
अमेठी- जनमत चाचण्यांमधून काँग्रेस पक्षाच्या पराभवाचे भाकीत केले जात असले तरी अशा जनमत चाचण्यांना काँग्रेसने नेहमीच चुकीचे ठरवले आहे आणि या वेळीही या चाचण्यांना चुकीचे ठरवत काँग्रेसलाच विजय मिळणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. अमेठी या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते.
२००४ आणि २००९ मध्ये जनमत चाचण्यांनी अशाच प्रकारे काँग्रेसच्या विरोधात भाकीत केले होते आणि या दोनही निवडणुकीत काँग्रेसनेच सत्ता मिळवून या चाचण्या चुकीच्या ठरवल्या होत्या. या निवडणुकीतही तसेच होणार असल्याचा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. त्यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेल्या राहुल गांधी यांचे अमेठीच्या नागरिकांनी उत्साहात स्वागत केले. या वेळी त्यांच्यासोबत त्यांच्या भगिनी प्रियांका गांधी होत्या. या भावंडांचा ताफा अमेठीच्या रस्त्यावरून जात असताना त्यांना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. या गर्दीला पाहून दोघांनी हात उंचावून त्यांचे स्वागत स्वीकारले. राहुल आणि प्रियांका यांच्यावर या वेळी गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करण्यात आला. प्रियांका गांधींबरोबरच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि प्रियांका या मतदारसंघात राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपकडून स्मृती इराणी व ‘आप’चे कुमार विश्वास निवडणूक लढवत आहेत.
राहुल गांधी महाराष्ट्रात
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी १४ आणि १५ एप्रिल रोजी राज्यात येणार आहेत. या दरम्यान ते भाऊसाहेब वाकचौरे, विश्वजीत कदम, राजीव सातव यांच्यासाठी प्रचारसभा घेतील. १४ एप्रिलला शिर्डी व लातूर येथे तसेच १५ एप्रिल रोजी ते पुणे आणि हिंगोलीला प्रचारसभा घेतील. राज्य प्रभारी मोहन प्रकाश, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे या वेळी उपस्थित राहणार आहेत.
Archive for April, 2014
0
जनमत चाचण्या चुकीच्या ठरणार – राहुल गांधी
0
महाराष्ट्रात १० लाखाहून अधिक तरुण मतदार

मुंबई – लोकसभा निवडणुकीतील रंगत दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मतदानाच्या एकूण नऊ टप्प्यांपैकी चार टप्प्यातील मतदान पार पडले आहे. या निवडणुकीत राज्यातील ७.८९ कोटी मतदारांपैकी १०.७ लाख मतदार हे १८ ते १९ या वयोगटातील असून पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
४८ लोकसभा मतदारसंघ असलेल्या महाराष्ट्रातील विदर्भात मतदानाचा पहिला टप्पा पार पडला असून मोठ्या प्रमाणात लोकांनी मतदानाचा अधिकार बजावला. १.६६ कोटी लोकांपैकी सुमारे ६० टक्के लोकांनी मतदान केले.राज्यातील १९ मतदारसंघांमध्ये १७ एप्रिलला दुस-या टप्प्यातील मतदान होणार आहे. केंद्रीय गृह मंत्री सुशीलकुमार शिंदे(सोलापूर), भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे(बीड), माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण(नांदेड) आणि केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील(सांगली) या नेत्यांमध्ये जोरदार लढत होणार आहे. राज्यातील तिस-या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान २४ एप्रिलला होणार आहे. मुंबई, ठाणे, रायगड, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा १९ मतदारंसघामध्ये मतदान होणार आहे. राज्यात एकूण सात कोटी ८९ लाख ६६ हजार ६४२ मतदारांपैकी १० लाख ७५ हजार ३७६ मतदार हे १८ ते १९ या वयोगटातील आहेत.
0
तेंडुलकर, गांगुली फुटबॉल संघांचे मालक

मुंबई – विक्रमवीर सचिन तेंडुलकर आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली आता इंडियन सुपर लीगमध्ये फुटबॉल संघांचे मालक झाले आहे. सचिनने कोची संघ विकत घेतला असून गांगुलीने त्याच्या घरचा म्हणजे कोलकाता संघासाठी यशस्वी बोली लावली. सचिनने पीवीपी वेंचर्ससोबत कोची संघाचे हक्क मिळवले. याउलट गांगुलीने स्पेनमधील आघाडीचा क्लब अॅटलेटिको माद्रिद, हर्षवर्धन नोटिया, संजीव गोयंका आणि उत्सव पारेख या व्यावसायिकांसोबत संयुक्तपणे कोलकाता संघाचे मालकी हक्क मिळवले.
मुंबई संघाची मालकी मिळवण्यात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला यश आले. त्याने बिमल पारेखसोबत मुंबई संघ विकत घेतला. बॉलिवूड अभिनेता सलमान खानही पुण्याचा संघ विकत घेण्यात यशस्वी झाला. कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांच्या वाधवान ग्रुपसोबत सलमानने ही यशस्वी बोली लावली. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने आय-लीग संघ शिलॉँग लॅजॉँगसोबत गुवाहाटी संघ खरेदी केला. दिल्ली संघ घेण्यात समीर मनचंदा यांचा डेन नेटवर्क यशस्वी ठरला. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाची मालकी असलेला सन ग्रुप बंगळूरु संघ यशस्वीपणे खरेदी करू शकला. व्हिडियोकॉनचे वेणुगोपाळ धूत, दत्तराज साळगावकर आणि श्रीनिवास डेंपो यांनी एकत्रितपणे गोवा संघाचे मालकी हक्क मिळवले. स्टार इंडियाच्यावतीने आयएमजी-रिलायन्सने या लीगचे आयोजन केले आहे. अर्थातच त्याला अखिल भारतीय फुटबॉल संघटनेचे (एआयएफएफ) पाठिंबा आहे. यावर्षी सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान ही लीग होणार आहे.
0
काश्मीरमध्ये दोन जवान शहीद

नवी दिल्ली – काश्मीरमधील पुलवामा परिसरात नॅशनल कॉन्फरन्सच्या कार्यकर्त्याच्या घरावर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन पोलिस जवान शहीद झाले आहेत.
नॅशनल कॉन्फरन्सचे कार्य़कर्ते यवार मसुदी यांच्या घरावर रविवारी दुपारी अतिरेक्यांनी अचानक गोळीबार केला. या गोळीबारात दोन पोलिस जवान ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. अब्दूल हमीद आणि विनोद कुमार अशी शहीद झालेल्या जवानांची नावे आहेत.घटनेनंतर या परिसरात अधिक सैन्य पाठविण्यात आले आहे. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी एका दहशतवाद्याला कंठस्थान घातल्याचे वृत्त आहे.
0
मोदींचे हिटलर बनण्याचे स्वप्न- शरद पवार

नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला असून मोदी हे हिटलर बनण्याचे स्वप्न पाहात असल्याची टीका त्यांनी ट्विटरवर केली.
या देशात सध्या कोणीतरी हिटलर बनण्याचे स्वप्न पाहात आहे. अशा शक्तींना आपणच आवर घातला पाहिजे. या निवडणुकीत आपल्याला मोदींचा पराभव करावाच लागेल, असे ते म्हणाले. आम्ही संसदेत महिलांना ५० टक्के आरक्षण मिळण्याच्या बाजूने आहोत. मात्र भाजपचे नेते खासगीत याबाबत टिंगल टवाळी करतात. असे नेते देश कसे चालवतील असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.
0
निळोणा धरणात दोन युवक बुडाले

यवतमाळ – शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या दोन तरुणांचे मृतदेह आज येथील निळोणा धरणात आढळल्याने एकच खळबळ उडाली़ अश्वजीत हर्षवर्धन ठमके (२१), पंकज भिमराव राजगडकर (१८) रा. बांगर नगर अशी मृतकांची नावे आहेत़
शुक्रवारी ११ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ते घरुन निघुन गेले होते. दरम्यान दुपारी ३ वाजून गेल्यानंतरही ते घरी न परतल्याने नातेवाईकांनी शहर पोलीस ठाणे गाठून दोनही युवक बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दरम्यान आज शनिवारी सायंकाळी निळोणा धरणात दोन युवकांचे मृतदेह तरंगतांना आढळले़ या बाबतची माहिती वडगाव रोड व ग्रामीण पोलिसांना कळविण्यात आली. त्यावरुन वडगाव रोडचे ठाणेदार सुर्यकांत राऊत, ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश राठोड, सहा. पोलीस उपनिरीक्षक यु.एन. पाटील यांनी घटनास्थळ गाठले. पंचनामा करुन मृतदेह पाण्याबाहेर काढल्यानंतर ते अश्वजीत व पंकजचे असल्याचे उघड झाले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने व शहरचे ठाणेदार अरुण आगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे़
0
माओवाद्यांचा निवडणूक पथकावर हल्ला, १३ ठार

सुकमा – निवडणुकीला विरोध करणा-या माओवाद्यांनी शनिवारी छत्तीसगडमध्ये केलेल्या दोन वेगवेगळया हल्ल्यांमध्ये १३ जण ठार झाले आहेत. ठार झालेल्या मध्ये सीआरपीएफच्या पाच जवानांचा समावेश आहे.
बिजापूरमध्ये माओवाद्यांनी सकळी अकराच्या सुमारास निवडणूक पथकाच्या सदस्यांना घेऊन जाणारी बस स्फोटामध्ये उडवून दिली. या हल्ल्यात निवडणूक पथकातील सात सदस्यांचा मृत्यू झाला. दुस-या एका घटनेत दर्भा घाटीमध्ये सीआरपीएफच्या जवानांना घेऊन जाणारी एक रुग्णवाहिका माओवाद्यांनी भुसुरुंग स्फोटामध्ये उडवून दिली.
या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. चार जवान जखमी झाले. बस्तर येथील निवडणूकीचे काम संपवून हे पथक परतीच्या मार्गावर असताना हा हल्ला झाला.
या आठवडयाच्या सुरुवातीला सुकमा जिल्ह्यात सीआरपीएफ आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे तीन जवान शहीद झाले होते. माओवाद्यांचे वर्चस्व असलेल्या बस्तर जिल्ह्यात लोकसभेसाठी एकूण ४७ टक्के मतदान झाले आहे. गुरुवारी दहा एप्रिलला छत्तीसग़डमध्ये मतदान होत असताना माओवाद्यांनी दहा मतदान केंद्राजवळ गोळीबारही केला होता.
0
अमेठीमधून राहुल यांचा अर्ज दाखल

लखनऊ – काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी अमेठीमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी गौरीगंज ते अमेठी जिल्हाधिकारी कार्यालयातपर्यंतच्या ४० कि.मी.च्या मार्गावर रोड शो केला.
उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल यांच्यासोबत त्यांच्या आई आणि काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, बहिण प्रियंका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वडेरा उपस्थित होते. राहुल यांनी यावेळी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना, भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर कोणतीही वयैक्तीक स्वरुपाची टिका केली नसल्याचे सांगितले.
मी मोदी यांच्याबद्दल कोणतेही वयैक्तीक स्वरुपाचे वक्तव्य केलेले नाही. मोदींनी यापूर्वी आपल्या विवाहाची माहिती दिली नव्हती एवढेच मी म्हटले. प्रियंका गांधी यांनीही राहुल यांचे समर्थन केले. राहुल यांनी फक्त नरेंद्र मोदींच्या प्रतिज्ञापत्रातील तथ्य लोकांसमोर मांडले असे प्रियंका म्हणाल्या. २००४ आणि २००९ प्रमाणे याही वेळी निवडणूक पूर्व सर्वेक्षण चाचण्यांचे अंदाज पूर्णपणे चुकतील असा दावा राहुल यांनी केला. अमेठीमधून दोनवेळा खासदार राहिलेले राहुल गांधी येथून तिस-यांदा निवडणूक लढवत आहेत. यावेळी येथे तिरंगी सामना आहे. भाजपक़डून स्मृती इराणी आणि आम आदमी पक्षाकडून कुमार विश्वास रिंगणात आहेत.
0
नेमबाजी : मानवजीत संधूला सुवर्णपदक

नवी दिल्ली – अमेरिकेत झालेल्या आयएसएसफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या ट्रॅप प्रकारात भारताच्या मानवजीत सिंह संधूने अचूक निशाणा साधत सुवर्णपदक पटकावले. त्याने दोनवेळच्या ऑलिंपिक सुवर्णपदक विजेत्या मायकल डायमंडवर मात केली.
मानवजीतने पात्रता फेरीत १२१ आणि अंतिम फेरीत १३ गुणांची कमाई करुन सुवर्णपदक पटकावले. डायमंडने पात्रता फेरीत ११९ आणि अंतिम फेरीत नऊ गुणांचा कमाई केली. उपांत्यफेरीत मानवजीतने पंधरापैकी १४ वेळा लक्ष्यभेद केला. रशियाच्या अलेक्सी आलीपोव्हला कास्यपदक मिळाले. त्याने १२१ आणि १२ गुणांची कमाई केली.
जगातल्या सर्वोत्तम नेमबाजांमध्ये स्पर्धा होती. मायकल डायमंड सारख्या प्रतिस्पर्ध्या विरुध्द सामना जिंकणे एक आव्हान होते. मात्र मी अचूक लक्ष्य भेद केला. हिवाळी हंगामात मी या विश्वचषक स्पर्धेची तयारी केली होती असे विजयानंतर मानवजीतने सांगितले.२०१२ च्या लंडन ऑलिंपिकमध्ये मानवजीतकडून पदकाच्या अपेक्षा होत्या. मात्र त्याला अंतिम फेरीत प्रवेश करता आला नव्हता. पात्रता फेरीत त्याला १६ व्या स्थानावर समाधान मानावे लागले होते.
0
नऊ कोटीची रोकड जप्त

बेल्लारी – निवडणूक अधिका-यांना शनिवारी पहाटे बेल्लारीमध्ये एका सावकाराच्या घरात बेहिशोबी नऊ कोटी रुपयांची रोकड सापडली.
परशुराम पुरिया असे या सावकाराचे नाव असून, गणेश कॉलनीमधील त्याच्या घरामध्ये त्याने मोठया प्रमाणावर रोख रक्कम ठेवल्याची निवडणूक अधिका-यांना खात्रीलायक माहिती मिळाली होती.
त्या आधारावर निवडणूक अधिका-यांनी पहाटे त्याच्या घरावर धाड टाकून शोध सुरु केला असता कपाट आणि पेटयांमध्ये नऊ कोटीची रोकड सापडली. या भागामध्ये चोर बाबुलाल म्हणून हा सावकार ओळखला जातो. गणेश कॉलनीमध्ये त्याची तीन घरे आहेत. निवडणूक अधिका-यांनी रीतसर सर्च वॉरंट मिळवून ही धाड टाकली.रोख रक्कमेबरोबर फिक्स डिपॉझिटच्या पावत्या, सोन्याची बिस्कीटे, वेगवेगळया जमीन व्यवहाराची कागदपत्रे आणि चेक सापडले. हा सावकार राजकीय नेत्यांना, राजकीय पक्षांना व्याजावर पैसे देत होता असे निवडणूक अधिका-यांनी सांगितले. कागदपत्रांमध्ये एका राजकीय पक्षाने पैसे परत केल्याचा चेकही सापडला.
0
६८ लाखांचे परकीय चलन जप्त

मुंबई – राज्य उत्पादन शुल्क व राज्य सरकारच्या भरारी पथकाने आरामबसमधून मुंबईत छुप्या पद्धतीने आणलेल्या सुमारे ६८ लाख ३७ हजार रुपये किमतीचे परकीय चलन व मद्यसाठा जप्त केला आहे. दाना बंदर येथील सोलापूर स्ट्रीट येथे कारवाईत मुद्देमालासह बसही जप्त करण्यात आली. याप्रकरणी गोव्यातील दोन नागरिकांसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात ग्रेट ब्रीटन पाउंड, अमेरिकन डॉलर, सिंगापूर डॉलर, ऑस्ट्रेलियन डॉलर, युरो, जपानी येन, सौदी रियाल, ओमनी रियाल, युएईचे दि-हाम, फ्रेंच फ्रँक, बहारिनचे दिनार व कुवेतचे दिनार अशा विविध १३ देशांतील चलनांचा समावेश आहे. ही रक्कम भारतीय बाजारभावानुसार ६८ लाख ३७ हजार रुपये इतकी आहे. याशिवाय २१ हजार ४०० किमतीचा मद्यसाठा जप्त केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई महत्त्वाची मानली जाते.
0
राहुल गांधी १५ एप्रिल रोजी पुण्यात

मुंबई – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी येत्या १४ आणि १५ एप्रिल रोजी महाराष्ट्राच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर येणार आहेत. राहुल सोमवारी १४ एप्रिल रोजी लातूर व शिर्डी येथे जाहीर सभांना संबोधित करतील. दुसऱ्या दिवशी, मंगळवारी १५ एप्रिल रोजी ते पुणे व हिंगोली येथे जाहीर सभांना मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे उपस्थित राहतील.
0
सायबरविश्वात आलाय ‘हार्टब्लीड’ व्हायरस

वृत्तसंस्था, नवी दिल्ली – तुम्हाला काही संशयित ई-मेल्स, लिंक किंवा ऑडिओ, व्हिडिओ क्लिप्स आल्यात का? या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी असेल, तर तुमचे पासवर्ड तातडीने बदलून टाका. भारतीय सायबरविश्वात हार्टब्लीड नावाच्या व्हायरसने प्रवेश केला असून, त्यामुळे पासवर्ड, क्रेडिट कार्ड नंबर आणि अन्य महत्त्वाची गुप्त माहिती हॅकर्सच्या ताब्यात जाण्याची भीती आहे. म्हणून, भारतीय सायबर तज्ज्ञांनी सर्व इंटरनेट वापरकर्त्यांना सुरक्षेचा इशारा दिला आहे.
हा व्हायरस खुल्या सिक्युअर सॉकेट लेयरवर (ओपन एसएसएल) हल्ला करतो. ‘ओपन एसएसएल’ हा ऑनलाइन यंत्रणेमधला सर्वांत महत्त्वाचा प्रोटोकॉल असून, माहिती सुरक्षित ठेवणे आणि माहितीचे इंटरनेटवर हस्तांतर करणे, यामध्ये तो प्रोटोकॉल महत्त्वाचे काम करतो. त्यामुळे इंटरनेट वापरकर्त्यांची वैयक्तिक गुप्त माहिती, पासवर्ड आदी हॅकर्सच्या ताब्यात जाण्याची भीती ‘कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ इंडिया’ने (सर्ट-इन) व्यक्त केली आहे. ‘सर्ट-इन’ ही हॅकिंग, फिशिंगशी दोन हात करणारी; तसेच भारताच्या इंटरनेट डोमेनशी निगडित सुरक्षा वाढवण्यासाठी कार्यरत असलेली संस्था आहे. या व्हायरसपासून धोका खूप जास्त धोका असून, सर्व असुरक्षित यंत्रणा या व्हायरसला बळी पडू शकतात, असा इशारा या संस्थेने दिला आहे. लाल रंगाचा ‘एक्स’ किंवा स्राव होणाऱ्या हृदयाचे चिन्ह असे संशयित मेसेज आधी येऊ शकतात आणि नंतर व्हायरसचा हल्ला होतो, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
आपण काय करू शकतो?
तज्ज्ञाशी संपर्क साधून ‘ओपन एसएसएल’ची व्हर्जन ‘१.०.१जी’ अशी अपग्रेड करून घ्यावी. अँटीव्हायरस, ऑपरेटिंग सिस्टीम, फायरवॉल सिस्टीम आदी वेळेवर अपग्रेड करून घ्यावे. ई-मेल, बँकिंग यंत्रणा; तसेच महत्त्वाच्या ऑनलाइन अकाउंटचे पासवर्ड वेळोवेळी बदलावेत.
0
फेसबुकमुळे महिलांमध्ये नकारात्मक भावना

अमेरिका व ब्रिटिश विद्यापीठांचे संशोधन
वॉशिंग्टन – बराच वेळ फेसबुक वापरणाऱ्या महिलांना फेसबुकवरील इतर महिलांचे फोटो पाहून स्वतःमध्ये कमतरता आहे असे वाटायला लागते, असा धक्कादायक निष्कर्ष अमेरिका आणि ब्रिटनमधील विद्यापीठांनी केलेल्या एका संयुक्त संशोधनाद्वारे समोर आला आहे.
सिअॅटलमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेत हा शोधनिबंध प्रसिद्ध करण्यात आला. हे संशोधन इंग्लंडमधील स्ट्रेथक्लेड विद्यापीठ आणि अमेरिकेतील आयोवा आणि ओहायो विद्यापीठात करण्यात आले आहे. त्यासाठी कॉलेजात जाणाऱ्या ८८१ तरुणींचा फेसबुक वापर, त्यांच्या खाद्य आणि व्यायामाच्या सवयी यांचा अभ्यास करण्यात आला.
या संशोधनात सामील असलेल्या संशोधिका पिटी एकलर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘फेसबुक बराच काळ वापरणाऱ्या महिला स्वतःच्या शरीरयष्टीची तुलना फेसबुकवरील इतर महिलांच्या फोटोंशी करतात. इतर फोटो अधिक सरस असल्याचे वाटून त्यांच्यामध्ये स्वतःबद्दल नकारात्मक भावना वाढीस लागते.’ ‘महिला जितका अधिक वेळ फेसबुक वापरतात, तितकी त्यांच्यामध्ये नकात्मक भावना बळावते. त्याचप्रमाणे ज्या महिलांना स्वतःचे वजन कमी करायचे आहे, त्या महिला फेसबुकवर इतर महिलांच्या वेशभूषा आणि देहबोलीकडे जास्त लक्ष देऊन पाहतात,’ असेही पेटी यांनी सांगितले. स्वतःच्या देहाविषयी नकारात्मकता निर्माण झाल्यास खाण्याविषयी अनास्था निर्माण होते आणि त्याचा परिणाम आरोग्यावर होतो. सोशल मीडियाचा अशा पद्धतीने वापर होत असल्यास ते अत्यंत धोकादायक आहे, असेही संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे.
0
रक्ताने हात माखलेल्या लोकांनी देशाबद्दल बोलू नये- ममता

करंदिघी – तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्यावर मतांचे राजकारण करत असल्याच्या नरेंद्र मोदींच्या आरोपावर ममता यांनी सोमवारी चोख प्रत्युत्तर दिले. रक्ताने हात माखलेल्या लोकांनी देशाबद्दल बोलूच नये अशी बॅनर्जी यांनी मोदींवर नाव न घेता टीका केली. उत्तर दिनापूर येथील सभेदरम्यान त्या बोलत होत्या.
अटलबिहारी वाजपेयींचे सरकार असताना तृणमूल काँग्रेस केंद्र सरकारमध्ये सहभागी होता. तसेच गुजरातमध्ये झालेल्या दंगलीला त्यावेळी कोणीही समर्थन केले नव्हते असे त्यांनी म्हटले.मी कधीही हिंदू मुस्लिम यांच्यात फूट पडू देणार नाही. भाजपकडे जरी मोठ्या प्रमाणात निधी असला तरी पश्चिम बंगालमध्ये त्यांना एकही जागा मिळणार नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
0
उद्या चौथ्या टप्प्यातील मतदान

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान उद्या (१२ एप्रिल) शनिवारी होणार आहे. या टप्प्यात चार राज्यातील सात लोकसभेच्या जागांवर मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया सात एप्रिल रोजी सुरु झाली होती. १० एप्रिल रोजी तिस-या टप्प्यातील मतदान झाले असून या तिन्ही टप्प्यात मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याचे दिसून आले आहे. चौथ्या टप्प्यात गोवा, आसाम, त्रिपूरा आणि सिक्कीम या चार राज्यातील सात जागांवर मतदान होणार आहे. या सात जागांवर ७४ उमेदवार उभे आहेत. गोव्यात लोकसभेच्या केवळ दोनच जागा असून या ठिकाणी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या ठिकाणी काँग्रेस, भाजप, सीपीआय आणि अन्य प्रादेशीक पक्षांनी आपले उमेदवार उभे केले आहेत. उत्तर गोव्यातून भाजपचे विद्यमान खासदार श्रीपाद नाईक हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्याच्या विरोधात काँग्रेसकडून रवी नाईक तर आपने दत्ताराम देसाई हे प्रमुख उमेदवार आहेत.दक्षिण गोव्यात काँग्रेसने विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्या ऐवजी आमदार आलेक्स रेजिनाल्ड याने उमेदवारी दिली आहे. त्याच्याविरोधात भाजपकडून नरेंद्र सवाईकर आणि आपचे स्वाती केरकर हे प्रमुख उमेदवार आहेत.सिक्कीममधील लोकसभेच्या एका जागेबरोबरच विधानसभेच्या ३२ जागांसाठी मतदान होणार आहे. आसाममधील दुस-या टप्प्यात तीन मतदारसंघात मतदान होणार आहे. आसाममध्ये याआधी पाच लोकसभा मतदारसंघात सात एप्रिल रोजी मतदान झाले होते. तर त्रिपुरामध्ये एका जागेसाठी मतदान होणार आहे. राज्यात लोकसभेच्या दोन जागा असून सात एप्रिल रोजी येथे पहिल्या टप्प्यात मतदान झाले होते.
0
रॉकस्टार नंदू भेंडे यांचं निधन

मुंबई – मराठीतील पहिले रॉकस्टार नंदू भेंडे (मूळ नाव सदानंद) यांचं आज सकाळी मुंबईत निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. मराठी चित्रपटातील ज्येष्ठ अभिनेते आत्माराम भेंडे आणि डॉ. आशा भेंडे यांचे ते चिरंजीव होते.
७०च्या दशकात मराठी संगीतप्रेमींना नाट्यसंगीतानं, भावसंगीतानं वेड लावलं होतं. त्या काळात नंदू भेडे यांनी रॉक म्युझिक मराठीत आणलं होतं. जोश, जल्लोषानं भरलेलं हे संगीत तरुणाईला आवडलं आणि त्यांनी त्या तालावर ठेकाही धरला. ‘तीन पैशाचा तमाशा’ या नाटकातील अंकुशच्या भूमिकेतून नंदू भेडेंनी रसिकांवर आपली छाप पाडली होती. अगदी, पु. ल. देशपांडे यांनीही त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती. नंदू भेंडे यांनी व्हेलवेट फॉग, सेव्हेज एन्काउंटर आणि ऑटोमिक फॉरेस्ट या बँडमध्ये गाणी गायली होती. त्याचप्रमाणे ‘जिझस क्राइस्ट सुपरस्टार’ या नाटकांमधील त्यांची भूमिकाही जबरदस्त गाजली होती. १९८० मध्ये नंदू भेंडेंनी ‘डिस्को डान्सर’ या हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं होतं आणि ते ‘गोल्ड डिस्क’चे मानकरी ठरले होते. आर. डी. बर्मन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, बप्पी लहरी यांच्यासोबतही त्यांनी काम केलं होतं. नंदू भेंडे यांचे अनेक अल्बम जुन्या संगीतप्रेमींनी संग्रहात ठेवलेत. सोनी टीव्हीवरची चमत्कार, दूरदर्शनवरील चंद्रकांता, झी टीव्हीवरची जिना इसी का नाम है, दायरे यासारख्या काही मालिकांनाही त्यांनी संगीत दिलं होतं.रॉकमध्ये मराठी माणसाचा झेंडा पहिल्यांदा फडकवणा-या नंदू भेंडे यांच्या निधनाबद्दल संगीतवर्तुळात दुःख व्यक्त होतंय.
0
केजरीवाल घेणार ‘डॉन’चा पाठिंबा

नवी दिल्ली – एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना वाराणसीत कोणत्याही परिस्थितीत पराभूत करण्याचा चंग आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी बांधला आहे. त्यासाठी केजरीवालांनी ‘वाराणसीचा डॉन’ म्हणून ओळखले जाणारे मुख्तार अन्सारी यांच्याशी हातमिळवणीचे संकेत दिले आहेत. मोदी आणि गांधींना हरवण्यासाठी जो कोणी आम्हाला पाठिंबा देईल, त्याला सोबत घेऊ,’ असं केजरीवालांनी म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसी लोकसभा मतदारसंघात केजरीवालांनी मोदींना आव्हान दिले आहे. मोदींच्या हिंदुत्ववादी प्रतिमेमुळे केजरीवालांची खरी भिस्त मुस्लिम मतांवर आहे. वाराणसीतील मुस्लिम धर्मगुरूंनीही शाही इमामांचे आवाहन धुडकावून केजरींना पाठिंबा दिला आहे. त्यातच गेल्या वेळी येथून निवडणूक लढणारे मुख्तार अन्सारी यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने केजरींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता केजरीवालांनी अन्सारी यांच्या कौमी एकता दलाचा थेट पाठिंबा मिळविण्याचे प्रयत्न चालवले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्तार अन्सारी यांचे बंधू व कौमी एकता दलाचे अध्यक्ष अफझल अन्सारी आणि केजरीवाल यांच्यात यासंदर्भात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत. मुख्तार ‘आप’ला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केजरीवाल यांच्या पक्षाचा वाराणसीत कोणताही प्रभाव नाही. त्यांची स्वतंत्र अशी व्होटबँक नाही. मात्र, अन्सारी यांचा पाठिंबा मिळाल्यास चार लाख मुस्लिम मतांच्या बळावर मोदींशी थेट लढत देता येईल, असा विश्वास त्यांना आहे. हेच गणित लक्षात घेऊन त्यांनी कोणाचाही पाठिंबा चालेल, असा प्रचार सुरू केला असल्याचे मानले जात आहे.
0
अल्पवयीन मुलीवर बलात्कार

भिवंडी – भिवंडी तालुक्यातील दलोडे येथील एका पोल्ट्री फॉर्ममध्ये काम करणाऱ्या नराधम तरुणाने वीट भट्टीवर काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला ताडी पाजून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला गणेशपुरी पोलिसांनी अटक केली आहे.
१४ वर्षीय पीडित मुलगी आपल्या मावशीसोबत वीट भट्टीवर काम करण्यासाठी आली होती. तिथेच जवळ असणाऱ्या पोल्ट्री फॉर्ममध्ये काम करणाऱ्या कमलाकर जाधव (२६) याच्याशी तिची ओळख झाली. कमलाकर जाधव याने तिला ताडी देऊ केली जसजसा ताडीचा अंमल तिच्यावर चढू लागला त्यानंतर त्याने जबरदस्तीने बलात्कार करुन तो फरार झाला. पीडित तरुणीने घरी परतल्यानंतर घडला प्रकार कुटुंबीयांनाच्या कानावर घातला. पीडित तरुणीच्या कुटुंबीयांना तात्काळ गणेशपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करीत बलात्कारी कमलाकरच्या मुसक्या आवळल्या.
0
नक्षली हल्ल्यात जवान शहीद

नागपूर – गडचिरोली जिल्ह्यातील आहेरी येथे मतदान यंत्रांची वाहतूक सुरू असताना शंभरहून अधिक नक्षलवाद्यांनी तेथील निवडणूक यंत्रणेच्या ताफ्यावर जोरदार हल्ला चढवला. अंदाधुंद गोळीबारात एक जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. तर अन्य पाच जवान जखमी झाले आहेत.
गिरीधर आत्राम असे शहीद जवानाचे नाव असल्याचे सांगण्यात येते आहे. तर रमेश पुंगटी, संदीप कोडावे, प्रकाश चिकराम, अरूण बुरशे, मुरलीधर भलावी, अशी जखमी जवानांची नावे सांगण्यात येत आहेत. जखमी जवानांना ऑरेंज सिटी नावाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.









