
रत्नागिरी- रत्नागिरी शहरानजीक फणसोप येथे अल्पवयीन अपंग युवतीवर सहा नराधमांनी बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. वडिलांना व भावाला ठार मारण्याची धमकी देत मागील वर्षभर हा प्रकार सुरू होता. पीडित युवती चार महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर तिच्या नातेवाइकांनी याबाबतची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दिली. शहर पोलिसांनी या प्रकरणातील सहाही संशयित आरोपींना अटक केली आहे.
या बलात्कार प्रकरणी शहर पोलिसांनी दीपक वासुदेव बोरकर (४४), सचिन वासुदेव बोरकर (३५), पप्या ऊर्फ प्रसाद बळवंत फडणवीस (३८), राजू ऊर्फ शशिकांत अनंत पवार (३३), चंदन वसंत शिंदे (२३) आणि योगेश संजय मुरकर (२७, सर्व राहणार मागलाड, फणसोप) या सहा संशयित आरोपींना मंगळवारी रात्री अटक केली आहे. या सहा जणांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.
पीडित तरुणीच्या आईचा मृत्यू झाला असून ती वडील आणि भावासह फणसोप येथे राहते. वरील सहा जणांनी वडील आणि भावाला ठार मारण्याची धमकी देत २०१२ पासून अनेक वेळा ठिकठिकाणी बलात्कार केला. वडिलांना व भावाला ठार मारण्याची धमकी दिल्याने अल्पवयीन युवतीने ही गोष्ट कोणाला सांगितली नाही. मात्र युवती चार महिन्यांची गर्भवती राहिल्याने ही बाब उजेडात आली. या प्रकरणी पीडित युवतीच्या नातेवाइकांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Archive for March 13th, 2014
0
अपंग युवतीवर सामूहिक बलात्कार
0
दिल्ली सामूहिक बलात्कार, दोषींची फाशीची शिक्षा कायम

नवी दिल्ली (दि. १३ मार्च) – संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींची फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचा निकाल गुरुवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती रेवा खेत्रपाल आणि न्यायमूर्ती प्रतिभा राणी यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला.
१६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दिल्लीतील एका धावत्या बसमध्ये सहा नराधमांनी मिळून निर्भयावर अत्यंत क्रूर पध्दतीने सामूहिक बलात्कार केला होता. यावेळी निर्भयासोबत असणा-या तिच्या मित्रालाही या सहाजणांनी बेदम मारहाण करुन त्या दोघांना रस्त्यावर फेकून दिले होते. गंभीर जखमी झालेल्या निर्भयाचा २९ डिसेंबर २०१२ रोजी सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ रुग्णालय़ात उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.
या सहापैकी एक अल्पवयीन आरोपी होता. त्याला तीनवर्षांची शिक्षा झाली. एकाने दिल्लीच्या तिहार तुरुंगात आत्महत्या केली. सप्टेंबर २०१३ मध्ये सत्र न्यायालयाने मुकेश (२६), आकाश ठाकूर (२८), पवन गुप्ता (१९), विनय शर्मा (२०) यांना फाशीची शिक्षा सुनावली. दिल्लीतील या बलात्कार प्रकरणानंतर संपूर्ण देशात संतापाचा एक आगडोंब उसळला होता. दिल्लीतील जनता रस्त्यावर उतरली होती. जन उद्रेक लक्षात घेऊन संसदेने बलात्कारा विरोधातील कायदा अधिक कठोर केला. दिल्लीतील महिलांच्या सुरक्षेसाठी विशेष उपायोजना करण्यात आल्या.
0
नवनीत कौर-राणा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

मुंबई (दि. १३ मार्च) – लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर झालेल्या नवनीत कौर – राणा यांच्याविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईतील मुलुंड पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर यांना अमरावती मतदार संघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कौर यांनी बोगस प्रमाणपत्र तयार केल्याबाबत जयंत वंजारी यांनी मुलुंड न्यायदंडाधिका-यांपुढे तक्रार केली होती. त्यावर न्यायालयाने सहा मार्चला कौर यांच्याविरोधाच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. गुरुवारी नवनीत यांच्यावर भारतीय दंड विधानानुसार कलम ४२०, ४६८ आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे नवनीत यांच्या अडचणीत आणखीनच भर पडली आहे. कौर यांच्या उमेदवारीबाबतही मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रमाणपत्राची वैधता रद्द झाल्यास नवनीत यांची उमेदवारीही रद्द होऊ शकते.
0
काँग्रेसची दुसरी यादी जाहीर, राज्यातील सात जणांचा समावेश

नवी दिल्ली (दि. १३ मार्च) – लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने गुरुवारी ७१ जणांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत राज्यातील सात उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने गाझियाबादमधून राज बब्बर यांना उमेदवारी दिली आहे. तर अभिनेत्री नगमा यांना मेरठमधून उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने याआधी १९४ जणांची पहिली यादी जाहीर केली होती.
काँग्रेसने जाहीर केलेल्या दुस-या यादीत महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश आहे. जालन्यातून विलास औताडे यांना, हिंगोलीतून राजीव सातव यांना, भिवंडीतून विश्वनाथ पाटील, गडचिरोलीतून नामदेव उसेंडी, हातकणंगलेमधून काल्लापा अवाडे, वर्ध्यातून सागर मेघे, अकोल्यातून हिदायत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र राज्यातील पुणे, नांदेड आणि औरंगाबाद या जागांवरील उमेदवार काँग्रेसने अद्याप जाहीर केलेले नाहीत.
0
…तर मराठी चित्रपट मोठा होईल – अभिनेत्री मृणाल कुळकर्णी

यवतमाळ (दि. १३ मार्च) – कोणतेही कथानक, सामाजिक संदेश नसताना अनेक हिंदी चित्रपट हिट होतात. मात्र चांगल्या कथानक असलेले मराठी चित्रपट हिट होत न होता पडतात. प्रेक्षकांनी ठरविले तरच मराठी चित्रपट मोठा होऊ शकतो असे, मत प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुळकर्णी यांनी व्यक्त केले.
येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित ‘विंग्ज’ या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनासाठी यवतमाळात आल्या असता, त्या पत्रकार परिषदेत बोलत
होत्या. मी कथा लिहिलेला ‘प्रेम म्हणजे प्रेम असतं’हा पहिला चित्रपट तर ‘राजा की आयेगी बारात’ हा नकारात्मक भूमिका असलेला एकमेव चित्रपट आहे. २२ हिंदी मालिकांत काम केल्याचे सांगून मराठी चित्रपट क्षेत्रातच पुष्कळ काम असल्याने हिंदी चित्रपट आणि मालिका यांना देण्यासाठी माझ्याकडे आता वेळ नसल्याचे त्या म्हणाल्या. खर्च परवडत नसल्याने मराठी चित्रपटाची जाहिरात हिंदीच्या तुलनेत नगण्य आहे. मराठीत चांगल्या कथा असल्यानेच गेल्या पाच वर्षांत तीन चित्रपट आॅस्करसाठी गेल्याचे सांगून आज मराठी चित्रपट तयार करताना कोणत्या विषयावर आणि कोणत्या वर्गावर बनवायचा, हा मोठा प्रश्न पडत असल्याची चिंता व्यक्त केली. मराठी चित्रपट चालावे यासाठी शासनाने प्रत्येक सिनेमागृहात एक शो प्राईम टाईममध्ये दाखवावा, अशी मागणी यावेळी कुळकर्णी यांनी केली.यावेळी पत्रकार परिषदेला जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सचिव शीतल वातीले उपस्थित होते़.
युवतीची राजस्थान येथे विक्री, चार अटकेत
पांढरकवडा (दि. १३ मार्च )- तालुक्यातील वागदा येथील युवतीला पळवून राजस्थान येथे विक्री करणाºया चार आरोपींना अटक केली. सुंदराबाई माणिक गुंजेकार, आनंद रामाजी काकडे, सुनील रंजन सिंग ठाकुर, शोभा सुनील ठाकुर सर्व रा. रंगारीपूरा वणी अशी आरोपींची नावे आहे. आरोपी सुदराबाई वागद येथील एका व्यक्तीकडे पाहुणी म्हणून आली होती. ५ मार्च रोजी वागद येथील २० वर्षीय युवतीला पळवून नेले. आई-वडीलांनी मुलगी घरी नसल्याने तीची शोधमोहीम सुरु केली. मात्र तीचा कुठलाही थांगपत्ता न लागल्याने पांढरकवडा पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३६६, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मोबाईल लोकेशवरून सुंदरा हीला वर्धा येथे अटक करून चौकशी सुरु केली. तसेच आनंद, सुनील, शोभा या तीन आरोपींना अटक केली. पळवून नेलेल्या युवतीची राजस्थान येथे विक्री केल्याची माहिती समोर आली असून तीच्या शोधासाठी पोलिस पथक रवाना झाले आहे.
कारसह देशी दारु जप्त
यवतमाळ (दि. १३ मार्च) – धामणगाव मार्गावरील मोहा फाटा येथे जाणारी अवैध देशीदारु व कार उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाने बुधवारी रात्री १०.३० वा. जप्त करून एका आरोपीला अटक केली. अक्षय रमेश जयस्वाल (३०) रा. मोहा फाटा पुनर्वसन असे आरोपीचे नाव आहे. अक्षयने अप्सरा टॉकीज जवळील मेट्रो वाईन्समधून १९ पेट्या देशी दारु विकत घेतल्या. त्यानंतर अवैधपने देशी दारुच्या पेट्या घेऊन कारने(एम.एच.२६ / सि ३८३९) मोह्याकडे जात होता. याबाबतची गुप्त माहिती यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाला मिळाली. त्यावरून पथकाने रात्री ११.३० वाजता लकडगंज जवळ सदर कार अडवून झडती घेतली. त्यामध्ये ३० हजार रुपयाची दारु आढळल्याने कार, देशी दारु जप्त करून अक्षयला अटक केली. तसेच मेट्रो वाईन्सच्या मालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदणे, जमा. राहुल मनवर, इकबाल शेख, तुषार नेवारे, संतोष मडावी, प्रमोद मडावी, विजय जाधव, वसीम शेख यांनी केली.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
यवतमाळ (दि. १३ मार्च) – लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी निवडणूक संपेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शंभर मीटर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे.
या आदेशान्वये परिसरात पाच पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाही. मोबाईळ फोन, सेल्युलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसारमाध्यमे घेऊन परिसरात प्रवेश करता येणार नाही. शांतता व सुव्यवस्था भंग होईल असे कृत्य करता येणार नाही. अनधिकृत व्यक्ती व वाहनास प्रवेशास बंदी राहील, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.
0
केंद्रीय समितीकडून जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी
नुकसानीचा घेतला आढावा
यवतमाळ (दि.१३ मार्च)- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस व गारपीट होत आहे. या गारपीटीत जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आज जिल्ह्यात आलेल्या केंद्र शासनाच्या एक सदस्यीय समितीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तसेच ठिकठिकाणी नुकसानग्रस्त शेतकºयांशी चर्चा करुन नुकसानीचा आढावा घेतला.
गेले काही दिवस सतत झालेला पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या समित्या विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरुन पाहणी करीत आहे. यामध्ये केंद्रीय जल आयोगाचे संचालक असलेले डॉ.डी.एम.रायपुरे यांच्या एक सदस्यीय समितीने आज जिल्ह्यात विविध भागांना भेटी देवून पाहणी केली. डॉ. रायपुरे यांनी विश्रामभवन येथे अप्पर जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह उपविभागीय अधिकाºयांसोबत बैठक घेवून नुकसानीची माहिती घेतली. त्यानंतर आर्णी, दिग्रस, दारव्हा व नेर यातालुक्यातील काही गावांना भेटी देवून प्रत्यक्ष पाहणी केली. आर्णी तालुक्यातील काठोडा येथे दिगांबर एकघरे यांच्या शेतातील खराब झालेल्या हरभरा पिकाची पाहणी केली. दिग्रस तालुक्याती तुपटाकळी येथे विष्णू ठाकरे, दीपक आनंदवार या शेतºयांचे गहू, हरभरा, संत्रा, मोसंबी पिकांची पाहणी करण्यासोबतच शेतकºयांसोबत चर्चा दारव्हा तालुक्यात पळशी येथे भेट दिल्यानंतर गारपीटीत जनावरे दगावलेल्या शेतकºयांशी त्यांनी संवाद साधला. लाख खिंड येथे अन्नाजी चौधरी यांच्या संत्रा पिकाच्या नुकसानीची पहाणी डॉ.रायपुरे यांनी केली. त्यानंतर नेर विश्रामभवन येथे तालुक्यातील नुकसानीची माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी संबंधित उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर समिती अमरावती जिल्ह्याकडे रवाना झाली.










