महागाव – तालुक्यातील अतीदुर्गम भागातील बेडी पोखरी येथे जागलीसाठी गेलेल्या शेतकºयांचा खून केल्याची घटना घडली. दुधराम सखाराम चव्हाण (६५) रा. पोखरी असे मृतकाचे नाव आहे. त्याच्याकडे बेडी पोखरी शिवारात १० एकर शेती असून तुरीच्या जागलीसाठी गोकुळ नामक मुलालासोबत घेऊन गेला होता. अशातच मध्यरात्री मुलगा व ते झोपून असतांना अज्ञात मारेकºयांनी संधी साधून दुधराम याचा गळा दाबून काठ्याने जबर मारहाण केली. यावेळी आवाजाने जागा झालेल्या मुलालाही मारहाण केल्याने त्याने तो रात्रभर अंधारात एका झुडपात दबा धरून बसला. या मारहाणीमध्ये दुधराम याचा मृत्यू झाला असून हा प्रकार त्याचे मुलाने नातेवाईकांना सांगितली. या घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. पुसदच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी दिलीप राठोड याच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात मारेकºयाविरूद्घ गुन्हा दाखल केला. अधिक तपास ठाणेदार रऊफ शेख, पोलीस उपनिरीक्षक चरडे, दुधाने, इंगोले, सुभाष राठोड, गणेश राठोड, धम्मानंद केवटे, प्रकाश चव्हाण करीत आहे.
Archive for February 3rd, 2014
स्विटमार्ट गोडाऊनला आग, पाच लाखाचे नुकसान
यवतमाळ – शहरातील चापमनवाडी येथील सत्कार स्विटमार्टच्या गोडाऊनला आग लागल्याने संपूर्ण साहित्य जळून खाक झाले असून पाच लाखाचे नुकसान झाले.
सत्कार स्विटमार्टचे संचालक भगवानदास लोहाणा याचे चापमनवाडीत श्रीनाथ फु्रट प्रॉडक्टे गोडाऊन आहे. दरम्यान काल मध्यरात्री १२.४५ वाजता या गोडाऊनला अचानक आग लागली. पाहता पाहता आगीने रौद्ररुप धारण करून आतमधील सर्व साहित्य कवेत घेतले. यामध्ये पॉलीथीन, पॅकींग रोल, कार्टुन बॉक्स, पॉकीट, मटेरीयल, नमकीन पॉकीट, दरवाजे, खिडक्या, टेबल आदी पाच लाख रुपयाचे साहित्य जळुन खाक झाले. या घटनेची माहिती मिळताच नगर परिषद अग्निशन दलाचे दिलावर खॉ, यशवंत पाटील यांनी घटनास्थळी दाखल होऊन पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली. काही वेळातच ही आटोक्यात आल्याने शेजारी असलेल्या घराचे कुठलीही हानी झाली नाही.
तोतया पोलिसाने महिलेला अडीच लाखाने गंडविले
यवतमाळ – देवदर्शन घेऊन घराकडे पायी जाणाºया वृध्द महिलेला दोन तोतया पोलिसांनी गंडविल्याची घटना आज सकाळी ९.३० वाजता महादेव मंदिराजवळ घडली. या महिलेची पोत, पाटल्या, अंगठी आदी अडीच लाखाचे दागिने घेऊन तेथून पळ काढला. या घटनेने खळबळ उडाली असून महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वसंतीदेवी भुत (७२) रा. राजेंद्र नगर ह्या महादेव मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी नातवंडाने दुचाकीने या महिलेला तेथे आणून सोडून तेथून परत गेला. दर्शन झाल्यानंतर तेथून परत घराकडे जाण्यासाठी पायी निघाल्या. अशातच सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास दुचाकीने आलेल्या दोन युवकांनी सदर महिलेला अडविले. आम्ही पोलीस असून शहरात भानगडी चालू असल्याने एवढे मोठे सोने कशाला घालता असे म्हटले. याचवेळी दुचाकीने आलेल्या एका व्यक्तीला अडवून त्यालाही पोलीस असल्याची बतावणी करून सोनसाखळी घेतली. त्यामुळे या महिलेने ६० ग्रॅमची पोत, ४० ग्रॅमच्या बांगड्या, ८ ग्रॅम अंगठी अन्य दागिने (किंमत २ लाख ५० हजार )काढून दिलेले दागिने एका कागदाच्या पुडीत ठेऊन हातचखालीने उडविले. त्यानंतर त्यामध्ये टप्पराचे कडे, व रिंग आढळल्याने फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी महिलेने शहर पोलिस ठाणे गाठून या प्रकरणाची तक्रार दिली. या घटनेची माहिती मिळताच शहरचे ठाणेदार पंजाब डोंगरदिवे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिरी, डी.बी. पथकाने घटनास्थळी भेट देऊन आरोपीची शोधमोहीम राबविली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल केला. गत दोन महिन्यापूर्वी पोस्टल मैदानाजवळ मॉर्निंग वॉक करणाºया महिलेचे दागिने अशाच प्रकारे चोरुन नेले होते. या घटनेने खळबळ उडाली असून महिलांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्तवाढवावी अशी मागणी केली आहे.
कमी खर्चात आणि कमी वेळात न्याय मिळावा- न्या.भुषण गवई
ठाणे : देशाच्या शेवटच्या घटकाला न्याय मिळाला पाहिजे असा घटनेत उल्लेख आहे. शहापूर तालुक्यातील खेड्या-पाड्यातून तसेच दुर्गम भागातील लोकांना कमी खर्चात आणि कमी वेळात न्याय मिळावा यासाठी न्यायालयाची इमारत प्रेरणादायी ठरावी, अशी अपेक्षा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती भुषण गवई यांनी व्यक्त केली.
शहापूर येथील न्यायालयाच्या नवीन इमारत उदघाटन प्रसंगी न्या.गवई बोलत होते. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे समारंभाच्या अध्यक्ष स्थानी होते. न्या. प्रतिभा शेजवळ-काळे, ॲड.जगदीश घोरपडे, ॲड.प्रमोद पाटील, आमदार दौलत दरोडा यांची यावेळी उपस्थिती होती. शहापूर येथे सुंदर आणि सर्वसोईने अद्ययावत इमारत उभारण्याबद्दल त्यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धन्यवाद दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनीही या न्यायालयात काही काळ काम केले असल्याने या न्यायालयास वेगळे महत्व प्राप्त झालेले आहे. घटनेमुळे नागरिकांना अनेक अधिकार मिळाले आहेत. पत्रकार आणि कर्तव्यदक्ष अधिकारी एकत्र आल्यामुळे एक सुंदर वास्तु निर्माण झाली असल्याचे न्या.गवई यांनी सांगितले. 30 वर्षाच्या अथक प्रयत्नामुळे न्यायालयाची इमारत पूर्ण झाली. त्यामुळे एक वेगळा आनंद सर्वांना मिळाला आहे, असे सांगून न्या.सोनवणे म्हणाले की, या ठिकाणी वरिष्ठस्तर न्यायालय सुरु करणे गरजेचे आहे. पत्रकारांचे हित आणि त्यांच्या सोईसाठी इमारत उभारली असून या ठिकाणी स्वच्छता राखावी. या इमारतीत पक्षकार, वकील, पोलीस यांच्यासाठी वेगवेगळे कक्ष असून संगणीकरणामुळे पक्षकारांना प्रवेशदारावर सर्व माहिती उपलब्ध होणार आहे. ॲड.प्रमोद पाटील आणि जेष्ठ पत्रकार अरविंद भानुशाली यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. दिप प्रज्वलीत करुन आणि फीत कापून इमारतीचे उदघाटन झाले. पाटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वागत गीत सादर केले शेवटी न्या. प्रतिभा शेजवळ-काळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास अधिक्षक अभियंता अनिल गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय सोळंकी, तहसीलदार शहापूर, ठाणे जिल्ह्यातील न्यायीक अधिकारी, वकील आणि कर्मचारी उपस्थित होते.
हुक्का पार्लरवर छापा टाकून ३१ जणांना अटक
पुणे – आयटी कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या हुक्का पार्लरवर छापा टाकून पोलिसांनी ९ तरुणी आणि २२ तरुणांना पोलिसांनी अटक केली. पिंपरी-चिंचवडमधील िपपळे सौदागर येथील हॉटेल लुकलुकवर पोलिसांनी शनिवारी रात्री हा छापा टाकला.
अटक करण्यात आलेल्या मुलींमध्ये काही अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. तसेच काही जण आयटी इंजिनीअर्स आहेत. हॉटेलच्या तीन व्यवस्थापकांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी पोलिसांच्या गस्तीवर असलेल्या पोलिस पथकाला िपपळे सौदागर येथील हॉटेल ‘लुकलुक’मध्ये बेकायदा हुक्का आणि मद्याची पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार रात्री एकच्या सुमारास पोलिसांनी या हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी नऊ युवती आणि २२ युवकांचा नशेमध्ये धिंगाणा सुरू होता. हे सर्व जण हडपसर, हिजवडी, तळवडे या आयटी पार्क भागातील कर्मचारी आणि विद्यार्थी आहेत.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर ‘आम्ही जेवणासाठी इथे थांबलो होतो,’ असा कांगावा केला. मात्र, हे सर्व जण मद्याच्या नशेत असल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली. दरम्यान, या सर्वाची सकाळी अकराच्या सुमारास िपपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यामध्ये हे सर्व युवक-युवतींनी नशा केल्याचे आढळून आले. पोलिस उपायुक्त उमाप यांच्यासह सहाय्यक निरीक्षक सुनील गाडे, फौजदार अनंत व्यवहारे, सुरेश माने, अर्जुन पवार यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे सरकारचे प्रयत्न
रत्नागिरी – देशाचा समतोल विकास करण्यासाठी ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मजबूत करणे आवश्यक असून, सरकारमार्फत याच उद्देशाने विविध विकास योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी येथे केले.
स्वा. सावरकर नाटय़गृह येथे अन्न सुरक्षा योजना प्रारंभ आणि राजीव गांधी जीवनदाय योजनेंतर्गत हेल्थ कार्ड वाटप कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा जाधव, जिल्हाधिकारी राजीव जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय काळमपाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश जगताप, जिल्हा पुरवठा अधिकारी उमेश बिरारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. डी. नारोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र खंडागळे, रमेश कीर आदी उपस्थित होते.
पटेल म्हणाले की, सरकारी कृषीक्षेत्राच्या विकासासाठी आखलेल्या धोरणांचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. देशातून तीन लाख कोटींचा कृषी माल निर्यात करण्यात येत आहे. भारत जगातील पहिल्या क्रमांकाचा तांदूळ निर्यातक देश आहे. बासमती एवढीच कोकणातील हापूसला जगातून मागणी आहे. शेतक-यांनी नवे तंत्रज्ञान स्वीकारले असून, त्याचे चांगले परिणाम ग्रामीण भागात दिसून येत आहेत.
शेतक-यांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने कृषि कर्जमाफी योजना राबवली आहे. कर्जवाटपात लक्षणीय वाढ करून एकूण आठ लाख कोटीचे कृषि कर्ज वाटप करण्यात येत आहे. तांदूळाच्या हमीभावातही लक्षणीय वाढ करण्यात आलेली आहे. या सर्व प्रगतीचा लाभ सामान्य माणसाला मिळवून देण्यासाठी शासनाने अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी सुरू केली आहे, असे ते म्हणाले. जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभही ग्रामीण तसेच शहरी भागातील सामान्य जनतेला देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. रेशन दुकानदार आणि ग्रामपंचायत स्तरावरून शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती जनतेला करून दिल्यास प्रगत भारताचे चित्र साकार होईल, असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला.
जिल्ह्याच्या विकासाबाबत ते म्हणाले की, कोकणातील जिल्ह्यांच्या शेजारील जिल्ह्यांप्रमाणे विकास होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इथल्या निसर्गसंपदेचा लाभ विकासाच्या दृष्टीने करून घेणे गरजेचे आहे. पर्यावरणाचा विकास आणि स्थानिकांच्या गरजांचा विचार करताना पर्यटन क्षेत्राच्या दृष्टीने असलेल्या क्षमतेचाही विचार होणे गरजेचे आहे. अशा विविध क्षेत्रांतील विकासाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातील मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठीदेखील विविध योजना राबविण्यात येत असल्याचे पटेल यांनी सांगितले. जिल्ह्यातील ११ लाख जनतेला अन्न सुरक्षा तर १४ लाख जनतेला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ मिळणार असल्याचे जिल्हाधिकारी राजीव जाधव यांनी सांगितले.
हॉलिवूड अभिनेता हॉफमन यांचे निधन
न्यूयॉर्क – ऑस्कर पुरस्कार विजेते अभिनेता ‘फिलिप सिमोर हॉफमन’ यांचे रविवारी निधन झाले. ते ४६ वर्षांचे होते. औषधांच्या अतिसेवनाने त्यांचा मृत्यू झाल्याचे सूत्रांकडून समजते.
न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या अपार्टमेंटमधील बाथरुममध्ये हॉफमन यांचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी हॉफमन यांच्या घरातून हेरॉईन जप्त केले आहे.
हॉफमन यांना ‘कॅपोट’ या चित्रपटातील अभिनयासाठी २००६ मध्ये सर्वोत्तम अभिनेता म्हणून ऑस्कर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. १९९२ मध्ये ‘सेंट ऑफ वुमन’ या चित्रपटात त्यांनी शाळकरी मुलाची भूमिका बजावली होती. हॉफमन यांच्या मृत्यूमुळे हॉलिवूडसोबतच बॉलिवूडमध्येही शोककळा पसरली आहे.
सीएनजी प्रति किलो १५ रुपयांनी स्वस्त
नवी दिल्ली- सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी देशातील गॅस प्रकल्पातील गॅसचा पुरवठा सीएनजी कंपन्यांना पुरवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे सीएनजीच्या भावात किलोमागे १५ रुपये तर पाइप गॅसच्या भावात पाच रुपयांनी घट होणार आहे, अशी घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोईली यांनी केली.
सध्या शहरातील घरगुती व वाहनांसाठी सध्या देशातील गॅस प्रकल्पातून निर्माण होणारा ८० टक्के गॅसचा पुरवठा केला जातो. आता या क्षेत्रासाठी १०० टक्के गॅस पुरवठा केला जाईल. या निर्णयाचा फायदा दिल्ली व अहमदाबादसारख्या शहरातील नागरिकांना मिळू शकेल. मात्र, पेट्रोकेमिकल्स, पोलाद आणि तेल शुद्धीकरण कारखान्यांना लागणा-या गॅसच्या पुरवठ्यात कपात करण्यात येणार आहे.
सध्या सीएनजी तयार करण्यासाठी महागडा एलएनजी गॅस वापरला जातो. देशाअंतर्गत गॅसचा पुरवठा केल्याने आपोआपच गॅसच्या किंमती कमी होऊ शकतील. सर्वसामान्य व्यक्तींना दिलासा देण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे, असेही मोईली म्हणाले.
देशाअंतर्गत गॅस प्रकल्पातून मुंबईला गॅसचा पुरवठा केला जात असल्याने तेथील भाव कमी होणार नाहीत. दिल्ली व अहमदाबादमध्ये सीएनजीसाठी महागडा एलएनजी वायू वापरला जातो. तेथे या निर्णयाचा फायदा होणार आहे.
इटालियन खलाशी खटला: केंद्र सरकारला आठवड्याभराची मुदत
नवी दिल्ली – भारतीय मच्छिमारांची हत्या केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन इटालयिन खलाशांवर चाचेगिरीविरोधातील कायद्याअंतर्गत खटला चालवण्यासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. यासाठी येत्या १० फेब्रुवारी पर्यंत केद्र सरकारला मुदत देण्यात आली आहे.
इटालिय खलाशांवरील खटल्यासंदर्भातील अडथळे दूर करुन १० फेब्रुवारीला केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी असे आदेश न्यायमूर्ती बी.एस.चौहान यांच्या खंडपीठाने सोमवारी दिले. अँटर्नी जनरल गुलाम ई वाहनवटी यांनी केंद्राने यासंदर्भातील जवळपास सर्व त्रुटी दूर केल्या असून पुढील सुनावणीमध्ये भूमिका स्पष्ट होईल असा विश्वास व्यक्त केला.
गेल्या वर्षी १९ फेब्रुवारी रोजी दोन भारतीय मच्छीमारांवर गोळीबार केल्याप्रकरणी इटलीच्या लटोर्रे मॅसिमिलियानो आणि सॅल्वाटोर गिरोन या दोन खलाशांना अटक झाली होती. त्यांनी केलेल्या गोळीबारात अजेश बिंकी आणि जेलेस्टाईन हे दोन मच्छीमार मृत्युमुखी पडले होते. या प्रकरणी दोन्ही खलाशांवर केरळ उच्च न्यायालयामध्ये हत्येचा खटला सुरू आहे.
जनलोकपाल विधेयकाला दिल्ली मंत्रिमंडळाची मंजुरी
नवी दिल्ली- दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारने जनलोकपाल विधेयकाला मंजुरी दिली आहे. सोमवारी दिल्ली सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. हे विधेयक १६ फेब्रुवारी रोजी दिल्ली विधासभेत सादर केले जाणार आहे.
१५व्या लोकसभेचे अखेरचे अधिवेशन बुधवारपासून
नवी दिल्ली- १५ व्या लोकसभेचे अखेरचे अधिवेशन बुधवारपासून सुरू होणार आहे. तेलंगण राज्यनिर्मितीसह विविध ३९ विधेयके या अधिवेशनात मांडली जाणार आहेत.
पाच ते २१ फेब्रुवारी दरम्यान होणा-या या अधिवेशनात लेखानुदान आणि हंगामी रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी संसदीय कार्यमंत्री कमलनाथ यांनी सर्व पक्षीय नेत्यांना आवाहन केले आहे.या अधिवेशनात ३९ विधेयके सादर केली जाणार आहेत. यात जातीय हिंसाचार, तेलंगण राज्य निर्मिती विधेयक आदी महत्त्वाच्या विधेयकांचा समावेश आहे.









