
सांगली- महाराष्ट्राला आबा म्हणून परिचित असलेले आणि सर्वसामान्यांचा नेता अशी ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांना मंगळवारी शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. अंजनी येथील हेलिपॅड मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुपारी दोनच्या सुमारास रोहित, स्मिता आणि सुप्रिया या त्यांच्या तीन मुलांनी आर. आर. पाटील यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. आबांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते, नागरीकांची मोठी गर्दी उसळली होती.
आबांच्या अंत्यविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री एकनाथ खडसे, नारायण राणे आदी नेतेमंडळी उपस्थित होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेही याप्रसंगी उपस्थित होते. यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. हजारोंचा जनसमुदाय आपल्या लाडक्या नेताला निरोप देण्यासाठी हेलिपॅड मैदानावर लोटला होता. यावेळी सर्वांनाच आपले अश्रू अनावर झाले होते.
मंगळवारी सकाळी आर. आर. पाटील यांचे पार्थिव मुंबईहून तासगाव येथे आणण्यात आले. तासगावमधील बेलवंडी नाक्यापासून अंजनी पर्यंत निघालेल्या अंत्ययात्रेमध्ये हजारो नागरीक सहभागी झाले होते. अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते, नागरीकांना आपले अश्रू अनावर झाले होते.
मागच्या तीन महिन्यांपासून कर्करोगाने ग्रस्त असलेल्या आर. आर. पाटील यांचे सोमवारी दुपारी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. आर. आर. पाटील यांच्या निधनाच्या बातमीने राजकीय क्षेत्रासह सर्वसामान्य जनताही हळहळली. त्यांचे असे अचानक निघून जाणे सर्वांनाच चटका लावून गेले.
आर. आर. पाटील हे सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेले लोकप्रिय लोकनेते होते. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी स्वकर्तुत्वावर लोकनेतेपदापर्यंतचा प्रवास केला. गावांमध्ये जनहिताच्या योजना राबवून सांगली जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणावर स्वत:चा एक वेगळा ठसा उमटवला.
Archive for February 17th, 2015
0
आबांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
0
भारतीय वंशाच्या उद्योजकाची हत्या

न्यूजर्सी – अमेरिकेत भारतीयांवरील हल्ल्यांची मालिका सुरूच असून आता एका तरुण उद्योजकाला लक्ष्य करण्यात आले आहे. भारतीय वंशाचे २८ वर्षीय व्यावसायिक अमित पटेल यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेनंतर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांमध्ये एकच दहशत पसरली आहे.
काही दिवसांपूर्वीच अलबामा येथे सुरेशभाई पटेल या वृद्ध व्यक्तीला पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीने हादरलेल्या पटेल यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच काल रविवारी अमित पटेल या व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
न्यूजर्सीमध्ये अमित यांचा वाइन शॉप असून या शॉपमध्ये ते बसले असतानाच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा अमित हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते. गंभीररीत्या जखमी झालेल्या अमित यांचा रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे अमित यांचे वडिल या हल्ल्यावेळी वाइन शॉपच्या मागील बाजूस असलेल्या ऑफिसमध्ये होते. त्यांनाही काही वेळानंतर हल्ल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या तपासात अमितवर जवळून गोळ्या झाडण्यात आल्याचे स्पष्ट होत असून हा हल्ला दरोड्याच्या उद्देशाने करण्यात आला की अन्य काही कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. दरम्यान, अमित यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या मृत्यूने पटेल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
0
बस दरीत कोसळून १० ठार

धार (मध्य प्रदेश) – इंदूरहून राजस्थानमधील गलियाकोट येथे जात असलेली एका खासगी ट्रॅव्हल कंपनीची बस धार जिल्ह्यात मछलिया घाटी येथे दरीत कोसळली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. काल (सोमवारी) रात्री झालेल्या या अपघातात १० ठार आणि ४० जण जखमी झाले. जखमींना तातडीने झाबुआ जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बसमध्ये चालक (ड्रायव्हर) आणि वाहक (कंडक्टर) यांच्यासह ६० जण होते. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
0
मनिष ढाले यांची विदर्भ महासचिव पदावर नियुक्ती

यवतमाळ – लोक जनशक्ती पार्टी या पक्षाची बैठक रामविलास पासवान (केंद्रीय मंत्री अन्न व नागरी पुरवठा) यांच्या उपस्थितीमध्ये नागपूर येथे संपन्न झाली. त्यामध्ये मनिष ढाले यांची विदर्भ महासचिव (युवा) तथा जिल्हा प्रभारी या पदावर नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे श्रेय खासदार चिराग पासवान, सराफ राष्ट्रीय अध्यक्ष शमीम हवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लोकजन शक्ती पार्टी व प्रामुख्याने मोहन अनमोलु महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवा या सर्वाना देतात.











