घाटंजी – शहरातील एका युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. यावेळी युवकाच्या खिशात चिठ्ठी सापडली असून आत्महत्येचे गुढ कायम आहे.
राहुल अशोक भोयर (३० ) रा. घाटंजी असे मृतकाचे नाव असून तो रसिक इलेक्ट्रीक दुकानामध्ये नोकरी करीत होता. २५ मार्च रोजी रात्री दुकान बंद करुन तो घरी गेला. त्यानंतर अंगणात येऊन मोबाईलवर बोलतांनाही नागरिकांनी पाहिले होते. दरम्यान रात्रीच्यावेळी राहुलने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी ही बाब उजेडात आली असून पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी मृतकाच्या शिखातून एक चिठ्ठी सापडली असून त्यामधील मजकुर कळु शकला नाही. त्यामुळे या युवकाच्या मृत्यूचे गुढ अजुनही कायम आहे. राहुल हा अविवाहीत असून त्याच्या वडीलानेही पाच वर्षापूूर्वी आत्महत्या केली होती. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास ठाणेदार कुरळकर करीत आहे.
Archive for March 26th, 2014
युवकाची आत्महत्या, चिठ्ठीचे गुढ कायम
वीजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू
कळंब – तालुक्यातील झाडकिन्ही येथे मिटर दुरुस्तीचे काम करणाºया खाजगी वायरमनचा वीजेचा धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना आज बुधवारी दुपारी ४ वाजता घडली. प्रेमदास बापुराव पुडके (५०) रा. झाडकिन्ही असे मृतकाचे नाव असून तो खाजगी वायरमन होता. गावातीलच हरिचंद्र पाटील याच्या घरी मिटर दुरुस्तीचे काम करत होता. अशातच त्याला वीजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
0
बिबट्याचा मृतदेह आढळला

यवतमाळ – बाभुळगाव वनपरिक्षेत्रातील आसोला शिवारात बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. बुधवारी दुपारी हा प्रकार उजेडात आला असून अळ््यांनी वाघाचे शरीर पोखरल्याचे समोर आले आहे. या बिबट्याच्या अंगावर कुठल्याही जखमा नसून विष प्रयोग केल्याचे बोलल्या जात आहे.
यवतमाळ वनविभागातील बाभुळगाव वनपरिक्षेत्रातील आसोला जंगलात दुर्गंधी सुटल्याने नागरिकांनी तेथे जाऊन पाहणी केली असता तेथे कुजलेला बिबट्याचा मृतदेह दिसला. या बाबतची माहिती मिळताच उपवनसंरक्षक प्रेमचंद लाकरा, सहा. उपवनसंरक्षक वाभळे, उपवनसंरक्षक दहिवले, अविनाश घनमोडे, गवई, यवतमाळ वनपरिक्षेत्र अधिकारी नंदकिशोर जगताप, मानद वनजीव रक्षक शाम जोशी यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. यावेळी मृतक बिबट्याचे वय दहा वर्षापेक्षा जास्त असून तो म्हातारा झाला होता. त्याच्या अंगावर कुठल्याही जखमा नसुन कातडी व नख साबुत होते. त्यामुळे विषप्रयोग करुन बिबट्याला मारल्याची चर्चा वन्यप्रेमीमध्ये सुरु आहे. नेर येथील पशुवैद्यकीय अधिकरी डॉ. खोडवे यांना पाचारण करुन घटनास्थळावरच शवविच्छेदन करण्यात आले. बिबट्याच्या मृत्यूचे गुढ शवविच्छेदन अहवालानंतरच उलगडणार आहे.
0
खरे-खोटेपणा जाणून घेण्याची कुवत मनात असते

गुन्हेगार सहजासहजी आपल्या गुन्ह्याची कबुली देत नाहीत. गुन्हा कबूल करण्यासाठी विविध पद्धती राबवल्या जातात. प्रसंगी गुन्हेगारांना शारीरिक मारहाण व मानसिक छळ केला जातो. व्यक्तीचा खरे-खोटेपणा जाणून घेण्याची कुवत माणसाच्या सुप्त मनात असते असे एका संशोधनात आढळले आहे.
अट्टल खोटे बोलणा-या व्यक्तींकडून खरे काढून घेणे सोपे नसते. मात्र, त्यांच्या सुप्त मनाचा मागोवा घेतल्यावर त्यांचा खोटेपणा उघड होऊ शकतो. व्यक्ती खरी बोलते की खोटे यासाठी ‘लाय डिटेक्टर’ टेस्ट घेतली जाते. मात्र, या टेस्टच्या यशस्वीपणाची खात्री केवळ ५४ टक्के असते. स्वत: व्यक्तिमत्त्व, विचार करण्याची पद्धत याबाबत माणसे ही अत्यंत संवेदनशील असतात, असे कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानसशास्त्रज्ञ लीन टेन ब्रिंके यांनी सांगितले. त्यांच्या या संशोधनात डायना स्टिमसन, डाना कार्नी यांनी सहभाग घेतला होता.
या संशोधकांनी नवीन चाचणी विकसित केली आहे. एखादी व्यक्ती खोटे बोलत असल्यास सुप्त मन ते ओळखू शकते. विशेष म्हणजे सुप्त मन हे ओळखण्यात अपयशी ठरल्यावरही ही चाचणी यशस्वी होऊ शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे.या संशोधनासाठी ७२ स्वयंसेवकांची निवड करण्यात आली होती. त्यांना संशयित आरोपींच्या मुलाखतींची चित्रफीत दाखवण्यात आली. काही व्यक्तींनी पुस्तकातून १०० डॉलर्स चोरले होते. मात्र या चोरीची कबुली मुलाखत देणा-यांना देऊ नये असे बजावले होते. आरोपींमध्ये काही जणांना खरे बोलण्यास सांगितले तर काही जणांना खोटे बोलण्यास सांगितले. त्यानंतर या ७२ जणांना मुलाखतीतील व्यक्तींचा खरे-खोटेपणा सिद्ध करण्यास सांगण्यात आले. त्यांनी तत्काळ ४३ टक्के जण खोटे बोलत असल्याचे सांगितले तर ४८ जण खरे बोलत असल्याचे सांगितले. या चाचणीचे निष्कर्ष ‘सायकॉलॉजिकल सायन्स’ या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. व्यक्तीचे सुप्त मन खरी माहिती देत असते, असे चाचणीत आढळले.
0
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात रोजगार, घराचे आश्वासन
» सर्वसमावेशक विकासाचे आश्वासन
» १०० दिवसात महागाई कमी करणार
» पाच वर्षात ७५ हजार मेगावॅट वीज निर्मिती करणार
» महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्याच आश्वासन
» आरोग्य सेवा कायदेशी अधिकाराच्या कक्षेत आणणार
» वीस वर्ष भाडयाच्या घरात राहिल्यानंतर मालकी हक्क देण्याच आश्वासन
» १० हजार लोकांशी चर्चा करुन तयार केला जाहीरनामा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – सर्वसमावेशक विकासाचे वचन देत काँग्रेसने २०१४ लोकसभा निवडणूकीसाठी बुधवारी निवडणूक जाहीरनामा प्रसिध्द केला. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्ष कार्यालयात हा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला. २००९ च्या निवडणूक जाहीरनाम्यातील ९० टक्के आश्वसाने पूर्ण केल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
मागच्या पाच महिन्यात समाजाच्या विविध स्तरातील लोकांशी चर्चा करुन हा जाहीरनामा तयार केल्याचे राहुल यांनी सांगितले. जाहिरनामा तयार करताना पहिल्यांदाच आम्ही लोकांकडे जाण्याचा निर्णय घेतला. जाहीरनामा तयार करताना नेत्यांबरोबरच नव्हे तर शक्य असलेल्या प्रत्येक घटकांबरोबर चर्चा केली. व्यावसायिक आणि गरिबांकडे दुर्लक्ष करुन आपण विकास साध्य करु शकत नाही असे राहुल म्हणाले. विरोधकांपेक्षा आम्ही जास्त विकास करुन दाखवला आहे. आज आपण गुजरात मॉडेलबद्द ऐकतो पण ते एकच मॉडेल आहे. समानतेने सर्वांचा विकास करण्याचे मॉडेल काँग्रेसकडे आहे असे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये रोजगार निर्मितीबरोबर विकासाची दूरदृष्टी असल्याचे मनमोहन यांनी सांगितले.यंदाच्या निवडणुकीत चांगली धोरणे आणि प्रशासन कोण देतो हे महत्वाचे ठरणार आहे. या जाहीरनाम्यात आम्ही आरोग्याबरोबर घराचा अधिकार देण्याचेही आश्नवासन दिले आहे. ज्येष्ठांना निवृत्ती वेतनाचाही अधिकार देणार आहोत. चांगल्या धोरणांबरोबरच नागरिकांचे सवैधानिक अधिकारही महत्वाचा असल्याचे सोनियांनी सांगितले.
0
शरद पवारांनी मागितली माफी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – दोन वेळा मतदान करा, साता-यात मतदान केल्यानंतर पुन्हा मुंबईत मतदान करा आणि दु-यांदा मतदान करताना शाई पुसायला विसरु नका असे धक्कादायक वक्तव्य केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी निवडणूक आयोगाकडे माफी मागितली आहे. अशा प्रकारचे वक्तव्यकरून संभ्रम आणि गैरसमज निर्माण केल्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. तसेच आयोगाने हे प्रकरण बंद करावे अशी विनंती ही त्यांनी आयोगाकडे केली आहे.
रविवारी २३ मार्च रोजी नवी मुंबईत माथाडी कामागाराच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तीन टप्प्यात होणा-या निवडणूकीचा फायदा घ्या, दोनवेळा मतदान करा असा सल्ला दिला होता. या विधानावरुन शरद पवारांवर टीका सुरु झाल्यानंतर त्यांनी आपण हे विधान गंमतीने केले अशी सारवासारव केली. पवारांच्या या विधानावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यावर आयोगाने पवारांना गुरुवारपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते.
0
हवेतील प्रदूषणाचे ७० लाख बळी
जीनिव्हा (वृत्तसंस्था ) – हवेतील प्रदूषणामुळे २०१२मध्ये जगभर ७० लाख नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आरोग्य विभागाने(डब्लूएचओ) दिली आहे. स्वयंपाकाच्या धुरापासून स्वयंपूर्ण धुरापर्यंतच्या विविध प्रकारच्या घटकांमुळे हवेतील वाढत्या प्रदूषणाबाबत या अहवालात धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.
घरांमधील आणि बाहेरील अशा दोन्ही प्रकारचे हवा प्रदूषण हा सध्याचा मोठा धोका आहे. मुख्य म्हणजे विकसित आणि विकसनशील देशांना तो सारख्याच प्रमाणात सतावत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या सार्वजनिक व पर्यावरण आरोग्याच्या प्रमुख मारिया नीरा यांनी म्हटले आहे. जगात प्रत्येकी आठपैकी एकाच्या मृत्यूचे कारण हवेतील प्रदूषण आहे. फुप्फुसाचा कॅन्सर, श्वसनाचे विकार, ह्रदयविकार अशा विविध आजारांचा त्यात समावेश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आग्नेय आशियाला या प्रदूषणाचा सर्वाधिक फटका बसत आहे. त्यात भारत, इंडोनेशिया, चीन, दक्षिण कोरिया, जपान, फिलिपिन्स आदी देशांचा समावेश आहे. या देशांमध्ये एकूण ५० लाख ९० हजार जणांचा मृत्यू झाला आहे. ४० लाख ३० हजार मृत्यू घरगुती प्रदुषणामुळे झाले आहेत. त्यात कोळसा, सरपण आदींपासून निघणाऱ्या धुराच्या त्रासामुळे झालेले मृत्यू आहेत. बाहेरच्या वातावरणातील प्रदूषणामुळे ३० लाख ७० हजार जणांचा जीव गेला. कोळशाचा धूर; तसेच डिझेल इंजिनच्या धुराचा त्रास त्यासाठी कारणीभूत आहे. घरगुती आणि बाहेरच्या प्रदूषणामुळे गेलेले बळीही मोठ्या संख्येने आहेत. ही आकडेवारी धक्कादायक आणि काळजी करण्यासारखी असल्याचेही नीरा यांनी म्हटले आहे.आपण ज्या हवेत श्वास घेतो, ती शुद्ध राखण्यावर सर्वांनीच भर द्यायला हवा. हवेतील प्रदुषणामुळे होणारे मृत्यू खूप वाढल्याने ही काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.- मारिया नीरा, प्रमुख, सार्वजनिक व पर्यावरण आरोग्य विभाग, जागतिक आरोग्य संघटना
0
भीमशक्तीच्या जिल्हा संघटकाचा खून
औरंगाबाद – भीमशक्तीचे जिल्हा संघटक राजू जाधव यांचा चाणक्यपुरी भागात चाकूने वार करुन निर्घृण खून करण्यात झाला आहे. ही घटना सोमवारी रात्री साडेदहा वाजता घडली. जाधव यांनी भाचीला छेडणाऱ्या एकाला मारहाण केली होती. त्याचा राग मनात धरून आरोपीने दोन साथीदारांच्या मदतीने हा खून केल्याचा संशय आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून जवाहरनगर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिलिंदनगर भागातील रहिवासी राजू यादवराव जाधव (वय ४४) हे सोमवारी रात्री दुचाकीवर विभागीय क्रीडा संकुलाकडून उस्मानपुरा भागाकडे जात होते. यावेळी त्यांना पाठीमागून दुचाकीवर आलेल्या सचिन सुरेश पगारे (वय २८), अनिल प्रल्हाद बदाडे (वय २० सर्व रा. मिलिंदनगर) व एका १७ वर्षाच्या तरुणाने अडवले. या तरुणांनी चाकूने राजू जाधव यांच्यावर सपासप वार करणे सुरु केले. गंभीर जखमी अवस्थेत राजू जाधव याना सोडून आरोपीनी पलायन केले. दरम्यान नागरिकांनी हा प्रकार जवाहरनगर पोलिसांना कळवला. पोलिस निरीक्षक हेमंत कदम यांनी सहकाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत राजू जाधव यांना घाटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. या दरम्यान जाधव यांनी हल्ला करणाऱ्यांची नावे पोलिसांना सांगितली. उपचार सुरू असताना मध्यरात्री दीड वाजता राजू जाधव यांचा मृत्यू झाला. जवाहरनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी पोलिस निरीक्षक कदम यांच्या तक्रारीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रात्रीतून तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. सचिन पगारे याने काही दिवसापुर्वी राजू जाधव यांच्या भाचीची छेड काढली होती. त्यावरून जाधव यांनी त्याला मारहाण केली होती व पुन्हा छेड काढल्यास ‘गेम’ करतो अशी धमकी दिली होती. या घटनेचा राग तसेच ठार मारल्याची धमकी दिल्याने भिती सचिनच्या मनात निर्माण झाली होती. पोलिसांनी घटनास्थळावरुन जाधव यांची दुचाकी, चाकूची मुठ तसेच दुचाकीची लोखंडी चैन जप्त केली.
0
मुजफ्फरनगर दंगलीला राज्य सरकारच जबाबदार: सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर दंगलीसाठी राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनच जबाबदार असल्याचे सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे. तसे असले तरी दंगलीप्रकरणी राज्य सरकारकडून करण्यात आलेला तपास पुरेसा आहे. तसेच सीबीआय तपासाची आणि एसआयटी चौकशी करण्याचीही आवश्यकता नसल्याचे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारकडून करण्यात आलेला तपास पुरेसा आहे, असेही स्पष्ट झाले आहे.
दंगलीला सुरुवात झाली त्या काळात राज्य सरकारकडून कडक पावले उचलण्यात आली नाहीत. त्यामुळेच दंगल आणखी पसरली, असे कोर्टाने स्पष्ट म्हटले आहे. दंगलीतील पीडितांना सुरक्षा देण्यात आली पाहिजे, असे आदेशही कोर्टाकडून देण्यात आले आहेत. जनतेच्या प्रचंड विरोधामुळे आम्ही पहिल्या काही घटनांमध्ये आरोपींना अटक करू शकलो नाही, असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले होते. मात्र हा तर्क कोर्टाने सरळ अमान्य करत राज्य सरकार ती परिस्थिती हाताळण्यास असक्षम ठरल्याचे स्पष्ट म्हटले आहे. मुजफ्फरनगर येथे २०१३ मध्ये उसळलेल्या दंगलीत ५० जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी उत्तर प्रदेश राज्य सरकार विरोधात एक याचिका दाखल करण्यात आली होती. तसेच या दंगलींची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली होती.
0
शेअर बाजाराच्या निर्देशांकाने उच्चांक गाठला
मुंबई- मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने बुधवारी बाजाराला सुरुवात होताच उच्चांकी पातळी गाठली. निर्देशांक २२,१६२.५२ या उच्चांकी पातळीवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही ६ हजार ६०० अंकाच्या वर आहे.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची मेहेरनजर असल्याने गेल्या काही सत्रांपासून सेन्सेक्स रोज नवी शिखरे पादाक्रांत करत आहे. निर्देशांकाने जानेवारी महिन्यात गेल्या दोन वर्षांमध्ये पहिल्यांदाच २० हजार अंकाचा टप्पा गाठला. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. चालू आठवड्यात बँकांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात झालेल्या खरेदीने सोमवारी सेन्सेक्सने त्रिशतकी झेप घेतली. तो २२,०५५.४८ अंकांच्या नव्या शिखरावर बंद झाला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ८८.६० अंकांची वाढ झाली आणि तो ६,५८३.५० वर बंद झाला. मंगळवारी सेन्सेक्स केवळ ०.२७ अंकांच्या घसरणीसह २२,०५५.२१ वर बंद झाला होता. तर निफ्टीत मात्र ६.२५ अंकाची वाढ होऊन तो ६,५८९.७५ वर बंद झाला. बाजारामध्ये सध्या तेजीचे वातावरण असून गुंतवणूकीसाठी चांगली संधी असल्याचे जाणकारांचे मत आहे. आता नवीन वर्षांत तेजीचा नवा उच्चांक स्थापन केला जाईल, असा अंदाज आहे.
चीड
बाबासाहेब
भाषण द्यायचे
तेव्हाही मला चीड यायची.
पाणवठ्यावर पाणी पिताना
समाजाला लाथ मारायचे सवर्ण
तेव्हाही मला चीड यायची.
दारात पाय ठेवला की
मंदिराचे दरवाजे बंद व्हायचे
तेव्हाही मला चीड आली,
बेलछीत कत्लेआम झाला
तेव्हा मी पार चिडून गेलो.
हत्तीवर काढलेल्या
बाबाच्या मिरवणुकीवर दगडं आलीत
तेव्हा मी किती चिडलो ?
सबानेचे डोळे काढले
मवाडेचे तुकडे केले ,
पोचीराम जाळून टाकला ,
माझी चीड तेव्हा आस्मानात पोहचली.
पुतळे तोडले बाबांचे ,
तेव्हा मी चिडून बेभान झालो.
रिडल्सला त्यांनी हात लावला
चिडून माझे डोके बिथरले.
झज्जरला मुंडक्या छाटल्यात,
माझे डोके ठिकाणावर नव्हते चिडल्याने.
खैरलांजीत माणुसकीवर बलात्कार झाला,
माझे डोके चीड चीड करताहे … चीड चीड करताहे …
थोडे थांब, ध्यानात बसू दे ,
नंतर या विषयावर बोलू .
आनंद गायकवाड
[ इस्तो ]
लालदिवा !
आपण पाय पुढे काढला की
वाटाच दिसेनाशा होतात
पतंगाच्या दोरीसारखे
कुणाच्या हाती सूत्र असावे वाटांचे ?
दिशा अंधारून येतात
जिवंत देह फाडणार्या लांडग्यांचा आवाज
ऐकू येतोय हा
की, माणसांत प्रेत शोधणारे मसण्याऊद हे
हे वंशज कुणाचे ?
पार्श्वभागात वाटा घालून बसलेले
हे पामेरियन कुत्रे
आपण पाय पुढे काढला की
सभ्य तोंडाने भुंकतात.
या वाटेच्या वाटेला आपण जाऊ नये
पाय पुढे काढून भुतावळ जागवू नये
असा दम देणारे
थोर नेते आपलेच का ?
पायात घुंगरू बांधून आलेल्यांना
वाटा वळणे सारीच दिसली
हा कोणत्या हिजड्यांचा फड ?
आपले स्वप्न यांनी हायजेक करावे
एअर कंडीशन्ड हवेलीत बसून
झोपड्यांना ब्ल्याकमेल करणारे
हे हरामखोर
दुडूदुडू धावणाऱ्या सूर्यपुत्रांना
ओलीस ठेवून मागताहेत
कपाळावर लालदिवा ..!
भूमिपूजनावाचून
हापशीच खोदल्या गेली नाही
आपल्या गावात येत नाही यांचा रस्ता
कासावीस झालेले हे पाणीदार डोळे
जीभ धरून बाहेर आले
किसानाचे शेत कसे फाशी गेले
आसवात ओलेती मजूर
घाण उपसतांनाही भावते दलालांना
रक्ताळलेल्या टांचा घेऊन
काचा वेचणारा बालमजूर पाहून
सुचते यांना तीर्थाटन
पाणी आटलेले हे कुणाचे पुढारी
बिसलेरीच्या शिशीत बंद
यांची शुष्क गर्जना
आधी यांनाच करू फ्रीज
आपण पाय पुढे काढला की
वाटा तयार होतील असे करू
यांच्या वंशाचा लाल दिवा
हापशीच्या पाण्याने विझवून देऊ.
आनंद गायकवाड
[ आखरीचं तुव्हच सडान चिबवीन ]














