
गावकरी, शेतकऱ्यांशी साधला संवाद
यवतमाळ दि, 16 : खरीप हंगामात कमी पर्जन्यमान झाल्यामुळे उद्भवलेल्या जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी आज केंद्र शासनाच्या दोन वेगवेळ्या पथकाने केली. एका पथकाने उमरखेड, महागाव तर दुसऱ्या पथकाने बाभूळगाव, कळंब तालुक्यातील गावांना भेटी देऊन पाहणी करण्यासोबतच शेतकऱ्यांशी चर्चा करत परिस्थितीचा आढावा घेतला.
कमी पर्जन्यमानामुळे संपुर्ण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे दोन पथके आज जिल्ह्यात दाखल झाले. अमरावतीहून जिल्ह्यात दाखल झालेल्या पथकामध्ये केंद्र शासनाचे कापुस विकास संचालनालयाचे संचालक आर.पी.सिंग, पशुसंवर्धन उपायुक्त चंद्रशेखर साहुकार, भारतीय खाद्य निगमचे सहसंचालक सुधीर कुमार, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सहाय्यक सल्लागार विजय कुमार बाथला या केंद्र शासनाच्या सदस्यांसोबतच राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव मंदार पोहरे, अव्वर सचिव श्रीरंग घोलप आदींचा समावेश होता. पथकासोबत विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, उपायुक्त रविंद्र ठाकरे, यवतमाळ उपविभागीय अधिकारी नरेंद्र टापरे, राळेगावचे मोहन जोशी, बाभूळगाव तहसिलदार किरण सावंत पाटील, कळंब तहसिलदार संतोष काकडे उपस्थित होते. या पथकाने कळंब तालुक्यातील नायगाव या गावातील शेतपिकांची पाहणी केली. शंकरराव नागोसे या शेतकऱ्याच्या शेताला भेट दिल्यानंतर पथकाने गावकऱ्यांशी संवाद साधला. गावकरी मोहनराव कापसे, सतिश मानलकर, कृष्णा महानूर यांनी शेतकऱ्यांच्या समस्या पथकासमोर विषद केल्या. पथकानेही गावकऱ्यांकडून शेत पिकांसाठी लागाणारा खर्च, दोन-तीन पिके घेतली जातात काय, सिंचनाच्या सोई, वीजेची उपलब्धता यासह एकूनच परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर कळंब तालुक्यातील गांधा या गावाला पथकाने भेट दिली. गांधा शिवारातील श्रीराम कांबळे व रामाजी टेकाम या शेतकऱ्यांच्या शेतपिकांसह विहिरीचीही पाहणी केली. मागिल वर्षाची पिकपस्थिती व यावर्षीच्या परिस्थीतीची तुलनात्मक माहिती पथकाने शेतकऱ्यांकडून घेतली. गांधा येथून सदर पथक वर्धा जिल्ह्याकडे रवाना झाले. परभणी येथून जिल्ह्यात दाखल झालेल्या पथकाने उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी व महागाव तालुक्यातील मुडाणा या गावांना भेटी दिल्या. येथेही शेतपिकांची पाहणी करून दृष्काळी परिस्थितीची माहिती घेतली. ठिकठिकाणी गावकरी, शेतकऱ्यांशी संवाद साधतांना परिस्थितीची पाहणी केल्यानंतर अहवाल केंद्र शासनास सादर करणार असल्याचे पथकातील सदस्यांनी सांगितले.
Archive for December 16th, 2014
0
केंद्रीय पथकाकडून जिल्ह्यातील दुष्काळीसदृष्य परिस्थितीची पाहणी
0
केंद्रीय पथकाची हुलकावणी ; उमरखेड येथे शेतकºयांचा रास्तारोको

उमरखेड, दि. १६ – तालुक्यातील नागेशवाडी येथे आज केंद्रीय पथकाचा दौरा होता. मात्र नागेशवाडीला भेट न देता हुलकावणी दिल्याने शेतकºयांनी सायंकाळी ७ वाजता यवतमाळ-उमरखेड महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.
केंद्राचे पथक नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी येणार म्हणून दुपारपासून आपल्या व्यथा मांडण्यासाठी शेतकरी सुरोशे यांच्या शेतात थांबून होते. आता येणार मग येणार म्हणून शेतकरी सायंकाळ पर्यंत थांबुन होते. तरीही पथक न आल्याने ३०० शेतकºयांनी यवतमाळ-उमरखेड मार्गावर रास्तारोको केला. अखेर सायंकाळी ७.३० वाजता नागेशवाडी येथील शोभा दादाराव सुरोशे या महिलेच्या शेतीला रात्री दरम्यान भेट देवून पाहणी केली. या पथकात वेणू नारायणनन, वंदना सिंगल यांच्यासह दोन अधिकाºयांचा समावेश होता. सारवासारव करता रात्री अंधारात शेतकºयांसोबत संवाद साधला. यावेळी काही शेतकºयांनी आपल्या व्यथा पथकासमोर मांडल्या. पथकाची पाहणी केवळ कागदीघोडे नाचविण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रीया शेतकºयांनी व्यक्त केली.
0
युवकाच्या मृतदेहासह पोलीस ठाण्यावर धडक

यवतमाळ , दि. १६ – आंध्र प्रदेशात कामासाठी गेलेल्या युवकाचा संशस्पद मृत्यू झाल्याची घटना आज घडली. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह घेऊन पांढरकवडा पोलीस ठाण्यावर धडक दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर कार्यवाही करावी अशी मागणी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
शेख शाहरुख शेख कादर (१९) रा. गोंडवाकडी असे मृतकाचे नाव आहे. पांढरकवडा तालुक्यातील गोंडवाकडी येथील युवकला त्याचा नातेवाईक बुरान खान चाँद खान याने फॅकटरीमध्ये काम लाऊन देतो म्हणून नेले. गेल्या चार महिन्यापासून युवक आंध्रातील गुंटूर येथे होता. दरम्यान आज मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बुरान खान युवकाचा मृतदेह घेऊन गोंडवाकडी येथे आला. यावेळी मुलाचा मृतदेह पाहुन त्याच्या आईवडीलांनी हंबरडा फोडला. काम करीत असताना, त्याचा मृत्यू झाल्याचे बुरान खान याने सांगितले. मात्र मुलाच्या मृत्यूवर शंका उपस्थित करीत युवकाच्या मृतदेहासह नातेवाईकांनी पांढरकवडा पोलीस स्टेशनवर धडक दिली. यावेळी पोलिसांनी संतप्त नातेवाईकांची समजूत काढून गुन्हा नोंद केला. मृतदेह शविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करीत आहे.
0
तालिबानी हल्ल्यात १०० मुलं ठार

पेशावर – दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानला आज त्याची सर्वात मोठी किंमत मोजावी लागली आहे. तालिबानी अतिरेक्यांनी पेशावरमधील सैनिकी शाळेवर चढवलेल्या आत्मघाती हल्ल्यात आतापर्यंत १२६ निष्पाप विद्यार्थी व शाळेच्या स्टाफला आपले प्राण गमवावे लागले आहेत. या हल्ल्यात सुमारे ८० विद्यार्थी जखमी झाले असून त्यातील ४२ विद्यार्थी चिंताजनक आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे. दरम्यान, पाच स्फोटांचा आवाज शाळेतून आला आहे.
स्फोटकांचा मोठा साठा घेऊन लष्कराच्या वेशात शाळेत घुसलेल्या दहशतवाद्यांनी सबंध पाकिस्तानलाच हादरवून टाकले आहे. गेल्या चार तासांपासून पाकिस्तानची सुरक्षा यंत्रणा आजवरच्या सर्वात बिकट संकटाचा मुकाबला करत आहे. शाळेत ५०० च्यावर मुलं व स्टाफला दहशतवाद्यांनी ओलीस ठेवले असून मुलांवर अंदाधुंद गोळीबार केला जात आहे. गोळीबारात आतापर्यंत १०० विद्यार्थी तसेच स्टाफ व पाक सैनिक मिळून १२६ जणांचा बळी गेला आहे. आमच्या शिक्षिकेला दहशतवाद्यांनी जिवंत जाळल्याचे एका जखमी विद्यर्थ्याने सांगितले. पाकिस्तानी लष्कराने ओलीस मुलांची सुटका करण्यासाठी युद्धपातळीवर ऑपरेशन हाती घेतले असतानाच एका मानवी बॉम्बचा स्फोट तसेच आणखी चार स्फोट झाल्याने मृतांचा आकडा वाढला आहे. लष्कराने दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी हवाई हल्ल्यांचाही मार्ग अवलंबला असून आतापर्यंत तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे. दोन दहशतवादी अजूनही शाळेत आहेत. गंभीर बाब म्हणजे ज्या दहशतवाद्यांनी हे भयंकर कृत्य केलंय ते १८ ते १९ वर्षांचे आहेत.
0
लग्नाच्या दिवशी वऱ्हाडी बेपत्ता

औरंगाबाद – आठ महिन्यापूर्वी विवाह ठरला. साखरपुडाही पार पडला. ३ डिसेंबर रोजी विवाह करण्याचे निश्चित झाले. तरुणीकडील लोकांनी मंगल कार्यालय ठरविले. पाहुणे आले, नवरदेवाची, वऱ्हाडाची वाट पाहणे सुरू होते. मात्र, ऐनवेळी त्यांच्याकडून लग्नाला येत नसल्याचे कळविण्यात आले. शहरातील २७ वर्षाच्या तरुणीसोबत हा दुर्देवी प्रकार घडला असून वधूपक्षाच्या तक्रारीवरून जवाहरनगर पोलिस ठाण्यात नवऱ्या मुलासह कुटुंबावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गारखेडा भागात राहणाऱ्या मनिषा (वय २७, नाव बदललेले आहे) या तरुणीला मुंबई येथील अश्विन उल्हास हासनाळे यांनी एप्रिल महिन्यात लग्नासाठी मागणी घातली होती. त्यावेळी त्याचे वडील उल्हास हासनाळे हे देखील उपस्थित होते. १५ जून रोजी त्यांचा औरंगाबादला साखरपुडाही पार पडला. ३ डिसेंबर रोजी गारखेडा भागातील एका मंगल कार्यालयात विवाहाचे आयोजन करण्यात आले. मनिषाच्या कुटुंबाने लग्नाची सर्व तयारी केली. लग्नपत्रिका छापून नातेवाईकांना वाटण्यात आल्या. २ डिसेंबर रोजी मनिषाच्या वडिलांनी उल्हास हासनाळे यांना लग्नासाठी औरंगाबादला निघाल्याबाबत विचारणा केली. यावेळी नवरा मुलगा अश्विनला बरे वाटत नसून तो हॉस्पिटलला गेल्याची थाप मारण्यात आली. वारंवार संपर्क करूनही हासनाळे कुटुंबियांनी टाळाटाळ केली. ३ डिसेंबरपर्यंत वाट पाहून, संपर्क करुनही हासनाळे कुटुंब लग्नासाठी न आल्याने हा विवाह सोहळा अखेर रद्द करावा लागला. विवाहासाठी लागलेला पाच ते सहा लाखाचा खर्च यावेळी व्यर्थ गेला. या प्रकरणी मनिषाने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी नवरा मुलगा अश्विन, त्याचे वडील उल्हास, आई पुष्पा, भाऊ हेमंत, बहीण क्रांती त्र्यंबके, क्रांतीचा पती, आत्या अलका शिंदे व अश्विनचे काका यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अश्विनचा यापूर्वी विवाह झालेला होता. ही बाब त्याने मनिषाच्या कुटुंबियांपासून लपवून ठेवली होती. त्यांना माहित झाल्यावर त्याने पहिल्या पत्नीचे चारित्र्य वाईट असून सारखे फीटस् येत असल्याने घटस्फोट घेतल्याची माहिती दिली.
0
काळ्या पैशांच्या यादीत भारत तिसरा

वॉशिंग्टन – देशात आणि देशाबाहेर सर्वाधिक काळा पैसा असलेला भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे, असा निष्कर्ष ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रिटी या आंतरराष्ट्रीय अभ्यास संस्थेने (थिंक टॅंक) काढला आहे.
‘ग्लोबल फायनान्शियल इंटिग्रिटी’ने विविध देशांशी संबंधित काळ्या पैशांच्या संदर्भात एक अहवाल तयार केला आहे. त्यानुसार, २००३ ते २०१२ या काळात भारतामधून सुमारे २८ लाख कोटी रुपये परदेशात पाठवले आहेत. एकट्या २०१२मध्ये तब्बल ६ लाख कोटी रुपये विविध मार्गाने परदेशात पाठविण्यात आले आहेत.काळ्या पैशांच्या व्यवहारात चीन व रशिया हे दोन देश आघाडीवर आहेत. चीनचे २४९.५७ अब्ज डॉलर्स तर रशियाचे १२२.८६ अब्ज डॉलर्स काळ्या पैशांच्या रुपात जगाच्या बाजारात फिरत आहेत. करचुकवेगिरी, गुन्हेगारी व भ्रष्टाचाराच्या मार्गाने परदेशात लपविण्यात आलेल्या काळ्या धनात भारताचा हिस्सा एकूण दहा टक्के इतका आहे. या काळ्या पैशाच्या तपासासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका विशेष तपासणी पथकाची स्थापना केली आहे.
0
कोळसा खाणवाटप घोटाळा : मनमोहन सिंग चौकशीच्या फेऱ्यात


नवी दिल्ली – कोळसा खाणवाटप घोटाळ्यात अखेर माजी पंतप्रधान आणि कोळसा मंत्री मनमोहन सिंग हेही चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला कोळसा खाण बहाल केल्याप्रकरणी अधिक चौकशीची आवश्यकता अधोरेखित करताना कोर्टाने मनमोहन यांचा जबाब नोंदवण्याचे निर्देश सीबीआयला दिले.
विशेष न्यायालयाने हिंदाल्को प्रकरणात तपास संस्थेने दिलेला क्लोजर रिपोर्ट आज फेटाळून लावला. हिंडाल्कोप्रकरणी कुमार मंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी. सी. पारेख व संबंधितांची आणखी खोलात जाऊन चौकशी करण्याची गरज आहे तसेच या खाणवाटपावेळी कोळसा मंत्री राहिलेले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही जाब नोंदवण्यात यावा, असे न्यायालयाने नमूद केले. याप्रकरणी पुढील सुनावणी २७ जानेवारी रोजी होणार आहे. २००५ मध्ये बिर्ला यांच्या हिंदाल्को कंपनीला ओडिशात तालाबीरा दोन आणि तीन अशा दोन खाणींचे वितरण करण्यात आले. त्यावेळी कोळसा खात्याचा प्रभार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे होता. त्यामुळेच याप्रकरणात मनमोहन यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, याआधी २५ नोव्हेंबर रोजी जेव्हा याप्रकरणी सुनावणी झाली होती तेव्हा मनमोहन यांची चौकशी का करण्यात आली नाही?, असा सवाल विशेष न्यायाधीश भरत पराशर यांनी सीबीआयला केला होता. कोळसा खाणवाटप गैरव्यवहारात हिंदाल्को कंपनीच्या कुमार मंगलम बिर्ला यांच्या सहभागाबाबत स्पष्टीकरणाची मागणीदेखील विशेष न्यायालयाने केली होती.









