यवतमाळ , दि. १७ – तेलंगणांसिमेवरील पिंपळखूटी येथे आज बुधवारी सायंकाळी येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मटका अड्डयावर धाड टाकली. यावेळी चार आरोपींना अटक केली असून चार लाख २९ हजार रुपयाचा माल जप्त केला.
अशोक राय, शुभम राय रा. पांढरकवडा, शंकर बावणे रा. पिंपळखुटी, विजय विकास गेडाम रा. पांढरकवडा यांना अटक केली. तेलंगणासिमेवरील पिंपळखुटी येथे राजरोसपणे मटका सुरू आहे. या ठिकाणी आंध्रासह जिल्ह्यातील मटका शौकीन जुगार खेळण्यासाठी येत असून लाखो रुपयाची उलाढाल होते. दरम्यान आज मंगळवारी सायंकाळी यवतमाळ येथील स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पिंपळखुटी मटका अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी सदर चार आरोपींना अटक करून त्याच्याकडून चार लाख २९ हजार रुपये जप्त केले. ही कार्यवाही पथकाचे प्रमुख संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू, सुनील खंडागळे, रुपेश पाली, ऋषी ठाकुर, प्रदिप नाईकवाडे, वासु साठवणे, अमोल चौधरी, अनिल चव्हाण, चालक प्रदिप तांबेकर यांनी केली.
Archive for March 17th, 2015
पिंपळखुटी येथे मटका अड्ड्यावर धाड, चार लाख जप्त
पुसदमध्ये स्वाईन फ्लूने इसमाचा मृत्यू
पुसद (यवतमाळ), दि. १७ – स्वाईन फ्लू आता जिल्ह्यात पाय पसरत असून, येथील महिला रुग्णाचा नागपूर येथे उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. आशा अजय चव्हाण (४०) रा. जवाहन कॉलनी, श्रीरामपूर असे मृत महिलेचे नाव आहे.
आशा चव्हाण ही महिला आजारी पडल्यानंतर उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने नागपूर येथे नेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. सदर महिला स्वाईन फ्लूने आजारी असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. त्यावरून त्यांनी स्वॉब नमूने घेवून तपासणीसाठी पाठविले. यात प्रयोगशाळेचा अहवाल पॉझिटीव्ह आला. स्वाईन फ्लूचा उपचार सुरू असतानाच आज सकाळी आशा चव्हाण या महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. पुसद शहरातील महिलेचा नागपुरात स्वाईन फ्लूने मृत्यू झाल्याची वार्ता शहरात पसरताच खळबळ उडाली आहे. शहरात स्वाईन फ्लू पाय पसरत असल्याची धास्ती पुसदकरांना सतावत आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
आंबिवली रेल्वे स्थानकाच्या कार्यालयात अडीच लाख चोरी
कल्याण,(महाराष्ट्र न्यूज नेटवर्क,सतिष राठोड) – कल्याण तालुक्यातील आंबिवली रेल्वे स्थानकाच्या कार्यालयातून खिडकी तोडून रात्री २:३० ते ३:०० वाजेच्या सुमारास अडीच लाख रुपयांची चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली.
रेल्वे स्थानक प्रमुख मधुकर गोठणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार चोरी करणारा संशयित आरोपी मनोज रावत हे आहेत.मनोज रावत हे काही दिवसांपूर्वी आंबिवली स्थानकावर कार्यरत होते.पण त्यांनी याआधी नकली तिकेट विकतांना सापडल्यावर त्यांना २ महिने नौकरीवरुन काढण्यात आले होते.त्यानंतर ते कल्याण स्थानक येथे पार्सल कार्यालयात कार्यरत झाले,व त्याच रात्री वेळ १:३० च्या सुमारास आंबिवली स्थानकावर आढळल्याचे निदर्शनास आले,व त्यानंतर ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. ही घटना घडल्याचे कळताच स्थानिक शिवसेना नगरसेवक दुर्योधन पाटील,माजी नगरसेवक दशरथजी तरे हे रेल्वे स्थानकावर दाखल झाले व स्थानकाची पाहणी व सुरक्षेच्या बाबतीत विचारपुस केली असता,हलक्या दर्जाची खिडकी लावलेली आढळून आली असता त्यावर तरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली की,या रेल्वे स्थानकाहून जास्तीत जास्त महिला-पुरुष प्रवाशी रोज प्रवास करत असुन महिन्याला ६० लाख रुपये उत्पन्न मिळूनही रेल्वे स्थानकाचे काम केले जात नाही.रात्री सुरक्षेचा विचार केला असता फक्त एकच आरपीफ कर्मचारी कार्यरत असतात.व यातर तरी रेल्वे प्रशासनाने सुरक्षा वाढवावी अशी अपेक्षा केली आहे. संशयित आरोपी मनोज रावत हे रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असुन पुढील तपास आरपीएफ करीत आहेत.
नगर पालिकेच्या इमारतीस आग, ३० वर्षापूर्वीची कागदपत्रे जळाली
दिग्रस, दि. १७ -नगर पालिकेच्या जुन्या इमारतीस आग लागल्याने ३० वर्ष जूनी कागदपत्रे जळून खाक झाली. ही घटना आज दुपारी ३.३० वाजता दरम्यान घडली. अग्निशमन दलाच्या पथकाने एक तास पाण्याचा मारा केल्यानंतर आग आटोक्यात आली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यास लागून नगर पालिकेची जुनी इमारत आहे. आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास खिडकीतून धूर निघत असल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. ही माहीती तत्काळ अग्निशमन दलाच्या पथकाला देण्यात आली. मात्र प्रशिक्षीत कर्मचारी नसल्याने रोजंदारी कर्मचारी लावून आगिवर नियंत्रण मिळविण्यासाठी झुंज द्यावी लागली. या इमारतीच्या तळमजल्यावरील संकुलामध्ये दवाखाने, मेडीकल, पतसंस्था, हाडवेअर आदी दुकाने आहे. मात्र घटना तत्काळ लक्षात आल्याने आगीची झळ दुकानांना बसली नाही. शॉर्टसर्कीटमुळे ही लागली असून, ३० वर्षजुनी कागदपत्रे जळाल्याची माहिती वरिष्ठ लिपिक दयाराम पवार यांनी दिली. यावेळी घटनास्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
वादळात शंभर घरांची पडझड,रब्बी पिकांचे नुकसान
यवतमाळ दि. १७ – वादळी वाºयासह आलेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात वणी तालुक्यातील शंभर घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे रब्बी पिकांच्या नुकसानीसह दोन बैल व एक म्हैस ठार झाली आहे.
१६ मार्चच्या रात्री ९ वाजताच्या दरम्यान वणी परिसरातील शेतकरी तथा नागरिकांना सहन करावा लागला़ तालुक्यात वादळी वाºयासह कोसळणाºया पावसाने शेतातील रब्बी पिकाची प्रचंड नासाडी झाली़ हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिरावून घेतला़ तालुक्यात जवळपास शंभर घरांची पडझड झाली असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे़ तर डोर्ली या गावातील दोन बैल व निवली गावातील म्हैस ठार झाली आहे़ शहरातील बाकडे पेट्रोलपंपाला वादळी वाºयाचा फटका सहन करावा लागला असून, पेट्रोलपंपावरील संपूर्ण छत उडून गेले आहे़ तसेच तहसील कार्यालयात लावण्यात आलेल्या पवनउर्जेचा पंखा बेपत्ता झाला आहे़
सोमवारी वादळी वाºयासह झालेल्या अवकाळी पावसाने बºयाच ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली आहे़ तर विजेच्या खांबासह भारत संचार निगमच्या खांबांचे प्रचंड नुकसान झाले आहे़ यामुळे रात्री वीजपुरवठा खंडित झाला होता़ तर बीएसएनएलची मोबाईल सेवा ठप्प पडली़ तालुक्यात वादळी वाºयासह पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे प्रचंड नुकसान झाले असून, महसूल प्रशासनामार्फत वृत्त लिहिपर्यंत पंचनामा सुरू होता़ यामुळे पंचनाम्यानंतरच नेमके झालेले नुकसान कळणार आहे़
तलाठ्यांच्या जेष्ठता यादीला स्थगीती, नागपूर हायकोर्टाचे आदेश
यवतमाळ, दि. १७ – तलाठ्यांच्या जेष्ठता यादीला नागपूर हायकोर्टाने स्थगीती दिली आहे. २० एप्रिलपर्यंत यादी दुरूस्तीचा आदेश देण्यात आला असून, तो पर्यंत ही स्थगीती कायम राहणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातंर्गत येणाºया मंडळ अधिकारी सवर्गात पदोन्नती देण्यासाठी जानेवारी २००८ मध्ये जेष्ठता यादी तयार करण्यात आली होती. या यादीमध्ये ५८१ तलाठ्याना मंडळ अधिकारी सवर्गासाठी पात्र ठरविण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यादी सादर करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयाने अंतिम यादी जानेवारी २०१५ ला प्रसिद्घ केल्यानंतर जेष्ठता यादीमध्ये घोळ असल्याची चर्चा महसूल वर्तुळात सुरू झाली. ४ जुन १९९८ च्या राजपत्राप्रमाणे जेष्ठता यादी तयार होणे करण्यात आले नसून, नियमबाह्य यादी तयार करण्यात आल्याचा आरोप झाला. यादी पूर्वीच्या शासन निर्णयानुसार तयार करण्यात आल्याच्या कारणावरून अरूण वांजाळ व बाबा पोटे यांनी याबाबत नागपूर हायकोर्टात याचिका दाखल केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर बेंच चे न्यायाधिश बी.पी. धर्मधिकारी व एस. बी. शुकरे यांनी यावर सुनावणी देत २० एप्रिल २०१५ पर्यंत तात्पूरता स्थगनादेश दिला आहे. अर्जदाराकडून अॅड. श्रीकृष्ण तांबडे, अॅड. रोशनी काळे व अॅड. चंद्रशेखर चांदूरकर यांनी बाजू मांडली. न्यायालयाच्या या आदेशामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला चांगलीच चपराक बसली आहे. एप्रिल २०१५ पर्यंत जेष्ठता यादीमध्ये दुरूस्ती करण्याचे आदेश देण्यात आले असल्याने नवीन राजपत्रानुसार जेष्ठता यादी तयार करावी लागणार आहे.
वसतीगृहातील विद्यार्थ्यांची हेळसांड, मनसेचा समाजकल्याण अधिकाºयांना घेराव
यवतमाळ, दि. १७ – जिल्ह्यात समाजकल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या शासकीय वसतीगृहांमध्ये विद्यार्थ्यांची हेळसांड सुरू आहे. समाजकल्याण विभागाच्या दुर्लक्षित धोरणामूळे विद्यार्थ्यांना नरकयातना भोगाव्या लागत असल्याचा आरोप करीत मनसेने समाजकल्याण अधिकारी यांना घेराव घालून संताप व्यक्त केला.
शासकीय वसतीगृहांच्या कागदोपत्री तपासण्या होत असल्याने कार्यरत अधिकारी व कर्मचारी मनमानी कारभार चालवित आहे. याचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत असून, भोजन, राहण्याची व्यवस्था योग्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घाटंजी येथील वसतीगृहाचा कारभार रामभरोसे असल्या सारखा असून, येथील कर्मचाºयांना केवळ विद्यार्थ्यांच्या पोषण आहारावर डल्ला मारण्यातच रस आहे. याबाबत वारंवार तक्रारी करून देखील कार्यवाही शुन्य आहे. त्यामुळे संतप्त मनसे पदाधिकाºयांनी समाजकल्याण विभागावर धडक देऊन अधिकाºयांना घेराव घातला. यावेळी पदाधिकारी वसतीगृहातील गैरप्रकाराचा पाढा वाचत असताना, अधिकारी कर्मचाºयांची बाजू मांडत होते. त्यामुळे पदाधिकारी व समाजकल्याण अधिकाºयामध्ये चांगलाच वाद रंगला. यावेळी वसतीगृहांची तपासणी करून दोषीविरुद्घ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली. निवेदन देतेवेळी जिल्हाध्यक्ष अनिल हमदापूरे, विकास पवार, देवा शिवरामवार, गजानन भालेकर,माधूरी ठाकरे, बबीता मेश्राम, पल्लवी ठाकरे आदी उपस्थित होते.
0
खर्च वसूल झालेले ६२ टोल बंद

नवी दिल्ली : ज्या रस्त्याच्या बांधकामासाठी १०० कोटींपेक्षा कमी खर्च झाला आहे व ज्यांचा खर्च टोलमधून वसूल झाला आहे, असे देशातील ६२ टोल प्लाझा मागील काही महिन्यांत बंद करण्यात आल्याची माहिती देतानाच महामार्गांची गुणवत्ता उत्तम ठेवण्यासाठी यापुढे सिमेंटचेच रस्ते बांधण्याची घोषणा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत केली.
सिमेंट रस्त्यांमुळे खर्च वाढणार नसून, किमान १२० रुपये प्रति बॅग या दराने सिमेंट मिळणार असल्याने रस्त्यांची किंमत सुमारे २५ ते ३० टक्क्यांनी कमी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासानंतर गडकरी यांनी त्यांच्या विभागाने सुरू केलेल्या नवीन वेब पोर्टलची माहिती दिली. जागतिक पातळीवरील नवे तंत्र रस्ते निर्माणासाठी वापरण्यात येईल, असे सांगून रस्त्यांची गुणवत्ता व त्यांचे जीवनमान वाढविण्यासाठी सिमेंट रस्त्यांचा निर्णय घेतला आहे. देशातील ३६ सिमेंट कंपन्यांचे १०३ प्लांट आहेत. तेथून सिमेंट घेतले जाईल. त्यामुळे वाहतूक खर्चाचा बोजा व पर्यायाने किंमत कमी होईल. या पोर्टलवर आलेल्या निविदांनुसार किमान दर १२० रुपये प्रतिबॅग असून, कमाल दर १५७ रुपये ठरला आहे. राज्य सरकारे, महापालिका, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी हा दर कायम आहे. आपल्या विभागाने यासाठी प्रथम पुढाकार घेतल्याने पायाभूत योजनांसाठी सिमेंट वापरण्यात येणार असल्याने यापुढे ३० टक्क्यांपर्यंत प्रकल्पांची किंमत कमी होईल.
0
लँड माफियांवर अंकूश ठेवणार्या आएएस अधिकार्याचा संशयास्पद मृत्यू

बंगळुरु – कर्नाटकातील कोलार येथे लँड माफियांवर अंकूश ठेवणारे तरुण आएएस अधिकारी डी. के. रवी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. बंगळुरुत त्यांच्या फ्लॅटमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडला. बंगळुरुचे पोलिस आयुक्त एम.एन.रेड्डी म्हणाले, ‘प्राथमिक तपासानुसार ही आत्महत्या असल्याच वाटते. मात्र, त्यांच्या घरतून सुसाइड नोट सापडलेली नाही. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले आहे.’
कर्नाटकचे गृहमंत्री के.जे. जॉर्ज यांनी देखील घटनास्थळाची पाहाणी केली आहे. त्यांनी रवी यांच्या मृत्यूची सर्वबाजूनी तपास होईल याचे आश्वासन दिले.डी.के. रवी कर्नाटक केडरमधील 2009च्या बॅचेचे 35 वर्षीय आयएएस अधिकारी होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये कोलार येथून बंगळुरुमध्ये त्यांची अतिरिक्त आयुक्त (कमर्शिअल टॅक्स) या पदावर बदली झाली होती. त्यांच्या बदलीसाठी रिअल इस्टेट लॉबीचा दबाव असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे. त्यांच्या बदलीला कोलारमध्ये मोठा विरोध झाला होता. त्यांची बदली रद्द करावी यासाठी लोक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी लँड माफियांना वठणीवर आणण्याचे काम कोलार येथे केले होते.
0
दीक्षाभूमीवर लागणार सीसीटीव्ही

नागपूर : नवनियुक्त अध्यक्ष रमेश शिंगारे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी स्थायी समितीची पहिली बैठक पार पडली. तीत दीक्षाभूमी येथे ५० लाख रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची निविदा मंजूर करण्यात आली.
दीक्षाभूमी येथे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी जिल्हा नियोजन समितीतर्फे नाविण्यपूर्ण योजनेंतर्गत ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. संबंधित काम महापालिकेमार्फत केले जाणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत या कामासाठी मे. टेक्नोकी सोल्युशन यांची १२.६ टक्के कमी दराची निविदा मंजूर करण्यात आली. रिलायन्सने ४ जी साठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका मुलीचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. या घटनेची दखल घेत रिलायन्सचे सर्व खोदकाम थांबविण्याचे आदेश सिंगारे यांनी बैठकीत दिले. यापूर्वी करण्यात आलेले खोदकाम झोननिहाय बुजविण्यात यावे. सहाय्यक आयुक्तांची याची खातरजमा करावी व त्यानंतरच खोदकाम सुरू करावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
0
पत्ते खेळणे जुगार नव्हे, शारीरिक खेळ!

नवी दिल्ली: पत्ते खेळणे हे करमणुकीचे साधन किंवा जुगारी खेळ मानावे हे केंद्र सरकारचे म्हणणे अमान्य करून सर्वोच्च न्यायालयाने पत्ते खेळणे हा शारीरिक खेळ असल्याचे जाहीर केले आहे.
सरन्यायाधीश न्या. एच. एल. दत्तु यांच्या खंडपीठाने म्हटले की, पत्ते खेळताना हातांचा वापर केला जातो, त्यामुळे ते शारीरिक खेळाच्या प्रकारातही मोडू शकते.
न्यायालयाने हा निकाल पत्त्यांचे जोड उत्पादित करणाऱ्या उत्पादकांवर किती दराने उत्पादन शुल्क आकारायचे या संबंधीच्या वादात न्यायालयाने अलीकडेच हा निकाल दिला. शारीरिक खेळांसाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांच्या उत्पादनावर पाच टक्के अशा सवलतीच्या दराने उत्पादन शुल्क आकारले जाते. शारीरिक श्रमाविना खेळल्या जाणाऱ्या खेळांच्या क्रीडासाहित्यावर एक टक्का जास्त म्हणजे सहा टक्के दराने उत्पादन शुल्क आकारले जाते.
केंद्र सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल रोहटगी यांचे असे म्हणणे होते की, पत्ते खेळणे हा काही शारीरिक श्रमाचा खेळ नाही. त्यामुळे हा खेळ खेळण्यासाठी वापरला जाणारा पत्त्यांचा जोड हा ‘क्रीडासाहित्य’ या प्रकारात गणला जाऊ शकत नाही. परिणामी त्याला उत्पादन शुल्काचा सवलतीचा दर लागू होऊ शकत नाही. गेमिंग पार्लरमध्ये खेळल्या जाणाऱ्या पिन टेबल्स, बिलियर्ड्स किंवा कसिनो यासारख्या करमणुकीच्या किंवा जुगारी खेळांप्रमाणे पत्ते हा खेळ आहे, असे रोहटगी यांचे म्हणणे होते. कंपनीचे वकील अॅड. व्ही. लक्ष्मी कुमारन यांचे म्हणण असे होते की, सरकारची ही व्याख्या मान्य केली तर बुद्धिबळालाही खेळ म्हणता येणार नाही. न्यायालयाने त्यांचे म्हणणे मान्य केले.
0
जाट आरक्षण सुप्रीम कोर्टाकडून रद्द

नवी दिल्ली, दि. १७ – युपीए सरकारने गेल्या वर्षी जाट समाजाला दिलेले आरक्षण सुप्रीम कोर्टाने मंगळवारी रद्द केले.जातिनिहाय आरक्षणाची आवश्यकता नाही असे परखड मतंही सुप्रीम कोर्टाने मांडले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे आता केंद्र सरकारमधील नोकरी व शिक्षणात जाट आरक्षण लागू राहणार नाही.
गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीपूर्वी युपीए सरकारने जाट समाजाला ओबीसी कोट्यात आरक्षण दिले होते. याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल झाली होती. या याचिकेवर मंगळवारी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला. राजकीय हितासाठी जातिनिहाय आरक्षण दिले जात असेल ते चुकीचेच आहे असे सांगत सुप्रीम कोर्टाने जाट आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारने काढलेली अधिसूचना रद्द केली. जात ही आरक्षणाचा आधार ठरु शकत नाही. त्या जातीची विद्यमान सामाजिक व आर्थिक या बाबींचा अभ्यास करुनच आरक्षण द्यायला पाहिजे असे सुप्रीम कोर्टाने सांगितले.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे केंद्रातील जाट आरक्षण रद्द झाले आहे. मात्र ज्या ९ राज्यांनी जाट समाजाला आरक्षण दिले आहे तेथील जाट आरक्षण कायम राहणार आहे. या राज्यांमधील जाट आरक्षणाविरोधातही स्थानिक हायकोर्टांमध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. संविधानात जातीनुसार आरक्षण दिले जाते. सुप्रीम कोर्ट संविधानापेक्षा मोठे आहे का असा सवाल जाट समाजाचे नेते यशपाल मलिक यांनी उपस्थित केला. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सखोल अभ्यास करु व वेळ पडल्यास आंदोलन करु पण आमचा हक्क सोडणार नाही असे मलिक यांनी स्पष्ट केले.
0
अरुण गवळी नागपूर कारागृहात

नागपूर : नवी मुंबईतील तळोजा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला मुंबईचा डॉन अरुण गवळी याला सोमवारी सकाळी ९ वाजता कडेकोट पोलीस बंदोबस्तात नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात आणण्यात आले. त्यामुळे या कारागृहाची सुरक्षा व्यवस्था आणखी वाढविण्यात आली आहे.
मुंबईत नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्येप्रकरणी गवळीसह ११ जणांना मोक्का विशेष न्यायालयाने २४ आॅगस्ट २०१२ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हत्येची ही घटना २ मार्च २००७ ला घडली होती. जन्मठेप झाल्यापासून गवळीला तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे. खून, खंडणी वसुली, दंगल घडविणे, आदी गुन्हे त्याच्याविरुद्ध पोलिसात दाखल आहेत. गवळी हा तळोजा कारागृहात असताना त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला डिसेंबर २०१४ मध्ये मुंबईच्या जे.जे. इस्पितळात दाखल करण्यात आले होते. अरुण गवळीच्या जीवनावर ‘डॅडी’ नावाचा चित्रपट बनत आहे. या चित्रपटात डॅडीची भूमिका वठविणारा अभिनेता अर्जुन रामपाल याने इस्पितळात गवळीची भेट घेऊन चर्चा केली होती. या भेटीने वादळ उठले होते.
0
गोर बंजारा समाजाचा उद्या मुंबई येथे महामोर्चा

कल्याण : बंजारा समाजाला अनुसुचित जमातीत समावेश करण्यासाठी तसेच क्रिमिलीअरची अट रद्द करून मिळणे व बंजारा समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी बंजारा समाजाच्या सर्व संघटनांनी एकत्र येवुन “गोर बंजारा संविधानिक हक्क महासमिती” गठीत केली असुन या समितीचे नेतॄत्व बंजारा समाजाचे धर्मगुरू तपस्वी संत रामरावजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संघटनांचे अध्यक्ष करत असुन मोर्चाचे नेतॄत्व तपस्वी संत रामरावजी महाराज करणार आहेत.त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातुन किमान तीन ते चार लाख बंजारा बांधव या मोर्चात सहभागी होत आहेत.तरी सर्व समाज बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की बंजारा समाजाला संविधानिक हक्क मिळवुन देण्यासाठी मोठया संखेने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे कल्याण तालुका अध्यक्ष सतिष राठोड यांनी केले आहे.









