यवतमाळ – जिल्ह्यात विविध अपघातातमध्ये दोन जण ठार झाल्याच्या घटना नुकत्याच घडल्या. राळेगाव तालुक्यातील वाढोणा बु. येथे अज्ञात वाहनाने निलेश भाईमारे यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये जखमी झालेल्या निलेशचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी कवडू नथ्थुजी निम्मनवार (५०) रा. टकळी यांच्या तक्रारीवरून वडकी पोलिसांनी वाहन चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला. तसेच यवतमाळ येथील कोहीनुर सोसायटी जवळ एम.एच. २९ टी ३२५३ क्रमांकाच्या वाहनाने अब्दुल सत्तार रा. तायडे नगर यांना धडक दिली. यामध्ये ते जखमी झाले असून उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलिसांनी चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला.
Archive for February 4th, 2014
प्रविण दिवटेसह १० जणाविरूद्घ गुन्हा
यवतमाळ – गुन्हेगारी पार्श्वभूमि असलेल्या नितीन निघोट याच्यावर काल रात्री प्राणघातक हल्ला केला. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केला असून माजी नगरसेवक प्रविण दिवटे याच्यासह १० जणाविरुद्घ गुन्हा दाखल केला. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली तर उर्वरीत नऊ जण फरार आहे.
नितीन किसन निघोट रा. विसावा कॉलनी पिंपळगाव या माजी नगरसेवक प्रविण दिवटे याच्यावर प्राणघातक हल्ल्यातील आरोपी आहे. घटनेपासून तो फरार होता. अशातच सोमवारी रात्री दत्त चौकातील भाजी मंडीमध्ये लोखंडी रॉडने हल्ला केल्याने नितीन हा गंभीर जखमी झाला. येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविले. पुर्ववैमनस्यातून बदला घेण्याच्या हेतूने हा हल्ला केल्याचे बोलल्या जात आहे. याप्रकरणी पुष्पा किसन निघोेट यानी वडगाव रोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी किशोर पंडीत, गोलु पारधी, विक्की किनाके, विकास पाटील, प्रविण दिवटे अन्य पाच ते सहा जणाविरुद्घ भादंवि कलम ३०७, १४७, १४८, १४९ अंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान काल रात्री पंडीत याला अटक केली असून उर्वरीत आरोपी फरार आहे. अधिक तपास वडगाव रोडचे ठाणेदार विपीन बसबनिस यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक संजय शिरभाते करीत आहे.
पुरूष गटात हरियाणा तर महिला गटात एमडी स्पोर्ट्स पुणेची बाजी
अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेचा समारोप
यवतमाळ – नवजयहिंद क्रिडा मंडळाच्या वतीने आयोजित अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा स्थानिक बालाजी सोसायटी येथील मैदानात पार पडल्या. स्पर्धेत पुरूष गटात हरियाणाचा बाबा हरदास संघ तर महिला गटात एमडी स्पोटर्स पुणे ने प्रथम पारितोषिक पटकाविले. हरियाणा संघाचा प्रमोद कुमार तर पुणेची पुजा शेलार यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून गौरविण्यात आले. यावेळी विजेत्या चमूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष आ.प्रा. वसंतराव पुरके, खा.भावनाताई गवळी, माजी आ. अरूण अडसड, जि.प. अध्यक्ष प्रविण देशमुख, राष्टÑवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नानाभाऊ गाडबैले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनिष पाटील, जि.प. सदस्य राहुल ठाकरे, सिमा तेलंगे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, विदर्भ कबड्डी असोसिएशनचे रामदास दरणे आदि उपस्थित होते. पुरूष गटात अंतिम सामन्यात हरियाणाच्या बाबा हरदास क्लबने पटियालाच्या संघाला २९ विरूध्द ६ गुणांनी पराभव करीत धुळ चारली. तर महिला गटात पुणेच्या एमडी स्पोटर्स संघाने अटीतटीच्या सामन्यात पंजाबच्या राणा स्पोटर्स क्लबचा पराभव केला. शिवाय स्पर्धेत विजेत्या संघासह द्वितीय, एअर इंडीया मुंबईच्या संघाला तृतिय व साई गुजरात संघ चतुर्थस्थानी राहिलेल्या संघांना रोख पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. तसेच मॅन आॅफद सिरीज ठरलेल्या एमडी क्लब पुणेच्या पुजा शेलार हिला स्कुटी देऊन गौरविण्यात आले. बिएमडब्ल्यु पटीयाला संघातील रोहीत कुमार, राणा स्पोर्टर्स पंजाबच्या मोती चंदल, एअर इंडीया मुंबईच्या राहुल चौधरी, साई गुजरातचा रवी, अशोक संघ कलकत्त्याची पिंकी राय, पालम स्पोेटर्स दिल्लीची भावना, विदर्भ नागपूर संघाची साक्षी झेंडे, आणि महिला आश्रम पुणेची अंकीता मोहड यांना बक्षिस वितरीत करण्यात आले. स्पर्धेच्या यशस्वीतेकरीता स्वागताध्यक्ष आ.संदीप बाजोरीया, नवजयहिंद मंडळाचे अध्यक्ष विनायक बोदडे, अरूण राउत, सतिश भोयर, राजु डांगे, बाळासाहेब चौधरी, राजु जॉन, बाळासाहेब दौलतकार, प्रशांत वानखडे, चंद्रशेखर परडखे, प्रकाश दौलतकर, शंकर कुमरे, सुधिर गदरे, शंकर नागोसे, भिमराव मडावी, अनील काळे, सुरेश जवंजाळ, विष्णू बेहरे, प्रभाकर सावरकर, लक्ष्मण वेलादे, इंगळे, पप्पु तोंदवाल, अजय शेंडे, अरुण शेंडे, अरुण गवळी, प्रदिप वानखडे, हरिहर देशुख, कैलास राठोड, सुनील वानखडे, अमोल बोदडे, विलास कीनवटकर, लक्ष्मण पवार, कैलास शिंदे, सचिन दरेकर, डॉ. सुभाष डोंगरे, दिलीप मुनगीनवार, विनोद देशमुख, शाम पाचपोर, प्रा. विकास टोणे, शैलेश वानखडे यांच्यासह कार्यकत्र्यांनी सहकार्य केले.
‘लव्ह इन रिलेशनशिप’चा वाद पोलिस ठाण्यात; प्रियकराविरूद्घ बलात्काराचा गुन्हा
यवतमाळ – शहरातील संभाजी नगरामध्ये राहणाºया एका युवकाने विधवा महिलेला लग्नाचे आमिष दाखवून प्रेमाच्या जाळयात ओढून तीच्यासोबत शारीरीक सबंध प्रस्तापित केले. प्रियकर युवकाच्या कुटुंबीयाने त्याची दुसºया युवतीसोबत सगाई केल्याने तीन-चार वर्षापासून सुरु असलेले ‘लव्ह इन रिलेशनशिप’ संपुष्टात आली आहे. त्यामुळे आता हा वाद शहर पोलिस ठाण्यात पोहलचा असून पोलिसांनी प्रियकराविरूद्घ बलात्काराचा गुन्हा दाखल केला.
धामणगाव मार्गावरील राधाकृष्ण नगरीमध्ये ३५ वर्षीय भारती (काल्पनिक नाव) नामक महिला वास्तव्यास आहे. चार वर्षापूर्वी आजाराने पतीचे निधन झाल्याने ती मुला-मुलीसोबत राहत होती. अशातच मुलगा सतत आजारी राहत असून त्याला उपचारासाठी नागपूर येथील डॉक्टरकडे महिन्यातून तीन ते चार वेळा न्यावे लागत होते. त्यामुळे सदर महिला संभाजी नगरातील संतोष राठोड (३३) या युवकाची कार नेहमी भाड्याने करीत होत्या. या महिलेच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती झाल्यावर सदर युवकाने तीला प्रेमाच्या जाळ््यात ओढून लग्नाची आमिष दाखविली. त्यानंतर तीच्या सोबत शारीरीक सबंध प्रस्तापित करून लैंगिक शोषण केले. त्यांच्या प्रेमकाहानीची भनक दोघांच्याही कुटुंबाला लागली. त्यामुळे युवकाच्या आई-वडीलाने त्याचा विवाह दुसºया युवती सोबत करून देण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी विवाहयोग्य स्थळही शोधले होते. यावेळी संतोष याने सदर महिलेला सोबत नेऊन विवाह जुळलेल्या कुटुंबीयाची भेट घेऊन प्रेमाची माहिती देऊन विवाह मोडला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयाने महिलेची समजूत काढून संतोषचा पुन्हा दुसºया युवतीसोबत विवाह जुळवून साक्षगंध केले. यावेळी संतोषने पूर्णपणे सबंध तोडावे असे त्यावेळी ठरले होते. मात्र तो पुन्हा या महिलेच्या घरी जाऊन तीच्यावर पत्नीसारखा हक्क गाजवून जबरीने अत्याचार करून मारहाण करीत आहे. त्यामुळे त्याचा ‘लव्ह इन रिलेशनशिप’चा वाद पोलिस ठाण्यात पोहचला. याप्रकरणी महिलेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून संतोष राठोड याच्याविरूद्घ भादंवि कलम ४१७, ३७६, ५०४, ५०६,२९४ गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार पंजाब डोंगरदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तेजस्वीनी गिरसावळे करीत आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्यावर गुन्हा
यवतमाळ – भारतीय जनता पक्षाचे माजी राष्टÑीय अध्यक्ष नितीन गडकरी हे भ्रष्ट नेते असल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला होता. त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त केला. भाजपा शहराध्यक्षांनी दिलेल्या तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी मुख्यमंत्री केजरीवाल याच्यांविरूद्घ अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
‘आप’चे संस्थापक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत भारतीय जनता पक्षाचे माजी राष्टÑीय अध्यक्ष नितीन गडकरी हे सर्वात भ्रष्ट नेते आहेत असा आरोप केला. त्यांचे विरुद्घ उमेदवार उभा करून त्यांना संसदेत प्रवेश करु देणार नाही असे अपमानजनक वक्तव्य करून बदनामी केली. या वक्तव्याने भाजपाच्या कार्यकर्त्यामध्ये संताप व्यक्त केला. भाजपाचे शहराध्यक्ष नितीन भुतडा यांनी आज ४ फेबु्रवारी रोजी उमरखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून मुख्यमंत्री केजरीवाल याच्यांविरूद्घ अदखलपात्र गुन्हा दाखल केला.
लाचखोर गटविकास अधिकाºयास अटक
यवतमाळ – अंगणवाडी बांधकामाचे मुल्यांकन व तंटामुक्त समिती अंतर्गत निधीच्या गैरप्रकार मिटविण्यासाठी ग्रामसेवकाकडून तीन हजाराची लाच घेणाºया नेर येथील प्रभारी गटविकास अधिकाºयांस रंगेहात पकडून अटक केली. यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दुपारी १२.३० वाजता पंचायत समितीमध्ये ही कार्यवाही केली असून कर्मचाºयांमध्ये खळबळ माजली आहे.
सखाराम जयवंत इसलकर (५०) असे लाचखोर अधिकाºयाचे नाव आहे. नेर पंचायत समितीमध्ये ते विस्तार अधिकारी (पंचायत) असून त्याच्याकडे प्रभार आहे. गणेश सुर्यभान सुगदे (४०) हे नेर पंचायत समितीमध्ये ग्रामसेवक आहे. चिकणी डोमगा येथील तंटामुक्त समितीच्या निधीमध्ये गैरप्रकार व मांगला देवी येथे येथील अंगणवाडी बांधकामाची तक्रार पंचायत समितीकड ेदिली होती. या प्रकरणाची चौकशी गटविकास अधिकारी इसळकर याच्याकडे होती. ग्रामसेवकाने सदर प्रकरणाची चौकशी पूर्ण करण्यासाठी व बांधकामाचे मुल्यांकण करण्याची विनंती इसळकर यांच्याकड े केली. यावेळी ग्रामसेवकाला एकविरा कॉलनीमध्ये घरी भेटण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी चौकशीचे प्रकरण निपटविण्यासाठी व मुल्यांकण करूण देण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी रोजी ग्रामसेवकाने दोन हजार रुपये दिले. उर्वरीत तीन हजार रुपये आणून देण्याचे सांगितले होते. या प्रकरणाची तक्रार ग्रामसेवकाने येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. त्यावरून ३ फेबु्रवारी रोजी पडताळणी दरम्याण प्रभारी गटविकास अधिकाºयाने लच मांगितल्याचे उघड झाले. त्यावरून आज दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास नेर येथील कार्यालयात सापळा रचून गटविकास अधिकारी इसलकर यांना तीन हजार रुपये घेतांना रंगेहात पकडले. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. ही कार्यवाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, उपअधिक्षक सतीश देशमुख, जमादार सुशिल झघेडगेकर, दिपक इवाने नंदकिशोर शुक्ला, गजानन राठोड, अमोल महल्ले, निलेश पखाले, शैलेश ढोणे, अमित जोशी, अनिल राजकुमार, सुधाकर कोकेवार यांनी केली.
फेसबुकचा आज दहावा वाढदिवस ; जगभरातील एक अब्ज २० कोटी नेटयुझर्सना एकत्र
मुंबई- लोकसंख्येच्या विचार केल्याच चीन आणि भारत यानंतर याचा क्रमांक लागतो. गेल्या दहा वर्षे जगभरातील एक अब्ज २० कोटी नेटयुझर्सना एकत्र आणणा-या फेसबुकचा आज (चार फेब्रुवारी) दहावा वाढदिवस आहे.चार फेब्रुवारी २००४ रोजी मार्क झुकरबर्क आणि त्याच्या काही सहकार्यांनी फेसबुकची सुरुवात केली होती. आज दहा वर्षानंतर फेसबुक हा नेट आणि स्मार्टफोन युझर्सच्या जगण्यातील एक महत्त्वाचा घटक ठरला आहे.हार्वड विद्यापीठातील विद्यार्थ्यांना संवाद साधण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या या संकेतस्थळानेनंतर अनेक विक्रम नोंदवले. मार्क आणि त्याच्या काही सहकार्यांनी महिन्याला केवळ ८५ डॉलर्स असलेला सर्व्हर विकत घेऊन फेसबुकची सुरुवात केली होती.
भारत-पाकिस्तान क्रिकेट पुन्हा सुरु होणार ?
कराची – पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत पुन्हा क्रिकेट मालिका सुरु करण्यास भारताने अनुकूलता दाखवली आहे. भारतीय क्रिकेट नियामंक मंडळाचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेसाठी तयार आहेत असे पीसीबीचे अध्यक्ष झाका अशरफ यांनी सांगितले.
भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका सुरु व्हावी यासाठी श्रीनिवासन अत्यंत गंभीर आहेत. आमच्या पसंतीच्या त्रयस्थ ठिकाणी मालिका खेळवण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे. श्रीनिवासन यांच्याकडून आम्हाला सध्या तोंडी आश्वासन मिळाले आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये खात्रीलायक मालिका खेळवली जावी यासाठी आम्हाला लिखित आश्वासन हवे आहे असे अशरफ यांनी सांगितले.भारतामध्ये पाकिस्तानकडून सातत्याने होणा-या दहशतवादी कारवायांमुळे भारताने पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळणे बंद केले आहे. आयसीसीच्या उत्पनामध्ये जास्त वाटा मिळावा यासाठी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारताने एक प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावाला पाकिस्तान, श्रीलंकेने विरोध केल्यानंतर बीसीसीआयने त्रयस्थ ठिकाणी मालिकेचा प्रस्तावाला सकारात्मक संकेत दिले आहेत.
बांगलादेशात ११ जणांना जलसमाधी, ५० बेपत्ता
ढाका – बांगलादेशमधील सुमनगंज जिल्ह्यातील सुरमा नदीमध्ये नाव उलटल्याने झालेल्या अपघातात ११ जणांना जलसमाधी मिळाली तर ५० हूनही अधिक जण बेपत्ता झाल्याची माहिती अधिका-यांनी दिली.सोमवारी रात्री नऊच्या सुमारास बोटीला अपघात झाला. सकाळी तीन वाजेपर्यंत सहा जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. नावेमध्ये १५ ते २० मुले आणि महिलांचा समावेश होता.नावेला आग लागल्याने हा अपघात झाल्याचे अपघाचतून बचावलेल्या नागरिकांनी सांगितले. सुमारे ४० ते ४५ लोकांना पोहून किना-यावर पोहोचण्यात यश मिळाले मात्र ५० हूनही अधिक जण अजूनही बेपत्ता असल्याची माहीती अधिका-यांनी दिली.
सातव्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदी माथूर
नवी दिल्ली- सरकारी कर्मचा-यांसाठी महत्त्वाचा असणा-या सातव्या वेतन आयोगाच्या नेमणुकीला मंगळवारी मंजुरी देण्यात आली. माजी न्यायमूर्ती अशोक कुमार माथूर यांच्या अध्यक्षतेखाली सातव्या वेतन आयोगाला पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मंजूरी दिली.
सातव्या वेतन आयोगाला दिलेल्या मंजुरीचा फायदा ५०लाखाहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी तर तीस लाखाहून अधिक निवृत्तीवेतनधारकांना होणार आहे. आयोगाचे अध्यक्षपद माजी न्यायमूर्ती ए. के. माथूर यांना सोपविण्यात आले आहे. सातव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशी एक जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात येणार आहेत.
यापूर्वी मनमोहन सिंग यांनी मंजुरी दिलेल्या सहाव्या वेतन आयोगाची एक जानेवारी २००६ मध्ये अंमलबजावणी करण्यात आली होती.
दहावी-बारावीच्या परीक्षेवरील बहिष्कार मागे
मुंबई- दहावी-बारावीच्या परीक्षेवर मुख्याध्यापक- शिक्षकांनी टाकलेला बहिष्कार मागे घेतल्याने दहावी-बारावीच्या परीक्षा वेळेवर होतील. यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसलेल्या लाखो विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ व कायम विनाअनुदानित शाळा कृती समिती आणि संस्थाचालक, मुख्याध्यापक शिक्षक-शिक्षकेतर समन्वय समितीने दहावी-बारावीच्या परीक्षेवरील बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय मंगळवारी घेतला.
मुख्याध्यापक संघ महामंडळ, विनाअनुदानित शाळा कृती समिती आणि शिक्षकेतर समन्वय समितीच्या मुख्य पदाधिका-यांनी बालभवन मुंबई येथे शालेय शिक्षण मंत्री राजेंद्र दर्डा यांची भेट घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या हितासाठी आपण आंदोलन मागे घ्यावे राज्यातील कायम विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील ‘कायम’ हा शब्द मंत्रिमंडळाच्या बैठकीत तात्काळ काढण्यात येणार असून त्यासाठीची कार्यवाही आपल्याकडून पूर्ण झाली असल्याचे आश्वासन शिक्षणमंत्र्यांनी दिले. यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षेवरील बहिष्कार मागे घेण्यात येत असल्याची माहिती मुख्याध्यापक संघ महामंडळाचे प्रवक्ते प्रशांत रेडीज, सचिव अरूण थोरात, सुभाष माने यांनी दिली.मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर संघटनेच्या प्रतिनिधींनी शिक्षण मंत्र्यांसमोर दिलेल्या निवेदनात विविध प्रकारच्या १६ मागण्या सादर केल्या होत्या. त्यापैकी शालेय पोषण आहारासाठी मुख्याध्यापक संघ तसेच शिक्षण संचालक कार्यालयाने तयार केलेला मसुदा स्वीकारणे, यासाठीची मुख्य जबाबदारी मुख्याध्यापकावर व पोषण आहार निर्मिती व वाटपाची जबाबदारी बचत गटांवर देण्याच्या विषयावर सकारात्मक चर्चा झाली. तर मुल्यांकनास प्राप्त झालेल्या विनाअनुदानित शाळांचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठविला असून त्याला लवकरच मंजुरी मिळणार असल्याची ग्वाहीही यावेळी शिक्षण मंत्र्यांनी दिली असल्याचे रेडीज यांनी सांगितले.
इंडो-पाक बँडच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचा गोंधळ
मुंबई- पाकिस्तानी कलाकारांना भारतात कार्यक्रमाची संधी दिल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारत-पाक संयुक्त बँडची घोषणा करणारी पत्रकार परिषद मंगळवारी प्रेस क्लबमध्ये उधळून लावण्याचा प्रयत्न केला.
प्रचंड पोलिस बंदोबस्त असूनही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘पाकिस्तानी कलाकारांनो चालते व्हा’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणा देत पत्रकार परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले आहे.भारत आणि पाकिस्तान यांच्यात संबंध सुधारण्यासाठी ‘मीकाल हसन बँड’ हा वाद्यवृंद प्रेस क्लबमध्ये भारतीय कलाकारांसोबत कार्यक्रम सादर करणार होते. या संदर्भात पाकिस्तानी कलाकारांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.भारत व पाकिस्तान यांचे संबंध सुधारावेत यासाठी प्रेस क्लबने या संयुक्त बँडचे आयोजन केले आहे. शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रेस क्लबचे अध्यक्ष गुरबिर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील आणि संयुक्त पोलिस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) सदानंद दाते यांना माहिती दिली होती. या कार्यक्रमाचा निषेध करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याची पूर्वसूचना पोलिसांना होती, त्यामुळे पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही याठिकाणी निषेध व्यक्त करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने पोलिसांनी प्रेल क्लबचा मुख्य दरवाचा बंद केल्याचे सिंग यांनी सांगितले.
मात्र यामुळे पाकिस्तानी टिव्ही कलाकार बेगम नवाईश अली, बीग बॉसमधील कलाकार वीणा मलिक आणि गेल्या वर्षी दिल्ली येथे झालेल्या सिंधी सुफी संगित महोत्सवात भाग घेतलेले काही कलावंत या परिषदेच्या निमित्ताने आले आहेत. ते सर्वजण सुखरुप असल्याचे सिंग यांनी सांगितले. पाकिस्तानी कलाकारांना व खेळाडूंना विरोध करण्याची शिवसेनेची ही जुनीच भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने केलेली ही स्टंटबाजी असल्याची टीका काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे.
स्पेक्ट्रम लिलावात ४० हजार कोटींची बोली
नवी दिल्ली- यापूर्वी दोनदा स्पेक्ट्रम लिलावाकडे पाठ फिरवणा-या कंपन्यांनी दिल्ली, कोलकाता आणि मुंबई या सर्कलमधील स्पेक्ट्रम खरेदीसाठी लिलावाच्या पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे पहिल्याच दिवशी बोलीतून सरकारला ४० हजार कोटी रुपये मिळाल्याचे दूरसंपर्कमंत्री कपिल सिबल यांनी सांगितले.
लिलावात प्रथमच उतरलेल्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमने तगडे आव्हान उभे केल्याने ९०० मेगाहर्ट्झ बँडमधील ध्वनिलहरींचे हक्क राखण्यासाठी भारती एअरटेल आणि व्होडाफोन या कंपन्या झटताना दिसल्या. या अटीतटीत बोली ३९,३०० कोटी रुपयांवर गेल्याने वित्तीय तुटीने चिंतित असलेल्या सरकारला मात्र मोठा दिलासा मिळाला.
दिवसभरात बोलींच्या सात फे-या पार पडल्या. यामध्ये ३९,३०० कोटी रुपयांची बोली कंपन्यांनी लावली. या भरघोस प्रतिसादामुळे या वर्षी अर्थसंकल्पी लक्ष्यापेक्षा स्पेक्ट्रम महसूल अधिक राहील, असा विश्वास दूरसंपर्क सचिव एम. एफ. फारूकी यांनी व्यक्त केला. २०१३-१४ या वर्षासाठी ५.१६ लाख कोटीपर्यंत वित्तीय तूट रोखण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. मात्र पहिल्या नऊ महिन्यांतच ही तूट लक्ष्याच्या ९५ टक्क्यांवर गेली आहे. या पार्श्वभूमीवर हा लिलाव दिलासा देणारा ठरला आहे.९०० मेगाहर्ट्झमधील ध्वनिलहरींसाठी १६,००० हून अधिक, तर १८०० मेगाहर्ट्झमध्ये २३,००० कोटी रुपयांची बोली लागली. दिल्ली आणि मुंबईमध्ये प्रत्येकी १६ क्षेत्रांमध्ये, तर कोलकातामध्ये १४ क्षेत्रांत मागणीचा रेटा राहिला. तर १८०० मेगाहर्ट्झमध्ये गुजरात, बिहार, पश्चिम बंगाल आणि यूपी पश्चिम या सर्कलमध्ये कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा लागली.गेल्या दोन लिलाव फे-यांमध्ये मुंबई सर्कलमधील स्पेक्ट्रम खरेदीत निरुत्साह दाखवणा-या कंपन्यांनी या वेळी ध्वनिलहरी खरेदीसाठी उड्या घेतल्या. यामुळे ध्वनिलहरींसाठीची बोली आधार किमतींपेक्षा ४४ टक्क्यांनी वाढून ४७३.२३ कोटी प्रति मेगाहर्ट्झवर जाऊन हे सर्कल सर्वात महागडे ठरले. या सर्कलसाठी ३२८ कोटी प्रति मेगाहर्ट्झ एवढी आधारभूत किंमत ठरवण्यात आली होती. कोलकातामध्ये आधार किमतीपेक्षा ३८.५२ टक्क्यांनी अधिक बोली लागून ही किंमत १७२.१६ कोटी प्रति मेगाहर्ट्झवर गेली. तर दिल्लीमध्ये १९.१४ टक्क्यांनी वाढून ४२८.९२ प्रति मेगाहर्ट्झची बोली लागली. या दोन्ही सर्कलसाठी अनुक्रमे १२५ कोटी प्रति मेगाहर्ट्झ आणि ३६० कोटी प्रति मेगाहर्ट्झची आधार किंमत निश्चित करण्यात आली होती.
सचिन-सीएनआर राव यांना ‘भारतरत्न’ प्रदान
नवी दिल्ली- भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि एच-इंडेक्स ऑफ १०० मध्ये पोहचणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांना मंगळवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते भारतरत्न या देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनच्या दरबार हॉलमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला पंतप्रधान मनमोहन सिंग, संपुआ अध्यक्ष सोनिया गांधी, संरक्षण मंत्री ए. के. अँटोनी उपस्थित होते. या पुरस्कार सोहळयाला सचिनची पत्नी अंजली, त्याची दोन मुले अर्जून-सारा आणि नागेश रामचंद्र राव यांचे कुटुंबियही उपस्थित होते. कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांना आनंदाचे अनेक क्षण देणारा सचिन हा सर्वोच्च नागरी पुरस्कार पटकावणारा पहिला भारतीय क्रीडापटू आहे.














