मुंबई- मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकाने बुधवारी बाजाराला सुरुवात होताच उच्चांकी पातळी गाठली. निर्देशांक २२,१६२.५२ या उच्चांकी पातळीवर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीही ६ हजार ६०० अंकाच्या वर आहे.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची मेहेरनजर असल्याने गेल्या काही सत्रांपासून सेन्सेक्स रोज नवी शिखरे पादाक्रांत करत आहे. निर्देशांकाने जानेवारी महिन्यात गेल्या दोन वर्षांमध्ये पहिल्यांदाच २० हजार अंकाचा टप्पा गाठला. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. चालू आठवड्यात बँकांच्या शेअरची मोठ्या प्रमाणात झालेल्या खरेदीने सोमवारी सेन्सेक्सने त्रिशतकी झेप घेतली. तो २२,०५५.४८ अंकांच्या नव्या शिखरावर बंद झाला. तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीतही ८८.६० अंकांची वाढ झाली आणि तो ६,५८३.५० वर बंद झाला. मंगळवारी सेन्सेक्स केवळ ०.२७ अंकांच्या घसरणीसह २२,०५५.२१ वर बंद झाला होता. तर निफ्टीत मात्र ६.२५ अंकाची वाढ होऊन तो ६,५८९.७५ वर बंद झाला. बाजारामध्ये सध्या तेजीचे वातावरण असून गुंतवणूकीसाठी चांगली संधी असल्याचे जाणकारांचे मत आहे. आता नवीन वर्षांत तेजीचा नवा उच्चांक स्थापन केला जाईल, असा अंदाज आहे.
Archive for March, 2014
0
शेअर बाजाराच्या निर्देशांकाने उच्चांक गाठला
चीड
बाबासाहेब
भाषण द्यायचे
तेव्हाही मला चीड यायची.
पाणवठ्यावर पाणी पिताना
समाजाला लाथ मारायचे सवर्ण
तेव्हाही मला चीड यायची.
दारात पाय ठेवला की
मंदिराचे दरवाजे बंद व्हायचे
तेव्हाही मला चीड आली,
बेलछीत कत्लेआम झाला
तेव्हा मी पार चिडून गेलो.
हत्तीवर काढलेल्या
बाबाच्या मिरवणुकीवर दगडं आलीत
तेव्हा मी किती चिडलो ?
सबानेचे डोळे काढले
मवाडेचे तुकडे केले ,
पोचीराम जाळून टाकला ,
माझी चीड तेव्हा आस्मानात पोहचली.
पुतळे तोडले बाबांचे ,
तेव्हा मी चिडून बेभान झालो.
रिडल्सला त्यांनी हात लावला
चिडून माझे डोके बिथरले.
झज्जरला मुंडक्या छाटल्यात,
माझे डोके ठिकाणावर नव्हते चिडल्याने.
खैरलांजीत माणुसकीवर बलात्कार झाला,
माझे डोके चीड चीड करताहे … चीड चीड करताहे …
थोडे थांब, ध्यानात बसू दे ,
नंतर या विषयावर बोलू .
आनंद गायकवाड
[ इस्तो ]
लालदिवा !
आपण पाय पुढे काढला की
वाटाच दिसेनाशा होतात
पतंगाच्या दोरीसारखे
कुणाच्या हाती सूत्र असावे वाटांचे ?
दिशा अंधारून येतात
जिवंत देह फाडणार्या लांडग्यांचा आवाज
ऐकू येतोय हा
की, माणसांत प्रेत शोधणारे मसण्याऊद हे
हे वंशज कुणाचे ?
पार्श्वभागात वाटा घालून बसलेले
हे पामेरियन कुत्रे
आपण पाय पुढे काढला की
सभ्य तोंडाने भुंकतात.
या वाटेच्या वाटेला आपण जाऊ नये
पाय पुढे काढून भुतावळ जागवू नये
असा दम देणारे
थोर नेते आपलेच का ?
पायात घुंगरू बांधून आलेल्यांना
वाटा वळणे सारीच दिसली
हा कोणत्या हिजड्यांचा फड ?
आपले स्वप्न यांनी हायजेक करावे
एअर कंडीशन्ड हवेलीत बसून
झोपड्यांना ब्ल्याकमेल करणारे
हे हरामखोर
दुडूदुडू धावणाऱ्या सूर्यपुत्रांना
ओलीस ठेवून मागताहेत
कपाळावर लालदिवा ..!
भूमिपूजनावाचून
हापशीच खोदल्या गेली नाही
आपल्या गावात येत नाही यांचा रस्ता
कासावीस झालेले हे पाणीदार डोळे
जीभ धरून बाहेर आले
किसानाचे शेत कसे फाशी गेले
आसवात ओलेती मजूर
घाण उपसतांनाही भावते दलालांना
रक्ताळलेल्या टांचा घेऊन
काचा वेचणारा बालमजूर पाहून
सुचते यांना तीर्थाटन
पाणी आटलेले हे कुणाचे पुढारी
बिसलेरीच्या शिशीत बंद
यांची शुष्क गर्जना
आधी यांनाच करू फ्रीज
आपण पाय पुढे काढला की
वाटा तयार होतील असे करू
यांच्या वंशाचा लाल दिवा
हापशीच्या पाण्याने विझवून देऊ.
आनंद गायकवाड
[ आखरीचं तुव्हच सडान चिबवीन ]
एका अपक्ष उमेदवाराची माघार
यवतमाळ – यवतमाळ- वाशिम लोकसभा मदरारसंघासाठी आज दिनांक 25 मार्च रोजी गोवींद देवाजी चव्हाण या अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. उद्या दिनांक 26 मार्च रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतीम दिनांक आहे.
चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता 39 उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहीले आहे. उद्या शेवटच्या दिवाशी किती उमेदवार आपले अर्ज मागे घेतात यावर निवडणूक रिंगणातील अंतीम उमेदवार ठरणार आहे.
0
अमरावतीत ८७ वाघनखे, कस्तुरी जप्त

अमरावती – शहरातील नेहरू मैदानावरील गांधी शिल्प बाजार या हस्तकला प्रदर्शनातून रविवारी वनविभागाने ८७ वाघनखांसह मौल्यवान कस्तुरी जप्त केली. या प्रकरणी कर्नाटकातील जितुनाथ काकम आणि यारबी या दोघांना अटक करण्यात आली आहे.
नागपूर येथील दलित मुस्लीम मागासवर्गीय युथ फेडरेशनने नेहरू मैदानात १५ मार्चपासून गांधी शिल्प बाजार हे हस्तकला प्रदर्शन भरविले आहे. येथे शंभरांवर स्टॉल्समधून रोझ वूड, सँडल वूड फिगर, कलमकरी पेंटिंग, खादी ड्रेसेस, सॉफ्ट टाॅइज, ग्लास पेंटिंग, वूड कटलरी असे विविध साहित्य विक्रीस ठेवले आहे. येथे वाघ नखे आणि कस्तुरीचीही चोरटी विक्री होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानुसार रविवारी दुपारी वनसंरक्षक सोमराज यांच्या नेतृत्वातील पथकाने येथे छापा घातला आणि सहाव्या क्रमांकाच्या स्टॉलमधून ६० तर १४ क्रमांकाच्या स्टॉलमधून २७ वाघ नखे जप्त केली. वाघनखांसोबतच मौल्यवान कस्तुरीही जप्त करण्यात आल्याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. चौकशीसाठी सात जणांना ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीनंतर दोघांना अटक करण्यात आली. जप्त वाघनखे खरी की खोटी, हे तपासण्यासाठी हैदराबाद येथील फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात येणार आहेत.
0
दोन अभयारण्ये खुली

नागपूर – उन्हाळ्यात सर्वत्र पर्यटनाची चाहूल लागते. अशावेळी विदर्भात पर्यटनाची अमाप संधी असतानाही वैदर्भीयांना बाहेरील पर्यटनस्थळे खुणावतात. मात्र, येथील पर्यटकांना येथेच थांबवून ठेवण्यासाठी वन विभागाने पुढाकार घेतला आहे. दोन महत्त्वाची अभयारण्ये खास उन्हाळ्यासाठी २१ मार्चपासून वैदर्भीयांच्या सेवेसाठी खुली करण्यात आली आहेत.
२५० चौरस किमी क्षेत्रफळावर विस्तारलेल्या उमरेड-कऱ्हांडला या वन्यजीव अभयारण्याला केंद्र सरकारने मागीलवर्षीच व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा दिला. त्यानंतर अनेकांची या अभयारण्याला भेट देण्याची इच्छा होती. त्यामुळे वन विभागाने खापरी प्रवेशद्वारातून हे अभयारण्य खुले केले आहे. यानुसार, सकाळी ६.३० ते ८.३० दरम्यान प्रवेश घेऊन ११ वाजतापर्यंत बाहेर यावे लागेल. त्यानंतर दुपारी २.३० ते ४.३० दरम्यान प्रवेश घेऊन सायंकाळी ६ वाजता परत यावे लागेल. अभयारण्याजवळील पवनी येथे शनिवारी आठवडी बाजार असल्याने तो दिवस सोडून अन्य दिवशी हे अभयारण्य सुरू असेल. यासोबतच देवलापार येथील मानसिंगदेव वन्यजीव अभयारण्य हा तब्बल ७५७ चौरस कि.मी .क्षेत्रफळाच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचा भाग आहे. हे अभयारण्यदेखील आता निसर्गप्रेमींसाठी सुरू करण्यात आले आहे. या अभयारण्यातदेखील वाहनांना उमरेड-कऱ्हांडलाच्या वेळेनुसारच खुर्सापार प्रवेशद्वारातून प्रवेश दिला जाणार आहे. अभयारण्याजवळील पवनी येथे बुधवारी आठवडी बाजार असल्याने तो दिवस सोडून अन्य दिवशी हे अभयारण्य सुरू असेल
0
‘ते’ विमान कोसळले

क्वाललांपूर – गेले १७ दिवस २३९ प्रवाशांसह बेपत्ता असलेले मलेशिया एअरलाइनचे विमान दक्षिण हिंदी महासागरात कोसळले असल्याचे मलेशियचे पंतप्रधान नजिब रझाक यांनी सोमवारी जाहीर केले. त्यांच्या या घोषणमुळे गेले १७ दिवस सुरू असलेली विमानाबद्दलची अनिश्चितता संपुष्टात आली आहे. दरम्यान, विमान कोसळल्याच्या अधिकृत घोषणेनंतर प्रवाशांच्या नातेवाईकांवर दु:खाचा डोंगर कोसळला. इतके दिवस आपले जीवलग परत येतील, अशी त्यांना असलेली आशा यामुळे मावळून गेली.
एमएच३७० हे दक्षिण हिंदी महासागरात कोसळले असल्याचे जाहीर करताना आम्हाला अत्यंत खेद होत असल्याचे त्यांनी विशेष पत्रपरिषदेत म्हटले आहे. ब्रिटिश सॅटेलाइट कंपनी इन्मरसॅटने दिलेल्या माहितीनुसार हे विमान हिंदी महासागराच्या दक्षिण टापूत दिसल्याचे नोंदवण्यात आले आहे. मलेशिया एअरलाइन्सचे बोइंग७७७- २०० हे विमान ८ मार्चला २३९ प्रवाशांसह बेपत्ता आले होते. यात पाच भारतीय प्रवशांसह एका भारतीय वंशाच्या कॅनेडियन नागरिकाचा समावेश आहे. ब्लॅक बॉक्स शोधासाठी अमेरिकन नौदलाने ‘टीपीएल२५’ ही यंत्रणा या भागात तैनात केली आहे. या यंत्रणेमुळे विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधण्यास मदत होईल. २० हजार फूट खोलीपर्यंतचे अवशेष शोधण्यासाठी या यंत्रणेचा फायदा होऊ शकतो. मात्र, या भागात विमान कोसळल्याचे ठोस पुरावे मिळाले तरच या यंत्रणेचा फायदा होऊ शकेल.
0
‘हर हर मोदी’ न्यायालयात

वाराणसी – एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशात दिल्या जाणाऱ्या ‘हर हर मोदी… घर घर मोदी…’ या घोषणेचा वाद आता न्यायालयात पोहोचला आहे. सेंट्रल बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष मनोजकुमार दुबे यांनी याप्रकरणी याचिका दाखल करून भाजप नेत्यांवर गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे.
नरेंद्र मोदी हे वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा झाल्यापासून यूपीतील भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. याच उत्साहातून कार्यकर्ते ‘हर हर मोदी… घर घर मोदी…’ ही घोषणा देत आहेत. मात्र, त्यामुळे बिथरलेल्या काँग्रेस, सपा व आम आदमी पक्षाने या घोषणेस हरकत घेतली आहे. हा देवाचा अपमान असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही याचिका करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी, यूपी भाजपचे प्रभारी अमीत शहा, वाराणसीचे महापौर रामगोपाल मोहले यांना यात प्रतिवादी करण्यात आले आहे. मतांसाठी भाजप ‘हर हर महादेव, घर घर महादेव आणि कण कण महादेव’ या घोषणेचे विकृतीकरण करत असून त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. ही घोषणा पक्षाची अधिकृत घोषणा नसल्याचे भाजपने आधीच स्पष्ट केले आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वत: ट्विटरवरून कार्यकर्त्यांनी अशी घोषणा देऊ नये, असे आवाहन केले आहे. त्यानंतरही याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे.
0
केजरीवालांच्या गाडीवर अंडाफेक

वाराणसी- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्यासाठी वाराणसीत दाखल झालेल्या अरविंद केजरीवाल यांना ठिकठिकाणी विरोधाला सामोरे जावे लागत आहे. आधी काशी येथे विश्वनाथ मंदिराबाहेर त्यांच्या गाडीवर अंडी फेकण्यात आली तर नंतर शाईफेकीलाही त्यांना सामोरे जावे लागले.
वाराणसी येथील भोजूबीर भागात भाजप कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांना मोठा विरोध केला. केजरीवाल दिल्ली सोडून वाराणसीत पळून आले आता आम्ही वाराणसीतूनही त्यांना पिटाळून लावणार, असे सांगत कार्यकर्ते केजरीवालविरोधी घोषणा देत होते. टागोर टाउन कॉलनीतील एका कार्यकर्त्याच्या घरी केजरीवाल गेले असता तेथे आप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणायुद्ध रंगले. त्यानंतर विश्वेश्रगंज येथील काळ भैरव आणि विश्वनाथ मंदिरात दर्शनासाठी आलेल्या केजरीवाल यांनाही भाजप कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता पोलीस व भाजप कार्यकर्त्यांमध्ये काही वेळ चकमकही उडाली.’आप’मधून बाहेर पडून स्थापन झालेल्या आम आदमी सेनेनेही केजरीवाल यांच्या वाराणसी दौऱ्याचा विरोध केला असून प्रत्यक्ष सभेतही मोठा हंगामा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.वाराणसीतील बेनियाबाग मैदानात केजरीवाल यांची सभा होत आहे. यावेळी ते वाराणसीतून लोकसभा निवडणूक लढण्याबाबत आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. मात्र, केजरीवाल वाराणसीत दाखल झाल्यापासून स्वागत आणि विरोध अशा दुहेरी चित्रामुळे पोलिसांची पुरती दमछाक झाली आहे. केजरीवाल यांच्या सभास्थानीही पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
0
इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या तहसीन याला अटक

नवी दिल्ली – भारताच्या प्रमुख शहरांत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांतील मुख्य आरोपी व इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या तहसीन अख्तर ऊर्फ मोनू याला अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या काकडविट्टा येथून दिल्ली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ‘बॉम्बमेकर’ वकास याच्या अटकेनंतर लगेचच अख्तर जाळ्यात अडकल्याने मुजाहिदीनचे कंबरडे मोडले आहे.
वकास याच्या अटकेनंतर सैरभैर झालेला मोनू पाकिस्तानात पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याआधीच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. मोनू हा एनडीएनचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथील सभेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा सूत्रधार होता. यासीन भटकळ याच्या अटकेनंतर इंडियन मुजाहिदीनची सर्व सूत्रे तहसीनकडे आली होती. तोच या संघटनेचा म्होरक्या होता. मुंबईत २०११ साली झालेले बॉम्बस्फोट, बोधगया स्फोट आणि पुणे बॉम्बस्फोटांतही तहसीनचा हात होता, अशी सूत्रांची माहिती आहे.
0
इजिप्तमध्ये ५२९ मोर्सी समर्थकांना फाशी

कैरो – इजिप्तचे माजी राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोर्सी यांचे समर्थन करणा-या ५०० हून अधिक जणांना पोलिसांची हत्या तसेच इतर हिंसक घटनांप्रकरणी दोषी ठरवत न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. इजिप्तमधील मिन्या येथील न्यायालयाने हा निर्णय दिला. मोर्सी यांच्या एकूण ५२९ समर्थकांना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
या सुनावणीदरम्या न्यायालयाने २६ जणांची सुटका केली आहे. शिक्षा सुनावण्यात आलेल्या सगळ्यांनाच पोलिसांनी गेल्या वर्षी ऑगस्ट २०१३ मध्ये अटक केली होती. मोर्सी यांची पुनर्नियुक्ती करण्यात यावी या मागणीसाठी समर्थकांनी दक्षिण इजिप्तमध्ये हिंसक आंदोलन सुरू केले होते. पोलिसांनी बळाचा वापर करुन हे आंदोलन मोडून काढत सगळ्यांना अटक केली होती.यावेळी पोलिसांनी १२०० मोर्सी समर्थकांविरुद्ध विविध आरोप ठेवून खटले दाखल करण्यात आले होते.
0
जसवंत सिंग यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

बारमेर – पक्षाकडून लोकसभा निवडणूकीसाठी तिकीट न मिळाल्याने नाराज झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते जसवंत सिंग यांनी सोमवारी बारमेरमधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. याआधी रविवारी त्यांनी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते.
बारमेरमधून निवडणूक लढवण्याची आपली इच्छा असताना आपल्याला डावलून काँग्रेसमधून भाजपात आलेल्या कर्नल सोनाराम चौधरींना पक्षाने उमेदवारी दिली. त्यामुळे सिंग यांनी बंडाचा पवित्रा घेतला होता.सध्याच्या भाजप या पक्षात बाहेरून आलेल्या लोकांनी अतिक्रमण केल्याचा आरोप जसवंत सिंग यांनी केला होता. तसेच आपल्या बाबतीत पक्षाने दुसर्यांदा असे केले असल्याचे जसवंतसिंग म्हणाले होते.
0
शरद पवारांविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई – राज्यात तीन टप्प्यात होणा-या निवडणूकीचा फायदा घेऊन, दोनवेळा मतदान करा असा सल्ला पक्ष कार्यकर्त्यांना देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार अडचणीत सापडले आहेत.
भाजपने त्यांच्या या विधानाविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांना पत्र देऊन रीतसर तक्रार दाखल केली आहे. पवारांवर लोकप्रतिनिधी कायद्यातंर्गत करावाई करण्याची मागणी करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसवर बंदी घालावी अशी मागणीही त्यांनी केली. सोमय्या यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली. किरीट सोमय्या प्रसिध्दी मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठल्याही प्रकारे प्रसिध्दीच्या झोतात रहाण्याचा सोमय्या यांचा नेहमीच प्रयत्न असतो अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केली. रविवारी नवी मुंबईत माथाडी कामागाराच्या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तीन टप्प्यात होणा-या निवडणूकीचा फायदा घ्या, दोनवेळा मतदान करा असा सल्ला दिला होता. या विधानावरुन शरद पवारांवर टीका सुरु झाल्यानंतर त्यांनी आपण हे विधान गंमतीने केले अशी सारवासारव केली.
0
अनिवासी केरळी मतदारांसाठी दुबईहून विमान

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. या निवडणुकीबाबत परदेशातील अनिवासी भारतीयांमध्ये उत्सुकता आहे. हे अनिवासी भारतीय केवळ टीव्ही किंवा वर्तमानपत्रातील बातम्यांवर समाधान मानतात. मात्र, दुबईतील केरळ मुस्लीम कल्चरल सेंटरने (केएमसीसी) केरळमध्ये मतदान करण्यासाठी जाऊ इच्छिणा-या नागरिकांसाठी खास चार्टर्ड विमानाची सोय करण्याचे ठरवले आहे.
दुबईत केरळ मुस्लिम कल्चरल सेंटरचे ५०,३०० सदस्य आहेत. या संस्थेने केरळमध्ये सात एप्रिल रोजी होणा-या मतदानात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मतदारांसाठी चार्टर्ड विमान करण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे कोझिकोडे जिल्ह्यातील नागरिकांना एका फेरीचे तिकीट सवलतीत मिळणार आहे. या मतदारांना भारतात आणण्यासाठी खासगी विमान कंपन्यांसह एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेसकडून चार्टर्ड विमान भाडयाने घेण्याची चर्चा सुरू आहे. ही सुविधा केवळ केरळातील मतदारांसाठी आहे, असे केएमसीसीचे महासचिव इब्राहिम इलेत्तिल यांनी सांगितले.
मतदानासाठी भारतात जाऊ इच्छिणा-या नागरिकांच्या संख्येवर विमानांची संख्या अवलंबून राहणार आहे. १६५ प्रवाशांसाठी खासगी कंपनीचे विमान भाडयाने घेतल्यास प्रति प्रवाशामागे ८३१९ रुपये तिकीट राहणार आहे. तर अन्य दोन कंपन्यांनी भारतातून दुबईसाठी १८० प्रवाशांसाठी प्रति प्रवाशामागे १२,४७७ आणि ९९८१ रुपये तिकीट आकारण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे मतदारांवर कोणताही प्रभाव टाकण्याचा हा प्रकार नाही. मतदार त्यांच्या इच्छेनुसार मतदान करू शकतात, असे इलेत्तिल यांनी सांगितले.
0
टी-२० विश्वचषक: भारताचा सलग दुसरा विजय

मिरपूर- आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेतील ‘ब’ गटातील सामन्यात भारताने वेस्ट इंडिजवर सात गडी राखून विजय मिळवला. स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. तसेच ‘ब’ गटात भारताने चार गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे.
प्रथम फलंदाजीकरत वेस्ट इंडिजने भारतापुढे विजयासाठी १३० धावांचे आव्हान ठेवले होते. शिखर धवन शून्यावर बाद झाल्यामुळे भारताची सुरुवात खराब झाली. मात्र त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दुस-या विकेटसाठी १०६ धावांची भागीदारी केली. कोहली ५४ धावांवर बाद झाला. तर रैनाने नाबाद ६२ धावा केल्या.त्याआधी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. वेस्ट इंडिजकडून धोकादायक ख्रिस गेलने सर्वाधिक ३४ धावा केल्या. यासाठी त्याने ४९ चेंडू घेतले. तर संघातील अन्य फलंदाजांनाही मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजला २० षटकात सात बाद १२९ धावा केल्या.भारताकडून रवींद्र जडेजाने तीन, अमित मिश्राने दोन तर आर अश्विनने एक गडी बाद केले.
0
गुगलचे ई-मेल्स होणार अधिक सुरक्षित

पत्रलेखन मागे पडून आता जमाना झाला. आता प्रत्येक पत्र ‘ई-मेल’द्वारे लिहिले जाते. या ‘ई-मेल’ने जगात क्रांती घडवली आहे. जगभरातील इंटरनेटवर लक्ष ठेवणा-या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा कार्यक्रमाने खळबळ उडाली. कारण आपले ‘ई-मेल’ अकाउंट सुरक्षित नसल्याने सर्वच नेट वापरणा-यांमध्ये घबराट पसरली. आपण लिहिलेले पत्र कोणीही वाचत असल्याचे लक्षात आल्याने प्रत्येक या सेवेविषयी साशंक राहू लागला. आता जगातील सर्वाधिक लोकप्रिय सर्च इंजिन गुगलने आपल्या ‘ई-मेल’ना अधिक सुरक्षेचे कवच पुरवले आहे. त्यामुळे ही सेवा वापरणाऱ्यांना खात्रीशीर सुरक्षेचा अनुभव मिळणार आहे.
तुमचे ‘ई-मेल’ अकाउंट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते अधिक सुरक्षित असावे अशी तुमची इच्छा असते. ही बाब आमच्यासाठी अधिक महत्त्वाची आहे, असे ‘जी-मेल’चे सुरक्षा अभियंता निकोलस लिडबोरस्की यांनी सांगितले. गुगलने ‘जी-मेल’ची सेवा सुरू केली तेव्हापासून ती कायम ऌळळढर’चा वापर करते. आजपासून या ई-मेल अकाउंटला अधिक सुरक्षा कवच पुरवले आहे. त्यामुळे तुमचा संदेश कोणीही वाचू शकणार नाही. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी ‘वाय-फाय’ सेवा वापरून संगणक, फोन आणि टॅब्लेट वापरल्यावरही सुरक्षेबाबत काहीच अडचण येणार नाही.
तुम्ही पाठवलेला प्रत्येक ‘ई-मेल’ हा १०० टक्के सुरक्षित आहे. याची माहिती केवळ तुम्ही आणि जी-मेलच्या सव्र्हरलाच असते. तसेच ही माहिती गुगलच्या डेटा सेंटरला असते. २०१३ मध्ये जी-मेल वापराचे प्रमाण ९९.९७८ टक्के होते. वर्षभरात केवळ दोन तास ही सेवा बंद राहिली होती. आमचे अभियांत्रिकी तज्ज्ञ आठवडयाचे सात दिवस व २४ तास यंत्रणेवर लक्ष ठेवून असतात. कोणतीही अडचण उद्भवल्यास ते तत्काळ त्यातून मार्ग काढतात. तसेच यंत्रणेत एखादा दोष निर्माण झाल्यास भविष्यात तो उद्भवू नये, म्हणून आमचे तज्ज्ञ त्याचे पूर्णपणे विश्लेषण करतात, असे लिडबोरस्की यांनी सांगितले.
0
मोदींना ‘मानवी बॉम्ब’चा धोका

नवी दिल्ली – देशातील सध्याचे सर्वाधिक चर्चेतील नेते व भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर मानवी बॉम्बचा हल्ला होण्याची भीती गुप्तचर अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून लालकृष्ण आडवाणी, राहुल गांधी, मुलायमसिंह, केजरीवाल यांच्यासह काही नेत्यांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्याचेही आदेश दिले आहेत.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर १९९१ साली झालेल्या हल्ल्याची पुनरावृत्ती करून देशातील धार्मिक सौहार्द बिघडवण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे. त्यासाठी निवडणूक काळात प्रमुख नेत्यांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर वाराणसी किंवा वडोदऱ्यामध्ये हल्ला होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे गुजरात, महाराष्ट्र व यूपीतील सुरक्षा संस्थांना खास खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दिल्लीतील शास्त्री पार्क येथे २६ मार्च रोजी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. या पार्कापासून जवळ असलेल्या सीलमपूर, जाफराबाद या वसाहतींमध्ये मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. ही सभा म्हणजे भाजपचा मुस्लिमांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. तर मुस्लिमबहुल भागातील या सभेचा फायदा घेऊन दहशतवादी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात, अशी भीती गुप्तचर विभागाने व्यक्त केली आहे.’मोस्ट वॉण्टेड’ दहशतवादी वकास व त्याचे साथीदार हाती लागल्याने पोलिसांना मोठा दिलासा मिळाला असला तरी धोका अजूनही कायम आहे. त्यांचे काही साथीदार अद्यापही फरार असून लश्कर व हरकत उलच्या दहशतवाद्यांमध्ये संभाषण झाल्याची कुणकुणही गुप्तचर अधिकाऱ्यांना लागली आहे. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे.
0
सोनिया गांधी यांना हिशेब का विचारत नाही – मुख्यमंत्री पर्रिकर


नागपूर – ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल हे काँग्रेसाध्यक्ष सोनिया गांधी यांना दहा वर्षांतील कारभाराबद्दल का विचारत नाहीत? त्यांनाही हिशेब विचारा ना, असे आव्हान गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी रविवारी येथे ‘आप’ला दिले.
‘फ्रेण्ड्स ऑफ बीजेपी’च्यावतीने ‘व्हिजन ऑफ बीजेपी फॉर डेव्हलप्ड इंडिया’ या विषयावर शंकरनगरातील साई सभागृहात संवाद आयोजित करण्यात आला होता. भाजपचे नितीन गडकरी यांच्या प्रचारानिमित्त नागपूरकरांशी संवाद साधताना पर्रिकर यांनी सहज शैलीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे गुणगान करून गोव्याच्या विकासाकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. पक्षाची लहान राज्यांची भूमिका असल्याचे सांगत वेगळ्या विदर्भाचे समर्थन करताना त्यांनी सावध पवित्रा घेतला. ‘अरविंद केजरीवाल यांनी आघाडी उघडताच माझी अचानक किंमत वाढली. देशभरातून आमंत्रणे येऊ लागली’, असे सांगून मनोहर पर्रीकर यांनी केजरीवाल यांचे उपरोधिक आभार मानले व त्यांच्या साधेपणावर टोले लगावले. पत्रकारांशी बोलतानाही त्यांनी केजरीवाल यांच्यावर टीका केली. साधेपणासोबत एखादी बाब घडवणे व तिची योग्य अंमलबजावणी करण्याची क्षमता आवश्यक आहे. त्यासाठी चांगल्या माणसाची गरज आहे. सद्यस्थितीत नरेंद्र मोदी सोडल्यास कुणीही अशी क्षमतावान व्यक्ती नाही, असा दावाही पर्रिकर यांनी केला. आयआयटीयन्सचे वैशिष्ट्य अधोरेखित करताना त्यांनी एक किस्साही सांगितला. १८ वर्षांपासून राजकारणात असलो तरी, अद्याप राजकारणी झालो नाही, असे पर्रिकर म्हणाले. यानंतर त्यांनी श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. भाजपच्या कोषाध्यक्ष शायना एन.सी. मॉडरेटर होत्या. ‘वेद’चे देवेंद्र पारेख, नाग-विदर्भ चेम्बर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल, रमेश मंत्री आदी उपस्थित होते. संचालन नितीन रोंघे यांनी केले.
0
जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकºयानी घेतले विष

यवतमाळ – जिल्ह्यात गारपिटीने शेतातील पिके उद्घवस्त झाली असून शासनाने अजुनही आर्थीक मदत दिली नाही. अशातच आकपूरी येथील एका शेतकºयाने आज सोमवारी २४ मार्च रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्रशन केल्याने खळबळ उडाली आहे.
जनार्दन राऊत (६५)असे या शेतकºयाचे नाव आहे. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या गारपिटीने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहे. शासनाने जाहीर केलेली मदत अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन केले. ही बाब निदर्शनास येताच शहर पोलिस व नागरिकांनी त्याला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्याचवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या शेतकºयाच्या खिशात आढलेल्या तीन चिठ्ठीमध्ये एका राजकीय पदाधिकाºयासह काही अधिकाºयांची नावे असल्याची माहिती आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आ. संजय राठोड, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मांगुळकर यांच्यासह अनेक पदाधिकाºयांनी भेटी दिल्या.
0
विदर्भात १७ शेतकºयांच्या आत्महत्या

नागपूर – विदर्भात गारपीटीनंतर नैराश्यग्रस्त कर्जबाजारी शेतकºयांच्या आत्महत्येचे सत्र पुन्हा सुरू झाले असून मागील पाच दिवसात १६ शेतकºयांनी आत्महत्या केल्याने सरकारच्या मदतीचे सर्व दावे फोल ठरले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कर्ज वसुलीला त्रस्त होऊन अचानक आलेल्या प्रचंड नुकसानीमुळे अन्नापासूनही वंचित राहिल्याने आत्महत्या करत असल्याचा आरोप विदर्भ जनआंदोलन समितीचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे.
मागील ५ दिवसात यशवंत मुळे रा. पंचाळा जि. वाशीम, विजय धोटे रा. बोरगाव जि. नागपूर, दमडू राठोड, रा. दत्तापूर जि. यवतमाळ, योगेश्वर लढी रा. हिवरा जि. वर्धा, माधवराव लांजेवार, रा. निलागोंदी जि. भंडारा, अभिमान काळे रा. बोरगाव जि. चंद्रपूर, कृष्णा वानखडे रा. साखरा जि. यवतमाळ, सुधाकर पोटे, रा. नवरगाव, राजू घोटेकार रा. वडनेर जि. वर्धा, भगवंत महाजन, रा. धानोरा, जि. वर्धा, वासुदेव घुले, रा. पळसाड, जि. नागपूर, सुरेश भुसार रा. गंगापूर जि. नागपूर, विजय कस्तुरे रा. बोथली जि. चंद्रपूर, पंतय्या रेंगुडवार, रा. आंबेधानोरा जि. चंद्रपूर, शंकर गडमडे रा. वरुड (इजारा), जि. यवतमाळ, सुभाष भोगेकर रा. धानापूर जि. चंद्रपूर, संतोष लिचडे रा. कासारखेडा, जि.वर्धा या १७ शेतकºयांनी आत्महत्या केल्यानंतर यांच्या आत्महत्येची स्वतंत्र चमुद्वारे कारणमिंमासा केली. त्यामध्ये सदर शेतकरी प्रचंड कर्जबाजारीला तोंड देत असून मागील जुलै -आॅगस्ट महिन्याच्या अतिवृष्टीत सोयाबीन गमाऊन आता नव्या उमेदीने रब्बी मध्ये हरभरा व गहू लाऊन जीवन जागण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र गारपीटीने त्यांचे जीवन उद्ध्वस्त केले असून सरकारने घोषित केलेली मदतही ५० टक्क्याच्यावर नापिकी या अटी खाली हे सर्व शेतकरी मदतीपासून वंचित राहणार आहे. बँक आणि खासगी सावकारांनी यांचे जगणे कठीण केले आहे. अनेक शेतकºयांच्या घरी अन्नही नसून यावर्षी मुलीचे लग्न सुध्दा करावयाचे आहे, अशा कठीण परिस्थितीमध्ये मदत तर सोडा कोणताही सरकारी प्रतिनिधी वा राजकीय नेता मदत घेऊन त्यांच्या दारावर आलेला नाही. एकीकडे राजकीय नेते निवडणूकीत कोट्यावधीचा खर्च करत असून दुसरीकडे विदर्भात २ वेळेचे अन्न नसल्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहे, अशा परिस्थितीमध्ये समाजाने समोर येऊन या शेतकºयांना दिलासा द्यावा, असे आवाहन सुध्दा किशोर तिवारी यांनी केले आहे.










