
बेळगाव, दि. ७ – महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने करण्यात आल्याने ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला गोंधळाचे गालबोट लागले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन पार पडले. त्यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव, निपाणी कारवारसह संयुक्त महाराष्ट्र व्हायलाच पाहिजे अशा घोषणा दिल्याने काही काळ गोंधळाच वातावरण निर्माण झाले. त्यामुळे संमेलनाचे अध्यक्ष मोहन जोंशीनी व्यासपीठावरून खाली उतरून कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला खरा, मात्र तोपर्यंत उद्घाटन सोहळ्याला गालबोट लागलेच
‘ज्ञानपीठ’ पुरस्कार मिळाल्याबद्दल यावेळी शरद पवार यांनी भालचंद्र नेमाडेंचे अभिनंदन केले. प्रांतवादानंतरही बेळगावच्या जनतेची मराठीशी नाळ जुळलेली आहे, असेही ते म्हणाले.
Archive for February 7th, 2015
0
नाटय संमेलनाच्या उद्घाटनाला गोंधळाचे गालबोट
0
दिल्लीत पाच वाजेपर्यंत ६३ टक्के मतदान

नवी दिल्ली – नव्या सरकारच्या निवडीसाठी दिल्लीमध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला दिल्लीकर उस्फूर्त प्रतिसाद देत आहेत. मतदानासाठी विविध मतदान केंद्राबाहेर नागरीकांच्या रांगा लागल्याचे चित्र आहे.
संध्याकाळी पाचवाजेपर्यंत सरासरी ६३.४६ टक्के मतदान झाले आहे. आतापर्यंत सहा मतदान यंत्रे बदलण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली. उत्तर पूर्व दिल्लीमध्ये सर्वाधिक ६६.३७ टक्के मतदान झाले असून, दक्षिण दिल्लीत त्या तुलनेने कमी ६१.७ टक्के मतदान झाले आहे.
सकाळी आठ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे. सकाळीच दिल्लीतील राजकीय नेत्यांनी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी, आम आदमी पक्षाचे उमेदवार अरविंद केजरीवाल यांनी सकाळी लवकर मतदानाचे कर्तव्य बजावले. तसेच मोठ्या संख्येने नागरिकांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे असे आवाहनही केले.
नेत्यांचे मतदान
दिल्लीतील विधानसभेच्या ७० जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी एकूण ६७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्व उमेदवारांचे भवितव्य आज दिल्लीकर मतदानाद्वारे ठरवणार आहेत. उत्तर दिल्लीतील बुरारी मतदारसंघातून सर्वाधिक १८ उमेदवार निवडणुकीसाठी उभे आहेत तर दक्षिण दिल्लीतील आंबेडकर नगर मतदारसंघातून सर्वात कमी चार उमेदवार रिंगणात आहेत.
राज्यभरात एकूण १२ हजार मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी ७१४ संवेदनशील मतदान केंद्रे असून त्यामधील १९१ ही अतिसंवेदनशील मतदानकेंद्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
दिल्लीतील १.३३ कोटी मतदारांना आज मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यामध्ये ७३ लाख ८९ हजार ०८९ पुरुष मतदार तर ५९ लाख १९ हजार १२७ महिला मतदार आहेत. यासोबतच ८६२ तृतीयपंथी मतदार आहेत. १८ ते १९ या वयोगटातील मतदारांची संख्या दोन लाख २७ हजार ३१६ इतकी आहे. तर ३११ मतदार हे १००हून अधिक वयाचे आहेत. दिल्लीतील मातिया महाल मतदारसंघात सर्वाधिक तीन लाख ४७ हजार २४५ मतदार आहेत. तर चांदनी चौक येथे एक लाख १३ हजार ७७७ मतदार आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात चहावाला
संपूर्ण मतदाप्रक्रियेदरम्यान कोणतीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ६५ हजार पोलीस कर्मचा-यांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. तर मतदान सुरळीत पार पडावे यासाठी निवडणूक आयोगाने ९५ हजार निवडणूक अधिका-यांना कामाला लावले आहे.
१६ वर्षे दिल्लीतील सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपासमोर यंदाच्या निवडणुकीत आपचे भलेमोठे आव्हान आहे. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी चळवळीतील सदस्य राहिलेल्या किरण बेदी यांना भाजपाने मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरवले आहे. त्यामुळे केजरीवाल विरुद्ध बेदी असे दिल्लीतील निवडणुकीचे चित्र आहे.
0
बस-अॅटोमध्ये अपघात; ४ जण गंभीर

कळंब, दि. ७ – भरधाव अॅटो बसमध्ये घुसल्याने झालेल्या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज सायंकाळी ७.३० वाजता दरम्यान राळेगाव मार्गावर असलेल्या जिनिंगनजीक घडली.
सय्यद तनवीर खान (२५) रा. कात्री, दिनेश खंडाते (२०),बंटी अशोक तलमले(२५), विलास रमेश तेवतळे (२२) रा. कळंब अशी गंभीर जखमींची नावे आहे. यवतमाळमार्गे बस राळेगावकडे जात असताना अॅटोक्रमांक एम.एच. २९ व्ही/ ९५५८ बस क्रमांक एम.एच. ४० एन/ ८१७५ मध्ये शिरला. अॅटो चालक सय्यद तनवीर खान याने बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सदर अपघात झाला. जखमींना तत्काळ यवतमाळ येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
0
आयकरकडून दुसºया दिवशीही पुसदमध्ये सर्च


यवतमाळ, दि. ७ – पुसद शहरात आज दुसºया दिवशीही यवतमाळ व वर्धा येथील पथकाने सर्च मोहीम राबविली. यामध्ये ग्यानचंदाणी यांच्या दोन दुकानातून संशयास्पद असलेले कागदपत्र जप्त केले आहे. याकारवाईमुळे व्यापाºयांचे धाबे दणाणले आहे.
नागपूर उपआयुक्ताच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ व वर्धा येथील पंधरा अधिकारी व कर्मचाºयांचा फौजफाटा गुरुवारपासून पुसद शहरातील दाखल झाला होता. त्यांनी पुसद येथील सुभाष चौक येथील ओंकार कलेक्शनचे रवि ग्यानचंदाणी आणि डॉ. आंबेडकर चौकातील वंदना ड्रेसेसचे विजय ग्यानवचंदाणी यांच्याकडे सर्च करून बिले, कागदपत्राची तपासणी केली. पुसद येथील सुभाष चौक येथील ओंकार कलेक्शनचे रवि ग्यानचंदाणी आणि डॉ. आंबेडकर चौकातील वंदना ड्रेसेसचे विजय ग्यानवचंदाणी यांच्याकडे सर्च करून बिले, कागदपत्राची तपासणी केली. आज तीसºया दिवशीही या पथकाकडून सर्च मोहीम सुरूच होती. यामध्ये या दुकानातून संशयास्पद असलेले कागदपत्रे, बिल व अन्य साहित्य जप्त करून चौकशीसाठी नेले आहे. सायंकाळी हे पथक पुसद येथून परत गेल्यानंतर येथील व्यावसायीकांनी सुटकेचा श्वास सोडला.
पार्डी सावळापूर येथील स्वयंसहायता समूहांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल
कळंब- तालुक्यातील पार्डी (सावळापूर) येथील १५ महिला स्वयंसहायता सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोठा तर्फे बँक कर्ज मंजुरी. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती कळंब व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोठा यांच्या संयुक्त विद्यमानाने कोठा क्लस्टर मधील पार्डी (सावळापूर) या गावातील १५ स्वयंसहायता समूहांना १२ लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. महिलांना दिल्या गेलेल्या या कर्जामुळे त्यांची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरु झालेली आहे, गावातील महिलांना आता गावातच रोजगार व उद्योगधंदे निर्माण करता येणार आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिलांनी आपल्या संसाराचा गाडा सुरळीतपणे हाकण्यासाठीचा यशस्वी प्रयन्त सुरु केलेला आहे. या अगोदर स्वयंसहायता समूहाला कर्ज मिळविण्यात खूप कष्ट सहन करावे लागत होते, परंतु आता महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती कळंब येथील तालुका व्यवस्थापक उमेश शिंदे यांनी कर्जाचा योग्य विनियोग याबाबतचे शिबीर घेऊन त्यांना सक्षम करण्याचे चांगले काम केलेले आहे तसेच त्यांनी बँक व्यवस्थापक गोखले व वडनेरकर यांना वेळोवेळी समूहाच्या बैठकीला बोलावून महिलांच्या समूहातील कार्यप्रणालीची माहिती दिली त्यामुळे त्यांनी पार्डी येथील १५ स्वयंसहायता समूहांना १२ लाख रुपयाचे कर्ज मंजूर केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान पंचायत समिती कळंब व सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा कोठा यांच्या संयुक्त विद्यमानाने कोठा क्लस्टर मधील पार्डी (सावळापूर) या गावातील पंधरा स्वयंसहायता समूहांना बँक मेळावा घेऊन कर्जाचे वितरण करण्यात आले. मेळाव्याला अमोल देवलसी जिल्हा अभियान व्यवस्थापक, भूपेंद्र बाहेकर विस्तार अधिकारी व स्वयंसहायता समूहाच्या १५० महिला उपस्थित होत्या. या मेळाव्यासाठी उमेश शिंदे तालुका व्यवस्थापक, प्रतिभा बावनकर तालुका व्यवस्थापक, श्रीनिवास एसमपेल्ली पीआरपी, अर्चना भोयर, प्रीती कांबळे, लताताई गावंडे यांनी अभियानातर्फे व गोखले ,वडनेरकर यांनी बॅंकेतर्फे परिश्रम घेतले.
0
अश्रृंना जर पंख जरासे लावून घेता आले असते….!

यवतमाळ – ग्रंथोत्सवाच्या आमराईत गेल्या गेल्या पाडाचा आंबा अलगद समोर पडावा अन् त्या आनंदानं हिरकलेल्या वाचकांचं रसिकत्व कंच्च मोहरून यावं अगदी तसीचं यवतमाळकरांच्या कायम आठवणीत रहावी अशी भेट ग्रंथोत्सवातील काव्योत्सवात चिंब भिजलेल्या शब्दांनी रसिकांना दिली.
वऱ्हाडी साहित्याचे भूषण कविवर्य शंकर बडे यांच्या नर्मविनोदी निवेदनाने रंगात आलेल्या आणि वऱ्हाडी साहित्याचे हेडमास्तर डॉ.विठ्ठल वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या कवितेच्या दरबारात दोन पिढ्यांची कहानी सांगणारा हृदयस्पर्शी कवितांचा पाझर ओसंडून वाहिला. आयुष्यातील तरल नात्यांची मांडामांड करणाऱ्या शब्दांची मुक्त उधळण झाली. ‘माय’, ‘बाप’, ‘मुलगी’, ‘गुरुजी’, असे नात्यांचे पदरांना स्पर्श करीत जीवनातील वास्तवाचा वेध घेणाऱ्या उबदार रचनांनी श्रोत्यांना अक्षरश: रिझवले. गजल, लावणी, विडंबन उपरोधाच्या श्रृंगाराने भारलेली काव्य मैफल अस्सल वऱ्हाडी मातीच्या सुगंधाचे वाण देणारी ठरली.
आभाय भलतं जोरात होतं
जल्माची माही तहान होती
कालचा दिसं कुवारा होता
कालची रातं जवान होती
तरुणाईच्या काळजाला हात घालणाऱ्या डॉ.विठ्ठल वाघ यांच्या या तारुण्यसुलभ अदाकारीने घायाळ प्रेक्षकांना शंकर बढेंच्या कारुण्याने ओथंबलेल्या ‘माय’ कवितेने भानावर आणले. डोळ्यात अश्रूंची गर्दी खेचणारी त्यांची ‘माय’ सर्वांनाच चटका लावून गेली. काळजात घर करून गेली-माय कायजात वस्ती करून माय असते कासरे धरून येसन कवा खेचली नाही पुराणी कवा टोचली नाही
तिचं तंतर तिचं जाणे
डोयात तिच्या आभायाचे गाणे !
‘माय’ ची थोरवीचे आभाय रिते होत असताना अश्रूंचे ओघळ पुसणारी गजल चांदूर बाजार येथील कवि नितिन देशमुख यांनी सादर केली. जगण्याचे वास्तव चिमटीत पकडणारे त्यांचे शब्द हृदयाला पाझर फोडणारे ठरले.
अश्रृंना जर पंख जरासे लावून घेता आले असते
या डोळ्यातून त्या डोळ्यांना झरकन देता आले असते
मराठी गजलेतील नव्या पिढीचा श्वास असणाऱ्या नितिन देशमुखांनी माणुसकीला उंचीवर नेणाऱ्या रचनांची
बरसात केली. अश्रूंची फुले होत असतांना प्र.के.अत्रेच्या ‘झेंडूच्या फुलांची’ खमंग मेजवानी देणारा प्रत्यय माजलगांव (जि.बिड) चे दमदार कवी प्रभाकर साळेगावकर यांनी दिला. त्यांच्या विडंबन काव्याने राजकारणाचा ‘असली’ चेहरा चव्हाट्यावर मांडला. पिंजलेल्या जनतेच्या दु:खाची ‘गोम’ सांगणारे त्यांचे घडी-घडी सवईनं तुम्हा दिली महागाई
भरतीचा उघडला पिंजरा पोरापायी असेचं वाढो प्रेम आपुले, सुखात नांदो दलाल आम्हावर श्रेष्ठींची मर्जी बहाल!
आपल्या कवितेतून त्यांनी उपहासगर्भ चिंतन अचुकपणे प्रस्तुत केलं. तर ‘वाटोळा’ या शब्दाचा अर्थ
शाळेत शिकता आला असता तर ? हा मार्मिक प्रश्न नागठाणे (जि.सांगली) येथून आलेले कवी रमजान
मुल्ला यांनी उपस्थित केला.
लहाणपणी गुरुजी शिकवायचे
एवढा मोठा भोपळा आकाराने वाटोळा
पैकी शिकविला नाही कधीचं गुरुजींनी
‘वाटोळा’ या शब्दाचा अन्वयार्थ !
रमजान मुल्ला यांनी पुढे शब्दांना सुरांचा बाज चढवित मैफलीत अनोखा रंग भरला. त्यांनी सादर केलेली ‘आई’, ‘मुलगी’ भावस्पर्शी नात्यांची वीण गुंफणारी होती. कवितेच्या खोलात जाऊन प्रभाकर साळेगावकरांनी परत शोषणाचा संदर्भ उलगडला.
‘मुळं भूगर्भातील रसाचं शोषण करतात
आपल्यातल्या शोषण या शब्दांचे संदर्भ बदलू
कारण त्यांना आभाळाला पाझर फोडायचा असतो
व मातीशी इमान राखायचं असतं
वऱ्हाडी मातीची महत्ती सांगणाऱ्या कसदार कवितांनी काव्य मैफलीला आगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. रसिकांच्या काळजात घर बांधणाऱ्या या मैफलीच्या निमित्ताने मात्र मिराताई ठाकरे यांच्या शब्दांची आठवण पुन्हा एकदा टवटवीत झाली असा वऱ्हाडी वऱ्हाडी वऱ्हाडी माणूस इया, कुदय, पावडं त्यांच्या जिन्गानीचा साज हेडमास्तर ‘वाघ’ आणि ‘मास्टर’ बढे यांची शाब्दीक जुगल बंदीचे दुधात साखर घालणारी होती. मातीशी इमान राखणारी ही काव्यमैफल कविवर्य शंकर बढे यांच्या संचलनाच्या तडक्याने विशेष उल्लेखनीय ठरली. यवतमाळ ग्रंथोत्सतव आयोजन समितीच्या परिश्रमाने कवि संमेलनाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. उपस्थितांचे आभार ज्येष्ठ कवी योगानंद टेंभुर्णे यांनी मानले.
0
जलयुक्त शिवार योजनेत इतर विभागांचाही सहभाग महत्वाचा – संजय राठोड

यवतमाळ – जिल्ह्यातील 372 गावांमध्ये जलयुक्त शिवार योजना राबविण्यात येत आहे. ही सर्व गावे विकासाच्या बाबतीत परिपुर्ण करण्याच्या दृष्टीने कामे करावयाची आहे. त्यामुळे या योजनेशी संबंधीत यंत्रणेसोबतच विविध विभागांनीही या गावांमध्ये विकासाची कामे राबवून आपला सहभाग देणे आवश्यक आहे. त्यासाठी या विभागांनी विकासाचा आराखडा तयार करावा, अशा सुचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या.
पालकमंत्र्यांनी दारव्हा तालुक्यातील विविध विकास कामे, जलयुक्त शिवार योजना व तालुक्यातील तलाठी कार्यालयाचा बांधकामाचा आढावा दारव्हा येथील बचत भवन येथे आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. बैठकीस जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जिल्हा परिषद सदस्य पंढरी सिंहे, संगिता इंगोले, पंचायत समिती सभापती उज्वला बनसोड, उपसभापती प्रा.सुषमा गावंडे, सदस्य चरण पवार, जयश्री मिराशे, उपविभागीय अधिकारी मनोहर कडू, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड उपस्थित होते.जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत निवडण्यात आलेल्या गावांमध्ये जलसंधारण, पाणलोटची कामे करून या गावांमधील पाणी टंचाई कायमस्वरूपी निकाली काढायची आहे. त्यादृष्टीने संबंधीत यंत्रणा काम करीत आहे. परंतु येवढयावरच न थांबता ही गावे विकासाच्या दृष्टीने परिपुर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे या गावांमध्ये पाणन रस्ते, पक्के रस्ते, इमारत बांधकाम, रुक्ष लागवड, विजेच्या समस्या, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा यासह विविध प्रकारची कामेही करावयाची आहे. त्यामुळे निवडण्यात आलेल्या गावांमध्ये विकास कामे करण्यासाठी प्रत्येक विभागाने आठ दिवसात विकास आराखडा सादर करावा व कामे करावी, असे पालकमंत्र्यानी सांगितले. या कामांसाठी विभागाअंतर्गत असलेला विधीचा उपयोग करावा. निधी उपलब्ध नसल्यास मागणी करावी, असेही त्यांनी सांगितले. गावांमध्ये विकासाची कामे करत असतांना गावकऱ्यांना विश्वासात घ्या. जलशिवार योजनेअंतर्गत कामांचे मुल्यमापण होणार असल्याने काळजीपुर्वक कामे केले जावे, असेही त्यांनी सुचविले. जिल्ह्यातील या योजनेतील गावे राज्यासाठी मार्गदर्शक ठरतील अशा पध्दतीने गावांमध्ये कामे करण्याच्या सुचना त्यांनी केल्या. या योजनेअंतर्गत दारव्हा तालुक्यातील 46 गावांमध्ये कामे केली जात असून यावेळी या सर्व गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक उपस्थित होते. या सर्व गावातील विकास आराखडे करण्याच्या सुचना त्यांनी संबंधीत सरपंचासह विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी तालुक्यातील तलाठी कार्यालयाच्या बांधकामाचा आढावाही त्यांनी घेतला. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी उपस्थित 46 गावाचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक यांना मार्गदर्शन केले.
0
बेदींविरोधात ‘आप’ची निवडणूक आयोगाकडे तक्रार
नवी दिल्ली – आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप करत आम आदमी पक्षाने भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवार किरण बेदी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
किरण बेदी यांनी कृष्णनगर मतदारसंघातून शंभरहून अधिक कार्यकर्त्यांसह पदयात्रा आणि बाईक रॅली काढली. यावेळी अनेक मतदारांची त्यांनी भेट घेतली. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याने बेदींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ‘आप’ने केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानासाठी दिल्लीकरांचा मोठा प्रतिसाद दिसून येत असून मतदानकेंद्राबाहेर मतदानासाठी नागरिकांनी मोठमोठ्या रांगा लावल्या आहेत.
0
दिल्ली विधानसभेसाठी मतदान सुरू

नवी दिल्ली, दि. ७ – दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदानास सुरूवात झाली असून दिल्लीकर मोठ्या उत्साहाने मतदानास बाहेर पडत आहेत. मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब राग लागलेल्या दिसत असून ९ वाजेपर्यंत ५.६४टक्के मतदान झाले आहे.
सकाळी ८ वाजता मतदानास सुरूवात झाली असून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत नागरिकांना मतदान करता येईल. १० फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन अखेर निकाल लागेल. काँग्रेस , आम आदमी पक्ष आणि भाजपामध्ये मुख्य लढत दिसत आहे. मतदान सुरळीत पार पडावे यासाठी तब्बल ५५ हजार पोलिस व निमलष्करी दलाचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
दिल्लीतील १ कोटी ३३ लाख मतदार विधानसभेच्या ७० उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद करणार आहेत. भाजपा, काँग्रेस, आम आदमी पक्ष व अन्य पक्षांचे मिळून ६७३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १२ हजार ७७७ मतदान केंद्रावर मतदान पार पडणार असून ७१४ मतदाने केंद्र संवेदनशील व १९१ मतदान केंद्र अतिसंवदेनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, आप प्रमुख अरविंद केजरीवाल, भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदींसह अनेक दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला.
0
ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे कालवश

पुणे, दि. ७ – ज्येष्ठ अभिनेते आणि नाट्यसंमेलनाचे माजी अध्यक्ष आत्माराम भेंडे यांचे शनिवारी निधन झाले. ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे आज बेळगावमध्ये उद्घाटन होत असतानाच भेंडे यांच्या निधनाचे वृत्त आल्याने संमेलनावर दु:खाची छाया पसरली असून त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ९३ वर्षीय आत्माराम भेंडे यांनी पुण्यातील रत्ना रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
सहा दशकांहून अधिक काळ अभिनयाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या आत्माराम भेंडे यांनी इंडियन नॅशनल थिएटरमधून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली. अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता अशा तिन्ही भूमिका सांभाळताना त्यांनी हिंदी व इंग्रजी रंगभूमीवरही कामाचा ठसा उमटवला. झोपी गेलेला जागा झाला, तरूण तुर्क म्हातारे अर्क, पिलूचं लग्न, दिनूच्या सासूबाई राधाबाई, पळा पळा कोण पुढे पळे, तुज आहे तुजपाशी, मन पाखरू पाखरू, प्रीती परी तुजवरी अशी अनेक नाटकं गाजली.
जाहिरात व चित्रपटांमध्येही त्यांनी अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. लगे रहो मुन्नाभाई या चित्रपटातील भूमिकाही खूप गाजली.
0
यवतमाळचे जांबुवंतराव, सांगोल्याचे गणपतराव

पन्नास वर्षापूर्वी तमाम विदर्भात या घोषणा घुमत होत्या. त्यावेळी आधुनिक साधने नव्हती. वृत्तपत्रांचे स्वरूप आजच्या एवढे रेखीव नव्हते. आजच्यासारखे ‘डिजिटल युग’ नव्हते. नेत्याकडे जे भांडवल होते, ते म्हणजे तो स्वत: नेता, त्याच्या नेतृत्वाबद्दलचा विश्वास आणि त्या नेत्याची गरिबांबद्दल असलेली तळमळ..
यवतमाळचे जांबुवंतराव
‘वारे शेर आया शेर..’
पन्नास वर्षापूर्वी तमाम विदर्भात या घोषणा घुमत होत्या. त्यावेळी आधुनिक साधने नव्हती. वृत्तपत्रांचे स्वरूप आजच्या एवढे रेखीव नव्हते. आजच्यासारखे ‘डिजिटल युग’ नव्हते. नेत्याकडे जे भांडवल होते, ते म्हणजे तो स्वत: नेता, त्याच्या नेतृत्वाबद्दलचा विश्वास आणि त्या नेत्याची गरिबांबद्दल असलेली तळमळ.. आज जांबुवंतराव धोटे फारसे प्रकाशात नाहीत. पण नेतृत्वाची, जनतेच्या विश्वासाची ही सगळी लक्षणे ज्याला लागू पडतील, असा किमान सलग तीस वर्षे लोकांमध्ये टिकून राहिलेला, लोकांनी डोक्यावर घेतलेला आणि स्वत:करिता काहीही न मिळवणारा म्हणजे जांबुवंतरावभाऊ.
१९६२, ६७ या दोन टर्मची ही दहा वर्षे विधानसभा गाजवलेले भाऊ १९७१च्या लोकसभा पोटनिवडणुकीत नागपूरमधून खासदार म्हणून निवडून आले. मग १९८४ पर्यंत ते खासदार होते. ते आमदार किती वेळा होते आणि खासदार किती वेळा होते, यापेक्षा सुद्धा हे जे जांबुवंतराव होते, ते सगळ्यांपेक्षा वेगळे होते. आज जांबुवंतरावांची आठवण येण्याचे कारण त्यांचाच अचानक फोन आला. किती तरी दिवसांनी ‘मी जांबू धोटे बोलतोय. मधुकर तू कसा आहेस?’ भाऊंनी विचारले. मी म्हटलं, ‘भाऊ, आठवण कशी केली?’ त्यांनी आणखी एक धक्का दिला. ते म्हणाले, ‘अरे, आज आचार्य अत्रेसाहेब आणि तुझी एकदम आठवण आली..’ मी म्हणालो, ‘भाऊ, कुठे अत्रेसाहेब आणि कुठे चिल्लर मी.’ एकदम मनात गलबल झाली. आणि मग जांबुवंतरावांची अनेक रूपे समोर आली. एकेकाळी महाराष्ट्राची विधानसभा आणि नागपूरमधले लोखंडी पुलाखालचे सगळे नागपूर, गदगदा हलवणारे जांबुवंतराव म्हणजे खरे हनुमानच होते. हनुमंताने पर्वत हातावर उचलून आणला. भाऊंनी एकटय़ाच्या ताकदीवर कोणालाही करता येणार नाही, एवढी प्रचंड आंदोलने डोंगरासारखी हातावर उचलून आणली आणि यशस्वी करून दाखवली. साधने नव्हती, वृत्तपत्रे नव्हती, फोन नव्हते, ना टीव्ही होते, ना मोबाईल होते, ना गाठीला पैसा होता. होती फक्त जिद्द, बजरंगबलीची ताकद आणि लोकांचा विश्वास. आदल्या दिवशी भाऊंनी लोकांना चार जिल्हय़ात चिठ्ठय़ा पाठवाव्यात.. ‘उद्या विधानसभेवर लाखाचा मोर्चा आहे,’ आणि दुस-या दिवशी लाख माणसे मोजून घ्यावीत. चोवीस तासाच्या निरोपावर लाख माणसे त्यांच्याकरिता धावत होती. ना गाड्या-घोडे, ना टॅम्पो, ना खिचडी, ना पैसे. चिटणीस पार्क असो, वा कस्तुरचंद पार्क असो, तिथून निघालेल्या लाखालाखाच्या मोर्चात शेवटपर्यंत चालणारा हा एकमेव नेता होता. नाही तर पुढारी काय करतात, मोर्चा विधान भवनजवळ अडवला गेला की गाडीने येतात, भाषण करतात. गाडीने निघून जातात. भाऊंजवळ ना गाडी, ना घोडा. एसटीने जाणार, एसटीने येणार. हातावर भाकरी खाणार. लांब सोगा असलेले स्वच्छ धोतर, ते स्वत: धुणार. त्यावर तेवढाच स्वच्छ कुर्ता, हातात कडं, केसाची जटा. वाढलेली दाढी आणि त्यांचा तो अन्यायाविरुद्ध संतप्त झालेला चेहरा. कोणत्याही अन्यायाला ठेचून काढू की त्याचा जबडा फाडू अशा आवेशात त्यांचे वावरणे आणि अशी त्यांची भाषणे. एकवेळ निखारा हातात धरता येईल. पण भाऊंचा अन्यायाविरुद्धचा संताप शांत करणे कठीण. धगधगत्या निखा-यापेक्षा अन्यायाविरुद्ध त्यांची चीड जास्त प्रखर. त्यांनी कधी कोणाशी तडजोड केली नाही. कोणाकडे लाचारीने कधी उभे राहिले नाहीत. ना पैसा मिळवण्याच्या मागे लागले. ‘लोकांचा, लोकांसाठी असलेला नेता’ म्हणजे जांबुवंतराव. ते कोणत्या पक्षाचे आहेत, हे महत्त्वाचे नव्हते. पक्ष तोंडी लावण्यापुरता. पण खरा पक्ष म्हणजे जांबुवंतरावच. जांबुवंतराव हेच पक्षाचे निशाण. तेच म्हणजे जाहीरनामा. ते म्हणतील त्याला तिकीट आणि ते देतील त्या उमेदवाराला लोकांनी निवडून आणायचे. भाऊंच्या विश्वासावर विदर्भातल्या जनतेने अठरा-वीस आमदारांना फॉरवर्ड ब्लॉकच्या तिकिटावर निवडून आणले आहे. आणि निवडून आलेले अगदी साधे कार्यकर्ते. मग ते सुभाष कारेमोरे असतील, शंकरराव बोबडे असतील, हरीष मानधना, सुधाकर दुर्वे किंवा भाऊंचे उजवे हात नानाभाऊ एम्बडवार. भाऊंचा शब्द झेलायला ही हनुमानाची सेना हजर असायची. भगवंतराव गायकवाड, सुरेंद्र भुयार आणि नानाभाऊ यांना तर जांबुवंतरावांनी मंत्री केले. महाराष्ट्रात कोणताही पक्ष पाठीशी नसताना एक खांबी तंबू म्हणता येईल.. खांब कसला, लोखंडाची कांबच म्हणायला हवी. अशा पोलादी शरीराचे भाऊ किती वर्षे तुरुंगात राहिले हिशोब नाही. नागपुरातला विणकरांचा लढा, अकोला कृषीविद्यापीठाचा लढा, अमरावतीचे आंदोलन आयुष्यभर ते लढत राहिले. एक पाय तुरुंगात, एक पाय बाहेर. तुरुंगातसुद्धा त्यांना लादीवर झोपवले जात होते.
त्यांच्या संतापी स्वभावाने विधानसभेत त्यांनी एकदा अध्यक्षांच्या अंगावर पेपरवेट फेकला. बाळासाहेब भारदे यांना सुदैवाने तो लागला नाही; पण सभागृह भाऊंच्या विरोधात गेले. त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा ठराव आला. सदस्यत्व रद्द झाले. दरम्यान भाऊंना तुरुंगवासही झाला. तुरुंगात असतानाच विधानसभेची पोटनिवडणूक लढवली. १९६२ची निवडणूक त्यांनी तीन हजार मतांनी जिंकली होती. पेपरवेट फेकल्यामुळे सदस्यत्व रद्द झाल्यानंतरची पोटनिवडणूक भाऊंनी ८ हजार ८८८ मतांनी जिंकली. ज्यांचं सदस्यत्व सभागृहाने रद्द केलं होतं ते जांबुवंतराव रुबाबात पुन्हा विधानसभेत आले. निवडून आल्यावर पुन्हा शपथ घेण्यासाठी अध्यक्षांनी नाव पुकारले. विधानसभा सचिवाजवळ भाऊ आले. त्यांनी माईक हातात घेतला. ते म्हणाले, ‘ज्या जांबू धोटेचे सदस्यत्व पाशवी बहुमताच्या जोरावर तुम्ही रद्द केलं होतं, तो जांबू धोटे मीच आहे आणि लोकांनी मला पुन्हा निवडून दिले आहे..’
काँग्रेसचे चंद्रपूरचे आमदार मा. दा. तुमपल्लीवार उभे राहिले. ते म्हणाले, ‘अध्यक्ष महाराज माझा हरकतीचा मुद्दा आहे. आमदारपदाची शपथ घेतल्याशिवाय सदस्याला भाषण करता येते का?’ त्यांचा मुद्दा तांत्रिक होता आणि तो बरोबर होता. पण भाऊंचा दरारा होता. ते तुमपल्लीवार यांच्या अंगावर ओरडले.. ‘चूऽऽऽप’ विधानसभेचे अध्यक्ष होते बाळासाहेब भारदे. ते एवढेच म्हणाले, ‘जांबुवंतरावांना बोलू द्या..’ आणि आमदारकीची शपथ घेण्याच्या अगोदर भाऊंनी भाषण केले. आणि सभागृहाच्या इतिवृत्ताचा ते भाषण भाग झाले. संसदीय इतिहासात हाही एक आगळावेगळा विक्रमच होता.
विधानसभेतील ती दहा वर्षे भाऊंची वर्षे होती. अधिकृतरीत्या ते विरोधी पक्षनेते नव्हते. पण दुस-या अर्थाने सभागृहात त्यांचा दरारा विरोधी पक्षनेत्याइतकाच सरस होता.
वर्षानुवर्षे प्रवाहाच्या विरुद्ध पोहत राहायचे ही सोपी गोष्ट नाही. मोर्चात, जाहीर सभेमध्ये, विधानसभेत अत्यंत संतापलेले भाऊ अनेकांनी पाहिले. पण एवढय़ा लढाऊ वृत्तीचा हा नेता मनाने एकदम हळवा आहे. निर्मळ आहे. वसंतराव नाईक यांच्याशी आयुष्यभर भाऊंचा वाद झाला; पण नाईकसाहेब गेल्यावर भाऊंच्या डोळ्यांतून पाण्याची धार लागली. महाराष्ट्राला खरं वाटणार नाही; पण त्यांचा संगीताचा अभ्यास केवढा मोठा आहे. वनस्पतीशास्त्राचा, पानांचा, फुलांचा अभ्यास किती मोठा आहे आणि शेतीचा अभ्यासही खूप मोठा आहे.
भाऊ आता ८४ वर्षाचे. पण ना कधी वाढदिवस, ना कधी कटआऊट. गरिबांसाठी सगळे आयुष्य पणाला लावणारे त्यांचे ते समर्पण कुठच्याही शब्दांत आणि तागडीत तोलता येणार नाही. फाटक्या माणसाचा पन्नास वर्षापूर्वीचा सगळ्यात मोठा आधार हाच धडधाकट माणूस होता. काळाची गती थांबत नाही. पण कर्तृत्वाचे विस्मरण होता कामा नये.
सांगोल्याचे गणपतराव
महाराष्ट्र विधानसभेत ज्या काळात आक्रमक जांबुवंतराव धोटे होते त्याच काळात अतिशय शांत प्रवृत्तीचे पंरतु आपला मुद्दा अतिशय खंबीरपणे मांडणारे गणपतराव देशमुख हेही होते. महाराष्ट्र विधानसभेतले सगळ्यात ज्येष्ठ आमदार म्हणून आजही गणपतराव देशमुख हेच आहेत. अकरा वेळा निवडून येण्याचा पराक्रम त्यांनी केलेला आहे. आजच्या राजकारणात एक निवडणूक जिंकली तरी आपण केवढा पराक्रम केला असे निवडून येणा-याला वाटत असते. किंवा निवडून आल्यानंतर पाच वर्षे त्याला चिंता असते ती पुढच्या निवडणुकीची. तेरा निवडणुका लढवून अकरा निवडणुका जिंकणारे गणपतराव असा कोणताही ताणतणाव न घेता निवडणुकीला उभे राहतात आणि हसत हसत निवडून येतात. गेल्या तीन-चार निवडणुकीत तर प्रत्येक वेळी ते सांगत होते की ‘ही माझी शेवटची निवडणूक.’ असं म्हणत म्हणत अकरा निवडणुका झाल्या. कार्यकर्ते त्यांना स्वस्थ बसू देत नाहीत. आग्रह करतात आणि गणपतराव पुन्हा उभे राहतात. निवडून येतात. महाराष्ट्राच्या राजकारणातला सर्व पक्षांना आदर असलेला हा एक नेता आहे. गेली पन्नास वर्षे त्यांना पाहतो आहे. ते जसे होते, तसेच पन्नास वर्षे आहेत. वयाचा किंचित परिणाम चेह-यावर झाला. पण सामान्य माणसाच्या प्रश्नासाठी विधानसभेत किंवा विधानसभेच्या बाहेर लढण्याची त्यांची जिद्द काही कमी झालेली नाही. नागपूरच्या एवढय़ा अधिवेशनाला सलग तीस वर्षे मी गेलो; पण नागपूरच्या थंडीत गणपतरावांनी कोट घातला, असे कधी पाहायला मिळाले नाही. त्यांची पांढरी पॅन्ट, पांढरा शर्ट या त्यांच्या पोषाखात ना कधी बदल झाला, ना गणपतरावांच्या स्वभावात कधी बदल झाला. विधानसभेत क्वचितच आवाज वाढवून ते बोलतात. त्यांचा मुद्दा दुर्लक्षित करण्यासारखा नसतो. प्रश्नाचा अभ्यास करण्याची त्यांची एक हातोटी आहे आणि प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची प्रवृत्ती आहे. महाराष्ट्रात रोजगार हमी कायदा प्रभावीपणे राबवण्याचे ज्यांना ज्यांना श्रेय आहे, त्यात गणपतराव हेही प्रमुख आहेत. कृष्णराव धुळप, दि. बा. पाटील यांच्याप्रमाणेच रोजगार हमी हा गणपतरावांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. या रोजगार हमी योजनेवर पुरुष आणि महिला काम करतात. एका दुष्काळात तर सात-सात, आठ-आठ लाख लोक एकेका दिवशी कामावर होते, त्यात तीन-चार लाख भगिनी होत्या. पण या श्रम करणा-या महिलांना पुरुषांऐवढी समान मजुरी मिळत नव्हती. गणपतरावांनी हा विषय उचलला आणि थेट इंदिरा गांधींच्या समोरच हा विषय नेला. त्याचे असे झाले की, १९७४ साली श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सोलापूरला एका कार्यक्रमाला येणार होत्या. गणपतरावांचा जिल्हा सोलापूर. ते सांगोल्याचे. त्यांनी त्यांच्याच जिल्ह्यातल्या रोजगार हमीवर काम करणा-या पाच-पंचवीस हजार महिलांना जमवले आणि इंदिरा गांधींचे विमान उतरणार होते, त्यांच्यासमोरच या भगिनींचा डेरा लावला. इंदिरा गांधी विमानातून खाली उतरल्या, समोर बघतात तर हजारो भगिनी. मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना इंदिराजींनी विचारले, ‘इनकी क्या माँग है..?’ इंदिराजी तडक निघाल्या आणि मोर्चासमोर आल्या. गणपतरावांनी विषय समजावून सांगितला. बायांनाही समान मजुरी हवी हे पटवून दिले. एका मिनिटात इंदिराजी म्हणाल्या, माँग सही है. आणि सोलापूरच्या सभेत इंदिराजींनी तशी घोषणा केली. महिलांना समान मजुरी मिळण्याचे श्रेय गणपतरावांचे.
गणपतरावांचे आणखी एक काम फार मोठे आहे. कापसाचा एक बोंडसुद्धा ज्या सांगोल्यात होत नाही, तिथे गणपतरावांनी उत्तम सहकारी सूत गिरणी चालवली. इचलकरंजीत कलप्पा आवडेंची सूतगिरणी. सोलापुरात शिवदारे यांची सूतगिरणी आणि सांगोल्यात गणपतरावांची. या तिन्ही गिरण्या कापूस न पिकणा-या भागात आहेत. पण उत्तम चालतात. आणि केंद्र सरकारची बक्षिसे मिळवतात. कापूस पिकणा-या विदर्भातल्या सूतगिरण्या बंद पडल्या.
गणपतराव १९७८ साली शरद पवारांच्या मंत्रिमडळात रोजगार हमीचे मंत्री होते. मंत्रालयासमोरच छोटा बंगला होता. चालत यायचे आणि चालत जायचे. त्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी मंत्री असताना मुंबईत कधीही आणले नाही. मी एकदा त्यांना विचारले की, तुम्ही कुटुंबीयांना का आणत नाही? ते सहज म्हणाले, ‘अहो आपल्या मंत्रीपदाचे काही खरे आहे का? शहराच्या सवयी लागल्या की मग खेड्यात राहायला अडचण होते.’ आमदार असतानाही वर्षानुवर्षे घरी बायकोला महिन्याला ५०० रुपये पाठवणारा हा आमदार. ‘लोकमत’मध्ये असताना मी त्यांचा फोटो टाकून लिहिले. ‘बायकोला महिन्याला पाचशे रुपये पाठवणारा आमदार’. त्या लेखाची चर्चा झाली. एकदा सांगोल्याला गेलो असताना गणपतरावांनी त्यांच्या सौभाग्यवतींची ओळख करून दिली. आपल्यावर ज्यांनी लिहिले होते ते हेच, असेही सांगितले. सौ. गणपतराव म्हणाल्या की, का हो खोटं लिहिलंत. मी म्हटलं, काय खोटं लिहिलं? मग गणपतरावांकडे बघून त्या म्हणाल्या, ‘कधी पाचशे रुपये पाठवलेत हो.. चारशे रुपये तर पाठवायचात.’ विधानसभेत प्रश्नाला लगेच प्रतिप्रश्न विचारणारे गणपतराव घराच्या प्रश्नाला मात्र क्षणात निरूत्तर झाले. असे हे साधे गणपतराव जसे आहेत तसे. ना ते बदलले ना एवढी वर्षे आमदार राहून त्यांचा सांगोला जिल्हा बदलला. तरी तिथल्या लोकांना आमदार हवे गणपतराव. असे तिथले मतदारही विलक्षण आणि आमचे गणपतरावही विलक्षण.
पन्नास वर्षापूवी व्यंकटेश माडगुळकरांनी ‘माणदेशी माणसं’ लिहिली. त्यातला धर्मा रामोशी हा सांगोल्याचा. त्या कथेत व्यंकटेशने दुष्काळी सांगोल्याचे चित्रण उभे केले. तो धर्मा आणि त्याची बया यांचे ते चित्रण मनाला भेदून जाणारे होते. आजही सांगोल्याच्या त्या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. आता गणपतराव यांच्या अखेरच्या या आमदारकीच्या काळात हे चित्र बदलावं अशी अपेक्षा.
(साभार – दै. प्रहार)










