्यांना बघायला गेले असता सदर प्रकार उघडकीस आला.
याबाबत गावच्या पोलीस पाटलाने माहिती देताच पोलीस अधिकारी श्वान पथकासह घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरु आहे.
0
तुमची गाऱ्हाणी, आता थेट मोदींच्या कानी!

नवी दिल्ली – ‘सबका साथ, सबका विकास’चा नारा देत सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या प्रक्रियेत देशातील जनतेला साथीला घेण्यासाठी पुढचं पाऊल टाकलं आहे. यापुढं सरकारमधील भ्रष्टाचार व अन्य प्रशासकीय कामांविषयीच्या लोकांच्या तक्रारी थेट मोदींपर्यंत पोहोचणार आहेत. त्या तक्रारी पोहोचविण्याची सोय असलेले नवे वेबपोर्टल उद्या खुद्द मोदी यांच्याच हस्ते कार्यान्वित होणार आहे.
प्रो-अॅक्टिव्ह गव्हर्नन्स अँड टाइमली इम्प्लिमेंटेशन अर्थात ‘प्रगती’ असं या वेबपोर्टलचं नाव असेल. मनमोहन सिंग यांच्या काळात ‘पीएमओ सीपीग्राम्स’ नावानं लोकांच्या तक्रारीसाठी पोर्टल चालविले जात असे. मात्र, त्यात स्पष्टता नसल्यानं त्या माध्यमातून तक्रारी करणं कटकटीचं काम होतं. मोदी सरकारनं हे पोर्टल बदलून त्याऐवजी जास्त सोपं व सुटसुटीत पोर्टल आणलं आहे. ‘प्रगती’मध्ये भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आलं आहे. पोर्टलमधील भ्रष्टाचाराच्या कॉलममध्ये आणखी नऊ प्रकारच्या भ्रष्टाचारांना स्थान देण्यात आलं आहे. टेलिकॉम, रेल्वे, वित्तविभाग, ऊर्जा, पेट्रोलियम, अवजड उद्योग, नगरविकास, परिवहन, ग्राम विकासासह अन्य काही विभागाविषयी तक्रारी करण्याची सुविधाही यात आहे.
विभाग आणि भ्रष्टाचाराच्या वर्गवारीमुळं जनतेला आपल्या तक्रारी नेमकेपणानं सरकारपर्यंत पोहोचविण्याची संधी मिळणार आहे. सरकारच्या एखाद्या विभागात नेमका कोणता व कसा भ्रष्टाचार होतोय याची तक्रार दाखल करता येणार आहे. अन्याय, अत्याचाराच्या तक्रारींची अल्पसंख्याक, एससी/एसटी, मागासवर्ग, महिला, बालक, अपंग अशी वर्गवारी करण्यात आली आहे. पोलिसांशी संबंधित स्तंभात भ्रष्टाचार, अत्याचार व निष्क्रियता असं वर्गवारी करण्यात आली आहे. जनतेकडून आलेल्या तक्रारींवर केंद्रीय तसेच मुख्य सचिवांना विशिष्ट वेळेत स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे. सरकारकडून सोडविण्यात आलेल्या तक्रारींचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या बुधवारी घेणार असल्याचं समजतं.
0
खासगी बँकांचे दंडही महागणार

१ एप्रिलपासून निर्णयाची अंमलबजावणी
मुंबई वृत्तसंस्था – आगामी आर्थिक वर्षात खासगी क्षेत्रातील बँकांनी विविध दंड आणि शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय, अॅक्सिस आणि कोटक महिंद्र या बँकांनी बचत खात्यातील किमान ठेवींचे बंधन ग्राहकांनी न पाळल्यास दंडाची रक्कम वाढविण्याचे ठरविले आहे. बचत खात्यांच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेने घालून दिलेल्या नियमावलीनुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे बँकांतर्फे स्पष्ट करण्यात आले.
बचत खात्यांमध्ये किमान रकमेची मर्यादा पाळली न गेल्यास बँकांनी ग्राहकांकडून दंड आकारावा, या आशयाची अधिसूचना रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये जारी केली होती. त्यासाठी एक एप्रिल २०१५ ही तारीखही निश्चित करण्यात आली होती. खात्यातील किमान रकमेविषयी बँकांनी ग्राहकांना एसएमएस किंवा ई-मेलद्वारे माहिती देण्याचेही बंधन घालण्यात आले आहे. ग्राहकांना योग्य त्या सूचना देऊनही त्यांना किमान रक्कम खात्यामध्ये राखण्यास अपयश आल्यास किंवा किमान मर्यादेपेक्षा खात्यातील रक्कम कमी राहिल्यास नंतर खात्यात जमा होणाऱ्या रकमेतून वळती करून घेण्याचेही आदेश बँकांना देण्यात आले आहेत.
‘ग्राहकांच्या बचत खात्यातील किमान रकमेचे दर तिमाहीनंतर होणारी तपासणी आणि त्यातून वसूल करण्यात येणारा दंड काही नवीन नाही. मात्र, या दंडाच्या शुल्कामध्ये घट करण्यात आली, तर त्याचा परिणाम बँकांच्या आर्थिक शिस्तीवर पडणार आहे. सध्या विविध बँकांकडून १०० ते ४,००० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येतो. संबंधित ग्राहकाच्या प्रकारानुसारच आता ही वाढीव रक्कम आकारण्यात येणार आहे,’ अशी माहिती एका खासगी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
‘एचडीएफसी बँके’तर्फे किमान रकमेची मर्यादा न पाळली गेल्यास स्लॅबप्रमाणे दंड आकारणार आहे. नव्या नियमावलीनुसार बँकेतर्फे १५० ते ६०० रुपयांदरम्यान दंड आकारण्यात येणार आहे. ग्राहकांच्या प्रकारानुसार या दंडामध्ये बदल करण्याचे अधिकारही बँकांनी राखून ठेवले आहेत. या पार्श्वभूमीवर काही बँकांनी लॉकरच्या रकमेतही दुप्पट वाढ केली आहे. चुकीचा पत्ता अथवा संबंधित व्यक्ती जागेवर नसणे आदी कारणांस्तव चेकबुक आणि अन्य कागदपत्रे पुन्हा बँकेच्या पत्त्यावर आल्यास ‘एचडीएफसी बँके’तर्फे दंड आकारण्यात येणार आहे. या शिवाय ऑनलाइन बँकिंगसाठी नव्याने देण्यात येणाऱ्या ‘पिन’साठीही पन्नास रुपये आकारण्यात येणार आहेत. खात्यांमधील किमान रकमेची मर्यादा न पाळल्यास खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठ्या ‘आयसीआयसीआय बँके’तर्फेही शहरी भाग आणि महानगरांसाठी शंभर रुपये दंड आकारला जाणार आहे. ग्रामीण भागाला अद्याप दंड आकारण्यात येणार नाही. कोटक महिंद्र बँकेने १ जानेवारीपासूनच दंडाचे नवीन दर आकारण्यास सुरुवात केली आहे. अॅक्सिस बँकेनेही यापूर्वीच दंड आकारण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक शंभर रुपयांना पाच रुपये दंड किंवा सरसकट ३५० रुपये यापैकी जो कमी तो दंड आकारण्यात येणार आहे.
आयटी कायद्यातील कलम ६६ (अ) रद्द
![]()
नवी दिल्ली – फेसबुक, टि्वटर या सोशल नेटवर्कींग साईटसवरील आक्षेपार्ह मजकूराबद्दल तात्काळ अटकेचा अधिकार देणारे माहिती तंत्रज्ञान कायद्यातील (आयटी) कलम ६६ (अ) सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केले. त्यामुळे यापुढे इंटरनेटवरील आक्षेपार्ह मजकूराबद्दल तात्काळ अटक करता येणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल येणा-या काळात परिणामकारक ठरणार असून, यामुळे भारतात इंटरनेट वापरकर्त्यांना अधिक स्वातंत्र्य, मोकळीक मिळणार आहे. ६६ (अ) कायद्याची व्यवस्थित अंमलबजावणी करु हा केंद्र सरकारचा युक्तीवाद पटणारा नसल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने आयटी कायद्यातील हे कलम रद्द केले. अनेक राज्यांमध्ये आयटी कायद्यामधील या कलमाचा पोलिसांकडून गैरवापर झाल्याने विविध स्वयंसेवी संस्था, नागरी हक्क संघटनांनी या कलमाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या.कलम ६६ (अ) स्वांतत्र्य आणि अभिव्यक्ती स्वांतत्र्य या लोकशाही अधिकारांच्या मूळावर आघात करणारे आहे असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाने त्याचवेळी एखाद्या मजकूरामुळे सामाजित शांतता बिघडणार असेल किंवा, दुस-या देशांबरोबरच्या संबंधांवर परिणाम होणार असेल तर, असा मजकूर ब्लॉग करण्याचा सरकारचा अधिकार अबाधित ठेवला आहे.
0
गुटखा विक्री आता ठरणार अजामिनपात्र गुन्हा

गुटख्यावर बंदी असतांनाही चोरीछुपे गुटखा विक्री करण्यावर आता टाच येणार आहे. गुटखा विक्री आता अजामिनपात्र गुन्हा ठरणार आहे.एवढंच नाहीतर गुटखा विकणार्याला दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येणार आहे अशी घोषणा अन्न आणि औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधानसभेत केली.तसंच लवकरच याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. आघाडी सरकारनं राज्यात गुटखाविक्रीवर बंदी घातली होती. पण चोरून गुटख्याची विक्री सुरूच होती. त्यामुळे आता अधिक कडक शिक्षेची घोषणा सरकारनं केलीय.
0
बाबासाहेबांनी विकसित केले इतिहासातील नवीन सिद्धांत -इतिहासकार डॉ. चहल

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान इतिहासकार सुद्धा होते. त्यांनी केवळ इतिहासाचे लेखनच केले नाही, तर इतिहासाचे संशोधन करीत असताना त्यांनी अनेक नवीन सिद्धांतही मांडले आणि ते विकसित केले आहेत. त्यांच्या सिद्धांताला इतिहासाच्या क्षेत्रात आज जगभरात मान्यता मिळाली असून इतिहासाचा अभ्यास करीत असताना या सिद्धांतांचा विचार करावा लागत आहे, असे प्रतिपादन इतिहासकार व हरियाणा कुरुक्षेत्र विद्यापीठातील इतिहास विभागाचे प्रो. डॉ. एस.के. चहल यांनी शुक्रवारी येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनातर्फे दीक्षांत सभागृहात आयोजित दोन दिवसीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमालेचा शुक्रवारी सायंकाळी समारोप करण्यात आला. ‘इतिहासकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या विषयावर डॉ. चहल मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर होते. व्यासपीठावर डॉ. आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे होते.
डॉ. चहल म्हणाले, भारताचा इतिहास लिहिला गेला तेव्हा त्यात दलित व महिलांना कुठलेच स्थान मिळाले नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या प्राचिन इतिहासावर बरेच संशोधन केले. केवळ संशोधनच केले नाही, तर इतिहासाचे लेखन करताना नवीन सिद्धांत विकसित केले. त्यांच्या इतिहास लेखणीचा नायक हा सर्वसामान्य व्यक्ती होता. दलित होते. शोषित होते. महिला होत्या. ‘शुद्र पूर्वी कोण होते’, ‘रिडल्स आॅफ हिंदुईझम’, ‘द अनटचेबल’ यासारख्या अनेक ऐतिहासिक संशोधनपर ग्रंथाद्वारे त्यांनी प्राचिन भारतातील जाती व्यवस्थेवर प्रकाश टाकला. क्रांती अणि प्रतिक्रांतीसारखा ग्रंथ लिहून त्यांनी इतिहासातील नवे सिद्धांत निर्माण केले. भारताच्या फाळणीवर प्रकाश टाकणारा थॉट्स आॅन पाकिस्तानसारखा ऐतिहासिक ग्रंथ त्यांनी लिहिला. अर्थशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्रासह भारतीय राजकारण, संविधानाची निर्मिती यासोबतच भारताच्या इतिहास संशोधनातही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान अमूल्य आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. डॉ. मुरलीधर चांदेकर यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. प्रदीप आगलावे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. रमेश शंभरकर यांनी संचालन केले.
0
सिंगापूरचे पंतप्रधान ली कुआन यू यांचं निधन

नवी दिल्ली, दि. २३ – सिंगापूरचे पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांचं सोमवारी पहाटेच्या सुमारास निधन झाले. ते ९१ वर्षाचे होते. त्यांच्यावर फेब्रुवारी महिन्यापासून उपचार करण्यात येत होते परंतू सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सिंगापूर शहराला जागतिक स्तरावर ओळख निर्माण करुन देण्यात आणि त्या शहराची जडणघडण करण्यात ली कुआन यांचा फार मोठा वाटा मानला जातोय. ली कुआन यू यांनी सिंगापूरचे पहिले व सलग ३१ वर्ष पंतप्रधानपद भूषविले आहे. ली कुआन यू यांचा मुलगा लि सिएन लूंग सध्या सिंगापूरचे पंतप्रधानपदावर विराजमान असून ली कुआन यांचं निधन झाल्याची माहिती पंतप्रधानांचे सचिव यांनी अधिकृत घोषणा केली आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनूसार, ली कुआन यू यांचे सिंगापूरमधील जनरल हॉस्पिटलमध्ये स्थानिक वेळेनुसार ३ वाजून १८ मिनिटांनी निधन झाले.पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे ली कुआन यांना श्रद्धांजली वाहिली.
0
नेत्यांचा संधीसाधूपणाच दलीत राजकारणाच्या अद्य:पतनाचा कळस – स्वागताध्यक्ष कॉ. मनोज किर्तने यांची खंत

माहूर (नांदेड), दि. २३ – दलीत जनतेचे आर्थीक सक्ष्मीकरणासाठी जमीन सुधारणा गरजेचे आहे. दलीत मुस्लीमांना व्होट बँक म्हणून वापर करनारे भांडवली पक्ष, धर्म जातीच्या नावावर द्वेशाचे राजकारण करून अमानुष पद्घतीने विषमतेची बीजे पेरून एकमेकांना झुंजत ठेवले. वैचारीक स्त्रोत असलेले डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे सारख्या पुरोगामी व वैज्ञानिक दृष्टीकोणान ठेवणाºयाचा काटा काढण्यात आला. या वैचारीक लढाईत बहुजनांची, शोषीत वंचीतांचा अभेद्य एकजुट उभारने अत्यंत गरजेचे असतांना काही दलीत नेत्यांचा संधीसाधुपणाच दलीत राजकारणाºया अद्य:पतनाचा कळस ठरल्याची खंत स्वागताध्यक्ष कॉ. मनोज किर्तने यांनी व्यक्त केली.
बौद्घभूमि परीसर माहूर येथे आयोजीत बौद्घ धम्म परिषदेच्या समारोप प्रसंगी कॉ. किर्तने बोलत होते. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड म्हणाले की, माहूर येथे बौद्घस्तूप बांधण्यासाठी बौद्घभूमि परीसराचा पर्यटन बहृत आराखड्यात समावेश झाला आहे. शासनास माहुर गड विकास प्राधीकरणाकडून तीन कोटीचा आराखडा १४ मार्च २०१४ ला सादर केल्याचे ते म्हणाले. समारोपीय कार्यक्रमात ‘मला चिड येत नाही हा माझा गुन्हा, दोष देऊ कुणा’ या वामन दादा कर्डक यांनी लिहलेल्या गिता बरोबर वादळ वारा सारख्या भीम गिते सादर करून प्रसिद्घ कवी, गायक अनिरूद्घ वनकर यांनी श्रोत्यांना तीन तास खिळवून ठेवले. तसेच कविसंमेलनात मराठवाडा-विदर्भातील नामवंत कवीनी रचना सादर केल्यास. अध्यक्षस्थानी अॅड.के.के. सावळे यांनी केले. संचालन कादर दोसानी यांनी, प्रा. विनोद कांबळे, आकाश कांबळे यांनी केले. यावेळी कवि व कलाकाराचे स्वागत निमंत्रक गोविंद मगरे यांनी केले. यावेळी संयोजन समितीचे सदस्य, माहूर तालुका संभाजी ब्रिगेड, डीवायएफचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
शेतकºयाची मुलगी झाली पोलीस उपनिरीक्षक

यवतमाळ , दि. २३ – ध्येय व चिकाटीच्या जोरावर पुसद तालुक्यातील शेतकºयाची पोलीस असलेली मुलीने पोलीस उपनिरीक्षक पदाची परिक्षा उत्तीर्ण केली असून तीची सदर पदासाठी निवड झाली आहे.
धरती प्रकाश काळे रा. पुसद असे निवड झालेल्या मुलीचे नाव आहे. प्राथमिक व पदवी पर्यतचे शिक्षण पुसद येथे घेतले. त्यानंतर यवतमाळ येथे राज्यशास्त्रात एम ए केले. सन २००५ मध्ये ती यवतमाळ पोलीस दलात महिला पोलीस शिपायी म्हणून रुजू झाली असून सध्या ती यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. महाराष्टÑ लोक सेवा आयोगाने सन २०१३ मध्ये घेतलेल्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परिक्षेत ती उत्तीर्ण झाली आहे. वडील प्रकाश काळे हे अल्पभूधारक शेतकरी असून आई गृहीणी आहे. सात बहिणी व एक भाऊ असा काळे याचा परिवार आहे.भाऊ यवतमाळ पोलीस दलात कार्यरत असून बहिणी शिक्षण घेत आहे. धरती काळे ही लवकरच प्रशिक्षणासाठी जाणार असून तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
0
अपघातात दुचाकीस्वार ठार

यवतमाळ : अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शेलू फाट्यानजीक घडली. शेख शम्मी शेख रा. यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. ते दुचाकीने आर्णीने येथे जात असताना, अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या शेख यांना शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचारादरम्यान इसमाचा मृत्यू झाला असून, याबाबत परवीन बानो शेख यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
0
पवना धरणात 4 विद्यार्थी बुडाले

मावळ – तालुक्यातील पवना धरण परिसरात फिरायला गेलेल्या चार विद्यार्थी आज (रविवारी) दुपारी धरणात बुडाले. त्यापैकी एका विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, अन्य तिघांचा शोध सुरू असल्याचे बचाव पथकाकडून सांगण्यात आले.
पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे इथील जेएसपीएम महाविद्यालयातील चार विद्यार्थी लोणावळ्या जवळच्या पवना धरण परिसरात फिरायला गेले होते. पोहण्यासाठी ते चौघे धरणाच्या पाण्यात उतरले होते. पोहताना चौघेही पाण्यात बुडाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी बचावकार्य होती घेतले. तसंच पोलिसांनाही पाचारण करण्यात आले. शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर विद्यार्थ्याचा मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आलं असून, अन्य तीन विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात येत आहे.
0
गुंडाच्या धमक्यांना घाबरून स्वत:च्याच मुलीचं केलं मुंडन!

ठाणे – आपली मुलगी सुंदर दिसावी, असं प्रत्येक आईला वाटत असतं. मात्र काही नराधमांच्या धमक्यांमुळे ठाण्यातील मातेवर आपल्याच मुलीचं मुंडन करण्याची वेळ आली आहे. ठाण्यातील कळवा परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे.
कळवा इथे राहणार्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर सहा महिन्यापूर्वी म्हणजेच 30 जुलै 2014ला सामूहिक बलात्कार झाला होता. मोहम्मद लियाकत अली उर्फ बाबू आणि त्याच्या 16 वर्षांच्या साथीदारानं पीडित मुलीवर बलात्कार केला. याप्रकरणी बाबूला अटकही झाली होती. मात्र सध्या तो जामिनावर बाहेर आला आहे आणि जामिनावर बाहेर येताच त्याने पीडित मुलीला पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली. त्याची हिम्मत इतकी वाढली की तो मुलीच्या घरी जाऊन तिची छेड काढायचा आणि आता तर त्याने गुन्हा मागे घे नाहीतर पुन्हा बलात्कार करू अशी धमकीच दिली.
ही काही पहिली धमकी नाही. आरोपी बाबू तुरुंगात होता. तेव्हासुद्धा त्याच्या कुटुंबीयांनी आपल्यावर पाचवेळा हल्ले केले, असा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला आहे. या सर्व प्रकाराची या कुटुंबाने पोलिसांत तक्रारही केली. पण, पोलिसांनी फक्त अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. सततची धमकी, हल्ले, मुलीला होणारा त्रास आणि पोलिसांची कुचराई यामुळे धास्तावलेल्या या आईने अखेर आपल्या मुलीचं मुंडन करून तिला विद्रूप केलं. यामुळे तरी तिची छळातून सुटका होईल, असं या आईचं म्हणणं आहे.
दरम्यान, या धक्कादायक प्रकार समोर येऊनही कळवा पोलिसांनी आधी फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी पोलीस सहआयुक्तांकडे दाद मागितल्यानंतर, मुलीच्या जबानीनुसार कळवा पोलिसांनी गुन्हे दाखल केले. ठाणे सहपोलीस आयुक्त व्ही .व्ही लक्ष्मीनारायण यांनी सबंधित आरोपींचे जामीन रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. पण अजून आरोपीला अटक झालेली नाही आणि कळव्यातल्या झोपडपट्टीत राहणारं हे कुटुंब अजूनही भीतीच्या छायेखाली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्या गुन्हेगारांना राजकीय आश्रय असल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.
0
सेझसाठी ‘स्वाभिमानी शेतकरी’ची पदयात्रा

रखडलेल्या सेझच्या जमिनी शेतकर्यांना परत कराव्यात, तसंच शेतकर्यांच्या सातबारा उतार्यावर संपादनासाठी मारण्यात आलेले शेरे त्वरित कमी करावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज (सोमवारी) राजगुरूनगर येथून बाधित शेतकर्यांची पदयात्रा काढण्यात आली आहे. राजगुरूनगर येथून ही पदयात्रा निघेल. तिचा पहिला मुक्काम आज आळंदीत असणार आहे. त्यानंतर पदयात्रा उद्या (मंगळवारी) पुण्यात येणार आहे.
तत्कालीन सरकारने 2013 मध्ये जो कायदा केला होता, तो सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून केला. मात्र, या सरकारने त्यामध्ये बदल केला. शेतकर्यांच्या जमिनी स्वस्तात घ्यायच्या आणि त्या उद्योगधंद्यांना जादा किमतीत द्यायच्या, असा काही लोकांचा नवीन धंदा तयार झाला आहे, असंही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
शहीद दिनाचे निमित्त साधून केंद्र सरकारच्या भूमी भूसंपदान कायद्याच्या विरोधात ‘शेती वाचवा, शेतकरी वाचवा’ या आंदोलनाची ही सुरुवात आहे. 8 वर्षांपूर्वी सेझच्या नावाखाली खेडमधल्या राजगुरूनगर इथल्या 17 गावांमधल्या जमिनींचं संपादन करण्यात आलं होतं. पण नियमाप्रमाणे 5 वर्षांमध्ये सेझचा प्रकल्प पूर्ण झाला नाही, त्यामुळे ती जमीन प्रकल्पबाधितांना परत मिळायला हवी, अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे. ठाकरवाडी या गावातले शेतकरीही या प्रकल्पावर संतापले आहेत. या जमिनींच्या मोबदल्यात शेतकरी आणि आदिवासींना कोणतंही पॅकेज मिळालं नसल्याची तक्रार या प्रकल्पबाधितांनी केलीये. ठाकरवाडीतल्या जमिनी संपादित केल्यानंतर या शेतकरी आणि आदिवासींना घरं देण्यात आली होती. मात्र ती लहान आहेत आणि त्यांना तडे गेलेत. गावकर्यांना पाण्याची टाकी बांधून दिली पण आजही इथल्या महिलांना पाणी आणण्यासाठी दूर जावं लागतं. इथे बांधण्यात आलेले रस्ते दगडगोट्यांचे आहेत. इथे बसवलेले सोलरही थोड्याच दिवसांत बंद पडले.जमिनींसाठी शेतकर्यांना आकर्षक पॅकेजचं आश्वासन दिलं होतं. पण असं कोणतंही पॅकेजही मिळालेलं नाही. त्यामुळे आता या प्रश्नी आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं घेतला आहे. या मोर्चात इथले गावकरीही खेड ते पुणे पदयात्रेमध्ये सहभागी झाले आहेत.
दरम्यान, ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मनातील बात सांगितली. शेतकर्यांच्या मनातील नाही, अशा शब्दांत आज भाजपचे मित्रपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पंतप्रधानांवरच टीका केली. ‘मन की बात’मध्ये त्यांनी कळीचा मुद्दा बाजूलाच ठेवला. जमिनी हव्या आहेत तर शेतकर्यांशी थेट बोलण्यास का घाबरता, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
0
सेल्फीच्या नादात सात तरुणांनी गमावला जीव

नागपुर – जिल्ह्यातील वडदजवळच्या मंगरुळ तलावावर पिकनिकसाठी गेलेल्या सात तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. सेल्फी काढण्यासाठी तलावाच्या मध्यभागी स्वत:हून होडी घेऊन गेले आणि फोटो काढण्याच्या नादात होडी कलंडली. या दुर्घटनेत 10 पैकी 7जणांचा दुदैर्वी अंत झाला असून सुदैवाने तिघेजणं बचावले आहेत.
नागपूरच्या आशीर्वाद नगर भागात राहणार्या 10 कॉलेज तरुणांचा ग्रुप मंगरुळ तलावावर काल संध्याकाळी पिकनिकसाठी गेला होता. किनार्यावर लावलेली होडी हे तरुण स्वतःहून पाण्यात घेऊन गेले आणि त्यांचं हेच धाडस सात जणांच्या जीवावर बेतलं. तलावाच्या मध्यभागी गेल्यावर सेल्फी काढण्याच्या नादात, होडीत उभे राहिल्याने होडी एका बाजुला कलंडली. आणि यात सात जणांचा तलावात बुडून दुदैर्वी मृत्यू झाला. तर, तिघेजण या दुर्घटनेत बचावले आहेतय
तलावात बुडून मृत्यू झालेले सातही तरुण नागपूरच्या आशीर्वाद नगर भागात राहाणारे आहेत. हर्षल आदमने, चेतन आदमने, गोवर्धन थोटे, राहुल वाळोदे, राम शिवरकर, मकसूद शेख आणि अब्दुल सरफराज अशी या मृत मुलांची नावं आहेत.
0
नक्षलवाद्यांच्या गोळीबारात दोन पोलीस शहीद

गडचिरोली – छत्तीसगड सीमेलगत गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत महाराष्ट्राचे दोन पोलीस जवान शहीद झाले. तर, एक जवान गंभीर जखमी झाला.
सी-60 पथकामध्ये हे जवान कार्यरत होते. काल छत्तसिगड सीमेलगतच्या एटापल्ली तालुक्यातील जंगलात सी-60 पथकाकडून नक्षलवाद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या कोम्बींग ऑपरेशन करण्यात येत होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांकडून अचानक गोळीबारास सुरूवात झाली. त्यात दोहे आत्राम आणि स्वरूप अमृतकर हे पोलीस कमांडो ठार झाले तर दिनेश हिचामी जखमी झाला होता. नक्षलवाद्यांचे लोकेशन असल्याने तसंच अंधार झाल्याने बचावकार्यासाठी हॅलीकॅप्टर जाऊ शकल नाही, आज सकाळी जवानांचे मृतदेह आणि जखमी जवानाला हॅलीकॅप्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आलं.
0
डी.के.रवीकुमार मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे

बंगळूरु – धडाडीचे आयएएस अधिकारी डी.के.रवीकुमार यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास कर्नाटक सरकारने सीबीआयकडे सोपवला आहे. डी.के.रवीकुमार यांचे कुटुंबिय आणि राज्यातल्या विरोधी पक्षांकडून रवीकुमार यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याची मागणी करण्यात येत होती.
मागच्या आठवडयात बंगळूरुतील रहात्या घरी डी.के.रवीकुमार यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी रवीकुमार यांच्या पत्नीला पत्र लिहून निष्पक्ष तपासाचे आश्वासन दिले होते. कर्नाटकमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री सिध्दरमय्या यांच्याशी चर्चा करुन सीबीआयकडे तपास सोपवण्याचा सल्ला दिला होता.
प्रथमदर्शनी डी.के.रवी यांचा मृत्यू आत्महत्या असल्याचे तपास अधिका-यांचे मत आहे. मात्र रवी यांनी वाळू आणि जमीन माफियांवर कारवाई केली होती. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा अनेकांना संशय आहे.
रवी यांनी मृत्यूपूर्वी सहकारी आयएएस महिलेला काही फोन केल्याचे समोर आले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला रवी यांच्या मृत्यू प्रकरणाचा प्राथमिक अहवाल सार्वजनिक करण्यास मनाई केली आहे. भ्रष्टाचार खपवून न घेणारा अधिकारी अशी रवी यांची ओळख होती.
महापौरांचा ‘लाल दिवा’ कायम ठेवा
![]()
मुंबई – देशातील फक्त नऊ अतिमहत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींनाच ‘लाल दिव्या’चा विशेषाधिकार देण्याच्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रस्तावाचं शिवसेनेनं स्वागत केलं असलं, तरी हा मान काही प्रमुख शहरांच्या महापौरांनाही मिळायला हवा, अशी आग्रही सूचना त्यांनी केली आहे. मुंबई, दिल्ली आणि कोलकात्याच्या महापौरांचा ‘लाल दिवा’ कायम ठेवण्याची त्यांची मागणी आहे.
देशातील ‘व्हीआयपी कल्चर’ला चाप लावण्याच्या दृष्टीनं, केंद्रातील आणि राज्यांतील मंत्र्यांच्या गाडीवरचा प्रतिष्ठेचा लाल दिवाच काढून घेण्याचा प्रस्ताव केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींनी तयार केलाय आणि आपल्या सहकाऱ्यांकडे अभिप्रायार्थ पाठवलाय. फक्त नऊ घटनात्मक पदांवरील व्यक्तींनाच लाल दिव्याची गाडी दिली जावी, असं ‘क्रांतिकारी’ मत त्यांनी मांडलं आहे. केंद्रात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा सभापती आणि सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश या पाच व्यक्तींना, तर राज्यांमध्ये राज्यपाल, मुख्यमंत्री, विधानसभाध्यक्ष आणि हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती या चौघांच्या गाडीवर मानाचा लाल दिवा असावा, असं त्यांनी नमूद केलंय. या प्रस्तावाबाबत त्यांनी राजनाथ सिंह, अरुण जेटली, सुषमा स्वराज या सहकारी मंत्र्यांकडून मतही मागवलं आहे. ते काय अभिप्राय देतात, यावरच अंतिम निर्णय अवलंबून असला तरी जनतेला हा प्रस्ताव पसंत पडलाय.
शिवसेनेनंही ‘लाल दिव्या’चा वापर मर्यादित करणाऱ्या या प्रस्तावाला हिरवा कंदील दिला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी या प्रस्तावाचं स्वागत केलंय. परंतु, त्याचवेळी महापौरांच्या गाडीवरचा लाल दिवा कायम ठेवण्याचा आग्रहही धरला आहे. मुंबई, दिल्ली, कोलकाता यासारख्या जागतिक ख्यातीच्या शहरांतील महापौरांना लाल दिव्याची गाडी मिळायला हवी. मुंबईच्या महापौरपदाला मोठी परंपरा आहे. महापौर हा शहराचा प्रथम नागरिक असतो. त्यामुळे त्याला हा मान दिला गेला पाहिजे, असं मत त्यांनी मांडलंय. आता ही सूचना केंद्र सरकार विचारात घेतं का, हे पाहावं लागेल.
0
शहीद भगत सिंग, सुखदेव, राजगुरूंना श्रद्धांजली

नवी दिल्ली, दि. २३ – देशाच्या स्वातंत्र्यासाठी हसत हसत प्राणांची आहुती देणारे शहीद भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रद्धांजली वाहिली. ‘देशासाठी प्राणांचे बलिदान देणा-या भगतसिंग, सुखदेव, राजगुरूंना माझे शत प्रणाम. या तिन्ही देशभक्तांना मी श्रद्धांजली वाहतो’, असे ट्विट त्यांनी केले आहे. दरम्यान आज ते पंजाबच्या दौ-यावरही जाणार असून भगत सिंग, सुखदेव व राजगुरू यांच्यावर ज्या हुसैनीवाला गावात अंत्यसंस्कार करण्यात आले त्या गावाला मोदी भेट देणार आहेत. तसेच सुवर्ण मंदिर व जालियानवाला बाग येथेही पंतप्रधान जाणार असून त्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अण्णा हजारेंनीही वाहिली भगतसिंगना श्रद्धांजली
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनीही आज भगतसिंग, सुखदेव व राजगुरूंना श्रद्धांजली वाहिली, यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते. खटरकला गावात जाऊन अण्णा भगत सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करत असताना त्यांच्या भावना अनावर झाल्या आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
दरम्यान यावेळी अण्णांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. सरकारने लोकांना दिलेले वचन पाळले नाही. निवडणुकीपूर्वी त्यांनी जनतेला काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते, मात्र सरकार सत्तेवर येऊन दहा महिने उलटून गेले तरी एक पैसाही परत आला नसल्याचे सांगत सरकारने जनतेचा विश्वासघात केल्याची टीका अण्णांनी केली.
0
पानसरेंच्या हत्येसाठी २५ लाखांची सुपारी!

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येसाठी मिरज येथील एका सराईत फासेफारधी गुन्हेगाराने २५ लाखांची सुपारी घेतली होती. पानसरे दाम्पत्यावर हल्ला करून तो कर्नाटकात लपल्याची धक्कादायक माहिती मिरज येथील एका फासेपारधी दाम्पत्याने पोलिसांना रविवारी दिली. त्यानुसार या दाम्पत्याकडून अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांचे पथक दिवसभर माहिती घेत होते, असे विश्वसनीय पोलीस सूत्रांनी सांगितले.
फासेपारधी दाम्पत्याने दिलेली माहिती आणि आतापर्यंत पोलिसांनी केलेल्या तपासातील साम्य जुळत असल्याने पोलिसांची काही विशेष पथके रात्रीच कर्नाटकात रवाना झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.
मिरजेतील फासेपारधी दाम्पत्याला पानसरे यांच्या मारेकऱ्यांची माहिती असल्याचे पोलिसांना खबऱ्याकडून समजले. त्यांनी तातडीने या दाम्पत्याला ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर ही धक्कादायक माहिती पुढे आली. माहितीची खातरजमा करण्यासाठी संबंधितांना मिरज पोलिसांचे एक पथक रविवारी सकाळी कोल्हापुरात घेऊन आले. पोलीस मुख्यालयामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी त्यांच्याकडून माहिती घेतली. मारेकरी कर्नाटकात लपला असून तो आम्हाला २५ हजार रुपये देणार होता, अशी माहितीही त्यांनी पोलिसांना दिली.










