
नागपूर, दि. १५ – आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे निलंबित करण्यात आलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे निलंबन मागे घेण्यात आले आहे. आव्हाड यांनी शुक्रवारी नथुराम गोडसेचा जन्मदिवस साजरा करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी विधानसभेत गोंधळ घातला होता, तसेच आक्षेपार्ह शब्दही वापरले होते. त्यानंतर आव्हाड यांना निलंबित करण्यात आले होते. मात्र या निर्णयाचा निषेध करत राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सभात्याग केला होता तसेच राषट्रवादीने कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता.
आव्हाड यांनी नथुराम गोडसेचा जन्मदिवस साजरा करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी केली असता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर निवेदन केले. यावर आव्हाड पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करीत असताना गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता मध्येच बोलायला उठले. अध्यक्षांनी त्यांना बसण्यास सूचना केली असता महेता अध्यक्षांनाच ‘तुम्ही थांबा’, असे म्हणाले. हा अध्यक्षांचा अवमान असल्याचा मुद्दा पुढे करीत आव्हाडांसह विरोधी सदस्यांनी नारेबाजी केली. या वेळी महेता व छगन भुजबळ यांच्यात खटके उडाले. या गोंधळात मुख्यमंत्री बोलत असताना आव्हाडांनी जागेवर बसून आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यामुळे त्यांना चालू अधिवेशन संपेर्पयत निलंबित करण्यात आले होते. मात्र आज अधिवेशन सुरू झाल्यानंतर आव्हाड यांचे निलंबन मागे घेण्यात आले.
Archive for December 15th, 2014
0
जितेंद्र आव्हाड यांचे निलंबन मागे
0
मुंबई सेंट्रल येथील इमारतीला भीषण आग

मुंबई, दि. १५ – मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला भीषण आग लागली आहे. रेल्वे कर्मचा-यांच्या वसाहतीतील १५ मजली इमारतीतील चौथ्या मजल्याला मोठी आग लागली असून अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीत अडकलेल्या ८ जणांना बाहेर काढण्यात यश मिळाले असून बचावकार्य व आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
0
पेट्रोल, डिझेल २ रुपयांनी स्वस्त

मुंबई, दि. १५ – पेट्रोल व डिझेलचे भाव प्रति लिटर दोन रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. त्यामुळे आता ग्राहकांना मध्यरात्रीनंतर पेट्रोल व डिझेलसाठी प्रति लिटर दोन रुपये कमी मोजावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात घसरलेल्या खनिज तेलाच्या भावांमुळे भारतातही पेट्रोलजन्य उत्पादने स्वस्त होत आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी घेतलेल्या पंधरवड्याच्या हवाल्यामध्ये हा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षभरात आंतरराष्ट्रीय बाजारातील खनिज तेलाचे भाव प्रति बॅरल ११० डॉलर्सवरून ६० डॉलर्स इतके घसरले आहेत, आणि येत्या काळातही हे भाव कमीच राहणार असल्याचा अंदाज आहे.
0
पत्रकार शिवकुमार यांचे निधन

बेळगाव – टाइम्स ऑफ इंडियाचे ज्येष्ठ पत्रकार एन. डी. शिवकुमार (३९)यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने सोमवारी निधन झाले. शिवकुमार हे बंगलोरहून बेळगावला कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाचे वार्तांकन करण्यासाठी आले होते. टाइम्स ऑफ इंडियामध्ये ते सह संपादक म्हणून सेवा बजावत होते.
शनिवारी अधिवेशनाला सुट्टी असल्यामुळे शिवकुमार आपल्या मित्रासमवेत महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कोल्हापूरहून परतले होते. रविवारी ते गोकाकचा धबधबा पाहण्यास गेले होते. त्यांना अन्नातून विषबाधा झाल्यामुळे जुलाबाचा त्रास सुरु झाला. त्यांनी के एल ई हॉस्पिटलमध्ये जावून उपचार करून घेतले. उपचारासाठी दवाखान्यात दाखल होण्याचा सल्ला त्यांना डॉक्टरनी दिला पण त्यांनी त्याला नकार दिला. खोलीवर परतल्यावर काही वेळाने त्यांची तब्येत अधिक बिघडली. लगेच त्यांना दवाखान्यात नेण्यात आले. पण डॉक्टरनी ते मृत झाल्याचे घोषित केले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक मंत्र्यांनी हॉस्पिटलमध्ये जावून त्यांचे अंत्यदर्शन घेतले. एन. डी. शिवकुमार यांच्या पश्चात पत्नी जयलक्ष्मी आणि तीन वर्षाची मुलगी साहित्या असा परिवार आहे.
0
रुग्ण दगावल्याने जिल्हा रुग्णालयाची तोडफोड

यवतमाळ, दि. १५ (रवी चरडे) – येथील कै.वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉक्टरांनी उपचारात हयगय केल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या युवकांनी मदत व मार्गदर्शन केंद्राची तोडफोड केल्याची घटना सोमवारी १५ डिसेंबर रोजी दुपारी घडली.
जिल्हा शासकीय महाविद्यालयाच्या शवविच्छेदन गृह परिसरात एक अनोळखी इसम अत्यवस्थ अवस्थेत पडून असल्याची माहीती सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली होती. त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी थातूरमातूर तपासणीकरून सीटीस्कॅन करण्याचा सल्ला दिला. माहिती विचारण्यासाठी मदत व मार्गदर्शन केंद्रात गेलेल्या युवकांना उडवाउडवीचे उत्तर देण्यात आले.अशातच रुग्णाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या युवकांनी मदत केंद्राची तोडफोड केली.
0
लाकूड चोरट्यांचा वनपथकावर हल्ला

यवतमाळ , दि. १५ (विशेष प्रतिनिधी)- झरी तालुक्यातील मुधाडी (गिट्टी) जंगलक्षेत्रात लाकूड चोरीचे प्रमाण गेल्या काहीमहिन्यापासून वाढले आहे. लाकूड चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यासाठी गेलेल्या वनरक्षकाच्या पथकावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री घडली.
किष्टन्ना पुल्लेनवार, सुभाष पिकनिकवार, दिनेश भोयर, महादेव सरोदे या जामणी रेंजच्या वनरक्षकांसह वनकामगार सोनू दडांजे जखमी झाले. लाकूड चोरटे मुधाडी जंगलक्षेत्रात लाकूड कटाई करीत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. त्यावरून त्यांनी रविवारी रात्री ९ वाजतापासून सापळा रचला होता. रात्री २ वाजताच्या सुमारास सहा जण सागवान चौपट डोक्यावर घेवून येताना दिसले. लाकूड चोरटे जवळ येताच वनपथकाने दोघांना पकडले. सागवान खाली टाकून वनपथकावरच हल्ला चढविला. कर्मचाºयांनी बॅटरीचा प्रकाश चोरट्यांच्या चेहºयावर टाकल्याने त्यांची ओळख पटल्याचे वनरक्षक सांगत आहे. चोरट्यांच्या हल्ल्यात वनरक्षक व कर्मचारी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची तक्रार वनपरिक्षेत्र अधिकारी यशवंत नागुलवार यांनी पाटण पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून पोलिसांनी भीमराव आत्राम, सोनू टेकाम, कपलू टेकाम याच्यासह अन्य तिघांविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.
0
लोणबेहळ शिवारात तीन बिबट

यवतमाळ, दि. १५ (प्रतिनिधी) – लोणबेहळ जंगलक्षेत्राला लागून असलेल्या शेत शिवारात रविवारच्या रात्री तीन बिबट शेतकºयांना आढळून आल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. ज्या शेतात बिबट आढळले त्या भागाची पाहणी केली असता वनविभागाच्या पथकाला बिबटचे ठसे आढळून आले.
लोणबेहळ शिवारात सुभाष येनेवार यांच्या शेतात काल रात्री तीन बिबट जागलीला जाणाºया शेतकºयांना दिसले. सहा महिन्यापूर्वी कोसदणी घाटात व लोणबेहळ जंगलातही बिबट आढळले होते. पण आता त्यांनी आपला मोर्चा शेत शिवाराकडे वळविल्याने शेतकºयात धास्ती पसरली आहे. जंगलात पिण्यास पाणी नसल्याने बिबट शेत शिवारात पिण्याच्या पाण्याकरिता येत असल्याचे सांगितल्या जाते. कोट्यवधीचा खर्च करून वन विभागात वनतळे, मातीबांध, बांधातील गाळकाढणे, सिमेंट बंधारे अशी कामे मागील दोन वर्षांपूर्वी झाली. मात्र त्याचा किंचीतही उपयोग झाल्याचे दिसत नाही.
प्रकाश वानखडे, शांतीलाल जयस्वाल यांच्या शेतातही या बिबट आढळून आल्याची माहिती आहे. लोणबेहळ वन परिक्षेत्राचे वनपाल सुभाष लंबे, वनरक्षक नीलेश सरोदे, सुहास कानडे यांनी या शेतात फिरून बिबटचे ठसे घेतले. आज रात्री पुन्हा ते कुठल्या शेत शिवारात आढळतात. त्या वरून उद्या त्या भागात पिंजरा बसविण्यात येणार असल्याची माहिती वनविभागाच्या सूत्राने दिली. तीन बिबट आढळल्याने गावकºयासह शेतकरीही दहशतीत आहेत. शेतात चणा, गहू, ऊस असे पीक आहे. या पिकाकरिता शेतकरी जागलीला व रात्री पाणी देण्यास शेतात जावे लागतेबिबट आढळल्याने एकटा शेतकरी शेतात जाण्यास धजावताना दिसत नाही.
0
कवीतेचा झरा काळजात जिवंत असावा – शंकर बडे

एक अधिक एक अकरा काव्य संग्राहाचे प्रकाशन
यवतमाळ, दि. १५ (प्रतिनिधी) – कविता ही शिकून येत नसत कवितेचा झरा हा काळजात जिवंत असावा लागतो. हे जसे खरे आहे. तसेच प्रत्येकात एक कवी असतो. मात्र त्याला जिवंत ठेवणारी संवेदनशिलता बोबट होऊ न देण्याची गरज असते. एक अधिक एक अकरा या काव्या संग्रहातील कवितेत हा जो जिवंतपणा आहेत. तो मला भावला असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी शंकर बडे यांनी केली. मनिष काळे लिखीत काव्य संग्रहाच्या प्रकाशन सोहळ््यात ते बोलत होते.
राळेगाव पंचायत समिती सभागृतात हा प्रकाशन सोहळा रविवारी पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, श्रमिक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पखाले, गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष विलास भोयर, पंचायत समिती सभापती बेबीताई जवादे, तहसिलदार सुरेश कव्हळे, उपसभापती सुरेश मेश्राम, प्रा. सदानंद चौधरी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. वसंत पुरके म्हणाले की, काव्य संग्रहातील शेतकरी, खंत, जमान, बळी इत्यादी कवितावर मार्मिक भाष्य केले. सोबतच एक अधिक एक अकरा या शिर्षकाचे विश्लेशन केले. तर नितीन पखाले यांनी पत्रकारीता व साहित्यावर भाष्य केले. तहसिलदार सुरेश कव्हळे यांनी शेतकरी आत्महत्योबाबत चिंता मनोगतातून व्यक्त केली. यावेळी राजू रोहणकर, राजेश काळे यांनीही विचार मांडले. या सोहळ््याला डॉ. के. एस. वर्मा, महेश शेंडे, प्रा. पिंपरे, फिरोज लाखाणी, संजय दुरबुडे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कैलास राऊत यांनी केले.
0
तळेगाव(भारी) येथे शेतकºयांचा रस्तारोको, कृषीमूल्य आयोग रद्द करण्याची मागणी

यवतमाळ, दि. १५ (प्रतिनिधी) – शेतकºयांच्या मालाला हमीभाव देण्याबाबत सातत्याने उदासीनता बाळगणारा कृषीमूल्य आयोग रद्द करण्यात यावा, यामागणीसाठी तळेगाव (भारी) महामार्गावर शेतकºयांनी १ तास रस्तारोको आंदोलन केले. यामुळे यामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
कृषीमूल्य आयोग आकस बुद्धीने शेतकºयांच्या मालाला हमीभाव देत आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आत्महत्या वाढत आहे. असा आरोप यावेळी करण्यात आला. या आंदोलनात २५ ते ३० गावातील शेतकरी सहभागी झाले होते. शेतकºयांना अशोक भुतडा, दत्ता चांदुरे, मोरेश्वर आदमणे, परशराम पारधी, सुभाष पातालबंशी यांनी मार्गदर्शन केले. कृषी पंपाची वीज जोडणी देण्यात यावी, कापूस व सोयाबीनच्या भावात वाढ करावी, स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात आदी मागण्या करण्यात आल्या. रस्तारोको आंदोलनात आनंदा नागपूरे, महिपाल प्रधान, अरुण यादव, संदीप गोधने, मोहन ढोरे, मूलराज सोमवंशी, गणपत काकडे, प्रदीप लांडगे, ब्रिजेश शुक्ला, मोतीराम गावंडे, रामकिसन काकाणी, सदाशिव देशपांडे, नितीन मोरघडे, गोविंद राठोड, सुरेश डुकरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. अनुचित घटना घडू नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.









