
यवतमाळ : आधार हेल्थ फाऊंडेशनने गरीब व गरजू रुग्णांसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, आ. मदन येरावार, राजू तोडसाम, आ. राजेंद्र नजरधने, आ. संजीवरेड्डे बोदकुलवार, भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे, लोकनेते अण्णासाहेब पारवेकर, यांच्या उपस्थितीत पार पडला.
ही रुग्णावाहिका मातोश्री रेवती निलावार फाऊंडेशनचे दिपक निलावार यांनी भेट दिली आहे. आधार हेल्थ फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे मान्यवरांनी स्वागत केले. यावेळी मनोज इंगोले, अजय बिहाडे, विजय कोटेचा, अंकूश डोळे, रेखा कोठेकर, माया खेरे उपस्थित होते. आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष राजु पडगीलवार यांनी गरीब व गरजू रुग्णांना रुग्णवाहिकेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.
Archive for December 4th, 2014
0
आधार हेल्थ फाऊंडेशनच्या रूग्णवाहिकेचा लोकार्पण
0
विदर्भात दोन दिवसात ७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

यवतमाळ : एकीकडे शिवसेना भाजपशी सत्ता समीकरणात जास्तीत जास्त मंत्रिपद पदरात पाडून ‘शिवशाहीचा ‘ सुतोवात करीत होती त्याच वेळी मागील विदर्भात ४८ तासात ७ दुष्काळग्रस्त उपासमारीला तोंड देत असलेले मदतीची आस संपलेले शेतकरी आपली जीवन यात्रा आत्महत्या संपवीत होते या नापिकीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये अमरावतीचे घाटलाड्गीचे संदीप नागले ,चमकचे सुरेंद्र निकम चेटकपुरचे प्रभाकर भोसले ,यवतमाळ येथील बाम्ह्रडाचे शैलेश खरे ,अकोला येथील राम्पापुरचे कृष्णा मडावी ,वाशिमचे वाईगौड गावचे राजू टोंगे तर भंडारा येथील बपेराचे अप्पाजी निनावे यांचा समावेश आहे याच दरम्यान महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त मराठवाडा भागात १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त समोर आले ,विदर्भात या वर्षी १०४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून केंद्र व राज्य सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने या आत्महत्या होत असल्याचा आरोप विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी यांनी केला आहे.
मागील २ व ३ डिसेंबरला आपण दिल्लीयेथे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी ,हंसराज अहिर यांना भेटून तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देऊन महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचे सुमारे ५० लाख हेक्टर वरील नगदी पिक कापुस व सोयाबीन सम्पूर्ण नापिकी झाल्यानंतर व आलेल्या पिकला हमीभावापेक्षा कमी मिळत असल्यामुळे तसेच सतत दोन महिन्यापासून ओरड करूनही सादी दखलही अधिकारी घेत नसल्यामुळे सारा महाराष्ट्र हेलावून निघाला आहे त्यातच केंद्र व राज्य सरकारने बध्याची भुमिका घेतली शेतकऱ्यांचे एकूण पिकांचे नुकसान ५० हजार कोटीचे झाले असतांना महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला फक्त साडे चार हजार कोटीची मदत मागितली असुन ही फारच अपुरी असुन महाराष्ट्राचे या वर्षीचे कृषी संकट अभुतपूर्व असुन या करीता कमीतकमी ६० हजार कोटीचे विषेय पकेज देणे काळाची गरज असुन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विदर्भात यावे अशी विनंती विदर्भ जनांदोलन समितीचे नेते किशोर तिवारी केंद्र सरकारला केली आहे .
आपल्या मागणी पत्रात सरकारने दुष्काळग्रस्त शेतकर्यांना प्रति हेक्टरी २५ हजार रुपये सरसकट अनुदान द्या, संपूर्ण शेतकर्यांना कर्जमाफी व नव्याने पीककर्ज देण्याची योजना लागू करा, सर्व उपासमारीला तोंड देत असलेल्या गावातील शेतकरी व शेतमजुरांना अंत्योदय योजना तत्काळ लागू करा, सर्व शेतकर्यांना रोजगार हमी योजनेमधून १०० दिवस प्रति एकरी अनुदान द्या, सर्व दुष्काळग्रस्त शेतकर्यांना व शेतमजुरांना मोफत आरोग्य सुविधा, शिक्षण सुविधा व मुलीच्या लग्नासाठी अनुदान द्या आदी मागण्याही तिवारी यांनी केल्या आहेत.
0
२०११च्या विश्वचषकातील ‘स्टार’ संघाबाहेर

मुंबई – ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये पुढल्यावर्षी होणा-या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारताचा संभाव्य तीस सदस्यीय संघ जाहीर झाला आहे. अपेक्षेप्रमाणे अनुभवी पण सध्या खराब कामगिरीमुळे संघाबाहेर असलेल्या चार खेळाडूंना ३० जणांच्या संभाव्य संघात स्थान देण्यात आलेले नाही.
या संघात एकवेळचे भारतीय संघाचे आधारस्तंभ समजले जाणारे विरेंद्र सेहवाग, युवराज सिंग, गौतम गंभीर, हरभजन सिंग आणि झहीर खान यांना स्थान मिळालेले नाही. या पाच ही खेळाडूंना गेल्या वर्षभरात एकदिवसीय क्रिकेट सामन्यात चांगली कामगिरी करता आली नव्हती. त्यामुळे त्याचा निवड समितीने विचार केलेला नाही.
संभाव्य संघात आशिष नेहरा, पियुष चावला यांना स्थान मिळाले आहे. तर जम्मू काश्मीरकडून खेळणारा अष्टपैलू परवेझ रसूल, उत्तर प्रदेशचा कुलदीप यादव, मनिष पांडे,केदार जाधव, अक्सर पटेल यांनी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत केलेल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर पहिल्या ३०मध्ये स्थान मिळवले आहे.
या विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या ३० जणांमध्ये २०११मध्ये झालेल्या विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडूंची संख्या अगदी कमी आहे. युवराज, सेहवाग, हरभजन, गंभीर आणि झहीर हे खराब कामगिरीमुळे बाहेर आहेत. तर अन्य खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर याने निवृत्ती घेतली आहे. आणि एस.श्रीसंत यावर स्पॉट फिक्सिंगमुळे बंदी घालण्यात आली आहे.पुढील वर्षी १४ फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथे विश्वचषकाला सुरुवात होणार आहे.
0
साध्वींनी केलेले वक्तव्य निषेधार्ह – पंतप्रधान

नवी दिल्ली – केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी अखेर आपले मौन सोडले. साध्वी यांचे हे विधान पूर्णपणे निषेधार्ह असून अशा प्रकारची विधाने करणे टाळली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
दिल्लीतील सभेदरम्यान प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकऱणी गेल्या दोन दिवसांपासून विरोधकांचा संसदेत गदारोळ सुरु आहे. विरोधकांकडून साध्वी यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे. पंतप्रधानांनी यावर स्पष्टीकरण द्यावे अशीही मागणी विरोधकांनी बुधवारी केली होती. यावर गुरुवारी पंतप्रधानांनी राज्यसभेत स्पष्टीकरण दिले. साध्वी यांनी केलेले हे विधान पूर्णपणे निषेधार्ह आहे. नेत्यांनी अशी विधाने करणे टाळले पाहिजे. याप्रकरणी साध्वी यांनी माफी मागितली आहे त्यामुळे ही माफी स्वीकारुन संसदेचे कामकाज सुरळीत चालू द्यावे अशी विनंती मोदी यांनी केली.तसेच साध्वी या नवीन आहेत. त्यांनी याप्रकऱणी माफी मागितली आहे त्यामुळे हे प्रकऱण इथेच संपवावे असे त्यांनी सांगितले.
0
हिवाळी अधिवेशन ३ आठवडे

नागपूर – आतापर्यंतच्या अधिवेशनात नागपूर कराराची आठवण देत सहा आठवडे कामकाज चालवण्याची मागणी करणाऱ्या भाजपच्या नव्या सरकारने पहिले हिवाळी अधिवेशन तीन आठवड्यात गुंडाळण्याची तयारी केली आहे. ८ ते २६ डिसेंबरपर्यंतचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे.
नॅनो मंत्रिमंडळ, शिवसेनेकडून होत असलेली कोंडी आणि अल्पमताची टांगती तलवार सद्यस्थितीत सरकारसमोर आहे. त्यामुळे पहिले अधिवेशन चालवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले. मात्र, सेनेने सत्तेत सहभागी होण्याचे संकेत देताच तीन आठवडे अधिवेशन आहे. नवीन मंत्र्यांना संधी मिळावी म्हणून विस्तार करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. पण, सेनेशी चर्चा लांबली आणि विस्तारही पुढे ढकलण्यात आला. त्यामुळे गेल्या १५ वर्षात विरोधी बाकावर बसून आवाज उठवण्याची सवय असलेले बरेच मंत्री आणि सदस्य अद्याप रुळलेले नाही. त्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेस, शेतकरी संघटना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारला धारेवर धरण्याचे मनसुबे आखले आहेत. मात्र, सेना सत्तेत सहभागी झाल्यास विरोधकांचे हल्ले परतवून लावण्यासाठी सरकारला बळ मिळेल.
अधिवेशनाच्या १९ दिवसांच्या कार्यक्रम पत्रिकेत कामकाज सल्लागार समितीने मुंबईत झालेल्या बैठकीत १९ तारखेपर्यंतचे कामकाज निश्चित केले. १८ तारखेला समितीची बैठक होणार असून त्यात पुढील आठवड्याचे कामकाज निश्चित करण्यात येईल. कामकाजात ४ दिवस शनिवार व रविवारची सुट्टी आणि २५ तारखेला नाताळ असे ५ दिवस सुट्टी राहील. प्रत्यक्ष कामकाज १४ दिवसांचे असून त्यातही पहिला दिवस शोक प्रस्तावावर राहील. त्यामुळे २५ तारखेला गुरुवारनंतर शुक्रवारसाठी थांबवण्याऐवजी शेवटच्या दिवशीचे शासकीय कामकाज आधीच आटोपून २४ ला संपण्याचा विचार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
0
बंदोबस्तावरील पोलिसाचा मृत्यू

नागपूर -हिवाळी अधिवेशनाच्या बंदोबस्तासाठी वर्ध्याहून नागपूरला आलेल्या पोलिस हवालदार-ड्रायव्हर सुधाकर गंथळे यांचा मृत्यू झाला. रात्री राहण्याची कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे ते पोलिसांच्या टाटा सुमो गाडीतच झोपले होते. गाडीमध्येच झोपेत त्यांचा मृत्यू झाला. सकाळी सहकारी पोलिसांना ते गाडीतच मृतावस्थेत आढळले. गंथाळे यांच्या मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल (पोस्टमॉर्टेम रिपोर्ट) आल्यानंतर कळेल, अशी माहिती नागपूर पोलिसांनी दिली. दरम्यान थंडी सहन न झाल्यामुळे अथवा अतिश्रमामुळेच पोलिस हवालदार-ड्रायव्हर सुधाकर गंथळे यांचा मृत्यू शक्यता व्यक्त होत आहे.
0
जवखेडा हत्याकांड : फिर्यादीस अटक

अहमदनगर – अहमदनगरमधील बहुचर्चित जवखेडा हत्याकांडाचे गूढ उकलण्यात यश आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या तिहेरी हत्याकांडातील फिर्यादी प्रशांत जाधवला पोलिसांनी अटक केली असून त्याला आज दुपारी कोर्टासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जवखेडा येथे २० ऑक्टोबर रोजी दलित कुटुंबातील तिघांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे राज्यभरात खळबळ माजली होती. पोलिसांची सुमारे सात पथकं या घटनेचा विविध पद्धतीने तपास करत होते. याप्रकरणातील फिर्यादी प्रशांत जाधव याची लाय डिटेक्टर टेस्ट आणि कोर्टाच्या परवानगीनंतर प्रशांतच्या घराची घेतलेली झडती यातून पोलिसांना महत्त्वपूर्ण पुरावे मिळाले आहेत. या आधारे पोलिसांनी प्रशांतला अटक केली आहे.
संजय जाधव, त्यांची पत्नी जयश्री आणि १९ वर्षाचा मुलगा सुनील या तिघांची तीक्ष्ण हत्यारांनी वार करत त्यांचे अवयव विहिरीत फेकण्यात आले होते. याप्रकरणी प्रशांत जाधव यानेच पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून तो संजय जाधव यांचा पुतणा आहे. या हत्येेचे गूढ उकलल्याचे पोलिसांनी म्हटले असले तरी हत्याकांडाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
0
राज्यात युतीचेच सरकार : १२ मंत्रिपदं देणार

मुंबई – विधानसभा निवडणुकीत दुभंगलेल्या शिवसेना – भाजपा युतीचे अखेर मनोमिलन झाले आहे. गुरुवारी शिवसेना – भाजपाच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली असून शिवसेनेला १२ मंत्रिपदं देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यामध्ये ५ कॅबिनेट व ७ राज्यमंत्रीपदाचा समावेश असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
विधानसभा निवडणुकीत जागावाटपावरुन शिवसेना – भाजपाची २५ वर्ष जुनी युती तुटली होती. मात्र आता या दोन्ही पक्षांनी पुन्हा एकत्र येत नव्याने संसार थाटण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी दुपारी भाजपा व शिवसेना नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा पालवे – मुंडे, शिवसेना नेते सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, रामदास कदम आदी नेते उपस्थित होते. भाजपा व शिवसेनेला मिळालेले यश पाहता जनतेने आघाडी सरकार विरोधात कौल दिल्याचे स्पष्ट होते. आम्ही दोघांनी एकत्र येऊनच सरकार चालवावे अशी इच्छा जनता व दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची होती, त्यासाठी आम्ही पुन्हा युती करण्याचा निर्णय घेतला असे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आमची युती वैचारिक असून ती भविष्यातही कायम राहावी यासाठी समन्वय समिती स्थापन करु असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
शिवसेनेला १२ मंत्रिपद दिली जातील आणि त्यापैकी १० मंत्री उद्या शपथ घेतील. भाजपाचेही ८ ते १० मंत्री उद्या शपथ घेतील,या सर्वांची नावे आज रात्रीपर्यंत जाहीर करु असे फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेच अन्य घटक पक्षांसोबतही चर्चा सुरु असून त्यांना उद्याच्या विस्तारात किंवा हिवाळी अधिवेशनानंतर होणा-या विस्तारात स्थान देण्याबद्दलचा निर्णयही आज रात्रीपर्यंत होईल असेे त्यांनी नमूद केले. महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकाही एकत्रच लढवणार असल्याची घोषणाही याप्रसंगी करण्यात आली. शिवसेना व भाजपाने एकत्र येऊन महाराष्ट्राला मजबूत सरकार द्यायचे ठरवले आहे असे सुभाष देसाई यांनी सांगितले. स्वतंत्र विदर्भाची भूमिका काय या प्रश्नावर फडणवीस यांनी थेट उत्तर देणे टाळले. मात्र दोन्ही पक्ष त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत असे सूचक विधानही त्यांनी केले.
0
अरबी समुद्रातील शिवस्मारकाला केंद्राचा ग्रीन सिग्नल

नवी दिल्ली – मुंबईतील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक होणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवस्मारकांस केंद्रीय पर्यावरण खात्याने मंजुरी दिली असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गुरूवारी दिल्लीत केली.
महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीवेळी भाजपाने ‘छत्रपतींचा आशीर्वाद, चले चलो मोदी के साथ’ अशा प्रकारचे बॅनरबाजी केल्याने शिवसेना-भाजपामध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळाले होते. छत्रपतींचा आशीर्वाद शिवसेनेच्याच पाठीमागे आहे असे शिवसेनेकडून सांगण्यात आले होते. मात्र आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने शिवस्मारकाला परवानगी देत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अरबी समुद्रात ३०९ फूट उंचीचा शिवरायांचा पुतळा उभारणार असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. दरम्यान, बैलगाडी शर्यतीला केंद्राकडून परवानगी देण्यात येत असल्याने शंकरपटाचा नाद पुन्हा एकदा अनुभवयास मिळणार आहे. राज्याच्या अनेक कानाकोप-यात बैलगाडी शर्यत पाहण्यासाठी शेतकरी वर्गामध्ये उत्सूकता असते परंतू राज्यात यावर बंदी घालण्यात आल्याने अनेक शेतक-यांचा हिरमोड झाला होता. परंतू आता पुन्हा एकदा शेतक-यांना बैलगाडयांची शर्यत अनुभवायाचा मार्ग मोकळा होणार असल्याचे जावडेकर म्हणाले.









