
यवतमाळ , दि. १ – विहिरीचे खादकाम करीत असताना दगड अंगावर कोसळल्याने दोन मजूर घटनास्थळीच ठार झाले असून एक बालक जखमी झाला. ही घटना आज दुपारी ३.३० वाजता दरम्यान पिंपळदरी येथे घडली. कांताराव रामराव नाईक (३५), देवबा नागोराव गायकवाड (४५) दोघेही रा. पिंळदरी असे मृतांचे नाव आहे. तर योगेश विठ्ठल तांभारे (१०) हा जखमी झाला.
पिंपळदरी येथील वाडीजवळ मनोहर कांबळे यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू आहे. या कामावर दोन्ही कामगार काम करीत होते. दुपार दरम्यान विहिरीच्या वरच्या भागावर असलेला मोठा दगड घसरून अचानक दोन्ही कामगारांच्या अंगावर कोसळला. यामुळे कांताराव नाईक, देवबा गायकवाड यांचा दगडाखाली दबून घटनास्थळीच मृत्यू झाला. सुदैवाने योगेश नामक बालक या अपघातातून बचावला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी जयभीम मनोहर कांबळे यांनी पोफाळी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पुढील तपास ठाणेदार सरदार सिंग ठाकूर करीत आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Archive for February 1st, 2015
0
विहीरीत दगड कोसळल्याने दोन मजूर ठार
0
सूरजला जीवदान : बारातासानंतर बोअरवेलमधून सुटका

निंगणूर (यवतमाळ), दि. १ – आईसोबत शेतात गेलेल्या सूरज बोअरवेलमध्ये पडला होता. स्थानिक नागरिक व प्रशासनाने शर्तीचे प्रयत्न करून बारा तासानंतर म्हणजेच रात्री २.१५ वाजताच्या सुमारास त्याला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.
उमरखेड तालुक्यातील निंगणूर येथील शंकर आखरे हे आपल्या कुटुंबीयाचा गाडा हाकतात. काल शनिवारी दुपारी ३ वाजता दरम्यान आखरे यांची पत्नी दोन वर्षीय मुलगा सूरज मुलगी पूजा यांनासोबत घेऊन नईम नवाब यांच्याशेतात गेली होती. अशातच सूरज व त्याची बहिण पूजा हे दोघे खेळत होते. दरम्यान पोत्याने झाकून असलेला बोअरवेलचा खड्डा न दिसल्याने सरळ त्यात कोसळला. भाऊ बोअरवेलमध्ये पडल्याचे बघतात घाबरलेल्या पूजाने आरडाओरड करून महिलांना गोळा केले. या घटनेची माहिती नईम नवाब व सरपंच वली उल्ला खान यांना मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. सदर प्रतिनिधीने घटनेचे गांभीर्य ओळखून तत्काळ तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करून या घटनेची माहिती दिली. तहसीलदार शेजाळ यांनी उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला यांच्याशी संपर्क साधून घटनास्थळ गाठले. तहसीलदार घटनास्थळी पोहचेपर्यंत आरोग्य विभागाची अॅम्बुलंन्स वैद्यकीय चमू आणि जेसीबी घटनास्थळी दाखल झाली होती. तहसीलदारांनी डिझास्टर रेस्क्यू पथकाच्या संपर्कात राहून आॅपरेशन कसे राबवायचे या बद्दल टिप्स घेतल्या. प्रथम बोअरवेलमध्ये सूरजला आॅक्सीजन कसे मिळेल, याची व्यवस्था केली. तोपर्यंत जेसीबीच्या सहाय्याने खोदकामाला सुरूवात झाली होती. प्रथम टारगेट डिझास्टर रेस्क्यू फोर्स आणि त्यानंतर अकोला येथून नॅशनल डिझास्टर फार्स सायंकाळी सहा वाजेपर्यंत घटनास्थळी दाखल झाल्यानंतर बचावकार्याला वेग आला होता. सहा वाजतानंतर रेस्क्यू फोर्सने बचाव कार्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती. या घटनेची वार्ता परिसरात पोहोचल्याने घटनास्थळी नागरिकांची गर्दी होत होती. तसेच सायंकाळ होत असल्याने अंधारात काम करणे कठीण जात होते. वीज वितरण कंपनीकडून मोठ्या लाईटची व्यवस्था करून प्रकाशाची अडचण सोडविण्यात आली. बोअरवेलला समांतर खड्डा खोदणे सुरू असताना पाणी लागले. त्यामुळे शेजारच्या शेतातील मोटरपंप आणून पाणी बाहेर काढण्यात आले. ५० फूट खड्डा खोदल्यानंतर पाणी पातळी वाढल्यास कसे होईल, या विचाराने उपस्थितांच्या हृदयाचे ठोके चुकत होते. मात्र डिझास्टर रेस्क्यू पथकाने आलेल्या समस्यांचा सामना करीत अंतर्गत भूयार करून रात्री ठिक २.१५ मिनिटांनी सूरजची बोअरवेलमधून सुखरूप सुटका केली. रेस्क्यू टिमकडून ‘कामयाब’ झाल्याचा संदेश ‘भारत माता की जय’ असा देताच उपस्थित नागरिकांनी ‘भारत माता की जय’ असा जय घोष करून परिसर दणाणून सोडला होता. या क्षणाचा अनुभव घेताना उपस्थितांचे डोळे पाणावले होते. चिमुकल्याला लगेच उपचारासाठी यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याची तपासणी करून सुखरूप असल्याने परत फुलसावंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले. घटनास्थळी पूर्णवेळ आ. राजेंद्र नजरधने, उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला, तहसीलदार सचिन शेजाळ यांच्यासह माजी आ. विजय खडसे, उत्तम राठोड, राम राठोड, ठाणेदार मानकर उपस्थित होते.
तिघांचा सत्कार
बचाव कार्यात निंगणूर येथील मारोती शंकर पांडे व भगवान मेंडके या दोघांनी मोलाची मदत केली. तसेच अंकुश राठोड या युवकाने घटनेची माहिती तहसीलदारांना देवून कर्तव्यतत्परता दाखविली. तिघांच्या कार्याची दखल घेवून ग्रामपंचायतीच्या वतीने सोमवारी सत्कार करण्यात येणार आहे.
0
पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार

कळंब, दि. १ – पाच वर्षीय बालिकेवर अत्याचार केल्याची घटना कळंब तालुक्यातील शिंगणापूर येथे उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे. पसार झालेल्या नराधमाचा शोध घेण्यासाठी एसडीपीओचे पथक रवाना झाले असून, प्रमोद झोड (४५) रा. कळंब असे कुकर्म करणाºया नराधमाचे नाव आहे.
कळंबपासून आठ किमी अंतरावर शिंगणापूर गाव आहे. या ठिकाणी प्रमोद झोड याचे शेत असून, तो रोज गावात येत होता. गुरूवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास पाच वर्षीय बालिका खेळत असताना, त्याची नजर बालिकेवर गेली. त्याने तिला जबरदस्ती गोठ्यात नेले व तिच्यावर अत्याचार केला. मुलगी घरी रडत असल्यामुळे तिच्या आई वडीलांनी चौकशी केली. यावेळी मुलीने घडलेला सर्व प्रकार आईला सांगितला. मुलीच्या आईने कळंब पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला. दरम्यान आरोपी पसार झाल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस उपविभागीय अधिकारी यांचे पथक रवाना झाले आहे. ४५ वर्षीय इसमाने पाच वर्षीय बालिकेवर केलेला कुकर्म चीड आणणारा असून, नराधमाला तात्काळ अटक करावी अशी मागणी जोर धरत आहे.
0
वटफळी येथे बौध्द धम्म परिषद आजपासून

यवतमाळ, दि. १ – तथागतचा आर्य आष्टांगीक मार्ग व मानवता वादाची शिकवण आणि डॉ. बाबासाहेब व महात्मा फुले व शाहू महाराजाचे समता मुलक विचार जनसामान्यापर्यंत पोहचावे या हेतूने सुभेदार रामजी आंबेडकर स्मृती दिनाचे औचीत्य साधून दि २ व ३ फेब्रुवारी रोजी २३ व्या बौद्घ धम्म परिषदेचे आयोजन केले आहे.
या धम्म परिषदेच उद्घाटन भदन्द धम्मप्रिय महाथेरो कपिवस्तू यांचे हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भदन्त सदानंद महाथेरो (संघनायक) हे राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.भदन्त यु.पय्या लिंकारा (चिन), भदन्त संघरतन माणके, भदन्त सुगतदंत, भदन्त शिवली (श्रीलंका) भन्ते प्रज्ञा दिप बुध्दगया व थायलंड येथील भिक्यू संघ या निमित्ताने उपस्थित राहणार आहे. प्रमुख मार्गदर्शक खनिकर्म विभागाचे आयुक्त डॉ. हर्षदिप कांबळे, भैय्याजी खैरकार, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, पंजाबराव वानखडे, उपजिल्हाधिकारी संजय खडसे , दिनेश वानखडे, सचिन मुन, वंत मून, यशवंत गायकवाड, देविदास वाघमारे, किशोर भगत, पुष्पा बोरकर, सुमीत वानखडे, अॅड.संजय इंगळे, अनिल वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थितांना राहणार आहे. इंजि.ललीत बन्सोड हे पाहुण्याचे स्वागत करतील. भिक्खू संघाची धम्मदेशना, पटाचारा ही नाटीका, विपश्याना वर्ग, अंधश्रध्दा निर्मूलनावर प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि त्यानंतर प्रबोधनपर गीत गायनाने उद्घाटकीय सत्राचा समारोप होईल. ३ फेब्रुवारी रोजी त्रिरत्न वंदना , महिला प्रबोधनपर व युवा मार्गदर्शन पर चर्चासत्र मान्यवरांना धम्मभूषण पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. त्यानंतर समारोपीय सत्रामध्ये महसुलमंत्री ना.संजय राठोड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.माणिकराव ठाकरे , खा.भावना गवळी, जिल्हा परिषद सदस्य राहूल ठाकरे इत्यादी मान्यवर उपस्थिती राहणार आहे. त्यानंतर ‘नव्या युगाची सावित्री’ हा एकपात्री प्रयोग कल्याणी गजभिये सादर करणार आहे. या प्रबोधनाचा लाभ घेण्याचे आव्हान आयोजन समिती व भदन्त प्रा.सुमेधबोधी महाथेरो यांनी केले आहे.
0
पंतप्रधान मोदी आणि खासदार उदासीन

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील अनेक खासदारांनी स्वत:च्या मतदारसंघांमध्ये एक रुपयाही खर्च केलेला नसल्याची माहिती उघडकीस आली आहे. यात महाराष्ट्रातील खासदारही त्यांना मिळणारा खासदार निधी खर्च करण्यात उदासीन असल्याचे दिसून आले.
लोकसभा निवडणुकीला सुमारे आठ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला. मात्र देशातील ३६ राज्यांमधील (केंद्रशासीत प्रदेश मिळून) अवघ्या १० खासदारांनीच आपल्या खासदार निधीतून विकास कामाला सुरुवात केली आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, आसाम आणि हिमाचल प्रदेश अशा विविध राज्यांमधील खासदारांनी अद्याप खासदार निधीला हातही लावलेला नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे.
मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिसटिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन’ यांच्याकडून लोकप्रतिनिधींच्या विकासनिधीच्या प्रत्यक्ष वापराची माहिती मिळाली आहे. त्यानुसार, मे २०१४ ते १ जानेवारी २०१५ या कालावधीत देशातील ३६ राज्यांतील सर्व खासदारांना एकूण १२४२.५० कोटी रुपयांचा खासदार निधी देण्यात आला आहे. मात्र १० खासदारांनीच आपल्या खासदार निधीतून विकास कामाला सुरुवात केली आहे.
खासदारांना दरवर्षी ५ कोटी रुपयांचा खासदार निधी विकास कामांसाठी दिला जातो. या निधीतून खासदार त्यांच्या मतदारसंघातील गरजा पूर्ण करु शकतात. स्थानिक पातळीवरील आवश्यक कामांसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून देता यावा यासाठी हा निधी असतो. या निधीतील पैसा पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, रस्ते यासाठी खर्च करण्याची खासदारांना सवलत दिलेली आहे.
0
ऑस्ट्रेलियाने तिरंगी मालिका जिंकली

पर्थ- तिरंगी मालिकेतील अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा ११२ धावांनी दणदणीत पराभव केला आणि तिरंगी मालिका जिंकली.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक मा-यासमोर इंग्लड संघाची पुरती भंबेरी उडाली आणि विजयासाठी २७९ धावांचे आव्हान स्विकारुन मैदानात आलेल्या इंग्लंडचा डाव ३९.१ षटकांत १६६ धावांत आटोपला.
ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या २७९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या इंग्लडची सुरुवात खराब झाली. इंग्लडचा सलामीवीर इयान बेल आठ धावा करुन तंबूत परतला. त्यानंतर टेलर चार धावा करुन बाद झाला. मोईन अलीने खेळपट्टीवर टिकून राहत धावा जमवण्याचा प्रयत्न केला मात्र जॉन्सनने त्याला बाद केले. त्याने २६ धावा केल्या. त्यानंतर आलेला मॉर्गन भोपळा न फोडताही माघारी परतला.
भारताविरुद्धच्या यापूर्वीच्या सामन्यात खो-याने धावा काढणा-या बटलरला या सामन्यात केवळ १७ धावा करता आल्या. तर ख्रिस वोकर्स शून्यावर बाद झाला.
तत्पूर्वी, ग्लेन मॅक्सवेलच्या झुंजार ९५ धावा आणि मिशेल मार्श आणि जेम्स फॉकनरच्या प्रत्येकी अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अडीचशे पार धावसंख्या उभारली. ग्लेन मॅक्सवेलने ९८ चेंडूत तडाखेबाज ९५ धावांची खेळी केली. तर मिशेलने ६८ चेंडूत ६० आणि फॉकनरने केवळ २४ चेंडूत ५० धावा केल्या.
सामन्यात इंग्लडने नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी बोलवले. मैदानात उतरेलल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाला इंग्लडने पहिल्याच षटकात धक्का दिला. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर अरोन फिंच एकही धावा न करता आल्यापावली परत गेला. त्यानंतर वॉर्नर १२ धावा करुन अँडरसनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. दोन्ही सलामीवीर झटपट बाद झाल्यानंतर स्मिथने सावध फलंदाजीस सुरुवात केली. यादरम्यान जॉर्ज बेलीच्या रुपाने तिसरा धक्का ऑस्ट्रेलियाला बसला.
त्यानंतर स्मिथही ४० धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑस्ट्रेलियाच्या धावफलकावर चार बाद सहा अशी धावसंख्या असताना ग्लेन मॅक्सवेल आणि मार्श या जोडीने इंग्लडच्या मा-याचा प्रतिकार करत धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १४१ धावांची भागीदारी रचली. मॅक्सवेल शतकाच्या उंबरठ्यावर असताना ब्रॉडच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. त्याने ९५ धावा केल्या. त्यानंतर लगेचच मार्श धावचित झाला. तर हॅडिन नऊ, जॉन्सन तीन धावा करुन बाद झाले. शेवटच्या फळीतील जेम्स फॉकनरनेही खेळाचे चांगले प्रदर्शन करत आपल्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलिया २७८ धावांचा टप्पा गाठून दिला.
इंग्लडकडून स्टुअर्ट ब्रॉ़डने सर्वाधिक तीन गडी बाद केले तर अँडरसन याने दोन आणि फिन आणि मोईन अली यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.









