
मुंबई – शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी परळ येथील हाफकीन संशोधन संस्थेची जागा घेण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. ‘हाफकीनच्या विस्तारासाठी आम्हालाच आणखी जागा हवी आहे. त्यामुळं अन्य कोणत्याही कारणासाठी एक इंचही जागा देणार नाही,’ असं संस्थेच्या व्यवस्थापनानं स्पष्ट केलं आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी स्मारकाची घोषणा करण्याचा राज्य सरकारचा मानस होता. त्यासाठी राज्य सरकार व महापालिकेने सात जागांची यादी बनविली आहे. त्यात परळ येथील हाफकीन संस्थेच्या तीन एकर जागेचा समावेश आहे. ही जागा स्मारकासाठी मिळावी म्हणून कोकण विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व शिवसैनिकांनी मंगळवारी संस्थेच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि तीन एकर जागेचा प्रस्ताव ठेवला. मात्र, व्यवस्थापनाने तो स्पष्ट शब्दांत धुडकावून लावला.
‘हाफकीनच्या कॅम्पसमध्ये थोडीफार मोकळी जागा आहे. मात्र, भविष्यात आम्हाला संस्थेचा विस्तार करायचा आहे. ही जागा गेल्यास आमच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना पाण्यात जातील. सरकारी पथकाला आम्ही हे सांगितल्याचं हाफकीनचे महाव्यवस्थापक सुभाष शंकर राव यांनी सांगितलं.
‘सध्या हाफकीन ४५ देशांना पोलिओ प्रतिबंधक लसींचा पुरवठा करते. हे प्रमाण वाढवून आणखी काही देशांना लसी पुरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळं जमिनीचा प्रत्येक तुकडा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे,’ असं राव यांनी सांगितलं.
संसर्गजन्य आजारांवर व त्यावरील उपायांवर संशोधन करणारी हाफकीन ही संस्था १८९९ मध्ये स्थापन झाली. सुरुवातीला संस्थेकडं २७ एकर जागा होती. मात्र, २०१२ साली राज्य सरकारनं यातील ५ एकर जागा टाटा कॅन्सर हॉस्पिटलला देऊन टाकली. त्यामुळं आता हाफकीनकडं २२ एकर जागा आहे. त्यातील काही जागा रिकामी आहे. या जागेवर टीबी, डायरिया, टिटॅनस आणि डीटीपीसह अन्य रोगप्रतिबंधक लसींसाठी संशोधन प्रकल्प सुरू करण्याची हाफकीनची योजना आहे.
Archive for January 22nd, 2015
0
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकास जागा देण्यास हाफकीनचा नकार
0
कारची विद्युत खांबाला धडक, अर्ध्या शहराचा विद्युत पुवठा खंडीत

वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने जीवित हानी टळली
यवतमाळ , दि. २२ – जांब मार्गाकडून आर्णी बायपासकडे येणाºया कारने विद्युत खांबाला धडक दिल्याने जिवंत विद्युत तारा तुटून पडल्या. आज गुरुवारी रात्री ७ वाजता ही घटना घडली. यामध्ये चालक जखमी झाला असून वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेने मोठी जीवित हानी टळली.
इंद्रनिवास शंकर गोरे (३५) रा. वडगाव रोड असे जखमीचे नाव आहे. भोकरे नामक व्यक्तीच्या कारने (एम.एच. २९ / ए.डी. ३९९९) चालक गोरे व अन्य दोन व्यक्ती जांब मार्गाकडून आर्णी बायपासने येत होते. अशातच रस्त्यावरील वीज खांबाला कारने धडक दिली. ही धडक एवढी जबरदस्त होती की, यामध्ये खांब पूर्णपणे वाकला असून, ३३ केव्ही विद्युत पुरवठा करणाºया जिवंत तारा तुटून रस्त्यावर लोंबकळत होत्या. या बाबतची माहिती जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस नायक सुरेंद्र वासनिक यांना मिळाली. त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून वीज वितरणच्या मुख्य कार्यालयात दूरध्वनीवरून माहिती देऊन विद्युत पुरवठा खंडित करायला लावला. त्यामुळे कुठलीही जीवित हानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळताच वडगाव रोडचे सहा. पोलीस निरीक्षक गोमासे हे आपल्या पथकासह दाखल झाले होते. यामुळे वडगाव, जांब रोड, पृथ्वीराजनगर, बेले ले-आऊट, रामकृष्णनगर, दांडेकर ले-आऊट, गुरुकृपा नगरी, मुलकी यासह परिसरातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू होते. यावेळी पांढरकवडा, आर्णी या मार्गावरील वाहतूकही दोन ते तीन तास खोळंबली होती. जखमी चालक गोरे याच्यावर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
0
दुषित पाणीस्त्रोतांच्याठिकाणी जलशुध्दीकरणाची विशेष व्यवस्था

जिल्हा नियोजन समितीची बैठक, पुढील वर्षासाठी 399 कोटींचा आराखडा मंजूर
यवतमाळ, दि. 22 : दुषित पाण्यामुळे अनेक आजार संभवतात. जिल्ह्यात काही ठिकाणी फ्लोराईडयुक्त तर काही ठिकाणी अन्य दुषित घटक आढळून येतात. अशा ठिकाणचे पाणी आरोग्यास अपायकारक असल्याने अशा सर्व ठिकाणी जलशुध्दीकरणाची विशेष व्यवस्था करण्यात येणार असून त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जातील. याबाबतचा प्रस्ताव संबंधित विभागाने तातडीने तातडीने तयार करून शासनास सादर करावा, अशा सुचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या.पालकमंत्री राठोड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक बचत भवन येथे पार
पडली. त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. बैठकीस जिल्हा परिषद अध्यक्षा डॅा.आरती फुफाटे, खा.भावना गवळी, खा.राजीव सातव, आ.मनोहर नाईक, आ.मदन येरावार, आ.डॅा.अशोक उईके, आ.संजीवरड्डी बोदकुरवार, आ.राजु नजरधने, आ.राजु तोडसाम, आ.हरिभाऊ राठोड, आ.ख्वाजा बेग, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल,मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मल्लिनाथ कलशेट्टी, अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्यासह नियोजन समितीचे सदस्य, विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीत पुढील वर्षाचा सन 2015-16 साठी एकूण 399 कोटी 85 लाख 91 हजार रुपयाच्या वार्षीक आराखड्यास मान्यता देण्यात आली. त्यात सर्वसाधारण योजनेअंतर्गत 177 कोटी 43 लाख, आदिवासी उपयोजना 157 कोटी 21 लाख, अनुसूचित जाती उपयोजना 64 कोटी 22 लाखांच्या आराखड्याचा समावेश आहे.
सदर आराखडा सर्वसंमतीने बैठकीत मंजुर करण्यात आला. तसेच चालु वर्षातील खर्चाचा पुर्नविनियोजन आराखड्यासही मान्यता देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्यावतीने दुषित पाणीस्त्रोतांच्या काही ठिकाणी जलशुध्दीकरण यंत्र (आरओ) लावण्यात आले होते. यापैकी काही यंत्र सुरू आहे. जिल्ह्यात अशा स्त्रोतांच्या ठिकाणी आरोग्याच्यादृष्टीने जलशुध्दीकरणाची कायम यंत्रणा उभारणे आवश्यक आहे. त्यामुळे यासाठी प्रस्ताव सादर करण्यासोबतच निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. जिल्हा नियोजन समितीमधून स्मशानभूमीसारखी जनसुविधेची कामे केली जातात. परंतु यासाठी अपुरा निधी मिळत कामे चांगल्या पध्दतीने करता येत नाही. त्यामुळे दरवर्षी काही ठराविक गावांची निवड करून त्याठिकाणी शेड, रस्ता, बगीचा, झाडे, बसण्याची चांगली जागा आदी प्रकारच्या सुविधा करण्यावर भर देण्यात येईल. येत्या पाच वर्षात सर्वच स्मशानभूमिचा विकास करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. पुरसंरक्षक भिंतीसाठी निधी उपलब्ध आहे. परंतु या कामांना पाहिजे तशी गती नाही. त्यामुळे अशा भिंती उभारण्याचा कामासाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी केल्या. जिल्ह्यात 48 भिंतींसाठी 12 कोटी रुपये उपलब्ध आहे. दुष्काळी स्थिती पाहता शेतकऱ्यांचे विज कनेक्शन कापल्या जावू नये. जुने कापलेले कनेक्शन कसे जोडता येईल यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, असे ते म्हणाले. जिल्ह्यात पाणी पुरवठा योजनेची अनेक कामे केवळ कंत्राटदारांचा हलगर्जीमुळे प्रलंबित आहे. त्यामुळे अर्धवट कामे सोडून जाणाऱ्या सर्व कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करा. तसेच शेतकऱ्यांना मदत वाटप करतांना त्यांच्याकडून
पैसे मागणाऱ्या तलाठ्यांना पाठीशी न घालता त्यांचावर निलंबनाची कार्यवाही करा, अशा सुचनाही पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या.यावेळी पालकमंत्र्यांनी पाणी वापर संस्था, अरुणावती प्रकल्पावरील मच्छ बिज केंद्र, मागील मदत वाटपाचा आढावा, क्रीडा संकुल बांधकामाची सद्यस्थिती, निम्न पैनगंगा प्रकल्पामुळे खरेदी विक्रीचे थांबलेले व्यवहार आदींबाबतही माहिती जाणून घेतली. यावेळी सर्व लोकप्रतिनिधी तसेच जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांनी वेगवेगळ्या विषयांवर मुद्दे उपस्थित करून बैठकीत चर्चा केली. सुरुवातीस जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी सर्व उपस्थितांचे रोपटे भेट देवून स्वागत केले. बैठक संपल्यानंतर उपस्थितांचे आभारही त्यांनीच मानले.
0
देशात मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली – देशातील लोकसंख्या वाढीचा सरासरी दर १८ टक्के असला तरी २००१-२०११ या दशकात मुस्लिमांच्या लोकसंख्येत २४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळं देशातील मुस्लिमांची एकूण संख्या १३.४ टक्क्यांवरून वाढून १४.२ टक्के इतकी झाली आहे.
गेल्या दशकातील धर्मनिहाय जनगणनेचा अहवाल लवकरच प्रसिद्ध होणार आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला मिळालेल्या या अहवालातील ताज्या आकडेवारीनुसार, मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर आजही राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे. मात्र, नव्वदच्या दशकातील आकडेवारीशी तुलना केल्यास मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर पाच टक्क्यांनी घसरला आहे. १९९१-२००१ या काळात मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीचा दर २९ टक्के होता. तो आता २४ टक्क्यांवर आला आहे.
0
आता कंप्युटरवरूनही वापरा व्हॉट्सअॅप

सॅन फ्रॅन्सीस्को – जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजींग अॅप्लिकेशन असणारे व्हॉट्सअॅपवर आता कंप्युटरवरुनही वापरता येणार आहे. व्हॉट्सअॅपने आपली वेबबेस सेवा सुरु केली असून त्यामुळे आता लहानश्या मोबाईल स्क्रीनवर बोटे चालवून थकलेल्यांना कंप्युटरच्या मोठ्या स्क्रीनवरुन व्हॉट्सअॅपचा आनंद घेता येणार आहे.
५०० दशलक्ष युझर्स असणा-या व्हॉट्सअॅपने आपल्या या वेब सेवेला फोनवरील व्हॉट्सअॅपची डेस्कटॉपवरील मिरर अवृत्ती असल्याचे म्हटले आहे. आमच्या वेब ब्राऊसरवरुन आता मोबाईलवरील व्हॉट्सअॅप कनेक्ट करुन थेट कंप्युटरवर व्हॉट्सअॅप वापरता येणार असल्याचे व्हॉट्सअॅपने आपल्या ब्लॉगमध्ये नमूद केले आहे. त्यामुळे एकाच वेळी युझर्सला वेब आणि मोबाईलवरुन व्हॉट्सअॅप वापरता येईल आणि कुठूनही केलेला संवाद दुस-या डिव्हाइसवर दिसेल.
व्हॉट्सअॅपची ही सेवा सध्या गुगल क्रोमच्या ब्राऊसरवर वापरता येणार आहे. तर अॅपल प्लॅटफॉर्मवरील मर्यादेमुळे आयफोन युझर्सला ही सेवा वापरता येणार नसल्याचे व्हॉट्सअॅपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.ऑक्टोबर महिन्यामध्ये २२ अब्ज डॉलरला फेसबुकने व्हॉट्सअॅपला विकत घेतले होते. त्यानंतर व्हॉट्सअॅपच्या युझर्सच्या संख्येत वाढ झाली असली तरी फेसबुकने व्हॉट्सअॅपसाठी मोजलेली किंमत योग्य आहे का याबाबत टेक जाणकारांमध्ये दुमत आहे. या वेबबेस सेवे व्यतिरीक्त लवकरच व्हॉट्सअॅपवर फ्री कॉलिंगची सेवा देण्यात येणार असल्याचेही वृत्त आहे.
0
मुंबईत हाय अलर्ट

मुंबई- मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने (आयबी) वर्तवली असून सतर्कतेचा इशारा दिला आहे. हा दहशतवादी हल्ला २८ जानेवारीपूर्वी होण्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तवली आहे.
मुंबईतील सिद्धीविनायक मंदिर हे दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे. मंगळवारी सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गर्दी असते, ती संधी साधूनच हा हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर मुंबई आणि महाराष्ट्रातील सर्व गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.जमात-ऊल-दावा, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन या चार दहशतवादी संघटना देशात सक्रीय झाल्या आहेत. त्यांनी महाराष्ट्र, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि ओदिशात आपले बस्तान मांडले आहे. मुंबईत हल्ला घडवून आणण्याची जबाबदारी अब्दुल्ला-अल-कुरेशी, नासीर अली, जावेद इक्बाल, मोबीद झेमन आणि समशेर या चार दहशतवाद्यांवर सोपवण्यात आली आहे.
0
‘मन की बात’मध्ये मोदींसोबत ओबामा

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा २७ जानेवारीला ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे भारतीय नागरिकांशी रेडियोवरुन एकत्रितपणे संवाद साधणार आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.
बराक ओबामा २५ जानेवारीला भारत भेटीवर येत आहेत. ओबामा हे प्रजासत्ताकदिनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. नरेंद्र मोदी देशवासियांशी ‘मन की बात’द्वारे संवाद साधतात. यावेळी २७ जानेवारीला होणा-या ‘मन की बात’ या कार्यक्रमामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा व मी आमचे विचार एकत्रितरित्या मांडणार आहोत, असे मोदी यांनी म्हटले आहे.
0
जुन्या मुंबई-पुणे मार्गावर अपघातात, तीन ठार, पाच जखमी

पुणे- जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कान्हे फाट्याजवळ मोटारीवर टेम्पो धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर अन्य पाचजण जखमी झाले. गुरुवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर सोमाटने फाट्यावरील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कान्हे फाट्याजवळ मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणा-या टेम्पो चालकाचे कान्हे फाट्याजवळ गाडीवरील नियंत्रण सुटले. टेम्पो रस्ता दुभाजक ओलांडून रस्त्याच्या थेट विरुद्धबाजूला जाऊन मुंबईच्या दिशेने निघालेल्या एमएच ०४-इएक्स-१३४६ या मोटारीवर धडकला. या धडकेत मोटारतील तीनजण जागीच ठार झाले. तर अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, या अपघाताचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसून जुन्या व नव्या अशा दोन्ही मार्गांवरील वाहतूक सुरळीत सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.









