
मेलबोर्न, दि. १९ – रोहित शर्माच्या (१३७) दमदार शतकानंतर गोलंदाजांच्या भेदक कामगिरीमुळे भारताने बांग्लादेशचा १०९ धावांनी पराभव करत विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताच्या ३०३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांग्लादेशचे सर्व फलंदाज १९३ धावांवर बाद झाले. उमेश यादवने ४ तर शमी व जडेजाने प्रत्येकी २ आणि मोहित शर्माने १ बळी टिपत बांग्लादेशच्या फलंदाजांचा धुव्वा उडवला. विश्वचषक स्पर्धेत भारताने हा सलग सातवा सामना जिंकला असून कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा हा शंभरावा विजय आहे. उद्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात जो संघ जिंकेल त्या संघाशी भारताची सेमी फायनलमध्ये गाठ पडेल.
तत्पूर्वी रोहित शर्मा व सुरेश रैनाच्या खेळीच्या आधारे भारताने बांग्लादेशसमोर विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान ठेवले. भारताने ५० षटकांत सहा गडी गमावत ३०२ धावा केल्या. शेवटच्या षटकांमध्ये रविंद्र जडेजाच्या फटकेबाजीने भारताने ३०० चा टप्पा ओलांडला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित शर्मा व शिखर धवन या दोघांनी चांगली सुरुवात करुन दिली. भारताच्या ७५ धावा झाल्या असताना बांग्लादेशच्या गोलंदाजांना ही जोडी फोडण्यात यश आले. शिखर धवन ३० धावांवर यष्टीचित झाला. यानंतर विराट कोहली ३, अजिंक्य रहाणे १९ धावांवर बाद झाला. भारताची स्थिती २८ षटकांत ३ बाद ११५ अशी झाली यानंतर रोहितने सुरेश रैनासोबत शतकी भागीदारी कर भारताचा डाव सावरला.या जोडीने १२२ धावांची भागीदारी रचली. सुरेश रैना ६५ धावांवर बाद झाला. रोहित शर्माने वन डे कारकिर्दीतील ७ वे तर वर्ल्डकपमधील पहिले वहिले शतक ठोकले. वर्ल्डकपमध्ये फॉर्ममध्ये नसल्याने टीका करणा-या टीकाकारांनाही रोहितने त्यांच्या बॅटने चोख प्रत्युत्तर दिले.
शेवटच्या पाच षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा १३७ तर कर्णधार महेंद्रसिंग धोनी ६ धावांवर बाद झाला. रविंद्र जडेजाने १० चेंडूत ४ चौकार ठोकून २३ धावांची छोटी पण महत्त्वाची खेळी केली. ५० षटकांत रुबेल हुसैन यॉर्कर टाकून जडेजा व आर. अश्विनला फटकेबाजीची संधीच दिली नाही व भारताचा डाव ५० षटकांत ३०२ धावांवर रोखण्यात त्याला यश आले. बांग्लादेशतर्फे तास्कीन अहमदने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. मशरफे मोर्तझा, रुबेल हुसैन व शकीब अल हसन या तिघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
Archive for March 19th, 2015
0
भारताची सेमीफायनलमध्ये धडक, बांग्लादेशवर १०९ धावांनी विजय
0
माहूरच्या महिला नगराध्यक्ष एसीबीच्या कचाट्यात

माहूर (नांदेड) दि. १९ (सरफराज दोसानी)- घरकुलाचे अनुदान मंजूर करण्यासाठी लाभार्थ्यांला १० हजार रुपये लाचेची मागणी येथील नगराध्यक्षांनी केली आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
रमाई घरकुल योजनेंतर्गत केशव भगत यांना घरकुल मंजूर झाले होते. शासनाच्या नियमानुसार भगत यांनी घरकुलाचे बांधकाम पूर्ण करून आवश्यक कागदपत्र संबंधित विभागात दिले. मात्र, या लाभार्थ्यांला अनुदान दिले नाही. दरम्यान, माहूरच्या नगराध्यक्ष गौतमी कांबळे यांनी लाभार्थ्यांला आकाश रमेश कांबळे यांच्या मध्यस्थीने अनुदान देण्यासाठी १० हजारांची लाच मागितली. तसेच ११ व १२ फेबु्रवारी रोजी मोबाईलवरून एसएमएसवरून उर्वरित ३ हजार रुपये नगर परिषदचे कारकुन सिडाम यांच्याकडे दे, असा संदेश पाठविला. त्यावरून भगत व आकाश कांबळे यांनी नांदेड येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यावरून २० फेबु्रवारी रोजी नगर परिषदची सर्वसाधारण सभा असल्याने व ठरलेले पैसे देण्यासाठी भगत गेले होते. त्यावेळी सीसीटीव्ही कॅमेरा आहे पैसे घरी आणून दे, असे नगराध्यक्षांचे व्हाईस रेकॉर्ड लाच लुचपत विभागाने रचलेल्या सापळ््यात मिळून आले. त्यावरून आज १९ मार्च रोजी लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केला. कांबळे यांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामाचा पंचनामा, गुत्तेदार, एजन्सी व त्याचे बँक अकाऊन्ट तपासले जाणार आहे. ही कार्यवाही अप्पर पोलीस अधीक्षक एन. व्ही. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक एम.जी. पठाण, पोलीस निरीक्षक दयानंद सरवदे, जमा. अशोक देशमुख, चंद्रकात कदम, वामन कोकाटे, व्यंकट शिंदे, विनोद साखरकर, महिला पोलीस रत्नपारखे, चालक शेख अन्वर, अनिल कदम यांनी केली.
0
लाचखोर कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक व रोजगार सेवकास अटक

उमरखेड (यवतमाळ), दि. १९ – महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत मंजूर झालेल्या विहिरीचे खोदकाम व बांधकामाची एमबी मंजूर करण्यासाठी व मस्टर काढून देण्यासाठी शेतकºयाकडून लाच घेणारे कनिष्ठ अभियंता, ग्रामसेवक व रोजगार सेवकास रंगेहात पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज गुरुवारी ही कारवाई केली.
कनिष्ठ अभियंता सुभाष तगडपल्लेवार, जेवली येथील ग्रामसेवक डी. ए. मस्के, रोजगार सेवक विशाल देवसरकर अशी लाचखोरांची नावे आहे. एका शेतकºयाला महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत एक लाख ९० हजार रुपयांची विहीर मंजूर झाली होती. सदर विहिरीचे खोदकाम व बांधकाम संबंधाने पंचायत समिती येथून कामाची एम.बी. मंजूर करणे व मस्टर काढावे लागते. कामाची रक्कम मिळावी म्हणून शेतकºयाने तगडपल्लेवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तसेच ग्रामसेवक मस्के यांनी मंजूर झालेल्या विहिरीच्या कामाचे पैसे काढून देतो, असे म्हणून १९ हजार रुपये लाचेची मागणी रोजगार सेवकाच्या मध्यस्थीने केली होती. त्यावरून आज १९ मार्च रोजी सापळा रचून उमरखेड येथील हुतात्मा स्मारक गार्डन येथे पाच हजार रुपये स्वीकारताना तिन्ही आरोपींना पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक सतिश देशमुख, नितीन लेव्हरकर, जामकर, नरेंद्र इंगोले, अमोल महल्ले, शैलेश ढोणे, गजानन राठोड, अमित जोशी, नीलेश पखाले, अनिल राजकुमार, किरण खेडकर, सुधाकर मेश्राम, विशाल धलवार यांनी केली.
0
प्लॉटची विक्री करणारे दोन गजाआड

यवतमाळ,दि. १९ – शहरालगत असलेल्या भोसा येथील ले-आऊटमधिल तब्बल सात प्लॉटची विक्री करणाºया आणखी दोघांना वडगावरोड पोलिसांनी गजाआड केले आहे. शेख सलीम शेख हुसेन रा. सावरगड जि. गडचिरोली व अशोक बापूराव लव्हाने रा. शिरपूर अशी अटकेतील आरोपींची नावे आहे. आरोपींची संख्या आता सातवर गेली असून, त्यांना न्यायालयाने आज गुरुवारी २३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहरालगत असलेल्या भोसा ग्राम पंचायतीमध्ये ले-आऊट असून, त्याचा मालक वर्धा येथे वास्तव्यास आहे. याचा फायदा उचलून रवी उर्फ खन्ना सुरणकर, सचिन लडके, धनराज रेवते, नंदू थोटे, गुणवंत हनखोरे यांनी संगणमत करून प्लॉट विक्रीचा बेत आखला. त्यासाठी ओळखपत्र, बनावट दस्ताऐवज तयार करून एक दोन नव्हे तर चक्क सात प्लॉटची विक्री सुद्घा केली. याबाबतची माहिती मालकाला झाल्यावर त्याने पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली. पोलिसांनी पाचजणांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने यातील तीन आरोपींना १९ पर्यंत तर दोघांना २३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. चौकशीत शेख सलीम शेख हुसेन रा. सावरगड जि. गडचिरोली व अशोक बापूराव लव्हाने रा. शिरपूर या दोघांची नावे समोर आल्यावर पोलिसांनी काल बुधवारी या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्याची कबूली देण्यात आली आहे. त्यांना आज वडगावरोड पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. पोलिसांनी पाचजणांना २३ पर्यंत पोलीस कोठडी देण्यात यावी, असा अर्ज न्यायालयात केला होता. न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली असून, प्लॉट विक्रीचे घबाड बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
महिलांचा जिल्हाकचेरीवर घागर मोर्चा
यवतमाळ,दि. १९ – कळंब तालुक्यातील नांझा ग्राम पंचायतीने ६० लाख रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला सुरूंग लावल्याने गावावर जलसंकट आले आहे. गेल्या महिन्याभरापासून ग्रामस्थांना दोन किमीवरून पाणी आणावे लागत आहे. पाण्यासाठी महिलांनी आज गुरुवारी जिल्हा कचेरीवर घागर मोर्चा काढून प्रशासनाविरुद्घ संताप व्यक्त केला.
नांझा ग्राम पंचायतला गेल्या आठ वर्षपूर्वी भारत निर्माण योजनेतून पाणी पुरवठ्यासाठी ६० लक्ष रुपये मंजूर झाले होते. त्यामुळे पंधरादिवसाऐवजी आता दररोज पाणी मिळेल अशी अपेक्षा ग्रामस्थांना होती. गावात जलकुं भाचे काम सुरू झाले. पाईपलाईन टाकण्यात आली. त्यानंतर मात्र पंधरादिवसाला येणारे नळ महिना -महिना बेपत्ता झाले. त्यामुळे गावाला बारोमास पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे. गेल्या एक महिन्यापासून तर नळाला थेंबरही पाणी आले नसून, महिलांना पाण्यासाठी गावाबाहेर असलेल्या दोन विहिरीवर जावे लागत आहे. त्यासाठी दोन किमीचा प्रवास महिलांना करावा लागत असून, पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी ग्राम पंचायतीकडे अनेकदा केली. मात्र ग्राम पंचायत पाणी पुरवठा योजनाच हस्तांतरीत झाली नसल्याचे सांगून ग्रामस्थांची दिशाभूल करीत आहे. काम करतेवेळी जूनीच पाईप वापरण्यात आल्याने नळ योजना फसल्या गेली आहे. ६० लाख रुपयांच्या निधीत गैरप्रकार केल्याने ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पाण्यासाठी त्रासलेल्या महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढून मागणीचे निवेदन दिले. पाण्यासाठी दोन किमीचा प्रवास करावा लागत असून, तात्काळ उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी जयश्री बोदंरे, दुर्गा लेडें, मंदा पुरके, उशा बुरबूरे, रेखा हसतबांधे, रत्नमाला काबंळे, दुर्गा मलकापुरे, बेबी मुके, शालू मुके, बेबी वाघाडे आदी महिला उपस्थित होत्या.
0
‘चला बुद्ध धम्माच्या वाटेवर’ चळवळीचे प्रणेते हनुमंत उपरे यांचे निधन

मुंबई- ‘चला बुध्द धम्माच्या वाटेवर’ या चळवळीचे प्रणेते व ओबीसी समाजाचे नेते हनुमंत ऊपरे (वय 63) यांचे आज सकाळी मुंबईत निधन झाले. मागील महिन्यात उपरे यांच्या मेंदुत रक्तस्त्राव (ब्रेन ह्यमरेज) झाल्याने ते कोमात होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपरे यांच्यावर उद्या दुपारी त्यांच्या मूळगावी बीडजवळील नानलगाव फाटा येथे बौध्द पद्धतीने अंत्यविधी होणार आहे.
सत्यशोधक ओ.बी.सी. परिषदेचे अध्यक्ष म्हणून उपरे यांनी सामाजिक क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला. उपरे यांनी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते. सामाजिक प्रश्नांवर, दलित, ओबीसी यांच्या सामाजिक, राजकीय व आरक्षण विषयाबाबत त्यांनी भरीव काम केले.
0
शिवसेनेचा ‘जैतापूर’वर धडक मोर्चा, आमदार-खासदार पोलिसांच्या ताब्यात

रत्नागिरी- रत्नागिरीतील जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाचे कार्यालय उद्धवस्त करण्यासाठी निघालेला शिवसेनेचा आंदोलन मोर्चा पोलिसांनी एक किलोमीटर अलीकडेच रोखून धरला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी शहराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे. आज सकाळपासूनच जैतापूरमधले वातावरण तणावाचे आहे.
दरम्यान, अणुउर्जा प्रकल्पाचे कार्यालय उद्धवस्त करणारच, असा निर्धार शिवसेना आमदार राजन साळवी यांनी केला आहे. पोलिसांनी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, राजन साळवी यांच्यासह शेकडो शिवसैनिकांना ताब्यात घेतले आहे. तसेच अनुचित घटना टाळण्यासाठी प्रकल्प कार्यालय परिसर, राजापूर, जैतापूर, नाटे परिसरात कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.जैतापूर प्रकल्पाला शिवसेनेचा जोरदार विरोध आहे. हा प्रकल्प कोकणातून हद्दपार करण्यासाठी सेनेने स्थानिकांच्या मदतीने सुरूवातीपासूनच विविध आंदोलने केली होती. त्यामुळे या प्रकल्पाचे काम बंद ठेवण्यात आले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी पुन्हा हा प्रकल्प सुरू करण्याच्या हलचालींना वेग आला. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत प्रकल्पाचे कार्यालयदेखील सुरू करण्यात आले होते. त्यामुळे शिवसेनेने हे कार्यालय उद्धवस्त करण्याचा इशारा दिला होता.
त्यानुसार आज शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोर्चाचे आयोजन केले. मात्र, शिवसैनिकांना कार्यालयापर्यंत पोहचू नये याची पुरेपूर काळजी घेत कार्यालयापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोर्चाला आज सुरूवात झाल्यानंतर पोलिसांनी हा मोर्चा अडविला आहे. दरम्यान, पोलिसांनी कितीही प्रयत्न केले तरी गनिमी कावा करून शिवसैनिक कार्यालय उद्धवस्त करतीलच, असा विश्वास आमदार राजन साळवी यांनी व्यक्त केला आहे.
0
वांद्रे पोटनिवडणूक: शिवसेनेची तृप्ती सावंत यांना उमेदवारी

मुंबई – नारायण राणे यांच्या संभाव्य उमेदवारीमुळं चर्चेत आलेल्या वांद्रे येथील विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेने येथील दिवंगत आमदार प्रकाश (बाळा) सावंत यांची पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी दिली आहे.
बाळा सावंत यांच्या निधनामुळं ही पोटनिवडणूक होत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपशी युती नसतानाही बाळा सावंत यांनी येथून ४१,३८८ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला होता. दुसऱ्या क्रमांकावर भाजपचे कृष्णा पारकर हे होते. त्यांना २५, ७९१ मते मिळाली होती. मात्र, आता होणाऱ्या पोटनिवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय भाजपनं घेतल्यामुळं शिवसेनेचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे.
राणे लढणार का?
वांद्र्यातून काँग्रेसनं नारायण राणे यांना लढण्याची ऑफर दिली आहे. राणे त्या दृष्टिनं चाचपणीही करत आहेत. मागील निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार चौथ्या क्रमांकावर फेकला गेला होता. काँग्रेसच्या उमेदवाराला जेमतेम १२ हजार मतं मिळाली होती. नवख्या एमआयएमनं २३,९७६ मतं मिळवत काँग्रेसला धक्का दिला होता. हे चित्र पाहता राणे यांनी निवडणूक लढविली तरी ती त्यांना सहजसोपी नसेल. मतांचं मोठं अंतर पार करण्याचं आव्हान त्यांच्यापुढं असेल. राणे हे आव्हान स्वीकारणार का, याबाबत उत्सुकता आहे.
0
गोर बंजारा संविधानिक हक्क महासमितीचा विराट मोर्चा
मुंबई,(महाराष्ट्र न्यूज नेटवर्क,सतिष राठोड)
मुंबई येथिल आझाद मैदान येथे दि.१८ मार्च रोजी गोर बंजारा संविधानिक हक्क महासमिती आयोजित व बंजारा समाजाचे धर्मगुरु संत तपस्वी रामरावजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.त्यात बंजारा समाजातील सर्व संघटनांनी सहभाग घेतला असुन महाराष्ट्रातील बंजारा समाजाच्या,शासनाकडे प्रलंबित असलेल्या मागण्या,संपूर्ण देशात एकच भाषा, एकच बोली,एकच वेशभुषा व एकच संस्कृती,चालीरीती जपणारी एकमेव जगात गोर (बंजारा) असूनही वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गात या समाजाला विभागून ठेवले आहे.आजपर्यंत अनेक सामाजिक संघटनांनी वेगवेगळी आंदोलने करुन सरकारचे डोळे उघडण्याचे प्रयत्न केले.परंतु सत्तेत येणाञा सरकारने आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी खोटेे आश्वासना व्यतीरिक्त या समाजाला काहीच दिले नसुन निव्वळ फसवणूक केली आहे.व बंजारा समाजावर अन्याय केला आहे.
या वर्गात मिळण्यात येणाञा सवलती बंद केले आहे.सरकारी नौकरी करणाञा कर्मचाञांची पदोन्नती वरही बंदी लावण्यात आली असुन,सरकारने बंदी उठवावी, बंजारा जमातीला अनुसुचित जातीत समाविष्ठ करण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून केंद्र सरकारला शिफारस करण्यात यावी,बंजारा यांना लावलेली क्रिमीलेअरची जाचक अट रद्द करण्यात यावी,मॅटने दिलेला निकाल रद्द करुन पदोन्नतीबाबत नविन जी.आर काढण्यात यावे,प्रत्येक तांड्याला महसुली दर्जा व स्वतंत्र ग्रामपंचायत मंजुर करणे,तांडा विकास योजना फक्त तांड्यासाठी राबवावा व तांडा विकास महामंडळ स्थापन करण्यात यावा.गोर बंजारा भाषेला राजभाषेचा दर्जा द्यावे,बंजारा विमुक्त भटक्यांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात आर्थिक तरतुद करण्यात यावी,वसंतराव नाईक महामंडळाकरीता १,००० कोटींची तरतुद करण्यात यावी व अध्यक्ष म्हणून गोर बंजाराचाच असावा.बंजारा जमातीची जनगणना करणे,स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये स्वतंत्र आरक्षण देण्यात यावा,तसेच आंध्र, कर्नाटक व उत्तर प्रांतातून आलेल्या बंजारा बांधवांना आरक्षणाची सवलत देऊन क्षेत्रीय बंधन रद्द करण्यात यावा व ( जातीचा दाखला पुरावा करीता सन १९६१ पूर्वीची अट रद्द करणे),बांधकाम कामगार, नाका कामगार,उसतोड कामगार, मच्छी कामगार तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष सोयी-सवलती उपलब्ध करुन देण्यात यावी, भूमीहिन, बेरोजगार युवक युवतींसाठी जमीन, उद्योगधंद्यासाठी स्वस्त दराने कर्ज उपलब्ध करुन देणे, बंजारा भवन उभारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जागा व निधी उपलब्ध करुन देण सदगुरु सेवालाल जयंतीची सुट्टी जाहीर करण्यात यावी,वसंतराव नाईक साहेबांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात यावा, गोर बंजाराची शैक्षणिक व आर्थिक गुणवत्ता वाढावी व शासन प्रशासनात भागीदारी घेण्यासाठी सक्षम व्हावे यासाठी तालुका, जिल्ह्याच्या ठिकाणी हाॅस्टेल, स्पर्धा पराक्षा केंद्राची स्थापना करण्यात यावी, तसेच शाळा,काॅलेजमध्ये प्रवेश घेतांना फी माफ करण्यात यावी व एससी,एसटी प्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात यावी आदि अनेक मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे राष्ट्रीय अध्यक्ष व गोर बंजारा संविधानिक हक्क महासमिती सदस्य मा. आत्मारामजी जाधव यांनी दिली असुन या महासभेच्या व्यासपीठावर शासनाचे प्रतिनिधी म्हूणून सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले,महसुल राज्यमंत्री ना.संजयभाऊ राठोड, माजी मंत्री मनोहरजी नाईक, आ.हरीभाऊ राठोड, आ.तुषार राठोड, राजु नाईक,प्रदिप नाईक, अॅड.अविनाश जाधव, अॅड.नरेश राठोड, अशोक चव्हाण,अजय राठोड,राधेश्याम आडे, ए.बी. चव्हाण,रविराज राठोड आदि समाज सेवक उपस्थित होते.व बडोले यांनी आश्वासन दिले की,गोर बंजारा समाजाने केलेल्या मागणीचा पाठपुरावा करुन या समाजाला योग्य न्याय देण्यात येईल. यावेळी हजारोच्या संख्येने राज्यातल्या कानाकोपञातून महिला व पुरुषांनी पारंपारिक वेशभुषेत, बंजारा भाषेत गाणी गात सहभाग घेतला.
0
बांग्लादेशसमोर ३०३ धावांचे आव्हान

मेलबोर्न, दि. १९ – रोहित शर्माचे दमदार शतक आणि सुरेश रैनाच्या अर्धशतकाच्या आधारे भारताने बांग्लादेशसमोर विजयासाठी ३०३ धावांचे आव्हान दिले आहे. भारताने ५० षटकांत सहा गडी गमावत ३०२ धावा केल्या असून शेवटच्या षटकांमध्ये रविंद्र जडेजाच्या फटकेबाजीने भारताने ३०० चा टप्पा ओलांडला.
वर्ल्डकपमधील बादफेरीत गुरुवारी भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात सामना सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित शर्मा व शिखर धवन या दोघांनी चांगली सुरुवात करुन दिली. भारताच्या ७५ धावा झाल्या असताना बांग्लादेशच्या गोलंदाजांना ही जोडी फोडण्यात यश आले. शिखर धवन ३० धावांवर यष्टीचित झाला. यानंतर विराट कोहली ३, अजिंक्य रहाणे १९ धावांवर बाद झाला. भारताची स्थिती २८ षटकांत ३ बाद ११५ अशी झाली यानंतर रोहितने सुरेश रैनासोबत शतकी भागीदारी कर भारताचा डाव सावरला.या जोडीने १२२ धावांची भागीदारी रचली. सुरेश रैना ६५ धावांवर बाद झाला. रोहित शर्माने वन डे कारकिर्दीतील ७ वे तर वर्ल्डकपमधील पहिले वहिले शतक ठोकले. वर्ल्डकपमध्ये फॉर्ममध्ये नसल्याने टीका करणा-या टीकाकारांनाही रोहितने त्यांच्या बॅटने चोख प्रत्युत्तर दिले.
शेवटच्या पाच षटकांमध्ये फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात रोहित शर्मा १३७ तर कर्णधार महेंद्रसिंग धोनी ६ धावांवर बाद झाला. रविंद्र जडेजाने १० चेंडूत ४ चौकार ठोकून २३ धावांची छोटी पण महत्त्वाची खेळी केली. ५० षटकांत रुबेल हुसैन यॉर्कर टाकून जडेजा व आर. अश्विनला फटकेबाजीची संधीच दिली नाही व भारताचा डाव ५० षटकांत ३०२ धावांवर रोखण्यात त्याला यश आले. बांग्लादेशतर्फे तास्कीन अहमदने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. मशरफे मोर्तझा, रुबेल हुसैन व शकीब अल हसन या तिघांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
0
फेसबुक पोस्ट टाकल्याने विद्यार्थ्याला अटक
रामपूर(उत्तर प्रदेश) – उत्तर प्रदेशचे मंत्री आणि समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी अकरावीत शिकणा-या एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली.
माहिती तंत्रज्ञान च्या कलम २२ अ अंतगर्त त्याला दोषी ठरवत स्थानिक न्यायालयाने त्याला तुरुंगात धाडले आहे. आझम खान यांचे प्रसिद्धी प्रमुख फसाहत अली खान यांनी या पोलीस ठाण्यात या प्रकऱणी तक्रार दाखल केली होती.
मंगळवारी आरोपी विद्यार्थ्याला न्यायालयात सादर करण्यात आले. यावेळी न्यायलयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
0
अर्थसंकल्प : घोषणांचा पाऊस

मुंबई- महाराष्ट्रातील जनतेला मोठमोठी स्वप्ने दाखवत सत्तेवर आलेल्या भाजपा-शिवसेना युतीच्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा अवकाळी पाऊस ठरला आहे. भाजपा नेत्यांच्या नावाने नवीन योजना, मोठमोठय़ा घोषणा आणि सवंग शेरोशायरी करीत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या या अर्थसंकल्पात १ ऑगस्टपासून राज्यात एलबीटी रद्द करण्याची घोषणा आहे. मात्र त्यासाठी लागणारा पंधरा हजार कोटींचा निधी कसा उपलब्ध करणार याचा कुठेही खुलासा नाही. ३ हजार ७५७ कोटी रुपये तुटीचा हा अर्थसंकल्प राज्यातील जनतेची पूर्णपणे निराशा करणारा असल्याची प्रतिक्रिया अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे.
निवडणूक काळात वाट्टेल ती आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपा सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले होते. विधान परिषदेत राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी एखादा निबंध वाचून एकदाची आपल्यावरची जबादारी पार पाडावी, असा अर्थसंकल्प वाचून टाकला. तर सुधीर मुनंगटीवार यांनी मात्र शेरोशायरीच्या नादात दोन तास सभागृहात भाषण केले. २०१५-१६च्या अर्थसंकल्पामध्ये जमा १ लाख ९८ हजार २३० कोटी आहे. तर महसुली खर्च २ लाख १ हजार ९८८ कोटी अंदाजित केला आहे. परिणामी ३ हजार ७५७ कोटी रुपये महसुली तूट येणार आहे. अनावश्यक खर्चात बचत करून व महसुली वसुली अधिक प्रभावीपणे करून ही तूट मर्यादित करू, असे अर्थमंत्र्यांनी म्हटले असले तरी नेमक्या कोणत्या प्रभावी उपाययोजना करणार याचा स्पष्टपणे कुठेही उल्लेख केलेला नाही.
अनेक योजनांची नावे बदलून त्यांना भाजपा आणि जनसंघांच्या नेत्यांची नावे देण्यात आली आहेत. तर पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री ग्रामीण मार्ग योजना जाहीर केली आहे. त्यासाठी ३ हजार कोटी या वर्षी राखून ठेवण्यात येणार असून पुढे प्रतिवर्षी १ हजार कोटींचा निधी देण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले. खासदारांनी गाव दत्तक घेण्याच्या पंतप्रधान मोदी यांच्या घोषणेच्याच धर्तीवर आमदार आदर्श ग्राम योजनाही त्यांनी जाहीर केली. सिंचन प्रकल्पाचे तांत्रिक व वित्तीय नियोजन करून प्रकल्प अंमलबजावणीचा कालबद्ध कार्यक्रम राबविण्यासाठी जलसंपदा विभागास ७ हजार २७२ कोटी रुपयांचा निधी, स्वच्छ भारत अभियानासाठी ८१० कोटी, मुंबई मेट्रो-३ साठी १०९.६० कोटी, नागपूर मेट्रोसाठी- १९७.६५ कोटी. तर पुणे मेट्रोकरिता २६८ कोटी निधीची घोषणा करण्यात आली.
सर्वसामान्य जनतेच्या प्रवासाचे साधन असलेल्या एसटी गाडय़ांची खरेदी व एसटी स्थानके दुरुस्तीसाठी केवळ ४१४ कोटी रुपये देण्यात येणार आहे. बांधकामाधीन रेल्वे प्रकल्पांसाठी ६८.६० कोटी रुपये व विमामनतळ विकासाकरिता ९१ कोटी रुपये निधी देण्याचेही अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले. राज्यातील पर्यटनात वाढ होण्यासाठी मार्गस्थ सुविधांसाठी ५० कोटी, वन पर्यटन व जैविक विविधता संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळाची स्थापना, प्रत्येक जिल्ह्यात उत्तमराव पाटील वन उद्यान निर्मिती, महिला बचत गटांच्या उत्पादित वस्तूंसाठी कायमस्वरूपी पुण्योक अहिल्याबाई होळकर बाजारपेठ अशा अनेक घोषणाही त्यांनी केल्या. राज्याच्या विविध भागात सुरू असलेल्या योजनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंत्रालयीन स्तरावर स्वतंत्र नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात येईल, अशी घोषणाही त्यांनी केली.
या अर्थंसंकल्पातील ठळक वैशिष्ट्ये
शेतक-यांसाठी जलयुक्त शिवार योजना सरकारने हाती घेतली आहे
राज्यासाठी ५४ हजार ९९९ कोटींची य़ोजना
सावकारी कर्जातून शेतक-यांची मुक्तता करणार
जीवनावश्यक वस्तूंवरील सवलत ३१ मार्च २०१६ पर्यंत कायम
एक ऑगस्ट २०१५ पासून एलबीटी रद्द करणार
मूल्यवर्धित करात वाढ केल्याने एलबीटी रद्द
राज्यात देशी मद्य महाग होणार
शेतक-यांच्या आत्महत्या चिंताजनक बाब
दुष्काळग्रस्तांसाठी चार हजार कोटींची मदत केली
साखळी सिमेंट बंधा-यासाठी ५०० कोटी
शेतक-यांसाठी कृषी समृद्ध योजना
शेतक-यांसाठीच्या कृषी समृद्धी योजनेसाठी ५० कोटींची तरतूद
कृषी पंपासाठी एक हजार ३९ कोटींचे अनुदान, सात हजार ५४० सौर कृषीपंप बसवणार
दोन लाख २३ हजार शेतक-यांना कर्जमुक्तीचा फायदा
यवतमाळ जिल्ह्यात मोतीराम लहाने कृषी समृद्धी योजना
सूक्ष्म सिंचनासाठी अर्थसंकल्पात ३३० कोटींची तरतूद
गारपिटीपासून संरक्षणासाठी द्राक्षे उत्पादक शेतक-यांना नेटशेडसाठी अनुदान
शेतीचा विकास चार टक्क्यांवर आणण्यासाठी सरकार कटिबद्ध
मुंबई, कोकणमध्ये जेट्टी उभारण्साठी १२० कोटींची तरतूद
मुख्यमंत्री ग्रामीण मार्ग योजनेची घोषणा, योजनेसाठी ३५० कोटींची तरतूद
ग्रामीण रस्त्यांसाठी दोन हजार ४१३ कोटींची तरतूद
आमदार आदर्श गाव योजनेची घोषणा
पाच वर्षात एक हजार गावे आदर्श होतील
प्रत्येक आमदाराने तीन गावे आदर्श बनवावू
जलविद्युत प्रकल्पासाठी ९०० कोटींची तरतूद
वीजदर कमी करणे राज्य शासनाचा उद्देश
घरकुल योजनेसाठी २०० कोटींची तरतूद
पं. दीनदयाल उपाध्याय घरकुल योजना, दोन लाख १७ हजार भूमीहीनांना होणार फायदा
राज्य सरकार एक लाख घरांची उभारणी कणार
मुंबई मेट्रोसाठी १०९ कोटी ६० लाखांची तरतूद
नागपूर मेट्रोला १९८ कोटींची तरतूद
पुणे मेट्रोला १७५ कोटींची तरतूद
बस स्थानकांचे नूतनीकरण, नवीन बस खरेदीसाठी १२५ कोटी देणार
२०२० पर्यंत सर्वांना घरे देणार
पाणीपुरवठा आणि मलनिस्सारण योजना राबवणार
राज्य महामार्गांसाठी तीन हजार कोटींची तरतूद
मिहान प्रकल्पासाठी २०० कोटींची तरतूद
मेक इन महाराष्ट्र नवा उपक्रम सुरु कऱणार
रत्नागिरीतील जयगड बंदर रेल्वेला जोडणार, त्यासाठी ६८ कोटी ६० लाखांची तरतूद
राज्यातील तीर्थक्षेत्रांसाठी १२५ कोटींचा अतिरिक्त निधी
कोल्हापूर, अमरावती, कराडमध्ये विमानतळ, ९१ कोटींची तरतूद
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नागपूरमधील स्मारकासाठी १० कोटींची तरतूद
रायगडावर रायगड महोत्सव सुरु कऱणार
मुंबईमध्ये मोफत वायफाय सुविधा
उद्योग क्षेत्रासाठी तीन हजार १५० कोटींची तरतूद
वस्त्रोद्योगासाठी ५९ कोटी ६६ लाख
किल्ले संवर्धनासाठी ५० कोटींची तरतूद
राज्यांतील जिल्ह्यात हायटेक रोपवाटिकेसाठी ११ कोटींचा निधी
प्रमोद महाजन कौशल्य विकास योजनेची घोषणा
महाराष्ट्र प्राणी संग्रहालय प्राधिकरण सुरु करणार
प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास केंद्राची स्थापना, १६१ कोटी ८४ लाखांची तरतूद
सागरी किनारा पर्यटनासाठी ४१ कोटी
राज्यात मुलींच्या वसतिगृहासाठी ११२ कोटी ५२ लाखांचा निधी
कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र बनवणार
जे.जे. सोबतच इतर कला महाविद्यालयांच्या आधुनिकीकरणासाठी १० कोटी
शालेय शिक्षणासाठी एक हजार ६९० कोटी
औरंगाबादमध्ये स्कूल ऑफ प्लानिंग अँड आर्किटेक्चरची स्थापना करणार
राज्यातील सार्वजनिक व्यायामशाळांसाठी ५० कोटींची तरतूद
मुलींच्या वसतिगृहांच्या संरक्षक भिंतीसाठी २५ कोटींचा निधी, तीन वर्षात बांधणार
आरोग्य संस्थांच्या बांधकामांसाठी ३८९ कोटी ९२ लाखांची तरतूद
जे.जे. रुग्णालयाच्या नव्या बांधकामाला परवानगी, रुग्णालयात एक हजार खाटा उपलब्ध करणार
राज्य सरकारची माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी २०० कोटींची तरतूद
औरंगाबाद, नाशिक, नागपूरमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार
राज्यातील मुस्लिम बहुल ४४० गावांसाठी २५ कोटींची तरतूद
सायबर गुन्हे रोखण्यासाठी १८ कोटींची तरतूद
७० नवजात शिशू रुग्णवाहिका घेणार
इंदूमिलमध्ये डॉ. आंबेडकरांचे स्मारक, १०० कोटींची तरतूद
राज्यातील लोककलांच्या माहितीच्या संगणकीकरणासाठी ७० लाखांची तरतूद
रेशन दुकाने बायोमेट्रिक करण्यासाठी १०३ कोटी
राज्यातील २०६ हुतात्मा स्मारकांच्या नुतनीकरणासाठी २५ कोटींची तरतूद
बाळासाहेब ठाकरे अध्ययन केंद्रासाठी पाच कोटी
औरंगाबादमध्ये गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक उभारणार
माहिती व तंत्रज्ञान विभआगासाठी १० कोटींचा निधी
अरबी समुद्रात शिवस्मारक बांधणार
९५६ दुर्मिळ ग्रंथांचे डिजीटलायझेशन होणार, मोडी लिपीतील ग्रंथाची जोपासना
कर संकलनाची पद्धत सुकर करणार, एक लाख १८ हजार ६४० कर संकलनाचे उद्दिष्ट
कर संकलन पद्धतीचे संगणीकरण
एक एप्रिलपासून राज्यात जीएसटी लागू करणार
परमवीर चक्र विजेत्यांचे मुंबईत स्मारक बांधणार
संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेसाठी एक हजार ४५१ कोटी ५० लाखांची तरतूद
पोलीस वसाहतींमध्ये आधुनिक सुविधा पुरवणार
कर्करोगावरील उपचारासाठींच्या औषधांवरील कर माफ
एलईडी बल्ब, महिलांच्या पर्स स्वस्त होणार
देशी बटर, व्हाइट खारी बटर, बेदाणे स्वस्त
मासिक पगार १० हजार रुपये असणा-या महिलांना व्यवसायिक कर नाही











