यवतमाळ – वटबोरीवरून यवतमाळकडे येणाºया दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एक जण ठार तर एक जण जखमी झाला. आज सोमवारी सायंकाळी ६.४५ वाजता जोडमोहा नजीक हा अपघात झाला.
सुनिल गुणवंत गुल्हाणे (४५) रा. जामनकर नगर, यवतमाळ असे मृतकाचे नाव आहे. तर माणिक सुरपाम (४०) हे जखमी झाले. गुल्हाणे यांची वटबोरी येथे शेती असून ते दररोज ये-जा करीत होते. दरम्यान आज सायंकाळी ते एम.एच. २९ / वाय ५१६० क्रमांकाच्या दुचाकीने यवतमाळकडे परत जात होते. अशातच जोडमोहा जवळ अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. या घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. तर जखमी सुरपाम याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे. ग्रामीण पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे. या घटनेची माहिती मिळताच जामणकर नगरात शोककळा पसरली होती.
Archive for February 10th, 2014
अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार
युवतीचा मृतदेह आढळला
पुसद – दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या युवतीचा मृतदेह पुस नदीच्या पात्रात आढळल्याने खळबळ उडाली आहे. शितल दलित मुनेश्वर (१९) रा. वसंत नगर असे मृतक युवतीचे नाव आहे. ८ फेबु्रवारी रोजी ती बेपत्ता असून कुटुंबीय व नातेवाईकांनी तीचा शोध घेतला मात्र थागपत्ता लागला नव्हता. दरम्यान आज सोमवारी दुपारी पुस नदीच्या पात्रात शितलचा मृतदेह आढळला. याप्रकरणी पुसद शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृत्यूचे कारण कळु शकले नाही.
सिसीटीव्ही चित्रीकरण तपासणार
भोपाळच्या युवकाचे आत्महत्या प्रकरण
यवतमाळ – येथील हॉटेल रामायणमध्ये भोपाळ येथील एका युवकाने पिस्टलमधून गोळी झाडून आत्महत्या केली. या युवकाचा खून केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या घटनेच्या दिवसापासून तीन दिवसाचे सिसीटीव्ही चित्रीकरण तपासणा असून आज हॉटेलचे मालक व नोकराचे बयाण नोंदविले.
धर्मेंद्र हरी उजवणे (३३) रा. कोटरा सुलतानाबाद भोपाल या युवकाने ७ फेबु्रवारी रोजी सकाळी ९.३० वाजता त्याने दत्त चौकातील हॉटेल रामायनमध्ये चौथ्या माळयावरील ४०६ क्रमांकाची रुम बुक केली होती. धर्मेद्रने आत्महत्या केल्याचे दुसºया दिवशी उघडकीस आले असून त्याने आत्महत्या का केली याबाबतच विविध चर्चेला उधान आले होते. अशातच कुटुंबीय व नातेवाईकाने धर्मेद्रची आत्महत्या केली असा आरोप केला. शहरातील एका युवतीसोबत प्रेम होते, त्यातूनच तीच्या वडील व भावाने त्याचा खून केल्याचे नातेवाईकांचे म्हणने आहे. या प्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून कसुन चौकशी सुरु केली आहे. पोलिसांनी आज सोमवारी हॉटेलचे मालक व नोकराचे बयाण नोंदविले. तसेच घटनेच्या एक दिवस अगोदरपासून तीन दिवसाचे सिसीटीव्ही चित्रीकरण तपासणार आहे. त्यावरून हॉटेलमध्ये आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या संशयास्पद हालचाली तपासणार असून त्यावरून या घटनेचे सत्य बाहेर येणार आहे.
रिपाई (आठवले) तीन जागावर लोकसभा लढविणार
प्रदेशाध्यक्ष भुपेशजी थुलकर यांची माहिती
यवतमाळ – भाजपा-शिवसेना- रिपाई (आठवले) पक्षाच्या महायुतीसाठी राज्यात वातावरण पोषक असून लोकसभेच्या ३५ जागेवर महायुती विजय प्राप्त करेल,अशी माहिती रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडीयाचे (आठवले गट) प्र्रदेशाध्यक्ष भुपेशजी थुलकर यांनी दिली. येथील पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते.
राज्यात कॉग्रेस-राष्टÑवादी कॉग्रेस बद्दल जनतेमध्ये प्रंचड रोष असून जनता महायूतीच्या बाजुने आहे.रिपाई चे राष्टÑीय अध्यक्ष खा.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात पुणे,सोलापूर,नांदेड,परभणी,गंगाखेड इत्यादी ठिकाणी जिल्हा दौरे आटोपून यवतमाळ जिल्हयात पक्ष संघटन वाढविण्यासाठी आपण आलो असल्याचे ते म्हणाले तसेच जिल्हाकार्यकारणीमध्ये फेरबदल करणार असल्याचे सांगितले.राज्यात रिपाई लोकसभेत ३ जागा लढविणार आहे.याकरीता पक्षाची लोणावळा येथे राज्यकार्यकारणीची बैठक ७ फेब्रुवारीला पार पडली.रिपाईने सुरवातीपासुनच ३ लोकसभा व १ राज्यसभेच्या जागेची मागणी महायुतीच्या बैठकीत केली आहे.यामध्ये भाजपाने प्रकाश जावडेकर यांची उमेदवारी रद्द करून रामदास आठवलेना राज्यसभेवर पाठविले.याबद्दल त्यांनी भाजपचे आभार मानले.आता लोकसभेत रिपाईला कल्याण,इशान्य मुंबई यापैकी एक,सातारा,पुणे,लातूर यापैकी एक व रामटेक वर्धा यापैकी एक अशा ३ लोकसभेच्या जागा पाहिजे यामध्ये भाजपाने १ तर शिवसेनेने २ जागा द्याव्या.अशी मागणी पुढील आठवड्यात होणाºया महायुतीच्या समन्वय बैठकीत करण्यात येणार असल्याचे थुलकर यांनी सांगितले. यावेळी सामाजीक कार्यकर्ते महेंद्र मानकर यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. या पत्रकार परिषदेला विदर्भ प्रदेशाध्यक्ष सुधाकर तायडे, अनिल गोंडाने, नेरचे उपनगराध्यक्ष मोहन भोयर,नवनीत महाजन,धम्मपाल माने,राहुल तायडे उपस्थित होते.
नवीन क्रीडा धोरणामुळे क्रीडा विकासाला चालना

छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा
यवतमाळ : राज्याच्या नवीन क्रीडा धोरणामुळे विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात राज्य आघाडीवर आहे. या क्रीडा स्पर्धाद्वारे ग्रामीण भागातील खेळाडुंना उत्तेजन दिल्या जात असल्यामुळे क्रीडा विकासाला चालना मिळू लागली आहे. असे प्रतिपादन राज्याचे क्रीडा व युवक कल्याणमंत्री पद्माकर वळवी यांनी केले.
राळेगांव येथे स्व. राजीव गांधी तालुका क्रीडा संकुलच्या क्रीडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी चषक राज्यस्तर व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन प्रसंगी क्रीडा मंत्री वळवी बोलत होते. विधान परिषरदचे सदस्य माणिकराव ठाकरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके, खासदार भावना गवळी, जि.प. अध्यक्ष प्रवीण देशमुख, पं.स. सभापती अशोक केवटे, उपसभापती नलीनी पराते, जि.प. सदस्या सीमा तेलंगे, नरेंद्र ठाकरे विभागीय आयुक्त डी. आर. बन्सोड, पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, प्र. जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे, क्रीडा उपसंचालक जयप्रकाश दुबळे, विजय संतान आदि मान्यवर व्यासपीठावर होते. विविध क्रीडा स्पर्धा तसेच व्यायाम शाळांच्या अनुदानात वाढ करण्यात येत आहे. खेळाडू विद्यार्थ्यांना परीक्षेत क्रीडा गुण देण्याची तसेच शासकीय नौकरीसाठी आरक्षणाद्वारे प्राधान्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलम्पीक स्पर्धेत सुवर्ण पदक प्राप्त करणाऱ्या खेळाडूला राज्य शासनाकडून एक कोटी रुपयाचे बक्षीस व त्या खेळाडुच्या क्रीडा मार्गदर्शकाला त्या पुरस्कार रकमेच्या 25 टक्के रक्कम दिली जाते अशी माहितीही पद्माकर वळवी यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केल्यानंतर दीप व क्रीडा ज्योत प्रज्वलीत करुन क्रीडा मंत्र्यांनी राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन केले. यावेळी क्रीडा ध्वज फडकविण्यात आला. आंतरराष्ट्रीय खेळात महाराष्ट्र पुढे येत आहे. क्रिकेट सोबतच देशी खेळाचे महत्व वाढविण्यासाठी चांगले प्रयत्न झाले पाहिजे असे विचार सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केले.खेळ हे जीवनाचं अविभाज्य अंग असून तणावमुक्तीसाठी खेळाचे अधिक महत्व आहे. या क्रीडा स्पर्धेद्वारे राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ होते. असे प्रतिपादन विधानसभा उपाध्यक्ष वसंत पुरके यांनी व्यक्त केले. ग्रामीण भागातील क्रीडांगणे सुसज्ज असावी तसेच राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आयोजित झाल्या पाहीजेत अशी अपेक्षा पुरके यांनी केले. खेळ हा व्यायामाचा प्रकार असून आरोग्यासाठी उत्तम आहे. परीक्षेसाठी क्रीडा गुण दिले जात असल्यामुळे मुलांना खेळाकडे प्रोत्साहित करण्याचा पालकांचा कल दिसून येतो ही चांगली बाब आहे असे मत खासदार भावना गवळी यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागात खेळाडुंना चांगल्या सुविधा निर्माण कराव्यात अशी मागणी जि.प. अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी याप्रसंगी केली.आमदार माणिकराव ठाकरे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करुन खेळाडूंना शुभेच्छा दिल्यात. विभागीय आयुक्त डी.आर बनसोड यांनीही आपले विचार मांडलेत. राज्यातील आठ विभागातील एकूण 32 चमू या व्हॉलीबॉल स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत. 18 व 21 वयोगटातील मुलमुली खेळण्यासाठी आले असून ह्या क्रीडा स्पर्धा 13 फेब्रुवारी पर्यंत या मैदानावर होत आहेत. विजेत्या चमूना सुमारे 17 लाख 60 हजाराची रोख बक्षीसे दिली जातील अशी माहिती क्रीडा उपसंचालक जयप्रकाश दुबळे यांनी प्रास्ताविकात दिली.याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधव काळे, तालुका समन्वय समितीचे अध्यक्ष अरविंद वाढोणकर, राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे प्रमोद धुर्वे, जलालुद्यिन गिलानी, उपविभागीय अधिकारी मोहन जोशी, भागवत डोईफोडे, तहसिलदार सुरेश कवडे, प्रतिष्ठीत नागरिक नरेंद्र जयसिंगकार, विवेक दौलतकार, पवन छोरीया, रमेश बोभाटे, विनोद उगेमुगे, सतीश डाखोरे यांचे सह खेळाडू उपस्थित होते.सूत्रसंचालन कैलास राऊत यांनी केले. जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक खंडारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
11 हजार ग्रामपंचायती होणार ई-बँकींग
यवतमाळात 200 ग्रामपंचायतीमध्ये बँकींग सेवेस प्रारंभ
यवतमाळ : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना त्यांच्या हक्काच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. छोट्या मोठ्या कामांसाठी त्यांना गावाबाहेर जाण्याची गरज भासू नये, यादृष्टीने महाराष्ट्र शासन वाटचाल करीत आहे. प्रशासन लोकाभिमूख करण्यासोबतच ग्रामीण जनतेला दिलासा देण्यासाठीच ई-प्रशासनावर जोर देण्यात येत असून ई-बँकींग हा त्यातला महत्वाचा भाग आहे. ग्रामपंचायतींमध्ये ई-बँकींग सेवा सुरु होणे ग्रामीण महाराष्ट्राच्यादृष्टीने अतिशय महत्वाचे पाऊल असल्याचे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.
जिल्ह्यातील परसोडी बु. येथील ग्रामपंचायतीमध्ये ई-बँकींग सुविधेचे उद्घाटन श्री.पाटील यांच्याहस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. परसोडी ही ई-बँकींग सुविधा देणारी देशातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. परसोडी सोबतच यवतमाळ जिल्ह्यातील 200 ग्रामपंचायतीमध्ये ई-बँकींग सेवेचा शुभारंभ झाला. शुभारंभा प्रसंगी अजिक्य जगताप या युवकाने ई-बँकींगव्दारे पाचशे रुपये आपल्या खात्यात जमा केले. त्याची पावती ग्रामविकास मंत्र्यांनी यावेळी त्याला सुपुर्द केली.
उद्धाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष प्रा.वसंत पुरके तर प्रमुख पाहुणे म्हणून खा.भावना गवळी, आ.संदीप बाजोरीया, आ.वसंतराव खोटरे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एस.एस.संधू, उपसचिव एकनाथ मोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रविण देशमुख, अमरावती जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुरेखा ठाकरे, बुलडाणा जिपच्या अध्यक्षा वर्षाताई वानरे, गडचिरोलीच्या अध्यक्षा भाग्यश्री आत्राम, नागपूरच्या अध्यक्षा संध्याताई गोतमारे, वर्धाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ढगे, अकोल्याचे अध्यक्ष शरद गवई, वाशीम जिपचे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, बुलडाणाचे उपाध्यक्ष पांडूरंग पाटील, ठाणे जिपचे उपाध्यक्ष इरफान भुरे, यवतमाळ जिपचे सभापती सुभाष ठोकळ, मनमोहनसिंह चव्हाण, प्रभाकर उईके, प्राजक्ता मानकर, माजी आमदार राजू तिमांडे, केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाचे राज्य सदस्य अविनाश देशमुख, प्रभारी जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी, बँक ऑफ बडोदाचे जनरल मॅनेजर किशोर खरात, सीईओ भगवान गाडगे आदी उपस्थित होते.
अलिकडे माहिती तंत्रज्ञानाने क्रांती केली. शहरातील शिक्षीत वर्गाने या क्रांतीचा उपयोग करुन घेतला. बंगलोरसारख्या शहरात अगदी कमी वयात संगणक क्षेत्रात नोकऱ्या मिळवणारे युवक चांगले पगारदार बनले. माहिती तंत्रज्ञानाची ही क्रांती ग्रामीण भागातही पोहचली पाहीजे. त्यादृष्टीनेच काही वर्षात राज्याशासन प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच 28 हजार गावात संगणक पोहचले. राज्यात ई-पंचायत सुरु झाली. केंद्र शासनाने त्याचा गौरव केला. लोकांपर्यत त्यांच्या हक्काच्या सुविधा पुरविण्यासाठीच ही धडपड आहे. यवतमाळ सारख्या जिल्ह्यात ग्रामपंचायत असलेल्या गावातही बँकांची शाखा नाही. आपल्या कामांसाठी लोकांना लांबवर दुसऱ्या गावी जावे लागते. प्रत्येक गावात बँकेची शाखा त्वरीत उघडणे शक्य नाही. त्यामुळेच गेल्या काही दिवसांच्या प्रयत्नांमुळे ई-बँकींग प्रणाली अस्तित्वात आली असल्याचे पुढे बोलतांना श्री.पाटील यांनी सांगितले.
ई-बँकींग सुविधा राबविण्यासाठी 27 राष्ट्रीयकृत बँकांसोबत शासनाने करार केला आहे. त्यामुळे आता गावातच नागरिकांना बँकेचे खाते उघडता येईल. आर्थिक व्यवहार करता येईल. कर्ज प्रकरणे मंजूर करण्यासोबतच कर्जाची रक्कमही ई-बँकींगच्या माध्यमातून ग्रामपंचायतीतूनच काढता येतील व जमाही करता येईल. भविष्यात मोबाईल, टेलिफोन, वीज बिलाचा भरणा करण्यासोबतच रेल्वे व बसचे आरक्षणही आपल्याच गावात ई-बँकींगव्दारे होणार आहे. आता छोट्या मोठ्या कामांसाठी नागरिकांना बाहेरगावी जावे लागणार नाही, असे ग्रामविकासमंत्री म्हणाले.
जगातील सुविधा सामान्यांच्या घरापर्यंत पोहचवीणे राज्याकर्त्यांचे काम आहे. या सुविधा पोहचविण्यासाठी येणारे अडथळे आम्ही दुर करतो आहे. ई-बँकींगसाठी काही ठिकाणी इंटरनेट कनेक्शनचा प्रश्न उद्भवू शकतो, त्यासाठी ऑप्टीकल फायबर ठिकठिकाणी टाकले जाणार आहे. त्यामुळे ही अडचणही भविष्यात राहणार नाही, असे त्यांनी सांगितले. राज्यात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न आहे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत ग्रामपंचायतींचे गट करुन येथील कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ठराविक रक्कम शासन देणार आहे. सरपंचांच्या मानधन वाढीचाही प्रश्न आहे. त्यावरही लवकरच योग्य पर्यांय काढू, असे ग्रामविकास मंत्री म्हणाले.
यावेळी विधासनसभा उपाध्यक्ष प्रा.वसंत पुरके यांचेही भाषण झाले. ई-बँकींगसेवेमुळे महिलांना खऱ्या अर्थाने फायदा होणार आहे. ही सुविधा ग्रामीण भागासाठी क्रांतीकारी पाऊल ठरेल. बचतीला प्रोत्साहन देण्यासोबतच पारदर्शकता वाढीस लागेल, असे सांगून या सुविधेची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. खा.भावना गवळी, आ.संदीप बाजोरीया, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रविण देशमुख, अमरावतीच्या अध्यक्षा सुरेखा ठाकरे यांचीही यावेळी भाषणे झाली. प्रास्ताविक प्रधान सचिव एस.एस.संधू यांनी केले. ग्रामपंचायतीत बँक हे स्वप्न साकार झाले असल्याचे ते म्हणाले. भविष्यात विविध प्रकारचे अनुदान ई-बँकींगव्दारे वितरीत केल्या जातील, असे त्यांनी सांगितले.
राजू शेट्टी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल
कोल्हापूर- २०१२मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलेल्या ऊस दरवाढ आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या पोलिस हेड कॉन्स्टेबल मोहन दिनकर पवार(५६, रा- लाईन बजार, कसबा बावडा) यांच्या मृत्यू प्रकरणी खासदार राजू शेट्टी यांच्यासह अन्य ८४ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ७८वे आरोपी असलेल्या राजू शेट्टी यांच्यासह ८४ जणांवर शिरोली पोलिसांनी रविवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.
ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नोव्हेंबर २०१२मध्ये आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान पोलिस आणि स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात झटापट झाली होती. यात चार आंदोलकांसह पोलिस हेड कॉन्स्टेबल मोहन पवार जखमी झाले होते. पोलिस आणि आंदोलनकत्यांमध्ये झालेल्या झटापटीवेळी पवार यांनी हेल्मेट घातले होते. मात्र आंदोकरांनी ते काढून त्यांच्या डोक्यात लोखंडी सळीने हल्ला केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच यासंदर्भात पुरावेही असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या घटनेनंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन महिन्यांच्या उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले होते. मात्र काही दिवसांनंतर त्यांच्या नाकातून सतत पाणी येत होते. ऑगस्टमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र की काही कारणामुळे पुढे ढकलण्यात आली होती. दरम्यान पवार कोमात गेले. त्यांच्यावर कदमवाडी येथील रुग्णालयात उपचार सुरु होते. रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे १२ नोव्हेंबर २०१२ रोजी झालेल्या या घटनेबद्दल पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केली नव्हती. मात्र रविवारी(नऊ फेब्रुवारी) पवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्ह्याचे स्वरुप बदलले आहे.दरम्यान, राजू शेट्टी यांनी पवार यांचा मृत्यू दुदैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा पवार यांच्यावर जीवघेणा हल्ला हेतू नसल्याचे म्हटले आहे.
कसोटी क्रमवारीत अश्विन, पुजाराची घसरण
दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत भारतीय खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि आर. अश्विन यांची घसरण झाली आहे. कसोटी क्रमवारीतील फलंदाज पुजाराची सहाव्या क्रमांकावर तर गोलंदाजीमध्ये आर. अश्विनची आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. आयसीसीने सोमवारी कसोटी क्रमवारी जाहीर केली.
यादरम्यान विराट कोहलीने ११ व्या क्रमांकावरील आपले स्थान कायम राखण्यात यश मिळवले आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात शतक झळकावलेला रोहित शर्मा ३६ व्या स्थानावर आहे. तर प्रग्यान ओझा ११ व्या स्थानावर आहे. न्यूझीलंडच्या ट्रेट बोल्टने कसोटीतील गोलंदाजीच्या क्रमवारीत सातवे स्थान पटकावले आहे तर साऊदीने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदा टॉप टेनमध्ये बाजी मारली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सतत होणा-या पराभवाचा फटका भारताच्या कसोटी क्रमवारीवरही होण्याची शक्यता आहे. ऑकलंड येथील न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ४० धावांनी पराभव झाला होता. जर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने बाजी मारली तर भारताचे कसोटी क्रमवारीतील दुसरे स्थान धोक्यात येऊ शकते. सध्या दक्षिण आफ्रिका १३३ गुणांनी आघाडीवर आहे तर ऑस्ट्रेलिया १११ गुण कमावून तिस-या स्थानावर आहे.
तेजपालच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांची वाढ
पणजी – महिला पत्रकाराचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी कोठडीत असलेले तहलकाचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची न्यायालयीन कोठडी आणखी १४ दिवसांनी वाढवण्यात आली आहे.
गोव्यात महिला पत्रकाराचा लैंगिक छळ केल्याप्रकरणी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गोवा पोलिसांनी तेजपालला अटक केली होती. तेजपालने यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे. तेजपालला आतापर्यंत दोन महिने पोलिस तसेच न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.सध्या तेजपाल वास्को येथील साडा कोठडीत आहेत.
आसाराम तुरुंगातच रहाणार, जामीन नामंजूर

जोधपूर – अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूचा जामीन अर्ज सोमवारी राजस्थान उच्च न्यायालयाने फेटाळून लावला. बचाव पक्षाचे ज्येष्ठ वकिल राम जेठमालानी यांचा युक्तीवाद न्यायमूर्ती नीरमल जीत कौर यांच्या न्यायालयाने फेटाळून लावला.
जामीन मंजूर व्हावा यासाठी जेठमालानींनी पिडित तरुणीच्या आरोपांवर प्रश्न उपस्थित केले होते. पिडित तरुणी आई-वडिलांसह स्वत: आश्रमात आली होती तसेच आसाराम ब-याच काळापासून तुरुंगात असल्याने ते अशक्त आणि आजारी आहेत हा जेठमालानींचा युक्तीवाद न्यायालयाने फेटाळून लावला. सरकारी वकिल महीपाल बिष्णोई यांनी बचाव पक्षाचे सर्व मुद्दे खोडून काढून जामीनाला विरोध केला होता. युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने तीन फेब्रुवारीला निर्णय राखून ठेवला होता. अखेर सोमवारी न्यायालयाने जामीन फेटाळून लावला. आसाराम ऑगस्ट महिन्यापासून तुरुंगात आहेत. त्याच्यावर आश्रमात आलेल्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. आसारामचा मुलगा नारायण साईही बलात्काराच्या आरोपाखील तुरुंगात आहे. त्याच्यावर सूरतमधल्या दोन सख्ख्या बहिणींनी लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.
५० लाख कोटींचे व्यवहार बंद
मुंबई- बँक कर्मचा-यांच्या दोन दिवसीय संपामुळे धास्तावलेल्या ग्राहकांनी मुंबई, ठाण्यासह ठिकठिकाणी एटीएम सेंटरमधून रोकड काढून घेतल्याने रविवारी संध्याकाळी अनेक एटीएम सेंटरमधील गंगाजळी संपुष्टात आली. रविवारी कॅशचा भरणा होत नसल्याने आणि सोमवार, मंगळवारच्या संपामुळे बँका बंद आणि एटीएममध्येही खडखडाट या परिस्थितीत हजारो बँक ग्राहकांना व्यवहारासाठी रोकड उपलब्ध होणार नाही. या अभूतपूर्व परिस्थितीत सर्वसामान्य ग्राहकांचे सर्वाधिक हाल होणार आहेत. रविवारसह सलग तीन दिवस आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील सुमारे ५० लाख कोटींचे व्यवहार थंडावणार आहेत.
सर्व सरकारी बँकांच्या कर्मचा-यांसह प्रमुख खासगी बँकांचे कर्मचारीही या देशव्यापी संपात सहभागी झाले आहेत. बुधवारी सकाळीच बँकांचे दरवाजे उघडणार असून एटीएम सेंटरमध्ये रोकड भरणा बुधवारीच होईल. तेव्हाच ही परिस्थिती पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी बँक कर्मचा-यांच्या सर्व संघटनांनी संपाचे हत्यार उपसले आहे. या संपकाळात सर्व चेक क्लिअरिंग, पैसे काढणे, एटीएम असे सारे व्यवहार बंद राहणार आहेत. बँकांच्या सुमारे ७ ते ८ हजार शाखा, सात हजार एटीएम सेंटर या काळात बंद असतील. सार्वजनिक क्षेत्रातील २७ बँका, १२ खासगी आणि ८ विदेशी बँकांचे कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत.ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन संघटना संपाबाबत ठाम आहे, असे संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्वास उटगी यांनी सांगितले. पाच वर्षात बँकांची उलाढाल तिप्पट वाढली. त्यांच्या नफ्यात १० टक्क्यांनी वाढ झाली. तरीही वेतनवाढीबाबत सरकारने काहीच हालचाली केल्या नाहीत. या संपामुळे ग्राहकांना होणा-या त्रासाला भारतीय रिझव्र्ह बँक जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. सोमवारी दुपारी १२ वाजता आझाद मैदान येथे कर्मचा-यांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे, असेही ते म्हणाले. मुंबईतील १५ हजार एटीएममध्ये रविवार वगळता रोज रोख रक्कम भरली जाते. मात्र, सोमवार, मंगळवारी संप असल्याने रोख रक्कम भरता येणार नाही. त्यामुळे सर्वत्र एटीएममध्ये पैशांचा खडखडाट होण्याची शक्यता आहे. संप संपल्यावर बुधवारी संध्याकाळनंतर एटीएममधून पैसे मिळू शकतील. आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा, एचएसबीसी आणि एचडीएफसी या खासगी बॅँक सुरू राहणार आहे. तसेच या बॅँकांची सर्व एटीएमही सुरू राहतील.
शीतगृहात वायूगळती, दोन अत्यव्यस्थ
नवी मुंबई- नवी मुंबईत वाशी येथील मॅफ्को मार्केटमधील शीतगृहात वायूगळती झाल्यामुळे २० जणांना बाधा झाली. त्यापैकी दोघांची प्रकृती अत्यव्यस्थ आहे. त्यांच्यावर नवीमुंबई महापालिका रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. वाशी येथील सेक्टर १८ मधील हिरावती कोल्ड स्टोरेजमध्ये रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास अमोनिया वायूची गळती झाली. येथे माशांवर प्रक्रिया केली जाते. वायूगळती झाल्याने येथील २० कर्मचा-यांना त्रास जाणवू लागला. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. यापैकी १८ जणांना प्राथमिक उपचार करुन घरी सोडण्यात आले. मात्र दोन जणांची प्रकृती अत्यव्यस्थ असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले आहे.










