पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for March, 2014

फेसबुक देणार ड्रोनने इंटरनेटची सुविधा 0

फेसबुक देणार ड्रोनने इंटरनेटची सुविधा

facebook-logo-i14-300x131
फेसबुक जगातील सर्वात मोठी सोशल मीडिया वेबसाइट आहे. अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत, फ्रान्सपासून दक्षिण आफ्रिकेपर्यंत, भारतापासून जपानपर्यंत सर्व जण फेसबुकचे वेडे आहेत. पण, प्रत्येक गोष्टीला अपवाद असतोच. त्यामुळे जगाच्या काही दुर्गम भागात इंटरनेट पोहोचलेले नाही. त्यामुळे फेसबुक कंपनीने संपूर्ण पृथ्वीतलावर इंटरनेट पोहोचवण्यासाठी चक्क आकाशमार्गाचा सहारा घेण्याचे ठरवले आहे. विमाने, ड्रोन आणि उपग्रहांवर एक विशेष प्रयोगशाळा उभारली जाणार आहे. त्याद्वारे जगभरात इंटरनेट पोहोचवण्याचा मानस फेसबुकने केला आहे.
जगातील सर्व व्यक्तींना आकाशातून इंटरनेट देण्याचे स्वप्न आम्ही साकारणार आहोत. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी फेसबुक कंपनी इंटरनेट. ऑर्गच्या सहाय्याने ‘कनेक्टिव्हिटी लॅब’ उभारत आहे. या नवीन तंत्रज्ञानाने संपूर्ण जग नक्कीच जोडले जाईल, असे फेसबुकचा सहसंस्थापक-प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी सांगितले.
ही ‘कनेक्टिव्हिटी लॅब’ बांधण्यासाठी अंतराळ विज्ञान आणि कम्युनिकेशन तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. यात नासातील जेट प्रोपल्शन लॅब अ‍ॅँड अ‍ॅम्स रिसर्च सेंटरच्या माजी अधिका-यांचाही समावेश आहे. जगातील दुर्गम भागात राहणा-या लोकसंख्येपर्यंत इंटरनेट पोहोचवण्यासाठी उपग्रहांचा वापर केला जाणार आहे. तसेच शहरांमध्ये राहणा-या नागरिकांना विमानातून इंटरनेटची सुविधा दिली जाणार आहे. ही विमाने वातावरणाच्या बाहेरून प्रवास करणार असून ती सौरऊर्जेवर चालणार आहे. ही विमाने महिनोनमहिने आकाशात राहू शकतात, असे फेसबुकचे अधिकारी येल मॅग्युरी यांनी सांगितले.
ही तर केवळ सुरुवात आहे. आमच्या टीममध्ये अनेक तज्ज्ञ व चांगली संकल्पना असलेले लोक आहेत. हे तंत्रज्ञान विकसित करण्यात काही अडचणी असून त्या निश्चितपणे दूर केल्या जातील, असेही मॅग्युरी यांनी सांगितले.

लष्करी तळाबाहेर सापडली स्फोटके 0

लष्करी तळाबाहेर सापडली स्फोटके

Encounter in Kathua district
श्रीनगर – जम्मू-काश्मीरच्या काथुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी नागरिकांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबाराची घटना ताजी असतानाच, शनिवारी सकाळी श्रीनगरमधील लष्करी तळाच्या बाहेर स्फोटके सापडली.
श्रीनगरच्या बीमीना भागात गस्तीवर असणा-या जवानांना लष्करी तळाच्या बाहेरील रस्त्यावर एक संशयास्पद बॅग आढळली. जवानांनी ही बॅग उघडली असता त्यात प्रेशर कुक होता.जवानांनी तात्काळ बॉम्ब निकामी पथकाला पाचारण केले. या कुकरमध्ये पाच किलो स्फोटके होती. बॉम्ब निकामी पथकाने ही सर्व स्फोटके नष्ट केली. जवानांच्या सर्तकतेमुळे मोठी हानी टळली. कथुआमध्ये शुक्रवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षापथकांनी सर्तकतेचा इशारा जारी केला आहे. महत्वाच्या लष्करी तळावरील सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

March 29, 2014 in देश-विदेश
राज्यातील मतदानाच्या वेळेत वाढ 0

राज्यातील मतदानाच्या वेळेत वाढ

voting-machine1000
मुंबई : राज्यात १०, १७ आणि २४ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करण्यासाठी राज्यातील मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत (११ तास) राहील, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त व्ही. एस. संपत यांनी शुक्रवारी दिली.
राज्यातील निवडणूक पूर्व कामाचा आढावा घेण्यासाठी संपत यांनी विविध राजकीय पक्ष, मुख्य सचिव, पोलिस अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. नक्षलग्रस्त भागात सकाळी सात ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत मतदान करता येईल.

March 29, 2014 in मुख्य पान
भारताची विजयाची हॅटट्रिक 0

भारताची विजयाची हॅटट्रिक

Rohit Sharma
मिरपूर- यजमान बांगलादेशवर आठ विकेटनी विजय मिळवत माजी विजेता भारताने टी-२० वर्ल्डकपमधील उपांत्य फेरी जवळपास निश्चित केली. गटवार साखळीतील भारताचा हा सलग तिसरा विजय आहे. या विजयासह भारताने ब गटात सहा गुणांसह अव्वल स्थान कायम ठेवले आहे.
विराट कोहली आणि रोहित शर्माच्या शतकी भागीदारीच्या जोरावर भारताने शुक्रवारी बांगलादेशचे १३९ धावांचे आव्हान नऊ चेंडू राखून पार केले. बांगलादेशने विजयासाठी दिलेल्या १३९ धावांचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. शिखर धवन केवळ एक धावा काढून बाद झाला. त्यानंतर रोहित आणि विराट यांनी दुस-या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. शर्मा ५६ धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट आणि महेंद्रसिंग ढोणीने विजयाची औपचारीकता पूर्ण केली. त्याआधी पहिल्या दोन टी-२० लढतींतील ‘सामनावीर’ ठरलेला भारताचा लेगस्पिनर अमित मिश्राने पुन्हा प्रभाव (तीन विकेट) पाडल्याने बांगलादेश सात बाद १३८ इतकीच मजल गाठू शकला. तीन बाद २१ या स्थितीतून यजमानांनी स्वत:ला सावरले असले तरी त्यांना अपेक्षित दीडशे धावांचाही पल्ला गाठता आला नाही. मिश्राने टाकलेल्या डावाच्या शेवटच्या षटकात त्याची हॅटट्रिकची संधी हुकली असली तरी ४-०-२६-३ असे त्याचे पृथ:करण होते. पुन्हा एकदा त्याने गुगली हे त्याचे प्रभावी अस्त्र वापरले.तत्पूर्वी, सलग तिस-या लढतीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. भारताने सलग तिस-या लढतीत संघात बदल केला नाही. बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही. तमिम इक्बाल (६), शमशूर रहमान (०) यांना डावाच्या चौथ्या षटकात लागोपाठच्या चेंडूंवर ऑफस्पिनर रवीचंद्रन अश्विनने बाद केले. मात्र त्याचीही हॅटट्रिकची संधी हुकली. मात्र पुढच्याच षटकात भुवनेश्वरने धोकादायक शाकिब अल हसनला (१) त्रिफळाचित करत बांगलादेशची अवस्था बिकट केली. मात्र कर्णधार मुशफिकुर रहिम आणि फॉर्मात असलेला सलामीवीर अनामूल हक यांनी चौथ्या विकेटसाठी ४६ धावा करत बांगलादेशला सावरले. शामीने मुशफिकुरला (२४) बाद करत ही जोडी फोडली.पाठोपाठ अनामूलही ४३ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांसह ४४ धावा फटकवत बाद झाला. मिश्राने त्याला त्रिफळाचीत केले. मात्र बांगलादेशला १३० पार नेण्याचे काम नासीर हुसेन (१६) आणि मोहम्मदुल्ला (२३ चेंडूंत नाबाद ३३) यांनी केले. सातव्या क्रमांकाचा फलंदाज मोहमदुल्लाच्या खेळीत पाच चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे.

March 29, 2014 in क्रीडा
भाजप दाऊदलाही उमेदवारी देईल! 0

भाजप दाऊदलाही उमेदवारी देईल!

nakwi
नवी दिल्ली : संयुक्त जनता दलातून हकालपट्टी करण्यात आलेले नेते साबीर अली यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याच्या मुद्दय़ावरून भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी कमालीचे संतप्त झाले असून, यापुढील काळात भाजपमध्ये दाऊद इब्राहिमलाही प्रवेश दिला जाईल, असा घरचा आहेर त्यांनी शुक्रवारी दिला.
मुस्लीम मतदारांना आकर्षित करण्यासाठी साबीर अली यांना भाजपमध्ये मोठा गाजावाजा करून प्रवेश देण्यात आला होता. त्यानंतर काही तासांतच नक्वी यांनी, दहशतवादी भटकळच्या मित्राचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे.
लवकरच दाऊदलाही स्वीकारले जाईल.. असे ट्विट केले. काही महिन्यांपूर्वी भटकळला साबीर अलींच्या मुंबईमधील घरातून अटक झाली होती, असे सांगत नक्वी यांनी त्यांच्या दाव्याचे समर्थन केले.

March 29, 2014 in देश-विदेश
पाकमध्ये हनुमान मंदिर पेटवले 0

पाकमध्ये हनुमान मंदिर पेटवले

hindu-temple
कराची – पाकिस्तानातील सिंध प्रांतात तीन अज्ञात व्यक्तींना हनुमान मूर्ती तोडून नंतर मंदिर पेटवून दिल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून मूर्तीची विटंबना करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करा, अशी मागणी करत जमाव रस्त्यावर उतरला आहे.
लतीफाबाद भागात असलेल्या या मंदिरात येत्या १४ एप्रिल रोजी वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्याआधीच ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मंदिराची देखभाल करणारा पुजारी दर्शन याने सांगितल्यानुसार, शुक्रवारी तीन व्यक्ती मंदिरात होणाऱ्या प्रार्थनेसाठी आले होते. पूजा-अर्चा झाल्यानंतर या तिघांनी हनुमानाच्या मूर्तीला लक्ष्य केले. मूर्तीची विटंबना करताना तेथील तेल ओतून या समाजकंटकांनी मंदिरात आग लावली. त्यामुळे एकच हलकल्लोळ माजला आणि त्याचाच फायदा घेऊन हल्लेखोर पसार झाले. या घटनेचे वृत्त परिसरात पसरताच संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. या भागात हिंदू वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली. हा तणाव लक्षात घेऊन पोलीस महानिरीक्षक सनाउल्ला अब्बासी यांनी तडकाफडकी स्थानिक पोलीस उपअधिक्षक आणि पोलीस निरीक्षकांना निलंबित केले.

March 29, 2014 in मुख्य पान
मसूदना १४ दिवसांची कोठडी 0

मसूदना १४ दिवसांची कोठडी

Imraan-masood
नवी दिल्ली – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना मारण्याची धमकी देणारे सहारणपूरचे काँग्रेसे उमेदवार इमरान मसूद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. इमरान मसूदच्या या प्रतापामुळे काँग्रेसची गोचीच झाली असून उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज सहारणपूरमध्ये होणारी आपली सभा रद्द केली आहे.
शुक्रवारी रात्री उशीरा अटक करण्यात आलेल्या इमरान मसूद यांना शनिवार सकाळी देवबंद कोर्टात सादर करण्यात आले. यावेळी कोर्टाने मसूद यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या आधी कोर्टाच्या बाहेर मसूद यांच्या कार्यकर्त्यांनी काही काळ गोंधळ घातला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मसूद यांच्या विरोधात तक्रारही नोंदवल्याने काँग्रेसने राहुल गांधी यांची सभा रद्द केली आहे. पुढली वेळ मिळाल्याशिवाय येथील सभेचे वेळापत्रक ठरणार नाही, असे काँग्रेसचे नेते प्रदीप माथुर यांनी सांगितले.

March 29, 2014 in मुख्य पान

छेडखानी करणाºया आरोपीस शिक्षा

कळंब – तालुक्यातील कामठवाडा येथील एका महिलेची छेडखानी करणाºया आरोपीला सहा महिने शिक्षा ठोेठावली. प्रथम श्रेणी न्यायाधिश ओ.एन. मंत्री यांनी आज शुक्रवारी हा निकाल दिला.
संदिप महादेव बोटरे (३०)रा. कामठवाडा असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. १५ जून २०११ रोजी आरोपीने गावातीलच एका महिलेच्या घरी जाऊन तीला तंबाखू व लोनचे मागितले. यावेळी त्याने महिलेची छेडखानी करुन विनयभंग केला. महिलेच्या तक्रारीवरुन कळंब पोलिसांनी आरोपीविरुद्घ भादंवि कलम ३५४,४५२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. जमा.सुमित शुक्ला यांनी तपास पुर्ण करुन आरोपीला अटक केली व प्रकरण न्यायप्रविष्ठ केले होते. येथील प्रथम श्रेणी न्यायाधिश ओ.एन. मंत्री यांच्या न्यायालात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी वकील आर.आर. त्रिवेदी यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन आरोपी संदिप बोटरे याला सहा महिने शिक्षा व चार हजार रुपये दंड ठोठावला.

March 28, 2014 in विदर्भ

तहसील परिसरात युवकाची आत्महत्या

वणी – येथील तहसील कार्यालय परिसरात एका युवकाने आत्महत्या केली. आज शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता ही घटना घडली असून खळबळ उडाली.
सतिश धागे (३३) रा. दहेगाव असे मृतकाचे नाव आहे. शहरात न्यायालय, तहसील, पोलीस स्टेशन एकाच परिसरात आहे. दरम्यान आज सायंकाळी ६. ३० वाजता तहसील परिसरात सतीश बेशुद्घवस्थेत पडून होता. पोलिसांनी त्या युवकाला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी डॉक्टरांनी त्याचा विष प्राशन केल्याने मृत्यू झाल्याचे घोषित केले. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून आत्महत्येचे कारण कळु शकले नाही.

March 28, 2014 in विदर्भ

जातीयवाद्यांना थारा देऊ नये – आ. माणिकराव ठाकरे

दिग्रस काँग्रेसची प्रचार रॅली
यवतमाळ – यवतमाळ-वाशीम लोकसभा क्षेत्राचे काँग्रेस व राष्टÑवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांचे प्रचारार्थ आज शुक्रवारी दिग्रस येथे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढण्यात आली. या रॅलीचे रुपांतर सभेत झाल्यानंतर मान्यवरांनी सभेला संबोधित केले. यावेळी काँग्रेसचे महाराष्टÑ प्रदेश अध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे यांनी भाजपा व शिवसेना नेत्यांवर टिका केली.
या सभेला ना. मनोहराव नाईक, माजी मंत्री संजय देशमुख, प्रवीण देशमुख, रा.काँ. जिल्हाध्यक्ष नाना गाडबैले, अ‍ॅड. शंकरराव राठोड, अ‍ॅड. सिमा तेलंगे आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे म्हणाले की, भाजपा-शिवसेना युतीचे नेते विकास आणि शेतकरी प्रश्नावर राजकारण करतात. केवळ मोदीचे गुणगान गायील्याने सत्तेवर बसता येत नसते, अशी टिका आ. माणिकराव ठाकरे यांनी केली. यवतमाळ-वाशीम लोकसभा क्षेत्रातून काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडी व मित्र पक्षाचे उमेदवार अ‍ॅड. शिवाजीराव मोघे यांना निवडून आणण्याची जबाबदारी पक्षाने माझ्यावर सोपविली आहे. मला विश्वास आहे की, आपण कामाला लागले आहे. या निवडणुकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जातीयवादी शक्तींना थारा देऊ नये, असे आवाहन यावेळी आ. ठाकरे यांनी केले. या सभेत काँग्रेस, राकाँच्या पदाधिकाºयांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.

March 28, 2014 in विदर्भ

निवडणूक पथकाकडून दहा लाख जप्त

यवतमाळ – लोकसभा निवडणूक आयोगाच्या पथकाने पांढरकवडा तालुक्यातील पिंपळखुटी चेकपोस्ट व कळंब बायपासवर वाहन तपासणीत दहा लाखाची रक्कम जप्त केली.
उमेदवारांकडून निवडणूकीच्या काळात मतदारांना पैशाचे प्रलोभन दाखविले जाते. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशावरून वाहनाची तपासणी मोहीम सुरु केली असून अवैधपने नेण्यात येणारी रक्कम जप्त करत आहे. दुपारी आदीलाबादकडून क्रमांक एमएच-२६ ई/ १२४८ हे वाहन तपासणी पथकाने पिंपळखुटी चेकपोस्टजवळ अडविले. पथकाने तपासणी केली असता वाहनातील महादेव डोंगरे व मिरगू राकेश यांच्याकडे १ लाख ४९ हजार रुपये आढळून आले. ही कारवाई पथकातील घाटंजीचे नायब तहसीलदार एम.डी.मेंढे, आर्णीचे सुधीर पवार यांनी केली. तर शुक्रवारी कळंब बायपासजवळ एका वाहनाच्या तपासणीत विठ्ठल महादेव राजुरकर या व्यक्तीकडून ३ लाख ५० हजार रोख जप्त करण्यात आले. सबंधित व्यक्तीने आपण ही रक्कम बँकेतून इनकमटॅक्स भरण्यासाठी काढल्याचे सांगितले, अशी माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी दिली. दुसºया कारवाईत याच घटनास्थळी वणी तालुक्यातील नायगाव येथील रहिवासी असलेल्या हरिदास सुधाकर बोबडे या व्यक्तीकडून ४ लाख ७ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले. संबंधित व्यक्तीने आपण ही रक्कम ट्रॅक्टरघेण्यासाठी आणल्याचे सांगितले.

March 28, 2014 in विदर्भ
६७ वर्षांनी २७२ जण प्रथमच मतदान करणार 0

६७ वर्षांनी २७२ जण प्रथमच मतदान करणार

Lok-Sabha-Constituencies-of-Meghalaya-01-300x149
उंखबव(मेघालय)- देशाला स्वतंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल ६७ वर्षांनी आणि मेघालयला राज्याच्या दर्जा मिळाल्यानंतर ४० वर्षांनी येथील २७२ जण प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. राज्यातील पूर्व खासी हिल्स जिल्ह्यातील हे नागरीक आगामी लोकसभा निवडणुकीत प्रथम मतदान करतील.
भारत आणि बांगलादेश सीमाभागात असणा-या १४ गावातील तब्बल सात हजारहून अधिक नागरीकांची मतदार म्हणून नोंदच नसल्यामुळे आजवर त्यांना कोणत्याही निवडणुकीत मतदान करता आले नव्हते. मात्र यातील २७२ जणांना निवडणूक आयोगाने ईपीआयसी कार्ड दिले असून ते लोकसभा निवडणूकीत प्रथमच मतदान करतील. या २७२ जणांनी याआधी राज्य विधानसभा निवडणुकीत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत मतदान केले होते. मतदानाचा अधिकार अद्याप न मिळालेल्यांची संख्या या भागात मोठी असल्याचे निवडणूक अधिका-यांनी सांगितले. १९७१च्या बांगलादेश युद्धानंतर हे सर्व नागरिक विस्थापीत झाले होते. भारत आणि बांगलादेश सीमाभागात हे सर्वजण अनेक वर्षांपासून राहतात. त्यामुळे त्याच्यापर्यंत अद्याप अनेक सुविधा पोहचलेल्या नाहीत. या भागातील अनेक जण ब्रिटीशांच्या आधीपासून येथे राहतात. या १४ गावातील अनेकांकडे मनरेगाची कार्ड आहेत. मात्र या भागात अद्याप पिण्याचे शुद्ध पाणी देखील उपलब्ध नसल्याचे सेंटू संगमा या एका नागरिकाने सांगितले. विशेष म्हणजे ज्या २७२ जण प्रथमच लोकसभेसाठी मतदान करणार आहेत त्यांना अद्याप उमेदारांची नावे देखील माहित नाहीत.

March 28, 2014 in देश-विदेश
विदर्भातील दहा जागांसाठी २०१ उमेदवार रिंगणात 0

विदर्भातील दहा जागांसाठी २०१ उमेदवार रिंगणात

voting-machine1000
नागपूर – विदर्भातील लोकसभेच्या दहा जागांसाठी २०१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणूक लढवण्यासाठी एकूण ३१८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यातील २७१ उमेदवारी अर्ज वैध ठरले. राजकीय तडजोडीनंतर ७० उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.
विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर आणि यवतमाळ-वाशिम या दहा जागांसाठी १० एप्रिलला मतदान होणार आहे. सर्वच पक्षाचे प्रमुख नेते विदर्भातून निवडणूक लढवत आहेत. केंद्रीय अवजड उद्योग मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल भंडारा-गोंदियामधुन तर, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी नागपूरातून रिंगणात उतरले आहेत. त्यांचा थेट सामना काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांच्याशी आहे. काँग्रेस नेते मुकूल वासनिक रामटेकमधुन, राज्य सरकारमधील मंत्री संजय देवतळे चंद्रपूर आणि शिवाजीराव मोघे यवतमाळमधुन निवडणूक रिंगणात आहेत. मागच्या लोकसभा निवडणूकीत नागपूर, वर्धा, गडचिरोली-चिमूर आणि रामटेक या जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसने भंडारा-गोंदियामधुन विजय मिळवला होता. अकोला, चंद्रपूरची जागा भाजपकडे तर, बुलढाणा, अमरावती आणि यवतमाळमधुन शिवसेनेचे खासदार आहेत.

March 28, 2014 in विदर्भ
मोदीचे तुकडे-तुकडे करून टाकेन! - काँग्रेस उमेदवार 0

मोदीचे तुकडे-तुकडे करून टाकेन! – काँग्रेस उमेदवार

Narendra
नवी दिल्ली-हिटलर, भस्मासूर, नरभक्षक अशा असंख्य विशेषणांनी हिणवले गेलेले भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना आता काँग्रेसच्या एका उमेदवाराने थेट हत्येचीच धमकी दिली आहे. ‘उत्तर प्रदेशातून निवडणूक लढणाऱ्या मोदीच्या विरोधात लढून त्याला चांगलाच धडा शिकवणार, त्याचे तुकडे-तुकडे करून टाकणार,’ असे भयंकर वक्तव्य काँग्रेसचे उमेदवार इमरान मसून यांनी केले आहे.
इमरान मसूद हे काँग्रेसचे सहारणपूर येथील उमेदवार आहेत. त्यांचे एक वादग्रस्त भाषण व्हीडिओ कॅमेऱ्यात कैद झाले आहे. त्यात ते मुस्लिम समुदायाला मोदींच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. ‘यूपीतून निवडणूक लढणाऱ्या मोदीला माहीत नाही की हा उत्तर प्रदेश आहे, गुजरात नाही. गुजरातमध्ये फक्त ४ टक्के मुसलमान आहेत. पण इथे २२ टक्के मुसलमान आहेत. मी त्याच्याविरोधात निवडणूक लढणार आहे. त्याला जशास तसे उत्तर कसे द्यायचे हे मला माहीत आहे,’ असे मसूद महाशय या भाषणात म्हणतात. मसूद यांनी आपल्या भाषणात मोदींवर शिव्यांचा भडीमारही केला आहे.
स्वत:च्या ताकदीची आणि दहशतीची बढाई मारताना लहान मुलांनाही दबंग बनविण्याची इच्छा इमरान मसूद यांनी व्यक्त केली आहे. कायदा तोडल्याबद्दल एखाद्या पोलिसाने मुलाला रोखल्यास इमरानचा माणूस असल्याचे सांगून त्याने पोलिसांना उत्तर द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. इमरान मसूद हे काँग्रेसचे दिग्गज नेते रशीद मसूद यांचे पुतणे आहेत. आधी समाजवादी पक्षाने त्यांना उमेदवारी दिली होती. मात्र, रशीद मसूद यांनी त्यांचे तिकीट कापून स्वत:च्या मुलाला मिळवून दिले. त्यामुळे नाराज झालेले इमरान मसूद काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवित आहेत. मसूद यांच्या मोदीविरोधी वक्तव्यामुळे काँग्रेसला प्रतिक्रिया देणेही कठीण झाले आहे.

March 28, 2014 in मुख्य पान
लोकशाहीचा सांगावा 0

लोकशाहीचा सांगावा

Lokshahi (2)

 

आली भूमाता घेऊन । लोकशाहीचा सांगावा ।
पाचावर्षाच्या बोलीन । गडी-चाकर नेमावा ॥

लोकप्रतिनिधी नको । म्हणा लोकांचे नोकर ।
जनतेच्या मतावर । यांची शिजते भाकर ॥

होऊ नका लोभापायी । कोण्या पालखीचे भोई ।
करा फक्त तेच ज्याने । सुखावेल काळीआई ॥

धन-द्रव्य घेतल्याने । होते कर्तृत्व गहाण ।
नको स्वत्वाचा व्यापार । राखा आत्म्याचा सन्मान ॥

नशापाणी फुकटाची । आणि खानावळी शाही ।
होते अशा करणीने । कलंकित लोकशाही ॥

धर्म-पंथ-जाती-पाती । यांना देऊ नये थारा ।
मतदान करताना । फक्त विवेकाला स्मरा ॥

पाच वर्ष जनतेची । करू शकेल का सेवा ।
पात्रता नी योग्यतेचा । नीट अदमास घ्यावा ॥

कुणी आला शुभ्रधारी । ढग पांघरुनी नवा ।
आत कलंक नाही ना । गतकाळ आठवावा ॥

कधी गाळला का घाम । त्याने मातीत राबून ।
स्वावलंबी की हरामी । थोडे घ्यावे विचारून ॥

पूर्ती केलेली नसेल । पूर्वी दिल्या वचनांची ।
द्यावे हाकलुनी त्यास । वाट दावा बाहेरची ॥

नको मिथ्या आश्वासने । बोला गंभीर म्हणावं ।
कशी संपेल गरिबी । याचं उत्तर मागावं ॥

कृषिप्रधान देशात । नाही शेतीचे ’धोरण’ ।
कच्च्या मालाच्या लुटीने । होते शेतीचे मरण ॥

शेती रक्षणाकरिता । नाही एकही कायदा ।
फुलतात घामावरी । ऐदी-बांडगुळे सदा ॥

शेतीमध्ये जातो जो जो । मातीमोल होतो तो तो ।
अशी अनीतीची नीती । कोण धोरणे आखतो? ॥

सत्ता लोभापायी होतो । हायकमांडचा नंदी ।
प्रश्न शेतीचे मांडेना । करा त्यास गावबंदी ॥

पाचावर्षातुनी येते । संधी एकदा चालुनी ।
करा मताचा वापर । अस्त्र-शस्त्र समजुनी ॥

स्थिर मनाला करून । ‘अभय’ व्हा निग्रहाने ।
मग नोंदवावे मत । सारासार निश्चयाने ॥

– गंगाधर मुटे ‘अभय’

March 28, 2014 in मनोरंजन
सुनील गावस्कर बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष 0

सुनील गावस्कर बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष

sunil-gavaskar-014
नवी दिल्ली – इशारा देऊनही बीसीसीआय अध्यक्षपदाची खूर्ची न सोडणा-या एन.श्रीनिवासन यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने काही काळासाठी बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरुन दूर केले असून, त्यांच्या जागी भारताचे माजी कर्णधार आणि लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे.
सुनील गावस्कर यांना बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष बनवले असले तरी, त्यांच्या हाती फक्त आयपीएलच्या सातव्या मोसमाची सूत्रे दिली आहेत. आयपीएल व्यतिरिक्त बीसीसीआयच्या सर्व दैनंदिन कारभाराचे अधिकार बीसीसीआयचे उपाध्यक्ष शिवलाल यादव यांना देण्यात आले आहेत. आयपीएलचा सातवा मोसम पूर्ण होईपर्यंत गावस्कर बीसीसाआयचे अध्यक्ष रहातील.
सध्याचे सर्व आठही संघ आयपीएलमध्ये खेळू शकतात असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळे राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालायने गुरुवारी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलचा सातवा मोसम खेळू नये असा प्रस्ताव दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दोन्ही संघांवर तसेच कुठल्याही खेळाडूवर कोणतीही बंदी घातली नाही.शुक्रवारी झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने एन.श्रीनिवासन यांच्या आयसीसी अध्यक्षपदाच्या मार्गात कोणाताही अडथळा आणलेला नाही. जुलै महिन्यात श्रीनिवासन आयसीसीच्या अध्यक्षपदाची सूत्रे संभाळू शकतात असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. गावस्कर यांचा आयपीएलबरोबर समालोचक म्हणून करार आहे. गावस्कर यांना या करारामधुन बाहेर पडण्याचे आदेश देताना, बीसीसीआयलाही या कराराची भरपाई देण्याचे आदेश दिले.

March 28, 2014 in क्रीडा
दिल्लीत 'आप'ची लोकप्रियता घसरली 0

दिल्लीत ‘आप’ची लोकप्रियता घसरली

aap-logo
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकांच्या तारखा जसजशा जवळ येत आहेत तसा जनतेचा कलही बदलत चालला असून दिल्लीत आम आदमी पक्षाचा लोकप्रियतेचा ‘ग्राफ’ घसरत चालल्याचे ताज्या जनमत चाचणीमध्ये दिसून आले आहे. ‘आप’ला दिल्लीतील सात पैकी तीन तर भाजपच्याही पारड्यात तीन जागा पडतील असे सध्याचे चित्र आहे. त्याचवेळी काँग्रेसच्या मतांमध्ये मोठी वाढ होऊन एका जागेची लॉटरी त्यांना लागेल, असे ही चाचणी सांगते.
दिल्लीत १० एप्रिल रोजी मतदान होणार असून एबीपी न्यूज आणि नेल्सन यांनी घेतलेली ताजी जनमत चाचणी ‘आप’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांना जबरदस्त धक्का देणारी आहे. दोन महिन्यांपूर्वी दिल्लीत घेण्यात आलेल्या जनमत चाचणीत दिल्लीत ‘आप’चे वर्चस्व कायम राहिल, असा कौल जनतेने दिला होता. ‘आप’ला त्यावेळी ७ पैकी ६ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र आता चे चित्र हळू हळू बदलू लागले आहे. जनमत चाचणीनुसार ‘आप’ची लोकप्रियता वेगाने घसरत चालली आहे. मात्र, त्याचवेळी सर्वात जास्त म्हणजे ३४ टक्के मते पदरात पाडण्यात ‘आप’ यशस्वी ठरेल. त्याखालोखाल ३२ टक्के मते भाजपला तर २८ टक्के मते काँग्रेसला मिळणार आहेत. ‘आप’ची घटलेली मते भाजपच्या नाही तर काँग्रेसच्या पारड्यात पडतील. काँग्रेसच्या मतांमध्ये मोठी वाढ पहायला मिळेल, असा अंदाज आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या जनमत चाचणीत काँग्रेसला केवळ ९ टक्के मते मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यात अवघ्या दोन महिन्यात १९ टक्के मतांची वाढ झाल्याचे दिसत आहे. तर याच काळात भाजपच्या मतांमध्ये तीन टक्के वाढ दाखवण्यात आली आहे. ‘आप’ला जानेवारी महिन्यात ५५ टक्के मते मिळतील, असा अंदाज होता त्यात १९ टक्के घसरण होईल, असे सध्याचे चित्र आहे.

March 28, 2014 in देश-विदेश
हवाई दलाचे विमान कोसळून ५ ठार 0

हवाई दलाचे विमान कोसळून ५ ठार

cj1
नवी दिल्ली –  भारतीय हवाई दलाचे मालवाहक विमान मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरजवळ कोसळल्याचे वृत्त असून या घटनेत वैमानिकासह पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
सुपर हर्क्युलस सी-१३० जे या विमानाने आग्रा येथील तळावरून उड्डाण घेतले होते. मात्र, ग्वाल्हेरपासून ७२ किलोमीटरवर असलेल्या शोपूर-रघुनाथपूर भागात या विमानाला अपघात झाला आहे. हे विमान मलेशियाच्या बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी वापरण्यात आले होते, तसेच उत्तराखंडमध्ये आलेल्या भयंकर पूरावेळी मदत पोहोचवण्यासाठी या विमानाचा वापर करण्यात आला होता, असे सूत्रांनी सांगितले.हे विमान दोनच वर्षांपूर्वी अमेरिकेकडून खरेदी करण्यात आले होते. अशा प्रकारची केवळ सहाच विमानं भारताकडे आहेत.

March 28, 2014 in देश-विदेश
काँग्रेस, भाजपला सत्तेपासून रोखा- मायावती 0

काँग्रेस, भाजपला सत्तेपासून रोखा- मायावती

BP2635995-smallBP2636105-small
अमरावती – लोकसभेच्या सोळाव्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपला सत्तेत येण्यापासून रोखा, असे जाहीर आवाहन बहुजन समाज पक्षाच्या नेत्या, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी अमरावतीत गुरुवारी केले.
विदर्भातील बसपच्या १० उमेदवारांच्या प्रचाराकरिता मायावती यांची अमरावतीच्या सायन्सकोर मैदानावर सभा झाली. या सभेत मायावती यांनी काँग्रेस आणि भाजपला लक्ष्य केले. स्वातंत्र्याला साठ वर्षे होऊनही देशात गरीब आणि मध्यमवर्गीय जनतेची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बदलली नाही. गरीबी वाढली आहे अन् भ्रष्टाचार बोकाळला आहे. विद्यमान सत्ताधा‍र्यांनी राबवलेल्या योजनांचा सवर्सामान्यांना कसलाही फायदा झाला नाही. देशाच्या आजच्या हलाखीच्या परिस्थितीला फक्त काँग्रेस सरकारच जबाबदार आहे. केंद्राच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशाची पत आंतरराष्ट्रीय समुदायात घसरली. अद्यापही विदेशातील काळा पैसा भारतात आणण्यात काँग्रेस सरकारला यश आले नाही. भ्रष्टाचार थांबवण्यासाठी केलेले कायदे कुचकामी आहेत, असे त्या म्हणाल्या. भांडवलदारांच्या हाती सत्तेच्या चाव्या : देशात भांडवलदार, उद्योजक आणि ‘धन्नासेठ’ यांच्याकरिताच कायदे बनवण्यात येतात. त्यांच्या मदतीनेच केंद्रात काँग्रेस, भाजपने आतापर्यंत सत्ता हस्तगत केली. त्यांच्यापासून सुटका करायची असेल, तर आता सोळाव्या लोकसभेत काँग्रेस, भाजप दोघांनाही सत्तेपासून रोखण्याची संधी आहे, असे मायावती म्हणाल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित, पीडित आणि दलितांकरिता आरक्षण कायदा लागू करून सुविधा दिल्यात. मात्र, सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने नवनवे नियम लादून दलित जनतेचा आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. दलितांसाठी सरकारी नोकरीत असलेले आरक्षण हळूहळू संपवण्याचा काँग्रेसचा डाव आहे, असा आरोप मायावती यांनी केला.  लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या जाहीरनाम्यावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मायावती यांनी केले. देशात सहा वर्षे भाजपचे सरकार होते, मग त्यावेळी त्यांनी देशात सुधारणा का केल्या नाहीत? बहुजन समाज पक्षाच्या वतीने कधीही निवडणुकीत जाहीरनामा प्रकाशित करण्यात येत नाही. आम्ही विकास करून दाखवतो, असे मायावती यांनी स्पष्ट केले. गुजरातमध्ये दंगे घडवल्याचा आरोप असलेले नरेंद्र मोदी यांना भाजपने पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केले, तर पुढचा पंतप्रधान ‘युवराज’ होईल अशी काँग्रेसला आशा आहे, असे सांगत मायावती यांनी पंतप्रधानपदाच्या दोन्ही उमेदवारांना विरोध दर्शवला.
या जाहीर सभेला विदर्भाती बसपचे उमेदवार गुणवंत देवपारे (अमरावती), बळीराम राठोड (यवतमाळ-वाशीम), बी. सी. कांबळे (अकोला), अ. हफीज अ. अजिज (बुलडाणा), डॉ. मोहन गायकवाड (नागपूर), चेतन पैदाम (वर्धा), किरण पाटणकर (रामटेक), रामराज नन्नावरे (गडचिरोली), संजय नासरे (भंडारा), हंसराज कुंभारे (चंद्रपूर) उपस्थित होते.

March 28, 2014 in महाराष्ट्र
हॉटेलमध्ये हाणामारी, ३ ठार 0

हॉटेलमध्ये हाणामारी, ३ ठार

52064af9820ad

नाशिक – नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील गोळशी येथे आरती हॉटेलमध्ये काल (बुधवारी) रात्री दहाच्या सुमारास सुरू झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि हॉटेल मालकासह तीनजणांचा मृत्यू झाला.
हॉटेलमध्ये वीटभट्टी आणि ट्रक व्यावसायिक किरण ढाकणे, ट्रकचालक श्रीराम शिखरे आणि अन्य एक व्यक्ती असे तिघेजण रात्री दहाच्या सुमारास जेवत होते. त्यावेळी टेबलवर शिखरे यांनी उलटी केली. हॉटेलमालक रमेश सोनवणे यांनी शिखरे यांना टेबल साफ करुन देण्यास सांगितले. यावरुन शिखरे आणि सोनवणे यांच्यात वाद झाला. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले आणि शिखरे यांचा मृत्यू झाला. ही घटना कळताच शिखरे यांना ओळखणा-या दहा-पंधरा जणांचा जमाव हॉटेलमध्ये आला. जमावाने केलेल्या हल्ल्यात हॉटेल मालक सोनवणे आणि हॉटेलचा आचारी मनोज गंभीर जखमी झाले. दोघांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथेच त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी चौकशीसाठी काहीजणांना ताब्यात घेतले आहे आणि घटनास्थळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. हॉटेलमधील घटनेनंतर गोळशी आणि आसपासच्या भागात तणावाचे वातावरण आहे.

March 27, 2014 in महाराष्ट्र