
नवी दिल्ली- आम्ही दिलेल्या आदेशानुसार जर राज्यातील अधिका-यांच्या बदल्या केल्या नाही तर पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या निवडणुकाच रद्द कराव्या लागतील असा इशारा केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पाच पोलिस अधिक्षक, एक जिल्हाधिकारी आणि दोनन अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिका-यांच्या बदलीचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते. मात्र या अधिका-यांच्या बदल करण्यास मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नकार दिला. यावर निवडणूक आयोगाने थेट राज्यातील निवडणुकाच रद्द करण्याचा इशारा दिला आहे. तसेच यासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांच्या विरोधात कारवाइ केली जाईल असेही आयोगाने म्हटले आहे. या अधिका-यांच्या विरोधात तक्रारी आल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांची बदली करण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भात बॅनर्जी यांनी थेट निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला होता. आयोग आपल्या विरोधात असलेल्या काँग्रेस, भाजप आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे एंजट असल्याची टीका त्यांनी सोमवारी केली होती. तसेच या बदल्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी निवडणूक आयोगावर असेल असेही बॅनर्जी म्हणाल्या होत्या. दरम्यान, राज्याच्या मुख्य सचिवांनी निवडणूक आयोगाला या अधिका-यांच्या बदल्यांच्या संदर्भात पुन्हा एकदा विचार करण्याची विनंती केल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्य सचिवांनी आयोगाला लिहलेल्या पत्रात, अधिका-यांच्या बदल्या राज्य सरकारशी चर्चा केल्यानंतरच होऊ शकते असे म्हटले आहे.
Archive for April, 2014
0
प.बंगालमधील निवडणुकाच रद्द करु , केंद्रीय निवडणूक आयोगाचा इशारा
0
चकमकीत दोन जवान शहीद

श्रीनगर – कुपवाडा जिल्ह्यातील पंचगाम येथे भारतीय लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाले असून दोघा दहशतवाद्यांना यमसदनी धाडण्यात जवानांना यश आले आहे. या भागात अजूनही दोन्ही बाजूने अधून-मधून गोळीबार सुरू आहे.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून जवळच ही चकमक झडली. गेल्या १२ तासांपासून गोळीबार सुरू आहे. त्यात एक निरीक्षक तसेच एक जवान शहीद झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सोमवारी रात्री ९ च्या सुमारास ही चकमक सुरू झाली. पंचगाम गावात काही अतिरेकी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी या भागाला घेरले होते. यावेळी दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार सुरू केला आणि जोरदार चकमक झडली. गोळीबारात पाच पोलीस जखमी झाले असून दोन पोलीस बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. या दोघा पोलिसांचे अतिरेक्यांकडून अपहरण करण्यात आले असावे, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
0
मुझफ्फरनगर दंगल; आरोपीचा मृत्यू
मुझफ्फरनगर – उत्तर प्रदेशामधील मुझफ्फरनगरच्या दंगल प्रकरणातील आरोपी प्रवीण कुमार यांचा आज (मंगळवार) येथील जिल्हा तुरुंगात हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला.
गेल्या वर्षी मुझफ्फरनगरमधील शामली येथे भडकलेल्या दंगलीत कुमार याने एका व्यक्तीची गोळी घालून हत्या केल्याचा आरोप त्याच्याविरोधात ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर अनेकांना जखमी केल्याचा ठपकाही कुमारवर होता. हृदयविकाराचा झटका येताच कुमार याला तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. कुमारचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.
0
रिक्षावाल्याने केजरीवाल यांना मारले

नवी दिल्ली – आम आदमीच्या कल्याणासाठी राजकारणाच्या आखाड्यात उतरलेले आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आज (मंगळवार) पुन्हा आम आदमीच्या संतापाचे लक्ष्य ठरले. दिल्लीच्या सुलतानपूर भागात रोड शो करणाऱ्या केजरींना एका सामान्य रिक्षावाल्याने कानफाटात हाणली. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीआधी दिलेली आश्वासने पूर्ण न केल्याच्या रागातून रिक्षावाल्याने हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे.
उत्तर-पश्चिम दिल्लीतील लोकसभा मतदारसंघातील ‘आप’च्या उमेदवार राखी बिडलान यांचा प्रचार करण्यासाठी केजरीवाल दुपारी सुलतानपूर येथे गेले होते. रोड शोच्या माध्यमातून वाजतगाजत त्यांचा प्रचार सुरू होता. त्याचवेळी गर्दीतील एक व्यक्ती हार घालण्याच्या निमित्ताने केजरीवालांच्या जवळ आला आणि त्याने केजरींच्या गालात जोरदार थप्पड हाणली. यामुळे केजरींच्या डोळ्याला दुखापत झाली आहे. हा प्रकार लक्षात येताच ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी केजरींवर हात उगारणाऱ्या व्यक्तीला चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या व्यक्तीचे नाव लाली असून तो दिल्लीतील अमन विहार परिसरात राहतो. लाली हा रिक्षाचालक आहे. दिल्लीकरांना मोठमोठी आश्वासने देऊन केजरीवाल यांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीत २८ जागा जिंकल्या होत्या. योगायोगाने, काँग्रेसच्या पाठिंब्यावर दिल्लीत केजरीवालांचे सरकारही स्थापन झाले. त्यामुळे त्यांच्याकडून दिल्लीकरांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. मात्र, जनलोकपालचे निमित्त करत अवघ्या ४९ दिवसांत केजरींनी सत्ता सोडली. त्यामुळे दिल्लीकरांमध्ये प्रचंड नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने या नाराजीला तोंड फुटू लागल्याचे बोलले जात आहे.याआधी वाराणसी येथे प्रचार करताना केजरीवाल यांच्यावर ‘शाईहल्ला’ झाला होता. त्यानंतर दिल्लीतील दक्षिणपुरी भागात गाडीवर चढून एकाने केजरींना ठोसा लगावला होता. आज याचीच पुनरावृत्ती झाली. विशेष म्हणजे, याआधी केजरींवर हल्ला करणारे दोघेही ‘आप’चे कार्यकर्ते होते.
0
वाराणसीत कॉंग्रेसचे अजय राय देणार मोदींना टक्कर

नवी दिल्ली – वाराणसी मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाने अजय राय यांना उमेदवारी जाहीर केली आहे. नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी मिळून एकच उमेदवार जाहीर करावा अशी चर्चा सुरु होती. परंतु सर्व पक्षांमध्ये एकमत न झाल्याने अखेर कॉंग्रेसने आज, मंगळवारी आपला उमेदवार जाहीर केला.
मोदींविरुद्ध कॉंग्रेसकडून गेले काही दिवस अजय राय यांच्या नावाची चर्चा सुरु होती. राय हे पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहे. पूर्व भाजप नेते असलेले राय यांना २००९ च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारले गेले होते. परिणामी त्यांनी सपाच्या तिकीटवर निवडणूक लढवून मुरली मनोहर जोशी आणि मुख्तार अंसारी यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. पूर्व उत्तरप्रदेशातील वजनदार नेता मानले जाणारे राय यांची वाराणसी मतदारसंघातील भूमिहार आणि ब्राम्हण मतदारांवर चांगली पकड असल्याचे सांगण्यात येते.भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यासह आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय समन्वय अरविंद केजरीवाल, कॉंग्रेसचे अजय राय आणि कौमी एकता दल पक्षाचे मुख्तार अंसारी हे प्रमुख उमेदवारी रिंगणात आहेत.
0
सत्ताधाºयांकडून गारपिटीचेही राजकारण – राज ठाकरे यांचा आरोप

यवतमाळ : राज्यातील शेतकरी गारपिटीच्या तडाख्याने उद्ध्वस्त झाल्यानंतर केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे आपापल्या पक्षाचे मतदारसंघ असलेल्या भागात पाहणी करण्यासाठी गेले. सत्ताधाºयांनी गारपिटीचेही राजकारण केले, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार राजू पाटील राजे यांच्या प्रचारार्थ येथील पोस्टल मैदानावर आयोजित सभेत बोलत होते. यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष आनंद एंबडवार, हेमंत गडकरी, प्रवीण बरडे, श्रीधर जगताप, विठ्ठल लोखंडकर, उमेदवार राजू पाटील राजे, मनसेचे जिल्हाप्रमुख राजू उंबरकर, अभय गडम, अशोक पुरी यांच्यासह मनसेचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना म्हणाले की, सर्वाधिक शेतकरी आत्महत्या ही जिल्ह्यासाठी भूषणावह गोष्ट नाही. दु:ख प्रत्येकालाच असतं, पण आत्महत्या कोणत्याही संकटाला पर्याय होऊ शकत नाही, असा धीर राज ठाकरे यांनी शेतकºयांना आपल्या भाषणातून दिला. गेल्या ६५ वर्षांपासून त्याच त्या प्रश्नांवर निवडणुका लढविल्या जात आहेत. रस्ते, वीज, पाणी आणि नोकरीची आश्वासने यातच काँग्रेसने आजपर्यंत मतदारांना जखडून ठेवल्याचा आरोप केला. राज्यात दररोज उत्तरप्रदेश, बिहार आणि झारखंडमधून तब्बल ४८ ट्रेन खचाखच भरून येतात. रेल्वेमधील नोकरीपासून रेल्वे कॅँटीनपर्यंत सर्व ठिकाणी परप्रातीयांनी अतिक्रमण केले आहे. आमच्या महाराष्टÑातील मराठी तरूण काम करत नाही, म्हणून रेल्वेसह अन्य ठिकाणी परप्रांतीय बाजी मारतात, असा आरोप केला जातो. हा आरोप साफ चुकीचा असून, आपण ज्यांना दिल्लीत खासदार म्हणून निवडून पाठविले ते लोकप्रतिनिधी रेल्वेसह केंद्राच्या इतर विभागात कधी, कोणत्या रिक्त जागांसाठी भरती होणार आहे, याची माहितीच आपल्यापर्यंत पोहचवित नसल्याचा आरोप त्यांनी केला. मनसेने रेल्वे भरतीसाठी सहा लाख मराठी तरूणांचे अर्ज भरले पण आजपर्यंत एकही कॉल आला नाही, अशी खंत व्यक्त केली. सभेला विक्रमी गर्दी झाली होती.
0
आसाम, त्रिपुरामध्ये विक्रमी मतदानाची परंपरा कायम

गुवहाटी- मतदानाबाबत नेहमी जागरुकता दाखवणा-या आसाम आणि त्रिपुरा राज्यातील मतदारांनी पुन्हा एकदा मोठ्या उत्साहाने मतदान केले. लोकसभा निवडणुकीत्या पहिल्या टप्प्यात आसाममधील १४ पैकी पाच जागांसाठी तर त्रिपूरामधील दोन पैकी एका जागेवर मतदान पार पडले. आसाममध्ये ७२ टक्के मतदान तर तर त्रिपुरामध्ये ८४ टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले. याआधी म्हणजे २००९साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत आसामध्ये १४ जागांसाठी ६९.६८ टक्के तर त्रिपुरामधील दोन जागांसाठी ८३.९१ टक्के मतदान झाले होते.
आसाममधील तेजपुर लोकसभा मतदारसंघामध्ये ७३ टक्के, जोरहाटमध्ये ७५ टक्के, लखीमपूरमध्ये ६७ टक्के, दिब्रुगडमध्ये ७० टक्के आणि कोलियाबोरमध्ये ७२ टक्के मतदान झाले आहे. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यापासून मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठया रांगा लागल्या होत्या. पहिल्या टप्प्यात एकूण दहा हजार मतदान केंद्रावर ६४.४ लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पाच वाजल्यानंतरही मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी दिसून येत होती.
आसाममध्ये १८ ते १९ वयोगटातील प्रथमच मतदानाचा हक्क बजावणा-या मतदारांची संख्या साडेसहा लाख इतकी आहे. तेजपुर, कालियाबोर, दिब्रुगड आणि लखीमपुरमधील वेगवेगळया मतदान केंद्रावरील ३३ मतदान यंत्रे बिघडली होती. त्यातील २९ मतदान यंत्रे बदलण्यात आली असून, चार मतदान यंत्रातील तांत्रिक बिघाड दूर करण्यात आल्याने तेथील मतदान सुरळीत पार पडले. कालिबोर लोकसभा मतदारसंघातील सारपाटहार मतदान केंद्रावर मतदान करण्यावरुन सीआरपीएफच्या जवानांबरोबर झालेल्या हाणामारीत चारजण जखमी झाले. यात एका महिलेचा समावेश आहे.
0
भाजपाचा ‘संकल्पनामा’ जाहीर , विकास आणि आर्थिक सक्षमतेवर भर

नवी दिल्ली – ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ असा नारा देत भाजपनं अखेर आज आपला ‘संकल्पनामा’ जाहीर केला आहे. त्यात देशाचा विकास आणि आर्थिक सक्षमतेवर भर देऊन भाजपनं तरुणाईला साद घातली आहे, तर रामनामाचा गजर करून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपल्या पारंपरिक मतदारांकडे मतांचा जोगवा मागितला आहे.
देशाबाहेरचा काळा पैसा परत आणणार, राम मंदिर उभारण्याच्या दृष्टीनं घटनात्मकदृष्ट्या जे-जे शक्य आहे ते करणार, रिटेल क्षेत्रात एफडीआय येऊ देणार नाही, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ई-गर्व्हनन्सला प्रोत्साहन देणार, महागाई रोखण्यासाठी विशेष निधी स्थापन करणार, संपूर्ण देश बुलेट ट्रेननं जोडणार, निवडणूक प्रक्रियेत आणि न्याय प्रक्रियेत सुधारणा करणार, अशी काही प्रमुख आश्वासनं भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात दिली आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वर्षभर आधीच सुरुवात करणा-या भाजपचा जाहीरनामा मात्र भारीच रखडला होता. भाजप नेतृत्वात राम मंदिराच्या मुद्द्यावरून मतभेद असल्यानं हा विलंब झाल्याचं बोललं जात होतं. त्यावर बराच खल झाल्यानंतर अखेर आज, लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशीच आपला जाहीरनामा प्रसिद्ध करण्यास भाजपला मुहूर्त मिळाला. नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत जाहीरनामा मसुदा समितीचे अध्यक्ष मुरली मनोहर जोशी यांनी आपला ‘संकल्पनामा’ जाहीर केला. सर्वांची साथ, सर्वांचा विकास, असं ब्रीदवाक्य असलेल्या या संकल्पनाम्यात सुशासन आणि विकास हे महत्त्वाचे मुद्दे आहेत.
भाजपचे प्रमुख ‘संकल्प’:
* राम मंदिर उभारण्यासाठी घटनात्मक चौकटीत राहून प्रयत्न * समान नागरी कायदा बनवण्याचा विचार * कलम ३७० हटवण्यासाठी सर्वपक्षीय चर्चा * महागाई रोखण्यासाठी विशेष निधी
* काळाबाजार रोखण्यासाठी विशेष न्यायालये * राष्ट्रीय कृषी बाजार बनवणार * कापड, इलेक्ट्रोनिक्स बाजार आणि कृषिउत्पादनांवर आधारित उद्योग विकसित करून रोजगारनिर्मिती
* गुजरात सरकारची ई ग्राम-विश्वस ग्राम योजना देशभरात लागू करणार * भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ई-गव्हर्नन्सचा वापर * कररचना सोपी करणार * महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांना सहभागी करून घेणार * काश्मिरी पंडितांना सन्मानानं घरी परत आणण्याचा प्रयत्न * प्रत्येक राज्यात विशेष महिला पोलीस दल * स्वातंत्र्याला ७५ वर्षं पूर्ण होईपर्यंत प्रत्येक कुटुंबाला पक्कं घर देणं * देशभरात बुलेट ट्रेनचं जाळं विणणार * शेतक-यांसाठी रेल्वेचं विशेष जाळं * प्रत्येक राज्यात एम्ससारखी संस्था बनवणार
0
बिहारमध्ये भूसुरुंगाचा स्फोट, दोन जवान ठार

औरंगाबाद(बिहार) – बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या भूसुरुंग स्फोटात दोन सीआरपीएफ जवान ठार तर इतर सात अधिकारी जखमी झाले आहेत.येत्या १० एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये मतदान सुरु होणार आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी हा स्फोट झाला. सीआरपीएफचे जवान आणि बिहारचे पोलिस भूसुरुंग निकामी करत असताना हा स्फोट झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक अमित कुमार यांनी दिली. जखमींमध्ये डिब्रा पोलिस स्थानकातील अधिका-यांचाही समावेश आहे.जखमी अधिका-यांना नजीकच्या सरदार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
0
आता इंटरनेटच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार

नवी दिल्ली- अनिवासी भारतीय नागरिकांना आता इंटरनेटच्या माध्यमातून मतदान करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. अनिवासी भारतीय मतदारांना इंटरनेटच्या माध्यमातून मतदान करता येईल का यासंदर्भातील शक्यता पडताळल्या जात असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सोमवारी दिली आहे.
मात्र १६व्या लोकसभेसाठीच्या मतदान प्रक्रियेत अनिवासी भारतीय नागरिकांना अशा प्रकारची सुविधा देणे अवघड असल्याचे आयोगाने न्यायमूर्ती के.एस.राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे झालेल्या सुनावणीत सांगितले. सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीत सर्व मतदारसंघातील मतदारांची अंतिम यादी तयार झाल्याचे आयोगाने म्हटले आहे.यावर न्यायालयाने आयोगाला स्वतःहून प्रयत्न करण्यास सांगितले. सध्या सुरु असलेल्या मतदानप्रक्रियेत अनिवासी भारतीय नागरिकांना सहभागी करून घेण्यासाठी आयोगाकडे अद्याप वेळ आहे. परदेशातील जे भारतीय नागरीक मतदार आहेत त्यांना पोस्टाद्वारे मतदान करण्याचा आधिकार देता येऊ शकतो असे मत न्यायालयाने व्यक्त केले. सध्या अकरा हजार ८४४ अनिवासी भारतीय नागरिकांनी मतदारयादीत आपले नाव नोंदवले आहे.निवडणूक आयोग किमान यासंदर्भात प्रयत्न करु शकेत असेही खंडपीठाने म्हटले आहे. यासंदर्भात न्यायालयाने आयोगाला ११ एप्रिल रोजी होणा-या सुनावणी दरम्यान आपले मत मांडण्यास सांगितले आहे.अनिवासी भारतीय नागरीक असलेल्या शमशीर व्हीपी यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. सध्याच्या नियमानुसार प्रत्यक्षात मतदान केंद्रावर येवूनच अनिवासी नागरिक मतदानाचा अधिकार बजावू शकतात. मात्र या नियमामुळे त्यांच्या मूलभूत अधिकारावर अतिक्रमण होत असल्याचे याचिकेत म्हटले आहे.परदेशात राहणा-या नागरिकांना जर मतदानाचा अधिकार दिला तर तब्बल एक कोटी भारतीय नागरीक मतदान करु शकतील असे शमशीर यांनी म्हटले आहे. जगभरातील ११४ देशांनी अशा प्रकारे मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यात २० आशियाई देश असल्याचे शमशीर यांनी याचिकेत म्हटले आहे. शमशीर गेली १२ वर्षे युएईमध्ये राहतात. त्याचे मुळ गाव केरळमधील कोईकोड येथे आहे. भारतात असताना ते नियमीतपणे मतदान करत होते. मात्र अनिवासी भारतीय नागरीक असल्यामुळे नंतर मतदान यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले.
0
राज ठाकरेंची ७ एप्रिलला यवतमाळात सभा

यवतमाळ – महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे ७ एप्रिल रोजी यवतमाळातील पोस्टल मैदानावर प्रचारसभेचे आयोजन केले आहे. यवतमाळ-वाशीम लोकसभेचे मनसे पक्षाचे उमेदवार राजू पाटील राजे यांच्या प्रचारार्थ मनसे प्रमुख राज ठाकरे यांची प्रचारसभा सायंकाळी ५ वाजता होणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांची यवतमाळात पहिल्यांदाच जाहीर सभा होत असून ते काय बोलतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. मनसेचे उमेदवार राजू पाटील राजे यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे येणार असल्याने मनसे ने त्यांच्या सभेची जय्यत तयारी केली आहे. सायंकाळी ५ वाजता होणाºया या सभेला मनसे कार्यकर्त्यांसह राज ठाकरे समर्थक व जनतेने आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन मनसेचे जिल्हाप्रमुख अशोक पुरी, राजू उंबरकर, अभय गडम, अनिल हमदापूरे आदींनी केली आहे.
0
देशाला लुटणाºयांना त्यांची जागा दाखवा – उद्घव ठाकरे
यवतमाळ – आजपर्यंत देशाला लुटणाºयांना त्यांची खरी जागा दाखवून देत शेतकºयांच्या गळ््याभोवती फास आवळणाºया काँग्रेसला फासावर लटकवा, असे आवाहन शिवसेना पक्ष प्रमुख उद्घव ठाकरे यांनी केले. शिवसेना, भाजप, रिपार्इं(आ.) महायुतीच्या यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ पोस्टल मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते.
यवतमाळ-वाशीमच्या उमेदवार भावना गवळी, चंद्रपूरचे हंसराज अहीर यांच्यासह विदर्भातील सर्वच ठिकाणच्या महायुतीच्या उमेदवारांना विजयी करून नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदी बसवा, असे आवाहन त्यांनी केले. राज्यातील शेतकरी सुल्तानी संकटात असताना त्यांच्यावर अस्मानी संकटही कोसळले असून पण सरकारने शेतकºयांच्या या परिस्थितीचेही राजकीय भांडवल केले, असा आरोप त्यांनी केला. केंद्रात एनडीएचे सरकार सत्तेत आल्यास शेतकºयांना कर्जमुक्ती देऊ, असे आश्वासन ठाकरे यांनी दिले. यवतमाळ-वाशीम मतदारसंघातील प्रतिस्पर्धी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराने शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळींसोबत एकाच व्यासपीठावर आमने-सामने चर्चा करावी, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. शेतकरी जनआंदोलन समितीचे नेते किशोर तिवारी आमच्या व्यासपीठावर आल्याचे समाधान आणि आनंद आहे, असे सांगून शेतकºयांनो धीर धरा, आत्महत्या करून कुटुंबाची परवड करू नका, असे आवाहन केले. सत्तेत आल्यानंतर शेतकºयांच्या सर्व समस्या प्राधान्याने सोडवू, अशी ग्वाही देत जिल्ह्यातील सिंचनाची समस्या, रेल्वे मार्ग, औद्योगीकरण आदी कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे आश्वासनही ठाकरे यांनी दिले. यावेळी यवतमाळ- वाशिम लोकासभेच्या उमेदवार भावना गवळी बोलतांना म्हणाल्या की, पुढील पाच वर्षात रेल्वेमार्ग पूर्णत्वास नेवून, टेक्सटाईल पार्क, शेतमलावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारण्याचे आश्वासन दिले. यावेळी शिवसेना नेते आ. सुभाष देसाई, डॉ. विकास महात्मे, माजी न्या. अशोक खिल्लारे, नामदेव खोब्रागडे, किशोर तिवारी, राजेंद्र डांगे यांची भाषणे झाली. कार्यक्रमाला शिवसेनेचे उपनेते माजी आ. गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख आ. संजय राठोड, माजी आ. बाळासाहेब मुनगीनवार, विश्वास नांदेकर, मदन येरावार, दिवाकर पांडे, संदीप धुर्वे, प्रवीण पांडे, सोमेश्वर पुसतकर, सुधाकर तायडे, महेंद्र मानकर, सुधीर कंवर, राजू पडगीलवार आदी उपस्थित होते.
0
ना बिकने वाला समाज बनो – गरुड

यवतमाळ – सोळाव्या लोकसभेच्या निवडणुकीत बहुजन समाज पार्टीने संपूर्ण देशामध्ये वातावरण निर्मिती केली आहे. बसपाने मुस्लिम,ब्राम्हण, मराठा, दलित, आदिवासी, बंजारा आदी समाजाला तिकीट देऊन महाराष्टÑात ४८ लोकसभा मतदार संघामध्ये उमेदवार उभे केले असून देशामध्ये पार्टी तिसºया क्रमांकाची ताकत म्हणून उभी झाली आहे. निवडणुकीच्या निमित्ताने भ्रष्टाचार हा प्रमुख मुद्दा नसून सामाजिक असमानता हा प्रमुख मुद्दा आहे. त्याला बगल देऊन काँग्रेस -राकॉ, सेना-भाजपा समस्त बहुजन समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून समाजाने ‘ ना बिकने वाला समाज बनो’ असे आवाहन बसपाचे प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी केले.
यवतमाळ – वाशीम लोकसभा क्षेत्राचे उमेदवार बळीराम राठोड यांच्या प्रचारार्थ पाटीपुरा येथे आयोजीत सभेत ते बोलत होते. पुढे बोलतांना ते म्हणाले की, आरक्षणाचा मुद्दा असो अथवा वेगळा विदर्भ राज्याचा मुद्दा असो हे दोन्ही एनडीए, युपीए एकमेकांच्या खांद्याला खांदा लावुन बहुजनवादी नितीचा विरोध करत असतात. कारण यांना कोलगेट, आदर्श, टेलीकॉम घोटाळ््यातून निवडणूक लढविण्याकरीता पैसा मिळत असतो. तसेच येथील उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेऊन इथल्या दलित शोषित समाजाचे अहित साधण्याचे काम ह्या पाटर्या करीत असतात.बहुजन समाज पार्टी ही समाजाच्या पैशाच्या भरवशावर निवडणूक लढवून सरकार बनविण्यावर इथल्या बहुजन समाजाचेच काम करणार नाही उद्योगपत्यांचे. जाती-जातीत वितुष्ट निर्माण करुन धर्माच्या नावावर मते मगण्याची व हिंदू, मुसलमान यांच्यात भांडणे लावून मुस्लिम काँग्रेस-राकाँकडे व हिंदू भाजप-शिवसेनेकडे वळविण्याचा प्रयत्न केला जातो. तर येथील बहुजन समाजाला विकासाच्या मुद्यापासून विभक्त केल्या जाते. बहुजन समाज पार्टीच्या मायावती ह्या जेव्हा उत्तर प्रदेशच्या चार वेळा मुख्यमंत्री बनल्या तेव्हा त्यांनी हजारो एकर सरकारी जमिनीचे वाटप केले. तसेच ४०० स्क्वेअर फुटाचे घरकुल बांधून दिले. महाराष्टÑामध्ये मात्र शेती तर नाहीच परंतु रमाई घरकुल योजनेअंतर्गत फक्त ६८ हजार ५०० रुपये देऊन येथील दलितांची मतदान घेण्याचे काम काँग्रेस-राकॉ करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मायावतींना पंतप्रधान बनविण्याकरीता आपणास बाबासाहेबांच्या हत्तीला संसदेमध्ये पाठवायचे आहे. यवतमाळ-वाशिम क्षेत्रातून उभे असलेले बळीराम राठोड यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी बळीराम राठोड यांनी गेल्या ६५ वर्षातील बहुजनावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी बंजारा सहित समस्त बहुजन समाजाने मतदान करुन विजयी करण्याचे आवाहन केले. यावेळी खोरिपाचे उमेदवार सुधाकर घायवान, शिलानंद कांबळें यांनी बंजारा समाजासह काँग्रेस,राष्टÑवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश घेतला.
0
काँग्रेसला विकास करण्यासाठी ६०० वर्षे लागतील – मोदी

बिजनौर – ‘देशाच्या विकासाचा नुसता ‘मॅप’ बनवण्यासाठी काँग्रेसच्या शहजाद्यांना ६० वर्षे लागली; आता विकास प्रत्यक्षात आणायसाठी आणखी ६०० वर्षे लागतील,’ अशी घणाघाती टीका एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केली.
उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे आज (रविवार) झालेल्या प्रचारसभेत मोदी बोलत होते. ‘काँग्रेस आतापर्यंत फक्त वोट बँकेचे राजकारण करत आली आहे. त्यामुळे देश खिळखिळा बनला आहे. काँग्रेसमधील सर्व नेते एकाच परिवाराचे गुणगान गाण्यात गुंतले आहेत. या परिवाराच्या नादात काँग्रेसचे देशाकडे लक्ष राहिले नाही. एवढेच काय पंतप्रधानांकडेही लक्ष राहिले नाही. काँग्रेसचा कुठलाही नेता पंतप्रधानांना आपला नेता म्हणण्यास तयार नाही, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
‘मोठमोठ्या गप्पा मारण्यासाठी मी इथे आलेलो नाही. मी स्वतः चहा विकला आहे. त्यामुळे गरिबी काय असते याची मला जाणीव आहे, असे सांगतानाच, ‘गेल्या अनेक वर्षांपासून देशाला लुटणाऱ्या सत्ताधाऱ्यांना देशातील युवक माफ करणार नाहीत,’ असेही ते म्हणाले.
0
तीन शिक्षिकांचा विनयभंग

नागपूर – दिघोरी येथील सर्वश्री विद्यालयातील तीन शिक्षिकांचा विनयभंग केल्याच्या आरोपावरून संस्थेचा सचिव राजेश काशिनाथ मासूरकर (वय ४६, रा.ओमनगर) याला हुडकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे.
पीडित शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीनुसार, राजेश नेहमी शिक्षिकांना त्रास देत होता. शुक्रवारी सकाळी राजेशने आपल्यासह तीन शिक्षिकांचा विनयभंग केला. शिक्षिकेने प्रतिकार केला. त्यानंतर गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी राजेशने दिली, असे पीडित शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी.एल. मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक विशाल जयस्वाल यांनी गुन्हा दाखल करून राजेशला अटक केली.
0
तेलगू देसम पुन्हा एनडीएत सामील

हैदराबाद- आंध्रप्रदेश व तेलंगणमधील आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) भारतीय जनता पक्षाबरोबर (भाजप) युती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी रविवारी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपला निर्णय जाहिर केला. टीडीपीच्या या निर्णयामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) आणखी एक घटक पक्ष सहभागी झाला आहे. अकाली दलाचे खासदार नरेश गुजराल यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली.
या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र अद्याप जागावाटपाबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. भाजप आंध्रप्रदेशमध्ये ५ तर तेलंगणमध्ये ८ जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे समजते. या युतीमुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण पसरले आहे. १९९९ ते २००५ पर्यंत चंद्राबाबू नायडू एनडीएत होते. मात्र २००५ मध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवासाठी भाजपला जबाबदार ठरवत त्यांनी एनडीएला सोडचिठ्ठी दिली होती. तेलंगणमध्ये ३० एप्रिल तर सीमांध्रमध्ये ७ मे रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे.
0
कसारा घाटात टँकरला अपघात, पाच ठार

ठाणे – मुंबई – आग्रा महामार्गावरील कसारा घाटात टँकर उलटून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला.
संगमनेरहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या दुधाच्या टँकरला कसारा घाटातील वळणावर अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.मृत्यू झालेले पाचही जण गोरेगाव येथील रहिवासी आहेत. जखमींना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टँकरच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि दुभाजकावर आदळून टँकर उलटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
0
गुगलचे ‘टी२० वर्ल्डकप’ विशेष डूडल

मुंबई – सतत प्रयोगशील असणा-या गुगलने रविवारी रंगणा-या आयसीसी टी२० विश्वचषकानिमित्त खास डूडल बनवले आहे. बांगलादेशमधील मिरपूर येथे भारत आणि श्रीलंका दरम्यानचा अंतिम सामना जोरदार रंगणार आहे.
गुगलच्या या खास डूडलमध्ये जल्लोष करणारे चाहते, फलंदाजी आणि गोलंदाजी करणारा खेळाडू दाखवण्यात आले आहे. तसेच बॉलरच्या हातातील बॉल, क्रिकेटमध्ये महत्त्वाचे असणारे स्टॅम्प दिसत आहेत.याआधी २००७ मध्ये भारताने आयसीसी टी२० विश्वचषक जिंकला होता. आतापर्यंत तीन वेळा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या श्रीलंकेला मात्र अद्यापही विश्वचषक जिंकता आलेला नाही. त्यामुळे विश्वचषकावर पुन्हा एकदा नाव कोरण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.















