
यवतमाळ, दि. १५ – हैद्राबाद येथे जाणाºया सराफा व्यावसायिकाची ३५ लाखाची रोकड लुटण्यात आल्याची घटना रात्री १०.३० वाजता दरम्यान पांढरकवडा येथे घडली. ही घटना घडताच नागरिकांनी सतर्कता दाखवित लपून बसलेल्या चोरट्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस चोरीच्या घटनांना आळा घालण्यास असमर्थ ठरत असताना नागरिकांच्या सतर्कतेमळे ३५ लाख रुपयाच्या लुटीचा छडा अवघ्या पंधरा मिनिटात लागला. या घटनेची चर्चा दिवसभर पांढरकवडा शहरात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अहेतेशाम अली शाहीद अली (२५) रा. कोहीनूर सोसायटी, यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. तर त्याचा अन्य साथीदार अमीर खान रा. पांढरकवडा हा फरार आहे. शनिवारी सायंकाळी संजय भीमराव लोहकरे (३४) रा. चमेडीयानगर हा व्यक्ती हैद्राबाद येथे जाण्यासाठी अमरावती-हैद्राबाद बसमध्ये बसला. त्याला ही रक्कम हैद्राबाद येथील मनोकामना ज्वेलर्सला द्यायची होती. बस पांढरकवडा राज्यमार्गावरील एका हॉटेलजवळ जेवन करण्यासाठी रात्री १०.१५ वाजता दरम्यान थांबली. लोहकरे रोकड घेवून हॉटेलकडे जात असताना अज्ञात दोन इसम जवळ आले आणि झटापट करून काळ््या रंगाची बॅग लांबविली. या घटनेमुळे भांबावलेल्या लोहकरे याने आरडाओरड सुरू केली. हा प्रकार मेटाडोर क्रमांक एम.एच. ३१/एम ६५९३ चा चालक बघत होता. बॅग घेवून चोरटे पळत असल्याचे बघून वाहनाने त्यांचा पाठलाग केला. एक चोरटा बाजूच्या घरात लपून असल्याचे लक्षात आले. तोपर्यंत नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेची माहिती पांढरकवडा पोलिसांना देण्यात आली. मात्र पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच नागरिकांनी एका चोरट्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी अहेतेशाम अली याला अटक केल्यानंतर पळून गेलेल्या साथीदाराचे नाव अमीर खान असल्याचे सांगितले. अहेतेशाम अलीकडून पोलिसांनी ३५ लाखाची रोकड जप्त केली. त्यात १००० रुपयाचे तीन व ५०० रुपयाच्या नोटाचे ६४ बंडल असे एकूण ३५ लाख रुपये होते. पांढरकवडा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस अधीक्षक संजय दराडे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
Archive for February 15th, 2015
0
सराफा व्यावसायिकाचे ३५ लाख लुटले, नागरिकांच्या सतर्कतेने आरोपीस अटक
0
अस्वलाच्या हल्ल्यात मजूर गंभीर जखमी

माहूर (नांदेड), दि. १५ – महाशिवरात्री निमित्त पुजेसाठी गणेरीचे फुल आणण्यासाठी गेलेल्या वृद्ध इसमावर दोन अस्वलानी हल्ला चडविल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. माहूर तालुक्यातील तांदळा शिवरात दुपारी ही घटना घडली.
कान्हु देव्हारे (६०) असे जखमीचे नाव आहे. महाशिवरात्री असल्याने पुजेसाठी गणेरीचे फुले आणण्यासाठी लगतच्या तांदळा शिवारातील शिवमंदिर शेजारी आज दुपारी गेला असता त्याच्यावर अचानक नर, मादी असलेल्या जोडीने हल्ला चढविला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यांना माहूर ग्रामीण रुग्णालयात आणले तेथे वैद्यकीय अधिकारी नीरज कुंभारे यांनी प्रथम उपचार करून यवतमाळ येथे अधीक उपचारासाठी पाठविण्याचे सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. तरोडे यांनी रुग्णालयात भेट देऊन पुढील उपचारासाठी आर्थिक मदत केली. यावेळी वनपाल एम.एन. देशमुख, वनरक्षक ए. आर. जाधव, एम. बी. राठोड, एस. आर. देशमुख, सेवक सैय्यद रियाजोद्दीन यांची उपस्थिती होती. शेतमजूर पांडुरंग देव्हारे यांची परिस्थिती हलाकीची असल्याने गावातील संतोष अग्रवाल, संजय राठोड, गौतम बिल्लारे, बाळ देव्हारे, विनोद खुपसे, जीवन अग्रवाल, सय्यद इसाक, सय्यद फते महंमद यांनी मदतीचा हात पुढे केला.
0
क्रिकेट सट्टा बाजारावर धाड, अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ, दि़१५ – भारत आणि पाकीस्तान क्रिकेट सामन्या दरम्यान यवतमाळ व वणी येथे सुरु असलेल्या क्रिकेट सट्टा बाजारावर धाड टाकून अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आज रविवारी उपविभागीय पोलीस अधिकाºयाच्या पथकाने ही कारवाई केली.
यवतमाळ येथील मारवाडी चौकात विजय सिंघानिया (५४) या इसमाच्या घरी सट्टा बाजार सुरू असल्याची टीप उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकाला मिळाली. त्यावरून दुपारी ३.३० वाजता पथकाने धाड टाकली. एक लॅपटॉप, एलसीडी, पाच मोबाईल व साडेपाच हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वणी शहरातील एकतानगर परिसरात क्रिकेट सट्टा सुरु असल्याची गोपनिय माहिती ठाणेदार असलम खान यांना मिळताच घटनास्थळी धाड टाकली असता सट्टा घेणाºया चार आरोपींसह १ लाख ५१ हजार ६१० रुपयाचा ऐवज ताब्यात घेतला़आज भारत-पाकिस्तान या दोन देशात क्रिकेटचा सामना सुरु होता़ येथील एकतानगरमध्ये या सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली़ घटनास्थळी धाड टाकली असता अल्ताफ शेख, कैसर गणी, अजहर शेख, संजय बावणे या चौघांना सट्टा घेतांना रंगेहात पकडण्यात आले़ त्यांचेकडून एलईडी टीव्ही, दहा मोबाईल संच, दोन चार्जर, प्लाझा, लाईटींग पॅड, कार्बन कागद, सेटअप बॉक्स असा एकूण १ लाख ५१ हजार ६१० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला़ ही कारवाई ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली स़पो़नि़दिपक पवार यांच्य्यासह गुन्हेशोध पथाकचे सुधीर पांडे, अरुण ताकतोडे, सय्यद साजीद, नफिस शेख, प्रमोद जुनूनकर, विकास धडसे यांनी केली़
0
बस खड्यात कोसळली, ३५ प्रवाशी जखमी

यवतमाळ , दि. १५ – भरधाव बसच्या गिअरबॉक्समध्ये बिघाड निर्माण झाल्याने झालेल्या अपघातात ३५ प्रवाशी जखमी झाल्याची घटना आज दुपारी ४.३० वाजता दरम्यान अर्जुना घाट परिसरात घडली. यात रुद्रेश प्रवीण शिंदे, ज्योती प्रवीण शिंदे रा. आर्णी, लक्ष्मण तानबा गोल्हर, तुकाराम सोमला जाधव, शशिकला गोल्हर, जान्हवी गोल्हर, मंदा राजू गायधने रा. लोणी, अंबादास तळपदे, मंगेश डवले रा. पहापळ, प्रमोद खत्रे, वंदना खरतडे रा. आष्टी, लता तिडके रा. मांगलादेवी यांच्यासह अन्य प्रवाशी जखमी झाले.
मोर्शी-माहूर बस क्रमांक एम.एच. ४०/ एन ८९६७ आर्णीकडे जात होती. दरम्यान अर्जुनाघाट परिसरात बसच्या गिअरबॉक्समध्ये बिघाड झाला. यामुळे बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ही बस दहा फूट खड्यात कोसळली. यामुळे बसमधील ३५ प्रवाशी जखमी झाले. जखमींना तत्काळ उपचारासाठी कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात चालकाविरुद्घ गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
0
विद्यार्थ्याला मारहाण,शेंबाळपिंप्रीत तणाव

यवतमाळ, दि. १५ – जनरल नॉलेजची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याला पाच जणांनी मारहाण केल्याची घटना आज रविवारी शेंबाळपिंप्रीत येथे घडली. या घटनेने गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले आहे.
संतोष ज्ञानबा कुलापे (२०) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. आज येथील एका संगणक संस्थेकडून जनरल नॉलेजची रविवारी परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षा देण्यासाठी गेलेल्या संतोष सोबत हॉल तिकीट देण्याच्या कारणावरून पाच ते सहा जणांनी वाद केला. त्यानंतर मारहाण करून संतोषला गंभीर जखमी केले. त्याच्यावर पुसद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथक, पुसद शहर व ग्रामीण आणि खंडाळा येथील पोलीस ठाण मांडून बसले आहे. यावेळी पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
0
भारताने मिळवला पाकिस्तानवर ७६ धावांनी विजय

अॅडलेड- विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ७६ धावांनी सहज विजय मिळवला. सलग सहाव्यांदा भारताने पाकिस्तानला विश्वचषकात धूळ चारली. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत झालेल्या पाच लढतीत भारताने बाजी मारली होती. धोनी ब्रिगेडने विश्वचषकातील हा इतिहास कायम राखला.
गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाच्या कामगिरीबाबत सर्वच स्तरातून चिंता व्यक्त केली जात होती. फलंदाजी ही भारताची जमेची बाजू. मात्र त्यातही गेल्या काही सामन्यांमध्ये सातत्य दिसून येत नव्हते. अशा परिस्थितीत पाकिस्तानला हरवणे तितकेसे सोपे नव्हते. मात्र धोनी आणि सहका-यांनी ही किमया साधली.
शतकवीर विराट कोहली, शिखर धवन आणि सुरेश रैना या त्रिकुटाने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करत भारताला तीनशे धावांचा टप्पा गाठून दिला. विराट कोहलीचे शतक सामन्यातील मोठे वैशिष्ट्य ठरले. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा विराट हा पहिला भारतीय फलंदाज ठरला. यासोबतच त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील २२ वे शतक पूर्ण केले. त्याने १२६ चेंडूत आठ चौकांराच्या मदतीने १०५ धावा केल्या. त्याला उत्तम साथ लाभली ती शिखर धवन आणि सुरेश रैनाची. त्यांच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर ३०१ धावांचे आव्हान ठेवले. मात्र पाकिस्तानला हे आव्हान पेलवले नाही आणि त्यांचा डाव २२४ धावांत संपुष्टात आला. पाकिस्तानचा कर्णधार मिसबा उल-हकने ७६ धावा करत पाकिस्तानला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे हे प्रयत्न अपुरे पडले आणि पाकिस्तानचा ७६ धावांनी पराभव झाला. मोहोम्मद शामीने पाकिस्तानच्या चार फलंदाजांना तंबूत धाडत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतीय फलंदाजांनी तो निर्णय सार्थ ठरविला. सराव सामन्यात बांगलादेशविरुद्ध सरस कामगिरी करणारा रोहित शर्मा या सामन्यात चमक दाखवू शकला नाही. तो १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट आणि धवनने खेळपट्टीवर जम बसवत धावांची टांकसाळ उघडली. शिखरने सलामीला फलंदाजी करत ७३ धावांची खेळी केली. त्याने विराटसह १२९ धावांची भागीदारी केली. शिखर बाद झाल्यानंतर विराटने रैनासोबत तिस-या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी साकारली. ४५ व्या षटकात विराट बाद झाला. त्यानंतर लगेचच रैनाही बाद झाला. हे दोघेही बाद झाल्यानंतर भारताचा डाव एकदम कोसळला. अखेरच्या पाच षटकात भारताने केवळ २७ धावा करत पाच गडी गमावले. पाकिस्तानच्या सोहेलने ५५ धावांत सर्वाधिक पाच बळी घेतले.
0
घर कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेशमधील मुघलसराय भागातील दुल्हीपूर वस्तीत रविवारी बांधकाम सुरु असलेले घर कोसळल्याने मोठा अपघात घडला. यामध्ये बारा जण ठार तर दोन जण जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्यास सुरवात केली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल कऱण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ३० हजार रुपयांची मदत जाहीर कऱण्यात आले असल्याची माहिती जिल्हा मॅजिस्ट्रेट एन.के.सिंग यांनी दिली.
0
संत सेवालाल जयंतीनिमित्त शोभायात्रा व मोटारसायकल रॅली

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शुभारंभ
यवतमाळ – बंजारा समाजाचे जगतगुरू संत सेवालाल महाराज यांची २७६ वी जयंती आज रविवारी शहरात उत्साहात साजरी झाली. येथील बंजारा टिचर्स असोशिएशन व समाजबांधवांनी स्थानिक आर्णी मार्गावरील राजीवनगरमधून काढलेल्या शोभायात्रेस व मोटाससायकल रॅलीस जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले. यावेळी राजुदास जाधव, प्रा. पी.पी. पवार, शेखर राठोड, महेश राठोड, देवीदास राठोड, डी.एस.चव्हाण, प्रा. राजेश चव्हाण, शंकर आडे, ए.के. राठोड आदी उपस्थित होते.
आर्णी मार्गावरून निघालेल्या या शोभायात्रेत समाजबांधवांसोबत पालकमंत्री संजय राठोड हे स्वत: सहभागी झाले होते. ही रॅली जिल्हा परिषदेजवळ पोहोचल्यानंतर येथे असलेल्या माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास ना. संजय राठोड यांच्यासह समाजबांधवांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. शोभायात्रेदरम्यान मार्गात असलेल्या सर्व महामानवांच्या पुतळ्यांस व प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्याचा नवीन पायंडा संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त बंजारा समाजबांधवांनी पाडला. शोभायात्रेत स्त्री भ्रुण हत्या, शेतकरी आत्महत्या, व्यसनमुक्ती आदी विषयांवरील देखाव्यासंह बंजारा वेशभूषेतील चिमुरडे लक्षवेधी ठरले. जयंती उत्सवानिमित्त राजीव नगरमध्ये दिवसभर विविध कार्यक्रमांसह सायंकाळी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले. संत सेवालाल जयंती उत्सवात शेकडो बंजारा समाजबांधव सहभागी झाले होते.
0
प्रियकराच्या घरी प्रेयसीची आत्महत्या , ‘व्हॅलेंटाईन डे’लाच माजलगावात थरार

माजलगाव : ‘तू लग्न करू नकोस, मी तुझ्यासाठी आयुष्यभर साथ देईन’ अशी विनवणी करूनही विवाहास नकार देणार्या प्रियकराच्या घरीच प्रेयसीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना माजलगाव येथील मंगलनाथ कॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी प्रियकरास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. येथील कृषी कार्यालयातील कर्मचार्याची माजलगाव येथील तहसील कार्यालयातील लिपिक महिलेशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन प्रशासकीय कामाच्या निमित्ताने दोघेही तहसील कार्यालयात वारंवार भेटत असत. ही महिला विवाहित असून, तिचा पती बुलडाणा येथे नोकरीनिमित्त राहतो. कृषी कार्यालयातील कर्मचारी हा अविवाहित होता. दरम्यान, या महिलेची बदली काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयात झाली; परंतु या प्रेमवीरांच्या वारंवार माजलगाव येथील या तरुणाच्या घरी भेटी होत असत. काही दिवसांपूर्वी या तरुणाचा विवाह जुळल्याची माहिती प्रेयसीला कळाल्याने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वसंध्येला (दि. १३) तिने थेट प्रियकराचे घर गाठले. दोघांमध्ये रात्रभर विवाह व प्रेमाबाबत चर्चा झाली. तिने तरुणास विवाह न करण्याची विनवणी केली, जीवनभर साथ देण्याचे वचन दिले; परंतु प्रियकराने स्पष्ट शब्दांत नकार दिल्याने नैराश्यातून प्रेयसीने शनिवारी सकाळी प्रियकराच्याच घरात तो मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर विषारी औषध प्राशन केले. तासाभरानंतर तो घरी परत आल्यानंतर प्रेयसी तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत निपचित पडलेली दिसून आली. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात फोन करून हा प्रकार कळविण्यात आला. पोलिसांनी या तरुणास ताब्यात घेतले असून, महिलेचा मृतदेह
0
वेदना आणि सुंदरतेतून दज्रेदार साहित्याची निर्मिती – अशोक पवार


युवा साहित्य संमेलनाचे थाटात उद््घाटन
वर्धा – जीवनातील वेदना आणि सुंदरता कळली तर दज्रेदार साहित्याची निर्मिती होऊ शकते. त्याकरिता अंत:करणातून वाचन करावे लागते, असे प्रतिपादन बिर्हाडकार अशोक पवार यांनी केले.
यशवंतराव दाते स्मृती संस्था आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दोनदिवसीय युवा राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन अनेकांत स्वाध्याय मंदिरात करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून अशोक पवार बोलत होते. संमेलनाचे उद््घाटन संजय भास्कर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर आ. डॉ. पंकज भोयर, विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग, डॉ. रवींद्र शोभणे, सरचिटणीस शोभा उबगडे, शाखाध्यक्ष व संमेलनाचे संयोजक संजय इंगळे तिगावकर, यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, कार्यवाह राजेंद्र मुंढे, सरकार्यवाह डॉ. स्मिता वानखेडे यांची उपस्थिती होती.
बिर्हाडकार अशोक पवार म्हणाले, १९९५ साली परभणीतील अखिल भारतीय मराठी संमेलनातून माझ्या लेखनाची बीजे रोवली गेली. कसदार लेखक होण्यासाठी वैयक्तिक पातळीवर त्याची किंमत मोजावी लागते. अपार मेहनत आणि परिश्रम तसेच वाचनाच्या माध्यमातून कसदार साहित्याची निर्मिती करता येते. त्यासाठी प्रत्येकाने वाचन केले पाहिजे. उपेक्षित साहित्यानेच मराठी साहित्य समृद्ध केले आहे. भारतात कृषी साहित्य पहिल्यांदा प्रेमचंद यांनी लिहिले. महात्मा फुले यांनी शेतकर्यांचा आसूड लिहिले. परंतु वर्तमानात कृषी साहित्याचे लेखन अनुभवातून होत नसून ते शहरात बसून होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
जात, धर्म, पंथाच्या बाहेर जाऊन लेखकाने तटस्थपणे लिखान व विचार केल्यास, वेदनेची जाणीव ठेवून सुंदरतेचा संगम घातल्यास निश्चितच अस्सल साहित्याची निर्मिती होते, असा विश्वास अशोक पवार यांनी व्यक्त केला. प्रत्येक तरुणाने अभ्यासपूर्ण वाचन करावे, असा सल्ला देऊन समाजातील वास्तव चित्र त्यांनी मांडले.
संमेलनाचे उद्घाटक संजय भास्कर जोशी यांनी नेहमीप्रमाणे आपल्या भाषणाची सुरुवात ‘ताल’ने केली. त्यांनी संमेलनात तबल्याचा दादरा ताल यावर विश्लेषण करीत प्रत्येकाने उत्सव, अनुभव, अभ्यास, तटस्थ लेखन, उत्तम वाचन आणि दाद देणे हे सहा ताल नेहमीच लक्षात ठेवल्यास महान साहित्यकृती निर्माण होते, असे सांगून संमेलनाचे उद््घाटन झाल्याचे जाहीर केले. प्रास्ताविक रवींद्र शोभने व प्रदीप दाते यांनी केले. संचालन शुभदा फडणवीस यांनी केले. आभार संजय इंगळे तिगावकर यांनी मानले. संमेलनात प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला सूतमाला अर्पण करून दीपप्रज्वलनाने संमेलनाची सुरुवात करण्यात आली. आयोजकांच्या वतीने मान्यवरांचे रोपटे, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.? वर्धा – राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनात बोलताना संमेलनाध्यक्ष बिर्हाडकार अशोक पवार. व्यासपीठावर उद्घाटक संजय भास्कर जोशी, आ. डॉ. पंकज भोयर, प्रदीप दाते, संजय इंगळे तिगावकर व इतर मान्यवर. बाजूच्या छायाचित्रात दीपप्रज्वलन करताना संजय भास्कर जोशी.
0
भारत ७ बाद ३००, पाकसमोर ३०१ धावांचे लक्ष्य

अॅडिलेड, दि. १५ – वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात विराट कोहलीचे शतक, रैना व धवन या डावखु-या फलंदाजांच्या अर्धशतकाच्या आधारे भारताने ५० षटकांत सात गडी गमावत ३०० धावांचा पल्ला गाठला. चांगली सुरुवात होऊनही शेवटच्या षटकांमध्ये भारतीय फलंदाजी कोसळल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
वर्ल्डकपमध्ये भारताची सलामीची लढत कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणा-या पाकिस्तानसोबत सुरु आहे. नाणेफेक जिंकून कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी सलामीला आली. भारताच्या २४ धावा झाल्या असताना भारताची सलामीची जोडी फोडण्यात पाकच्या गोलंदाजांना यश आले. रोहित शर्मा १५ धावांवर बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने संयमी खेळी करत भारताचा डाव पुढे नेला. धवन – कोहली जोडीने मोठे फटके मारण्याऐवजी एकेरी धावा करत भारताचा फलक हलता ठेवला. खेळपट्टीवर स्थिरावताच या दोघांनीही फटकेबाजीला सुरुवात केली. शिखर धवन ७३ धावांवर असताना चोरटी धाव घेण्याच्या नादात बाद झाला. धवन – कोहली जोडीने १२९ धावांची भागीदारी केली. यानंतर विराट कोहलीने रैनाच्या मदतीने भारताला दोनशेचा टप्पा गाठून दिला. कोहलीच्या शतकानंतर सुरेश रैनानेही अर्धशतक ठोकले. कोहली १०८ आणि रैना ७२ धावांवर बाद झाला तेव्हा भारताची स्थिती ४७.३ षटकांत ४ बाद २८४ अशी होती. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांचा अचूक मा-यासमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्कारली. कर्णधार महेंद्रसिंग धोनी १८, रविंद्र जडेजा ३ आणि अजिंक्य रहाणे भोपळा न फोडताच माघारी परतला. लागोपाठ तीन फलंदाज बाद झाल्याने भारताने ५० षटकांत सात गडी गमावत ३०० धावाच केल्या. शेवटच्या पाच षटकांत भारताने फक्त २१ धावा केल्या. पाकिस्तानतर्फे सोहेल खानने १० षटकांत ५५ धावा देऊन ५ विकेट घेतल्या. तर वहाब रियाजने एक विकेट घेतली.









