
वृत्तसंस्था, ने पी तॉ (म्यानमार)
‘धर्म आणि दहशतवाद यांची सांगड जगाने फेटाळली पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी खरीखुरी आंतरराष्ट्रीय भागीदारी झाली पाहिजे,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
पूर्व आशिया परिषदेत ते बोलत होते. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्यासह १८ देशांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले, ‘सायबर आणि अवकाश क्षेत्र ही दहशतवादाची नवी अवतारे न राहता संपर्काची साधने म्हणूनच राहिली पाहिजेत याची दखल घेतली पाहिजे. इस्लामिक स्टेटविरुद्ध (आयसिस) परिषदेने केलेल्या ठरावास आमचा पाठिंबा आहे. पण त्याचवेळी सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी खरीखुरी आंतरराष्ट्रीय भागीदारी झाली पाहिजे. ज्यांचा मानवतेवर विश्वास आहे त्यांनी एकत्र आले पाहिजे.’दहशतवाद आणि अतिरेकीवादाचे आव्हान वाढत असल्याचे सांगून मोदी म्हणाले, ‘या सर्वांचा अमली पदार्थांचा व्यापार, शस्रात्रांची चोरटी वाहतूक आणि हवाला व्यवहाराशी संबंध आहे.’
मोदी यांनी आपल्या भाषणात पूर्व आशियाला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांचा उल्लेख केला. चीनचा उल्लेख न करता दक्षिण चायना समुद्रातील हालचालींवरही त्यांनी निवेदन केले. ते म्हणाले, ‘पूर्व आशियात अनेक न सुटलेले आणि गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. त्यावर विचार झाला पाहिजे. विभागातील देशांमध्ये समजूतदारपणे वातावरण आणि विश्वास कायम राहिण्यासाठी सातत्यपूर्ण चर्चा सुरू राहिली पाहिजे. परस्परावलंबी आणि जागतिकीकरणाच्या काळात आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियम पाळण्याशिवाय पर्याय नाही. सागरी सुरक्षेलाही ते लागू होते. त्यामुळेच दक्षिण चायना समुद्रात शांतता आणि स्थैर्य राहण्यासाठी आंततराष्ट्रीय नियमांचे पालन झाले पाहिजे. १९८२ मध्ये राष्ट्रसंघाने सागरी हालचालींबाबत कायदा केला आहे. त्याच्या आधारानेच हा प्रश्न सुटला पाहिजे. नियमांचे पालन करून एकमताने हा प्रश्न सोडविता येईल अशी खात्री आहे.’आर्थिक विषयावर बोलताना मोदी यांनी विभागीय व्यापक आर्थिक भागीदारी कराराचा आग्रह धरला. यामुळे विभागीय एकता आणि संपन्नतेला चालना मिळेल असे ते म्हणाले.
Archive for November 13th, 2014
0
धर्म आणि दहशतवादाची सांगड जगाने फेटाळावीः नरेंद्र मोदी
0
चेन्नईत अडीच किलो सोने जप्त

वृत्तसंस्था, चेन्नई
दुबईहून चेन्नई विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाकडून सुमारे अडीच किलो वजनाचे सोने पोलिसांनी जप्त केले. हा प्रकार गुरुवारी सकाळी घडला. या सोन्याची किंमत ८५ लाख एवढी आहे. अटक केलेल्याचे नाव मोहम्मद ओमर असे असून तो तमिळनाडू येथील रहिवाशी आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला. बुधवारी देखील एका महिलेला ताब्यात घेण्यात आले होते, तिच्याकडून अडीच किलो सोने जप्त करण्यात आले होते. या महिलेचे नाव शेख मुबारक असे होते. ही महिला सौदी अरेबियातून भारतात आली होती.
0
रोहित शर्माने रचला इतिहास

कोलकाता- दुसरं द्विशतकं आणि सर्वाधिक २६४ धावा, असा विश्वविक्रमांचा ‘डबल धमाका’ करत भारताचा शैलीदार सलामीवीर रोहित शर्माने आज श्रीलंकेविरूद्धच्या लढतीत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. याआधी भारताच्याच विरेंद्र सेहवागच्या नावावर एकदिवसीय सामन्यांतील सर्वाधिक २१९ धावांचा विक्रम होता. आतापर्यंत सचिन तेंडुलकर, सेहवाग आणि रोहित असे तीन भारतीय फलंदाजच एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोनशे धावांची खेळी साकारण्याची किमया करू शकले आहेत.
कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर रोहित शर्मा नावाच्या वादळाने श्रीलंकेची गोलंदाजी आज उद्ध्वस्त करून टाकली. रोहितने शतक झळकावल्यानंतर लंकेच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. रोहितच्या आक्रमणापुढे कुलसेकरा, मेंडिस, मॅथ्यूज या अनुभवी गोलंदाजांचाही टिकाव लागू शकला नाही. रोहित षटकार आणि चौकारांची नॉनस्टॉप आतषबाजी करत सुटला होता. सलामीला आलेला रोहित ५० व्या म्हणजेच शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाला. तेव्हा त्याच्या नावार १७३ चेंडूत २६४ धावांचा ‘एव्हरेस्ट’ लिहिला गेला होता. या विक्रमी खेळीत रोहितने ३३ चौकार आणि ९ षटकार ठोकले. रोहितच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर भारताने ५० षटकांत ४०४ धावांचा डोंगर श्रीलंकेसमोर उभा केला आहे. भारतीय संघाची ही वनडेतील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. याआधी भारताने सर्वाधिक ४१८ धावा वेस्ट इंडिजविरूद्ध केल्या आहेत. भारताच्या डावात कर्णधार विराट कोहलीनेही सुरेख अशी अर्धशतकी खेळी केली.
0
ममता कुलकर्णीला केनियात अटक

नवी दिल्ली -बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामीला केनिया पोलिसांनी अटक केली आहे. अमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप या दोघांवर असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.
९०च्या दशकांत बॉलिवूडच्या पडद्यावर ‘बोल्ड’ दृश्यं दिल्यानं ममता कुलकर्णी प्रकाशझोतात आली होती. करण अर्जुन, क्रांतिवीर, बाजी, आशिक आवारा यासारख्या काही गाजलेल्या चित्रपटात तिनं भूमिका साकारल्या. पण नंतर तिला फार चित्रपट मिळाले नाहीत. ड्रग्स माफिया विकी गोस्वामीशी लग्न करून तिनं सगळ्यांनाच धक्का दिला होता. १९९७ मध्ये अमली पदार्थ तस्करीप्रकरणी विकी दोषी ठरला होता आणि त्याला आजन्म कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली होती. परंतु, चांगल्या वर्तनाच्या आधारावर २०१२ मध्ये त्याला सोडण्यात आलं होतं.
गेली काही वर्षं ममता कुलकर्णी केनियात राहत होती. तिथल्या अमली पदार्थविरोधी पथकानं ड्रग्ज तस्करीचं एक मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलं असून त्यात ममता आणि विकीलाही अटक झाल्याचं समजतं. आता चौकशीत ते दोषी ठरतात का आणि त्यांना काय शिक्षा होते, हे लवकरच स्पष्ट होईल.
0
जयललितांची आमदरकी रद्द

नवी दिल्ली -बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शिक्षा झालेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता ऊर्फ ‘अम्मा’ यांना दुसरा जोरदार दणका बसला आहे. जयललिता यांची आमदारकी रद्द करण्यात आली असून शिक्षेनंतरची ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. तामिळनाडू सरकारच्या सुधारीत राजपत्रात तसं स्पष्टपणं नमूद करण्यात आलं आहे.
तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष पी. धनपाल यांनी या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. जयललिता या दोषी असल्याने, त्यांच्या शिक्षेच्या दिवसापासून म्हणजेच, २७ सप्टेंबर २०१४ पासून त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात येत आहे. तसेच, लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ८नुसार शिक्षा पूर्ण केल्याच्या दिवसापासून पुढील ६ वर्षे जयललिता निवडणूक लढवण्यास अपात्र असतील, असंही अधिसूचनेत म्हटलं आहे. अधिसूचनेद्वारे जयललिता यांचा श्रीरंगम विधानसभा मतदारसंघ रिक्त घोषित करण्यात आला आहे.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात बेंगळुरू येथील विशेष न्यायालयाने जयललिता यांना ६ वर्षे तुरुंगवास व १०० कोटींच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने १७ ऑक्टोबर रोजी त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे. मात्र, सक्रीय राजकारणाला ‘अर्धविराम’ लागल्याने अम्मांच्या सुटकेच्या आनंदावर विरजण पडले आहे.
0
माचिल बनावट चकमक, सात दोषींना जन्मठेप

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील माचिल बनावट चकमकप्रकरणी लष्कराने दोन अधिका-यांसह सात जवानांना दोषी ठरवले आहे. या सात दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
३० एप्रिल २०१० मध्ये जम्मू-काश्मीरमधील माचिल येथे तीन घुसखोरांना ठार मारल्याचा दावा लष्कराने केला होता. हे तीनही घुसखोर पाकिस्तानी दहशतवादी असल्याचेही लष्कराकडून सांगण्यात आले होते. मात्र महम्मद शाफी, शहजाद अहमद आणि रियाझ अहमद हे तिघेही बारामुल्ला जिल्ह्यातील नंदीहाल भागातील नागरिक असल्याचे तपासादरम्यान आढळले होते.
चकमकीत मृत्युमुखी पडलेल्या या तिघांचे नोकरीचे अमिष दाखवून अपहरण करण्यात आले आणि कुपवाडाजवळील ताबारेषेवरील चकमकीत ठार मारल्याचा आरोप या अधिका-यांवर ठेवण्यात आला होता. त्यानंतर जानेवारी २०१४ मध्ये लष्कराच्या आदेशानंतर या प्रकरणातील आरोपींवर कोर्ट मार्शल कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत सात जवान, दोन नागरिक आणि एक प्रादेशिक जवान दोषी आढळले होते. माचिल येथील बनावट चकमकीनंतर काश्मीरमध्ये या घटनेचे हिंसक प्रतिसाद उमटले होते. काश्मीरमध्ये दोन महिने याविरोधात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात १२३ नागरिकांचा मृत्यू झाला होता.
0
धूमकेतूवर मानवाचे यशस्वी पाऊल


डार्मस्टॅण्डट – चंद्र, मंगळापर्यंत यशस्वी झेप घेणा-या मानवाने आता थेट फिरत्या धूमकेतूवर यशस्वी पाऊल उमटवले आहे. युरोपियन अवकाश संशोधन संस्थेने ‘फिली’ हा यंत्रमानव यशस्वीरित्या ६७ पी/ च्युरुयूमोव्ह-गेरासिमेन्का या धूमकेतूवर उतवरला आहे.
अवकाश संशोधन क्षेत्रातील ही अत्यंत महत्वाची घटना असून, या मोहिमेव्दारे युरोपियन अवकाश संशोधन संस्थेने एक नवी उंची गाठली आहे. रोसेटा या अवकाशयानातून ‘फिली’ला धूमकेतूवर उतरवण्यात आले. युरोपीयन प्रमाणवेळेनुसार पहाटे तीनच्या सुमारास फिली धूमकेतूवर उतरला.
जगभरातील अवकाश संशोधन संस्थांचे या मोहिमेकडे लक्ष लागले होते. कारण फिरत्या धूमकेतूवर यंत्रमानव उतरवणे एक आव्हान होते. विशिष्ट वेळेत फिली धूमकेतूवर पोहचू न शकल्याने युरोपियन अवकाश संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांच्या चेह-यावर चिंतेचे भाव उमटले होते. पण शास्त्रज्ञांनी यशस्वीरित्या फिलीला ६७ पी/ च्युरुयूमोव्ह-गेरासिमेन्काच्या बर्फाळ पृष्ठभागावर उतरवले.
Churyumov-Gerasimenko cometफिलीचा प्रवास दशकभरापूर्वी म्हणजे मार्च २००४ मध्ये सुरु झाला होता. २००४ मध्ये रोसेटा अवकाशयान ६७ पी/ च्युरुयूमोव्ह-गेरासिमेन्का धूमकेतूच्या दिशेने झेपावले होते. तब्बल पाच अब्ज किमीचा प्रवास करुन, दहावर्षांनी रोसेटा धूमकेतूनजवळ पोहोचले.
धूमकेतूपासून २२.५ कि.मी.अंतरावर असताना फिली रोसेटापासून वेगळे झाले आणि ६७ पी/ च्युरुयूमोव्ह-गेरासिमेन्काच्या दिशेने प्रवास सुरु केला. आतापर्यंत धूमकेतूच्या छायाचित्रामुळे केवळ त्याच्या बाहयअंगाचा अभ्यास करता येत होता.पण आता यंत्रमानवामुळे धूमकेतूचा सखोल अभ्यास करता येणार आहे. अवकाशातील अनेक घटकांचे उगमस्थान शोधण्यास मदत मिळणार आहे. फिलीवर विशिष्ट प्रकारची उपकरणे बसवण्यात आली असून, त्यातून धूमकेच्या आतील भागातील छायाचित्रे आणि तेथील अन्य घटकांचा अभ्यास करता येणार आहे. या मोहिमेतून सूर्यमालेच्या जन्मासंबंधी महत्वाची माहिती मिळू शकते.
0
राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी फेटाळली

मुंबई- राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार घटनात्मक तरतुदीनुसार स्थापन झालेले नाही. त्यामुळे भाजप सरकार बरखास्त करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भारीप बहूजन महासंघाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली.
न्यायमूर्ती व्ही.एम.कानडे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. राज्यात राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्यानंतर ८ ते १० नोव्हेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत संवैधानिक यंत्रणाच अस्तित्वात नसल्याचे अॅड. आंबेडकर यांनी याचिकेत म्हटले होते. संवैधानिक यंत्रणा नसल्याने सरकार स्थापनेचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असा दावा अॅड. आंबेडकर यांनी याचिकेत केला होता.
0
भाजपाच्या पापाला प्रायश्चित्त नाही – उद्धव ठाकरे

मुंबई – भाजपाने आवाजी मतदानाने सभागृहात ‘विश्वास’ संपादन केला असला तरी जनतेच्या मनात भाजवाविषयी असलेला विश्वास उतरंडीला लागला आहे. जनतेच्या विश्वासाचा गळा घोटणा-या भाजपाच्या या पापाला प्रायश्चित्त नाही अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.
बुधवारी विधानसभेत भाजपाने विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर करुन घेतला होता. यावरुन उद्धव ठाकरेंनी सामनामधून भाजपावर जोरदार टीका केली. जनतेसाठी सरकार चालवू, स्वच्छ कारभार करु असे दावे भाजपाने निवडणुकीत केले होते. पण प्रत्यक्षात भाजपाचे हे सर्व दावे पोकळ व दांभिक असल्याचे विधानसभेतील घटनेवरुन स्पष्ट होते असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. सत्तेसाठी तडजोडी कराव्या लागतात मात्र यासाठी घटना, नियम, परंपरा यांचा गळा घोटला जात नाही असे त्यांनी भाजपाला सुनावले आहे. सभागृहातील परंपरा आणि प्रथा धाब्यावर बसवून सभागृहात विश्वास जिंकणारी मंडळी उद्या जनतेचा विश्वास कसा जिंकणार असा सवालही उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे.
0
जिल्हा माहिती अधिकारी राजू पाटोदकर यांना पीएच.डी.

अलिबाग :- रायगड जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी पुरूषोत्तम (राजू) पाटोदकर यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाने जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. राजू पाटोदकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील प्रोफेसर डॉ.वि.ल.धारुरकर यांच्या मार्गदर्शनात ‘श्री.अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील सामाजिक वास्तवाचा संवाद : एक चिकित्सक अभ्यास (1975 ते 2005)’ या विषयावर संशोधन करुन आपला प्रबंध विद्यापीठास सादर केला होता. त्या प्रबंधास विद्यापीठाने मान्यता देऊन त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे.
श्री.पाटोदकर यांनी जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विषयातील पदव्युत्तर पदवी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून 1991 साली पूर्ण केली. तद्नंतर त्यांनी नाट्यशास्त्र पदवी व एम.ए.(मराठी) पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी दैनिक लोकमत, दैनिक एकमत व चित्रपट विषयक मुक्त पत्रकार म्हणून अनेक दैनिकांसाठी लेखन कार्य केले. तसेच 1999 साली महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयात सहाय्यक संचालक म्हणून ते रुजू झाले. त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी रत्नागिरी व मंत्रालयात विभागीय संपर्क अधिकारी म्हणून विविध विभागांसाठी काम पाहिले व जून 2014 पासून ते जिल्हा माहिती अधिकारी म्हणून रायगड जिल्ह्यात कार्यरत आहे.
त्यांनी आपल्या कार्यव्यापातूनही शिक्षणाची कास धरुन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पीएच.डी. सारखी उच्च पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे, माजी कुलगुरू डॉ.सुधीर गव्हाणे, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक अजय अंबेकर, अपर जिल्हाधिकारी प्रविण शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) किरण पाणबुडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.साळुंखे, माहिती संचालक (औरंगाबाद) राधाकृष्ण मुळी, माहिती संचालक (नागपूर) मोहन राठोड, प्राचार्य डॉ.अरुण भस्मे, दिलीप धूत, माजी प्राचार्य डी.एस.कुलकर्णी सर, डॉ.संजय पाटील-देवळाणकर, डॉ.नामदेव सानप (बीड), प्राचार्य डॉ.गणेश अग्निहोत्री (अलिबाग), डॉ.सुरेखा मुळे, अनिरुध्द अष्टपुत्रे, अभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड, अभिनेता शैलेश दातार (मुंबई), प्रा.सुरेश पुरी, डॉ.गनी पटेल, डॉ.जयंत शेवतेकर, डॉ.डी.एम.भोसले, डॉ.गणेश देसाई (औरंंगाबाद), डॉ.प्रताप पाटील (कोल्हापूर), प्रा.बाबा बोराडे (सांगली), डॉ.तुकाराम दौंड (जळगाव), डॉ.अरुण पाटील (नागपूर), डॉ.गणेश शिंदे, डॉ.अंबादास कांबळे, डॉ.दिपक शिंदे, (नांदेड), डॉ.राघवेंद्र टोपरे, डॉ.ओमप्रकाश मोतीपवळे (लातूर), डॉ.रमेश शेकोकार डॉ.किरण मोघे, (नाशिक), आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन आपला पीएच.डी. प्रबंध ग्रंथरुपात आणून तो सामान्य वाचकांसाठी उपलब्ध करुन द्यावा अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे









