
जिल्हाधिकारी कार्यालयात शिव जयंती साजरी
यवतमाळ, दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य प्रत्येकाने प्रेरणा घ्यावे, असे आहे. त्यांच्या कार्याची आठवण सर्वांनाच व्हावी तसेच यवतमाळकर जनतेची असलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी लवकरच महाराजांचा आश्वारूढ पुतळा यवतमाळात साकारणार असल्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र निफाडकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री.कडू, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मोहन जोशी, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते, सहाय्यक जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी श्री.कर्णेवार, सरकारी कामगार अधिकारी राजू गुल्हाणे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी महाराजांचे कार्य फार महान आहे. दैनंदीन पुजनीय असे व्यक्तीमत्व असलेले शिवाजी महाराज प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याची आणि शौर्याची आठवण प्रत्येकास व्हावी म्हणून शासन समुद्रात त्यांचा भव्य असा पुतळा उभारत आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे पालकमंत्री म्हणाले. यवतमाळातही महाराजांचा आश्वारूढ पुतळा असावा, अशी प्रत्येक यवतमाळकरवाशियांची इच्छा आहे. ही इच्छा लवकरच पुर्ण करू आणि महाराजांचा भव्य पुतळा उभारू असे पालकमंत्री यावेळी बोलतांना म्हणाले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांचेही भाषण झाले. त्यांनी महाराजांच्या जीवन कार्यावर यावेळी प्रकाश टाकला. सुरूवातीस पालकमंत्र्यांसह सर्व मान्यवरांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. कार्यक्रमाचे संचलन व आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मिनल जगताप यांनी केले.
Archive for February, 2015
0
यवतमाळात लवकरच शिवाजी महाराजांचा आश्वारूढ पुतळा – पालकमंत्री राठोड
0
शेतकºयाची आत्महत्या

नेर दि. १९ – तालुक्यातील अकोला मुंकीदपूर येथील शेतकºयाने स्वत:च्या घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज घडली. मारोती भीमराव रंगारी (४५) असे मृतकाचे नाव आहे. रंगारी यांच्याकडे तीन एकर शेती असून यावर्षी नापिकी झाली. त्यामुळे बँक व सावकाराचे कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत सदर शेतकरी राहात होता. दरम्यान, आज घरी कोणी नसताना त्यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे.
0
वृद्घाला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार ठार
माहूर, दि. १९ – वृद्घाला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास उपविभागीय कार्यालयासमोर घडली. संजय फकीरा वंजारे (३५) रा. आष्टा असे मृतकाचे नाव आहे. ते एम. एच. २६ एस-४३५२ क्रमांकाच्या दुचाकीने माहूरकडे येत असताना, उपविभागीय कार्यालयानजीक त्यांच्या दुचाकीसमोर देवराव महादू तायडे (६८) रा. मालवाडा हा इसम आला. यावेळी त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकी दुभाजकावर आदळली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या वंजारे यांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून, वृद्घ किरकोळ जखमी झाला आहे. याबाबत माहूर पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविण्यात आली असून, अधिक तपास पोलीस करीत आहे.
0
शिवजयंती शोभायात्रेने वेधले नागरिकांचे लक्ष

यवतमाळ , दि. १९ – छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज गुरुवारी मोठ्या दिमाखदारपणे जिल्ह्यात साजरी करण्यात आली. १५ ते २० संघटना मिळून स्थापित झालेल्या छत्रपती महोत्सव समितीने आज काढलेल्या शोभायात्रेने अवघे शहर शिवमय झाले होते. माँजिजाऊ छत्रपती शिवराय व मावळ््यांची वेशभूषा परिधान केलेल्या बाल कलाकारांनी नगरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. ‘मी मावळा शिवरायांचा’असे स्फूरणच प्रत्येक शिवप्रेमींच्या चेहºयावर चढल्याचे दृश्य या शोभायात्रेत उमटले होते.
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेप्रमाणे होणारी जयंती आज गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद, सर्व शाखेय कुणबी समाज संघटना, शिवाजी विद्यालय, वेदधारिणी महाविद्यालय आदी संघटनांनी शिवजयंती उत्सवाची तयारी गेल्या महिन्याभरापासूनच प्रारंभ केली होती. १६ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात शिवचरित्रावर व्याख्यानमाला, शिव मॅरेथॉन स्पर्धा, कराटे स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आदी कार्यक्रमांचे आयोजन केले होते. आज दुपारी शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या आझाद मैदानातून भव्य शोभायात्रेचा प्रारंभ झाला. वेदधारणी विद्यालय, अण्णासाहेब पारवेकर विद्यालय, डॉ. पंजाबराव देशमुख विद्यापीठ अकोला व वसंतराव नाईक विद्यालय, राष्टÑमाता जिजाऊ संस्था लोहारा, मधुबन नगरी, शिवाजी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान व व्यावसायिक अभ्यासक्रम महाविद्यालयांनी झांकी सादर केल्या. माँ जिजाऊ, छत्रपती शिवराय व मावळ््यांच्या रूबाबदार वेशात असलेल्या बाल कलाकारांनी नगरवासीयांचे लक्ष वेधून घेतले. ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत ‘जय जिजाऊ जय शिवराय’ अशा घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते. शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करीत या शोभायात्रेचा समारोप हनुमान व्यायाम शाळेजवळ झाला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राहुल ठाकरे, डॉ. दिलीप महाले आदी मोठ्या संख्येत शिवप्रेमी शोभायात्रेत सहभागी झाले होते.
0
बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ लोणावळ्यात रास्ता रोको
पुणे- लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टमध्ये चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या केल्याच्या निषेधार्थ लोणावळाकरांनी बुधवारी सकाळपासून कडकडीत बंद पाळला. रस्त्यावर उतरलेल्या संतप्त जमावाने कुमार रिसॉर्टवर दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला होता. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यामध्ये चार ते पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेच्या निषेधार्थ सकाळपासूनच लोणावळ्यात कडकडीत बंद बरोबरच रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले.
तीन दिवसांपूर्वी एका लग्न समारंभातून बेपत्ता झालेल्या आयेशा छगन जैन या सात वर्षीय चिमुरडीचा मृतदेह मंगळवारी दुपारी लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टच्या टेरेसवर सापडला. तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली होती. वैद्यकीय अहवालात तिच्यावर बलात्कार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
आयेशा जैन ही दोन दिवसांपूर्वी आपल्या कुटुंबासमवेत इंदापूरहून लोणावळ्यामध्ये एका लग्नासाठी आली होती. लोणावळ्यातील कुमार रिसॉर्टमध्ये लग्न समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान समारंभातून आयेशा अचानक गायब झाली. तिचा शोध घेतल्यानंतर ती सापडली नाही.
यामुळे सोमवारी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. दरम्यान मंगळवारी दुपारी कुमार रिसॉर्टच्या टेरेसवर आयेशाचा मृतदेह गळा चिरलेल्या अवस्थेमध्ये आढळून आला.
या घटनेच्या निषेधार्थ करण्यात आलेल्या आंदोलनामध्ये महिला व मुली मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, रिसॉर्टमधील संशियितांची पोलिसांनी कसून चौकशी सुरू केली आहे. या चिमुरडीच्या हत्येचा लोणावळा शहरामधून तीव्र निषेध करण्यात आला आहे. निषेधार्थ शहरात सर्वत्र शंभर टक्के बंद पाळण्यात आला. शाळा, कॉलेज, दुकाने, बाजारापेठा बंद ठेवण्यात आल्या.
लोणावळा पोलिसांचा निषेध करण्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावर कुमार रिसोर्ट चौकात सकाळी दहा वाजतापासून नागरिक जमा झाले होते. लोणावळा शहरवासीयांसोबत मावळ, खोपोली परिसरातील नागरिकही हजारोंच्या संख्येने लोणावळ्यात आले होते. संतप्त नागरिकांनी कुमार रिसॉर्टवर दगडफेक, तोडफोड करून रिसॉर्ट प्रशासनाचा निषेध केला. संतप्त जमावामुळे निषेध आंदोलनाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीचार्ज केला. यामध्ये चार ते पाच जण जखमी झाले आहेत.
तर अन्य काही महिला, मुलींनी शहरात मूक मोर्चा काढला. या आंदोलनात सर्वपक्षीय राजकीय पदाधिकारी, कार्यकत्रे, विविध संघटना आणि नागरिक सहभागी झाले होते.
0
सात वर्षाच्या मुलीची हत्या, लोणावळ्यात कडकडीत बंद

- लोणावळा, दि. १८ – लोणावळा येथील कुमार रिसॉर्टमध्ये सात वर्षीय चिमुरडीची हत्या केल्याची घटना समोर आली असून वैद्यकीय चाचणीत चिमुरडीची हत्या करण्यापूर्वी तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. या घटनेविरोधात लोणावळ्यात आज कडकडीत बंद पाळण्यात आला असून संतप्त जमावाने कुमार रिसॉर्टवर दगडफेक केल्याने तणावपूर्ण वातावरण आहे.
रायगडमधील इंदापूर येथे राहणारे एक कुटुंब रविवारी लोणावळा येथील कुमार रिसॉर्टमध्ये एका विवाह सोहळ्यासाठी आले होते. लग्न समारंभ पार पडल्यानंतर त्यांची सात वर्षांची मुलगी आयशा ही बेपत्ता असल्याचे समोर आले. लग्न समारंभ संपल्यावर रात्री साडे आठपर्यंत आयशा तिच्या मैत्रिणीसोबत खेळत असल्याचे तिच्या आईने बघितले होते.
गायब झाल्याच्या दोन दिवसानंतर म्हणजेच मंगळवारी दुपारी आयशाचा मृतदेह कुमार रिसॉर्टच्या टॅरेसवर आढळला. तीक्ष्ण हत्याराने गळा चिरुन तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले होते. या घटनेविरोधात आज लोणावळामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. संतप्त जमावाने जुन्या मुंबई – पुणे महामार्गावर रास्ता रोको केला. तसेच कुमार रिसॉर्टवर दगडफेकही केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी किरकोळ लाठीमार केला.
गर्भवती महिलांना BMC मोफत रक्तपुरवठा सेवा सुरु करणार
मुंबई,महाराष्ट्र न्यूज नेटवर्क,(सतिष राठोड)
बृहन्मुंबई महानगरपालिका लवकरच काही दिवसात गर्भवती महिलांना रक्त पूरविण्याचे अायोजन केले असून,गर्भवती महिलांना यापूर्वी बृहन्मुंबई महानगरपालिका अल्ट्रा सोनोग्राफी,एक्स-रे,ईसीजी व इतर सुविधा मोफत देण्यात येत होत्या,अाता गर्भवती महिलांना प्रसूतिपूर्व व प्रसूति नंतर जन्माला अालेल्या नवजात बालकांना गरज पडल्यास १ महिन्यांपर्यत मोफत रक्त पूरविण्यात येणार अाहे.अनेकदा जन्माला अालेल्या नवजात बालकाला कावीळ सारखे अाजार उद्भवतात.त्यावेळेस नवजात बालकाच्या शरीरातील रक्त काढून,नविन रक्त चढवावा लागतो.अाणि याची अंमल बजावणी म्हणून बीएमसीच्या काही मुख्य रुगणालयात व प्रसूति गृहात उपलब्ध करण्यात येणार अाहे.त्याच बरोबर ही सेवा १०८ (ब्लड काॅल) या क्रमांकावरही उपलब्ध राहणार असून,कदाचित त्यांच्याकडे उपलब्ध नसेल तर खासगी ब्लड बॅंके कडून,सरकारने निर्धारित केलेल्या किमतीत (जननी सुरक्षा योजना) या योजनेअंतर्गत करण्यात येईल.अात्तापर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून गरजू महिलांनाच रक्त पूरवठा करण्यात येत होता,पण अाता नविन सर्कुलर नुसार बीएमसीच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सगळ्या गर्भवती महिलांना मोफत रक्त पुरवठा सेवा देण्यात येईल.
0
ठाणे येथे संत सेवालाल महाराज यांची भव्य मिरवणूक उत्साहात
ठाणे,(प्रतिनिधी)
गोर बंजारा संघर्ष समिती तर्फे दि .१७ फेब्रुवारी रोजी संध्य्काळी ५:३० वा.बंजारा समाजाचे अाराध्य दैवत संत श्री. सेवालाल महाराज यांची २७६ वी जयंती निमित्त शिवाजी मैदान ठाणे येथे पारंपारिक रिती-रिवाजात,बंजारा भाषेतील वेशभुषात व बंजारा बोली भाषेत गाणी म्हणत महिलांनी भाग घेतले.व भव्य मिरवणूक उत्साहात काढण्यात अाली.व त्यानंतर सभा घेण्यात अाली असुन,सभेचे अध्यक्ष अाध्र प्रदेशचे माजी मंत्री मा.अमरसिंह तिलावत हे होते,प्रमुख मान्यवरांचे सत्कारही करण्यात अाले.त्यात समाज सेवक रविराज राठोड यांनी सांगितले कि,समाजाला एकत्रीत करण्यासाठी गोर बंजारा संघर्ष समिती स्थापना करण्यात अाली असून,या समिती मध्ये महाराष्टातूनच नाही,तर पूर्ण देशातून बंजारा समाज प्रेमी जुडलेले अाहेत,व निस्वार्थी पणाने समाज सेवा करत अाहेत,बंजारा समाजातील गोर गरीबांचे मुले शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून समिती मार्फत अार्थिक मदत,वह्या-पुस्तक व सामाजिक कार्य व मार्गदर्शन केले जातात.
त्यानंतर सेवा गृपचे अध्यक्श व समाज सेवक मा.मंगल चव्हाण यांनी अापले मनोगत व्यक्त केले,समाजाला जर प्रगती पथावर घेऊन जायचे असेल तर,त्यासाठी शिक्षणाचे महत्व कळून घ्यावे लागेल.अाणि अंधश्रध्देला समाज बळी पडू नये म्हणून अंधश्रध्देपासून समाज दूर राहीले पाहीजे.तसेच समाज सेवक मिलिंद पवार यांनी देखील अापले मनोगत व्यक्त करतांना बोलले कि, महापुरुषांची जयंती साजरा करणे हे कार्य नसून,त्यांचे विचार अाचरणात अाणावे हेच मोठे कार्य अाहे.हाच बंजारा समाज जो पहीले व्यापारी होता,तोच अाज त्या व्यापारांकडे मजूरी करुन अापली पोटजीविका भागवत अाहे.बंजारा समाजाचे मुले वकिल,डाॅक्टर,इंजिनियर,कठेकेदार नाही होऊ शकत का ? होऊ शकतो ! तर त्यासाठी शिक्षण व अापली विचार सारणी महत्वाची असते.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी मा.अमरसिंह तिलावत (माजी मंत्री अांध्र प्रदेश),कर्नाटकचे माजी अामदार मा.मनोहर नायक-ऐनापूर,हे होते.व प्रमुख उपस्थिती गोर बंजारा संघर्ष समिती,भारत.
समाज सेवक व बंजारा समाजातील बंधु अाणि भगिनींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
0
आबांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

सांगली- महाराष्ट्राला आबा म्हणून परिचित असलेले आणि सर्वसामान्यांचा नेता अशी ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांना मंगळवारी शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. अंजनी येथील हेलिपॅड मैदानावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
दुपारी दोनच्या सुमारास रोहित, स्मिता आणि सुप्रिया या त्यांच्या तीन मुलांनी आर. आर. पाटील यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. आबांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी कार्यकर्ते, नागरीकांची मोठी गर्दी उसळली होती.
आबांच्या अंत्यविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री एकनाथ खडसे, नारायण राणे आदी नेतेमंडळी उपस्थित होती. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेही याप्रसंगी उपस्थित होते. यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. हजारोंचा जनसमुदाय आपल्या लाडक्या नेताला निरोप देण्यासाठी हेलिपॅड मैदानावर लोटला होता. यावेळी सर्वांनाच आपले अश्रू अनावर झाले होते.
मंगळवारी सकाळी आर. आर. पाटील यांचे पार्थिव मुंबईहून तासगाव येथे आणण्यात आले. तासगावमधील बेलवंडी नाक्यापासून अंजनी पर्यंत निघालेल्या अंत्ययात्रेमध्ये हजारो नागरीक सहभागी झाले होते. अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले कार्यकर्ते, नागरीकांना आपले अश्रू अनावर झाले होते.
मागच्या तीन महिन्यांपासून कर्करोगाने ग्रस्त असलेल्या आर. आर. पाटील यांचे सोमवारी दुपारी मुंबईच्या लिलावती रुग्णालयात निधन झाले. ते ५७ वर्षांचे होते. आर. आर. पाटील यांच्या निधनाच्या बातमीने राजकीय क्षेत्रासह सर्वसामान्य जनताही हळहळली. त्यांचे असे अचानक निघून जाणे सर्वांनाच चटका लावून गेले.
आर. आर. पाटील हे सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडलेले लोकप्रिय लोकनेते होते. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी स्वकर्तुत्वावर लोकनेतेपदापर्यंतचा प्रवास केला. गावांमध्ये जनहिताच्या योजना राबवून सांगली जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणावर स्वत:चा एक वेगळा ठसा उमटवला.
0
भारतीय वंशाच्या उद्योजकाची हत्या

न्यूजर्सी – अमेरिकेत भारतीयांवरील हल्ल्यांची मालिका सुरूच असून आता एका तरुण उद्योजकाला लक्ष्य करण्यात आले आहे. भारतीय वंशाचे २८ वर्षीय व्यावसायिक अमित पटेल यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली आहे. या घटनेनंतर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांमध्ये एकच दहशत पसरली आहे.
काही दिवसांपूर्वीच अलबामा येथे सुरेशभाई पटेल या वृद्ध व्यक्तीला पोलिसांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीने हादरलेल्या पटेल यांना अर्धांगवायूचा झटका आला होता. या घटनेत एका पोलीस अधिकाऱ्यावरही निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच काल रविवारी अमित पटेल या व्यावसायिकाची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
न्यूजर्सीमध्ये अमित यांचा वाइन शॉप असून या शॉपमध्ये ते बसले असतानाच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा अमित हे रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले होते. गंभीररीत्या जखमी झालेल्या अमित यांचा रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे अमित यांचे वडिल या हल्ल्यावेळी वाइन शॉपच्या मागील बाजूस असलेल्या ऑफिसमध्ये होते. त्यांनाही काही वेळानंतर हल्ल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या तपासात अमितवर जवळून गोळ्या झाडण्यात आल्याचे स्पष्ट होत असून हा हल्ला दरोड्याच्या उद्देशाने करण्यात आला की अन्य काही कारण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत. सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहे. दरम्यान, अमित यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. त्यांच्या मृत्यूने पटेल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
0
बस दरीत कोसळून १० ठार

धार (मध्य प्रदेश) – इंदूरहून राजस्थानमधील गलियाकोट येथे जात असलेली एका खासगी ट्रॅव्हल कंपनीची बस धार जिल्ह्यात मछलिया घाटी येथे दरीत कोसळली. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. काल (सोमवारी) रात्री झालेल्या या अपघातात १० ठार आणि ४० जण जखमी झाले. जखमींना तातडीने झाबुआ जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त बसमध्ये चालक (ड्रायव्हर) आणि वाहक (कंडक्टर) यांच्यासह ६० जण होते. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
0
मनिष ढाले यांची विदर्भ महासचिव पदावर नियुक्ती

यवतमाळ – लोक जनशक्ती पार्टी या पक्षाची बैठक रामविलास पासवान (केंद्रीय मंत्री अन्न व नागरी पुरवठा) यांच्या उपस्थितीमध्ये नागपूर येथे संपन्न झाली. त्यामध्ये मनिष ढाले यांची विदर्भ महासचिव (युवा) तथा जिल्हा प्रभारी या पदावर नियुक्ती करण्यात आली. या नियुक्तीचे श्रेय खासदार चिराग पासवान, सराफ राष्ट्रीय अध्यक्ष शमीम हवा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लोकजन शक्ती पार्टी व प्रामुख्याने मोहन अनमोलु महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष युवा या सर्वाना देतात.
0
मी रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर आर पाटील.
मी , आर आर …..
नमस्कार .
मी रावसाहेब रामराव पाटील म्हणजेच आर आर पाटील.
लोक मला प्रेमाने आबा म्हणतात. आणि आता तीच माझी ओळख बनलेली आहे.
१६ ऑगस्ट १९५७ साली महाराष्ट्र राज्यातल्या सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यात माझा जन्म झाला. अंजनी हे माझे जन्मगाव. शिक्षण क्षेत्रातल्या मा. प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या शाळेत मी माझ्या लहानपणी श्रमदान करून शिकलो. पुढे सांगलीतल्याच शांतीनिकेतन महाविद्यालामध्ये मी कला शाखेची पदवी घेतली. आणि नंतर मी वकिलीचेही शिक्षण पूर्ण केले.
माझ्या सुरवातीच्या राजकीय जीवनामध्ये मी प्रथम १९७९ ते १९९० पर्यंत सांगली जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. नंतर १९९०, १९९५ ,१९९९ , २००४ आणि २००९ साली मी महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आलो.
महाराष्ट्रामध्ये ग्राम विकास मंत्री म्हणून जे गाडगे महाराज स्वच्छता अभियान मी राबवलं त्यामुळे पवार साहेब आणि महाराष्ट्रातल्या जनतेकडून मला शाबासकी आणि प्रोत्साहन मिळालं.
मी स्व:त बद्दल बोलायला फार संकोची माणूस आहे. या ब्लॉगच्या निमित्ताने मी माझ्याबद्दल जे तुम्हाला सांगतो आहे ते सांगताना सुद्धा मला फार संकोच वाटतो . गृहमंत्री म्हणून कॅबिनेट दर्जाची मोठी जबाबदारी पवार साहेबांनी माझ्यावर दिली. माझ्या परीने मी हे काम निष्ठेने आणि पवार साहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला तो सार्थ करण्याचा मी प्रयत्न केला . त्यात मला किती यश आले हे महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवायचे आहे. त्याबाबत मी या ब्लॉगवर काही बोलू इच्छित नाही.
माझ्या आयुष्यावर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण , महाराष्ट्राचे महान लोकनेते वसंतदादा पाटील आणि माझे आदरणीय नेते आणि प्रेरणास्थान शरदचंद्र पवारसाहेब यांचा खूप मोठा प्रभाव आहे. त्यांनी आखून दिलेल्या वाटेवरून भयमुक्तता आणि विश्वासार्हता या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेत पोलीसांमार्फत निर्माण करण्याचा मी सातत्याने प्रयत्न करतो आहे.
या व्यतिरिक्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या एका जबाबदार कार्यकर्त्याच्या भूमिकेतून मी पक्षाच्या कार्यक्षमतेमध्ये माझी बुद्धी , क्षमता आणि मेहनत या माध्यमातून पक्षाला अधिकाधिक देण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न केलेला आहे. त्यात मला फार यश आले अथवा नाही याबद्दल माझे नेते आणि माझे सहकारीच सांगू शकतील.मला साधेपणा आवडतो. साधी, तळागाळातली माणसे यांच्या सोबत बसून गप्पा मारायला आवडतात, त्यांची सुख-दु:खे जाणून घ्यायला आवडतात. राज्यकर्त्या माणसाला हे खूप आवश्यक आहे असं मला व्यक्तिगतरीत्या वाटतं.
सत्ता, पैसे येतात आणि जातात पण जोडलेली माणसे आणि जीवाभावाचे खरे मित्र, उत्तम शरीरसंपदा हीच माणसाची खरी संपत्ती असते. या गोष्टीवरून आपल्या भोवतीच्या समाजाचा विश्वास उडत चाललेला दिसतो याचे मला खूप वैषम्य वाटते. अश्या वेळी रेड-इंडियन्स लोकांनी अमेरिकन लोकांना उद्देशून म्हणलेली एक म्हण मला नेहमीच आठवते. ती म्हणजे , “जो पर्यंत शेवटचं झाड मरत नाही, शेवटची नदी सुकत नाही आणि शेवटचा मासा जीव टाकत नाही तो पर्यंत या माणसांना कळणार नाही की माणूस पैसे खाऊन जिवंत राहू शकत नाही.”
माझ्याबद्दल याहून अधिक मी लिहू इच्छित नाही. मी जसा आहे तसा आहे त्याला माझा ईलाज नाही. काहींना मी आवडतो काहींना मी आवडत नाही. ज्यांना मी आवडत नाही त्यांच्याबद्दल माझ्या मनात अजिबात द्वेष नाही.माध्यमांनी मला प्रेमाच्या प्रसिद्धीचं जसं शिखर दाखवलं आहे तसच त्यांनी मला निंदेचा तळही दाखवला आहे. त्यामुळे आता मला गैरवाजवी टीका किंवा स्तुती बरोबर ओळखता येऊ लागलेली आहे.या ब्लॉग च्या माध्यमातून जो संवाद मी आपल्याशी साधत राहीन ते शब्द आणि ती वाक्य हे माझ अधिकृत म्हणणं आहे . माझं म्हणजे (आर आर पाटील ) याच . ते जसच्या तसं आपण छापायला माझी काही हरकत नाही.
0
आर.आर. पाटील यांचे निधन

मुंबई – मुंबई- राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचे सोमवारी दुपारी लिलावती रुग्णालयात निधन झाले. ते ५७ वर्षाचे होते.त्यांच्यावर ब्रीच कॅन्डी रुग्णालय, बॉम्बे हॉस्पिटल्समध्ये उपचार करण्यात आले. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मध्यंतरी त्यांची प्रकृती उत्तम होती. त्यांनी चालण्याचा सरावही केला. मात्र, आज त्यांची प्रकृती पुन्हा खालावली.
दरम्यान, प्रकृती खालावल्याचे वृत्त समजताच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ, खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आणि राष्ट्रवादीच्या पदाधिका-यांनी सोमवारी रुग्णालयात धाव घेतली. रुग्णालयाबाहेर राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे.
0
कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला

कोल्हापूर – ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि विचारवंत गोविंद पानसरे यांच्यावर सोमवारी सकाळी अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात गोविंद पानसरे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कोल्हापूरच्या अँस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
सकाळी आठच्या सुमारास गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापुरातील सागरमळा भागातील रहत्या घराजवळ हल्ला झाला. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा नेहमीप्रमाणे शिवाजी विद्यापीठ परिसरातून मॉर्निंग वॉकवरुन परतत असताना, दुचाकीवरुन आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी पानसरे आणि त्यांच्या पत्नींवर गोळया झाडल्या.
हल्लेखोरांनी एकूण तीन गोळया झाडल्या. त्यातील एक गोळी पानसरे यांच्या मानेला लागली. एक गोळी त्यांच्या हाताला चाटून गेली. उमा पानसरे यांनाही एक गोळी लागली मात्र त्यांच्या प्रकृतीला धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
गोविंद पानसरे यांची प्रकृती चिंताजनक असली तरी, स्थिर आहे. दुपारपर्यंत डॉक्टर पानसरे यांच्या प्रकृतीविषयी नेमकी माहिती देऊ शकतात. ज्या ठिकाणी गोळीबार झाला त्या ठिकाणाला पोलिसांनी वेढा घातला असून, पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांनी या भ्याड हल्ल्याचा निषेध केला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टि्वटवरुन या हल्ल्याचा निषेध केला. गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नीवर हल्ल्याची बातमी ऐकून मला धक्का बसला. मी या हल्ल्याचा निषेध करतो. मी कोल्हापूरच्या पोलिस अधीक्षकांशी बोललो असून, आरोपींना पकडण्यासाठी वेगाने तपास करण्याचे निर्देश दिले आहेत.
हल्लेखोरांना पकडण्यासाठी संपूर्ण राज्यभरात नाकाबंदी करण्यात आली असून, तपासासाठी दहा पथके बनवण्यात येणार आहेत. गोविंद पानसरे टोलविरोधी आंदोलनात सक्रीय आहेत. आघाडीवर राहून ते या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याची पध्दती दोन वर्षांपूर्वी अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याशी मिळती-जुळती आहे.
डॉ.नरेंद्र दाभोळकर यांची भररस्त्यात गोळया झाडून निर्घुण हत्या करण्यात आली होती. सकाळच्या समयी डॉ. दाभोळकर यांना एकटयाला गाठून त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळया चालवल्या होत्या. अजूनही या मारेक-यांचा शोध लागलेला नाही.
0
संत सेवालाल महाराज यांचा २७६वा जयंती महोत्सव उत्साहात

कल्याण,(प्रतिनिधी), – बंजारा समाजाचे अाराध्य दैवत संत श्री जगतगुरु संत सेवालाल महाराज यांचा,दर वर्षाप्रमाणे यावर्षीही १५ फेब्रुवारी ला २७६ वा जयंती महोत्सव संपूर्ण भारतभर बंजारा समाजबांधवानी अतिशय अानंदात साजरा केला.
कल्याण शहरातील अंबिवली येथे,राष्ट्रीय बंजारा टायगर्स,कल्याण तालुका या सामाजिक संघटनेच्या वतीने संत सेवालाल महाराज यांचा २७६ वा जयंती महोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात अाला असुन,समाज बांधवांच्या समस्यांचा अाढावा घेण्यात अाला,तसेच समाजातील लोकांना जागृत करण्याचे काम अाजच्या तरुण पिढीने करावा, असे अावाहन समाज सेवक मा.अजय राठोड साहेब व कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे नगर सेवक मा.दशरथजी तरे साहेबांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष दशरथजी तरे, प्रमुख अतिथी समाज सेवक अजय राठोड (जि.प.ठाणे),अशोकभाऊ चव्हाण (प्रदेश सरचिटणीस-रा.बं.टा),संतोषभाऊ चव्हाण(मुंबई प्रदेशाध्यक्ष- रा.बं.टा),मा.सुदामभाऊ चव्हाण(ठाणे जिल्हाध्यक्ष- रा.बं.टा),मा.सतिष राठोड(कल्याण तालुकाध्यक्ष – रा.बं.टा),मा.डाॅ.अविनाश राठोड,डाॅॅ.युवराज राठोड,इ.पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वितेसाठी-रा.बं.टा टिम-अंकुश जाधव,विष्णु नाईक,.तेजराव चव्हाण,वकिल राठोड,अनिल चव्हाण,भास्कर पवार,विकास पवार,इंदल चव्हाण,अंकुश जाधव,श्यामराव राठोड,दिलीप राठोड,विश्वनाथ पवार,अनिल चव्हाण,जगदिश जाधव,सौ.सुनिता चव्हाण,सौ.अनुसया चव्हाण,सुरेखा राठोड इ.कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.
0
सराफा व्यावसायिकाचे ३५ लाख लुटले, नागरिकांच्या सतर्कतेने आरोपीस अटक

यवतमाळ, दि. १५ – हैद्राबाद येथे जाणाºया सराफा व्यावसायिकाची ३५ लाखाची रोकड लुटण्यात आल्याची घटना रात्री १०.३० वाजता दरम्यान पांढरकवडा येथे घडली. ही घटना घडताच नागरिकांनी सतर्कता दाखवित लपून बसलेल्या चोरट्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलीस चोरीच्या घटनांना आळा घालण्यास असमर्थ ठरत असताना नागरिकांच्या सतर्कतेमळे ३५ लाख रुपयाच्या लुटीचा छडा अवघ्या पंधरा मिनिटात लागला. या घटनेची चर्चा दिवसभर पांढरकवडा शहरात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अहेतेशाम अली शाहीद अली (२५) रा. कोहीनूर सोसायटी, यवतमाळ असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. तर त्याचा अन्य साथीदार अमीर खान रा. पांढरकवडा हा फरार आहे. शनिवारी सायंकाळी संजय भीमराव लोहकरे (३४) रा. चमेडीयानगर हा व्यक्ती हैद्राबाद येथे जाण्यासाठी अमरावती-हैद्राबाद बसमध्ये बसला. त्याला ही रक्कम हैद्राबाद येथील मनोकामना ज्वेलर्सला द्यायची होती. बस पांढरकवडा राज्यमार्गावरील एका हॉटेलजवळ जेवन करण्यासाठी रात्री १०.१५ वाजता दरम्यान थांबली. लोहकरे रोकड घेवून हॉटेलकडे जात असताना अज्ञात दोन इसम जवळ आले आणि झटापट करून काळ््या रंगाची बॅग लांबविली. या घटनेमुळे भांबावलेल्या लोहकरे याने आरडाओरड सुरू केली. हा प्रकार मेटाडोर क्रमांक एम.एच. ३१/एम ६५९३ चा चालक बघत होता. बॅग घेवून चोरटे पळत असल्याचे बघून वाहनाने त्यांचा पाठलाग केला. एक चोरटा बाजूच्या घरात लपून असल्याचे लक्षात आले. तोपर्यंत नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते. या घटनेची माहिती पांढरकवडा पोलिसांना देण्यात आली. मात्र पोलीस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच नागरिकांनी एका चोरट्यास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी अहेतेशाम अली याला अटक केल्यानंतर पळून गेलेल्या साथीदाराचे नाव अमीर खान असल्याचे सांगितले. अहेतेशाम अलीकडून पोलिसांनी ३५ लाखाची रोकड जप्त केली. त्यात १००० रुपयाचे तीन व ५०० रुपयाच्या नोटाचे ६४ बंडल असे एकूण ३५ लाख रुपये होते. पांढरकवडा पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलीस अधीक्षक संजय दराडे , स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय पुजलवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.
0
अस्वलाच्या हल्ल्यात मजूर गंभीर जखमी

माहूर (नांदेड), दि. १५ – महाशिवरात्री निमित्त पुजेसाठी गणेरीचे फुल आणण्यासाठी गेलेल्या वृद्ध इसमावर दोन अस्वलानी हल्ला चडविल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. माहूर तालुक्यातील तांदळा शिवरात दुपारी ही घटना घडली.
कान्हु देव्हारे (६०) असे जखमीचे नाव आहे. महाशिवरात्री असल्याने पुजेसाठी गणेरीचे फुले आणण्यासाठी लगतच्या तांदळा शिवारातील शिवमंदिर शेजारी आज दुपारी गेला असता त्याच्यावर अचानक नर, मादी असलेल्या जोडीने हल्ला चढविला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्यांना माहूर ग्रामीण रुग्णालयात आणले तेथे वैद्यकीय अधिकारी नीरज कुंभारे यांनी प्रथम उपचार करून यवतमाळ येथे अधीक उपचारासाठी पाठविण्याचे सांगितले. वनपरिक्षेत्र अधिकारी एस. जी. तरोडे यांनी रुग्णालयात भेट देऊन पुढील उपचारासाठी आर्थिक मदत केली. यावेळी वनपाल एम.एन. देशमुख, वनरक्षक ए. आर. जाधव, एम. बी. राठोड, एस. आर. देशमुख, सेवक सैय्यद रियाजोद्दीन यांची उपस्थिती होती. शेतमजूर पांडुरंग देव्हारे यांची परिस्थिती हलाकीची असल्याने गावातील संतोष अग्रवाल, संजय राठोड, गौतम बिल्लारे, बाळ देव्हारे, विनोद खुपसे, जीवन अग्रवाल, सय्यद इसाक, सय्यद फते महंमद यांनी मदतीचा हात पुढे केला.
0
क्रिकेट सट्टा बाजारावर धाड, अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त

यवतमाळ, दि़१५ – भारत आणि पाकीस्तान क्रिकेट सामन्या दरम्यान यवतमाळ व वणी येथे सुरु असलेल्या क्रिकेट सट्टा बाजारावर धाड टाकून अडीच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आज रविवारी उपविभागीय पोलीस अधिकाºयाच्या पथकाने ही कारवाई केली.
यवतमाळ येथील मारवाडी चौकात विजय सिंघानिया (५४) या इसमाच्या घरी सट्टा बाजार सुरू असल्याची टीप उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या पथकाला मिळाली. त्यावरून दुपारी ३.३० वाजता पथकाने धाड टाकली. एक लॅपटॉप, एलसीडी, पाच मोबाईल व साडेपाच हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
वणी शहरातील एकतानगर परिसरात क्रिकेट सट्टा सुरु असल्याची गोपनिय माहिती ठाणेदार असलम खान यांना मिळताच घटनास्थळी धाड टाकली असता सट्टा घेणाºया चार आरोपींसह १ लाख ५१ हजार ६१० रुपयाचा ऐवज ताब्यात घेतला़आज भारत-पाकिस्तान या दोन देशात क्रिकेटचा सामना सुरु होता़ येथील एकतानगरमध्ये या सामन्यावर सट्टा घेत असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली़ घटनास्थळी धाड टाकली असता अल्ताफ शेख, कैसर गणी, अजहर शेख, संजय बावणे या चौघांना सट्टा घेतांना रंगेहात पकडण्यात आले़ त्यांचेकडून एलईडी टीव्ही, दहा मोबाईल संच, दोन चार्जर, प्लाझा, लाईटींग पॅड, कार्बन कागद, सेटअप बॉक्स असा एकूण १ लाख ५१ हजार ६१० रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला़ ही कारवाई ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली स़पो़नि़दिपक पवार यांच्य्यासह गुन्हेशोध पथाकचे सुधीर पांडे, अरुण ताकतोडे, सय्यद साजीद, नफिस शेख, प्रमोद जुनूनकर, विकास धडसे यांनी केली़















