
यवतमाळ, दि. १९ : स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने गावागावात स्वच्छ भारत मकरसंक्रांत सप्ताह राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत सावरगड येथे आयोजित
कार्यक्रमास खा.भावनाताई गवळी यांनी सहभागी होवून तिळगुळ घ्या व प्रत्येक घरात शौचालय बांधा अशा शब्दात गावकऱ्यांना शौचालय बांधण्याचे आवाहन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, गटविकास अधिकारी श्री.ईश्वरकर, सरपंच सुहाष सरगर, प्रा.मोहनिष सवाई, प्रा.ओमी चांडक आदी उपस्थित होते. महात्मा ज्योतिबा फुले समाजकार्य महाविद्यालयाचे सावरगड येथे शिबीर सुरु असून त्या शिबीरात मकरसंक्रांतीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात खा.गवळी सहभागी झाल्या होत्या. जिल्हा परिषदेच्यावतीने मोठ्याप्रमाणावर शौचालय बांधकामाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शासनाच्यावतीने यासाठी पात्र कुटुंबाना 12 हजार रुपये शौचालय बांधकामासाठी अनुदान दिल्या जाते. त्याचा गावकऱ्यांनी लाभ घ्यावा व अधिकाधिक शौचालय बांधावे, असे आवाहन खा.गवळी यांनी केले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ.कलशेट्टी यांनी समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही त्यांना शौचालय बांधकामासाठी प्रवृत्त करून संपुर्ण गाव निर्मल ग्राम करण्यासाठी प्रयत्न करावे, असे सांगितले. प्रत्येकाने स्वच्छतेचा भ्यास घेतला पाहिजे. शासन यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे संचलन गजानन परसोडकर यांनी केले तर आभार प्रविण दळणे यांनी मानले. कार्यक्रमास गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Archive for January 19th, 2015
0
तिळगुळ घ्या व प्रत्येक घरात शौचालय बांधा – खा.भावना गवळी
0
महसूली गावात टंचाईसदृष्य परिस्थिती जाहिर
यवतमाळ, दि. 19 : जिल्ह्यात सन 2014-15 या वर्षातील खरीप हंगामातील अंतीम पैसेवारी 50 पैसे वा त्यापेक्षा कमी असलेल्या 2050 महसूली गावात टंचाई सदृष्य परिस्थिती जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक गावे पुसद तालुक्यतील आहे. या गावांमध्ये नियमाप्रमाणे सवलती लागू करण्यात येणार आहे.
टंचाई सदृष्य जाहिर करण्यात आलेली तालुकानिहाय गावांची संख्या अशी आहे. यवतमाळ तालुक्यातील 136 गावे टंचाई सदृष्य आहे. कळंब तालुका 141, बाभुळगाव 127, आर्णी 106, दारव्हा 146, दिग्रस 181, नेर 121, पुसद 187, उमरखेड 136, महागाव 114, केळापूर 131, घाटंजी 107, राळेगाव 132, वणी 160, मारेगाव 108 तर झरी जामणी तालुक्यातील 117 गावांचा समावेश आहे. टंचाई सदृष्य घोषित गावांमध्ये 8 प्रकारच्या सुविधा शासनाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यात जमीण महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीत स्थगिती, विज बिलात 33.5 टक्के इतकी सूट, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना परिक्षा शुल्कात माफी, रोजगार हमी योजनेअंतर्गत घेण्यात येणाऱ्या कामाच्या निकाषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकरचा वापर, टंचाई जाहिर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची विज जोडणी खंडीत न करणे यासारख्या सवलतीचा समावेश असल्योच जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
0
लाचेची मागणी करणाºया मंडळ अधिकाºयास अटक

यवतमाळ , दि. १९ – शेत जमिनीचे कुळ आजीचे नावे करून फेरफार करण्यासाठी साडेतील लाखाची मागणी करणाºया अमरावती जिल्ह्यातील दत्तापूर येथील मंडळ अधिकाºयास अटक केली. संजय कृष्णराव मांडवगणे (४८) असे लाच मागणाºया मंडळ अधिकाºयाचे नाव आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव , दत्तापूर सर्कलमध्ये कार्यरत होते. दत्तरामपूर येथील गट क्रमांक ६७/१ मधील शेत जमीनीचे कुळ आजीचे नावे चढवून त्याचा फेरफार करून देतो. सध्या ह्यात असलेले वारसदारांची नावे सातबारावर चढवून देतो असे म्हणून ३ लाख ५० हजार लाचेची मागणी शेतकºयाकडे केली होती. त्यापैकी पहिला हप्ता २५ हजार रुपये २ जानेवारी रोजी स्विकारण्याचे मान्य केले होते. या बाबतची तक्रार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून येथील पोलीस उपअधिक्षक सतीश देशमुख व पथकाने दत्तरामपूर येथून ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर, नंदकुमार जामकर, अरूण गिरी, नरेंद्र इंगोले, प्रकाश शेंडे,शैलेश ढोणे, अमोल महल्ले, अमित जोशी, अनिल राजकुमार, नीलेश पखाले, गजानन राठोड, सुधाकर मेश्राम, भारत चिरडे, किरण खेडकर, सुधाकर कोकेवार, विशाल धलवार यांनी केली.
0
अध्यादेशावरुन राष्ट्रपतींची मोदी सरकारला चपराक

नवी दिल्ली – सत्तेवर आल्यापासून अवघ्या सात महिन्यात नऊ अध्यादेश काढणा-या मोदी सरकारचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी जोरदार कान टोचले. सारखे सारखे अध्यादेश काढण्याची पद्धत बरी नव्हे. त्यापेक्षा सत्ताधारी व विरोधकांनी एकत्रित येऊन समस्यांवर मार्ग काढावा, अशी सणसणीत चपराक मुखर्जी यांनी मोदी सरकारला लगावली आहे.
केंद्रीय विद्यापीठ आणि संशोधन संस्थांच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मार्गदर्शन केले. त्यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या अध्यादेश संस्कृतीवर टोला हाणला. ते म्हणाले की, आपत्कालिन परिस्थितीत आणि अतिविशेष कारण असल्यावरच अध्यादेश काढण्याची तरतूद राज्यघटनेत आहे.
अध्यादेशाच्या मार्गाने कायदे मंजूर करण्याची पद्धत योग्य नव्हे. या मार्गाने विधेयक मंजूर करण्याचे धोकेही आहेत. लोकसभा किंवा राज्यसभेत सहा महिन्यात या अध्यादेशांना मंजुरी न मिळाल्यास ते रद्द होऊ शकतात, असा इशाराही राष्ट्रपतींनी दिला. नियमीत कायदा करण्याच्या प्रक्रियेला कोणत्याही परिस्थितीत टाळता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सत्ताधारी पक्षाला राज्यसभेत बहुमत नाही. त्यामुळे या समस्येतून मार्ग काढण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी एकत्रित येऊन चर्चा करणे गरजेचे आहे. राज्यसभेत विरोधी पक्षांकडे बहुमत असल्यास ते प्रस्तावाला विरोध करणार, सरकारची चिरफाड करणार हे सुसंगतच आहे. मात्र, लोकसभा किंवा राज्यसभेतील सर्वच लोकप्रतिनिधींनी सामूहिक जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे. संसद आणि विधानसभेच्या कामकाजात सातत्याने होणा-या गदारोळाबाबत मुखर्जी यांनी नाराजी व्यक्त केली.
सत्ताधारी व विरोधकांनी एकत्र येऊन गदारोळ टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. संसदेचे काम सुरळीत चालवण्याची जबाबदारी सत्ताधारी पक्षाची आहे. तसेच विरोधकांनी त्यांना कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सहकार्य केले पाहिजे. विविध अडचणीतून मार्ग काढण्यासाठी चर्चेचा मार्ग अवलंबवा, अशी सूचना राष्ट्रपतींनी सर्वच राजकीय पक्षांना केली.
ते म्हणाले की, विधेयक मंजूर करण्यासाठी संयुक्त अधिवेशन ही सुद्धा घटनात्मक तरतूद आहे. मात्र ती वास्तवात उतरणे कठीण आहे. १९५२ पासून आतापर्यंत संसदेच्या संयुक्त अधिवेशनात केवळ चारवेळाच कायदे मंजूर झाले आहेत, याकडे राष्ट्रपतींनी लक्ष वेधले. मोदी सरकारने सत्तेवर आल्यापासून अध्यादेश काढण्याचा सपाटा लावला आहे. जवळपास नऊ अध्यादेश सरकारने काढले आहेत. त्यात विमा विधेयक, भूसंपादन विधेयक, कोळसा खाण वाटप विधेयक आदींचा समावेश आहे.
0
केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) मार्फत 33 जागा

केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यावतीने सहयोगी प्राध्यापक (संगणक) (4 जागा), सहाय्यक प्राध्यापक (रसायन शास्त्र) (2 जागा), सहाय्यक प्राध्यापक (प्रसुतिशास्त्र आणि स्त्रीरोग तज्ञ) (21 जागा), सहाय्यक प्राध्यापक (प्लास्टिक सर्जरी ) (6 जागा), संचालक (संस्था) या पदांकरिता पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 10-16 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 जानेवारी 2015 आहे. अधिक माहिती http://www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
0
मध्ये रेल्वे नागपूर येथे खेळाडू कोट्यांतर्गत 4 जागा

मध्ये रेल्वे नागपूर येथे खेळाडू कोट्यांतर्गत बॅटमिंटन (1 जागा), ऍथलॅटिक (2 जागा), स्विमिंग (1 जागा) या पदांकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 फेब्रुवारी 2015 आहे. यासंबंधीची जाहिरात लोकसत्ता 16 जानेवारी 2015 च्या अंकात तसेच एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 16-23 जानेवारी 2015 च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.cr.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
0
हिंदूंनो, १० मुले जन्माला घाला – शंकराचार्य

अलाहाबाद : नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हिंदूंनी प्रत्येकी १० मुले जन्माला घालावी, असा नवा संदेश बद्रीकाश्रमचे शंकराचार्य स्वामी वासुदेवानंद सरस्वती यांनी हिंदू समाजाला दिला आहे.
येथील संगमावर ‘माघ मेळ्या’त बोलताना वासुदेवानंद सरस्वती शनिवारी रात्री म्हणाले की, हिंदूंच्या ऐक्यामुळेच मोदी पंतप्रधान झाले आहेत. भारतातील हिंदूंची बहुसंख्य समाज म्हणून स्थिती कायम राखण्यासाठी प्रत्येक हिंदू कुटुंबाने १० अपत्ये जन्माला घालायला हवीत.
एवढेच नव्हेतर, संघ परिवाराशी संबंधित संघटनांनी ‘घर वापसी’च्या नावाने हाती घेतलेल्या धर्मांतर कार्यक्रमाचेही शंकराचार्यांनी समर्थन केले. ते म्हणाले की, ख्रिश्चन, इस्लाम व शीख या धर्मांची उत्पत्ती हिंदू धर्मातूनच झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या मूळ धर्मातच परत यायला हवे. ‘घर वापसी’वर कोणताही प्रतिबंध असता कामा नये व धर्मांतराविरुद्धही कोणतीही कायदेशीर कारवाई करता कामा नये, असेही ते म्हणाले. हिंदूंनी चार मुले जन्माला घालावी, या भाजपा खासदार साक्षी महाराज यांच्या विधानाने उठलेले वादळ शमलेले नसतानाच शंकराचार्य वासुदेवानंद सरस्वती यांनी आता हे १० अपत्यांचे खूळ काढले आहे.
0
ओबामांच्या सुरक्षेसाठी ९० हजार सैनिक

नवी दिल्ली- १९६२ मध्ये चीनने आक्रमण केल्यानंतर १५ हजारांची एक अशा सहा तुकड्या भारत-चीन सीमेवर भारताने तैनात केल्या होत्या. आता भारताच्या ६५व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून येणारे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या सुरक्षेसाठी विविध सुरक्षा संस्थांचे ९० हजार सैनिक तैनात केले जाणार आहेत. त्याचबरोबर अमेरिकेचे १६ हजार सैनिक, सीआयएचे एजंट, सिक्रेट सव्र्हिस एजंट आदी सुरक्षेचा लवाजमा असेल.
या सुरक्षेसाठी खास ३५ श्वान तैनात केले असून, त्यांना २० आठवड्यांचे खास प्रशिक्षण दिले आहे. या श्वानांच्या तोंडाला खास प्रकारचा मास्क लावला आहे. या मास्कमुळे साध्या गोळ्यांचा कोणताही परिणाम त्या श्वानांवर होणार नाही. तसेच व्हीव्हीआयपी गाड्या पार्किंग करताना त्या एकाच दिशेने कराव्या लागतील. या गाड्या पार्क केल्यानंतर त्यांच्या चाव्या अमेरिकन एजन्सी ताब्यात घेतील. ओबामा यांच्यासमवेत सहा विमाने येणार आहेत.
तसेच ओबामा यांच्यासारख्या दिसणा-या दोन व्यक्ती या विमानात असतील. २६ जानेवारी रोजी राजपथावर जिथे मुख्य संचलन होणार आहे, तिथे भारताच्या राष्ट्रपतींसमवेत, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ओबामा, त्यांच्या पत्नी उपस्थित राहणार आहेत. व्यासपीठाच्या भोवती ३०० मीटरपर्यंत सुरक्षा कवच तयार करण्यात आले आहे. राष्ट्रपती आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, भारताचे पंतप्रधान, संरक्षणमंत्री यांच्या खेरीज अन्य कोणालाही त्या व्यासपीठावर प्रवेश दिला जाणार नाही.
दिल्लीमधील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा अमेरिकन सिक्रेट एजन्सी आणि सीआयएच्या अधिका-यांनी आज रविवार असूनही घेतला. दिल्ली मेट्रोच्या सर्व स्टेशनांभोवती खडा पाहरा सोमवारपासून तैनात करण्यात येणार आहे. राजपथाकडे येणारे सर्व मार्ग उद्यापासून सील केले जाणार आहेत. त्या मार्गावरून जाणा-या वाहनांची कडक तपासणी केली जाणार आहे. दिल्ली विमानतळाच्या भोवती कडक सुरक्षाव्यवस्था रविवारपासून लागू करण्यात आली आहे. दिल्लीत कडाक्याच्या थंडीमुळे अनेक लोकांना जाकीट घातल्याशिवाय रस्त्यावरून फिरणे शक्य होत नाही. अशा जाकिटांची तपासणीही करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रजासत्ताक दिनी अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या सुरक्षेसाठी सात स्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे. प्रजासत्ताक दिनी विमानांवर लक्ष ठेवण्यासाठी खास रडार आहे. जमिनीपासून हवाई मार्गावर कडेकोट सुरक्षा ठेवल्याने राजधानीला लष्करी छावणीचे रूप आले आहे. या सुरक्षा व्यवस्थेसाठी मल्टी एजन्सी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. यातून राजधानीतील प्रत्येक भागावर लक्ष ठेवण्यात येईल. अमेरिकेच्या सिक्रेट सव्र्हिसचे एजंट भारतात पोहचले असून, त्यांनी दिल्ली व आग्रा येथे तपासणी सुरू केली आहे. तसेच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला येताना ओबामा हे स्वत:च्या बुलेटप्रूफ लिमोझिनमधूनच येण्याची शक्यता आहे. ओबामा बसल्यानंतर व्हीव्हीआयपी कक्षाला भारताच्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आणि सिक्रेट सव्र्हिसेस एजंटचे कडे असेल. त्याचबरोबर केंद्रीय सुरक्षा दलांनी दहशतवाद विरोधी पथक तयार केले आहे. हे पथक राजधानीतील कोणत्याही हॉटेल, गेस्ट हाऊसमध्ये जाऊन अचानक तपासणी करणार आहे.
0
प्रेमसंबंधातून घरे पेटवली, चार ठार

मुझफ्फरपूर- बिहारमधील मुजफ्फरपूरमध्ये प्रेमसंबंधातून एका विद्यार्थ्याची हत्या केल्यानंतर हे प्रकरण चिघळले असून गावातील ४० घरांना रविवारी रात्री आग लावण्यात आली. यात तिघांचा होरपळून मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी दहा जणांना अटक केली आहे.
पाटणापासून ५५ किमी अंतरावर असलेल्या मुजफ्फरपूर जिल्ह्यात सरैय्या भागातील अजीजपुर गावात रविवारी ही संतापजनक घटना घडली. संतप्त जमावाने घरे, ट्रॅक्टर, दुचाकी आणि अन्य वाहनेही पेटवून दिली. यात काहीजण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. बहिलवारा या गावातील भारतेंदु या एलएस महाविद्यालयातील विद्यार्थ्याचे मुस्लिम तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. गेल्या आठवड्यात नऊ जानेवारी रोजी भारतेंदु याचे अपहरण करण्यात आले होते. रविवारी दुपारी अजीजपुर गावापासून जवळच असलेल्या शेतात एका पोत्यामध्ये भारतेंदु याचा मृतदेह आढळला. त्यामुळे बदल्याच्या रागातून हे कृत्य करण्यात आले असावे, असा पोलिसांना संशय आहे. या घटनेनंतर गावातील परिस्थिती तणावपूर्ण असली तरी नियंत्रणात आहे. परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. येथील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीची सरकारकडून घोषणा करण्यात आली आहे. तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच सीतामढी, मुजफ्फरपूर, छपरा आणि वैशाली जिल्ह्यातील अतिरिक्त पोलिस घटनास्थळी तैनात करण्यात आले आहेत. तसेच लष्कराचे ३०० जवानांची कुमकही येथे तैनात करण्यात आली आहे.












