
पर्थ – अननुभवी संयुक्त अरब अमिरातीला (यूएई) हरवत भारताने विश्वचषकातील सलग तिसरा विजय नोंदवला. अर्ध्या दिवसात संपलेल्या लढतीत महेंद्रसिंग धोनी आणि सहका-यांनी वर्चस्व राखले.
मात्र प्रतिस्पर्ध्यानी निराशा केल्याने लढत एकतर्फी झाली. गतविजेत्यांनी ९ विकेट आणि १८७ चेंडू (३१.१ षटके) इतक्या मोठय़ा फरकाने जिंकताना ‘ब’ गटातील अव्वल स्थान आणखी भक्कम केले. तसेच बाद फेरीसाठीची दावेदारी अधिक मजबूत केली.
पर्थच्या (वाका) खेळपट्टीवर वेगवान गोलंदाज वर्चस्व राखतील, असे वाटले. मात्र फिरकीपटूंना अधिक यश मिळाले. भुवनेश्वर कुमार (१ विकेट) आणि उमेश यादव (२ विकेट) या मध्यमगती दुकलीच्या प्रभावी मा-यानंतर अनुभवी ऑफस्पिनर आर. अश्विनने (१०-१-२५-४) अप्रतिम मारा करत विश्वचषकच नव्हे तर वनडे कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट वैयक्तिक कामगिरीची नोंद केली.
त्याला डावखु-या रवींद्र जडेजाची (२३-२) चांगली साथ लाभली. भारताच्या गोलंदाजी अचूक आणि टिच्चून मारा केलाच. मात्र यूएईच्या फलंदाजांनी निराशा केली. त्यांचे आघाडीचे फलंदाज चुकीचे फटके मारून बाद झाले. निम्मा संघ ४४ धावांत परतल्यानंतर यूएईचे धावांचे ‘शतक’ पूर्ण होण्याबाबत साशंकता होती.
मात्र शायमन अन्वरने (३५) तळातील असांका गुरुगेसह (नाबाद १०) शेवटच्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी करताना संघाला शतकी मजल गाठून दिली. अन्वरची खेळी यूएईतर्फे सर्वाधिक वैयक्तिक खेळी ठरली. तसेच त्याने गुरुगेसह केलेली भागीदारी डावातील सर्वोच्च ठरली.
गोलंदाजांनी विजय नक्की केल्याने १०३ धावांचे आव्हान म्हणजे केवळ सोपस्कार होते. डावखुरा सलामीवीर शिखर धवनच्या (१४) बदल्यात १८.५ षटकात भारताने विजयी लक्ष्य पार केले. अन्य सलामीवीर रोहित शर्मा (५५ चेंडूंत नाबाद ५७ धावा) आणि ‘वनडाउन’ विराट कोहलीने (४१ चेंडूंत नाबाद ३३ धावा) दुस-या विकेटसाठी नाबाद ७५ धावांची भागीदारी करताना २० षटकांच्या आतच विजय साकारला.
रोहितने यंदाच्या विश्वचषकातील पहिले आणि वनडेतील २४वे अर्धशतक झळकावताना १० चौकार आणि एक षटकार लगावला. कोहलीने ५ चौकार मारले. फलंदाजांनी निराशा केली तरी यूएईच्या गोलंदाजांनी भारताची एक विकेट घेतली. तसेच एकही अवांतर धाव दिली नाही.
सलग तिस-या विजयामुळे भारताने १२ गुणांसह ‘ब’ गटातील अव्वल स्थान अधिक मजबूत केले. भारताच्या आणखी तीन लढती (वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि आर्यलड) शिल्लक आहे. गटवार साखळीतील चौथ्या लढतीत शुक्रवारी (६ मार्च) पर्थवरच भारत विंडिजशी झुंजेल.
धावफलक
यूएई – अमजद अली झे. धोनी गो. भुवनेश्वर ४, आंद्री बेरेंगर झे. धोनी गो. उमेश ४, कृष्णचंद्रन झे. रैना गो. अश्विन ४, खुर्रम खान झे. रैना गो. अश्विन १४, स्वप्नील पाटील झे. धवन गो. अश्विन ७, शायमन अन्वर त्रि. गो. उमेश ३५, रोहन मुस्तफा पायचीत गो. मोहित २, अमजद जावेद झे. रैना गो. जडेजा २, मोहम्मद नाविद त्रि. गो. अश्विन ६, मोहम्मद तौकीर त्रि. गो. जडेजा १, मंजुला गुरुगे नाबाद १०, अवांतर – १३ धावा (लेगबाईज ४, वाईड ९), एकूण – ३१.३ षटकांत सर्वबाद १०२
बादक्रम : १-७ (बेरेंगर), २-१३ (अमजाद), ३-२८ (कृष्णचंद्रन), ४-४१ (स्वप्नील पाटील), ५-४४ (खुर्रम), ६-५२ (मुस्तफा), ७-६१ (जावेद), ८-६८ (नवीद), ९-७१ (तौकीर), १०-१०२ (अन्वर)
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ५-०-१९-१, उमेश यादव ६.३-२-१५-२, रविचंद्रन अश्विन १०-१-२५-४, मोहित शर्मा ५-१-१६-१, रवींद्र जडेजा ५-०-२३-२
भारत – रोहित शर्मा नाबाद ५७, शिखर धवन झे. मुस्तफा गो. नाविद १४, विराट कोहली नाबाद ३३, अवांतर – ०. एकूण – १८.५ षटकांत १ बाद १०४.
बादक्रम : १-२९ (धवन).
गोलंदाजी – मोहम्मद नाविद ५-०-३५-१, मंजुला गुरुगे ६-१-१९-०, अमजद जावेद २-०-१२-०, कृष्णचंद्रन ३-०-१७-०, मोहम्मद तौकीर २.५-०-२१-०
निकाल : भारत ९ विकेटनी विजयी.
Archive for February, 2015
0
भारताचा यूएईवर दणदणीत विजय
0
जादूटोण्याच्या संशयातून इसमाचा खून

पुसद (यवतमाळ), दि. २८ – जादूटोणा केल्याच्या संशयातून इसमाला लोखंडी खांबाला बांधून आठ जणांनी बेदम मारहाण केली. यातच इसमाचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना तालुक्यातील वेणी (खु.) येथे २७ फेब्रुवारीच्या रात्री ८.३० वाजता दरम्यान घडली. माधव लक्ष्मण खंदारे (५५) असे मृताचे नाव आहे.
माधव खंदारे हा इसम रात्री दरम्यान काम आटोपून घरी आल्यानंतर गावातील आठ जणांनी त्यास घरी गाठले. जादूटोना केल्याचा संशय व्यक्त करीत लोखंडी खांबाला बांधून लाथा बुक्यांनी पोट, छातीवर बेदम मारहाण केली. हा प्रकार बघून गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेवून माधवला आठही जणांच्या तावडीतून सोडविले. गंभीर जखमी माधव खंदारे त्याच अवस्थेत घरी गेला. मात्र काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. पार्वती खंदारे हिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी इस्माईल खान मनवर खान, नाजीर खान मनवर खान, उस्मान खान नामदार खान, सलमान खान इस्माईल खान, जमीर यांच्याविरुद्ध १४३, १४७, १४९, ३०३ कलम ३ (२) महाराष्टÑ नरबळी इतर अमानुष व इतर अनिष्ट प्रथा व जादुटोना प्रतिबंध कायदा २०१३, कलम ३ (२)(५) अनुसूचित जाती अन्वये गुन्हा नोंद केला आहे. घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्वीनी पाटील यांनी घटनास्थळ गाठून प्रकरणाची चौकशी केली. याप्रकरणाचा पुढील तपास ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार बुरळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण करीत आहे. जाटूटोण्याच्या संशयातून एकाला संपविल्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
0
वादळी वाºयासह पाऊस, वीज कोसळून एक ठार, तीन जखमी

यवतमाळ, दि. २८ – वादळी वाºयासह गारपीटीने जिल्ह्याला आज दुपारी चांगलेच झोडपून काढले.बिटरगाव येथे वीज कोसळल्याने एक ठार झाला असून, दोन जण जखमी झाले. महागाव तालुक्यातील वनोली येथील युवकाच्या अंगावर भिंत कोसळली. दिग्रसमध्ये घरांची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले. यवतमाळातही वादळी वारा व गारपीटीमुळे भाजी विक्रेत्यांचे नुकसान झाले. रब्बी पिकांना व फळबागांना गारपीटीचा व वादळी वाºयाचा सर्वाधिक फटका बसला असून, पुन्हा एकदा शेतकरी संकटात सापडला आहे.
शहरात दुपारी ३ वाजताच्या सुामारास वादळी वाºयासह गारपीट झाली. यामध्ये दत्त चौकालगत असलेल्या भाजी व फ्रु ट विक्रेत्यांची पळापळ झाली. दुकानाचे शेड उडाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले. तहसील चौक, नेताजी चौक, बसस्थानक चौकासह अन्य मार्गावरील झाडे कोसळल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. वादळी वारा व गारपीटीमुळे विद्यूत तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाला. तहसील चौकानजीक असलेल्या कारागृहावरील टिनपत्रे उडाली. उमरखेड तालुक्यातील बिटरगाव येथील शेतकरी पांडूरंग चिकने (४५) आपल्या दोन मुलासह शेतातून परतत असताना, अचानक आलेल्या वादळी वाºयामुळे व विजेच्या कडकडाटीमुळे त्यांनी झाडाचा आडोशा घेतला. यावेळी रतननगरनजीक पांडूंरंग चिकने यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर विशाल व मनोज ही दोन मुले जखमी झाली आहे. महागाव तालुक्यातील वनोली येथील पवन प्रकाश चव्हाण (१६) या युवकावर शेतातील कोठ्याची भिंत पडल्याने तो जखमी झाला आहे. दिग्रस येथील होलटेक पुरा, शनिमंदिर चौकातील राजा तिलावार यांचे घरावरील टिनाची कैची पुर्ण पणे उडून एका उंच झाडावर अडकली. देवनगर परिसरातील नारायणराव चिरडे यांचे घरावरील टिनपत्रे उडाल्याने त्यावरील फाड्या (दगड) घरात पडले. रमेश ठाकुर यांचा लाकूड फाटा व वर अंथरलेल्या टिनाचे संपूर्ण घर खाली कोसळले. तालुक्यातील विठोली, कांदळी, तुपटाकळी, लाख (रा) परिसरातील गहु, संत्रा पिकाचे नुकसान झाले. वादळी वारा व गारपीटीमुळे गहु, हरबºयासोबतच फळबागांचेही नुकसान झाले आहे.
0
वखार महामंडळात साडेचार कोटींचा घोटाळा, तिघांवर गुन्हे दाखल

उमरखेड (यवतमाळ) , दि. २८ – वेगवेगळ््या लोकांकडून खरेदी केलेले सोयाबीन, हरभºयाचे एकूण १२ हजार ६१९ पोते धान्य स्थानिक वखार मंडळाच्या गोदामातून वखार मंडळाचे भाडे अदा न करताच परस्पर हलविल्या प्रकरणी पोलिसांनी केंद्र प्रमुख, परिवाहक आणि धान्य व्यापारी या तिघांविरुद्ध फसवणूक तथा अफरातफर प्रकरणी गुन्हे दाखल केल्यामुळे एकच खळबळ उडाली. विशेष म्हणजे हे धान्य स्थानिक वाशीम अर्बन को. आॅप. बँकेला कर्जापोटी तारण होते. चातारी येथील घाऊक धान्य खरेदीदार श्रीधर माने यांनी सन २०१३ ते २१ फेब्रुवारी २०१५ पर्यंत वेगवेगळ््या लोकांकडून सोयाबीन तथा हरभरा खरेदी करून एकंदर १२ हजार ६१९ पोते धान्य स्थानिक वखार मंडळाच्या गोदामात साठविले होते. या धान्याच्या तारण पावतीवर खरेदीदाराने कर्जापोटी लाखो रुपयांची उचल वाशीम अर्बन बँकेच्या स्थानिक शाखेतून उचल केली होती. कर्जापोटी उचल केलेल्या रकमेची परत फेड न करताच त्याचप्रमाणे वखार मंडळाच्या साठवणुकीचे भाडे न देताच धान्य गोदामातून वखार मंडळातील केंद्र प्रमुख रोडगे, परिवाहक नेरकर आणि धान्य व्यापारी श्रीधर माने यांना एकमेकांच्या संगनमताने परस्पर हलविले. ही बाब राज्य वखार मंडळाचे अमरावती विभागाचे व्यवस्थापक मिलिंद मंगल घन यांच्या लक्षात येताच त्यांनी या प्रकाराची सविस्तर तक्रार उमरखेड पोलिसांत दिली. पोलिसांनी केंद्रप्रमुख परिवाहक आणि धान्य साठवणूक व्यापारी या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले. गोदामात साठविलेल्या धान्याची बाजार भावाने ४ कोटी २० लाख ३१ हजार ६१३ रुपये एवढी किंमत असून, उमरखेडच्या इतिहासातील मोठा धान्य घोटाळा असून, वखार मंडळाच्या विश्वासार्हतेवर या प्रकाराने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
0
मोदींचा संकल्प दाखवणार ‘महागाईचे दिन’

नवी दिल्ली – सर्वसामान्यांना ‘अच्छे दिन..’ चे स्वप्न दाखवत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारने महागाईचे दिन दाखवणारा अर्थसंकल्प सादर केला आहे.केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करताना उद्योगजगताला पुढल्या चार वर्षांसाठी कॉर्पोरेट टॅक्समध्ये दिलासा दिला आहे. त्यामुळे अच्छे दिन श्रीमंतांचे का ? असा प्रश्न या अर्थसंकल्पावर उपस्थित झाला आहे.जेटलींनी वयैक्तिक करदात्यासाठींची आयकर (इनकम टॅक्स) कररचना कायम ठेवली असली तरी, त्याचा करदात्याला फायदा होण्याची शक्यता कमी आहे. कारण दुस-या बाजूला जेटलींनी सेवाकर १२.३६ टक्क्यांवरुन १४ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे.त्यामुळे हॉटेल, मोबाईल, घर, गाडी या सर्वच वस्तू महागणार आहेत. ग्राहकाला वस्तू खरेदी करताना सेवा कर द्यावा लागतो. कॉर्पोरेट टॅक्स पुढल्या चार वर्षांसाठी ३० टक्क्यांवरुन २५ टक्के केला आहे. त्यामुळे मोदींच्या अच्छे दिनांसाठी आणखी वर्षभर वाट पहावी लागणार आहे.
या अर्थसंकल्पात ही ठळक वैशिष्ट्ये
कर सेवा
आर्थिक विकास कार्यात जीएसटीची भूमिका परिवर्तनवादी असते
पुढील चार वर्षांसाठी कॉर्पोरेट टॅक्स २५ टक्के
करमुक्त उत्पन्नाची मर्यादा कायम राहणार
एक कोटीहून अधिक उत्पन्नावर दोन टक्के अधिभार
कृषि क्षेत्र
ग्रामीण विकास पायाभूत विकास बँकेसाठी २५ कोटी रुपयांचे अनुदान
सूक्ष्म सिंचन प्रकल्पासाठी ३०० कोटींचा निधी
शेतक-यांना कर्जासाठी ८.५ लाख कोटी रुपयांचा निधी
पायाभूत सुविधा क्षेत्र
पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी ७० हजार कोटी रुपायांची तरतूद
सिंचन आणि रेल्वे, रस्ते प्रकल्पासाठी टॅक्स फ्री बॉण्ड
पायाभूत सुविधांचे पुनरुज्जीवन आणि विकासाठी पीपीपी मॉडेलचा आधार
रिसर्च अँड डेव्हलपमेंट फंडासाठी १५० कोटी रुपये
प्रत्येकी चार हजार मेगावॅट क्षमतेचे चार अल्ट्रा मेगा पॉवर प्रकल्प सुरु करणार
शिक्षण
जम्मू-काश्मीर, पंजाब, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, बिहार आणि आसाममध्ये एम्स स्थापणार
कर्नाटक, धनबाद येथील आयआयटींचा दर्जा वाढवणार
अमृतसरमध्ये उद्यानविद्येच्या अभ्यासक्रमासाठी पीजी इन्स्टिट्यूट
महाराष्ट्र, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये फार्मा सेंटर
अरुणाचल प्रदेशमध्ये आणखी एक फिल्म इन्स्टिट्यूट
संरक्षण
संरक्षण क्षेत्रासाठी दोन लाख, ४६ हजार ७२७ कोटींची तरतूद
संरक्षण साधनांच्या उत्पादनासाठी मेक इन इंडियावर अधिक लक्ष केंद्रित करणार
कल्याणकारी योजना
स्वच्छ भारत अभियानांतर्गत ५० हजार प्रसाधने बांधण्यात आली.
जीएसटी एक एप्रिल २०१६मध्ये लागू करणार
२०२० पर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाला घर मिळणार
देशातील ८० हजार माध्यमिक शाळांमध्ये सुधारणा आणणार
अटल पेन्शन योजना सुरु होणार.यात ५० टक्के प्रिमियम सरकार भरणार
वरिष्ठ नागरिकांसाठी अनेक नव्या योजना
मनरेगासाठी अतिरिक्त पाच हजार कोटी रुपयांची तरतूद
लघु उद्योगांसाठी मुद्रा बँकेची स्थापना
पारंपारिक उर्जा
इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनासाठी ७५ कोटी रुपयांचा निधी
२०२२पर्यंत पारंपारिक उर्जेचे लक्ष्य – सौर उर्जा – १०० हजार मेगावट, पवनउर्जा – ६० हजारमेगावॅट, जैवइंधन – १० हजारमेगावॅट, आणि लघु जलविद्युत – पाच हजारमेगावॅट
पर्यटन
देशातील जुना गोवा, हम्पी, एलिफंटा लेणी, राजस्थानातील जंगले, लेह पॅलेस, वाराणसी, जालियनवाला बाग, हैदराबादमधील कुतुब शाही मकबरा यांचा पर्यटनस्थळांचा दर्जा
१५० देशांतील पर्यटकांना व्हिसा ऑन अरायव्हलची सुविधा
0
काय महागणार आणि काय होणार स्वस्त

नवी दिल्ली – सामान्य नागरिकांना अच्छे दिन पासून दूर ठेवणारा मोदी सरकारचा पहिला पूर्ण अर्थंसकल्प शनिवारी संसदेत सादर करण्यात आला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात सेवा करात १२.३६ टक्क्यांवरुन १४ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सेवा कर वाढल्याने याचा परिणाम महागाईवर होणार आहे. फोन बिल, हॉटेलचे बिल, घरे यांच्या किंमतीत वाढ होणार आहे. काय होणार आहे महाग आणि काय होणार स्वस्त यावर एक नजर
हे होणार महाग
सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादने
सिमेंट
सुगंधित पेय आणि बाटलीबंद पाणी
प्लॅस्टिक पिशव्या
म्युझिक कॉन्सर्ट
दारू, चिटफंड आणि लॉटरी
बिझनेस क्लासचा हवाई प्रवास महागणार
आयात करण्यात आलेली व्यवसायिक वाहने
वर्ल्डकपमध्ये भारताची विजयाची हॅट्रीक
हे होणार स्वस्त
एक हजार रुपयांहून अधिक किमतीच्या चामड्याच्या चपला
लोकल कंपन्यांचे मोबाईल फोन, एलईडी/एलसीडी पॅनेल्स, एलईडी लाईटस आणि एलईडी दिवे
सोलार वॉटर हीटर
रुग्णवाहिका आणि त्याच्या सुविधा
संगणक, टॅब्लेट
अगरबत्ती
मायक्रोव्हेव ओव्हन
रेफ्रिजरेटर कॉम्प्रेसर
पीनट बटर, पाकीटबंद फळे आणि भाज्या
राष्ट्रीय उद्याने, प्राणिसंग्रहालय, संग्रहालय यांना भेटी देणे
0
अर्थसंकल्पाचा फायदा उद्योगपतींना – पी.चिदंबरम

नवी दिल्ली – मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प केवळ उद्योगपतींच्या फायद्याचा आहे. पहिल्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अरुण जेटली हे जमा-खर्च आणि समानतेचे गणित सोडवण्यात अपयशी ठरले आहेत, अशी जोरदार टीका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली.
या अर्थसंकल्पात केवळ उद्योगपतींना फायदा देण्यात आला आहे. तर ३.५ कोटी प्राप्तिकरदात्यांना थोडक्यात दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र सेवा कराचा बोजा वाढल्याने त्यात ते पिचणार आहेत, असेही चिदंबरम म्हणाले. सरकारने वित्तीय तूट कपात करण्याचे लक्ष ठेवले आहे. ही तूट ३.९ वरून ३.६ टक्के आणण्यात येणार आहे. याचाच अर्थ सरकारला ३७,५०० कोटी रुपयांचे कर्ज काढावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.
0
मोदी सरकारचा महागाईचा डबल दणका

नवी दिल्ली – महागाई कमी करण्याचे दावे करुन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी महागाईमध्ये भर घालणारा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर शनिवारीच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करुन, सर्वसामान्यांना मोदी सरकारने महागाईचा डबल दणका दिला आहे.
प्रतिलीटर पेट्रोल तीन रुपये १८ पैशांनी तर, प्रतिलीटर डिझेल तीन रुपये ९ पैशांनी महागले आहे. आधीच १२ टक्के असणारा सेवाकर १४ टक्के करुन महागाईला खतपाणी घातल्यानंतर आता प्रतिलीटर डिझेलच्या दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य माणूस महागाईमध्ये होरपळणार आहे. भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती डिझेलवर अवलंबून असतात. आता डिझेलच्या किंमती भडकल्याने दैनंदिन वापराच्या वस्तू महागणार आहेत.
0
आकडयांची आतषबाजी, घोषणाबाजीचा अर्थसंकल्प

नवी दिल्ली – नऊ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या मोदी सरकारने रेल्वे अर्थसंकल्पापाठोपाठ सर्वसाधारण अर्थसंकल्पात केवळ आकडय़ांची आतषबाजी आणि घोषणाबाजी केली.
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१५-१६ या वर्षाचा ४,६६,७११ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प संसदेत मांडला. या अर्थसंकल्पात सेवा कर १४ टक्के केल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे.
रालोआ सरकारचा पहिला पूर्ण अर्थसंकल्प अरुण जेटली यांनी मांडताना उद्योगांना झुकते माप दिले. तर प्राप्तिकर सवलत ‘जैसे थे’ ठेवल्याने लाखो करदात्यांच्या पदरात निराशा पडली आहे. या अर्थसंकल्पात कॉर्पोरेट करात येते चार वर्षे ५ टक्के कर सवलत दिली असून संपत्ती कर रद्द करून त्याऐवजी अतिश्रीमंतांवर दोन टक्के अधिभार लावला आहे.
सेवा कर महागल्याने सिगारेट, कुरियर, हवाई प्रवास, मद्य, हॉटेलिंग, केबल, डीटीएच सेवा, ब्युटीपार्लर आदींसाठी सर्वसामान्यांना अधिक पैसे मोजावे लागतील. वैयक्तिक करदात्यांच्या प्राप्तिकराचे दर कायम ठेवण्यात आले आहेत.
0
कुर्ला स्टेशन ते बीकेसी अंतर ५ मिनिटात

मुंबई- कुर्ला स्टेशन ते एलबीएस मार्गहून बांद्रा कुर्ला काॅम्पलेक्स (बीकेसी) ला जाण्यासाठी वाहन चालकाला ३० मिनिट येवढा वेळ लागतो,पण अात्ता कुर्ला स्टेशन ते बीकेसी जाण्यासाठीचा वेळ ५ मिनिटात शक्य असेल,त्यासाठी बीएमसी ने हा रस्ता जोडण्यासाठी २५ कोटीचा एक प्रकल् मंजूर केला अाहे.
अारटीअाय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या सतत प्रयत्नातून हे शक्य झाले अाहे,तसेच १३ मार्च २०१३ ला बीएमसी कमिश्नर सिताराम कुंटे व अनिल गलगली यांच्या बैठक झाल्यानंतर या प्रकल्पाच्या कार्याला गती मिळाली अाहे.या प्रकल्पानुसार २२११ वर्ग मिटरच्या डेविड चाळ ला हटवण्यात येणार असुन त्यानंतर या प्रकल्पाचा मार्ग मोकळा असेल.
0
मनपाजवळ बॉम्ब ठेवणा-या विद्यार्थीला अटक

नाशिक – नाशिक मनपा जवळ सुयोजित हाईटसमधील एका बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयाबाहेर बॉम्ब ठेवणा-याला अटक करण्यात आली आहे. बॉम्ब ठेवणारा आरोपी १२वीचा विद्यार्थी आहे. नाशिक पोलिसांनी बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयातील सीसीटीव्ही फूटेज तपासून बॉम्ब ठेवणा-याला अटक केली आहे. बॉम्ब ठेवणा-या तरुणाची चौकशी सुरू असून लवकरच संपूर्ण घटनेवर प्रकाश पडेल, अशी माहिती नाशिक पोलिसांनी दिली.
अटक करण्यात आलेला तरुण बॉम्ब ठेवण्यासाठी येताना चेह-यावर रुमाल बांधून स्कूटरवरुन आला होता. स्कूटर मनपाजवळ बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयाबाहेर उभी करुन तरुण एक खोका घेऊन कार्यालयात गेला. चेह-यावरील रुमाल न काढता त्याने कुरिअर घेऊन आल्याचे सांगितले. बांधकाम व्यावसायिकाकडे काम करणा-या शिपायाने तरुणाला खोका कार्यालयाच्या दरवाज्याजवळील टेबलावर ठेवून जाण्यास सांगितले. बाहेर पडल्यावर तरुणाने थोड्यावेळाने बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात फोन करुन बॉम्ब ठेवल्याचे सांगितले. फोन आल्यानंतर लगेच बांधकाम व्यावसायिकाच्या कर्मचा-यांनी तरुणाने आणलेला खोका कार्यालयाच्या इमारतीबाहेर नेऊन ठेवला आणि पोलिसांना बोलावले. पोलिसांनी बॉम्ब शोक पथकाच्या सहकार्याने खोक्यातील बॉम्ब निकामी केला होता.
0
भू-संपादन विधेयकात बदल करण्यास मोदींची तयारी

नवी दिल्ली- भूसंपादन विधेयकाला झालेल्या तीव्र विरोधामुळे आता भू-संपादन विधेयकात शेतक-यांच्या हितासाठी काही बदल करणे आवश्यक असल्यास ते करण्यास आम्ही तयार आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत सांगितले. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अभिभाषणानंतर लोकसभेत उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी नरमाईची भूमिका घेतली. मात्र भूसंपादन विधेयक, मनरेगा, काळा पैसा, जनधन योजना अशा अनेक मुद्यांवर मोदींनी विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला.
सुरुवातीला काही बदल करणे आवश्यक असल्यास ते बदल करु, असे म्हणणा-या मोदींनी काही क्षणातच सरकारने प्रस्तावित केलेले भूसंपादन विधेयक देशातील शेतक-यांच्या हिताचेच असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र त्यात काही बदल करायचे असल्यास विरोधी पक्षांनी चर्चा करावी. आम्ही खांद्याला खांदा लावून तुमच्यासोबत चालायला तयार आहोत. मात्र कारणाशिवाय आणि राजकीय स्वार्थासाठी भूसंपादन विधेयकाला विरोध करु नका, असे मोदी म्हणाले.
त्याचबरोबर काँग्रेसचे भू-संपादन विधेयक शेतक-यांच्या फायद्याचे असते तर लोकांनी त्यांना निवडून दिले असते, अशी मुक्ताफळेही मोदींनी उधळली. तसेच हे सरकार गरिबांसाठी काम करणार असल्याचे आश्वासन दिले. मनरेगा हा काँग्रेसचा ६० वर्षांतला जिवंत पुरावा आहे. हा पुरावा मी मिटवणार नाही. मनरेगा हे काँग्रेसच्या अपयशाचे स्मारक आहे. त्यामुळे आम्ही ती योजना बंद करणार नाही. काळ्या पैशाच्या बाबतीत जी-२० च्या व्यासपीठावर हा विषय घेण्यात आला आहे. तीन वर्ष सरकारने काळ्या पैशासाठी एसआयटी स्थापन केली नव्हती, आम्ही ते काम पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत केले. योजना कुणी आणली, तिचे नाव काय आहे, हा मुद्दा नाही, तर समस्या आहे हे सगळ्यांना मान्य आहे ना, मग समस्या कशी सोडवायची हा मुद्दा आहे. देश स्वच्छ आणि भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊ. जनतेच्या समस्या, शेतक-यांचे प्रश्न सर्वजण मिळून सोडवू. काळा पैसा परत आणण्यासाठी ज्यांच्यावर दबाव टाकायचा आहे, त्यांच्यावर सर्वांनी मिळून दबाव टाकू, असे आवाहन मोदी यांनी केले.
0
पतीने जाळून घेतले – पतीचा मृत्यू, वाचविण्याच्या प्रयत्नात पत्नी भाजली

कळंब दि. २७ – कौटुंबिक कलहातून वाद निर्माण झाल्याने रागाच्या भरात पतीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यामध्ये सदर इसमाचा मृत्यू झाला तर वाचविण्यासाठी गेलेली त्याची पत्नीही गंभीरपने भाजली असून मृत्यूशी झुंज देत आहे. तालुक्यातील बोरी महाल येथे गुरुवारी रात्री ८ वाजता ही घटना घडली असून गावात खळबळ उडाली आहे.
गणेश सिताराम मेश्राम (३८) असे मृतकाचे तर सुनंदा गणेश मेश्राम (३०) रा. बोरी महाल असे जखमी पती-पत्नीची नावे आहेत. गणेश हा पत्नीसोबत सतत क्षुल्लक कारणावरून वाद करून भांडण करीत होता. अशातच शुक्रवारी २६ फेबु्रवारी रोजी रात्री ८ वाजता पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण झाले. यावेळी रागाच्या भरात गणेशने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले. यावेळी त्याला वाचविण्यासाठी गेलीली त्याची पत्नी सुनंदा ही गंभीरपणे भाजली. हा प्रकार लक्षात येताच नातेवाईक व गावकºयांनी मेश्राम दाम्पत्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र ९० टक्के जळाल्याने गणेशचा रात्री उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर ६० टक्के भाजलेली सुनंदा ही मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे. त्याच्या मागे दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
0
मुलीवर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न . आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास

यवतमाळ . दि. २७ – घरी एकटी असल्याचे पाहुन मुलीवर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाºया आरोपीला तीन वर्ष सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली. अतिरीक्त सत्र न्यायाधिश ए.सी. चाफले यांच्या न्यायालयाने आज शुक्रवारी या खटल्याचा निकाल दिला.
रमेश तिमाजी ठाकरे (४५) रा. पहुर पुनर्वसन ता. बाभूळगाव असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. गावातीलच १३ वर्षीय बालिकेला राहत्या घरी एकटी टिव्ही पाहत असताना रमेश घरात घुसला. त्यानंतर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बालिकेने सुटका केली. याप्रकरणी बाभूळगाव पोलिसांनी आरोपी रमेशविरूद्घ गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी जमादार रमेश मगर यांनी आरोपीला अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. हा खटा न्या. ए.सी. चाफले यांच्या न्यायालयात चालला. सरकारी पक्षाच्या वतीने सात साक्षी तपासण्यात आल्या. रमेशला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये तीन वर्ष सश्रम कारावास, ५०० रुपये दंड आणि भांदवि ३५४, ४४८, ४५२ या कलमान्वयेही शिक्षा ठोठावयात आली आहे. या खटल्यात अतिरीक्त सरकारी वकील अॅड. निलीमा जयवंत यांनी युक्तीवाद केला.
0
वीज बिलाची होळी

उमरखेड , दि. २७ – महाराष्टÑ वीज ग्राहक संघटनेच्या वतीने वीज दरवाडी विरोधात संतप्त वीज ग्राहकांनी स्थानिक गांधी चौकात वीज बिलांची होळी केली.
राज्यातील ३०० युनिटच्या आतील सर्व सामान्य घरगुती व व्यावसायीक विद्युत ग्राहकावर २०१४ मध्ये सबसिडी रद्द केली. त्यावर २० टक्केदरवाढीचा बोजा लादण्यात आला. आता पुन्हा १२ टक्के दरवाढ होण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे यंत्रमाग धारक व उद्योजक या सर्व वित्त ग्राहकांचे वीज दर शेजारच्या राज्याच्या तुलनेत दिड ते दुप्पट झाले आहे. सदर दरवाढ सर्व सामान्य व्यक्तीला परवडणारी नाही. त्यामुळे शासनाने किमान दोन वर्षापासाठी वीजदर स्थिर ठेवावे. शेजारील राज्याप्रमाणे दर ठेवावे अशी मागणी मुख्यमंत्री, उर्जामंत्र ी महाराष्टÑ राज्य यांचंकडे संघटनेने केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष साजीद जागीरदार, सचिव राजू जयस्वाल, ओम सारड, इनायतुला जनाब, नंदकिशोर अग्रवाल, मझर टेलर, प्रमोद रुडे, इसराज, प्रेम बाहेती, राठोड याच्यासह वीज ग्राहक उपस्थित होते.
0
द.आफ्रिकाकडून वेस्ट इंडिजचा २५७ धावांनी पराभव

सिडनी- दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा २५७ धावांनी दणदणीत पराभव केला. वेस्ट इंडिजच्या संपूर्ण संघाला आफ्रिकेने अवघ्या ३३ षटक आणि एका चेंडूत १५१ धावांमध्ये गुंडाळले.
डीविलियर्सच्या नाबाद १६२ धावांच्या खेळीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणा-या दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजला विजयासाठी ४०९ धावांचे लक्ष्य ठेवले होते.
या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ १५१ धावांवर गारद झाला. ख्रिस गेल अवघ्या ३ धावांवर बाद झाला. जो होल्डरने सर्वाधिक ५६ धावा केल्या. स्मीथ ३१, सॅम्यूअल्स ००, कार्टर १०, रामदीन २२, सॅमी ०५ धावा केल्या. तर सिमन्स आणि रसेल शून्यावर बाद झाले. बेन अवघी एक धाव काढून तंबूत परतला. जे टेलर १५ धावांवर नाबाद राहिला. तत्पूर्वी, झंझावती फलंदाजीसाठी प्रसिध्द असलेला दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ए. बी. डीविलियर्स याने अवघ्या ६६ चेंडूंमध्ये १६२ धावांची तुफान खेळी साकारली. तर आमला, प्लेसी, रोसॉ यांच्या अर्धशतकी खेळीमुळे दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजविरुद्ध ५० षटकांत ५ बाद ४०८ धावांचा डोंगर उभा केला. आमला (६५), डू प्लेसी (६२) तर रॉसॉने केवळ ३९ चेंडूंमध्ये ६१ धावा केल्या.
0
पाकिस्तानात भूकंपाचा धक्का, पाच जखमी

इस्लामाबाद – पाकिस्तानच्या वायव्य भागात शुक्रवारी सकाळी ५.४ रिश्टर स्केलचा भूकंपाचा तीव्र धक्का बसला. भूकंपाचा धक्का बसल्याने पाच जण जखमी झाले आहे.
अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार, इस्लामाबादमधील खैबर पख्तुनवाला प्रांतातील हझारसा भागापासून १०० किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्रबिंदू होते.
‘आतापर्यंत हाती आलेल्या अहवालानुसार पाच नागरिक यात जखमी झाले आहेत. मात्र जखमींमध्ये कोणाचीही प्रकृती चिंताजनक नाही,असे पोलीस अधिका-यांनी सांगितले.
इस्लामाबाद तसेच पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील काही भागांमध्येही या भूकंपाचे हादरे जाणवले.
0
स्वाइन फ्लू : ज्येष्ठ पत्रकार रमेश राऊत यांचे निधन

औरंगाबाद – ज्येष्ठ पत्रकार रमेश राऊत यांचे आज पहाटे स्वाइन फ्लूमुळे निधन झाले आहे. ते 52 वर्षांचे होते. सात दिवसांपासून आजारी असलेल्या राऊत यांना गुरुवारी स्वाइन फ्लू झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना घाटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी पाहाटे पाच वाजताच्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्च्यात पत्नी माधूरी आणि मुलगी रेणू आहे.
रमेश राऊत यांनी गेली दोन दशके औरंगाबादमधील अनेक दैनिकांमध्ये पत्रकार ते संपादक पदापर्यंत जबाबदारी सांभाळली होती. साप्ताहिक चित्रलेखाचे ते अनेक वर्षे मराठवाडा प्रतिनिधी होते. या काळात त्यांनी केलेले सामाजिक आणि राजकीय लेखन गाजले होते. मुंबईत दैनिक सामानामध्येही त्यांनी काम केले.
सामनामध्ये काम केल्यामुळे ठाकरे कुटुंबियांशी त्यांची ओळख होती. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद दौर्यावर आल्यानंतर राऊत यांची आस्थेवाईक चौकशी करत असायचे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारणीवरही ते होेते. त्याचबरोबर साक्षात प्रकाशन संस्थेचे ते संचालक होते.
राऊत यांना प्रथम डॉ. हेडगेवार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. गुरुवारी त्यांना स्वाइन फ्लू झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना घाटी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. त्यांची पत्नी माधूरी यांच्यावरही घाटीमध्ये उपचार सुरु आहेत.
0
पाकिस्तानचा भारतीय चौकीवर गोळीबार

श्रीनगर – आंतरराष्ट्रीय सीमेवर आठवडाभर शांतता पाळल्यानंतर पाकिस्तानी रेंजर्सनी गुरुवारी रात्री पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
रात्री साडेनऊच्या सुमारास जम्मूमधील आर.एस.पूरा सेक्टरमधील सीमा सुरक्षा दलाच्या चौकीवर गोळीबार केला. पाकिस्तानी रेंजर्सनी गोळीबारासाठी छोटया शस्त्रास्त्रांचा वापर करत नावपिंड चौकीवर गोळीबार केला. पाकिस्तानच्या हद्दीत असलेल्या थाटी भागातून हा गोळीबार झाला. सौम्य स्वरुपाचा हा गोळीबार असल्याने बीएसएफने या गोळीबाराला प्रत्युत्तर दिले नाही.
घुसखोरीला मदत करण्यासाठी हा गोळीबार झाला असण्याची शक्यता असून, बीएसएफने आंतरराष्ट्रीय सीमेवर सर्तकतेचा इशारा दिला आहे.
0
वडिलांना अग्नी देऊन विद्यार्थिनीने दिला बारावीचा पेपर

हडपसर : सहा महिन्यांपूर्वीच ती आईच्या मायेला पारखी झाली, त्यातच वडीलांचेही छत्र हरपले. मात्र शिक्षणाचा ध्यास घेत श्रद्धाने वडिलांना अग्नी देऊन बारावीचा पेपर लिहिला. शिक्षणावरील या श्रद्धेने तिने विद्यार्थीमित्रांपुढे नवा आदर्श ठेवला आहे.
श्रद्धा मनोज कदम (१९, रा. ढेरे बंगला, गोपाळपट्टी, मांजरी बु.) असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वीच तिच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर बारावीचा दुसरा पेपर दिला आणि लगेचच वडिलांच्या निधनाची बातमी तिला ऐकावी लागली. बुधवारी रात्री ८.१५ च्या सुमारास वडिलांचे निधन झाले. गुरुवार सकाळी साडे नऊ वाजता श्रद्धाने वडिलांना मांजरी गावातील स्मशानभूमीमध्ये अग्नी दिला व ११ वाजता परीक्षा केंद्रावर हजर झाली.
दरम्यान, श्रद्धाला पेपर देण्यास धीर मिळावा म्हणून तिच्या चुलत बहिणीला गुरुवारी परीक्षा हॉलच्या बाहेर बसविण्या आले होते, असे साधना विद्यालयाचे प्राचार्या के. डी. रत्नपारखी यांनी सांगितले. श्रद्धा कदम या विद्यार्थिनीवर झालेला भावनिक आघात पाहता तिने परीक्षेला दाखविलेली उपस्थिती सर्वच विद्यार्थ्यांना आदर्श ठरली. आज दिवसभर हडपसरमध्ये तिच्या उपस्थितीचा विषय चर्चेचा ठरला.









