
यवतमाळ, दि. ३१- बहिणीसोबत शेतात खेळत असलेला चिमुकला बोअरवेलच्या खड्डयात पडल्याची घटना उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे आज दुपारी ३ वाजता दरम्यान घडली. सूरज शंकर आखरे (२) या चिमुकल्याला सुखरुप बाहेर काढण्यासाठी टार्गेट डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स (टीडीआरएस) युद्धस्तरावर प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. सूरजची जिवन जगण्यासाठी झुंज सुरू असून, रात्री ९ वाजेपर्यंत बचावकार्य सुरूच होते. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, चिमुरडा सुखरुप बाहेर निघावा म्हणून प्रत्येक जण आराधना करीत आहे.
शनिवारी दुपारच्या सुमारास निंगणूर येथील नईम अली यांच्या शेतात काही महिला कापूस वेचन्याचे काम करीत होत्या. शेतातच असलेल्या बोअरवेलनजीव सूरज हा पाच वर्षीय बहीण पूजा सोबत खेळत होता. शेतातील बोअरवेलला पोत्याने झाकून ठेवण्यात आले होते. बोअरवेलजवळ खेळत असलेला सूरज अचानक बोअरवेमध्ये पडला. सूरज आत पडताच पूजाने आरडा-ओरड सुरू केली. शेतातील महिलांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. ही वार्ता गावात पसरताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाला ही माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी दिपक सिंगला, तहसिलदार सचिन शेजाळ, फुलसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पठान, बिटरगावचे ठानेदार एम.बी. मानकर, महागाचे ठाणेदार पी.बी. शेळके आपल्या ताफ्यासह घटनास्थळावर दाखल झाले.
घटनेचे गांभीर्य ओळखून सूरजला बाहेर काढण्यासाठी अवघे प्रशासन कामी लागले. दोन जेसीबी यंत्राच्या सहाय्याने बोअरवेलला समांतर खड्डा खोदण्याला सुरूवात करण्यात आली. ४० फूट खोल खड्यात पडलेल्या सूरजला आॅक्सीजनची कमतरता भासू नये म्हणून डॉक्टरांच्या देखरेखीत आॅक्सीजनच्या सिंलेडरने खड्यात आॅक्सीजनचा पुरवठा सुरू करण्यात आला. दोरीच्या मदतीने बिस्कीट आणि पाणी आत सोडण्यात आले. मोठ्या टॉर्चने नियमीत बालकाच्या हातचालीवर लक्ष दिल्या जात आहे. सूरजची आई तिथेच चिमुकला सुखरुप बाहेर निघावा म्हणून बसून आहे. हे दृश्य उपस्थितांचे हृदय हेलावून सोडत आहे.
घटनेची माहिती तत्काळ जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. जिल्हा मुख्यालयातून टीडीआरएस पथक सायंकाळी ६ वाजता घटनास्थळावर दाखल झाले. हे पथक दाखल होताच उपविभागीय अधिकाºयांनी बचावकार्याची सुत्रे पथकाकडे सोपविली. घटनेचे गांभीर्य बघून आ. राजेंद्र नजरधने, माजी आ. उत्तमराव इंगळे घटनास्थळावर पोहाचले. बघ्यांच्या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी बिटरगाव, महागाव आणि उमरखेडवरून अतिरिक्त पोलीस कुमक मागविण्यात आले. अंधार पडताच वीज वितरण कंपनीच्या वतीने घटनास्थळावर मोठे लाईट लावण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत बचाव कार्य सुरूच होते.
Archive for January, 2015
0
चिमुकला बोअरवेलच्या खड्यात पडल्याने खळबळ , उमरखेड तालुक्यातील घटना
0
अपघातात दोन ठार

यवतमाळ , दि. ३१ – जिल्ह्यात राळेगाव घाटंजी तालुक्यात झालेल्या दोन विविध अपघातात महिलेसह पोलीस पाटील ठार झाल्याची घटना घडली.
युवकाने आपले वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून महिलेला धडक दिली. यात गया भोयर ही गंभीररित्या जखमी झाली. ही घटना राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथे घडली. अपघातात गया भोयर ही अपघातात जखमी झाल्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामू कृष्णाजी भोयर (४०) रा. धानोरा याने राळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून किशोर संजय जिरे (२१) रा. राळेगाव याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. तसेच उभ्या असलेल्या ट्रक्टरवर दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात कोटी येथील पोलीस पाटील यांचा मृत्यू झाला. ही घटना घाटंजी-रंझा मार्गावर घडली. अनंत वासुदेव अक्कलवार (४५) असे मृताचे नाव आहे. विजय शिवराम अक्कलवार हा जखमी झाला. काल रात्री दोघेही दुचाकीने घाटंजी येथून कोचीकडे जात होते. दरम्यान ट्रक्टर क्रमांक एमएच २९ / ३५०१ हा रस्त्यावर उभा होता. त्यामुळे ट्रक्टर न दिसल्यामुळे दुचाकी आदळली. यात अनंत अक्कलवार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर विजय जखमी झाला. त्याला उपचारासाठी यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघात झाल्याचे लक्षात येताच चालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी रोशन अक्कलवार याने घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
0
विनयभंग केल्याने युवतीने घेतले विष

यवतमाळ : दोन युवकांनी विनयभंग केला. यामुळे अपमानित झालेल्या युवतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना राळेगाव तालुक्यातील कळंबनेर येथे घडली.
अमर विलास जुनघरे (२४) याच्यासह अन्य एकाने गावातील युवतीचा हात पकडून विनयभंग केला. तसेच तिच्या वडीलांना जिवे मारण्याची धमकी दिली. यामुळे युवतीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी राळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यावरून अमर जुनघरे याच्यासह अन्य एकाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
0
नोकरीच्या नावाखाली ११ लाखाने फसवणूक, संस्थाध्यक्ष विजय डांगे विरुद्ध गुन्हा

यवतमाळ , दि. ३१ – शिक्षण संस्थेत शिपाई व शिक्षण पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ११ लाख रुपयाने फसवणूक केली. याप्रकरणी कोटंबा येथील शिक्षण संस्था अध्यक्ष विजय डांगे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
कोटंबा येथे तथागत विद्यालय असून, या शाळेत शिपाई व शिक्षक पदावर नोकरी देण्याचे आमिष बालाजी खताळ यास दाखविले. नोकरीसाठी म्हणून ११ लाख रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर ११ महिन्यांची आॅर्डर दिली. मात्र कालावधी संपल्यानंतर वाढीव मुदत न देता नोकरीवरून काढून टाकले. यापूर्वी देखील विजय डांगे याने नोकरीच्या नावाखाली अनेकांची फसवणूक केल्याचे सांगितल्या जाते. नोकरी न मिळता ११ लाखाने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फकीरराव नानासाहेब दहिभाते रा. सायखेडा याने बाभूळगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी विजय डांगे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे. फसवणुकीची पुन्हा एक घटना बाभूळगाव तालुक्यात उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
0
शारिरीक सुखाची मागणी करणाºया आरोपीस कारावास

यवतमाळ, दि. ३१ – तालुक्यातील किन्ही येथील युवतीला शारीरीक सुखाची मागणी करून विनयभंग करणाºया आरोपीस एक महिना कारावासाची शिक्षा सुनावली. येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी (तीसरे) एस.के. शाहु यांनी हा निकाल दिला. उत्तम दत्ता खडके (२३) रा. किन्ही असे आरोपीचे नाव आहे.
किन्ही येथील युवती किराणा दुकानात गेली असता. आरोपी उत्तम खडके याने मुलीला ५० रुपयाची आमिष दाखऊन शारीरीक सुखाची मागणी केली. यावेळी युवतीने या प्रकारास नकार देऊन तेथून काढता पाय घेतला. यावेळी उत्तमने युवतीला ही बाब कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. घरी गेल्यानंतर तीने हा प्रकार आपल्या आईला सांगितला. १९ जून २०११ रोजी घडलेल्या घटनेचा जाब विचारण्यासाठी युवतीची आई आरोपीच्या घरी गेली. यावेळी आरोपी व त्याच्या अन्य तीन साथीदारांनी महिलेला मारहाण केली. याप्रकरणी युवतीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी चारही आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३५४, ३२४, ५०६, ५०४, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. जमादार उद्देशन पाटील यांनी तपास करून आरोपींना अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी (तीसरे) एस.के. शाहु यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने पाच साक्ष तपासण्यात आल्या. यामध्ये दोष सिद्घ झाल्याने आरोपीस एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवस अतिरीक्त शिक्षा होणार आहे. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता अमित भेंडे यांनी काम पाहिले.
0
विनयभंग करणाºया आरोपीस शिक्षा

यवतमाळ , दि. ३१ – माहेरी राहत असलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीस एक महिना कारावासाची शिक्षा येथील प्रश्रम श्रेणी न्यायदंडाधिकारी एस.के. शाहु यांनी सुनावली. विष्णू बाबाराव चव्हाण (३०) रा. आसोला असे आरोपीचे नाव आहे.
पतीसोबत घरगुती कारणावरून वाद होत असल्याने एक महिला माहेरी आसोला येथे राहत होती. गावातीलच विष्णू चव्हाण या युवकाची वाईट नजर सदर महिलेवर पडली होती. या महिलेने आरोपीला समज देऊन समजुत काढली होती. अशातच १९ आॅक्टोंबर २०१३ रोजी महिलेचे आई वडील कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेऊन दारू पिऊन आरोपीने घरात प्रवेश करून महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३५४ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला. जमादार माणिक भगत यांनी तपासाअंती आरोपीस अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी (तीसरे) एस.के. शाहु यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने चार साक्ष तपासण्यात आल्या. यामध्ये दोष सिद्घ झाल्याने आरोपीस एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता अमित भेंडे यांनी काम पाहिले.
0
घोनसरा येथील युवकाचा खून

आर्णी , दि ३१ – तालुक्यातील घोनसरा येथील युवकाचा ईवळेश्वर शिवारात अनैतिक संबधातून खून करण्यात आल्याची घटना सकाळी आठ वाजता दरम्यान उघडकीस आली. उबेद खान (२२) रा. घोनसरा असे मृताचे नाव आहे. उबेदचे ईवळेश्वर येथील विवाहीत महिलेसोबत एक वर्षापासुन अनैतिक संबंध होते. तिला भेटण्यासाठी उबेद रात्री दरम्यान जात होता. काल रात्री ८ वाजता दरम्यान घोनसरा येथून जेवन न करता तो घरून गेला होता. रात्रभर घरी न आल्याने घरातील सर्वजन त्याची काळजी करत होते. ईवळेश्वर येथील नारायण कुडमथे यांनी मृतकाचा मोठा भाऊ फयाज खान यास सकाळ दरम्यान फोन करून ईवळेश्वर शिवारातील भाऊराव मडपाजी यांच्या शेताजवळ असलेल्या नालीत उबेदचा मृतदेह पडून असल्याची माहीती दिली. लगेच मृतकाच्या नातेवाईकांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी उबेदच्या डाव्या पायाला मार आणि गळा दाबलेल्या अवस्थेत आढळुन आला. याप्रकरणी उबेदचे वडील अमानुल्ला खान अमिर खान (५५ ) यांनी आर्णी पोलीसात तक्रार दिली. त्यावरून उज्वला मडावी, शारदा आडे, चंदू कुडमथे, शंशीकांत कुडमथे, लवकुश कुडमथे, गजानन ठवकर सर्व रा. ईवळेश्वर यांच्या विरुद्ध कलम ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास ठाणेदार हनुमंतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश जाधव करित आहे.
0
विविध प्रकारच्या ग्रंथवाचनानेच संस्कृतीचे दर्शन होते – संजय राठोड
यवतमाळ ग्रंथोत्सवाचे पालकमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन
यवतमाळ, दि. 31 : ग्रंथ हेच मानवाचा खरा गुरु आणि मित्र आहे. प्रत्येकाने ग्रंथांच्याबाबतीत हे तत्व आत्मसात केल्यास कोणीही जिवनाच्या कोणत्याही स्तरावर अपयशी होवू शकणार नाही. ग्रंथांमुळेच आपल्याला विविध प्रकारच्या संस्कृतीचे दर्शन होत असते. त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथवाचनाचा छंद जोपासला पाहिजे, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. पालकमंत्र्यांच्याहस्ते यवतमाळ ग्रंथोत्सवाचे थाटात उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.आरती फुफाटे तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, नांदेड येथील जेष्ठ बालसाहित्यिक मालध चुकेवाड, मुख्याधिकारी रविंद्र पांढरे, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, उपशिक्षणाधिकारी एस.आर.चव्हाण, ग्रंथालय संघटनेचे कार्यवाह विनोद देशपांडे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने, नितीन खर्चे आदी उपस्थित होते. सुरुवातीस दिप प्रज्वलीत करून तसेच ग्रंथदालनाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. वाचनानेच माणूस समृध्द होत असतो. त्यामुळे प्रत्येकाने वाचन केले पाहिजे. हाच उद्देश समोर ठेवून ग्रंथोत्सवाचे आयोजन केले जाते. एकाच ठिकाणी विविध पुस्तके उपलब्ध व्हावी. या पुस्तकांमधून साहित्य, संस्कृती व सांस्कृतिक ओळख निर्माण व्हावी हा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे पुढीलवर्षी मोठ्याप्रमाणावर ग्रंथ व सांस्कृतिक महोत्सव घेता येईल का यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले. यावेळी सर्वानी ग्रंथमहोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.फुफाटे यांनी चांगली पुस्तके चांगले विचार देत असतात. त्यामुळे प्रत्येकाने पुस्तके वाचलीच पाहिजे. पुस्तके जिवनात बदल घडवून आणू शकतातत. चांगली दिशा व शिस्त लावण्यासाठी पुस्तकेही मार्गदर्शकाची भुमिका बजावते, असे त्यांनी पुढे बोलतांना सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी शालेय विद्यार्थ्यांना पुस्तकांचे आवड निर्माण करण्यासाठी ग्रंथोत्सव असल्याचे सांगुन या ग्रंथोत्सवाचा प्रत्येकानी लाभ घ्यावा, असे ते म्हणाले. प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी केले. यावेळी त्यांनी ग्रंथोत्सवामागची भुमिका विशद केली. कार्यक्रमाचे संचलन जेष्ठ साहित्यिक सुरेश गांजरे यांनी केले तर आभार शिक्षण विस्तार अधिकारी श्री.शेंडगे यांनी मानले.कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी, साहित्यिक, कवी मोठ्यासंख्येने उपस्थित होते. सदर ग्रंथमहोत्सव दिनांक 2 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. या ग्रंथमहोत्सवात पुणे, मुंबई, औरंगाबाद यासह विविध ठिकाणच्या नामवंत प्रकाशनांचे पुस्तकांचे 34 स्टॉल असून वाचकांना पुस्तके पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
0
पाकिस्तानात बॉम्बस्फोट, ३५ ठार

इस्लामाबाद – दक्षिण पाकिस्तानात शिया मशिदीमध्ये शुक्रवारी दुपारी झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा वाढत चालला असून, आतापर्यंत ३५ जण ठार झाले आहेत.
पाकिस्तानच्या शिकारपूर शहरातील मशिदीमध्ये हा बॉम्बस्फोट झाला. दुपारच्या नमाजासाठी मशिदीमध्ये गर्दी झालेली असताना हा बॉम्बस्फोट झाला.
शिकारपूर रुग्णालयात आतापर्यंत ३१ मृतदेह आणण्यात आले असून, चौघांचा रुग्णालयाच्या वाटेवर असताना मृत्यू झाला. शिकारपूर सिंध प्रांतात असून, कराचीपासून पाचशे कि.मी. अंतरावर आहे. या बॉम्बस्फोटातील जखमींचा आकडाही मोठा आहे.
0
भारताचा पराभव, इंग्लंड फायनलमध्ये

पर्थ, दि. ३० – ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या तिरंगी मालिकेतील वन-डे सामन्यात इंग्लंडकडून भारतीय संघाचा पराभव झाला. भारताने २०१ धावांचे ठेवलेले आव्हान इंग्लंड संघाने ७ गडयांच्या बदल्यात पूर्ण करीत फायनलमध्ये धडक मारली. १ फेब्रुवारी रोजी होणारा अंतिम सामना ऑस्ट्रेलियाविरुध्द इंग्लंड यांच्यात पर्थ येथे होणार आहे.
प्रथम फलंदाजी करणा-या भारतीय संघाला केवळ २०० धावाच करता आल्या. भारतीय संघाला ५० षटके पूर्ण खेळता आली नसून भारतीय संघ ४८.१ षटकांतच सर्वबाद झाला. भारताकडून अजिंक्य राहण्ो याने सर्वाधिक ७३ धावा केल्या. शिखर धवन ३८, विराट कोहली ०८, सुरेश रैना ०१, अंबाती रायडू १२, महेंद्र सिंग धोनी १७, स्टूअर्ट बिन्नी ०७, रवींद्र जाडेजा ०५, अक्षर पटेल ०१, मोहित शर्मा नाबाद ०७, मोहम्मद शामी २५ धावांच्या बळावर भारताने सर्वबाद २०० धावा केल्या. भारताने ठेवलेले आव्हान पेलण्यासाठी उतरलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात फारशी चमकदार झाली नाही. बेल १० धावांवर असताना मोहित शर्माने त्याला पायचित ठरवले. इंग्लंडकडून टेलरने सर्वाधिक ८२ धावा केल्या. रुट ०३, मोर्गन ०२, बोपारा ०४ धावांवर बाद झाले. इंग्लंडचा डाव कोसळला असतानाच बटरने उत्तम फलंदाजीचे दर्शन घडवले त्याने ६७ धावा करीत संघाला विजयाजवळ आणून ठेवले. अखेरीस इंग्लंडने ७ गडी गमावित भारतावर विजय मिळविला. भारताकडून स्टूअर्ट बिन्नीने ३, मोहित शर्मा २ तर सामी व अक्षर पटेलला प्रत्येकी एक-एक गडी बाद करण्यात यश मिळाले.
0
विनयभंग करणाºया आरोपीस शिक्षा

यवतमाळ, दि. ३० – खानावळमध्ये महिलेचा विनयभंग करणाºया आरोपीस एक वर्ष शिक्षा सुनावली. सत्र न्यायाधिश एम.पी. असीम यांनी आज शुक्रवारी हा निकाल दिला. राजू मनोहर देशपांडे (३८) रा. सिद्घेश्वर नगर वाघापूर असे आरोपीचे नाव आहे.
वाघापूर येथील पंचशिलनगरमधील महिला त्याच भागातील खानावळमध्ये काम करत होती. अशातच १० मे २०१४ रोजी आरोपीने मागील दाराने खानावळीत प्रवेश करून त्या महिलेचा विनयभंग केला. यावेळी महिलेने आरडाओरड केली असता आरोपीने तोंड दाबुन आवाज करू नका अशी तंबी दिली. सदर महिलेच्या आवाज ऐकुन दुसºया खानावळीतील दोन महिला मदतीसाठी धावून आल्या. त्यांनाही आरोपीने अश्लिल व जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३५४, ३५४ (अ), ५०४, ५०६ व अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदणे यांनी तपासपूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. सत्र न्यायाधिश एम.ची. असीम याच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. सरकारी पक्षाच्या वतीने एकुण पाच साक्षदार तपासण्यात आल्या. यामध्ये दोषसिद्घ झाल्याने आरोपी राजू देशपांडे यास भादंवि कलम ३५४ अंतर्गत १ वर्ष कारावास आणि ३५४ (अ) व ५०४ मध्ये प्रत्येकी तीन महिने शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील मंगेश गंगलवार यांनी काम पाहिले.
0
जयंती नटराजन यांचा काँग्रेसला ‘रामराम’

नवी दिल्ली, दि. ३० – काँग्रेस आता पूर्वीसारखा पक्ष राहिलेला नाही, पक्षात घुसमट होत असून अशा वातावरणात काम करता येणार नाही, असे सांगत माजी केंद्रीय मंत्री जयंती नटराजन काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. मात्र अन्य पक्षात जाण्याचा विचार नसल्याचे नटराजन यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. नटराजन यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
नटराजन यांनी पक्षनेतृत्वाला पाठवलेले एक पत्र उघड झाल्याने काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. स्वत:ची बाजू मांडण्यासाठी नटराजन यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप केले. माझ्यासाठी आजचा दिवस अतिशय दु:खदायक आहे, आपले कुटुंब गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेससोबत आहे. फाईल्स मंजुरीसाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. नोव्हेंबर महिन्यात आपण बाहेर असताना अजय माकन यांनी आपल्याला फोन करून दिल्लीला बोलावले आणि मला मोदींविरोधात स्नूपगेटवरून टीका करण्यास सांगितले. मला वैयक्तिक टीकेपेक्षा त्यांच्या नीतींबाबत टीका करणे योग्य वाटत होते, मात्र तसे करत आले नाही, असेही त्या म्हणाल्या. माझी तामिळनाडू काँग्रेसबद्दल कोणतीच तक्रार नाही, माझी तक्रार हायकमांडबद्दल आहे. मला पक्षाध्यक्षांना भेटण्याची वेळच दिली नाही, असे सांगत त्यांनी काँग्रेसमध्ये लोकशाही नसल्याचा गंभीर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय जाहीर केला.
दरम्यान नटराजन यांचे पत्र उघड झाल्यानंतर आज मोठा गदारोळ झाला. केंद्रीय पर्यावरण मंत्री म्हणून काम करत असताना काही उद्योजकांच्या फाईल्स मंजुर करण्यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून दबाव यायचा असा गंभीर आरोप जयंती नटराजन यांनी त्यांच्या पत्रात केला होता. या दबावापुढे नमते न घेता मी काही फाईल्स रोखूनही ठेवल्या होत्या असा दावाही त्यांनी केला आहे.
जयंती नटराजन यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एक पत्र पाठवले होते. हे पत्र शुक्रवारी प्रसारमाध्यमांच्या हाती लागले असून या पत्रात जयंती नटराजन यांनी पक्ष नेत्यांवर गंभीर आरोप करुन काँग्रेसलाच गोत्यात आणले आहे. यामध्ये नटराजन यांनी पक्षातील काही नेते त्यांच्याविरोधात प्रसारमाध्यमांमध्ये खोट्या बातम्या पसरवत असल्याचा आरोप केला. पक्षातील वरिष्ठांकडून पर्यावरण खात्यातील फाईल्स मंजुर व्हाव्यात यासाठी काही सूचना येत होत्या, या सुचना म्हणजे आमच्यासाठी आदेश असायचे अशी तक्रार त्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. पक्षात माझा अपमान व मानसिक त्रास झाला, माझी बाजू मांडण्यासाठी मी तुमची आणि राहुल गांधी यांची भेट घेण्याचे प्रयत्न केले. मात्र मला भेट मिळू शकली नाही असे त्यांनी पत्रात म्हटले होते. हे पत्र शुक्रवारी उघड झाल्यावर काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे. जयंती नटराजन यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहेत. मात्र त्या दुस-या पक्षात जाणार नाही अशी माहिती सूत्रांनी दिली.
0
शिर्डीच्या विकासासाठी १२०० कोटींचा प्रस्ताव

शिर्डी दि. ३० – शिर्डीच्या विकासासाठी साईबाबा ट्रस्टने विकास आराखडा तयार केला आहे. या कामासाठी १२०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, त्याला महाराष्ट्र सरकारने मंजुरी द्यावी, असा प्रस्ताव ट्रस्टने सरकारकडे पाठवला आहे. साईबाबांच्या समाधी शताब्दी सोहळय़ासाठी शिर्डी विकास प्राधिकरण स्थापन करा, असा प्रस्तावही ट्रस्टने दिला, अशी माहिती अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी दिली.
ऑगस्ट महिन्यात नाशिकमध्ये कुंभमेळा होणार आहे. यावेळी देशासह परदेशातूनही कोटय़वधी भाविक तसेच पर्यटक नाशिकला भेट देतील. हे भाविक शिर्डीतही दाखल होणार असल्याने त्यांच्या सोयीसुविधांसाठी तसेच तीन वर्षानी साईबाबा समाधी शताब्दी सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिर्डीचा विकास करण्यासाठी १२०० कोटी रुपयांच्या खर्चाला सरकारने मंजुरी द्यावी. तसेच शिर्डीच्या विकासासाठी शिर्डी विकास प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी ट्रस्टने सरकारला पाठवलेल्या प्रस्तावात केली आहे.
याबाबत बुधवारी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी नाशिक विभागीय महसूल आयुक्त एकनाथ ढवळे, जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलीस अधीक्षक लख्मी गौतम आणि साईबाबा ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र जाधव यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत शिर्डीच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली. नाशिक येथे होणा-या कुंभमेळय़ात सुमारे १ कोटी भाविक उपस्थित राहतील. त्यापैकी जवळपास २५ लाख भाविक शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल होतील. या पार्श्वभूमीवर सरकारने विविध विकासकामांसाठी १९७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. अहमदनगर-मनमाड या २३ किमीच्या बायपास रोडसाठी १४० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती राम शिंदे यांनी दिली.
येथे येणा-या लाखो भक्तांना पाणी, सुरक्षा, चांगले रस्ते, सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे यासाठी शिर्डी विकास प्राधिकरण स्थापन करण्याबाबत लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत लवकरच बैठक घेतली जाईल, असेही शिंदे म्हणाले.
0
कुठे आहे काळा पैसा – राहुल गांधी

नवी दिल्ली दि. ३० – लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळा पैसा परत आणण्याचे आश्वासन दिले होते.
प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा करण्याचा शब्द दिला होता. तुम्हाला पैसे मिळाले का ? तुमच्या खात्यात पंधरा लाख जमा करणे दूर राहिले मोदी स्वत: हा दहा लाखांचा सूट परिधान करत आहेत अशी घणाघाती टिका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेमध्ये ते गुरुवारी बोलत होते. राहुल गांधींनी आपल्या भाषणामध्ये आम आदमी पक्षाचाही समाचार घेतला.
काँग्रेस प्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळात आम आदमी पक्ष बलात्कार, भ्रष्टाचार असे मुद्दे उपस्थित करुन आंदोलने करायचा. पण आता दिल्लीमध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये ३० टक्के वाढ झालेली असताना हा पक्ष शांत आहे.
आपल्या भाषणात राहुल गांधींनी गरीबांसाठी त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचे आश्वासन दिले. दिल्लीत काँग्रेसचे सरकार आले तर, सर्वप्रथम कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी रोजगार दिला जाईल असे राहुल म्हणाले.
0
दारव्हा उपविभागीय कार्यालयवर रुमणे मोर्चा धडकला

दारव्हा,दि. २९ – शेतकरी संघटनेने आपल्या विविध मागण्या संदर्भात रुमणे मोर्चा काढून उपविभागीय कार्यालयात धडक दिली. स्थानिक सर्कल मैदानातुन शेकडो शेतकरी बैलबंड्यासह या मोर्चात सहभागी झाले होते. सरकार विरोधी घोषणा बाजी करीत शेतकरी आत्महत्याच्या झाकीसह बैल व म्हशीवर शेतकºयांच्या विदारक अवस्थेचे फलक या मोर्चाचे प्रमख आकर्षण ठरले होते.
यावेळी अनेक शेतकºयांनी स्थानिक लोक प्रतिनिधींसह सरकारणे अच्छे दिनचे स्वप्न दाखवून विश्वासघात केल्याचा आरोप करून सरकार विरुध्द रोष व्यक्त केला. पॅकेजच्या नावावर सरकार शेतकºयांची दिशाभूल करीत असून, सरकारने वाचननाम्याप्रमाणे सातबारा कोरा करावा. उत्पादन खर्चात ५० टक्के नफा देऊन कृषी मालाचे भाव ठरवावे, घरगुती वीज बिलाचे दरवाढ करण्यात येऊ नये अश्या अनेक मागण्यांचे निवेदन यावेळी शेतकरी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकाºयांना दिले. यावेळी मोर्चात निखील कुमार पानचोरे या युवकाने फाशी घेतलेल्या शेतकºयांचे दृश्य झाकीद्वारे सादर केले.
0
पीएसआयवर हल्ला करणाºया तिघांविरुद्ध गुन्हा

यवतमाळ, दि. २९ – वडीलाच्या मृत्यूचा दोष पोलिसांवर देत शहर ठाण्यात घुसून पीएसआयवर हल्ला करणाºया अवैध व्यवसायिकासह दोनजणाविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला आहे. प्रशांत शेटे व अन्य दोन रा. वाघापूर अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. शहर पोलिसांनी अवैध व्यवसायवर धाड टाकल्यानंतर कारवाई दरम्यान प्रशांत शेटे याच्या वडीलाचा मृत्यू झाला होता. वडीलाच्या मृत्यूला पोलिसांना दोषी ठरवीत शहर ठाण्यावर धडक देऊन पीएसआय संतोष मनवर (३१) यांना मारहाण केली. याबाबत शहर पोलिसांनी तिनजणाविरुद्घ गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
0
ग्रामीण रुग्णालयात तोडफोड

नेर , दि. २९ – येथील शासकीय रुग्णालयात काल रात्री १२ वाजता तिन इसमानी धुडगुस घालून वैद्यकीय अधिक्षकांच्या कक्षाची तोडफोड करून काचा फोडल्या व वैद्यकीय अधीक्षकास शिविगाळ केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. आज पुन्हा रुग्णालयात जावून वैद्यकीय अधीक्षकास मारहाण करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
नेर शासकीय रुग्णालयात काल रात्री १२ वाजता आरोपी विजय उमरतकर व अन्य दोघांनी येऊन धुडगुसे घातल व वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय जाधव यांची कक्षाची तोडफोड केली व त्यांना शिविगाळ केली. जाधव यांनी हा धुडघूस घालून घरी गेले असता तीघेही त्यांना शिविगाळ केली.वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय जाधव यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान आज पुन्हा विजय उमरतरकर हा पाच वाजता दरम्यान रुग्णालयात गेला. तिथे उपस्थित वैद्यकीय अधीक्षकास मारहाण केली. त्यांनी पोलीस ठाणे गाठून मारहाण केल्याची तक्रार दिली. त्यावरून गुन्हा नोंद केला आहे.
0
खून करणाºया दोन आरोपीस जन्मठेप

यवतमाळ , दि. २९- करणी केल्याच्या कारणावरून इसमाचा खून करणाºया जवाहर नगर धुंदी येथील दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पुसद येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश अनिल सुब्रम्हण्यम् यांनी आज गुरूवारी हा निकाल दिला. कैलास श्रीराम चव्हाण, मधुकर कीसन राठोड अशी शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहे.
प्रकाश तुकाराम राठोड रा. जवाहर नगर धुंदी हा नागपूर येथील इंडियन आॅईल कंपनीत ड्रायव्हर या पदावर कार्यरत होता. सदर व्यक्तीवर कैलास चव्हाण याच्या आईला करणी केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे राठोड व चव्हाण यांच्यात पंधरा वर्षापासून वाद सुरू होता. तसेच आरोपी मधुकर कीसन राठोड, लक्ष्मी किसन राठोड, शोभा मधुकर राठोड, सिमा रमेश राठोड, रमेश किसन राठोड, अतुल मधुकर राठोड यानी प्रकाशला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ७ आॅगस्ट २०१० रोजी धुंदी गावात आत्माराम जाधव याच्या तीसºया दिवसाच्या कार्यक्रमासाठी सदर ट्रायव्हर आला होता. कार्यक्रम आटोपून तो भारत आडे, पुरासिंग आडे यांना घेऊन दुचाकीने पुसदकडे जात होता. अशातच आरोपी कैलास व मधुकर याने धुंदी गावाजवळ मोटर सायकल खाली पाडली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी कुºहाडीने वार करून प्रकाशचा खुन केला. या प्रकरणी भारत नरसिंग आडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुसद ग्रामीण पोलिसांनी सात आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२, ३४१, १४७, १४८, १४९, ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक आर.वाय. भद्रे यांनी आरोपींना अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. तसेच पोलीस उपनिरीक्षक पि.आर. सुळे यांनी फरार असलेल्या मधुकर, रमेश व अतुल या तीन आरोपींना अटक केली होती. पुसद येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश अनिल सुब्रमण्यम् यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने १५ साक्ष तपासण्यात आले. त्यामध्ये आरोप सिद्घ झाल्याने आरोपी कैलास व मधुकर यास जन्मठेप सुनावली. तसेच प्रत्येकी दहा हजार रुपये दंडही ठोठावला. तर उर्वरीत पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. सुधाकर राठोड यांनी काम पाहीले.
0
शेतकºयाकडून लाच स्विकारणाºया तलाठ्यास अटक

यवतमाळ, दि. २९ – कर्जाचा बोजा सातबाºयावर चढविण्यासाठी एक हजाराची लाच स्विकारणाºया तलाठ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. रविंद्र विठ्ठल कवटकर (४७) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.
दिग्रस तहसील अंतर्गत कांदळी साजा क्रमांक ९१ मध्ये तलाठी म्हणून रविंद्र कवटकर हे कार्यरत होते. कांदळी येथील शेतकºयांनी घेतलेले बॅक आॅफ बडोदाचा जुन्या कर्जाचा बोजा सात बाºयावरून अतरवुन देतो. तसेच आयसीआयसीआय बँकेच्या नवीन कर्जाचा बोजा सातबाºयावर चढवून देतो असे म्हणून शेतकºयाला एक हजार रुपये लाचेची मागणी केली. २९ जानेवारी रोजी दिग्रस येथील तहसील कार्यालयात लाच देण्याचे ठरले होते. त्यावरून यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दिग्रस तहसील कार्यालयात सापळा रचून तलाठ्यास लाच घेतांना रंगेहात अटक केली. ही कार्यवाही पोलीस उपअधिक्षक सतीश देशमुख, पोलीस निरीक्षक नंदकुमार जामकर, नितीन लेव्हरकर, गजानन राठोड, अनील राजकुमार, शैलेश ढोणे, अमोल महल्ले, अमित जोशी, निलेश पखाले, प्रकाश शेंडे, नरेंद्र इंगोले, अरुण गिरी, सुधाकर मेश्राम, भारत चिरडे, किरण खेडकर, सुधाकर कोकेवार, विशाल धलवार यांनी केली.
0
बीनागोंडात २५ वर्षांनी फडकला तिरंगा

गडचिरोली, दि. २९ – महाराष्ट्र – छत्तीसगडच्या सीमेवरील बीनाबोंडा गावात नक्षलवाद्यांची झुगारुन तब्बल २५ वर्षांनी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले. विशेष म्हणजे पोलिसांच्या या धाडसी पावलाला ग्रामस्थांनी साथ देत या ध्वजारोहण सोहळ्याला हजेरी लावली होती.
गडचिरोली जिल्ह्यातील बीनागोंडा हे गाव म्हणजे नक्षलवाद्यांचा बालेकिल्लाच. घनदाट जंगलात वसलेले हे गाव म्हणजे नो मेन्स लँड. नक्षलवाद्यांचा या गावात नेहमीच वावर असल्याने गावात नक्षलवाद्यांची दहशत असते. नक्षलवादी दहशतीच्या आधारे स्वातंत्र्य, प्रजासत्ताक हे सर्व खोटे असल्याचे स्थानिकांना सांगायचे. गेल्या २५ वर्षांत या गावात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला नाही. मात्र पोलिस आणि नक्षलवादविरोधी पथकाने यंदा अत्यंत नियोजनपूर्वक या भागात ध्वजारोहणाचा कार्यक्रम राबवण्याची तयारी सुरु केली. ग्रामस्थांना विश्वासात घेण्यात आले. याचे फळ म्हणजे यंदाच्या प्रजासत्ताक दिनी बीनागोंडातील आश्रमशाळेत पार पडलेला ध्वजारोहण सोहळा. आश्रमशाळेतील विद्यार्थी, ग्रामस्थ आणि कडेकोट पोलिस बंदोबस्त अशा वातावरणात उत्साहात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.











