
दिग्रस , दि. ३ – भरधाव बस बाभळीच्या झाडावर आदळल्याने झालेल्या अपघातात ११ प्रवासी जखमी झाल्याची घटना २ फेब्रुवारीच्या रात्री ११.३० वाजता दरम्यान हरसूल फाट्यानजीक घडली.
लातूर डेपोची बस एम.एच २०/ बिएल २९५३ नागपूरकडून परळीकडे जात असतांना दिग्रस तालुक्यातील हरसुल फाट्याजवळ अपघात झाला.प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार नागमोडी वळण असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात झाला. बसमधील ११ प्रवाशी जखमी झाले त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये सोमसिंग उमला पवार रा. सिंगद (४५), युनुस महमद गोंडील रा.दिग्रस (५५), विजय अंबादास इंगळे रा.पुसद, अ.रहेमान शे.इब्राहीम दिग्रस चाँदनगर (५५), सूरज सोपानराव दराडे रा. परळी वैजनाथ (३२), गणेश अविनाश तंवर रा.हिवळणी (३०), अमर देवराव वरारकर रा.पालम (३८), कोमल प्रताप चव्हाण रा.कळसा (४५), सुधाकर श्रीराम कांबळे रा.धुंदी उमरखेड (५४), राजेश क्रिष्णा राठोड रा.धुंदी (४३), उदल स्वरूपचंद पडवाळ रा. सेवानगर (४५) यांचा समावेश आहे. जखमींना उपचाराकरीता दिग्रस ग्रामिण रूग्णालय येथे उपचारासाठी आणण्यात आले होते प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचार करून डॉक्टरांनी त्यांची जिल्हा रूग्णालयात रवानगी केली. या प्रकरणी दिग्रस पोलीसांनी चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
Archive for February 3rd, 2015
0
भरधाव बस झाडावर आदळली, ११ प्रवासी जखमी
0
फेसबुकवर धार्मिक भावना भडकवणारे लिखाण, आर्णी कडकडीत बंद


आर्णी, दि. ३ – सोशल नेटवर्कवर धार्मिक भावना भडकवणारे लिखाण केल्याची घटना रात्री उघडकीस आल्यानंतर आर्णी कडकडीत बंद ठेवून या घटनेचा निषेध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांनी रास्तारोको करण्यासाठी नागपूर-तुळजापूर महामार्गावर टायर जाळले.
सागर रवींद्र आक्केवार (२३) रा.आर्णी मित्राच्या मोबाईलवर फेसबुक अकाऊंट ओपन केले असता ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सागर आक्केवार याने आर्णी पोलीसात तक्रार दिली. त्यावरून हसमेन आलम याच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. आज सकाळी या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण शहर कडकडीत बंद करण्यात आले. आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी निलेश गांवडे, अश्विन बोमंपिलेवार, प्रमोद कांगे, तुफान जाधव, भारत चांदेकर, उध्दव वानखडे, पवन येरावार, निलेश इंगोले यादी कार्यकर्ते उपस्थित होते. एसटी बस स्थानकासमोर टायर जाळून पाच मिनिट रास्ता रोको केला. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. आर्णी वासीयांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन ठाणेदार गायकवाड यांनी केले.
0
वाचन मेंदुची भुख भागविण्याचे काम करते – आ.मदन येरावार

तीन दिवसीय यवतमाळ ग्रंथोत्सवाचा समारोप
यवतमाळ, दि.3 : मराठी भाषेच्या माध्यमातून मराठी साहित्य दुरपर्यंत पोहोचले आहे. हे साहित्य संस्कृतीचे दर्शन घडविण्यासोबतच मानवाच्या मेंदुची भुख भागविण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन आ.मदन येरावार यांनी केले.
नगर भवन येथे आयोजित तीन दिवसीय यवतमाळ ग्रंथोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आर्णी येथील जेष्ठ साहित्यिक कवी प्रा.कलीम खान, जेष्ठ वऱ्हाडी कवी शंकर बडे, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, प्रा.डॉ.आशा देशमुख, कवी योगानंद टेंभुर्णे, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने उपस्थित होते. वाचनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे वाचकांना वाचनाची सवय लावण्यासोबतच त्यांना चांगले आणि दर्जेदार ग्रंथ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रंथ महोत्सवासारखे कार्यक्रम उपयोगी ठरणार आहे. ग्रंथ माणसाची दृष्टी व्यापक करते. मानवी मेंदुची भुख भागविण्यासोबतच ग्रंथ गुरुची भुमिका निभावत असते. त्यामुळे प्रत्येकाने ग्रंथ वाचनाची सवय लावावी, असे आ.येरावार यांनी सांगितले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना प्रा.कलीम खान यांनी ग्रंथ माणसाच्या जिवनातील आवश्यक बाब असल्याचे सांगितले. पुर्वी इलेक्ट्रानिक प्रसिध्दी माध्यमांचा भडीमार झाल्याने वर्तमानपत्र बंद होतील, अशी भाकीते केली जात होती. उलट वर्तमानपत्रे वाढीस लागली. त्याचप्रमाणे संगणकाच्या युगात कोणतीही माहिती तातडीने उपलब्ध होवू शकत असली तरी पुस्तकांचेही महत्व कधीही कमी होणारे नाही, असे कलीम खान म्हणाले. यावेळी शिक्षणाधिकारी वंजारी व कवी योगानंद टेंभुर्णे यांच्यासह अन्य मान्यवरांचीही भाषणे झाली. कार्यक्रमास कवी, साहित्यिक, लेखक, विद्यार्थी, शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांचा दिल्लीत गौरव

यवतमाळ, दि.3 : मागेल त्याला हक्काने काम देणा-या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांना केंद्र शासनाच्यावतीने गौरविण्यात आले. नरेगाचा दहावा वर्धापन दिन नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात साजरा करण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना अमरावती येथे केलेल्या कामासाठी त्यांच्या सहकाराऱ्यांसह पुरस्कार देऊन सन्मानित केल्या गेले.
केंद्रीय ग्रामविकास मंत्री बिरेंद्र सिंग, राज्यमंत्री सुदर्शन भगत, पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री रामकृपाल यादव, पंचायतराज राज्यमंत्री निहालचंद या केंद्रीय मंत्र्यांसह देशातील विविध राज्यातील व केंद्रशासित प्रदेशातील ग्रामविकास मंत्री, वरिष्ठ अधिकारी, सभापती, सरपंच, मनरेगामध्ये काम करणारे मजूर उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी राज्यातून 80 प्रतिनिधी सहभागी झाले होते. अमरावती जिल्ह्यातील आदिवासीबहूल चिखलदरा तालुक्यात जिल्हाधिकारी राहूल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांनी उत्तमप्रकारे मनरेगा योजना राबविली होती. त्यांच्या कल्पतेनेच हजारे आदिवासी बांधवांपर्यत योजना पोहोचविण्यासोबतच त्यांना योजनेचा लाभ घेता आला. अमरावती जिल्ह्यात सिचंन क्षेत्र कमी आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असते. हे थांबविण्याकरिता श्री.महिवाल यांनी अमरावती जिल्ह्यात त्रिस्तरीय योजना राबविली होती. गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधला. यामुळे मनरेगाच्या कामांना गती मिळाली. फलोत्पादन, जलसंधारण, वृक्षारोपण या माध्यमातून पाणी टंचाईवर मात करण्यात प्रयत्न केले. त्याचा परिणाम म्हणून अमरावती जिल्ह्याच्या गेल्या दोन वर्षात मानव विकास निर्देशांकही वाढला आहे. तसेच स्थलांतर मोठया प्रमाणात कमी झाले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी यांच्यासह योजनेच्या लाभाची रक्कम पारदर्शीपणे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणारे शाखा पोस्ट मास्टर गोकुल शंकर अलोकार यांनाही केंद्रीय सन्मानित करण्यात आले. जिल्हाधिकारी महिवाल यांच्या कौतूक होत आहे.
0
पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त

नवी दिल्ली दि. ३ – पेट्रोल आणि डिझेलचे दर आणखी कमी झाले आहेत. पेट्रोल प्रतिलिटर २.४२ रुपये आणि डिझेल २.२५ रुपयांनी स्वस्त झालं आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होतील. पेट्रोल, डिझेलचे दर कमी झाल्याचा फायदा सत्ताधारी भाजपला दिल्ली विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो, असं बोललं जातंय.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ४५ अमेरिकी डॉलरने घसरलेत. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखी कपात होईल, असा अंदाज आधीच लावण्यात आला होता. गेल्या जूनपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात घसरण सुरूच आहे.
0
अरुण गवळीच्या भेटीमुळे अर्जुन रामपालला समन्स

मुंबइ, दि. ३ – परवानगीशिवाय अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी याची भेट घेतल्यामुळे अभिनेता अर्जुन रामपाल अडचणीत सापडला असून याप्रकरणी पोलिसांनी त्याला समन्स बजावला आहे. एका चित्रपटात अरूण गवीची भूमिका करणा-या अर्जुनने मागच्या महिन्यात जे. जे. रुग्णालयात गवळीची भेट घेतली होती. सुमारे तासभर तो गवळीसोबत होता. मात्र या भेटीसाठी त्याने पोलिसांकडून परवानगी घेतली नव्हती.
नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खूनप्रकरणी गवळीला जन्मठेपेची शिक्षा झाली असून रुटीन चेकअपसाठी त्याला जे. जे. रुग्णालयात नेण्यात आले होते, तेवहा अर्जुन रामपालने त्याची भेट घेतली. दरम्यान गवळीला रुग्णालयात घेऊन जाणा-या पोलिस पथकाचीही अतंर्गत चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
0
बाटलीबंद पाण्यामुळे कॅन्सरचा धोका

मुंबई दि. ३ – तुम्ही ‘मिनरल वॉटर’ पीत असाल तर सावधान! कारण जे पाणी तुम्ही ‘आरोग्यवर्धक’ समजता, त्याच पाण्यामुळे तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो, अशी धक्कादायक माहिती ‘भाभा रिसर्च सेंटर’ने नुकत्याच केलेल्या संशोधनातून समोर आली आहे.
परिणामी हे पाणी ‘पाणी न ठरता विष’ ठरणार असल्याने या पाण्यावर बंदी आणावी, अशी मागणी मुंबई महापालिकेतील नगरसेवकांनी केली आहे. मुंबईकरांसह सर्वानाच आता या पाण्याची सवय लागल्याने १० ते १५ रुपये अशा चढय़ा दरात हे पाणी विकले जात आहे. हे पाणी बाटलीबंद करून विकले जात असल्याने या पाण्यात प्लास्टिकमधील ब्रोनेट, क्लोराइड इत्यादी रसायनांचा अंश असतो.
या रसायनांमुळे कॅन्सरसारखा आजार उद्भवू शकतो. याशिवाय किडनीवरही विपरीत परिणाम होण्याची शक्यता ‘भाभा रिसर्च सेंटर’ने केलेल्या संशोधनातून समोर आली आहे. त्यामुळे या पाण्यावर बंदी आणावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक परमिंदर भमरा यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे.
दरम्यान, बाटलीबंद पाणी प्यायल्यानंतर या बाटल्या कुठेही फेकल्या जातात. प्लास्टिक नष्ट होत नसल्यामुळे घातक कचरा तयार होतो. प्लास्टिकच्या बाटल्या नष्ट होण्यास ७०० वर्षापेक्षाही अधिक काळ लागत असल्याचेही ‘भाभा रिसर्च सेंटर’च्या संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे.
त्यामुळे बाटलीबंद पाण्याच्या विक्रीवर मुंबईत कडक निर्बंध घालावेत, अशी मागणी परमिंदर भमरा यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे महापौरांकडे केली आहे. याबाबत राज्य सरकारकडूनही योग्य ती कार्यवाही व्हावी, यासाठी महापालिकेच्या वतीने प्रयत्न केला जावा, असे त्यांनी म्हटले आहे.
बाटलीबंद पाणी महिलांसाठी अतिशय घातक!
बाटलीबंद पाणी महिलांसाठी सर्वाधिक धोकादायक आहे. गर्भाशयाजवळ होणारी फायब्रॉईडची गाठ अशाच पाण्याच्या सेवनामुळे होत असल्याचे स्त्रीरोगतज्ज्ञांचे मत आहे. ८० ते ९० टक्के महिला फायब्रॉईडच्या गाठीमुळे त्रस्त असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.









