पांढरकवडा – ११ दिवसापूर्वी ताडउमरी शिवारातील मृतदेह आढळलेल्या महिलेच्या खूनाचा उलगडा झाला. दारुपिऊन विवस्त्र नाचत असल्याने पतीनेच तीचा खून केल्याची कबुली त्याने दिली.
रामदास आत्राम रा. शाम नगर असे आरोपीचे नाव आहे. ताडउमरी शिवारात पटेल यांच्या शेतात कमला रामदास आत्राम या महिलेचा मृतदेह २१ फेबु्रवारी रोजी आढळला होता. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. महिलेचा मृत्यूबाबत शहरात उलट सुलट चर्चेला उधान आले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला. अशातच कमलाचा खून तीच्या पतीनेच केल्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी त्याची शोधमोहीम सुरु केली. दरम्यान काल रात्री रामदासला अटक केली असता त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. १६ फेबु्रवारी रोजी रामदासने घरी मटन आणून दिले व बाहेर गेला. काही तासानंतर घरी परत येताच पत्नी कमला ही दारुच्या नशेत विवस्त्र नाचत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे राग अनावर झाल्याने लाथा बुक्कयाने मारहाण केल्याने सदर महिलेचा मृत्यू झाला. ही बाब लक्षात येताच आरोपीने तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर दुसºया दिवशी मृतदेह खांद्यावर घेऊन ताडउमरी शिवारातील पटेल यांच्या शेतात फेकुन विल्हेवाट लावल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी भालचंद्र महाजन यांच्या मागर्दशनाखाली सहा. पोलीस निरीक्षक राखी गेडाम यांनी केली.
Archive for March 4th, 2014
पतीनेच केला पत्नीचा खून, कमला आत्राम मृत्यू प्रकरण
युवकावर प्राणघातक हल्ला
यवतमाळ – शेतातून घराकडे परत येत असताना युवकावर कुºहाडीने हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सायंकाळी भांबराजा येथे घडली. सुरेश परसराम चव्हाण (२५) रा. भांबराजा असे जखमी युवकाचे नाव आहे. ३ मार्च रोजी तो गावातीलच एका शेतकºयांच्या शेतात तुºहाट्या आणण्यासाठी गेला होता.तुºहाट्या न मिळाल्याने तो घराकडे परत येत होता. अशातच आरोपी संतोष आडे (३०) याने दारुच्या नशेत कुºहाडीने सुरेशच्या डोक्यावर वार केले. यामध्ये तो गंभीर जखमी झाला असून येथील वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी आरोपी संतोषविरूद्घ भादंवि कलम ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष माने करीत आहे.
जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे वाढते मधुमेहाची शक्यता
अलिकडेच करण्यात आलेल्या अभ्यासानुसार ज्या स्थूल व्यक्तींमध्ये जीवनसत्वाचे प्रमाण कमी असते त्यांना मधुमेह होण्याचा धोका अधिक प्रमाणात संभवतो. स्थूलपणामुळे मधुमेहाची शक्यता वाढते ही बाब तर सर्वज्ञातच आहे. त्याचबरोबर जीवनसत्वाचे अपुरे प्रमाण हे देखील मधुमेह होण्यास कारणीभूत ठरू शकते. मात्र या दोन्ही गोष्टी एकत्र आल्यास इंशुलिनचे प्रमाण असंतुलित करणाऱ्या या आजाराची शक्यता अधिक बळावते असे या नवीन अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. डायबेटिस केअर या नियतकालिकामध्ये या अभ्यासातून प्राप्त झालेले निष्कर्ष प्रसिद्ध करण्यात आले आहे. इंशुलिनचे असंतुलन हे मधुमेहाची पूर्वसूचना देणारे महत्वाचे लक्षण आहे.
उपरोल्लेखित अभ्यासाकरिता वैज्ञानिकांनी जवळपास ६००० व्यक्तींच्या प्रकृतीविषयक माहितीचा अभ्यास केला. त्यामध्ये असे आढळले की ज्या व्यक्ती स्थूल आहेत मात्र त्यांच्या शरीरामध्ये जीवनसत्वाचे प्रमाण उत्तम आहे त्यांच्यात सर्वसाधारण प्रकृतीच्या व्यक्तींच्या तुलनेत इंशुलिन असंतुलनाची शक्यता वीसपटीने अधिक होती. मात्र स्थूलपणा आणि जीवनसत्वाचे अपुरे प्रमाण ही दोन्ही लक्षणे असलेल्या व्यक्तींमध्ये हीच शक्यता ३२ पटींनी अधिक असल्याचे दिसून आले.
पेनिसिल्व्हानिया येथील ड्रेक्सेल विद्यापीठातील वैज्ञानिकांनी याबाबत माहिती देताना सांगितले की जीवनसत्वाचे अपुरे प्रमाण आणि स्थूलपणा ही इंशुलिनचे असंतुलन आणि मधुमेह या दोन्ही समस्यांची स्वतंत्र कारणे आहेत. मात्र आम्ही केलेल्या अभ्यासातून प्राप्त झालेल्या निष्कर्षांनुसार हे दोन घटक स्वतंत्रपणे इंशुलिनच्या असमतोलास ज्या प्रमाणात कारणीभूत ठरू शकतात त्यापेक्षा या दोन घटकांच्या एकत्र येण्याने ही शक्यता कितीतरी अधिक प्रमाणात वाढु शकते.
या क्षेत्रातील तज्ञांच्या मते जर या अभ्यासाचे निष्कर्ष स्वीकारण्यायोग्य असतील तर मधुमेहाचे बहुतांश रूग्ण हे औषधांबरोबर किंवा औषधांशिवाय केवळ जीवनसत्वाचे वार्षिक इंजेक्शन घेऊन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवू शकतील.
नोव्हा स्पेशालिटी सर्जरीचे वरिष्ठ बॅरिऐट्रिक सर्जन डॉ.रमन गोएल यांनी याविषयी बोलताना म्हंटले, आपल्याकडे भरपूर सूर्यप्रकाश आणि दूधदेखील मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मात्र तरीही आपल्या देशातील ६० ते ७० टक्के नागरिकांमध्ये जीवनसत्वाची कमतरता असल्याचे आढळते ही बाब देखील सर्वज्ञात आहे. मला असे वाटते की जीवनसत्वाची कमतरता हे मधुमेह होण्याचे कारण ठरण्यापेक्षा मधुमेहाचे प्रमाण वाढविणारा एक घटक ठरेल. मधुमेहाच्या सुरूवातीच्या टप्प्यामध्ये किंवा ज्यांच्याकडे कुटुंबातील अन्य व्यक्तींना मधुमेह असेल अशा व्यक्तींसाठी जीवनसत्वाचे प्रमाण योग्य आहे याकडे लक्ष देणे आणि त्या अनुषंगाने उपाय करणे यासारख्या गोष्टींमुळे मधुमेहाचा आजार लांब ठेवता येईल किंवा हा आजार टाळता येऊ शकेल.
डॉ.गोएल यांनी पुढे सांगितले, आमच्याकडे बॅरिऐट्रिक सर्जरी करण्यासाठी आलेल्या रूग्णांपैकी ३५ टक्क्यांपेक्षा अधिक रूग्णांमध्ये टाईप २ या प्रकारचा मधुमेह आढळतो. जवळजवळ त्या सर्वांमध्येच जीवनसत्वाची कमतरता असल्याचेही दिसून येते. शस्त्रक्रिया केल्यानंतर आणि जीवनसत्वाची पूरक जोड दिल्यानंतर या शस्त्रक्रियेच्या पश्चात मधुमेहाचे प्रमाण कमी होण्यासाठी शस्त्रक्रिया आणि जीवनसत्वाच्या प्रमाणात झालेली सुधारणा यांचे परस्पर योगदान किती असेल हे पडताळून पाहणे ही निश्चितच एक कुतुहलाची बाब ठरेल.स्थूल व्यक्तींमध्ये इंशुलिनचे असंतुलन आणि मधुमेहाची शक्यता कमी होण्यासाठी पूरक औषधे उपयोगी ठरतील की नाही हे निश्चित करण्याकरिता याविषयी अजून संशोधन करण्याची गरज आहे असेही वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे.
0
लोकसभा निवडणुकीची घोषणा बुधवारी

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीची घोषणा बुधवारी मुख्य निवडणूक आयुक्त व्ही.एस.संपथ पत्रकार परिषदेत करणार आहेत. या घोषणेनंतर आदर्श आचारसंहिता लागू होईल. मुख्य निवडणूक आयुक्तांसह दोन निवडणूक आयुक्त पत्रकार परिषदेत देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघातील मतदानाचे वेळापत्रक जाहीर करणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिलच्या दुस-या आठवड्यात मतदानाची प्रक्रिया सुरु होईल. तसेच सहा टप्प्यात संपूर्ण देशातील मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. या निवडणुकीमध्ये तब्बल ८१ कोटी जनता मतदानाचा हक्क बजावू शकतील. याआधी २००९मध्ये सहा टप्प्यात १६ एप्रिल ते १३ मे या कालावधीमध्ये लोकसभेच्या निवडणूका पार पडल्या होत्या.सध्याच्या लोकसभेची मुदत ३१ मे रोजी संपत असल्याने नवी लोकसभा एक जून रोजी अस्तित्वात येणे आवश्यक आहे.या लोकसभा निवडणूकीबरोबरच आंध्र प्रदेश, ओदिशा, सिक्कीम या राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांची घोषाण केली जाईल. तसेच देशातील नक्षलग्रस्त असलेल्या ३५ जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात मतदान होण्याची शक्यता आहे.या निवडणुकीत प्रथमच मतदारांना मतदान केल्याची पावती मिळणार आहे. देशातील काही मतदान केंद्रामध्ये प्रायोगीक तत्त्वावर हा प्रयोग केला जाणार आहे.
0
सुब्रतो रॉय तिहार तुरुंगात

नवी दिल्ली – सहारा उद्योग समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांनी मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाला यापुढे आदेशांचे पालन करण्याची खात्री देतानाच, गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यासाठी आणखी मुदत वाढवून मागितली आहे.
सहारा आपली संपत्ती विकून गुंतवणूकदारांचे पैसे परत करेल. उद्यापासून संपतीच्या विक्रीला सुरुवात होईल असे सुब्रतो रॉय यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करण्यासाठी मला आणखी एक संधी द्या. यापुढे संधी मिळूनही मी अपयशी ठरलो तर, स्वत: न्यायालयासमोर शिक्षा भोगण्यासाठी हजर होईन असे त्यांनी न्यायालयाला सांगितले. मात्र न्यायालयाला सुब्रतो रॉय यांचा प्रस्ताव पटला नाही. त्यांच्याकडून ठोस प्रस्ताव येईपर्यंत त्यांना तुरुंगातच रहावे लागणार आहे.सर्वोच्च न्यायालयाने सहाराने गेल्या दीडवर्षात गुंतवणूकदारांचे पैसे परत का केले नाहीत ? सहारा प्रत्येकवेळी वेगवेगळी कारणे का देत आहे असे प्रश्न विचारले. सहारा समूहाच्या संपत्तीची विक्री ही कंपनीची जबाबदारी आहे. सर्वोच्च न्यायालयाचे त्याच्याशी देणेघेणे नाही. फक्त आदेशाचे पालन करुन घेणे ही आमची जबाबदारी आहे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.२६ फेब्रुवारीच्या सुनावणीला गैरहजर राहिल्याबद्दल सुब्रतो रॉय यांनी न्यायालयाची माफी मागितली. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची माफी मंजूर केली. मात्र त्यांची सुटका केलेली नाही. पुढील सुनावणीपर्यंत त्यांना पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.सहारा उद्योग समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना मंगळवारी सर्वोच्च न्यायालयासमोर हजर करण्यासाठी नेत असताना, न्यायालयाच्या आवारात एका व्यक्तीने त्यांच्या अंगावर काळी शाई फकेली. मनोज शर्मा असे शाई फेकणा-या व्यक्तीचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. शाई फेकल्यानंतर सुब्रतो रॉय यांच्या समर्थकांनीत्याला बेदम मारहाण केली.
0
बलात्काराच्या तपासणीसाठी नवी मार्गदर्शकतत्वे

नागपूर – केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बलात्कार पीडित महिलेच्या वैद्यकीय तपासण्यांमध्ये काही महत्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बलात्कारानंतर होणारी वैद्यकीय तपासणी हा पीडित महिलेसाठी एक धक्कादायक अनुभव असतो.
या बदलांनंतर वादग्रस्त टू फिंगर चाचणी बंद होणार आहे. बलात्कार पीडित महिलेच्या उपचारासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नवी मार्गदर्शक तत्वे आखली आहेत. या मार्गदर्शकतत्वानुसार आरोग्य मंत्रालयाने प्रत्येक रुग्णालयाला बलात्कार पीडित महिलेच्या न्यायवैद्यक आणि वैद्यकीय तपासणीसाठी विशेष कक्ष उभारण्याच्या सूचना दिल्या आहेत.आरोग्य संशोधन विभाग, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था आणि तज्ञांनी मिळून ही राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. पीडित महिलेला बलात्काराच्या आघातातून सावरण्यास मदत व्हावी यासाठीही आरोग्य संशोधन विभागाने मार्गदर्शकतत्वे आखली आहेत. यामध्ये समुपदेशनाचा समावेश आहे.
0
जगातील धोकादायक देशात भारत तिस-या क्रमांकावर

नवी दिल्ली- जगभरात झालेल्या बॉम्बस्फोटांची आकडेवारी पाहिली असता भारत हा जगात तिस-या क्रमांकाचा सर्वात धोकादायक देश ठरला आहे. राष्ट्रीय बॉम्ब डेटा केंद्राच्या पाहणीत इराक पहिला तर पाकिस्तान दुस-या क्रमांकावर आहे.या अहवालात म्हटल्याप्रमाणे, जगभराचा विचार केल्यास जगातील ७५ टक्के बॉम्बस्फोट हे इराक, पाकिस्तान आणि भारतात झाले आहेत.
भारतात २०१३ मध्ये अफगाणिस्तानच्या दुप्पट म्हणजे २१२ बॉम्बस्फोट झाले. यात १३० जणांचा मृत्यू आणि ४६६ जण जखमी झाले. तर अधूनमधून चर्चेत असणा-या अफगाणिस्तानात मात्र वर्षभरात १०८ बॉम्बस्फोट झाले. तर अंतर्गत धूसफूस असणा-या बांगलादेशात ७५ आणि सिरीयात ३६ बॉम्बस्फोट झाले. तर २०१२ मध्ये भारतात २४१ बॉम्बस्फोट झाले होते. यात ११३ जणांचा मृत्यू आणि ४१९ जण जखमी झाले होते. मागिल २००४ पासून २०१३ पर्यंतचा रेकॉर्ड पाहिला असता भारतात दरवर्षी सरासरी २९८ वेळा बॉम्बस्फोट झाले. यात एक हजार ३३७ निरपरांधाना नाहक बळी गेला. मागच्या पाच वर्षाचा अफगाणिस्तानमधील बॉम्बस्फोटांचा अहवाल पाहता यातही भारताच सर्वाधिक बॉम्बस्फोट झाल्याचे दिसून येते. अफगाणिस्तानात मागच्या पाच वर्षात सरासरी २०९ बॉम्बस्फोट झाले.
भारतात आसाम आणि मणिपूरसह ईशान्य भारत तसेच बिहार, छत्तीसगढ आणि झारखंड येथे सर्वाधिक बॉम्बस्फोट झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. मागच्या वर्षभरात सुमारे ८० टक्के बॉम्बस्फोट या परिसरात झाले. तर २०१२ मध्ये सुमारे ५० टक्के बॉम्बस्फोट जम्मू- काश्मीरमध्ये झाले होते.जम्मू- काश्मीर, झारखंड, मेघालय, पश्चिम बंगाल, नागालँड आणि कर्नाटक या राज्यांमध्ये बॉम्बस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. तर मणिपूर, बिहार, छत्तीसगढ, आसाम, तामिळनाडू, ओदिशासह अन्य १५ राज्यांमध्ये बॉम्बस्फोटांचे प्रमाण घटल्याचे या अहवालात म्हटले आहे.









