पुणे- लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टमध्ये चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या केल्याच्या निषेधार्थ लोणावळाकरांनी बुधवारी सकाळपासून कडकडीत बंद पाळला. रस्त्यावर उतरलेल्या संतप्त जमावाने कुमार रिसॉर्टवर दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला होता. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये चार ते पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ सकाळपासूनच लोणावळ्यात कडकडीत बंद बरोबरच रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले.
तीन दिवसांपूर्वी एका लग्न समारंभातून बेपत्ता झालेल्या आयेशा छगन जैन या सात वर्षीय चिमुरडीचा मृतदेह मंगळवारी दुपारी लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टच्या टेरेसवर सापडला. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आयेशा जैन ही दोन दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासमवेत इंदापूरहून लोणावळ्यामध्ये एका लग्नासाठी आली होती. लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टमध्ये लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान समारंभातून आयेशा अचानक गायब झाली. तिचा शोध घेतल्यानंतर ती सापडली नाही.
यामुळे सोमवारी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. दरम्यान मंगळवारी दुपारी कुमार रिसॉर्टच्या टेरेसवर आयेशाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला.
या घटनेच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये महिला व मुली मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, रिसॉर्टमधील संशियितांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. या चिमुरडीच्या हत्येचा लोणावळा शहरामधून तीव्र निषेध करण्यात आला आहे. निषेधार्थ शहरात सर्वत्र शंभर टक्के बंद पाळण्यात आला. शाळा, कॉलेज, दुकाने, बाजारापेठा बंद ठेवण्यात आल्या.
लोणावळा पोलिसांचा निषेध करण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावर कुमार रिसोर्ट चौकात सकाळी दहा वाजतापासून नागरिक जमा झाले होते. लोणावळा शहरवासीयांसोबत मावळ, खोपोली परिसरातील नागरिकही हजारोंच्या संख्येने लोणावळ्यात आले होते. संतप्त नागरिकांनी कुमार रिसॉर्टवर दगडफेक, तोडफोड करून रिसॉर्ट प्रशासनाचा निषेध केला. संतप्त जमावामुळे निषेध आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. यामध्ये चार ते पाच जण जखमी झाले आहेत.
तर अन्य काही महिला, मुलींनी शहरात मूक मोर्चा काढला. या आंदोलनात सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, कार्यकत्रे, विविध संघटना आणि नागरिक सहभागी झाले होते.















