
यवतमाळ , दि. २८ – पूर्ववैमनष्यातून एका युवकाचा खून केल्याची घटना २७ मार्च रोजी रात्री डोर्ली येथे घडली. पंकज नंदकिशोर नागरगोजे रा.डोर्ली असे मृतकाचे नाव आहे . आरोपी संदिप उर्फ सोनु रामजी उगलमुगले (२५) रा. डोर्ली याने पूर्ववैमनष्यातून वाद केला. त्यानंतर डोक्यावर दगडानेमारुन पंकजला जागीच ठार केले. याप्रकरणी पुरुषोत्तम नंदकिशोर नागरगोजे याने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार बाबासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Archive for March 27th, 2015
0
डोर्ली येथे युवकाचा खून
0
आपमध्ये ‘राडा’, यादव, भूषण यांची हकालपट्टी

नवी दिल्ली, दि. २८ – आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला आज युद्धभूमीचे स्वरूप आले होते. प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांचे भवितव्य ठरवण्यासाठी घेण्यात आलेल्या बैठकीत त्या दोघांचीही कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र या बैठकीत लोकशाहीची हत्या झाल्याचे सांगत आपल्याला लाथा- बुक्क्यांनी मारहाण करून बाहेर हाकलण्यात आल्याचा आरोप योगेंद्र यादव यांनी केला आहे.
शनिवारी पार पडलेल्या बैठकीची सुरूवातच वादळी झाली. आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल बैठकीसाठी उपस्थित राहिले खरे, मात्र योगेंद्र यादव आणि पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांना बैठकीसाठी आत प्रवेशच दिला गेला नाही. यामुळे नाराज झालेले यादव हे धरणे आंदोलनास बसले, अखेर थोड्या वेळाने त्यांना आत जाण्याची परवानगी देण्यात आली.
त्यानंतर बैठकीत योगेंद्र यादव, प्रशांत भूषण, प्रा. आनंद कुमार आणि अजित झा या चौघांनीही पक्षाच्या सर्व पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत आमचे कुठलेही म्हणणे ऐकून घेतले नाही, बाऊन्सर्सनी आम्हाला व कार्यकर्त्यांना मारहाण करत बाहेर काढले, असा आरोप यादव यांनी केला. ही लोकशाहीची हत्या असल्याचेही ते म्हणाले.दिल्लीत प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या आम आदमी पक्षात नंतरच्या जेमतेम महिनाभरातच गृहयुद्धाचा भडका उडाला आहे.
0
लाचखोर वनपालासह एकास अटक

यवतमाळ, दि. २७ – सागवाण झाडाची मोक्का पाहणी करून पंचनामा तयार करून देण्यासाठी शेतकºयाकडून पाच हजाराची लाच घेणाºया पांढरकवडा येथील वनपालासह एका खाजगी व्यक्तीस अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज शुक्रवारी पांढरवडा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात ही कारवाई केली.
गौतम मारोती पुनवटकर (५६) असे लाचखोर वनपालाचे नाव असून ते पांढरवकडा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत आहे. तर अंबादास भीमराव मेश्राम (३५) रा. राजनी ता. झरी जामणी असे शेतकºयाजवळून लाच घेणाºया व्यक्तीचे नाव आहे. पांढरवकडा तालुक्यातील एका शेतकºयाने शेतातील सागवान कटाई केलेल्या झाडाची मोक्का पाहणी करून पंचनामा करावा यासाठी पांढरकवडा येथील वनपरिक्षेत्र कार्यालयात अर्ज केला होता. मात्र तेथे कार्यरत वनपाल गौतम पुनवटकर यानी मोक्का पाहणी व पंचनामा करून देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. सदर लाचेची रक्कम खाजगी इसम अंबादास मेश्राम यांचे मार्फत देण्याचे ठरले होते. दरम्यान या शेतकºयाने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडेतक्रार दिली. त्यावरून आज पांढरकवडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयात पथकाने सापळा रचून वनपाल पुनवटकर व मेश्राम याना पाच हजार रुपये स्विकारताना रंगेहात पकडले. ही कामगिरी पोलीस उपअधिक्षक सतीश देशमुख, नितीन लेव्हरकर, नंदकुमार जामकर, पोलीस निरीक्षक नरेंद्र इंगोले, अमोल महल्ले, शैलेश ढोणे, गजानन राठोड, अमित जोशी, निलेश पखाले, अनिल राजकुमार, किरण खेडकर, सुधाकर मेश्राम, गिरी, कोकेवार यांनी केली.
0
अपघातात शिक्षकासह पत्नी ठार

पुसद ,दि. २७ – भरधाव टिप्परने एका दुचाकीला जोरदार धडक दिल्याने शिक्षक दाम्पत्य जागीच ठार झाल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता माहुर पुसद रोडवरील इंद्रानगर फाट्याजवळ घडली.
स्थानिक ओमनगर श्रीरामपूर येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रघुनाथ हिरासिंग राठोड (४५) व त्याच्या पत्नी कांता रघुनाथ राठोड (४०) हे दाम्पत्य आपल्या गावी वाकद येथे दुचाकीने जात होते. अशातच इंद्रानगर फाट्याजवळ भरधाव टिप्पर क्रमांक एम.एच.३० ए ९१५१ ने दुचाकीला धडक दिली. यामध्ये राठोड दाम्पत्य दुचाकीवरून रस्त्यावर खाली पडल्याने जबर मार लागून मृत्यू झाला. यावेळी टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी पुसद शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
0
अमोल शेरकरला १० वर्षांची शिक्षा

पुणे – पुण्याच्या स्प्रिंगडेल शाळेच्या मुलींना घर ते शाळा असे बसमधून ने-आण करणा-या बस अटेंडंट अमोल शेरकरला मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा झाली आहे. कोर्टाने अमोल शेरकरला बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत दोषी ठरवले.
सिंहगड इन्स्टिट्युटच्या स्प्रिंगडेल शाळेत केजीच्या विद्यार्थीनीवर जबरदस्ती झाल्याचे प्रकरण उघड झाले आणि मुख्याध्यापिकेने डेक्कन जिमखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. यानंतर पोलिसांनी चौकशी करुन बस अटेंडंट अमोल शेरकर (वय २५, रा. वडगाव बुद्रुक, मूळ गाव पंढरपूर) आणि बस ड्रायव्हर विनायक कारंडे (वय २५, रा. वडगाव बुद्रुक, मूळचा सोलापूर) या दोघांवर गुन्हा दाखल केला होता. दोघांवरही बलात्कार आणि बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा २०१२ कलम ५,६,७,८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मुलांना ने-आण करणाऱ्या बसमधील बस अटेंडंट अमोल शेरकरने चालू बसमध्ये पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. बसवरील ड्रायव्हर विनायक कारंडे याने या प्रकाराची माहिती असतानाही तोंडावर बोट ठेवले. या प्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी मुख्याध्यापिकेकडे लेखी तक्रार अर्ज दिल्यानंतर सगळा प्रकार उघड झाला होता. कोर्टाने सर्व बाजू ऐकून घेऊन सुनावणीअंती अमोल शेरकरला दोषी ठरवून १० वर्षांची शिक्षा ठोठावली.
0
बांगलादेशमध्ये चेंगराचेंगरी, दहा यात्रेकरु ठार

ढाका – बांगलादेशची राजधानी ढाका येथील ब्रम्हपुत्रा नदीच्या किना-यावर पवित्र स्नानादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत दहा हिंदू यात्रेकरु ठार झाले. यामध्ये सात महिलांचा समावेश आहे तर अनेक जण जखमी झाले.
सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. नदीच्या तटावर अस्तमी स्नानासाठी मोठी गर्दी जमली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत दहा यात्रेकरुंचा मृत्यू झाला. हे सर्व यात्रेकरु ५० हून अधिक वयाचे होते. मृतांमध्ये सात महिला होत्या अशी माहिती गुरुवारी पोलिसांनी दिली.तर या दुर्घटनेत ३० भाविक जखमी झाले. या जखमी भाविकांवर उपचार करण्यासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या ठिकाणी भाविकांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या स्वयंसेवक तसेच पोलिसांची संख्या कमी असल्याने चेंगराचेंगरी झाल्याचा आरोप काही यात्रेकरुंनी केला. ढाकामधील ब्रम्हपुत्रानदीच्या काठावर असलेले लागलबंध हे तीर्थक्षेत्र आहे. दरवर्षी मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात नेपाळ, भारत, तसेच बांगलादेशातील मोठ्या प्रमाणात भाविक येथे पवित्र स्नानासाठी येतात.
0
अटलबिहारी वाजपेयींना ‘भारतरत्न’ प्रदान

नवी दिल्ली- देशातील सर्वोच्च नागरी सन्मान असणारा भारतरत्न हा पुरस्कार भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते वाजपेयींना शुक्रवारी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शासकीय शिष्टाचार बाजूला ठेवून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या दिल्लीतील कृष्ण मेनन मार्ग येथील निवासस्थानी जाऊन त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी आदी मान्यवरही उपस्थित होते.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी एक मंडप उभारण्यात आले होते. येथे हा पुरस्कार सोहळा संपन्न झाला. प्रसिद्धीमाध्यमांना कार्यक्रम स्थळापासून दूर ठेवण्यात आले होते.
अटलबिहारी वाजपेयींना भारतरत्न देण्याची घोषणा गेल्या वर्षी २४ सप्टेंबर रोजी त्यांच्या वाढदिवशी करण्यात आली होती. तेव्हा ते फक्त थोडेसे हसले होते. परंतू दोन दिवसांपूर्वी जेव्हा राष्ट्रपती स्वतः घरी येऊन त्यांचा हा सन्मान करणार आहेत, असे सांगितले तेव्हा त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अटलजी गेल्या काही वर्षांपासून आजारी आहेत. त्यांना अल्झायमर डिमेंशिया झाला आहे.
भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे नेतृत्व करताना वाजपेयींनी दोन वेळा देशाचे पंतप्रधानपद भूषवले. १९९६ मध्ये आलेले त्यांचे सरकार फक्त तेरा दिवस टिकले. त्यानंतर १९९८ मध्ये देशातील जनतेने पुन्हा एकदा वाजपेयींना संधी दिली. त्यांच्या या सरकारने पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे ते पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान होते.
0
धनगर आरक्षणावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

विधानपरिषदेत आज (शुक्रवारी) धनगर आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी पाहायला मिळाली. अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीच्या अहवालानुसार धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देणं घटनाबाह्य आहे, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला.
यापूर्वी सत्तेवर असणार्या सरकारने आरक्षण दिले असते तर, आता ही वेळच आली नसती, असे प्रत्युत्तर खडसे यांनी दिले आहे. मात्र, आता आरक्षण मिळवायला किती वेळ लागणार असून, हा प्रस्ताव केंद्राकडे कधी पाठवणार, अशा प्रश्नांनी विरोधकांनी सरकारला घेरलं. तसंच आदिवासी विकासमंत्री विष्णु सावरा यांनी प्रश्नांची उत्तरे देण्यास सुरूवात केल्यावर विरोधकांनी तांत्रिक मुद्दे काढत गोंधळ घातला. यावर सभापती रामराजे निंबाळकर यांनी आरक्षणासंदर्भात कालावधी निश्चत करण्याची सूचना दिली आहे.









