
मुंबई – सचिन तेंडुलकर यांनी जे पत्र लिहलंय त्यात टोलबाबत समस्या सांगितल्या आहेत. त्याची आम्ही गांभीर्याने दखल घेतली असून संबंधीत विभागाला सुचना दिल्या आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. टोलविरोधात आता खुद्द मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर मैदानात उतरलाय. सचिन तेंडुलकरनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र लिहिलंय. टोल वसुलीच्या धोरणाचा फेरविचार करा, अशी विनंती सचिननं मुख्यमंत्र्यांना केलीय. 20 फेब्रुवारीला त्यानं हे पत्र लिहिलंय.
सचिनच्या पत्राबद्दल मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत खुलासा केला. सचिन यांनी पत्र लिहले त्यात टोलच्या समस्येबद्दल माहिती देण्यात आलीये. या अगोदर आघाडी सरकारने हवे तिथे टोल उभारले. याबद्दल आम्ही विधानपरिषदेत माहिती दिली. सचिनने लिहलेल्या पत्राची गांभीर्याने दखल घेतली असून संबंधीत विभागाला सुचना करण्यात आलीये असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर, गेल्या दोन महिन्यांपासून सचिनच्या पत्रातील समस्येबद्दल आम्ही तयारी करतोय. मोठी वाहनं आणि छोटी वाहनं मोजणीमध्ये वेळ जात असल्यामुळे ट्रफिक जामची समस्या उद्भवत आहे. यावर तोडगा काढला जाईल. सचिनच्या पत्राशी आम्ही सहमत आहोत असं सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. तर भाजपने सत्तेत आल्यावर टोलमुक्त महाराष्ट्र करणार अशी घोषणा केली होती, ती घोषणा अगोदर पूर्ण करावी असा टोला नितेश राणे यांनी लगावलाय.
Archive for March 13th, 2015
0
सचिनच्या पत्राची गांभीर्याने दखल घेतली -मुख्यमंत्री
0
भातसा प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन होणार !

ठाणे – गेल्या 47 वर्षांपासून पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असलेल्या भातसा धरण प्रकल्पग्रस्तांना अखेर न्याय मिळालाय. आता या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा निर्णय महापालिकेनं घेतलाय.
भातसा धरण प्रकल्पग्रस्तांना अखेर न्याय मिळाला. गेली 47 वर्ष भातसा धरण प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन झाले नव्हतं. त्यांचं आता मुंबई महापालिका पुनर्वसन करणार आहे. तसंच त्यांच्या कुटुंबातल्या एका व्यक्तीला मुंबई महापालिकेत नोकरीही देण्यात येणार आहे. येणार्या भरतीमध्ये भातसा प्रकल्पग्रस्तांना नोकरी देणार आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेत आयुक्त आणि महापौर यांच्या सोबत बैठक घेऊन हा निर्णय घेतला. बैठकीनंतर भातसा धरण प्रकल्पग्रस्तांनीही समाधान व्यक्त केलंय.
0
शेतकरी सावकारांच्या कर्जातून मुक्त होणार

मुंबई – दुष्काळ, गारपीट आणि अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतक-यांना मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आज घेतला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील तब्बल दोन लाख २३ शेतकरी सावकारांच्या कर्जातून मुक्त होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतक-यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले १५६ कोटींचे कर्ज आणि त्यावरील १५ कोटींचे व्याज, असे तब्बल १७१ कोटी रुपये राज्य सरकार देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून अनेक संकटांचा सामना करणा-या शेतकऱ्यांना सावकारांच्या कर्जाच्या खाईतून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
0
प्रेम केले म्हणून तरुणाची धिंड

अहमदनगर – गावातील मुलीवर प्रेम केले, म्हणून गावातीलच एका तरुणाची भर बाजारपेठेतून मारहाण करीत कपडे फाडून धिंड काढण्यात आली. ही घटना आज सकाळी वांबोरी (ता. राहुरी) येथे घडली. मुलीचे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी हे कृत्य केले. ग्रामस्थांनी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेतली. शेवटी सरपंचाने हास्तक्षेप केल्याने त्या तरुणाची जमावाच्या तावडीतून सुटका झाली. या घटनेच्या निषेधार्थ व्यापाऱ्यांनी बंद पाळला आहे. पोलिस गावात दाखल झाले असून आरोपींची धरपकड सुरू झाली आहे.
गावात बाजारपेठेत राहणाऱ्या एका तरुणाचे त्याच गावात वस्तीवर राहणाऱ्या एका तरुणीवर प्रेम होते. काही दिवसांपूर्वी दोघेही पळून गेले होते. हा प्रकार तरुणाच्या घरच्यांना अजिबात रुचला नव्हता त्यामुळे त्यांनी शोध सुरू केला. काल सायंकाळी त्यांनी या दोघांना शोधून काढले. मुलीलाही मारहाण केली. रात्री वस्तीवर बैठक घेऊन प्रेम करणाऱ्या मुलाला धडा शिकविण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार शुक्रवारी सकाळी पंधरा-वीस जणांचा जमाव तरुणाच्या घरी आला. त्यांनी कुटुंबातील सर्वांना मारहाण केली. तरुणाला घराबाहेर ओढत नेले. त्याच्या अंगावरील कपडे फाडण्यात आले. त्याला चपलांचा हार घालून मारहाण करीत बाजारपेठेतून फिरविण्यात आले. हा प्रकार सुरू असताना बाजारपेठेतील नागरिक केवळ बघ्याची भूमिका घेत होते, हे विशेष. काही वेळाने हा प्रकार समजल्यावर गावचे सरपंच उदसिंह पाटील तेथे आले. त्यांनी जमावाच्या तावडीतून तरुणाची सुटका केली. घटनेची पोलिसांना माहिती दिली. पोलिस येईपर्यंत धिंड काढणारे पळून गेले होते. तरुण-तरुणी विभिन्न जातीचे असल्याने विरोध अधिक कडवा असल्याचे सांगण्यात आले.
या घटनेनंतर गावात तीव्र पडसाद उमटले. मुलगा व्यापारी कुटुंबातील असल्याने व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन या घटनेचा निषेध केला. बाजारपेठही बंद ठेवण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात आल्यावर गावात जादा पोलिस पाठविण्यात आले. त्यांनी जमावाचा शोध सुरू केला आहे. तरुणासह त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्य जखमी झाले आहेत. त्यांना राहुरी येथे हलविण्यात आले आहे.
0
‘नाईट लाइफ’वरुन उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

मुंबई, दि. १३ – मुंबईत ‘नाईट लाईफ’ सुरु करण्यासाठी राज्य सरकारने पावले उचलली असतानाच न्यायालयाने त्याआधी सरकारला खडे बोल सुनावीत चांगलेच फटकारले आहे. नाईट लाइफ सुरु झाल्यास रात्रभर मद्याची दुकाने व पब सुरु ठेवणार आहात का ? जर रात्रभर दुकाने उघडी ठेवली तर महिलांच्या सुरक्षाच्या आढावा राज्य सरकारने घेतला आहे का? असा प्रश्न विचारीत आधी महिलांच्या सुरक्षेचा आढावा घ्या मग नाईट लाइफ सुरु करा असा सल्ला न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे.
मुंबईतील गेल्या काही दिवसांतील महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने स्वत:हून खटला दाखल करुन घेत उच्च न्यायालयात त्यावर सुनावणी सुरु आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत निवृत्त न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीने डान्सबार बंदीमुळे महिलांवरील होणारे अत्याचार कमी झाल्याचे अहवालात म्हटले आहे. अशा पार्श्वभूमीवर मुंबईत ‘नाइट लाइफ’ सुरु करण्याचा राज्य सरकार विचार करत आहे. पण मद्याची दुकाने आणि पब रात्रभर सुरु राहणार आहेत का? संख्य कमी असल्याने पोलिस यंत्रणेवर आधीच दबाव असल्याचे माध्यमांमधून समोर येत आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा ‘नाइट लाइफ’ वेळी महिलांना सुरक्षा देण्यास सक्षम आहेत का? आणि सरकारने असा निर्णय घेतला असेल तर रात्रीच्या वेळी महिलांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे का? असे सवाल उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केले. तीन आठवडयात प्रतिज्ञापत्र सादर करा व विविध तंज्ञामार्फत आढावा घ्यावा असे आदेश सरकारला दिले. जोपर्यंत उच्च न्यायालयाचे समाधान होत नाही तोपर्यंत सरकारने नाईट लाइफच्या निर्णयाची अंमलबजावणी करु नये असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे मुंबईतील नाईट लाइफ बारगळण्याची शक्यता अधिक आहे.
0
ठोस उपाययोजनांसाठी शेतकर्यांचे सर्वेक्षण

शेतकर्यांनो सर्वेक्षणात सहभागी व्हा – ना. संजय राठोड
यवतमाळ, दि. १३ – राज्यात सातत्याने शेतकर्यांच्या आत्महत्या होत असल्याने या आत्महत्यांमागील कारणे शोधून त्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी शासनातर्फे विदर्भातील यवतमाळ आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांत शेतकर्यांच्या सर्वेक्षणाचा पथदर्शी प्रकल्प राबविला जात आहे. या सर्वेक्षणात शेतकर्यांची सविस्तर माहिती संकलित करून त्यातून निघणार्या निष्कर्षांमधून शेतकर्यांसाठी ठोस उपाय योजले जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व शेतकर्यांनी या सर्वेक्षणात सहभागी होऊन संपूर्ण माहिती द्यावी, असे आवाहन महसूल राज्यमंत्री व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
महसूल मंत्रालयाच्या वतीने ११ फेब्रुवारी रोजी एक परिपत्रक काढून यवतमाळ व उस्मानाबाद जिल्ह्यात शेतकर्यांचे शंभर टक्के सर्वेक्षण करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांना दिले. या सर्वेक्षणासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी इत्यादी तालुकापातळीवरील अधिकार्यांची समिती गठीत करण्यात आली. या समितीकडे तालुक्यातील प्रत्येक गावाचे सर्वेक्षण सुरळीतपणे पार पाडण्यासाठी देखरेख व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मंडळस्तरावर मंडळ निरीक्षकाच्या अध्यक्षतेखाली गाव पातळीवरील कृषी विभाग, ग्रामविकास विभाग आदी अधिकार्यांचा समावेश असलेली समिती गठीत करून, या समितीने त्यांच्या अखत्यारित सर्व गावांच्या शेतकर्यांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या सर्वेक्षणात शेतकर्याची संपूर्ण वैयक्तिक माहिती, जमिनीचा तपशील, शेतीचा प्रकार, कौटुंबिक माहिती, पत्नी व मुलांची माहिती, शेतीशिवाय उत्पन्नाचे इतर साधन असल्यास त्याची माहिती, गुरे, शेळ्या, मेंढ्या, गाई, म्हशी आदी जनावरांचा तपशील, राष्ट्रीयकृत बँक, विविध कार्यकारी सोसायटी, सहकारी संस्था, नागरी पतसंस्था, खासगी बँकेच्या कर्जाची माहिती, नियमित परतफेड आहे किंवा नाही याचा तपशील, खासगी व्यक्ती, नातेवाईक यांच्याकडून घेतलेले कर्ज, उसनवारीची माहिती, मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेतले असल्यास त्याचा तपशील, घरातील धार्मिक कार्य, विवाह आदींसाठी असलेले आर्थिक नियोजन, कुटुंबातील व्यक्तींचा विमा उतरविला असल्यास त्याची माहिती, घरात कमावती व्यक्ती असल्यास त्याची माहिती व अनुषंगाने मिळणारी इतर सर्व माहिती गोळा करून ती या सर्वेक्षणात संकलित केली जाणार आहे.
हे सर्वेक्षण दीड महिन्यात पूर्ण करून आयुक्तांमार्फत अहवाल शासनाकडे पाठविण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. हे सर्वेक्षण करताना शेतकर्यांची वस्तुस्थिती समोर येईल याची अधिकार्यांनी दक्षात घेण्याची सूचना करून, शेतकर्यांनी आपल्या गावात हे सर्वेक्षण सुरू असताना परिपूर्ण माहिती सादर करावी, असे आवाहन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
0
मुंबईकरांच्या मदतीसाठी सचिन तेंडुलकर

मुंबई, दि. १३ – टोलप्रश्नामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांच्या मदतीसाठी सचिन तेंडुलकर धावून आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून सचिनने मुंबईकरांचा त्रास कमी करण्याची मागणी केली आहे. क्रिकेटच्या मैदानात तूफान बॅटिंग करणारा आणि खासदार असलेल्या सचिनने मुख्यमंत्र्यांना २० फेब्रुवारी रोजी लिहीलेल्या पत्रात टोलप्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे.
गेल्या महिन्यात मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाताना सचिन खारघर टोलनाक्याजवळील ट्रॅफिकमध्ये अडकून पडला होता. त्यामुळे त्याला मुंबईकरांना रोज सामो-या जाव्या लागणा-या समस्येची जाणीव झाली. मुंबईतील अनेक टोलनाक्यांवर रोज अशीच वाहतूक कोंडी होते आणि नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. वाहतूक कोंडीमुळे प्रदूषणही खूप वाढते, या सर्व समस्या लक्षात आल्यानेच सचिनने पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहीले.
शहरातील विविध टोलनाके, त्यामुळे उद्भवणा-या ट्रॅफिकच्या समस्येमुळे मुंबईकरांना मानसिक व शारीरिक त्रास सोसावा लागत आहे, असे सचिनने पत्रात म्हटले आहे. तसेच टोल वाढवूनही रस्त्यांची अवस्था बिकट असल्याचेही सांगत त्याने नाराजी वर्तवली असून या प्रक्रियेचा फेरविचार करण्यात यावा आणि मुंबईकरांचा त्रास कमी करावा अशी अपेक्षा त्याने पत्रात व्यक्त केली आहे. तसेच सायन-पनवेल मार्गावरील नव्या टोलनाक्यासह एकूण नऊ टोलनाक्यांवरील बिकट परिस्थितीही त्याने पत्राद्वारे निद्रशनास आणून दिली आहे. हे टोलनाके कमी करण्याची गरज असल्याचे मतही त्याने मांडले आहे. टोलनाक्यांजवळ उद्भवणारी ट्रॅफिकची समस्या सोडवण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करता येईल असा सल्लाही सचिनने दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून टोलनाक्याचा विषय राज्यभरात गाजत आहे. मनससेह विविध राजकीय पक्षांनी टोलप्रश्नी आंदोलने केली आहेत. आता खुद्द सचिन तेंडुकरनेच याप्रश्नी आवाज उठवल्यानंतर तरी सरकार याकडे गांभीर्याने बघेल का आणि नागरिकांचे प्रश्न सुटतील का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
अर्थमंत्र्यांचा सभागृहातच मुक्काम

कोची, दि. १३ – केरळमध्ये आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होताना सभागृहात अभूतपूर्व गोंधळ माजला. अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत असताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आमदारांनी गोंधळ घालत अर्थमंत्री के. एम. मणी यांना धक्काबुक्की केल्याने देशातील सर्वात सुशिक्षितांचे राज्य अशी ओळख मिरवणा-या केरळची मान खाली गेली.
अर्थमंत्री मणी यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप असून त्यांना सभागृहात प्रवेश करू देणार नाही असा इशारा विरोधकांनी दिला होता.हा विरोध पाहून मणी यांच्यासह ७० हून अधिक आमदारांनी काल रात्रीपासून सभागृहातच मुक्काम केला. या सर्व गोंधळातच आज अर्थसंकल्प सादर करणे सुरू झाले असता विरोधकांनी निदर्शने करत गोंधळ माजवला, विधानसभा अध्यक्षांची खुर्चीही उखडून फेकून दिली तसेच मणी यांना धक्काबुक्कीही केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना थोडा लाठीमारही करावा लागला. या सर्व गोंधळातच मणी यांनी त्यांचे भाषण कसेबसे पूर्ण केले.
केरळमध्ये बारच्या नुतनीकरण परवाने देण्यासाठी मणी यांनी एक कोटी रुपयांची लाच घेतली असा आरोप विरोधकांनी त्यांच्यावर लावला आहे. केरळमध्ये छोटी व मध्यम हॉटेल्स व वाईन शॉपमध्ये दारू विक्रीवर बंदी असून थ्री, फोर व फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये दारू विक्री करता येते. त्यामुळे या हॉटेल्सच्या परवान्यांचे नुतनीकरण करण्यासाठी अर्थमंत्री मणी यांना लाच मागितली असा आरोप विरोधकांनी केला आहे.
0
मुंबई हल्ल्याचा सूत्रधार लख्वीची सुटका करण्याचा पाक कोर्टाचा आदेश

इस्लामाबाद, दि. १३ – मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झकी-उर-रहमान लख्वी याची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत त्याची तातडीने सुटका करण्याचा आदेश इस्लामाबाद कोर्टाने दिला आहे. लख्वी याने केलेल्या अर्जावरील सुनावणीदरम्यान न्या. नोरूल हक्क यांनी लख्वीचा याचिका मान्य करत त्याची तुरूंगातून सुटका करण्याचा आदेश दिला.
लख्वी हा फेब्रुवारी २००९ पासून तुरूंगात असून त्याच्यावर मुंबई हल्ल्याप्रकरणी खटला सुरू आहे. मात्र त्याच्याविरोधात ठोस पुरावे नसल्याने पाकिस्तानी न्यायालयाने गेल्या वर्षी त्याची सुटका केली होती. भारत सरकारने यावर नाराजी नोंदवत या निर्णयाचा निषेध केला होता. त्यानंतर पाकिस्तान सरकारने लख्वीला दुस-या एका प्रकरणात पुन्हा ताब्यात घेतल्याने त्याचा तुरूंगातील मुक्काम कायम राहिला. मात्र आद पुन्हा इस्लामाबाद न्यायालायने त्याच्या सुटकेचा आदेश दिल्याने खळबळ माजली आहे. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ जण मृत्युमखी पडले होते, तर शेकडो जण गंभीर जखमी झाले होते.









