Archive for January 12th, 2015
0
कर्तव्य बजावतांनाच वाहतुक शिपायाचा मृत्यू

यवतमाळ, दि. १२ – पांढरकवडा रोडवर कर्तव्य बजावत असताना वाहतुक शिपायाचा मृत्यू झाल्याची घटना आज सोमवारी रात्री ७ वाजता घडली. सिंगण दुबे असे मृतकाचे नाव असून ते जिल्हा वाहतुक शाखेत कार्यरत होते. आज दुपारच्या सत्रामध्ये दुबे व जोशी नामक शिपायाची पांढरकवडा बायपासवर ड्युटी लागली होती. त्यामुळे दोन्ही शिपायी बायपासवर कर्तव्यावर गेले होते. अशातच रात्री अचानक हृदयात त्रास होत असल्याने खाली बसले. यावेळी पोलीस शिपायी जोशी यानी दुबे यांना पोलीसांच्या वाहनाने नेऊन येथील कै. वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याना मृत घोषित केले. या घटनेची माहीती मिळताच पोलीस कर्मचाºयानी रुग्णालयात गर्दी केली होती. या घटनेमुळे पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
0
खूनातील दोन आरोपींस अटक

बाभूळगाव दि. १२ – तालुक्यातील दाभा शिवारात इसमाचा खून करणाºया दोन आरोपींना पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली.
श्रीकृष्ण गोविंदराव भडके (५५), सुरेश बालाजी मेश्राम (६०) दोन्ही रा. दाभा अशी आरोपींची नावे आहे. नववर्षाच्या पहाटेला दाभा शिवारात धामक फाट्यालगत सुभाष नामदेव पवार (४५) रा. यरड ता. नेर या इसमाचा खून झाला होता. या इसमाचा मृतदेह रस्त्याच्या कडेला टाकून असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनात आले होते. या प्रकरणी बाभुळगाव पोलिस स्टेशनमध्ये मृतकाची आई कौसल्या नामदेव पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल केला होता. दरम्यान आज सोमवारी या प्रकरणी संशयित दोन आरोपींना विविध ठिकाणाहुन अटक केली.यातील श्रीकृष्ण याला दारव्हा येथून तर सुरेश याला राहत्या घरून अटक करण्यात आली. या संशयितांचे खुनाच्या चार दिवसांआधी मृतकासोबत क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. याचा धागा पकडून पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.
0
संतप्त आंदोलकांचा ग्रामपंचायत कार्यालयालात तीन तास ठिय्या

ढाणकी ,दि. १२ – टेभेश्वरनगर येथे नाली बांधकामासह अन्य समस्या निकाली काढाव्या या मागणीसाठी तेथील नागरिकांनी ढाणकी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून तीन तास ठिय्या मांडला.
टेभेश्वर नगर हे ढाणकी ग्रामपंचायतमध्ये येत असून ग्रामपंचायत प्रशासनाला १८ नोव्हेंबर २०१४ रोजी नागरिकांनी निवदन दिले होते. त्यामध्ये नाली बांधकाम, कचरा सफाई, रस्त्याचे बांधकाम करावे अशी मागणी केली होती. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने आंदोलकांना मागण्या ३० डिसेंबर पर्यंत निकाली काढणार असल्याचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु दोन महीने होऊनही ग्रामपंचायत प्रशासनाने या मागण्याकडे दुर्लक्ष केले आहे. दरम्यान आज संतप्त टेभेश्वर नगर वासीयांनी ढाणकी ग्रामपंचायतवर धडक दिली. सरपंच, सचिवांनी जनतेची दिशाभूल केली असून त्याच्यांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून तीन तास ठिय्या मांडून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. या आंदोलनाचे नेतृत्व संभाजी ब्रिगेड शहर प्रमुख विजय धोपटे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष गायकवाड यांनी केले. या आंदोलनात सय्यद अजिम, देवराव शेळके, साहेबराव धोपटे, मुन्ना भंडारे, माधव बाठोरे, शे. इसराईल, लतीम यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते.
0
दोन गटात मारहाण , लाख (रायाजी) येथे तणाव

दिग्रस, दि. १२ – क्षुल्लक कारणातून दोन गट आमने-सामने आल्याने मारहाण करण्यात आली. यामुळे गावात तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ही घटना तालुक्यातील लाख येथे घडली. आज पोलीस व ग्रामस्थांनी मध्यस्थी करून दोन गटातील तणाव निवळला.
खरकटे पाणी अंगणात टाकण्याच्या कारणातून मारहाण केली. कलिम खान याच्यासह अन्य तिघांनी मारहाण करून जखमी केले. तसेच जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. सूरज गुलाब सुरोशे याने याप्रकरणी दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी कलीम खान अमजत खान, दिलदार खान, मुश्ताक शेख फरीद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. टिव्हीचा केबल हलविल्याच्या वादातून घरात घुसून नऊ जणांनी मारहाण केल्याची तक्रार तयरणबी कलीम खान हिने पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी प्रकाश राऊत, चंद्रकांत राऊत, सुरेश सुरोशे, मोरेश्वर सुरोशे, सुमित काळे, सुमित ढोरे, राजू कोहोळ, सचिन सातव, अनंता ढोरे, विनोद चव्हाण यांच्याविरूद्ध गुन्हा नोंद केला. ही घटना काल सायंकाळी ६.३० वाजता घडली होती. मात्र तणाव सदृशस्थिती निर्माण झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे, पोलीस निरीक्षक ठाणेदार गायकवाड, ठाणेदार संजय देशमुख घटनास्थळ गाठून जमावाची समजूत काढली. त्यानंतर तणाव निवळला.
0
‘आप’ला पावणेदोन कोटी

बंगळुरू दि. १२ – आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या खर्चासाठी रविवारपासून बंगळुरूमध्ये निधी संकलनाची मोहिम सुरु केली आहे.
बंगळुरूमधून १.७५ कोटी किंवा त्यापेक्षा अधिक निधी गोळा होईल असा विश्वास कर्नाटकमधील आपच्या पदाधिका-यांनी व्यक्त केला. आपच्या दोनशे समर्थकांकडून रविवारी मोठया प्रमाणावर निधी गोळा झाला असून, या समर्थकांना अरविंद केजरीवाल यांच्यासोबत दुपारच्या भोजनासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते.
या भोजन कार्यक्रमाला शहरातील बहुतांश तंत्रज्ञ आणि व्यावसायिक उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीच्यावेळी कर्नाटकमधून आपने अडीच कोटी रुपयांची देणगी गोळा केली होती. रविवारच्या निधी संकलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, बंगळुरूमधून आपला भक्कम पाठिंबा असल्याचा दावा पक्षाने केला आहे.
केजरीवाल यांच्यासोबत सेल्फी फोटो काढण्यासाठी एकहजारपेक्षा जास्त लोकांनी नोंदणी केली होती. त्यातील फक्त २५ जणांना सेल्फी फोटो काढता आला. या २५ जणांची ड्रॉ काढून निवड करण्यात आली असे पक्षाकडून सांगण्यात आले.
0
तीन माओवादी ठार, मृतदेह सापडले

रांची दि. १२ – झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील चौपारन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बुकर गावच्या जंगलात सोमवारी पहाटे केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान (सीआरपीएफ) आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. यात तीन माओवादी ठार झाले.
त्यांचे मृतदेह पोलिसांना सापडले आहेत. चकमकीनंतर मृतदेह सापडण्याची ही अत्यंत दुर्मिळ बाब असल्याचे सीआरपीएफच्या अधिका-यांनी सांगितले.
बुकर गावच्या जंगलात सीआरपीएफचे जवान आणि माओवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. जंगलात काही शस्त्रसाठाही सापडला आहे. घटनास्थळावरुन खिळा रायफल, आयएनएसएएस आणि एसएलआर रायफल पोलिसांनी जप्त केली आहे. या भागात सीआरपीएफने तातडीने दोन विशेष पथकेही जवानांच्या मदतीसाठी पाठवली आहेत.
0
मुलासाठी २० लाख जोडप्यांचे अर्ज
बीजिंग दि. १२ – चीनची लोकसंख्या आटोक्यात आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणा-या ‘एक कुटुंब-एक मूल’ या धोरणाचे दुष्परिणाम जाणवू लागल्यानंतर चीन सरकारने दुस-या मुलाला परवानगी दिली आहे. मात्र चिनी सरकारच्या कडक धोरणामुळे हे दुसरे मूल घेतानाही नोंदणी सक्तीची केली आहे. सरकारने परवानगी दिल्यानंतर चीनमध्ये दुसरे मूल घेण्यासाठी २० लाख जोडप्यांचे अर्ज आले आहेत.
गेल्या तीन दशकात चीनने लोकसंख्या नियंत्रित केली. चीनची सध्याची लोकसंख्या अंदाजे १३० कोटी आहे. मात्र, भविष्यात कामाला सक्षम असणारी तरुणपिढी मिळणार नसल्याने आणि वृद्धांची संख्या वाढत असल्याने मोठी समस्या चीनमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळेच आपल्या धोरणात बदल करण्याचा निर्णय चीनने घेतला आहे.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब आयोगाचे प्रवक्ते माओ क्यूनन म्हणाले की, आरोग्य विभागाकडे दुसरे मूल घेण्यासाठी २० लाख अर्ज आले आहेत. सरकार लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी खास यंत्रणा तयार करणार आहे.
चीनने जानेवारी २०१४ पासून झेजियांग प्रांतात दुसरे मूल घेण्याच्या निर्णयास प्रायोगिक तत्त्वावर मंजुरी दिली आहे. आता याची अंमलबजावणी संपूर्ण देशात करण्यात येणार आहे. सध्या एक मूल असलेल्या जोडप्यांना दुसरे मूल घेण्याची परवानगी मिळेल. गर्भवती महिलांच्या आरोग्याबाबत आम्ही माहिती गोळा करणार आहे.
0
दिल्ली निवडणुकीचे बिगूल वाजले

नवी दिल्ली दि. १२ – दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपत यांनी सोमवारी पत्रकारपरिषदेत केली. विधानसभेच्या ७० जागांसाठी सात फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. तर दहा फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होतील. संपत यांच्या घोषणेसह दिल्लीत आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे.
दिल्लीत एकूण १.३० कोटी मतदार आहेत. ७० विधानसभा निवडणुकीसाठी ११ हजार ७६३ मतदान केंद्र उभारण्यात येतील असे संपत यांनी सांगितले.
याआधी दिल्लीत २०१३मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ३१ जागा मिळाल्या होत्या. तर प्रथमच निवडणूक लढवणा-या आम आदमी पक्षाला २८ जागा मिळाल्या होत्या. त्यांनी काँग्रेसच्या आठ आमदारांच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. मात्र लोकपाल विधेयक मंजूर न झाल्याने अरविंद केजरीवाल यांच्या नेत्तृत्वाखालील ‘आप’च्या सरकारने ४९ दिवसांमध्येच राजीनामा दिला होता. तेव्हापासून दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू होती. त्यानंतर न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दिल्लीत निवडणुका घेण्याची तयारी सुरु झाली. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनी चार नोव्हेंबर २०१४ रोजी दिल्ली विधानसभा विसर्जित करून नव्याने निवडणुका घेण्याची शिफारस केंद्र सरकारला केली होती.
0
साखर संकुलावर दगडफेक, गाडीही पेटवली

पुणे दि. १२ – ऊसाला एफआरपीनुसार दर न देणा-या कारखान्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत साखर संकुलाची तोडफोड केल्याचा प्रकार सोमवारी पुण्यात घडला. साखर संकुलातील गाडयाही पेटवून दिल्या. तसेच सरकारच्या निषेधाच्या घोषणाही दिल्या गेल्या, असे असतानाही खासदार राजू शेट्टींनी केलेल्या या आंदोलनाबाबत शेतक-यांमध्ये शंकाच आहे. कारण ऊस दराच्या प्रश्नावर गेल्या दोन महिन्यापासून राजू शेट्टी मूग गिळून बसले होते का ? असा सवाल शेतकरी विचारत आहेत. परंतु, खासदार राजु शेट्टींनी केलेले आंदोलन हा केवळ दिखावा आहे की उद्रेक आहे, हे आठवडाभरात स्पष्ट होईल.
गेल्या दोन महिन्यापासून गाजत असलेल्या ऊसदराच्या प्रश्नावर भाजप सरकार काहीच भूमिका घेत नसल्याचे लक्षात येताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन सुरु केले.
दरम्यान, साखर आयुक्त बिपीनकुमार शर्मा यांनी दुपारी एक वाजताची वेळ दिली होती. आयुक्तांच्या केबिनमध्ये न जाता आयुक्तांनीच शेतकरी संघटनेच्या कार्यकत्रे आणि नेत्यांपुढे येऊन म्हणणे ऐकूण घ्यावे, अशी कार्यकर्त्यांनी अपेक्षा होती. मात्र, शर्मा यांनी केवळ खासदार शेट्टी आणि त्यांचा प्रतिनिधी अशा दोनच व्यक्तींनी आपल्या केबिनमध्ये यावे, असा निरोप पाठवला. आयुक्त शर्मा यांनी खाली येण्यास नकार दिल्याने कार्यकत्रे चिडले आणि साखर संकुलची तोडफोड केली. सरकारविरोधात घोषणाबाजी करीत त्यांनी आवारातील गाडीही पेटवून दिली. अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.












