
यवतमाळ दि. ९ – पांढरवकडा शहरातील एका महीलेचा अज्ञात आजाराने नागपूर येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांनी स्वाईन फ्लूची धास्ती घेतली आहे.
ललीता शेखर वर्मा (४५) रा. पांढरकवडा असे मृतक महीलेचे नाव आहे. ८ मार्च रोजी त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी डॉक्टांनी तपासणी करून आजाराचे लक्षणे स्वाईन फ्लू सारखी असल्याने सदर महीलेला नागपूर येथे हलविण्याचा सल्ला दिला. त्यावरून त्यांना नागपूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी आवश्यक त्या सर्व चाचण्या केल्या असून मुंबई येथून वैद्यकीय अहवाल येण्यापूर्वी या महीलेचा मृत्यू झाला. त्यामुळे नागरिकांनी स्वाईन फ्लू या आजाराची धास्ती घेतली आहे.
Archive for March, 2015
0
स्वाईन फ्लू सदृश्य आजाराने महीलेचा मृत्यू
0
सायबर कॅफेत रासलीला, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह १२ जण ताब्यात

यवतमाळ, दि. ९ – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चौकातील निक्स कॅफेत महाविद्यालयीन तरूण तरूणींची रासलीला सुरू असताना उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाने धाड टाकुन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह १२ जणांना ताब्यात घेतले आहे. आज सोमवारी ९ मार्च रोजी ही कार्यवाही केली असून युवकांजवळून गर्भनिरोधक साहित्य जप्त केले आहे.
सहा तरूणीसह पराग पुडके (२१) रा. जगदंबा मंदीरजवळ पुसद, शुभम राजेंद्र जयस्वाल (२०) रा. समर्थवाडी यवतमाळ, प्रवर मुनींद्र सहीर (१९) रा. पाटीपूरा, अतूल विनय राऊत (२१) रा. बांगरनगर, कौस्तूक प्रकाश बगमारे रा. जयप्रभात चौक माळीपूरा, स्वप्नील हरीभाऊ रामगीरवार (२५) रा. विदर्भ हाऊसिंग सोसायटी व कॅ फे चालक स्वप्नील मधूकर उजवणे (२२) रा. चापनवाडी इत्यांदीना पथकाने ताब्यात घेतले आहे. स्थानिक जिल्हा शासकीय रुग्णालय चौकातील निक्स कॅफेत गेल्या अनेक महिन्यापासून महाविद्यालयीन तरूण, तरूणींचे अश्लील चाळे सुरू असल्याची माहितीा आज उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पथकाने सापळा रचून दुपारच्या सुमारास कॅफेवर धाड टाकली. यावेळी सहा तरूणी व सहा तरूण अश्लील चाळे करताना आढळून आले. कॅफेतून गर्भनिरोधक साहित्य देखील जप्त करण्यात आले आहे. या कॅफेला अधिकृत परवानगी देखील नसून, केवळ महाविद्यालयीन तरूण, तरूणींसाठी हा कॅफे चालविल्या जात होता. पथकाने बारा तरूणतरूणीसह कॅफे चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये इंजिनियरींग, लॉ चे विद्यार्थी असून, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. शहरात अन्य ठिकाणी देखील असाच प्रकार सुरू असून, यासाठी डिवाएसपीचे पथक विशेष मोहिम राबविणार आहे. हि कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक संग्राम ताटे, इकबाल शेख, संतोष मडावी, प्रमोद मडावी, रूतूराज मेढवे, परेश मानकर, शांता जांभूळकर, रेखा खंडाळकर आदींनी केली.
0
ट्रॅव्हल-कंन्टेनरची धडक, एक ठार, सात जखमी

यवतमाळ, दि. ९ – नेर तालुक्यातील लोहतवाडी (रत्नापूर) येथील आठ युवक होळी सण साजरा करून औरंगाबाद येथे जात असताना पुणे औरंगाबाद दरम्यान ट्रव्हल्स व कंटेनरचा अपघात झाला. यामध्ये एक युवक जागीच ठार तर ७ जण जखमी झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी ७ वाजता घडली.
लोहतवाडी येथील विलास किसन राठोड (२२), कैलास किसन राठोड (२५), निवृत्ती विठ्ठल राठोड (२३), मुन्ना विठ्ठल राठोड, राहुल काळे, रामेश्वर चव्हाण, विजय जाधव, देवानंद जाधव आदी मित्र औरंगाबाद येथे मोलमजुरीचे काम करतात. दरम्यान होळी हा उत्सव साजरा करण्यासाठी ते आपल्यागावी लोहतवाडी येथे आले होते. दरम्यान परिवाराची भेट घेऊन ते काल रात्री ट्रव्हल्सने जात असताना या ट्रव्हल्सला कंटेनरने धडक दिली. झालेल्या या भिषण अपघातात विलास किसन राठोड (२२) हा जागीच ठार झाला. तर त्याचा भाऊ कैलास राठोड, निवृत्ती राठोड, मुन्ना राठोड हे या अपघातात गंभीर जखमी झाले असून राहुल काळे, रामेश्वर चव्हाण, विजय जाधव, देवानंद जाधव हे चार किरकोळ जखमी आहे. त्यांच्यावर औरंगाबाद शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती लोहतवाडीचे उपसरपंच बाबाराव राठोड यांनी दिली.
0
संतप्त जमावाचा सहा तास चक्का जाम

यवतमाळ, दि. ९ – भरधाव वाहनाने धडक दिल्याने लासीना येथील युवकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिकांनी गतीरोध बसविण्याची मागणी केली होती. मात्र सबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने संतप्त नागरिकांनी आज सोमवारी लासीना येथे चक्का जाम केला.
सिमेंट घेऊन जाणाºया ट्रकने चिरडल्याने अभय गौतम सोनोने (२२) रा. लासिना या युवकाचा मृत्यू झाला होता. यावेळी नागरिकांनी रोष व्यक्त करून गतीरोधक बसविण्याची मागणी केली होती. मात्र तीन दिवसानंतरही सार्वजनीक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले होते. दरम्यान आज नागरिकांनी आज सोमवारी सकाळी १२ वाजता पासून चक्का जाम आंदोलन केले. या बाबतची माहिती मिळताच यवतमाळ येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, दारव्हा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कल्पना भराडे, परिविक्षाधिन पोलीस उपअधिक्षक विजय लघारे, नेरचे ठाणेदार गणेश भावसार, जिल्हा वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास वांदिले तेथे दाखल झाले. सायंकाळी सहा वाजता गतिरोधक तयार केल्याने नागरिकांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनाने यवतमाळ-अमरावती मार्गावरील वाहतुक सहा तास खोळंबली होती.
0
खा. अशोक चव्हाण यांनी स्वीकारला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा कार्यभार

मुंबई, दि. 9 – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी सोमवार, दि. 9 मार्च 2015 रोजी पदाची औपचारिक सूत्रे स्वीकारली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दि. 2 मार्च 2015 रोजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली होती.
येथील दादरस्थित प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे मावळते प्रदेशाध्यक्ष आ.माणिकराव ठाकरे यांनी नवनियुक्त अध्यक्षांना कार्यभार सोपवला. याप्रसंगी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे चिटणीस व महाराष्ट्राचे सहप्रभारी श्री श्योराज जीवन वाल्मिकी यांच्यासह अनेक प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त अध्यक्षांनी उपस्थितांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. तत्पूर्वी खा. अशोक चव्हाण यांनी सिद्धीविनायक मंदीरात दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी चैत्यभूमीवर जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन व शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण केले.
0
लोकसभेत गदारोळ, कामकाज तहकूब

नवी दिल्ली, दि. ९ – फुटीरतवादी नेता मसरत आलमच्या सुटकेच्या निर्णयाविरोधात विरोधकांनी लोकसभेत गदारोळ माजवल्याने सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले. आलमच्या सुटकेबाबत पंतप्रधानांनी संसदेत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी विरोधकांनी सभागृहात केली. मसरतच्या सुटकेचा निर्णय मुफ्तींनी एकट्याने घेणे शक्य नाही, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली असावी असे काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले. मात्र आलमच्या सुटकेच्या निर्णयाबाबत केंद्र सरकारशी कुठलीही चर्चा झालेली नाही, त्याबद्दल सरकारला कुठलीही माहिती नव्हती व सराकार या निर्णयात केंद्र सरकार सहभागी नव्हते असे संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले. दरम्यान याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह दोन्ही सभागृहात निवेदन देणार आहेत.
जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आदेश दिले होते. यानुसार मसरत आलमचीही शनिवारी सुटका करण्यात आली. २०१० मध्ये आंदोलनादरम्यान आंदोलकांना भडकावल्याप्रकरणी आलमविरोधात गुन्हा दाखल होता. आलमची माहिती देणा-या तत्कालीन सरकारने १० लाख रुपयांचे पारितोषिकही जाहीर केले होते. अशा वादग्रस्त नेत्याची सुटका केल्याने सईद सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत आहे.
0
शेअर बाजार ३४० अंकांनी घसरला

मुंबई – गुंतवणूकदारांनी शेअर्सच्या विक्रीवर भर दिल्याने सोमवारी सकाळी बाजार उघडल्यानंतर मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ३४० अंकांची घसरण झाली.
बीएसई सेन्सेक्स २९,१०८.२६ अंकांवर होता तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही ८,९०० च्या खाली घसरला. निफ्टीमध्ये १२७ अंकांची घसरण होऊन निफ्टी ८८१० अंकांवर होता.
आयटी, तंत्रज्ञान, बँकिंग आणि ऊर्जा क्षेत्राच्या शेअर्समध्ये घसरण सुरु आहे. शुक्रवारी रंगपंचमीमुळे शेअर बाजार बंद होता.
अन्य आशियाई शेअर बाजारातील निराशाजनक चित्र आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवण्याची शक्यता असल्यामुळे गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिल्याचे बाजार विश्लेषकांनी सांगितले.
0
गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी समिती स्थापणार- तावडे

मुंबई : गड-किल्ले हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा अमूल्य ठेवा असून आमचे सरकार गड- किल्ल्यांच्या संवर्धनासाठी कटिबद्ध आहे. या अमूल्य ठेव्याचे संवर्धन करण्यासाठी सरकारतर्फे समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी केली.
महाराष्ट्रात तब्बल ३५० किल्ले आहेत. यापैकी ४९ किल्ले राज्य संरक्षक स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहेत तर केंद्र सरकारने संरक्षक स्मारक घोषित केलेल्या किल्ल्यांची संख्या ही ४७ इतकी आहे, अशी माहिती विनोद तावडे यांनी दिली. राज्यातील किल्ल्यांच्या संवर्धनासाठी राज्य सरकार आवश्यक निधी उपलब्ध करुन देईल तसेच केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या निधीबाबतही योग्य पाठपुरावा करेल असे सांगतानाच किल्ल्यांच्या संवर्धनासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार असून, यामध्ये निनाद बेडेकर, ऋषिकेश यादव आदी तज्ज्ञ मंडळींचा समावेश असेल, असेही तावडे यांनी स्पष्ट केले. केंद्राकडे किल्ल्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी असून केंद्राच्या अखत्यारीतील किल्ल्यांसाठी राज्याकडून नक्कीच पाठपुरावा करणार असून, खासगी किल्ले जनतेसाठी खुले करण्याचा प्रयत्न करण्यात येतील, तसेच कायद्यांमध्ये आवश्यक बदल करण्याचा विचार करण्यात येईल, असे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
0
आजच्या महिला या सावित्रीच्या लेकी – पंकजा मुंडे

मुंबई : आजच्या महिला या सावित्रीच्या लेकी आहेत. त्यामुळे या नक्कीच सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे नेतील, असे गौरवोद्गार महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे-पालवे यांनी काढले. ‘आम्ही उद्योगिनी’ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित राज्यव्यापी उद्योजक महिला परिषदेत, महिलांमध्ये जन्मत: उद्योजकतेचे बीज रुजलेले असते, असे मत मुंडे यांनी व्यक्त केले. उद्योग क्षेत्रातील महिलांनी उत्पादनातील उत्तम दर्जाला प्राधान्य द्यावे. शिवाय, नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर उद्योगांसाठी करावा, असा सल्ला सारस्वत बँकेचे उपाध्यक्ष गौतम ठाकूर यांनी दिला.
0
ना. राठोड यांच्या ‘बुलेट राईड’ने उत्साह

यवतमाळ, दि. 8 : शिवाजी चौक माळीपुरा येथून मोटारसायकल रॅलीने प्रभातफेरी काढण्यात आली. जागतिक महिला दिनाच्या औचित्याने या रॅलीचे नेतृत्व तरूणींनी केले. या रॅलीत पालकमंत्री संजय राठोड यांची ‘बुलेट राईड’ विशेष आकर्षण ठरली. स्वत: पालकमंत्री रॅलीत बुलेट घेऊन सहभागी झाल्याने कार्यकर्त्यांमध्येही उत्साह संचारला. यावेळी शेकडो शिवशैनिक आपल्या बाईक्सला भगवे झेंडे लावून या रॅलीत सहभागी झाले. यावेळी संपूर्ण शहर जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषांनी निनादून गेले. पाटीपुरा, कळंब चौक, आठवडी बाजार, अँग्लो हिंदी हायस्कूल, माईंदे चौक, दाते कॉलेज चौक, शिवाजी नगर, बसस्थानक चौक, हनुमान आखाडा चौक, स्टेट बँक चौक, वंजारी फैल, कॉटन मार्केट अशी मार्गस्थ होत या रॅलीचा माळीपुर्यात समारोप झाला. या मोटारसायकल रॅलीत पालकमंत्री संजय राठोड हे आपले चिरंजीव सोहम याला घेऊन पूर्णवेळ बुलेटने फिरले. पालकमंत्र्यांची ही बुलेट राईड शहरवासींयांसाठी औत्सुक्याचा विषय ठरली. याप्रसंगी मार्गातील सर्व महामानवांच्या पुतळ्यांना, प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री शिवाजी मंडळाच्या कार्यकर्त्यांसह शिवसैनिकांनी अथक परिश्रम घेतले. शिव छत्रपती दौड स्पर्धेसाठी संयोजक प्रा. अनंत पांडे, राजू जॉन, जितेंद्र सातपूते, मनोज येंडे यांच्यासह विविध शाळा, महाविद्यालयातील शारीरिक शिक्षकांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी पोलिसांनी चोख व्यवस्था ठेवली होती.
0
शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून निधी – पालकमंत्री राठोड

नाट्यगृह परिसरात अश्वारूढ पुतळ्याच्या कामाचे भूमिपूजन
यवतमाळ, दि. 8 : छत्रपती शिवाजी महाराजांचा फार मोठा इतिहास आहे. संपुर्ण राज्यासह देशाला अभिमान वाटावा, असे महाराजांचे कार्य आहे. या कार्याची आठवण होण्यासोबतच त्यांच्या कार्यातून प्रत्येकाने प्रेरणा घेणे आवश्यक आहे. महाराजांचा भव्य पुतळा यवतमाळ शहरात असावा, अशी अनेक वर्षांपासून शहरवाशियांची इच्छा आहे. येत्या वर्षभरात भव्य अश्वारूढ पुतळा उभा राहणार असून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून आवश्यक निधी उपलब्ध करून देऊ, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
नाट्यगृह परिसरात पुतळा उभारणीच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सुभाष राय तर प्रमुख पाहुणे म्हणून खा.भावना गवळी, आ.मदन येरावार, माजी खासदार सदाशिव ठाकरे, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, नप उपाध्यक्ष मनिष तिवारी, मुख्याधिकारी रविंद्र पांढरे उपस्थित होते.
सुरूवातीस छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. तसेच अश्वारूढ पुतळा बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. शिवाजी महाराज सर्वांचे राजे होते. गोरगरीब जनता तथा अठरापगड जातीच्या कल्याणासाठी महाराजांनी काम केले. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा महाराजांनी सुरू केली. त्यांच्या कार्याची आठवण या पुतळ्यातून होणार आहे, असे पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले.
जिल्हा नियोजन समितीतून पुतळा बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्यासोबतच पुढील जयंतीदिनापर्यंत पुतळा पुर्ण होणार असल्याचे ते म्हणाले. शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातही भव्य स्मारक उभे राहात आहे. यासोबतच महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांचे संवर्धन राज्य शासनाकडून होत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे उद्घाटक आ.मदन येरावार यांचेही यावेळी भाषण झाले. शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा समाजाला प्रेरणा देत राहील तसेच महाराजांच्या कार्याची आठवण करून देईल, असे ते म्हणाले. खा.गवळी यांनी प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेतली पाहिजे, असे सांगितले. नगराध्यक्ष सुभाष राय यांचे अध्यक्षीय भाषण झाले. माजी खासदार सदाशिव ठाकरे यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक मुख्याधिकारी रविंद्र पांढरे यांनी केले. यावर्षीच्या नगर परिषदेच्या अर्थसंकल्पात पुतळ्यासाठी निधीची तरतुद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास नगरपरिषदेच्या सभापती प्रणिता खडसे, नंदा जिरापुरे, श्रीमती कोटेकर यांच्यासह नगरसेवक, आजी-माजी पदाधिकारी तथा नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार नगर परिषदेचे अभियंता रावसाहेब पालकर यांनी मानले.
0
महिलांच्या आयुष्यात सुधारणेसाठी कटिबद्ध – मोदी

नवी दिल्ली – महिलांविरोधातील अत्याचाराचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) अडचणीत सापडलेल्या महिलांसाठी “मोबाईल हेल्पलाईन‘ व विशेष केंद्राची स्थापना करण्याची घोषणा केली. जागतिक महिला दिनानिमित्त सरकारची भूमिका स्पष्ट करताना पंतप्रधानांनी महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल आणण्याचे ध्येय हे केंद्र सरकारच्या विकासात्मक धोरणाच्या केंद्रस्थानी असल्याचे सांगितले.
“महिलांविरोधातील अत्याचाराच्या घटना पाहिल्यानंतर मान लाजेने खाली जाते. महिलांविरोधील सर्व प्रकारचा अन्याय संपविण्यासाठी आपण एकत्रितरित्या प्रयत्न करावयास हवा. आज आपल्या विकासाच्या प्रवासामध्ये महिलांना सामावून घेऊन, त्यांना समान स्थान देण्याच्या आमच्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करावयास हवा. महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी माझ्या सरकारने काही उपाययोजना केल्या आहेत. हिंसाचार वा इतर स्वरुपाच्या अत्याचाराचा सामना करावयास लागलेल्या महिलांना कायदेशीर सल्ला व मानसिक समुपदेशनाची सुविधा देण्यासाठी सरकार विशेष केंद्रे स्थापन करत आहे. याचबरोबर महिलांसाठी 181 या क्रमांकावर विशेष हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. विविध योजनांच्या माध्यमामधून महिलांच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणण्याप्रति सरकार कटिबद्ध आहे,‘‘ असे मोदी यांनी म्हटले आहे.
याचबरोबर, प्रधान मंत्री सुरक्षा बीमा योजना, प्रधान मंत्री जीवन बीमा योजना आणि अटल पेन्शन योजना या नुकत्याच संसदेत मांडलेया अर्थसंकल्पात सादर करण्यात आलेल्या योजनांमुळेही महिलांना मोठी मदत मिळणार असल्याचे निरीक्षण मोदी यांनी यावेळी नोंदविले.
0
विनोद मेहता यांचं निधन

नवी दिल्ली : ‘आऊटलूक’ ग्रुपचे संस्थापक, संपादक विनोद मेहता यांचं निधन झालं आहे. दिल्लीतील एम्समध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांनी वयाच्या 73 वर्षी अखेरचा श्वास घेतला.
त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत सुरुवात ‘सण्डे ऑब्जर्व्हर’, ‘द पायनिअर’ आणि ‘आऊटलूक’ यांसारख्या मासिकांमध्ये काम केलं. त्यांनी अनेक पुस्तकही लिहिली आहेत. भारतीय पत्रकारिता क्षेत्रात विनोद मेहता यांचं नाव आदराने घेतलं जातं. देशातील वरिष्ठ पत्रकारांमध्ये त्यांचा समावेश होतो. विनोद मेहता न्यूज चॅनलमध्ये पॅनलिस्ट म्हणूनही दिसायचे. त्यांनी पत्रकारांची संस्था ‘एडिटल गिल्ड’चं अध्यक्षपदही भूषवलं आहे. मेहता वयाच्या 73 वर्षीही पत्रकारितेत सक्रीय होते. विनोद मेहता त्यांच्या बिनधास्त आणि बेधडक मतांसाठी ओळखले जात होते. विनोद मेहता हे पत्रकार तर होतेच पण त्यांची ओळख एक चांगला लेखक आणि विचारवंत अशीही होती. विनोद मेहता यांनी सोनिया गांधींवर पुस्तक लिहिलं आहे. विशेष म्हणजे त्यांच्या कुत्र्याचं नावही ‘एडिटर’ होतं.
0
प्रणव मुखर्जींमुळे यूपीएचा पराभव – चिदंबरम

नवी दिल्ली,दि. ८ – तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी २००८ – ०९ च्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन पॅकेजची घोषणा केली होती. मात्र या नादात महागाई गगनाला भिडली व परिणामी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत युपीएचा पराभव झाला असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मांडले आहे.
चेन्नईतील एका महाविद्यालयात अर्थसंकल्पसंदर्भात संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पी. चिदंबरम यांनी यूपीएचा व वाढत्या महागाईचे कारण यावर भाष्य केले. चिदंबरम म्हणता, २००८ – ०९मध्ये यूपीएतील तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी अर्थव्यवस्थेला गति देण्यासाठी प्रोत्साहन पॅकेज दिले. पण यामुळे फिस्कल कन्सोलिडेशन नॉर्म्सचे उल्लंघन झाले. याचा फटका म्हणजे महागाई गगनाला भिडली, रुपयांचा भावही घसरला असे चिदंबरम यांनी नमूद केले. अखेरीस २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला नाकारले व यूपीएचा पराभव झाला असेही त्यांनी म्हटले आहे.
0
अभिनेता आदित्य पंचोलीला अटक

मुंबई – जूहू येथील एका नाईट क्लबमध्ये बाऊन्सरला मारहाण केल्याप्रकऱणी बॉलीवूड अभिनेता आदित्य पंचोलीला अटक करण्यात आली आहे.
जूहू-तारा रोड नाईट क्लबमध्ये आदित्यचा काही कारणावरुन तेथील डिस्क जॉकीशी वाद झाला. यावेळी आदित्य पंचोली दारुच्या नशेत होता. यादरम्यान एका बाऊन्सरने यात हस्तक्षेप केला असता आदित्य पंचोलीने त्याला मारहाण केली. यामध्ये बाऊन्सर जखमी झाल्याचे सांताक्रुझ पोलिसांनी सांगितले.
याप्रकऱणी पोलिसांनी त्याला अटक केली असून सोमवारी आदित्यला न्यायालयात सादर केले जाणार आहे.
0
बलात्का-याला चौकात फाशी, १८ जणांना अटक

दिमापूर – दिमापूरमध्ये बलात्का-याला तुरुंगातून बाहेर काढून भर चौकात फाशी दिल्याच्या घटनेप्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली आहे. याआधी सहा जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. तसेच आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
या शहरात लागू करण्यात आलेली संचारबंदी तीन वाजेपर्यंत शिथिल करण्यात आली आहे. मात्र मोबाईल, इंटरनेट आणि एसएमएस सेवा पुढील ४८ तासांपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. दिमापूरमधील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे.
नागालँडमधील दिमापूर शहरात शुक्रवारी एका बलात्का-याला भर चौकात फाशी देण्यात आल्याची घटना घडली. नागा समुदायाच्या मुलीवर बलात्काराचा आरोप असलेल्या सय्यद फरीद खानला दिमापूरमधील नागरिकांनी खेचतच तुरुंगाबाहेर आणले. त्यानंतर त्याची शहरभर धिंड काढण्यात आली. तसेच त्याला मारहाणही केली. यातच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांनी त्याला भर चौकात फाशी दिली. आरोपी सय्यद खानचे अंत्यविधी त्याच्या आसाममधील जन्मगावी करिमगंज येथे आज पार पडणार आहेत. आरोपीच्या कुटुंबियांनी या प्रकरणी न्यायाची मागणी केली आहे.
0
आजपासून तीन दिवस गारपीटीसह पावसाचा अंदाज

यवतमाळ, दि. 8 : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये दिनांक 8 ते 10 मार्च दरम्यान गारपीटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपूर्ण विदर्भासह संपूर्ण मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात गारपीटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून नागरिकांनी गारपीट सुरु असतांना बाहेर जाण्याचे टाळावे, यादरम्यान दुभती तसेच इतर जणावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, शक्य असल्यास ज्या धान्यांची कापणी झालेली आहे. ते धान्य सुरक्षित ठिकाणी हलवावे. गारपीटीनंतर तापमाणामध्ये घट होण्याची शक्यता असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. गारपीट सुरु असतांना विजेच्या तारा कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे वीज तारांपासून दूर रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.















