यवतमाळ – येथील कारागृहामध्ये असलेल्या कैद्याचा रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी सकाळी ५.३० वाजता घडली. सुनील हरिभाऊ सानप (४१) रा. टाकळी धरण असे मृतकाचे नाव आहे. प्राणघातक हल्ला प्रकरणात तो अनेक दिवसापासून फरार होता. १३ मार्च रोजी ग्रामिण पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयीन कोठडीत त्याची जिल्हा कारागृहात रवानगी केली होती. अशातच १५ मार्च रोजी प्रकृती बिघडल्याने त्याला येथील वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र आज रविवारी सकाळी ५.३० वाजता त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरु आहे.
Archive for March 17th, 2014
0
रविशंकर यांची मोदींवर स्तुतीसुमने

बेंगळुरू – ‘चांगली अर्थव्यवस्था आणि चांगले राजकारण यांना सांधणारा एकमेव दुवा म्हणजे चांगले प्रशासन हाच आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार ते सिद्ध करून दाखवेल,’ अशी आशा राज्यसभेतील विरोधी पक्ष उपनेते रविशंकर प्रसाद यांनी येथे व्यक्त केले.
‘सेंटर फॉर एंटरप्रेन्युअल एक्सलन्स’ या संस्थेच्या वतीने आयोजित ‘आयडिया एक्स्चेंज फोरम’मध्ये रविशंकर प्रसाद बोलत होते. भाजपच्या प्रवक्त्या मीनाक्षी लेखी कार्यक्रमाला उपस्थित होत्या.’आपण उद्योजकतेविषयी बोलता, धोरणात्मक पुढाकाराविषयी बोलता… नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही आपल्याला वाढीची चांगली संधी देण्याचे आश्वासन देतो. आपण देशातील मंदी, निराश वातावरणाविषयी बोलता पण भाजपशासित राज्यांचा विकासदर १० टक्क्यांहून अधिक असताना देशात मात्र असे वातावरण का आणि कसे आहे?’ उद्योजकांना पोषक वातावरण निर्माण करण्याची ग्वाहीही प्रसाद यांनी दिली. भारतासारख्या देशाचा पंतप्रधान लोकप्रिय नेताच असला पाहिजे. त्याने योग्य आणि ठाम निर्णय घेतले पाहिजेत.
0
नागपुरात बॉम्बची निर्मिती

नागपूर – कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ‘शोल्डर फायर बॉम्ब’ची निर्मिती आता नागपुरात होत आहे. तोफगोळा निर्मितीत अग्रेसर असलेल्या येथील अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्टरीला हे महत्त्वाचे काम मिळाले आहे. १८ मार्चच्या ऑर्डनन्स फॅक्टरी दिनानिमित्ताने ही महत्त्वाची घडामोड आहे.
लष्कराच्या तिन्ही दलांसह सर्वच सुरक्षा दलांना युद्धसामग्री उपलब्ध करून देणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टरीला २१३ वर्षे जुना इतिहास आहे. आज देशात ४१ फॅक्टरी आहेत. मात्र, त्यामध्ये येथील अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्टरीची सर्व प्रकारच्या हार्डवेअर निर्मितीसाठी स्वतंत्र ओळख आहे.अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्टरी ही विविध प्रकारच्या तोफगोळ्यांच्या हार्डवेअर निर्मितीसाठी ओळखली जाते. याच फॅक्टरीला आता ८४ मि.मी. तोफगोळ्यांची ऑर्डर मिळाली आहे. हे तोफगोळे खांद्यावरील रायफलद्वारे डागले जातात. यामुळेच त्याला ‘शोल्डर फायर रिकॉयलेस रायफल’ म्हणतात. ७०० ते १ हजार मीटरपर्यंत याची मारक क्षमता असते. वर्षाला असे ६० ते ८० हजार गोळे अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्टरीत तयार होत आहेत.लष्करातील तोफखाना विभागातील सैनिकांच्या प्रशिक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या १०५ मीमी तोफेचे गोळेदेखील नागपुरात तयार होतात. मात्र, येथील वैज्ञानिकांनीच त्यावर अतिरिक्त संशोधन करून त्याची मारक क्षमता १७ वरुन २०.५ कि.मी.पर्यंत नेली. यामुळे या श्रेणीत असा गोळा तयार करणारा भारत हा जगातील पाचवा देश ठरला आहे. ‘हाय एक्स्ल्पोसिव्ह एक्सटेन्डेड रेंज’ अर्थात ‘हीर’ नाव असलेल्या या तोफगोळ्याचे ५००-५०० चे दोन पायलट लॉट तयार असून ते लवकरच चाचणीसाठी लष्कराकडे पाठविले जात आहेत.
उद्या शस्त्र प्रदर्शन
देशातील पहिल्या ऑर्डनन्स फॅक्टरीतून १८ मार्च १८०२ ला उत्पादन सुरू झाले. त्यानिमित्ताने हा दिवस ऑर्डनन्स फॅक्टरी दिन म्हणून साजरा केला जातो. तर अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्टरी ९ मार्च १९६६ ला सुरू झाली. ऑर्डनन्स फॅक्टरी दिनानिमित्त अमरावती मार्गावरील येथील फॅक्टरीत मंगळवारी, १७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. याशिवाय अन्य कार्यक्रमदेखील आठवडाभर होत आहेत.
0
पृथ्वीभोवती कचरा,अवकाश मोहिमांना आडकाठी

लंडन – अवकाश मोहिमांच्या संख्येमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाढ झाली आहे, त्याचबरोबर अवकाशातील कचऱ्याचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे अवकाशातील कचऱ्याची समस्या अत्यंत तीव्र होणार असून, त्यामुळे भविष्यात अवकाश मोहिमा आखणेच अशक्य होणार आहे, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
युरोपीय अवकाश संस्थेच्या संशोधकांनी हा इशारा दिला आहे. ‘पृथ्वीभोवतीच्या अवकाशामध्ये सध्या वेगाने फिरत असलेल्या छोट्या तुकड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे अवकाशामध्ये निर्धोक अशी छोटी जागाही उपलब्ध नाही. त्यातच अवकाशातील या कचऱ्याची निर्मिती सातत्याने होतच आहे. सध्याचा अवकाश कचरा निर्मितीचा वेग सुरूच राहिल्यास, अवकाशातील टकरींची शक्यता २५ टक्क्यांनी वाढू शकते. त्यामुळे पृथ्वीभोवतीच्या लगतच्या कक्षेमध्ये यानाचे प्रक्षेपण करणे, अशक्य होणार आहे,’ असे युरोपीय अवकाश संस्थेच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. प्रामुख्याने दोन्ही धृवांवरील ८०० ते ९६५ किलोमीटरच्या कक्षेमध्ये सर्वाधिक कचरा असल्याकडेही लक्ष वेधण्यात येत आहे. मृत उपग्रह किंवा मोठे तुकडे पकडून ते पृथ्वीच्या वातावरणापर्यंत आणण्याची गरज आहे. पृथ्वीच्या वातावरणामध्ये प्रवेश केल्यानंतर ते आपोआप जळून खाक होतील, असे सांगता भविष्यातील योजना कशा पद्धतीने काम करेल, हेच त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. अवकाशामध्ये वेगाने फिरत असणाऱ्या एखाद्या शेंगदाण्याच्या आकाराचा तुकडाही हातबॉम्बच्या स्फोटापेक्षा जास्त हानी करू शकतो. त्यातच, कॉफीच्या कपाचा आकार असणारे सुमारे १७ हजारांपेक्षा जास्त तुकडे सध्या दिसून आले आहेत. या तुकड्यांना एकत्र करत नष्ट करण्यासाठी योजना आखण्यात येत आहे. या कचऱ्यामध्ये प्रामुख्याने मृत उपग्रहांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दरवर्षी पाच ते दहा उपग्रह नष्ट केले, तरी या कचऱ्यावर नियंत्रण मिळविणे शक्य असल्याचे या शास्त्रज्ञांनी सांगितले.
खा. आनंदराव अडसूळांविरोधात विनयभंगाची तक्रार
अमरावती – अमरावती लोकसभा मतदार संघाचे विद्यामान खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात एका महिला उमेदवाराने विनयभंग व जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार गाडगेनगर पोलिस ठाण्यात दिली. एका वृत्तवाहिनीने रविवारी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गाडगे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.
सर्वांसमोर विनयभंग कसा – खा. अडसूळ
वृत्तवाहिनीचा कार्यक्रम हा जाहीरपणे सुरु असताना अनेक नागरिक तेथे उपस्थित होते. सर्वांसमोर विनयभंग कसा शक्य आहे असा सवालही खा. अडसूळ यांनी उपस्थित केला. पोलिसांनी कार्यक्रमाची चित्रफीत जप्त केल्यास खरे काय ते स्पष्ट होईल् असेही ते म्हणाले.
0
केजरीवाल काँग्रेसचे एजंट- रामदेवबाबा

नागपूर- आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल म्हणजे केजरी’बवाल’ असल्याची कोटी करून, ते काँग्रेसचे एजंट असल्याचा आरोप योगगुरू रामदेवबाबा यांनी केला.योग महोत्सवानिमित्त रविवारी नागपुरात आलेल्या रामदेवबाबांनी ‘मिनी रोड शो’द्वारे ‘डोअर टू डोअर’ फिरून सत्ता परिवर्तनाचे नागरिकांना आवाहन केले.
भ्रष्टाचार रोखणे, गोरक्षा आदीशी संबंधित ९ मुद्दे बाबांनी उपस्थित केले आहेत. त्यावर भाजपचे नागपुरातील उमेदवार नितीन गडकरी यांनी पहिली स्वाक्षरी केली.केजरीवाल यांचे संकल्प अंमलात येण्यापूर्वीच संपुष्टात आले व ते केजरी’बवाल’ झाले. सर्वसामान्यांच्या आशेवर त्यांनी पाणी फेरले. त्यांच्या कथनी आणि करणीत बरेच अंतर आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देण्याचा निर्धार केल्यानंतरही सर्वाधिक भ्रष्ट काँग्रेसची साथ ते देत आहेत. पंजाविना झाडू चालू शकत नाही, हे त्यांनी सिद्ध केले, अशी टीका त्यांनी पत्रपरिषदेत केली.अरविंद केजरीवाल बोफोर्स, टू जी स्पेक्ट्रम, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा, आदर्श, ऑगस्टा वेस्ट लँड आदी घोटाळ्यांबद्दल एक शब्दही बोलत नाहीत. रॉबर्ट वड्रा, ए. राजा, कनिमोझी यांना ते विसरले. त्यांचा एकमेव निशाणा म्हणजे नरेंद्र मोदी आहेत, असे सांगून रामदेवबाबांनी मोदी यांच्यासह भाजपची जोरदार वकिली केली.अरविंद केजरीवाल यांनी वाराणसीतून निवडणूक लढण्याची शक्यता असल्याकडे लक्ष वेधले असता, ‘गिधड की जब मौत आती है तो वह गाँव की तरफ भागता है’ असे सांगून बाबा म्हणाले, ‘काँग्रेसच्या स्पीड ब्रेकर, एजन्टच्या रूपात केजरीवाल यांना समोर केले आहे.
0
देशात रंगपंचमीचा उत्साह

मुंबई – होळी रे होळी पुरणाची पोळी..’ होळी हा सण मुंबईसह देशभरात रंगपंचमीची मोठी धामधूम सुरु आहे. संपूर्ण देशभरात रंगपंचमीचे रंगमय वातावरण पसरले आहे. रुसवे फुगवे विसरुन एकमेकांवर रंगांची उधळण केली जात आहे.
लोकसभा निवडणूकीच्या धामधुमीत नेते लोकही या धुळवडीत सामील झाले आहेत. त्याचबरोबर मराठी कलाकार, बॉलीवूडचे कलाकारही रंगांच्या या खेळात धुंद होऊन मोठ्या उस्साहात नाच, गाणी करत हा सण साजरा करत आहेत.दिल्लीतही राजकीय नेत्यांनी एकमेकांना रंग लावून रंगपंचमीच्या शुभेच्छा दिल्या. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंग यांनीही कार्य़कर्त्यांसोबत होळी साजरी केली. पर्यावरणास हानीकारक ठरणार नाही असे नैसर्गिक रंग वापरुन ब-याच ठिकाणी धुळवड साजरी केली जात आहे. त्याचप्रमाणे काहींनी तर यावेळी गारपिटग्रस्तांना मदतनिधी देण्याचाही निर्धार केला आहे.रंगपंचमीमध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
0
आगामी लोकसभा निवडणूकीचा खर्च ३० हजार कोटी?

नवी दिल्ली – यावर्षीची निवडणूक ही भारतीय इतिहासातील सर्वात खर्चिक निवडणूक ठरणार आहे. आगामी लोकसभा निवडणूकीसाठी सुमारे ३० हजार कोटीहूनही अधिक खर्च होण्याची शक्यता एका संस्थेने वर्तवली आहे. संस्थेने केलेल्या अभ्यासानंतरच हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. यामध्ये राजकीय पक्ष, सरकार आणि उमेदवार यांच्याकडून केल्या जाणा-या खर्चाचा समावेश आहे.
‘सेंटर फॉर मिडीया स्टडीजने’ केलेल्या सर्वेक्षणात करोडपती उमेदवार, कॉर्पोरेट जगत आणि कंत्राटदारांकडून निवडणूकीसाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केला जाईल असे आढळले आहे. आगामी निवडणुकीसाठी ३० हजार कोटींच्या खर्चापैकी सात ते आठ हजार कोटी रुपये प्रत्यक्ष निवडणुका घेण्यासाठी होईल. यापैकी साडेतीन हजार कोटी रुपये निवडणूक आयोगाकडून खर्च केली जाईल. यात नेमका किती खर्च होईल हे मतदान सुरु झाल्यानंतरच स्पष्ट होईल.यावर्षीच्या उमेदवारांच्या निवडणुकीच्या खर्चात निवडणूक आयोगाने वाढ करुन ७० लाख इतकी ठेवली आहे. त्यामुळे उमेदवारांकडून चार हजार कोटी रुपयांचा खर्च होईल असा अंदाज अभ्यासात वर्तवण्यात आला आहे. १९९६च्या निवडणूकीत दोन हजार ५०० कोटी रुपये इतका खर्च झाला होता. तर २००४ मध्ये हाच खर्च १० हजार कोटींपर्यंत पोहोचला.
0
राष्ट्रीय स्तरावर ‘आप’चा प्रभाव नाही

नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा फारसा प्रभाव पडणार नाही असे मत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने मोठे यश मिळवले होते. मात्र लोकसभा निवडणुकीत त्यांचा फारसा प्रभाव पडणार नाही. दिल्लीत काँग्रेसच्या पाठिंब्यावर ‘आप’ने सरकार स्थापन केले होते. मात्र त्यांना त्यांनी राजीनामा दिला. दिल्लीत सत्तेत आल्यानंतर जी आश्वासने त्यांनी दिली होती, ती त्यांना पूर्ण करता आली नाहीत असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
सरकार स्थापन करणे ही वेगळी जबाबदारी आहे आणि दिल्लीत सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी जबाबदारीपासून पळ काढल्याचे ते म्हणाले. तसेच दिल्लीत सत्तेत असताना ‘आप’ने काहीच काम केले नसल्याची टीका त्यांनी केली.त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत ‘आप’चा फारसा प्रभाव पडणार नाही.
0
लोकसभा निवडणुक उमेदवाराची मालमत्ता केवळ ७५० रुपये
तिरुवनंतपूरम- लोकसभेवर निवडूण येणा-या करोडपती खासदारांची संख्या दिवसेदिवस वाढत असतानाच केवळ ७५० रुपयांची मालमत्ता असलेला एका व्यक्तीने लोकसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे.
केरळमध्ये दहा एप्रिल रोजी होणा-या मतदानासाठी सोशालिस्ट युनिटी सेंटर ऑफ इंडिया(कम्युनिस्ट) पक्षाच्या या उमेदवाराने केरळमधील कोट्टायम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. बिजू असे या उमेदवाराचे नाव आहे. बिजूने उमेदवारी अर्जसोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात रोख रक्कम केवळ ५०० रुपये तर एका सहकारी बॅकेत असलेल्या खात्यात २५० रुपये असल्याचे म्हटले आहे.४६ वर्षीय बिजू यांच्याकडे घर, गाडी अथवा दागदागिने असी कोणतीही मालमत्ता नसल्याचे अधिका-यांनी सांगितले.एसयुसीआयच्या आणखी एका उमेदवार शाजार खान यांची मालमत्ता केवळ एक हजार ५०० रुपये आहे. खान यांनी तिरुवनंतपूरम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याकडे एक मोटरसायकल आणि बँक खात्यातील रक्कमेसह २६ हजार ८०० रुपयांची मालमतात आहे. खान यांच्याकडे दागिने अथवा अन्य कोणतीही मालमत्ता नसल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.केरळमधील लोकसभेच्या २०जागांसाठी दहा एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
0
गुगलचे होळीसाठी रंगीबेरंगी डूडल

मुंबई – विविध रंगाची उधळण केला जाणारा होळी हा सण फक्त भारतातच नाही तर परदेशातही ठिकठिकाणी साजरा केला जातो. मग गुगलही याला अपवाद कसे काय ठरु शकेल?
होळीच्या निमित्ताने गुगलच्या होमपेजवर खास रंगीत डूडल बनवण्यात आले आहे. डूडलमध्ये रंगाची उधळण करणारी पिचकारी दाखवण्यात आली आहे. याआधी गुगलने २००१ मध्ये होळीसाठी विशेष डूडल तयार केले होते. त्यानंतर २०१० आणि २०११ मध्ये गुगलने रंगीबेरंगी डू़डल तयार केले होते.याआधीही गुगलने जागतिक महिलादिनी गुगलकडून खास डूडल तयार करण्यात आले होते. यामध्ये विविध देशातील महिलांच्या शुभेच्छा देणारा व्हिडीओ तयार केला होता.
0
नायजेरियातील हल्ल्यात १०० जणांचा मृत्यू

कदुना – नायजेरियात बंदूकधारी व्यक्तींनी केलेल्या हल्ल्यात तीन गावांतील १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला.
शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी ४०हूनही अधिक अज्ञात बंदूकधारी व्यक्तींनी उग्वार संकवाई, उग्वाम गता आणि छेनशी या गावातील लोकांवर गोळीबार केला. यामध्ये १००हून अधिक मृत्यूमुखी पडले तर काही जणांची घरेही जाळून टाकण्यात आली.नायजेरियातील हल्ला झालेल्या या गावांमध्ये जमिनीच्या मुद्द्यावरुन सतत गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरु आहे. मात्र शुक्रवारी आणि शनिवारी झालेला हल्ला हा फार मोठा होता. या हल्ल्यातील जखमींची संख्याही मोठी आहे.
0
आसारामबापू प्रकरणातील साक्षीदारावर अॅसिड हल्ला

सुरत – लैंगिक शोषण प्रकरणात तुरुंगात असलेले स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू प्रकरणातील साक्षीदार दिनेश वागचंदानी यांच्यावर रविवारी अॅसिड हल्ला करण्यात आला.
वागचंदानी हे मोटारसायकलवरुन त्यांच्या घरी जात असताना दोन व्यक्तींनी त्यांच्यावर अॅसिड फेकले. हल्ल्यात जखमी झालेल्या दिनेश यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तुरुंगात असलेले आसारामबापू यांच्याविरुद्ध दिनेश यांनी साक्ष दिली होती. साक्षीदारांवर करण्यात आलेला हा तिसरा हल्ला आहे. याआधील राकेश पटेल या साक्षीदारास चाकूने जखमी करण्यात आले होते.आसाराम बापू यांना अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा आरोपाखाली ऑगस्ट २०१३ मध्ये अटक केली होती. तेव्हापासून ते तुरुंगात आहेत.
0
नार्वेकरांचा शिवसेनाला जय महाराष्ट्र, राष्ट्रवादीत प्रवेश

मुंबई- बदललेल्या शिवसेनेचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे अॅड. राहुल नार्वेकर यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नार्वोकर यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. तसेच त्यांना मावळमधून उमेदवारी देण्यात आल्याचे घोषणा पवार यांनी केली.
त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नर्वेकर यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी केली. विशेष म्हणजे विधान परिषद निवडणुकीसाठीची उमेदवारी परस्पर माघीर घेतली नसल्याचे नार्वेकर यांनी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उमेदारीमागे घेत असल्याची कल्पना पक्षप्रमुखांना असल्याचे ते म्हणाले. निवडणुकीत घोडेबारा होऊ नये यासाठी उमेदवारी मागे घेतल्याचे नार्वेकर यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादी प्रवेश करताना नार्वेकर यांनी शिवसेना नेतृत्वावर जोरदार टीका केली. पक्षात घुसमट होत असल्याने पक्ष सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हाता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून जनसेवेची संधी मिळाल्याचे नार्वेकर म्हणाले. शिवसेनेतील अंतर्गत राजकारणाचे आपण बळी ठरत होते. तसेच पक्ष नेतृत्वाकडून हवी तशी साथ मिळाली नसल्याचे ते म्हणालेे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचेे पुण्यातील सर्व उमेदवार २६ मार्च रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.










