क्वालालंपूर – क्वालालंपूरहून २२७ प्रवाशांना घेऊन बीजिंगला निघालेलं आणि १२ तासांपासून गायब असलेलं मलेशिया एअरलाइन्सचं विमान चीनच्या दक्षिणेकडील समुद्रात कोसळल् आहे.बोइंग विमानाचा हा वर्षातील दुसरा अपघात असून, १९ वर्षांमधील ही सगळ्यात मोठी दुर्घटना ठरली आहे. या विमानातील २२७ प्रवाशांमध्ये चेन्नईतील एका महिलेसह पाच भारतीय नागरीकही आहे.
एम एच ३७० या बोइंग विमानानं काल मध्यरात्री १२ वाजून २१ मिनिटांनी (भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री १० वाजता) क्वालालंपूर विमानतळावरून ‘टेक ऑफ’ केलं होतं. चीनची राजधानी, बीजिंगला ते सकाळी साडेसहाला पोहोचणं अपेक्षित होतं. परंतु, उड्डाणानंतर दोन तासांनी या विमानाचा एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटल्यानं एकच खळबळ उडाली होती. प्रदीर्घ शोधमोहिमेनंतर, हे विमान व्हिएतनामच्या एअर स्पेसमध्ये कुठेतरी हरवल्याचं लक्षात आलं होतं. ही संपूर्ण हद्द पिंजून काढतानाच, हे विमान दक्षिण चीन समुद्रात कोसळल्याचं स्पष्ट झालं आहे.व्हिएतनामच्या नौसैनिकांना अॅडमिरल गो व्हॅन फॅट्ट यांनी तातडीनं घटनास्थळी पोहोचण्याचे आदेश दिल्यानं विमान कोसळल्याच्या वृत्ताला दुजोराच मिळाला आहे. या बातमीनंतर बीजिंग एअरपोर्टवर शोककळा पसरली आहे. मलेशिया एअरलाइन्सच्या या विमानात १४ देशांमधील २२७ प्रवासी होते, त्यात दोन चिमुरड्यांचाही समावेश होता. त्यापैकी सर्वाधिक १५२ प्रवासी चीनचे नागरिक होते. मलेशियाचे ३८, इंडोनेशियाचे १२, ऑस्ट्रेलियाचे सात आणि भारताचे पाच जण बीजिंगला निघाले होते. चंद्रिका शर्मा आणि सिरेगर फिर्मन चंद्रा यांच्यासोबतच क्रांती प्रल्हाद शिरसाट, चेतना कोळेकर आणि विनोद कोळेकर हे पाच जण अपघातात बेपत्ता झालेत.
Archive for March 8th, 2014
विमान समुद्रात कोसळलं
कुमार विश्वास यांच्यावर गुन्हा दाखल
अमेठी- आम आदमी पक्षाचे नेते कुमार विश्वास यांच्यासह २० जणांवर निवडणूक आचारसंहिता भंग केल्याची एफआयआर दाखल करण्यात आली.अमेठी येथील सरदार कोतवाली पोलिस स्थानकात एफआयआर दाखल केल्याचे जिल्हा दंडाधिकारी प्रदीप कुमार यांनी सांगितले. स्थानिक प्रशासनाकडून परवानगी न घेता कुमार विश्वास यांनी वर्दळीच्या रस्त्यावर मिरवणूक काढली होती, असे यादव यांनी सांगितले. तर आपण फक्त एकच वाहन घेऊन गेलो होतो, त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला नाही, असा दावा विश्वास यांनी केला.
भाजपची दुसरी यादी जाहीर
नवी दिल्ली- भ्रष्टाचाराचे आरोप असलेले कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केलेल्या बी.एस. येड्डीयुरप्पा यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने शनिवारी ५२ जणांची यादी जाहीर केली.
भाजपने दुस-या यादीत कर्नाटक, ओदिशा, त्रिपूरा, केरळ, आसाम आणि पश्चिम बंगाल या राज्यातील उमेदवारांचा समावेश आहे. कर्नाटकमधून शिमोगा लोकसभा मतदारसंघातून येड्डीयुरप्पा निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्यासह माजी मुख्यमंत्री डी.व्ही.सदानंद गौडा यांना इशान्य बंगळूरूमधून, अनंत कुमार यांना दक्षिण बंगळूरूमधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर पत्रकार आणि राजकारणी चंदन मित्रा यांना पश्चिम बंगालमधील हूगळी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.लोकायुक्तांनी भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर येड्डीयुरप्पा यांनी एक ऑगस्ट २०११मध्ये मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमधून बाहेर पडून कर्नाटक जनता पक्षाची स्थापना केली होती. कर्नाटकमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपविरोधात निवडणूक लढवली होती.भाजपने २७ फेब्रुवारी रोजी ५४ जणांची यादी जाहीर केली होती. भाजपजी तिसरी यादी १३ मार्च रोजी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
रत्नागिरीत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
रत्नागिरी- पैशाचा पाऊस पाडण्याच्या नावाखाली तरुणींना वाममार्गाला लावणारी दापोलीतील घटना ताजी असताना आता रत्नागिरीतही सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. पैशाचे आमिष दाखवत अल्पवयीन तरुणींना जाळ्यात ओढणारी टोळीच पोलिसांच्या हाती सापडली आहे.
रत्नागिरीतील चौदा वर्षाच्या युवतीने शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी ‘लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण’ या विशेष कलमांतर्गत गुन्हा दाखल करून घेत भ्रष्टाचार निर्मूलन व अन्याय निवारण समितीच्या महिला पदाधिका-यासह दोघांना अटक केली आहे. तर तिसरा संशयित आरोपी अटकेच्या भीतीने रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सेक्स रॅकेटमध्ये रत्नागिरीतील राजकीय पुढा-यांचादेखील सहभाग असल्याची शक्यता असून, अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रवी जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार अल्पवयीन युवतीने दिलेल्या तक्रारीनंतर स्वाती ठाकूर या भ्रष्टाचार निर्मूलन व अन्याय निवारण समितीच्या महिला पदाधिका-यासह सुशील, जितू, बाळू, हर्षद व अन्य एक अनोळखी युवक अशा सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी स्वाती ठाकूर आणि सुशील या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघांनाही १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तिसरा संशयित आरोपी जितू याची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल असून, अन्य तिघाजणांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.
पीडित मुलीचे नववीपर्यंत शिक्षण झाले असून, स्वाती किशोर ठाकूर हिने वैयक्तिक स्वार्थासाठी त्या युवतीला मानसिक त्रास देत लैंगिक शोषण करण्यास भाग पाडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पीडित तरुणीने तिच्यावर होणा-या लैंगिक शोषणाची माहिती प्रथम घरच्यांना दिली नंतर रत्नागिरीतील चाईल्ड लाईन संस्थेच्या मदतीने याबाबत शहर पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली. पीडित तरुणीचे मागील एक वर्षापासून लैंगिक शोषण केले जात होते. स्वाती ठाकूर ही पीडित युवतीला वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत होती, असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे. आरोपींनी पीडित युवतीसोबत रत्नागिरीत विविध ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले. स्वाती ठाकूर हिच्या घरीदेखील पीडित मुलीवर बलात्कार करण्यात आला. शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी त्या युवतीला टीव्हीवर अश्लील चित्रफिती दाखवून आणि बिअर पाजून बळजबरी करण्यात आली. स्वाती ठाकूर आणि सुशील यांनी पिडीत युवतीला गोव्यातही नेले. गोव्यात लॉजचे बुकींग करताना पिडीत युवती मुलगी असल्याचे सांगून त्यानंतर स्वाती ठाकूरच्या समोरच बलात्कार करण्यात आल्याची तक्रार त्या युवतीने दिली आहे. पीडित युवतीच्या तक्रारीनंतर शहर पोलिसांनी स्वाती ठाकूर हिच्या घरातील टीव्हीसह सीडीप्लेअर आणि अश्लिल चित्रफिती ताब्यात घेतल्या आहेत. पीडित युवतीने शहर पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीचे व्हिडीओ चित्रीकरण करण्यात आले असून, पिडीत युवतीचे शोषण झालेल्या ठिकाणी पोलिसांनी झाडाझडती घेण्यास प्रारंभ केला आहे. रत्नागिरीत अल्पवयीन युवतींना जाळय़ात ओढणारे रॅकेटच कार्यरत असल्याची शक्यता असून, यातील मोठी टोळी समोर येण्याची शक्यता आहे.
जनमत चाचण्यांवर बंदी आवश्यक
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनमत चाचण्यांवर बंदी घालावी, अशी मागणी निवडणूक आयोगाने पुन्हा शुक्रवारी केंद्र सरकारकडे केली. मात्र, याबाबत निर्णय घेण्याची कोणतीही घाई नसल्याचे सरकारने स्पष्ट केले. गेल्या आठवडय़ात निवडणूक आयोगाने केंद्रीय विधी खात्याकडे जनमत चाचण्यांना प्रतिबंध करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली होती. याबाबतचा कायदा २००४मध्ये तयार झाला आहे. या जनमत चाचण्यांवर बंदी घालण्याची मागणी कॉँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती.मात्र, याबाबत कोणताही निर्णय घेण्याची घाई नसल्याचे सरकारने सांगितले. व्यापक निवडणूक सुधारणांसाठी कायदा आयोगाकडे हे विधेयक छाननीसाठी पाठवले आहे, असे वरिष्ठ सरकारी अधिका-याने सांगितले. विद्यमान कायद्यानुसार मतदानापूर्वी ४८ तास आधी जनमत चाचण्यांना बंदी घालण्याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत.
0
जागतिक महिला दिनाची खास गुगल भेट

मुंबई – आठ मार्च सर्वत्र जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. याच धर्तीवर नेहमी प्रयोगशील असणा-या गुगलने महिलादिनानिमित्त खास व्हिडीओ स्वरुपातील गुगल डूडल बनवले आहे. गुगलच्या या डूडलमध्ये गुगल शब्दामधील दुस-या ओ या अक्षरावर क्लिक केल्यास व्हिडीओ सुरु होतो. या व्हिडीओमध्ये जगातील विविध देशातील विविध स्तरातील महिलांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या व्हिडीओमध्ये मलाला युसुफजाई आणि आशा भोसले यांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच व्हिडीओ संपल्यानंतर जागतिक महिला दिन अशा संदेश गुगलच्या पेजवर पहायला मिळतो. १९१४ रोजी पहिल्यांदा आठ मार्चला जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. तेव्हापासून आजतायगत जगभरात सर्वत्र मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा केला जातो.
0
पासवर्डच्या संरक्षणासाठी नव्या प्रणालीचा प्रस्ताव

ई-मेल अकाउंट, नेटबँकिंग व एटीएम, शेअर बाजाराचे ऑनलाइन व्यवहार इतकेच काय अगदी आपल्या हातात सतत असलेला मोबाइल बंद स्थितीतून पुन्हा सुरू करायचा असेल तरी पासवर्ड आवश्यक ठरतो. पासवर्ड लक्षात ठेवणे हे डोकेदुखीचे काम आहे. तसेच या पासवर्डचे संरक्षण करणे ही कठीण बाब आहे. कारण पासवर्ड चोरून पैसे पळवण्याचा उद्योग जगभरात सुरू आहे. त्यामुळे पासवर्डचे भक्कम संरक्षण करण्याची गरज आहे. नावीन्यपूर्ण पद्धतीने पासवर्डचे संरक्षण करण्याचे संशोधन भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांनी यशस्वी केले आहे. यामुळे हॅकर्सपासून पासवर्डचे संरक्षण होऊ शकते.
अलाबामा विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी हॅकर्सपासून पासवर्डचे संरक्षण करण्याची नवीन पद्धती शोधून काढली आहे. पासवर्ड साठवून ठेवणा-या सव्र्हरवर हॅकर्सपासून अनेक हल्ले होत असते. ‘लिंक्डइन’ आणि ‘पेपाल’ या कंपन्यांना याचा अनुभव आला आहे, अशी माहिती कम्युटर अॅँड इन्फॉर्मेशन सायन्स विभागाचे सहाय्यक प्राध्यापक नीतेश सक्सेना यांनी दिली.पासवर्ड लक्षात राहावा म्हणून अनेकजण तो अत्यंत सोप्या शब्दात लिहितात. हे पासवर्ड बहुतांशी सव्र्हरमध्ये साठवले असतात. हॅकर्स हे ऑनलाइन हल्ला करून किंवा सव्र्हरची कमकुवत सुरक्षा पाहून हल्ला करतात. त्यासाठी ते पासवर्ड डिक्शनरीचा वापर करतात.सध्या पासवर्डची खात्री पटवण्यासाठी ‘गुगल ऑथेंटिकेटर’ आणि ‘आरएसए सिक्युअर आयडी’ या दोन पद्धती वापरल्या जातात. पण, हॅकर्सच्या हल्ल्याप्रकरणी या पासवर्ड पद्धती निकालात निघाल्या आहेत. फेसबुक ही जगप्रसिद्ध सोशल साइट द्विस्तरीय पासवर्ड पद्धत वापरते.संशोधकांनी ४२ फॅक्टरची योजना आणली आहे. यात स्मार्टफोनवर सिक्युरिटी टोकन येते. संगणकाचे काम बॅँडविड्थवर अवलंबून असते. यात सुरक्षेचे १३ पर्याय दिले आहेत. नवीन पद्धतीत ‘पासवर्ड’ निर्मितीचे काम हे ‘अॅप्स’द्वारे केले जाते. संबंधिताने पासवर्ड टाइप केल्यानंतर स्मार्टफोनद्वारे स्वयंचलित पद्धतीने पासवर्ड निर्मितीचे काम केले जाते.सक्सेना यांच्याबरोबरच मलिहेह शिरवानियन, स्टानिस्लोव्ह जारेकी, नवीन नाथन यांनी पासवर्ड संरक्षणाच्या पद्धतीवर विस्तृत संशोधन केले. आमच्या प्रत्येक प्रस्तावामुळे तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारची सुरक्षा व्यवस्था मिळू शकेल, असा दावा संशोधकांनी केला आहे.
0
जागतिक महिला दिनाचं सेलिब्रेशन

निर्माती दिग्दर्शिका कांचन अधिकारी दरवर्षी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सर्वच क्षेत्रांतल्या मान्यवर महिलांना एकत्र करीत जोरदार सेलिब्रेशन करतात. याही वर्षी यानिमित्ताने अनेकजणी एकत्र आल्या. यात अरूणा इराणी, रोहिणी हटंगडी, किरण जुनेजा, लीना मोगरे, मृणाल कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर, वर्षा उसगांवकर, किशोरी शहाणे विज, वैजयंती कुलकर्णी-आपटे, अॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर, रेखा सहाय अशा अनेक महिलांचा समावेश आहे. या सेलिब्रेशनची काही जोरदार क्षणचित्रे…
0
बहारदार संगीताने सजलेला चित्रपट यशवंतराव चव्हाण – बखर एका वादळाची
१४ मार्च रोजी महाराष्ट्रात प्रदर्शित होणार
महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, व्यासंगी नेते, अभ्यासू व्यक्तिमत्व, दूरदृष्ट्री असलेलं कार्यकुशल नेतृत्व अशा अनेक बिरुदावल्या लाभलेले व्यक्तिमत्व म्हणजे मा. यशवंतराव चव्हाण. वैयक्तिक आयुष्यासोबतच राजकीय आणि सामाजिक जीवनातही अतिशय आव्हानात्मक परिस्थितींवर यशस्वीपणे मात करणा-या यशवंतरावांचा जीवनपट खूप रंजक असा आहे. त्यांच्या याच जीवनप्रवासावर आधारीत यशवंतराव चव्हाण – बखर एका वादळाची हा जब्बार पटेल दिग्दर्शित चित्रपट येत्या १४ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची प्रस्तुती महाराष्ट्र शासन आणि एस्सेल व्हिजनची आहे.
यशवंतराव चव्हाण या चित्रपटातून महाराष्ट्र आणि देशाची तत्कालीन राजकीय, सामाजिक परिस्थिती , यशवंतरावांचे दुरदर्शी निर्णय, झंझावाती कारकिर्द पटकथेतून चपखलपणे मांडण्याचं काम ज्येष्ठ लेखक, पत्रकार अरूण साधू यांनी केलं आहे. पटकथेसोबतच चित्रपटातील गीतेही कथानकाचाच एक भाग म्हणून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. महाराष्ट्राच्या निर्मितीकाळातील लोकसंगीत, साहित्य आणि समाजकारणातील उर्जितावस्था, लोककलांचे महत्त्व लक्षात घेऊन संगीताची मोलाची जबाबदारी आनंद मोडक यांनी या चित्रपटात सांभाळली आहे. चित्रपटात विविध बाजाची एकूण १६ गाणी असून ती अनेक नामवंत गायकांनी स्वरबद्ध केली आहेत.
“यशवंत असा गुणवंत”, “स्वातंत्र्य लढे पेटले”, “स्वातंत्र्याचा पोवाडा”, “यशवंत बहुगुणवंत”, “संयुक्त महाराष्ट्राचा पोवाडा” ही प्रसिद्ध कवी-गीतकार ना. धों. महानोर यांनी शब्दबद्ध केलेली स्फुर्तीदायक गीते आणि “देशभक्ता प्रासाद” हे विनायक करंदीकर यांनी लिहिलेलं गीतही ऐकायला मिळणार आहे. नंदेश उमप आणि सहका-यांनी ही सर्व गीते गायली आहेत. “संगमरवर या नद्यांचे” हे ना. धों. महानोर यांच्याच लेखणीतून उतरलेले गीत रविंद्र साठे आणि विभावरी आपटे यांनी गायलं आहे. यशवंतरावांच्या आई विठाबाई चव्हाण या प्रतिभावान कवयित्रीही होत्या. त्यांच्या याच प्रतिभेची झलक या चित्रपटातील गाण्यांमधूनही बघायला मिळणार आहे. या चित्रपटातील “गडगड आभुटं”, “नादारीचं दीस”, “मायबापाच्या पोटी” या त्यांच्या मुळ रचना यात ऐकता येणार असून या रचनांमध्ये काही शब्दांची भर घालत ना.धों. महानोरांनी त्याला गीताचं स्वरुप दिलं आहे. आणि ही गाणी आपल्या ठसकेबाज आवाजात सादर केली आहेत उर्मिला धनगर यांनी. याशिवाय “सखे नयन कुरंग” हे पारंपरिक बाजाचं गीतही उर्मिलाने गायलं आहे. याशिवाय चित्रपटात “उलटी हो गई तदबीरे सारी” ही मीर-तकी-मीर यांची भावपूर्ण रचना आरती अंकलीकर यांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. “उभविला मळा” ही भैरवी आणि “खालच्या आळीत गातो” ही निराळ्या बाजातील महानोरांची गीते अनुक्रमे रविंद्र साठे आणि आनंद शिदे यांनी गायली आहेत. याशिवाय कुसुमाग्रज यांच्या शब्दप्रतिभेतूनउतरलेलं गर्जा जयजयकार हे गीत शंकर महादेवन यांनी स्वरबद्ध केलं आहे. व्हिडीओ पॅलेसच्या वतीने या चित्रपटाच्या गाण्यांची ध्वनिफित बाजारात उपलब्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्राचा हा लाडका नेता आपल्या अभिनयातून साकार करण्याची किमया साधली आहे अशोक लोखंडे यांनी तर लुब्ना सलिम , ओम भुतकर, वैशाली दाभाडे, मीना नाईक, रेखा कामत, सुप्रिया विनोद, सतीश आळेकर, राहूल सोलापूरकर, बेंजामीन गिलानी यांच्या अन्य महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या १४ मार्च रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
0
पोलिस अधिकाºयाच्या वाहनाची दुचाकीला धडक , एक ठार
यवतमाळ – येथून चंद्रपूरकडे जाणाºया पोलीस अधिकाºयांच्या वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक जण ठार झाल्याची घटना आज वाकी नजीक घडली. यामध्ये एक जण जखमी झाला असून मृतकाच्या खिशातून एक लाख रुपये लांबविले.
अंबादास कवडू लिलारे (४५) रा. मोहदरी असे मृतकाचे तर नामदेव किसन मेश्राम (५२) रा. मोहदरी असे जखमीचे नाव आहे. आज सकाळी दुचाकीने (एम.एच. २९/ ९२४७) यवतमाळकडे जात होते. अशातच गंगा फर्टीलायझर जवळ चंद्रपूर येथील पोलीस निरीक्षक मनिष ठाकरे यांच्या कारने (एम.एच. २९ / आर. २०६९) जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये अंबादास जागीच ठार तर नामदेव हा गंभीर जखमी झाला. यावेळी जखमीना येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्याला सेवाग्राम येथे हलविण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस, जिल्हा वाहतुक शाखा, दंगल नियंत्रण पथक घटनास्थळी भेट देऊन तणाव नियंत्रणात आणला. मृतक अंबादासने नुकताच कापूस विक्री केला असून त्यापोटी मिळालेली रक्कम एक लाख रुपये त्याच्या सोबत होती. अपघातानंतर त्याच्या खिशातून सदर रक्कम चोरुन नेली. याप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
बेबळा कालव्याचे कामा करण्यास अडथळा , अभियंत्यासह कर्मचाºयांना अडविले
कळंब – तालुक्यात बेंबळा प्रकल्पाच्या कालव्याचे काम करण्यास एका युवकाने अडथळा निर्माण केला आहे. तसेच अभियंत्यास दगडाने मारून उर्वरीत कर्मचाºयांची अडवणूक केली.
शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे म्हणून तालुक्यात बेंबळा प्रकल्पा अंतर्गत कालवा निर्मीतीचे काम सुरु आहे. बेंबळा कालवे विभागाचे शाखा अभियंता गौतम सिताराम पाटील हे आपल्या कर्मचाºयांसह आज माटेगाव शिवारात कालव्याच्या काम करण्यासाठी जात होते. अशातच माटेगाव येथील पवन अशोक जगताप (२९) याने शाखा अभियंत्याचा रस्ता अडवून कॅनॉलचे काम करण्यास अडथळा निर्माण करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच कर्मचाºयांना गावा बाहेर जावू न देता सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणाची तक्रार शाखा अभियंता पाटील यांनी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सदर युवकाविरूद्घ भादंवि कलम ३४१, १८६, ३५३, ५०६ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
महिलांमुळे एकात्मतेची भावना रुजली – विधानाभा उपाध्यक्ष आ. पुरके
यवतमाळ – पुरुषाच्या तुलनेत महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण ५४ टक्के असून सर्वच आघाड्यावर महिलांची यशस्वी घोडदौड सुरु आहे. बचत गटासारख्या चळवळीतून महिला एकत्रीत झाल्या व त्यामुळेच त्याच्यासह समाजातही एकात्मतेची भावना रुजल्याचे प्रतिपादन विधानसभेचे उपाध्यक्ष आ. प्रा. वसंत पुरके यांनी केले. जागतिक महिला दिनानिमित्त आयोजीत महिला मेळाव्यात ते अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, इंदिरा गांधीनी समर्थपणे देश हिताचे त्या काळी निर्णय घेतले. त्यांच्या कल्पनेतुन पुढे आलेल्या योजनामुळेच ग्रामीण भागाची प्रगती झाली. आता ही महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेप्रमाणेच लोकसभा-विधानसभेतही ५० टक्के आरक्षण देण्याचा मतप्रवाह पक्षात आहे. त्यामुळे समाजातील चांगल्या गोष्टींना वाव मिळावा म्हणून महिलांनी अधिक प्रमाणात राजकीय सहभाग घेण्याची गरजही त्यांनी बोलुन दाखविली. आपल्या मुलांना संस्काराचे धडे दिल्यास मराठी माणसाचा टक्का आयएएस, आयपिएस, आयएफएस सारख्या प्रशासन सेवेत वाढेल असेही ते म्हणाले.राज्याच्या महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यात महिलांसाठी राबविलेल्या योजनांची माहिती दिली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. वामन कासावार, माजी मंत्री संजय देशमुख, देवानंद पवार, राहुल ठाकरे, महाराष्टÑ प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा कमल व्यवहारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
युवकाचे अपहरण
उमरखेड – पैशाच्या वादातून एका युवकाचे पंचायत समिती कार्यालय परिसरातून अपहरण केल्याची घटना घडली. सतिष नामदेव कोकरे रा. चुरमुरा असे अपहृत युवकाचे नाव आहे. त्याचा भाऊ सुशिल कोकरे याने कोल्हापूर येथील साखर कारखान्यातून २ हजार ७४५ रुपयाची उचल केली होती. या पैशाच्या वादाहून सुशिल समजून त्याचा भाऊ सतिषला उमरखेड पंचायत समिती कार्यालय परिसरातून बोलेरोमध्ये (एम.एच. २१/ २००९) कोंबुन पळवून नेले. याप्रकरणी उमरखेड पोलिसांनी बळीराम गडसिंग, मनोज बळीराम गडसिंग, नारायन निखाते रा. काजलगाव जि. कोल्हापूर याच्याविरूद्घ गुन्हा दाखल केला.
गारपिट ग्रस्तांच्या प्रश्नांसाठी आ. राठोड यांचे धरणे
यवतमाळ – जिल्ह्यातील गारपीट व वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना आर्थिक मदतद्यावी यासह विविध मागण्यासाठी आ. संजय राठोड १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे.
गारपिट व वादळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकºयांचे गहू, हरबरा, बागायती, पिकांचे अतोनात नुकसान झाले असून या संदर्भात विधानसभा सभागृहात प्रश्न उपस्थित झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना मदतीचे आश्वासन मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्यानंतरही अंमलबजावणीला सुरुवात झाली नाही. सर्वेक्षण अहवाल या बाबतील वेळ न घालवता शेतकºयांना तातडीने मदत करावी, बँकाची सक्तीची वसुली थांबवावी, पिकांची पैसेवारी कमी असल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत मिळणाºया सवलती मिळावा, २०१३ मध्े अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना आर्थिक मदत मिळावी या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करणार आहे. या धरणे आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर सेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व सर्व पदाधिकाºयांनी सहभागी व्हावे असे आवाहन आ. संजय राठोड यांनी केले आहे.












