
नवी दिल्ली -‘मराठी हा आत्मा’ असलेली शिवसेना आता महाराष्ट्राबाहेरील राजकीय अवकाशात ‘हिंदुत्वाचा श्वास’ घेण्यास सज्ज झाली आहे. त्याचाच भाग म्हणून दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याचे सूत्रांकडून समजते.
मराठी माणसाच्या न्याय्य-हक्कांसाठी स्थापन झालेल्या शिवसेनेने नव्वदच्या दशकापासूनच हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेऊन व्यापक होण्याचा प्रयत्न सुरू केला होता. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जहाल भूमिकांमुळे महाराष्ट्राबाहेर शिवसेनेला मानणारा एक वर्ग आहे. गुजरात, राजस्थान, दिल्ली, जम्मू-काश्मीर व मध्य प्रदेशसारख्या राज्यांत शिवसेनेच्या शाखाही आहेत. याच शाखांचा विस्तार करून राष्ट्रीय राजकारणात पाय रोवण्याचा शिवसेनेचा विचार आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी याआधीच त्यादृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत. आदित्य यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने राजस्थानातील काही महाविद्यालयांत निवडणुकाही लढवल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाला राष्ट्रीय पातळीवर अधिक वाव मिळावा, असा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यामुळेच दिल्ली व काश्मीरच्या निवडणुका लढण्याची तयारी पक्ष करत असून उद्धव ठाकरे लवकरच याबाबतीत अधिकृत घोषणा करतील, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
शिवसेनेच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षेला महाराष्ट्रातील सत्ताकारणाचा सध्याचा तिढाही कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. महाराष्ट्रात भाजपने राष्ट्रवादीच्या साथीने शिवसेनेची कोंडी केली असून विरोधी पक्षात बसायला भाग पाडले आहे. ही कोंडी फोडण्याची संधी शिवसेना शोधत असून दिल्ली व जम्मू-काश्मिरच्या निवडणुकांनी ती दिली आहे. येथे शिवसेनेने निवडणुका लढल्यास हिंदुत्ववादी मतांमध्ये फूट पडू शकते. ते भाजपला परवडणारे नाही. याची जाणीव असलेल्या शिवसेनेने महाराष्ट्राबाहेर भाजपचे नाक दाबून महाराष्ट्रात सत्तेचे दार उघडायचे अशी खेळी केली असावी, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
Archive for November 20th, 2014
0
शिवसेना दिल्लीची निवडणूक लढवणार
0
बाबा रामपालच्या आश्रमात , निरोधाची पाकिटे, छुपे कॅमेरे

हिसार – हरयाणात तब्बल ३३ तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी सतलोक आश्रमातून बाबा रामपाल याला अटक केली. त्याच्या अटकेनंतर तात्काळ आश्रमात झडती घेण्यात आली. स्वयंघोषित संत असणाऱ्या बाबा रामपालच्या आश्रमात अनेक आक्षेपार्ह गोष्टी सापडल्याने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. निरोधाची पाकिटे, महिला स्वच्छतागृहात छुपे कॅमेरे, अमली पदार्थ, तसेच बेशुद्ध अवस्थेत पोहचविण्याचे गॅस आणि यासोबत अनेक अश्लील साहित्य आश्रमात आढळून आले आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, मागील काही दिवसापासून आश्रमात लैंगिक अत्याचार होत असल्याचाही आरोप अनेक महिलांनी केला. रामपालने पोलिसांना शरण जाण्यापूर्वी पोलिसांना काही अटीही घातल्या होत्या. त्यातील प्रमुख अट म्हणजे अटकेनंतर आश्रमाची झडती घेऊ नये. मात्र, पोलिसांनी त्याच्या या सगळ्या अटी नाकारल्या. पोलिसांच्या कारवाईमध्ये जवळजवळ २० हजार अनुयायींना बाहेर काढल्यानंतर नऊ वाजेच्या दरम्यान रामपालच्या मुसक्या आवळल्या. रामपालने अनुयायांना आश्रमात ओलीस ठेवले असल्याचे आश्रमातून बाहेर पडलेल्यांनी पोलिसांना माहिती दिली.
रामपालच्या अटकेनंतर पोलिसांनी आश्रमातील लोकांना तात्काळ बाहेर काढले. मात्र तरीही काहीजण आश्रमातून बाहेर येणास तयार नसल्याने पोलिसांनी आश्रमाची झडती सुरु केली. सर्वप्रथम पोलिसांनी मेन गेट जवळील महिला प्रसाधनगृहची झडती घेतली. त्यावेळेस पोलिसांना शौचालयात छुपे कॅमेरे आढळून आले. तसेच निरोध देखील सापडले. आश्रमात एका विशिष्ट गॅसचा दुर्गंध येत होता. हा वायू नायट्रोजन गॅस असल्याचे डॉक्टरांच्या अहवालातून समोर आले.
आश्रमातील महिलांनी बाहेर आल्यानंतर आश्रमातील कुकर्मांचा पाढाच वाढण्यास सुरुवात केली. महिलांनी केलेल्या आरोपानुसार, रामपालचे सरंक्षक देखील महिलांना डांबून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करीत होते. एका महिलेला सात दिवसापासून आश्रमातून डांबून ठेवण्यात आले होते. तसेच वारंवार लैंगिक अत्याचार केला असल्याचा आरोपही पीडित महिलेने केला आहे.
पोलिसांनी रामपाल सोबत त्याच्या अनेक साथीदारांना अटक केली आहे. रामपालच्या आश्रमाचा संपूर्ण कारभार त्याचा भाऊ पुरुषोत्तम दास, जगदीश ढाका, प्रवक्ता राजकपूर आणि एक महिलेला देखील पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणामुळे रामपालाची काळी बाजू जगासमोर उघड झाली आहे.
0
विद्यार्थिनीचे ‘ऑनर किलिंग’

नवी दिल्ली – परजातीय मुलाशी विवाह करणाऱ्या दिल्ली विद्यापीठाच्या श्री व्यंकटेश्वर कॉलेज या नामांकित कॉलेजातील विद्यार्थिनीची तिच्या आई-वडिलांनीच हत्या केली आहे. १५ नोव्हेंबरला घडलेला हा धक्कादायक प्रकार ‘ऑनर किलिंग’ असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांनी तिच्या चुलत्यावरही संशय व्यक्त केला आहे.
हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहावर या कुटुंबाने मूळ गावी अंत्यसंस्कारही केले. या प्रकरणी मुलीची आई सावित्री व वडील जगमोहन यांना अटक करण्यात आली असून, वडील काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी व प्रॉपर्टी डिलर आहेत. भावना यादव (वय २१) असे या तरुणीचे नाव आहे. तिने अभिषेक सेठ (वय २४) या तरुणाशी १२ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील आर्य समाज मंदिरात विवाह केला होता. भावना मूळची राजस्थानची, तर अभिषेक पंजाबी कुटुंबातील आहे.
विवाहानंतर ‘झाले गेले विसरून जा’ असे सांगून भावनाच्या कुटुंबीयांनी तिला घरी बोलावले. त्या दोघांचे पुन्हा पारंपरिक पद्धतीने लग्न लावून देण्याचे आश्वासनही देण्यात आले. मात्र, घरी गेल्यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिला त्रास देण्यास सुरूवात केली. त्यानंतर भावना पुन्हा अभिषेकच्या घरी राहायला गेली. मात्र, आई-वडिलांनी तिला पुन्हा समजावल्याने काही दिवसांपूर्वीच ती माहेरी आली होती. दरम्यान, १५ नोव्हेंबर रोजी भावनाचे काका लखन याने आम्हा दोघांनाही धमकी दिल्याचे अभिषेकचे म्हणणे आहे. त्याच रात्री (१५ नोव्हेंबर) भावनाच्या आई-वडिलांनी तिची हत्या केली. तशी कबुलीही त्यांनी पोलिसांकडे दिली आहे. आम्ही तिचे लग्न आमच्या जातीतील एका मुलाशीच करण्याचे ठरवले होते. हा नियोजित साखरपुडा २२ नोव्हेंबर रोजी होता, अशी माहितीही त्यांनी दिल्याचे सहायक पोलिस आयुक्त तेजेंद्र लुथरा यांनी सांगितले. दिल्ली विद्यापीठातील श्री व्यंकटेश्वर कॉलेजमध्ये भावना तिसऱ्या वर्षाला होती, तर अभिषेक राष्ट्रपती भवनात कंत्राटी प्रोग्रॅमर आहे.
म्हणे, सर्पदंशाने मृत्यू
हत्येनंतर भावनाचे आई-वडील जगन्नाथ आणि सावित्री यांनी गाडीतून भावनाचा मृतदेह राजस्थानमधील अलवर येथे नेला. ‘भावनाला साप चावला आहे आणि आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी तिला मूळ गावी नेत आहोत,’ असे आई-वडिलांनी शेजाऱ्यांना सांगितले होते; मात्र, गावी गेल्यावर ‘रस्त्यातच भावनाचा मृत्यू झाला,’ असे त्यांनी गावातील नातेवाईकांना सांगितले.
0
हार्डवेअर दुकानाला भिषण आग, ४० लाखाचे नुकसान

यवतमाळ – आर्णी मार्गावर असलेल्या परफेक्टर हार्डवेअर दुकानाला लागलेल्या भिषण आगीत ४० लाखाचे नुकसान झाले. ही घटना काल बुधवारी रात्री दहा वाजता दरम्यान घडली. रवींद्र रतनलाल मुंधडा (४८) रा. वडगाव असे दुकान मालकाचे नाव आहे.
मुंधडा हे रात्री ९ वाजता दुकान बंद करून घरी निघून गेले होते. मात्र रात्री १० वाजता दुकानाला आग लागल्याची घटना उघडकीस येताच आर्णीरोड परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच मुंधडा यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले. बाजूच्या दुकानदारांनी आगीची माहिती अग्निशमन दलाला दिली. त्यावरून यवतमाळ नगरपालिकेचे बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रुप धारण केल्यामुळे आग नियंत्रणात आणणे कठीण झाले होते. घटनास्थळी नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी झाल्यामुळे पाण्याचा मारा करण्यास अडचण जात होती. अखेर वडगाव रोड पोलीस ठाण्यातील कर्मचारी व चार्ली कमांडोने गर्दी पांगविल्यानंतर रात्री २.३० वाजता आग नियंत्रणात आली. यासाठी १८ बंब पाणी लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. परफेक्टर हार्डवेअर दुकानात असलेले साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. यात टरपेन टाईन, आॅईल पेंट, प्लास्टीक पाईक, नॉयलोन दोरी, फर्निचर, रेकॉर्ड आदी साहित्याचा समावेश आहे. अद्यापत घटनास्थळाचा पंचनामा करण्यात न आल्यामुळे नुकसानीचा हा आकडा वाढण्याची शक्यात रवींद्र मुंधडा यांनी वर्तविली. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र कळू शकले नाही. या घटनेची तक्रार वडगाव रोड पोलीस ठाण्यात देण्यात आली.
0
पहिल्या महिला डॉक्टरचा संघर्ष घराघरात पोहोचावा-डॉ. छाया महाले

यवतमाळ – एकोणविसाव्या शतकातील एक असामान्य स्त्री व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. रखमा राऊत आहे. सौराष्टÑ आणि कच्छच्या पहिल्या भारतीय महाला डॉक्टरचा संघर्षमय प्रवास घराघरात पोहोचावा, यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने २२ नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. छाया महाले यांनी पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. हा कार्यक्रम कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात पार पडणार असून, एका महिला डॉक्टरला डॉ. रखमा राऊत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कैसर-ए-हिंद, हिंदू लेडी असलेल्या डॉ. रखमा राऊत या कायम पडद्याआड राहिल्या. बालविवाह नाकरणारी पहिला महिला असून त्याविरुध्द न्यायालयीन लढाई लढली. पसंत नसलेल्या पतीकडे नांदण्यापेक्षा तुरुंगात जाण्याची शिक्षा पसंत करणारी कणखर महिला डॉक्टर होती. १८९० मध्ये त्यांनी लंडन स्कूल आॅफ मेडीसीन फॉर विमेन या महाविद्यालयातून वैद्यकीय शिक्षणास प्रारंभ केला. १८९४ मध्ये शेवटची परीक्षा पास केली. वैद्यकीय सेवा करीत असताना त्यांनी सामाजिक भान कायम बाळगले होते. सुरतमधील माळवी हॉस्पीटल रखमाबाई हॉस्पीटल म्हणूनच ओळखल्या जाते. या माऊलीची १५० वी जयंती शासन पातळीवरून साजरी होणे आवश्यक होते. मात्र पडद्यामागील महानायिका उपेक्षित राहिल्याबद्दल डॉ. छाया महाले यांनी खंत व्यक्त केली. यावेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप महाले, योगेश धानोरकर, विद्या खडसे, राजश्री कुºहडकर, सुवर्णा ठाकरे, आशा काळे, संगीता होनाडे यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
0
अशोक चव्हाणांना दणका, आदर्श घोटाळ्यातून नाव वगळण्यास हायकोर्टाचा नकार
मुंबई – आदर्श घोटाळ्यामुळे गोत्यात आलेले काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण यांना बुधवारी मुंबई हायकोर्टाने जोरदार दणका दिला आहे. चव्हाण यांचे नाव आदर्श घोटाळ्यातील आरोपींमधून वगळण्यास हायकोर्टाने नकार दिल्याने चव्हाण यांना घोटाळा महागात पडण्याची चिन्हे आहेत.
आदर्श घोटाळ्यातील आरोपींमधून अशोक चव्हाण यांचे नाव वगळावे अशी याचिका सीबीआयने मुंबई हायकोर्टात दाखल केली होती. तत्कालीन राज्यपालांनी चव्हाण यांची चौकशी करण्यास नकार दिल्याने आरोपपत्रातून चव्हाणांचे नाव वगळावे अशी सीबीआयची भूमिका होती. या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली असता हायकोर्टाने आरोपपत्रातून चव्हाण यांचे नाव वगळण्यात नकार दिला. मुंबईतील कुलाबा येथे कारगिल युद्धातील शहीदांच्या पत्नीसाठी आदर्श ही इमारत बांधण्यात आली होती. मात्र या इमारतीतील बहुसंख्य फ्लॅट हे अधिकारी व राजकीय नेत्यांनी लाटल्याचे उघड झाले होते. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना हा घोटाळा झाला व त्यामुळेच चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. चव्हाण यंदाच्या लोकसभा निवडणुकीत नांदेडमधून लोकसभेवर निवडून गेले आहेत.
0
पंढरपूरमधील अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार – हायकोर्ट
पंढरपूर – आषाढी किंवा कार्तिकी वारीनंतर पंढरपूरमध्ये होणा-या अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार असल्याचे मत हायकोर्टाने मांडले आहे. हायकोर्टाने नेमलेल्या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे न्यायाधीशांनी हे मत मांडले आहे.
वारीनंतर पंढरपूरमध्ये होणा-या अस्वस्छतेविरोधात मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल असून यासंदर्भात हायकोर्टाने दोन वकिलांची नियुक्ती करत अहवाल मागवला होता. या द्विसदस्यीय समितीने हायकोर्टासमोर अहवाल मांडल्याचे वृत्त आहे. या अहवालाच्या आधारे हायकोर्टाने अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे. ‘वारकरी स्वच्छतागृह असतानाही त्याचा वापर करत नाही व त्यामुळेच शहर आणि नदीकाठी घाणीचे साम्राज्य पसरते. याबाबत विठ्ठल – रुक्मिणी मंदिर संस्थाना कोणतेही पाऊल उचलत नाही असे हायकोर्टाने नमूद केल्याचे एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
पुढील सुनावणीत पंढरपूर शहर स्वच्छ ठेवण्यासंदर्भात निर्देश दिले जातील. या सुनावणीला विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि वारकरी संघटनाचे प्रतिनिधी यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.
0
बाबा रामपालविरोधात देशद्रोहाचा गुन्हा
बरवाला (हिसार) – हरियाणाच्या हिसार जिल्हयातील बरवाला नगर येथील वादग्रस्त बाबा रामपालविरोधात पोलिसांनी बुधवारी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला आहे.
पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सोमवारी रामपाल यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी करीत शुक्रवारपर्यंत त्यांना न्यायालयासमक्ष हजर करण्याचे आदेश दिले होते़ मंगळवारी पोलीस रामपाल यांना अटक करण्यासाठी आश्रमात पोहोचले़ मात्र रामपाल समर्थकांनी त्यांना रोखले़ यामुळे तणाव वाढला. पोलीस आणि समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षात आत्तापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये ६ महिला व एका मुलाचा समावेश आहे. शेकडो जण जखमी झाले असून २७० संशयित लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी केलेल्या दाव्यानूसार, बाबा रामपाल यांच्या आश्रमात ५ ते ७ हजार समर्थक अजूनही आहेत. आश्रमामधून हजारो जणांना पोलिसांना काढण्यात यश आले असून यामध्ये सर्वाधिक महिलांचा समावेश आहे. दरम्यान, पोलिसांनी केलेल्या कारवाईत चार महिलांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप सतलोक आश्रमामधून करण्यात आला आहे तर हा दावा पूर्णत: बिनबुडाचा असल्याचे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.
0
दहावी-बारावी : बोर्डाच्या लेखी परीक्षेत २० टक्के गुण अनिवार्य
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावी लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या २० टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे. लेखी परीक्षेत २0 टक्के म्हणजेच १६ गुण विद्यार्थ्याला मिळवावे लागणार असून, हा निर्णय मार्च २0१६पासून लागू केला जाणार आहे.
सध्या दहावीची तोंडी परीक्षा २0 गुणांची, तर लेखी परीक्षा ८0 गुणांची घेण्यात येते. बारावीला ३0 गुणांची तोंडी वा प्रात्यक्षिक आणि ७0 गुणांची लेखी परीक्षा असते. परंतु नव्या निर्णयानुसार विद्यार्थ्याला लेखी परीक्षेत १६ गुण मिळवावे लागणार आहेत. दहावीच्या तोंडी परीक्षेत विद्यार्थ्याला २0पैकी २0 गुण मिळाले आणि तोंडी तरीक्षेत १५ गुण मिळाले तर विद्यार्थी पास होत असे. मात्र, नवीन नियमानुसार असे ३५ गुण मिळालेला विद्यार्थी उत्तीर्ण मानला जाणार नाही. विद्यार्थ्याला लेखी परीक्षेत १६ गुण मिळवावे लागणार आहेत. परीक्षा पद्धतीमधील बदलाबाबतच्या प्रस्तावास मंजुरी मिळाल्याने हा निर्णय मार्च २0१६च्या परीक्षेपासून लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याचे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर मम्हाणे यांनी सांगितले.
0
नरेंद्र मोदींचं मार्केटिंग जोरात, प्रॉ़डक्टचा पत्ता नाही – पवार
अलिबाग – नरेंद्र मोदींचं प्रॉडक्ट काय आहे ते माहित नाही परंतु मार्केटिंग मात्र जोरात आहे, अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या चिंतन शिबिरात बोलताना पवारांनी राज्यातल्या स्थितीवर भाष्य केले असले तरी जाता जाता नरेंद्र मोदींच्या मार्केटिंग करण्याच्या शैलीवर टीका केली आहे. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला अवघ्या ४१ जागा मिळाल्याचा संदर्भ देताना पवार म्हणाले की विकासकामं केली की त्याचं फळ मिळतं यावरचा विश्वास उडाला आहे. असे असले तरी विकासकामांवर आपला भर राहील अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
भारतीय जनता पार्टीचे सरकार फार काळ टिकणार नाही आणि निवडणुका मुदतपूर्व होतील असे भाष्य करून खळबळ उडवणा-या पवारांनी आपले वक्तव्य आज बोलताना मागे घेतले नसले तरी आपल्याला पाडापाडीमध्ये रस नाही असेही सांगून त्यांनी राजकीय विश्लेषकांना बुचकळ्यात टाकले आहे. सरकार पाडण्यात आपल्याला रसनसला तरी सरकार अयोग्य वाटत असेल तर आपण प्राणपणाने विरोध करू नी वेळ पडली तर रस्त्यावर उतरू असे ते म्हणाले.
चिंतन शिबिरात राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी भाजपाला पाठिंबा देणे ही चूक होती असे मत सांगून या मुद्यावर पक्षामध्ये एकमत नसल्याचे सूचित केले आहे. मात्र, सगळ्यांनी चर्चा करून विचार विनिमय करूनच हा निर्णय घेतला होता असे सांगून यावर पडदा टाकला आहे.
यश न मिळालेल्या २४१ मतदारसंघामध्ये पक्षाला कसे वाढवायचे हा मुख्य प्रश्न असल्याचे पवार म्हणाले, तसेच पक्षामध्ये सुसंवाद वाढला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
0
विश्वंभर उत्तरवार यांचे निधन
यवतमाळ : दारव्हा तालुक्यातील कामठवाडा येथील विश्वंभर उत्तरवार यांचे १८ नोव्हेंबर रोजी रात्री निधन झाले. ते ७९ वर्षाचे होते. त्याच्या पार्थीवावर आज बुधवारी कामठवाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दै. लोकमतचे प्रतिनिधी रुपेश उत्तरवार यांचे ते वडीत होते. त्याच्या मागे, पत्नी, दोन मुले, एक मुलगी,सुना, नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे.
0
शेखर वांढरे यांना तिरंगा कलागौरव पुरस्कार
यवतमाळ – नांदेड येथील तिरंगा परिवार प्रतिष्ठानव्दारा आयोजित कला वैभव व कला गौरव पुरस्कार २०१४ हा कार्यक्रम जागतिक कला दिन २५ आॅक्टोंबर रोजी असतो. परंतु काही कारणास्तव यावर्षी हा कार्यक्रम १५ नोव्हेंबर रोजी नांदेड शहरातील महात्मा फुले सांस्कृतिक सभागृह येथे पंडीत श्रीशाम गुंजकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी जिल्ह्यातील परिचित पोलिस कलावंत पोलिस हवालदार शेखर वांढरे वारली चित्रकार आणि टाकावू वस्तुपासून शोभावंत वस्तु बनविण्यात करीता त्यांना तिरंगा कला गौरव पुरस्कार, मानपत्र, स्मृती चिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. कलाकारांची कला नेहमी जगासमोर येते परंतू कलाकार हा मागेच राहतो म्हणून दरवर्षी विविध क्षेत्रातील कलाकारांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येत आहे. कलाकारांना तिरंगा परिवार नांदेड हे कला वैभव व कला गौरव पुरस्कार देतात. यावेळी कार्यक्रमाचे संचालन मिर्झा फयाज बेग यांनी केले. कार्यक्रमाला सतपाल सिंग, प्रा.विजय पेंडकर (बेग), अनिल कुळकर्णी, अड.मो.शाहीद, विनोद लघवे, सौ.रेणुका कडतन, महेंद्र सिंग गौर, डॉ.मुकुंद मुळे, श्रीनिवास भुयेवार, संजय वर्मा, साहेबराव गायकवाड आदींची उपस्थिती होती.
0
ट्रॅव्हल्सचे दोन्ही चाक निघाल्याने अपघात
आर्णी – नांदेड वरून नागपूर जाणाºया रॉयल ट्रॅव्हल्सचे दोन्ही चाक हाऊजींगसह निघाल्याने अपघात झाला. ही घटना आज सकाळ दरम्यान बाबा कंम्बलपोष दर्गाजवळ घडली. मात्र यात कुणीही जखमी झाले नाही.
बाबा कंम्बलपोष दर्गाजवळ ट्रॅव्हल्सचे मागील दोन्ही चाक हाऊजींग सह निघाले. मागच्या बाजुला अडून ट्रॅव्हल्स रस्त्याच्या कडेला आली. यात कुणीही जखमी नाही. चाके पूर्णत: निघून गाडीच्या बाहेर गेले असते तर मोठा अपघात झाला असता. मात्र यात सदैवाने कुणीही जखमी झाले नाही. यामध्ये २१ प्रवाशी प्रवास करीत होते. सकाळची वेळ असल्याने सर्व प्रवाशी झोपेत होते. त्याचवेळी यवतमाळ वरून दुसरी ट्रॅव्हल्स बोलावून प्रवाशांना रवाना करण्यात आले, अशी माहिती चालक श्यामनाथ दिघापांचे रा. नागपूर याने दिली.
0
पेट्रोलपंपवर ओमनी पेटली
कळंब – येथील पेट्रोलपंपावरून पेट्रोलभरून निघालेल्या ओमनी गाडीने अचानक पेट घेतला. त्यामुळे पेट्रोलपंपावरील वाहन धारकांमध्ये तारांबळ उडाली होती. यावेळी प्रसंगावधान ठेऊन चालकासह एकाने बाहेर उडी टाकली. आज दुपारी ४ .३०वाजता ही घटना घडली. यावेळी तीन्ही पेट्रोललंप बंद करून आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला.
कळंब-यवतमाळ रोडवर प्रशांत डेहणकर, प्रफुल भांगे, चव्हाण या तीन व्यक्तीचे पेट्रोल पंप आहे. त्यापैकी डेहणकर याच्या पेट्रोल पंपवर आज दुपारी ४.३० वाजता चालक भिमराव रामदास उरवते (२६)रा. पाथ्रड याने आपल्या ओमनीमध्ये (एम.एच.०४/बि.एच. ८६६१) पेट्रोल भरले. त्यानंतर गाडी चालु करून पेट्रोलपंपाच्या गेट जवळ येताच सदर वाहनाने अचानकपणे पेट घेतला. यावेळी प्रसांगवधान राखून चालक भगवान व त्याचे वडील रामदास उरवते (५२) यांनी उडी टाकुन आपला जीव वाचविला. ते पाथ्रड येथून यवतमाळ येथे कामानिमित्य जात होते. यावेळी तेथील वाहन धारकांसह कर्मचाºयांची तारांबळ उडाल्याने सैरावैरा पळू लागले. यावेळी परिसरातील तीन्ही पेट्रोलपंप बंद केले. या घटनेची माहीती मिळताच ग्रामपंचायतने टॅकरने पाठवून आग विझविण्याचे काम सुरू केले. या वाहनामध्ये खाली सिलिंडर आढळला असून शॉट सर्कीटने आग लागल्याची चर्चा आहे. याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक वंजारी, विनोद वानखडे यांनी घटनास्थळ गाठून वाहतुक नियंत्रणात आणली. अर्ध्या तासाने ही आग आटोक्यात आली असून लाखो रुपयाचे नुकसान झाले. या घटनेने नागपूर-यवतमाळ मार्गावरील वाहतुक खोळंबली होती. यावेळी तीन्ही पेट्रोलपंप त्वरीत बंद केल्याने कुठलीही जीवीत हाणी झाली नसून मोठा अनर्थ टळला.


















