Archive for January 17th, 2015
0
आमचे मित्र तथा दै. पुण्य नगरीचे नेर येथील तालुका प्रतिनिधी अशोक इसाळकर यांच्या मुलाचा (चि. अनुराग) १८ जानेवारी रोजी वाढदिवस! चि. अनुराग याला लाख – लाख शुभेच्छा !
0
गरीब असल्याच्या कारणावरून मुलाला हाकललं

पुणे – पुण्यात चिड आणणारी एक घटना घडलीय. मॅक्डोनाल्डमधल्या एका आऊटलेटमध्ये गरीब असल्याच्या कारणावरून मुलाला धक्के मारून बाहेर काढणयात आलं. हा मुलगा मॅक्डोनाल्डमध्ये सॉफ्टड्रींक घेण्यासाठी गेला होता. हा सगळा प्रकार एका महिलेने आपल्या फेसबूकवर टाकलेल्या पोस्टवरून समोर आलाय. ही महिला त्या मुलाला मॅक्डोनाल्डमध्ये घेऊन गेली होती.
संबंधित महिला आपल्या मित्रांसह मॅक्डोनाल्डमध्ये सॉफ्टड्रींक घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी मॅक्डोनाल्डच्या बाहेर असलेल्या एका गरीब मुलाने त्यांच्याकडे तशाच सॉफ्टड्रींकची मागणी केली. सॉफ्टड्रींक देण्यासाठी ती महिला त्याला मॅक्डीमध्ये घेऊन गेली. त्यावेळी मॅक्डीच्या स्टाफने त्या गरीब मुलाला पाहून धक्के मारून बाहेर काढलं. आणि स्टाफने संबंधित महिलेलाही वाईट वागणूक दिली.
मुलाला हव्या असलेल्या सॉफ्ट ड्रींकचे पैसे मी देतेय. तरी तुम्ही त्याला का बाहेर काढताय, असं त्या महिलेने मॅक्डीच्या स्टाफला बजावलं. पण त्या महिलेचं मॅक्डीच्या स्टाफने ऐकलं नाही. उलट त्या महिलेशी असभ्य वर्तवणूक केली. ‘अशा लोकांना आतमध्ये येण्याची परवानगी नाहीए’, असं ते म्हणाले. यासगळ्या प्रकारानंतर संबंधित महिलेने बाहेर येऊन त्या मुलाला सॉफ्टड्रींक दिलं. पण सगळा संतापजनक प्रकार तिने फेसबूकवर पोस्ट केला.
पुण्यात जेएम रोडवर असलेल्या मॅक्डोलनाल्डच्या आऊटलेटमध्ये हा प्रकार घडला. पण त्यावेळी या प्रकारावर स्पष्टीकरण देण्यास मॅक्डीतील स्टाफने नकार दिला. मात्र, हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि मॅक्डोनाल्ड इंडियाला यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं. ‘या घटनेत तथ्य असेल तर संबंधित स्टाफवर योग्य ती कारवाई केली जाईल’, असं कंपनीने सांगितलं.
0
बँक ऑफ बडोद्यावर दरोडा , ९६ लाखांची लूट

धुळे – धुळ्यात धाडसी चोऱ्यांचे सत्रच सुरू असून, गुरुवारी मध्यरात्री सात दुकाने फोडल्यानंतर चोरट्यांनी शुक्रवारी मध्यरात्री बँक ऑफ बडोदा शाखेवर दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. बँकेतून तब्बल ९६ लाख सहा हजार १०८ रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत. एका आलिशान कारमधून तीन चोरट्यांनी हा दरोडा टाकल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मात्र, त्यांचे चेहरे कपड्याने झाकलेले असल्याने त्यांची ओळख पटविणे अवघड झाले आहे.
शहरातील बाजारपेठ भागातील गल्ली क्रमांक पाचमध्ये बँक ऑफ बडोदाच्या मुख्य शाखेत शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता ही चोरी झाली आहे. बँकेत एका कारमधून तीन जण आले. तिघांच्याही तोंडावर कपडा बांधलेला होता. त्यांनी बनावट चाव्यांनी बँकेचा मुख्य दरवाजा उघडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बँकेतील स्ट्राँग रूमलाही बनावट चावीने उघडले. तिजोरीतून ९६ लाख सहा हजार १०८ रुपयांची रक्कम एका बॅगमध्ये भरली. मात्र, चोरट्यांनी तिजोरीत असलेले सोने तारण योजनेतील जमा करण्यात आलेले सोने आणि इतर लॉकरमधील मुद्देमालाला हात लावला नाही. त्यानंतर बॅगमध्ये भरलेली रक्कम घेऊन आल्या दिशेने पसार झाले. चोरटे बँकेत सुमारे १५ ते २० मिनिटे होते. हा सर्व प्रकार बँकेच्या शेजारी असलेल्या दुकानांबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे.
नेहमीप्रमाणे सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास बँकेचा शिपाई साफसफाई करण्यासाठी बँकेत आला असता चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्याने तत्काळ बँकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. काही वेळातच बँकेचे मॅनेजर, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रावण सोनवणे, आझादनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास शेळके, गुन्हे शाखेचे पथक, श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजता ही घटना घडल्याचे सीसीटीव्हीमधून स्पष्ट होत आहे.
0
तांदूळ व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला

नागपूर – शहरात गुन्हेगारीने चांगलेच डोके वर काढले आहे. चोरी व लुटीच्या दोन घटनांची नोंद एकाच दिवशी झाली, तर यशोधरानगर हद्दीत तांदूळ व्यापाऱ्यावर सशस्त्र हल्ला करीत तोडफोडही करण्यात आली. या वाढत्या घटनांमुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पेट्रोल पंप संचालक अलीस शब्बर इस्माइल भाई (७०, रा. गोंडवाना चौक) यांच्याकारमधून चोरट्यांनी अडीच लाखांची रोख व धनादेश लंपास केला. ही घटना कॉटन मार्केट परिसरात शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. अलीस व त्यांचा चालक कारने जात होते. कॉटन मार्केट परिसरात त्यांची कार पंक्चर झाली. ते व चालक स्टेफनी बदलवित होते. यादरम्यान चोरट्याने कारमधील रोख रक्कम असलेली सुटकेस चोरली. गणेशपेठ पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास चालू केला आहे.
दुसऱ्या एका घटनेत चाकूचा धाक दाखवून मोटरसायकलवर आलेल्या चौघांनी सतीश चैत्यानंद डोंगरे (२४, रा. मित्रविहारनगर) याच्याकडील दोन मोबाइल, सोनसाखळी व रोख हिसकावली. ही घटना १४ जानेवारीला रात्री ८ वाजताच्या सुमारास हसनबाग ते खरबी मार्गावर घडली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
अन्य एक घटना यशोधरानगर हद्दीत घडली. प्रकाश ट्रेडिंगमधून तांदूळ न खरेदी केल्याने सात जणांनी तांदूळ व्यापारी संजित श्योमल सोम (४२) यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. मदतीसाठी गेलेले त्यांचे मित्र कालिदास डे यांनाही मारहाण करून घरासमोरील कार व पानठेल्याची तोडफोड केली. शुक्रवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडलेलया या घटनेमुळे विनोबा भावेनगर येथील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी प्रकाश ट्रेडिंग कंपनीचा संचालक प्रकाश, जितू, शिवशक्ती बारमध्ये काम करणार रफिक अन्य चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
0
बोट बुडून २१ ठार

बीजिंग- पूर्व चीनमधील जियांग्सु प्रांतातील यांगत्से नदीत एक बोट बुडाल्याने २१ जणांचा मृत्यू झाला.
या बोटीवरील एकूण २५ प्रवाशांपैकी तीन जण सुरक्षित आहेत. तर एकजण अद्यापही बेपत्ता असून त्याचे राष्ट्रीयत्व जाहीर करण्यात आलेले नाही.
या बोटीत आठजण विदेशी होते. यात चार सिंगापूर, एक भारतीय, एक इंडोनेशियन, एक मलेशियन आणि एका जपानी नागरिकाचा समावेश आहे. यात समावेश असलेला भारतीय हा सिंगापूरचा रहिवासी आहे.
0
थंडीमुळे दिल्ली, काश्मीरचे जनजीवन विस्कळीत

नवी दिल्ली/श्रीनगर- कडाक्याच्या थंडीमुळे नवी दिल्लीत सर्वत्र दाट धुके पसरले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून येथील जनजीवन विस्कळित झाले आहे. शनिवारी नवी दिल्लीतील तापमान ८.४ अंश नोदवले गेले. कारगिलमध्ये तर अक्षरश: हुडहुडी असून, तेथील तापमान उणे १५.८ नोंदवले गेले आहे.
खराब हवामानामुळे नवी दिल्लीतील विमाने आणि रेल्वे सेवेचे वेळापत्रक कोलमडले असून, ३० विमाने व ५५ रेल्वे गाडय़ा नियोजित वेळेपेक्षा काही तास उशिराने धावत आहेत.
जनशताब्दी एक्स्प्रेस, दुरोंतो एक्स्प्रेस, पंजाब मेल, ब्रह्मपुत्र मेल, ओदिशा संपर्क क्रांति एक्स्प्रेस या गाडयांना याचा फटका बसला आहे.
दरम्यान, काश्मीर खो-यात लडाख भागातही कडाक्याच्या थंडीची लाट आहे. २० जानेवारीपर्यंत वेस्टर्न डिस्टर्बन्सचा फटका जम्मू आणि काश्मीरला बसण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याच्या प्रवक्त्याने दिली. शनिवारी श्रीनगरमध्ये उणे ३.३ अंश, काश्मीर खो-यातील काझिगुंड येथे उणे ४.४, तर अंबरनाथ यात्रेसाठी प्रसिद्ध असलेल्या पहलगाव येथे उणे ६.२ तापमान नोंदवले गेले आहे.
0
बँकेची कॅश व्हॅन लुटणारे चार जण अटकेत

मुंबई- पश्चिम दृतगती महामार्गावर मिलन सब वेजवळ बँकेच्या कॅश व्हॅनमधून सुमारे दोन कोटी रुपये चोरणा-या चार संशयिताना विले पार्ले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या आरोपींकडे काही रक्कम सापडली असून त्याची मोजदाद सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. पश्चिम दृतगती महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोअर परळ येथील सुरक्षा कंपनीची बँकेची कॅश व्हॅन पश्चिम उपनगरातील एटाएम सेंटरमध्ये रोकड जमा करण्यासाठी निघाली तेव्हा गाडीत दोन कोटीहून अधिक रक्कम होती. या व्हॅनमध्ये सद्रे अलम याच्यासह अन्य तीन सुरक्षा रक्षक होते.
त्यानंतर अलम याने वरळीत गाडी थांबवून त्यातील अन्य तीन सुरक्षारक्षक आणि गाडी चालकाला चहा पिण्यासाठी उतरले होते. त्यावेळी अलमने त्यांना चहामधून गुंगीच औषध दिले. त्यानंतर गाडी मिलन सबवेजवळ येईपर्यंत त्या सर्वांना गुंगी येत होती.
चालकालाही गाडी चालवताना अवघड झाले होते. त्यातच पाठीमागून आलेल्या तीन जणांनी त्यांच्या व्हॅनसमोर गाडी उभी केल्याने व्हॅन थांबवावी लागली. त्या गाडीतील तीन चोरट्यांनी अलमच्या मदतीने व्हॅनचे लॉकर उघडून दोन कोटी चोरुन पळ काढला. याप्रकरणी पोलिसांना अलमचा संशय आला. त्याची कसून चौकशी करुन त्याच्या अन्य तीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
0
पोलीस शिपायाचा महिलेवर बलात्कार

पालघर- पालघर जिल्हा पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाने एका विधवा महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी रत्नाकर उगलमुगले या पोलीस शिपायावर तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तारापूर येथे वास्तव्यास असलेली ही विधवा महिला उदरनिर्वाहासाठी स्वयंपाक आणि जेवणाचे डबे बनवून देते. यातून तारापूर येथे राहणारा पोलीस शिपाई रत्नाकर याच्याशी तिची ओळख झाली. रत्नाकरने तिला लग्नाचे आश्वासन दिले होते.
ही महिला एकटी रहात असल्याचा गैरफायदा घेऊन रत्नाकरने तिच्यावर अनेकदा बलात्कार केला आणि नंतर लग्न करण्यास नकार दिला. तसेच या प्रकाराची कोठेही वाच्यता केल्यास तो स्वत: पोलीस असल्याने आपले कोणी काही वाकडे करु शकत नाही, अशी बोलून मारण्याची धमकीही दिली होती.
त्यानंतर मागिल २० ते २५ दिवस त्याने तिच्यावर सतत अत्याचार केल्यामुळे तिची प्रकृती ढासळली. त्यामुळे तिला पालघर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी रत्नाकर विरोधात तारापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दुर्गेश शेलार यांनी सांगितले.
0
केजरीवाल यांना निवडणूक आयोगाची नोटीस

नवी दिल्ली- आचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाने आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना नोटीस बजावली आहे.
आयोगाने बजावलेल्या नोटीसीवर केजरीवाल यांना २० जानेवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपा शहरात जातीय दंगली घडवण्याासाठी प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला होता.
केजरीवार यांच्या या आरोपानंतर दिल्ली भाजपाचे प्रमुख सतीश उपाध्याय यांनी आयोगाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत आयोगाने ही नोटीस बजावली आहे.
दिल्लीतील त्रिलोकपूरी आणि नंदनगरी येथे झालेल्या दंगलीमध्ये भाजपाचा हात होता असा आरोप केजरीवार यांनी पत्रकार परिषदेत केला होता. तसेच अशा प्रकारच्या दंगली अन्य भागातही घडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला होता. प्रथम दर्शनी केजरीवाल दोषी आढळल्याचे आयोगाने म्हटले आहे.
0
भारतीयांची जीवनसंस्कृती म्हणजे भारतीय संविधान – प्रा. डॉ. निलकंथक

यवतमाळ, दि. १७ – ‘आम्ही भारतीय लोक’ या वाक्याने भारतीयांना समर्पीत असलेले भारतीय संविधान. भारतीयांना सामाजिक, आर्थीक आणि राजकीय न्याय प्राप्त करून देणारी एक विचारधारा आहे. स्वतंत्रता, समानता व बंधूता याचाच खºया राष्टÑवादीची मांडणी करणारे संविधान प्रत्येक माणसाला सन्मानासह प्रत्येकाला जगण्याचा हक्क प्रदान करते. खाजगीकर, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या आज जिवघेण्या स्पर्धे ही सर्वासामान्य न्भारतीयांच्या आशाआकांक्षांना प्रज्वलीत करणारा भारतीयांचा एकमेव धर्मगं्रथ म्हणजे भारतीय संविधान होय. संविधान हे केवळ पुस्तक नसून भारतीयांची जीवन जगण्याची संस्कृती आहे असे प्रतिपादन संविधान विश्लेषक प्रा. डॉ. निलकंथक यांनी केले.
कोरेगाव दिनाचे औचित्या साधून ‘बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिवेषात परिवेषात भारतीय संविधान’ या विषयावर आयोजित व्याख्यानप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सर्वप्रथम महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून भीमा कोरेगाव क्रांतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात ‘स्वरधारा’ ह्या कार्यक्रमात यशवंत पाटील, जया तेलंग, निलश्वज कांबळे, धनराज गायकवाड, महादेव कांबळे, उदय कांबळे, सोनवणे, दिनेश डोंगरे, उत्तर थुल, युवराज डोमे, वावरे आदी कलावंतानी जगदिश भगत यांच्या निवेदनात आपली क्रांतीगीत सादर केलीत. कार्यक्रमाच्या आयोजनामधील भूमिका संजय गुजर यांनी विषद केली. कार्यक्रमाचे संचालन चंद्रबोधी घायवटे तर आभार सुनिल मालके यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सिध्दार्थ भगत, धम्मा कांबळे, नामदेव थूल, प्रा. शैलेश तेलंग, केशव भागवत, वनमाला राऊत, आनंद उमरे, सुर्यवंशी, सुरेश मेश्राम, हरिदास, राऊत, सातपूते, उके, संतोष गुजर, यु.पी. बन्सोडे, इंगोले, प्रकाश दातार, डॉ. किशोर बन्सोड, अशोक ताकसांडे, अश्विन खरतडे, तथा समता सैनिक दल, कास्ट्राईब कर्मचारी वैद्यकीय संघटना, प्रजासत्ताक शिक्षक कर्मचारी संघ या सर्व संघटनांच्या पदाधिकाºयांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील बहुसंख्या नागरिकांची उपस्थिती होती.
शिवकालीन शस्त्रांनी उलगडली शौर्यगाथा
यवतमाळ, दि. १७ – शिवकाळामध्ये शस्त्रांना महत्त्व अनन्यसाधारण होते. शिवाजी महाराजांनी दारुगोळा आणि शस्त्र निर्मिती कारखाने उभारले होते अफझलखान विरुद्धच्या लढाईत झालेला चिलखत, बिचवा यांचा प्रभावी वापर, शंभूकाळात झालेला धनुष्य बानाचा वापर, यात शस्त्रांची भूमिका प्रभावी राहिली आहे.येथील गुरुदेव मंगल कार्यालयात शिवकालीन शस्त्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठ्यांच्या शौर्याचा इतिहास गाजविलेल्या शस्त्रांचे दर्शन यवतमाळांनी घेतले.
शिवरायांच्या कतृत्वाने संपूर्ण महाराष्टÑात स्वराज्य स्थापन झाले. ज्या शस्त्रांच्या भरवशावर बुद्धीचातुर्याने शिवाजी महाराजांनी इतिहास घडविला. तेच राजांचा स्पर्श लाभलेले ऐतिहासिक साक्ष देणारे दूर्मिळ शस्त्रास्त्र यवतमाळकरांना बुधवारपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ वाजतापर्यंत बघता येणार आहे. या प्रदर्शनात २२५ प्रकारच्या शस्त्रांचा खजिना बघण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला. मराठा धोप, पट्टा, दांडपट्यासह तलवारी, ढाली, गुप्ती, कट्यार, खंजीर, जंबिया, बिचव्यापासून ते अंगरख्यापर्यंत असलेल्या सर्व शस्त्रांचे दर्शन यवतमाळकरांना घडले. शिवकालीन शस्त्रप्रदर्शन बघण्यासाठी शाळकरी विद्यार्थी, शिवसैनिक, शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. या प्रदर्शनीत शिवाजी महाराज यांच्या तलवारीच्या चित्रासह मावळ््यांनी वापरलेली विविध प्रकारची शस्त्रे ठेवण्यात आली आहेत. मराठा तलवारीसोबतच राजस्थानी, मुघल, नायर तलवार, गर्ज, भाले, कुºहाड, धातूच्या चर्मढाली, गुप्त्याचे विविध प्रकार, ठासणीचे पिस्तूल, धनुष्यबान, संगीन आदी शस्त्रास्त्रे प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. शस्त्रांची बारकाईने पाहणी करण्याबरोबरच विद्यार्थी व आबालवृद्धांनी माहिती देखील जाणून घेतली.
0
बाजार समितीमधील अडत्यांची ८० लाखाने फसवणूक

बाभूळगाव, दि. १७ – येथील कृषि उत्पन्न बाजार समितीमधील अडत्यांची तब्बल ८० लाख ६३ हजार ५१७ रूपयांनी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बाजार समितीचे प्रशासक कैलास खटारे यांनी बाभूळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी व्यापारी ईसराईल बेग सरदार बेग मिर्झा (४५), रा.चांदोरेनगर, यवतमाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकारानंतर सदर व्यापारी फरार झाल्याचे सांगण्यात आले आहे. येथील सात अडत्यांनी शेतकºयापासून ६ जानेवारीच्या पूर्वी सोयाबीन विकत घेतले होते. या अडत्यांनी ईसराईलबेग व्यापाºयाला तेव्हाच सोयाबीन माल विकला होता. मात्र अडत्यांचे पैशे देण्यास व्यापारी टाळाटाळ करीत होता. अडत्यांनी पैशाचा तगादा लावल्याने या व्यापाºयाने त्यांना स्टेट बँकेचे चेक दिले. मात्र ते चेक बाऊन्स (अनादरित) झाल्याने आपली फसवणूक झाल्याचे अडत्यांच्या लक्षात आले. याप्रकरणी त्यांनी प्रशासक कैलास खटारे यांना माहिती दिली. त्यावरून ही कारवाई करण्यात आली.
0
दृष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी आत्महत्या तोडगा नव्हे – संमेलनाध्यक्ष इंद्रजित भालेराव

जगतगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेला सुरूवात
उमरखेड (यवतमाळ), दि. १७ – देशाचा पोशिंदा शेतकरी सध्या नैसर्गिक दृष्ट चक्राच्या सावटात अडकला आहे. ज्या बाजूने फिरकुन पाहतो तर दररोज आत्महत्या होत असल्याच्या बातम्या ठळक बघाव्यास मिळतात.या चक्रातून बाहेर पडण्यासाठी आत्महत्याचाच स्विकार करणे म्हणजे जिवनातील चढउताराचा तोडगा नव्हे असे प्रतिपादन साहित्यीक इंद्रजित भालेराव यांनी केले.
कै. विठ्ठलराव पाटील (देवसरकर) साहित्य नगरी स्थानिक माहेश्वरी खुले नाट्यगृह ह्या ठिकाणी ग्रामीण भागातील पहिले १० वे मराठा सेवा संघ प्रणित, जगतगुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे आयोजन १६ जानेवारी ते १८ जानेवारी दरम्यान केले आहे. या संमेजनाच्या उद्घाटन प्रसंगी ते संमेलनाध्यक्ष म्हणून बोलत होते. या संमेलनाचे उद्घाटन प्रा. शेषराव मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. तर संमेलनाध्यक्ष लोककवि इंद्रजित भालेराव तर स्वागताध्यक्ष म्हणून माजी आमदार प्रकाश पाटील हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिप प्रज्वलन करण्यात आले. पुढे बोलतांना भालेराव म्हणाले की, शेतकरी जीवनचरित्र्यावर ५०० च्या वर कविता लिहील्या आहे. ईयत्ता पहिली ते बारावीमध्ये सहा पुस्तकात माझ्या कविता आहे. पुस्तके बदलण्यात आली पण कविता नाही. साहित्य परिषदेची सुरूवात डॉ. एस.एस. भोसले यांनी केली. विदर्भ कन्या तिन पिढ्याच्या स्त्री एकमेव वारसदार मॉ जिजाऊ यांचा जिवनपट कवितातून मांडला होतो असे ते म्हणाले. यावेळी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरूषोत्तम खेडेकर, डॉ. निर्मला पाटील, नगराध्यक्षा उषा आलट, माजी आमदार विजय खडसे, जिल्हाध्यक्ष दिलीप महाल्ले, माजी बांधकाम सभापती तातू देशमुख, बाबा भांड, डॉ. अशोक राणा, सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, संमेलन कार्याध्यक्ष प्रा. प्र. भा. काळे, कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर, पप्पू भोयर पाटील उपस्थित होते. संमेलनाचे प्रास्ताविक डॉ. प्र. आर. काळे यांनी केले. यावेळी विदर्भ, मराठवाड्यातील नागरिक उपस्थित होते.
0
जिल्ह्यात पल्स पोलिओ लसिकरण मोहिम , 2 लाख 66 हजार बालकांना लस पाजणार

यवतमाळ,दि.17: पल्स पोलिओ लसिकरण मोहिमेचा पहिला टप्पा उद्या दि. 18 जानेवारी रोजी जिल्हाभर राबविण्यात येणार आहे. मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ पालकमंत्री संजय राठोड
यांच्याहस्ते सकाळी 9.30 वाजता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात होईल.
जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांच्याहस्ते ग्रामीण भागात पुसद तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र बेलुरा तर जिल्हा परिषद सभापतींच्याहस्ते ठिकठिकाणी शुभारंभ होणार आहे.
पहिल्या टप्यात शहरी व ग्रामिण भागात एकूण 2 लाख 66 हजार बालकांना पोलिओ लस देण्यात येणार आहे. सदर मोहिम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागात 2343, शहरी भागात 275 असे 2618 बुथ राहणार आहे. तसेच ग्रामीण व शहरी भागात 519 ट्रांझीट टिम तसेच 114 मोबाईल पथके नेमण्यात आली आहे. मोहिमेसाठी पुरेसे मनुष्यबळ नेमण्यात आले आहे. त्यात जिल्हा व तालुकास्तरीय अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, आरोग्य विस्तार अधिकारी याशिवाय 126 वैद्यकीय अधिकारी, 154 आरोग्य सहाय्यक, 795 आरोग्य सेवक, 2295 आशा कार्यकर्ती, 2255 अंगणवाडी सेविका यासह विविध सामाजिक संघटनांचा सहभाग राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व बालकांचे लसिकरण होण्याच्यादृष्टीने पालकांनी आपल्या 0 ते 5 वर्ष वयोगटातील तसेच नव्याने जन्मास आलेल्या सर्व बालकांना पोलिओ बुथवर आणून लसिकरण करुन घ्यावे व पोलिओ मुक्तीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. के.झेड. राठोड व जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक प्रेमानंद निखाडे यांनी केले आहे.










