
मुंबई दि. २९ – एकटक बघत राहणाऱ्या, अश्लील हावभाव करणाऱ्या आणि रोज घाटकोपर ते सीएसटीपर्यंत पाठलाग करणाऱ्या एका रोडरोमियोला दोन बहिणींनी चांगलीच अद्दल घडविली आहे. पोलिसांनी दखल न घेतल्यानं दोन बहिणींनी स्वत:च भामट्याची मानगूट पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
घाटकोपर येथे राहणारी एक तरुणी सीएसटी परिसरात नोकरीला आहे. एकेकाळी तिचा शेजारी असलेला राजेश आष्टेकर नावाचा रिक्षाचालक रोज येता-जाता तिचा पाठलाग करायचा. तिच्याकडं एकटक बघत राहायचा, चित्रविचित्र हावभाव करायचा, अश्लील बोलायचा. या साऱ्याला ती तरुणी कंटाळली होती. त्याविरोधात तिनं घाटकोपरमधील पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रारही केली. मात्र, काहीच कारवाई न झाल्यामुळं राजेशचे उद्योग सुरूच होते. त्यामुळं या तरुणीनंच त्याला अद्दल घडवायचं ठरवलं.
नेहमीप्रमाणं बुधवारी सकाळी ती कामानिमित्त घराबाहेर पडली. निघताना तिनं तिच्या बहिणीलाही सोबत घेतलं. दोघींनी घाटकोपर स्टेशनला नेहमीची लोकल पकडली. आष्टेकरनेही तीच लोकल पकडली आणि त्यांच्यामागोमाग तो सीएसटीला पोहोचला. प्लॅटफॉर्मवर उतरताच त्यानं नेहमीचे चाळे सुरू केले. त्यावेळी या तरुणींनी त्याला तिथेच पकडले आणि रेल्वे पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशीसाठी कुर्ला जीआरपीच्या ताब्यात देण्यात आलं आहे.
Archive for January, 2015
0
दोन बहिणींनी घडविली रोमियोला अद्दल
0
दूषित रक्तातून एक हजार रुग्णांना एचआयव्हीची लागण

मुंबई दि. २९ – कुठल्याही हॉस्पिटलमध्ये आपल्या पेशंटसाठी रक्त घ्यायची वेळ आल्यास अजिबात हलगर्जीपणा न करता खबरदारीनंच वागा. कारण, एचआयव्ही बाधित रक्त दिलं गेल्यानं गेल्या पाच वर्षांत राज्यातील तब्बल एक हजार रुग्णांना एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांमधील रक्ताच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.
रक्तातून एड्सच्या विषाणूंचं संक्रमण होऊ नये, यादृष्टीनं देशपातळीवर काटेकोर उपाययोजना करण्यात आल्या आहेत. रक्तपेढ्यांसाठी कडक कायदे करण्यात आलेत. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापराद्वारे एचआयव्ही बाधित रक्त ओळखणं सोपं झालंय. असं असतानाही, गेल्या पाच वर्षांत देशातील ८,९८३ जणांना रक्तातून एचआयव्हीची लागण झाल्याचं उघडकीस आल्यानं वैद्यकीय क्षेत्राच्या भुवया उंचावल्यात आणि सामान्य पेशंटनाही धडकी भरलीय. खुद्द राष्ट्रीय एड्स नियंत्रण संघटनेनंच, माहिती अधिकारांतर्गत हा आकडा जाहीर केला आहे. त्यापैकी १ हजार रुग्ण महाराष्ट्रातील असल्यानं राज्याच्या आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. रक्तातून एचआयव्हीच्या संक्रमणात गुजरात आणि उत्तर प्रदेशपाठोपाठ महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे राज्य सरकारला तातडीनं ठोस पावलं उचलण्यावाचून पर्याय नाही.
एप्रिल ते ऑक्टोबर २०१४ या कालावधीत देशातील ६२९ जणांना रक्ताद्वारे एचआयव्हीची लागण झाली, त्यात ८० जण राज्यातील आहेत. ही आकडेवारी समोर येताच एचआयव्ही नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या संघटनांचं धाबं दणाणलंय आणि त्यांनी आपले हात वर करायला सुरुवात केली आहे. स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिल (एसबीटीसी) आणि महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीनं (एमएसएसीएस) एकमेकांकडे बोटं दाखवून स्वतःची जबाबदारी झटकण्याचाच प्रयत्न केलाय. परंतु, अद्ययावत तंत्रज्ञानाचा अभाव, हेच रक्तातून एचआयव्ही संक्रमणामागचं प्रमुख कारण असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे.
अजूनही अनेक रक्तपेढ्यांमध्ये enzyme-linked immune-sorbent assay test (ELISA)द्वारे एचआयव्हीची तपासणी केली जाते. त्यातून अचून निदान होऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीला नुकतीच एचआयव्हीची बाधा झाली असेल, तर ते या चाचणीतून समजत नाही. त्यासाठी किमान तीन महिन्यांचा कालावधी लागतो. त्याऐवजी, न्युक्लिअर अॅसिड टेस्टिंगद्वारे एचआयव्हीचं अचूक आणि जलद निदान होऊ शकतं. पण हे तंत्रज्ञान खर्चिक असल्यानं शहरातील मोजकीच खासगी हॉस्पिटल वगळता अन्य कुणीही ही चाचणी करत नाही. इतकंच नव्हे तर, राज्य सरकारी किंवा मुंबई महापालिकेच्या एकाही रक्तपेढीत ही सुविधा उपलब्ध नाही, अशी सविस्तर माहिती थिंक फाउंडेशनच्या विनय शेट्टींनी दिली.
रक्तदानावेळी रक्तदात्याचं रक्त घेताना आणि नंतर ते तपासताना योग्य खबरदारी घेतली जात नसल्याची गंभीर बाब एका रक्तपेढीच्या वरिष्ठ तंत्रज्ञानं निदर्शनास आणून दिली. एखादी व्यक्ती एचआयव्हीग्रस्त आढळल्यानंतरही तिला याबाबत कल्पना दिली जात नाही. त्यामुळे तो त्यानंतरही रक्तदान करत राहतो. ही पद्धत तात्काळ बदलण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अर्थात, एसबीटीसी मात्र, जे चाललंय त्याबद्दल समाधानी दिसतेय. दरवर्षी सुमारे ११ लाख जण रक्तदान करतात. अशा परिस्थितीत किती नियंत्रण ठेवता येणार?, असा प्रश्न संचालक डॉ. संजय जाधव यांनी केला. सर्वांना रक्त पुरवणं ही जबाबदारी आमची आहे, पुढचं काम एड्स नियंत्रण सोसायटीचं असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, एमएसएसीएकडील आकडेवारीनुसार, राज्यात एचआयव्हीची लागण होण्याचं प्रमाण लक्षणीय कमी झालंय. २००७ मध्ये १०,४३१ जणांना एचआयव्हीची बाधा झाली होती, तर २०११ मध्ये हे प्रमाण ५,८९३ इतकं झाल्याकडे ते लक्ष वेधतात. हे आकडे समाधानकारक असले, तरी रक्तातून एचआयव्हीचं संक्रमण थांबवण्यासाठी राज्य सरकारनं, महापालिकेनं आपल्या रक्तपेढ्यांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान पुरवणं अपरिहार्यच आहे, हे कुणीही मान्य करेल.
0
आता सरकारी अधिकाऱ्यांवर सीसीटीव्हीचा वॉच

मुंबई दि. २९ – ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ अशी आपल्याकडं म्हण आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बेफिकीर आणि बेजबाबदार मनोवृत्तीमुळं आताच्या ई जमान्यातही सर्वसामान्यांना या म्हणीचा प्रत्यय येत असतो. याच ‘बाबूगिरी’ला आळा घालण्यासाठी मुंबई उपनगरचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी अभिनव मार्ग शोधला आहे. सरकारी कार्यालयांत सीसीटीव्ही बसवून अधिकाऱ्यांच्या कामावर वॉच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
सर्वसामान्य लोकांना तसेच लोकप्रतिनिधींना या ना त्या कारणानं सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या वेळा घ्याव्या लागतात. मात्र, अनेकदा आधी वेळ घेऊन आणि तासन् तास वाट पाहूनही अधिकारी लोकांना भेटत नाहीत. त्यांच्या अडचणी ऐकून घेत नाहीत. याबाबतच्या असंख्य तक्रारी आल्यामुळं पालकमंत्री तावडे यांनी उपनगरातील सर्व कार्यालयांत सीसीटीव्ही बसविण्याचे ठरवले आहे. त्याची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयापासून होणार आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये तसेच केबिनबाहेरील वेटिंग रूममध्ये लावण्यात येणार आहेत. त्यामुळं अधिकारी आपल्या कर्तव्ये योग्य पद्धतीनं पार पाडतात की नाही, हे समजू शकणार आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी १ कोटींची तरतूद करण्यात आली असून येत्या मार्चपासून ते बसविण्यास सुरुवात होणार आहे. दर महिन्याला त्यातील फुटेजचा अभ्यास केला जाईल, असे उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांनी सांगितले.
0
ओबामांचा शिरच्छेद करू!- ISIS

न्यूयॉर्क दि. २९ – दोन अमेरिकी पत्रकार, एक ब्रिटीश आणि एका फ्रेंच नागरिकाचा शिरच्छेद करून क्रोर्याची परिसीमा गाठणाऱ्या आणि संपूर्ण जगासाठीच धोकादायक ठरू शकणाऱ्या आयएसआयएसनं आता थेट महासत्तेच्या महानेत्यालाच आव्हान दिलंय. ‘व्हाइट हाऊस’मध्ये शिरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांचा शिरच्छेद करू आणि अमेरिकेला मुस्लिम राष्ट्र बनवू, अशी धमकी त्यांनी एका व्हिडिओमधून दिल्यानं जगभरात खळबळ उडाली आहे.
आयसिसचे तीन दहशतवादी एका कुर्दिश जवानाचा शिरच्छेद करण्याच्या तयारीत आहेत. त्याच्या मानेवर धारदार सुरा ठेवूनच ते अमेरिकेला धमकावत असल्याचं नव्या व्हिडिओत दिसतंय. ‘ओबामा, आम्ही अमेरिकेला येत आहोत. बॉम्ब आणि स्फोटकं घेऊन आम्ही येऊ. व्हाइट हाऊसमध्ये शिरून तुमचा शिरच्छेद करू आणि अमेरिकेला मुस्लिम राष्ट्र बनवू’, अशी धमकी त्यांनी या व्हिडिओत दिली आहे. त्यानंतर त्यांनी कुर्दिश जवानाला गळा चिरून ठार केल्याचंही व्हिडिओत दिसतंय.
या व्हिडिओत आयसिसनं फ्रान्स आणि बेल्जियमलाही धमकी दिली आहे. आम्ही कार बॉम्ब घेऊन येऊ आणि तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकू, असा इशारा त्यांनी दिलाय. जितक्या वेळा तुम्ही आमच्यावर क्षेपणास्त्र हल्ला कराल, आम्ही तुमच्या जवानांचा शिरच्छेद करू, अशी धमकी त्यांनी कुर्दिश लष्करालाही दिली आहे.
गेल्या वर्षभरात इस्लामिक स्टेट इन इराक अँड सीरिया (आयएसआयएस) या दहशतवादी संघटनेनं, जगातील सगळ्यात क्रूर दहशतवादी संघटना अशीच स्वतःची ओळख निर्माण केली आहे. या संघटनेचा खात्मा करण्याचा निर्धार मध्यंतरी बराक ओबामा यांनी केला होता. त्यानंतर आता आयसिसनं थेट त्यांच्याशीच पंगा घेतल्यानं येत्या काळात आयसिस विरुद्ध अमेरिका यांच्यातील घमासान पाहायला मिळू शकतं.
0
पर्यावरण मंजुरीमुळे अडलेल्या खाणी सुरु करण्यासाठी प्रयत्न – ना.प्रविण पोटे

यवतमाळ,दि. २९ : यवतमाळ जिल्ह्यात विविध प्रकारची खनिजे आहेत. वणी परिसरातील या खनिजांच्या उत्पन्नातुन शासनासही चांगला महसूल उपलब्ध होतो. परंतु पर्यावरण मंजुरीमुळे लाईमस्टोन व डोलामाईन या खनिजांच्या काही खाणी बंद पडल्या आहे. यामुळे शासनाच्या महसूलाचे नुकसान होत आहे. त्यामुळेच या खाणींना तातडीने पर्यावरण मंजुरी उपलब्ध करून त्या सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे उद्योग, खनिकर्म, पर्यावरण आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री प्रविण पोटे पाटील यांनी सांगितले. पोटे यांनी विश्राम भवन येथे जिल्ह्यातील उद्योग, पर्यावरण विभागामुळे अडलेले उद्योग तसेच जिल्ह्यातील बांधकाम विभागाचा सविस्तर आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला आ.राजू नजरधने, बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.बनगीनवार, राजू डांगे, बांधकाम, उद्योग व पर्यावरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पोटे यांनी वणी परिसरातील कोळसा व अन्य खनिजांच्या खाणींची माहिती घेतली. या खनिजांमधून शासनास चांगले उत्पन्न प्राप्त होते. पर्यावरण विभागाच्या मंजूरीमुळे लाईमस्टोन व डोलामाईनच्या 9 खाणी काही दिवसांपासून बंद असल्याचे बैठकीत निदर्शनास आले. बंद खाणींमुळे शासनाचे दरवर्षी 80 कोटी रूपयांचे नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी या खाणींना तातडीने पर्यावरण मंजूरी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. कोळसा वाहतूकीमुळे वणी परिसरातील रस्ते खराब होतात. त्यामुळे जास्त वाईट स्थिती असलेल्या वणी-कायर-मुकुटबन हा 50 किलोमिटरचा रस्ता विशेष बाब म्हणून हाती घेण्यासाठी प्रस्ताव करण्याचा सुचना त्यांनी केल्या. जिल्ह्यातील काही रस्ते बांधा, वापरा व हस्तांतरीत करा (बीओटी) या तत्वावर हाती घेता येईल का? त्याची तपासणी करण्यासोबतच अमरावती-यवतमाळ या मार्गाचाही त्यासाठी अभ्यास करावा, असे त्यांनी सांगितले.अनेक रस्ते वारंवार खराब होतात त्यासाठी कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक आहे. बांधकाम
विभागाने सुध्दा रस्त्यांच्या कामावर चांगले मॉनिटरींग केल्यास रस्ते खराब होण्याचे प्रमाण कमी करता येवू शकते. त्यामुळे बांधकामाधिन रस्त्यांवर लक्ष केंद्रीत करण्याचा सुचना त्यांनी केल्या. यावेळी श्री.पोटे यांनी जिल्ह्यातील खड्डे भरणीचे काम, रस्ते व इमारतीचे कामे, तेरावा वित्त आयोग, जिल्हा नियोजन समिती, योजना व योजनेत्तर कामांच्या बांधकामाचा आढावा घेतला. जिल्हा परिषदअंतर्गत सुरु असलेली कामे शक्यतोवर मार्च अखेरपर्यंत पुर्ण करावे, असे त्यांनी सांगितले.यावेळी जिल्ह्यात आतापर्यंत सुरु झालेले सर्वप्रकारचे उद्योग त्यातुन निर्माण झालेली रोजगार क्षमता व गुंतवणूक तसेच आगामी काळात जिल्ह्यात सुरु होणाऱ्या गुंतवणूकीचा आढावाही श्री.पोटे यांनी घेतला. गेल्या तीन वर्षातील कामे तपासणार असल्याने त्यासाठी बांधकाम विभागाने तयारी करावी, असेही त्यांनी सांगितले
0
महिलेचा खून: आरोपीस जन्मठेप

यवतमाळ, दि. २७ – वणी तालुक्यातील मुर्ती येथील विवाहीत महिलेचा खुन करणाºया आरोपीस जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पांढरकवडा येथील अतिरीक्त सत्र न्यायाधिश यांनी आज मंगळवारी हा निकाल दिला.
प्रकाश गजानन गोहोकार रा. मुर्ती असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याची गावातीलच संगिता विलास बोंडे या महिलेवर वाईट नजर होती. त्यातूनच आरोपी दोन, तीन वर्षापासून सतत त्या महिलेची छेडखानी करीत होता. मात्र महिलेने त्याला प्रतिसाद दिला नाही. अशातच २४ आॅक्टोंबर २०११ रोजी शेतात कापूस वेचण्याकरीता जात होती. दरम्यान येलेकार याच्या शेतातून जाणाºया पांधर रस्त्यावर अडवून महिलेच्या पोटात चाकुने सपासप वार करून खुन केला. याप्रकरणी मृतकचा पती विलास बोंडे यांनी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. तपास अधिकारी ठाणेदार मुकुंद कुळकर्णी यांनी तपास पुर्ण करून प्रकरण अतिरीक्त सत्र न्यायाधिश डोरले यांच्या न्यायालयात न्यायप्रविष्ठ केले होते. यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने ११ साक्षदारांची साक्ष नोंदविण्यात आली. यामध्ये पुरावे व युक्तीवाद ग्राहय धरून आरोपीला जन्मठेप व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता प्र.अ. मानकर यांनी काम पाहिले.
0
पोलिसांच्या हातावर तूरी देऊन आरोपी पसार

यवतमाळ, दि. २७ – खूनातील आरोपी पोलिसांच्या हातावर तूरी देऊन पसार झाल्याची घटना येथील कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय रुग्णालयात घडली. बापुराव दंडाजे (३२) रा. चपराळा (आंध्रप्रदेश) असे पसार झालेल्या आरोपीचे नाव आहे.
आंध्रप्रदेशातील बापूराव दंडाजे याने पाटणबोरी येथील जावायाचा खून केला होता. तेव्हापासून तो कारागृहातच होता. दरम्यान काल २६ जानेवारीला त्याला पोलिसांनी औषधोपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात आणले होते. त्याच्यावर उपचार सुरू असताना, त्याने पोलीस शिपायांची नजर चुकवून हाताची हतकडी खोलून रुग्णालयातून पळ काढला. याबाबत शहर पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.
0
नातवानेच केला आजोबाचा खून

यवतमाळ, दि. २७ – पूर्व वैमनस्यातून चुलत नातवानेच आजोबाचा खून केल्याची घटना डेहणी येथे घडल्याने खळबळ उडाली आहे. लक्ष्मण अगलदरे रा. डेहणी असे मृतकाचे नाव असून, शंकर अगलदरे (३०) असे आरोपी नातवाचे नाव आहे.
पूर्व वैमनस्यातून बालाजी अगलदरे व शंकर अगलदरे यांच्यात नेहमीच खटके उडत होते. बालाजी यांचे वडील लक्ष्मण अगलदरे हे घराबाहेर बसून असताना, शंकर तेथून चालला होता. दरम्यान शंकरची नजर चाुलत आजोबाकडे केली. यावेळी त्याने शिवीगाळ केली. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला व रागाच्या भरात शंकरने लक्ष्मण यांच्या डोक्यावर काठीने वार केले. डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याचे पाहून शंकर घटनास्थळावरून पसार झाला. यावेळी शेजारच्या नागरीकांनी रक्ताच्या थारोळ््यात पडलेल्या लक्ष्मण अगलदरे यांना उपचारार्थ यवतमाळ रुग्णालयात नेले. दरम्यान वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. याबाबत बालाजी अगलदरे यांनी आर्णी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असून, पोलिसांनी शंकरविरुद्घ खूनाचा गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
0
ग्रंथोत्सवानिमित्त जेष्ठ साहित्यिक डॉ.विजया वाड यांचे व्याख्यान

यवतमाळ, दि. २७ : यवतमाळ ग्रंथोत्सवानिमित्त दिनांक 31 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजता जेष्ठ साहित्यिक तथा महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाच्या अध्यक्षा डॉ.विजया वाड यांचे व्याख्यान टॉऊन हॉल, नगर परिषदसमोर यवतमाळ येथे आयोजित करण्यात आले आहे. यावेळी डॉ.वाड यांच्या 101 व्या पुस्तकाचे प्रकाशनही होणार आहे. डॉ.वाड यांची वेगवेगळ्या विषयांवरील 100 पुस्तके आतापर्यंत प्रकाशित झाली आहे. त्यांचे ‘हृदयीच्या गोष्टी’ हे 101 व्या पुस्तक यवतमाळात प्रकाशीत होणार आहे. त्यांच्या पुस्तक प्रकाशनासह त्यांना ऐकण्याची यवतमाळकरांना ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने उपलब्ध होणार आहे. डॉ.वाड यांच्या प्रकाशित साहित्यांमध्ये कादंबरी, कथासंग्रह, बालकादंबरी, बालवाचकांसाठी चरित्र पुस्तके, प्रवासवर्णन, बालकांच्या कथा, बालनाट्ये, बालकविता यांचा समावेश असून त्यांच्या कथांवर चित्रपटही आले आहे. गेल्या काही वर्षापासून त्या राज्य शासनाच्या मराठी विश्वकोश निमिर्त्ती मंडळाच्या अध्यक्ष आहे. मुंबई येथील राजा रामदेव पोदार शाळेतुन त्या प्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाल्या. त्यांच्या साहित्यास राज्य व केंद्र शासनासह विविध नामांकीत संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यात 35 पुरस्कारांचा समावेश आहे. दुरदर्शनच्या ‘शालेय चित्रवाणी’ या कार्यक्रमात टिव्ही टिचर म्हणून 11 वर्ष त्यांनी काम केले असून ‘परागण’ हा मुंबई दुरदर्शनवरील पहिला पाठ घेण्याचा मान त्यांना मिळाला. विश्वकोशाच्या ग्रंथवाचन स्पर्धेच्या कामगिरीबद्दल त्यांना कोलंबो विद्यापिठाने डी.लिट्ने सन्मानित केले आहे. पीएचडीचे सुवर्ण पदक बाम्बे टिचर्स ट्रेनिंग कॉलेजने त्यांना दिले आहे. विश्वकोशाचे 17, 18 व 19 हे तिन खंड अवघ्या पाच वर्षात त्यांनी संपादीत केले. शिवाय 20, 178 पानांची शिडी करून विश्वकोशाचे 1 ते 17 खंड शिडी करून जनतेस उपलब्ध करून दिले. देशासह विविध 14 देशातही त्यांची व्याख्याने झाली आहे. त्यांच्या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रंथोत्सव आयोजन समितीच्यावतीने करण्यात आले आहे.
0
शेतकऱ्यांनो आत्महत्या करू नका शासन तुमच्या पाठीशी – पालकमंत्री संजय राठोड

यवतमाळ, दि. २७ : नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. जिल्ह्यातील अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 11.40 कोटींची मदत वितरीत करण्यात आली. परंतु यापुढे एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असे वचन मला शेतकरी बांधवांकडून हवे आहे. शासन तुमच्या पाठीशी आहे. तुमच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्राधान्याने पुढाकार घेतला जाणार आहे. त्यामुळे आत्महत्या करू नका, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या 65 व्या वर्धापनदिनानिमित्त पोष्टल मैदानावर आयोजित मुख्य ध्वजारोहण समारंभाप्रसंगी पालकमंत्री बोलत होते. यावेळी खा.भावना गवळी, जिल्हा परिषद अध्यक्षा आरती फुफाटे, आ.मदन येरावार, आ.डॅा.अशोक उईके, आ.हरिभाऊ राठोड, आ.ख्वाजा बेग, माजी आमदार नंदीनी पारवेकर, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य वनसंरक्षक श्री.गुरमे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलिस अधिक्षक संजय दराडे, अप्पर पोलिस अधिक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक जे.बी.डाखोरे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले उपस्थित होते. सुरूवातीस पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्यविरांना नमन केले. संपूर्ण जिल्हावाशियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतांना राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शासनाकडून जनतेची जास्तीत जास्त कामे झाली पाहीजे हा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कामास सुरूवात केल्यानंतर अडीअडचणी समजून त्या सोडविण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे ते म्हणाले. जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांना मदत वाटपासाठी जिल्ह्याला 122 कोटी रूपये मिळाले असून त्यापैकी 75 कोटींचे वितरण करण्यात आले आहे. उर्वरीत वितरण सुरू आहे. मदत वाटपातून एकही पात्र शेतकरी सुटणार नाही, अशा सुचना प्रशासनास केल्या आहे. पालकमंत्री पदासोबतच महसूल विभागाचा राज्यमंत्री म्हणून काम करीत असतांना जिल्ह्यासाठी काही नाविन्यपुर्ण केले पाहिजे, या भावनेमुळेच जिल्ह्यातील तलाठी कार्यालयांना निवासस्थानांसह सुसज्ज इमारती,तालुक्यांच्या ठिकाणी प्रशासकीय इमारती, पोलिस ठाण्यांच्या ठिकाणी पोलिस पाटील भवन, तहसिल कार्यालयांमध्ये महिला सुविधा केंद्र व प्रतिक्षालये उभारण्याचा मनोदय केला असून टप्प्याटप्प्याने ही
कामे पुर्ण होणार आहे असे ते सांगितले.
प्रत्येकाला पिण्याचे स्वच्छ पाणी मिळाले पाहिजे ही माझी भूमिका आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी दुषीत पाण्याचे स्त्रोत आहे तेथे तेथे जलशुध्दीकरणाची विशेष सुविधा करता येईल का? यासाठी तपासणी करण्याच्या सुचना केल्या आहे. याबाबतही आम्ही लवकरच तोडगा काढू. जिल्ह्यातील स्मशानभूमींचा सर्वांगिन विकास करण्याचे धोरण आम्ही आखणार आहोत. त्यासाठी
नियोजनबध्द पध्दतीने काम केले जाणार आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर बंजारा तांडे, वाड्या, वस्त्या आहेत. परंतु त्यांना महसूली गावांचा दर्जा नाही त्यांना तो मिळावा म्हणून लवकरच निर्णय घेतला जाणार राज्य सरकारने अतिशय महत्वाकांक्षी अशी जलयुक्त शिवार योजना आणली. या योजनेत समाजातील सर्वच घटकांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्यामुळेच जिल्ह्यातील पतसंस्था, कारखानदार, लघु उद्योजक, शाळा, महाविद्यालयांनी जलयुक्त शिवार योजनेतील किमान 5 गावे दत्तक घेऊन त्या गावांच्या विकासासाठी हातभार लावावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यवतमाळ जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा पुढे नेण्यासाठी यवतमाळातील नाट्यगृह लवकरात लवकर पुर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी विशेष लक्ष घालून ते पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. तुकडेबंदी कायद्यामुळे लहान शेतकऱ्यांना आपल्या जमीनी खरेदी-विक्रीचे व्यवहार करता येत नाही. हे व्यवहार अधिक सुलभ करता यावे म्हणून तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे, असे पालकमंत्री म्हणाले.
0
कार अपघातात सात ठार, ४ जखमी

हैदराबाद – तेलंगणमधील मेबबूबनगरमध्ये दोन कारमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार तर चार जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. मृतांची अद्याप ओळख पटलेली नसून दोन कारपैकी एक कार महाराष्ट्र पासिंगची होती, असे पोलिसांनी सांगितले.
कोमिरेड्डीपल्लीपासून जवळच राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ वर आज सकाळी हा अपघात झाला. महाराष्ट्रातील रजिस्ट्रेशन असलेल्या कारने दुभाजक ओलांडून समोरून येणाऱ्या कारला धडक दिली. या अपघातात जागीच सात जण ठार झाले. अपघाताची माहिती मिळाल्यानंतर वानपर्थीचे पोलीस उपअधिक्षक जोगुला चेन्नया यांनी घटनास्थळी भेट दिली असून अपघातात ठार झालेल्यांपैकी सहा जण महाराष्ट्रातील गाडीतून प्रवास करत होते. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. जे चार जण अपघातात जखमी झाले आहेत त्यांची प्रकृतीही चिंताजनक असून त्यांना जवळच्याच रुग्णायलात दाखल करण्यात आले आहे, असे जोगुला यांनी सांगितले.
0
अमेरिका भारताचा चांगला मित्र बनू शकतो – ओबामा

नवी दिल्ली – तीन दिवसीय भारत दौ-याच्या आजच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी नवी दिल्लीच्या सिरी फोर्ट सभागृहात भाषण केले. नमस्ते, बहुत धन्यवाद या शब्दांनी आपल्या भाषणाची सुरुवात करत ओबामांनी उपस्थित भारतीयांची मने जिंकून घेण्याचा प्रयत्न केला.
जात, धर्म, वर्ण, महिला सशक्तीकरण आणि भारत-अमेरिका संबंध या सर्व मुद्यांवर ओबामांनी आपले विचार मांडले. अमेरिका भारताचा सर्वात चांगला मित्र बून शकतो. भारत-अमेरिका एकत्र आले तर जग अधिक सुरक्षित होईल असे ओबामा म्हणाले. दोन्ही देशांनी दहशतवादाची झळ सोसली असून, दोघांसमोरही आता नवी आव्हाने आहेत.
भारत-अमेरिकेमधील नागरी अणूऊर्जा करारातील अडथळे दूर करुन, आता आपण अंमलबजावणीच्या दिशेने पाऊल टाकले आहे त्यामुळे भारतीयांची वीजेची गरज पूर्ण होऊ शकेल असे ओबामांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आता सुधारणा होणे आवश्यक असून, सुरक्षा परिषदेवर भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व मिळावे यासाठी आपण शिफारस करणार आहोत असे ओबामा यांनी जाहीर करताच सभागृहात टाळयांचा एकच कडकडाट झाला. भारत-अमेरिका वेगवेगळया क्षेत्रात एकत्र काम करु शकतात. भारत-अमेरिका जे आजार रोखता येऊ शकतात अशा लसींची एकत्र निर्मिती करुन, बालमृत्यू रोखण्यामध्ये महत्वपूर्ण काम करु शकतात.
अलीकडच्या काहीवर्षांमध्ये अन्य देशांच्या तुलनेत भारतात सर्वाधिक गरीबी निर्मूलन झाल्याचे ओबामांनी सांगितले. ओबामांनी आपल्या भाषणात स्त्री सबलीकरणावरही जोर दिला. प्रजासत्ताक दिनी भारतीय सैन्य दलातील संचलनाचे महिलांनी जे नेतृत्व केले त्याचे ओबामांनी कौतुक केले. मुला इतकी प्रत्येकी मुलगीदेखील महत्वाची आहे. मुली यशस्वी होतात तेव्हाच देश यशस्वी होतो असे ओबामा म्हणाले.
जात, धर्म, पंथ आणि वर्ण यामध्ये न अडकता मानवतेला महत्व देण्याचा सल्ला त्यांनी दिली. अमेरिकेत माझ्या आयुष्यातही असे काही क्षण आले जिथे आपल्या रंगामुळे वेगळी वागणूक मिळाल्याची आठवण त्यांनी सांगितली. शाहरुख खान, मेरी कोम, मिल्खा सिंग यांचा धर्म, रंग न पाहता त्यांचे यश सर्व भारतीयांनी सारखेपणानेच साजरे करावे असे ओबामा म्हणाले.
0
राष्ट्रपती शौर्य पुरस्कार जाहीर

मुंबई- भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय लष्करातील जवानांसाठी एक अशोक चक्र, तीन किर्ती चक्र आणि नऊ शौर्य चक्र पुरस्कारांना राष्ट्रपतींनी मान्यता दिली आहे. याशिवाय मेजर मुकुंद वरदराजन यांना १५ ऑगस्ट २०१४ रोजी जाहीर करण्यात आलेले अशोक चक्र या यादीत समाविष्ट करण्यात आले असून ते प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सोमवारी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहे.
राजपुताना रायफलचे जवान नाईक नीरज कुमार सिंग (मरणोत्तर) यावेळी अशोक चक्र जाहीर करण्यात आले आहे. तर १५ ऑगस्ट रोजी राजपूत रेजिमेंटचे मेजर मुकुंद वरदराजन जाहीर झालेला अशोक चक्र (मरणोत्तर) यांचाही समावेश यात आहे. तर किर्ती चक्र पुरस्कारात राष्ट्रीय रायफलचे कॅप्टन जयदेव, सुभेदार अजय वर्धन(मरणोत्तर) आणि गोरखा रायफल्सचे नायब सुभेदार कोश बहादूर गुरंग या तिघांचा समावेश आहे.
शौर्य चक्रात पंजाब रेजिमेंटचे लेफ्टनंट कर्नल संकल्प कुमार (मरणोत्तर), चार पॅरा (एसएफ)चे मेजर मुकुल शर्मा, आर अँड ओ फ्लाइटचे इंजिनिअर मेजर अभिजय (मरणोत्तर), राष्ट्रीय रायफल्सचे मेजर आाशुतोष कुमार पांडे, इंजिनिअर मेजर आर वामशी कृष्णन, ५/५ जीआर एफएफचे मेजर बिभांशू धोंडियाल, २० महारचे नाईक स्वरुप कुमार घोराई, बटालियन पॅराशूट रेजिमेंटरचे पॅरादूपर बलविंदर सिंग (मरणोत्तर) आणि जम्मू व काश्मीर रायफल्सचे रायफलमन मंगा राम यांचा यात समावेश आहे.
तर जीवनरक्षा पदकासाठी जितेश काळे, भूषण संखे हे मानकरी ठरले आहेत. धाडसाने दुस-याचा जीव वाचवणा-या व्यक्तींना तीन प्रकारच्या जीवनरक्षा पदक पुरस्कारांनी सन्मानित केले जाते तर पदक, गृहमंत्र्यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र आणि एक रकमी डिमांड ड्राफ्ट असे या पुरस्काराचे स्वरुप असते.
तसेच प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला यंदा भारतीय हवाई दलातल्या ८३ जणांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. सहा एअर मार्शल्सना परम विशिष्ट सेवा पदक, दोन एअर मार्शल्स, चार एअर व्हाईस आणि नऊ एअर कमांडर्सना अति विशिष्ट सेवा पदके जाहीर झाली आहेत.
0
प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस पदक जाहीर

नवी दिल्ली – यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ९६७ जणांना पोलीस पदके जाहीर करण्यात आली आहेत. यापैकी २५ जणांना शौर्यासाठी राष्ट्रपतींच्या हस्ते पोलिस पदक, ९८ जणांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक तर ७१२ जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलीस पदकाने गौरविण्यात येणार आहे.
राज्यातील दिवंगत हवालदार गणपत नेवरु मडवी यांना मरणोत्तर राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक जाहीर झाले आहे. याशिवाय दिवंगत पोलीस नाईक गिरीधर अत्राम, पोलीस अधिक्षक यशवंत काळे, पोलीस उप निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलीस नाईक सदाशिव मढवी, पोलीस नाईक गंगाधर सिडाम, पोलीस हवालदार मुरलीधर वेलाडी, पोलीस उप निरीक्षक अतुल तावडे, पोलीस उप निरिक्षक अंकुश माने, पोलीस नाईक विनोद हिचामी, पोलीस हवालदार दिवंगत सुनील मडवी, पोलीस नाईक इंदरशाह सडमेरु, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र कुमार तिवारी, पोलीस उप निरीक्षक अविनाश गडख, पोलीस हवालदार रमेश येडे, पोलीस नाईक वामन पारधी, पोलीस नाईक राधेश्याम गटे, पोलीस नाईक उमेश इंगळे, पोलीस अधिक्षक मोहम्मद, सुवेझ हक यांना पोलीस शौर्य पदक जाहीर करण्यांत आले आहे. याव्यतिरिक्त उर्वरित दोन प्रकारच्या पुरस्कारांमध्येही महाराष्ट्रांतील अनेकांचा समावेश आहे.
जीवनरक्षा पदक पुरस्कार-२०१४ जाहीर
२०१४ या वर्षातील ‘जीवन रक्षक पदक’ पुरस्कारांकरिता राष्ट्रपतींनी ५६ व्यक्तींच्या नावाला मंजूरी दिली. सर्वोत्तम जीवन रक्षा पदकासाठी चार जणांची, उत्तम जीवनरक्षा पदकासाठी १७ जणांची आणि जीवनरक्षा पदकासाठी ३५ जणांची निवड झाली आहे.
यापैकी २७ जणांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात उत्तम जीवनरक्षा पदकात महाराष्ट्रातील शशिकांत पवार आणि गणेश अहिरराव यांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झाला आहे.
0
भारत-अमेरिका मैत्री जगाच्या हिताची – बराक ओबामा

नवी दिल्ली- भारत-अमेरिका परस्पर सहकार्य कायम ठेवणार असून भारत-अमेरिका मैत्री ही जगाच्या हिताची आहे. भारत-अमेरिका संबंध नव्या उंचीवर नेऊ, असे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ओबामा यांनी हैदराबाद हाऊस येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी अजमेर, विशाखापट्टणम व अलाहाबाद या तीन शहरांचा विकास आम्ही करू. ही तिन्ही शहरे स्मार्ट बनवू, असे आश्वासन ओबामा यांनी दिले आहे. मोदींचे मॅडिसन स्क्वेअर येथे बॉलिवूड स्टारप्रमाणे स्वागत करण्यात आल्याची आठवणही त्यांनी सांगितली. त्याबद्दल त्यांनी मोदींचे कौतुक केले.
ओबामा यांनी हिंदीतून ‘नमस्ते‘ असे म्हणत आपल्या संवादाला सुरुवात केली. ‘भारतवासीयों को मेरा प्यार भरा नमस्कार‘ असेही हिंदीतून बोलत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
यावेळी दहशतवादाविरोधात लढण्याबाबत दोन्ही देशांमध्ये एकमत झाल्याचे मोदी यांनी सांगितले. या शतकाच्या वाटचालीला एका व्यक्तिमत्वाप्रमाणे आकार देण्यासाठी भारत-अमेरिका संबंध महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.
भारत-अमेरिका अणुकरारातील दोन महत्त्वाचे अडसर दूर
भारत आणि अमेरिका यांच्यामधील महत्त्वाकांक्षी अणुकरारातील दोन मुद्द्यांवर सहमती झाल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी सांगितले. तसेच अमेरिका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात सहकार्य करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यासोबतच दहशतवादाशी दोन हात करताना कोणतीही तडजोड होणार नाही, असेही बराक ओबामा आणि नरेंद्र मोदी म्हणाले. भारताला संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळावे यासाठी आम्ही पाठिंबा देऊ असे आश्वासनही त्यांनी दिले.
संयुक्त पत्रकार परिषदेत संबोधन करण्याआधी दुपारी मोदी आणि ओबामा यांच्यात २० मिनिटे चर्चा झाली. यावेळी मोदींनी स्वत: ओबामांसाठी चहा तयार केला. त्यानंतर ‘थँक्यू फॉर द चाय पे चर्चा’ असा उल्लेख ओबामा यांनी आपल्या संबोधनात केला.
ओबामांचे आभार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे तीन दिवसाच्या भारत दौ-यावर असून रविवारी दुपारी हैद्राबाद हाऊसमध्ये ओबामा आणि मोदी यांच्यात सुमारे दीड ते दोन तास चर्चा झाली. या चर्चेनंतर ओबामा आणि मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मोदींनी व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून भारत दौ-यावर आल्याबद्दल ओबामांचे आभार मानले. दोन्ही देशांमधील नैसर्गिक संबंध असून संरक्षण, उत्पादन या क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करतील असे मोदींनी सांगितले. दहशतवादाविरोधात लढण्यात दोन्ही देशांमध्ये एकमत असल्याचा पुनरुच्चार मोदींनी केला. तर ओबामा यांनीही भारतीयांच्या आदरातिथ्यामुळे भारावून गेल्याचे सांगितले.
हिंदीचा शब्दांचा वापर
नमस्ते, नमस्कार, भारतवासीयों को मेरा प्यार भरा नमस्कार.. असे सांगत ओबामा यांनी भाषणाची सुरुवात केली. ‘चाय पे चर्चा’ या हिंदी शब्दाचा वापर करुन त्यांनी भारतीयांवर स्वतःची छाप पाडण्याचा प्रयत्न केला.
0
चिंतामणी दहिहांडीसाठी लाखो भाविकांची गर्दी

कळंब, दि. २५ – विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाºया श्री चिंतामणी जन्मोत्सवानिमित्त २१ जानेवारीपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आज रविवारी आयोजीत दंहिहांडी कार्यक्रमासाठी लाखो भक्तांनी गर्दी करून दर्शन घेतले.
श्री चिंतामणी उत्सवानिमित्त शहरातून मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर दहिहांडी शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये १०० च्यावर भजनी मंडळ व दिंड्यासह लाखो भक्तांनी सहभाग घेतला होता. यामध्ये ज्ञानेश्वर भजनी मंडळ कोठा, मुंगसाजी भजनी मंउळ कळंब, शारदा भजनी मंडळ कळंब, चिंतामणी महिला भजनी मंडळ, गाडगेबाबा महीला भजनी मंडळ, मोरया भजनी मंडळ, तपेश्वर भजनी मंडळ, गुरुदेव दत्तात्र्य भजनी मंडळ, गुरुदेव भजनी मंडळ, भगतसिंग भजनी मंडळ, राणी लक्ष्मी भजनी मंडळ, जयगुरू भजनी मंडळ, गजानन महाराज भजनी मंडळ, मंगलमुर्ती भजी मंडळ, स्वामी समर्थ भजनी मंडळ याच्या अन्य मंडळाचा समावेश होता. त्याच प्रमाणे जिल्हा परिषद बेसिक शाळा, जिल्हा परिषद कन्या शाळा, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिवशक्ती कन्या हायस्कुल, कनिष्ठ महाविद्यालय, गणेश विद्यानिकेतन, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोरी महाल व राजुरा येथील विद्यार्थी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. या शोभायात्रेला चिंतामणी मंदिरापासून सुरूवात करण्यात आली. शहरातील इंदिरा चौक, राममंदिर, पोलीस स्टेशन, गांधी चौक, नेहरु चौक, तथागत नगर, गाडगेबाबा पुतळा मैदान आदि मार्गाने शोभायात्रेने मार्गक्रम केले. यावेळी तरुणांनी चौकाचौकात पिण्याचे पाणी व शरबतची व्यवस्था केली होती. यावेळी अनुचित घटना घडू नये म्हणून पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
0
पुसदमध्ये आगीत सहा घरे जळून खाक

पुसद , दि. २५ – शहरात दोन वेगवेगळ््या लागलेल्या आगीत सहा घरांची राखरांगोळी झाली. ही घटना काल दुपारी व रात्री दरम्यान घडली. शॉर्ट शर्कीटमुळे आग लागल्याचे सांगिल्या जात असून, सहा परिवार बेघर झाले आहे. आगीच्या तांडवात लाखो रुपयाचे नुकसान झाले.
घर जळून खाक झालेल्यांमध्ये पुंजाजी मोहकर (४५), छगन मोहकर (४५), बबन रामजी आढाव(४५),प्रभू रामजी आढाव, संतोष आढाव (३६),काळूराम मोहकर(५०), नासीर बेग (३५) यांचा समावेश आहे. शनिवारी दुपारी १२ वाजता दरम्यान दुबई परिसरात वीज प्रवाहातील दाबामुळे अचानक वायर, लाईट, टीव्हीमधून धूर निघायला लागता. बघता-बघता आग लागली. यात इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नुकसान झाले. जवळपास दहा घरात हा प्रकार घडला. तर रात्री १२ वाजताच्या सुमारास वसंतनगर भागातील बेंडकी परिसरात अचानक धूर निघताना दिसला. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेण्यापूर्वी सहा घरांनी पेट घेतला होता. शहरात तणावपूर्ण शांतता असल्याने विविध चर्चेला उधाण आले होते. मात्र ही आग शॉर्ट शर्कीटने लागल्याचे स्पष्ट झाले. रात्री आग लागलेल्या घरातील सदस्य बाहेरगावी गेले होते. सर्व घरे लाकडी पाट्यांची असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. परिसरातील नागरिकांनी घराघरातून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या पथकाला आगीची माहिती मिळाल्यानंतर ते उशीराच दाखल झाले. त्यातली बंब अर्धाच भरला असल्याने नागरिकांनी रोष व्यक्त केला.
0
विविध अपघातात तीन ठार

यवतमाळ दि. २५ – जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाल्याच्या घटना आज रविवारी घडल्या.
शेतकरी ठार
बोरी (अरब) – भरधाव वाहनाने धडक दिल्याने कामनदेव येथील शेतकरी जागीच ठार झाल्याची घटना आज रविवारी रात्री ७ वाजता यवतमाळ रोडवर गावालगत घडली.
किसन पवार (६०) रा. कामनदेव असे मृतकाचे नाव आहे. आज सायंकाळी ते शेतात जात होते. अशातच समोरून आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने पवार हे रक्ताच्या थारोळ््यात रस्त्यावर कोसळले. यावेळी चालकाने वाहनासह तेथून पोबारा केला. घटनेनंतर अर्धा तास तेथेच पडून राहील्याने पवार यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच लाडखेड पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
इसम जागीच ठार
उमरखेड – महागाववरून उमरखेडकडे जात असलेल्या भरधाव ट्रकने धडक दिल्याने इसम जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी १० वाजता घडली. किसन रामसिंग पवार (५८) रा. चिल्ली असे मृतकाचे नाव आहे. महागाव वरून उमरखेडकडे जाणाºया एम.एच. ३१/ सी कयु २४२९ क्रमांकाच्या ट्रकने चिल्ली या गावाजवळ पवार यांना जोरदार धडक दिली. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी इंदल चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी ट्रक चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
अज्ञात वाहनाने एकाचा मृत्यू
यवतमाळ – अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार झाल्याची घटना दारव्ह्यानजीक घडली. गजानन वाघमारे रा. कुपटा असे मृताकचे नाव आहे. गजानन दुचाकीने जात असताना, समोरून येणाºया भरधाव वाहनाने त्याला धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या गजाननला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून, याबाबत रमेश वाघमारे यांनी दारव्हा पोलीस स्टेशनला तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी चालकाविरुद्घ गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
0
आॅटो उलटून मुलगा ठार, सात जखमी

नेर दि. २५, – देवदर्शनासाठी जाणारा आॅटो उलटून एक मुलगा ठार तर सात जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी १० वाजता पिंप्री मुखत्यारपूर येथे घडली.
सुरज घनशाम राठोड (६) रा. ब्राम्हणवाडा (पूर्व) असे मृतकाचे नाव आहे. तर धु्रपदा भगवान राठोड (६०), सचिन हरिहर चरडे (१८), विठ्ठल कोल्हे (४५), आॅटो चालक घनशाम राठोड (४५) , पार्वता राठोड, प्रज्वल मडावी, सायली राठोड आदि सात जण जखमी झाले असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. ब्राम्हणवाडा पूर्व येथुन आज २५ जानेवारी रोजी अमरावती जिल्ह्यातील भिलटेक येथे ते देवदर्शनासाठी आॅटोने (एम.एच. २९ / व्ही ८२९८) जात होते. अशातच पिंप्री मुखत्यारपूर चालकाने नियंत्रण सुटल्याने आॅटो उलटला. यामध्ये सदर मुलगा ठार झाला तर उर्वरीत सात जण जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी आॅटो चालकाविरूद्घ गुन्हा दाखल केला असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.
0
मूकबधीर मुलीवर बलात्कार; तीन अटक

नांदेड – तीन सेवक आणि विद्यार्थ्यांकडून सतत होत असलेल्या बलात्काराच्या प्रकाराला कंटाळून मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला. यामुळे सामुहिक बलात्काराचे गूढ उकलले आहे. याप्रकरणी बिलोली तालुक्यातील नरसी येथील निवासी मूकबधीर विद्यालयाच्या तीन सेवकांना पोलिसांनी अटक केली.
अल्पवयीन मूकबधीर मुलीला वडील नसल्याने व तिची आईच मोलमजुरी करून तिच्या शिक्षणाचा खर्च चालवत असते. गेल्या दोन वर्षांपासून या शाळेत शिकणाऱ्या या मतीमंद मुलीसोबत काही मुलांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. हा प्रकार शाळेतील तीन सेवकांच्या लक्षात येताच त्यानी संस्थाचालक किंवा मुख्याध्यापकाकडे तक्रार न करता त्यांनी ही या मुलीशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले. मकर संक्रातीच्या सणाला ही मुलगी आईकडे नरसी येथे आली असताना भेदरलेली दिसत होती. कोणालाही काहीही न बोलता तिने १८ जानेवारी रोजी तिने अंगावर रॉकेल ओतून घेतले व काडी लावणार इतक्यात, तिच्या धाकट्या बहिणीने तिच्या जवळील काडीपेटी हिसकावून घेतली. हा प्रकार का करीत आहेस अशी विचारणा केल्यानंतर तिने खाणाखुणाच्या भाषेत झालेल्या सामूहिक अत्याचाराचा पाढा वाचला. त्यानंतर या मुलीच्या आईने या मुलीच्या काकाला बोलावून हा घृणास्पद प्रकार कथन केला. तेंव्हा मुलीच्या काकाने मुकबधीर विद्यालयच्या मुख्याध्यापकास हा प्रकार सांगितला. मुख्यध्यापकांनी तीनही सेवकांना पाठीशी घालत संस्थेची बदनामी होईल म्हणून पालकांना गप्प राहण्याचा सल्ला दिला. त्यानंतर मुलीचे काका,आईने रामतीर्थ पोलिस ठाणे गाठले. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून देवीदास शंकर चिखले, मुजीब बाबूमिया शहजोर आणि चंद्रभान संभाजी भरणे यांना अटक करण्यात आली. बाकी सर्व आरोपी १२ ते १४ वयोगटातील आहेत.









