
यवतमाळ , दि. १५ – भरधाव बसच्या गिअरबॉक्समध्ये बिघाड निर्माण झाल्याने झालेल्या अपघातात ३५ प्रवाशी जखमी झाल्याची घटना आज दुपारी ४.३० वाजता दरम्यान अर्जुना घाट परिसरात घडली. यात रुद्रेश प्रवीण शिंदे, ज्योती प्रवीण शिंदे रा. आर्णी, लक्ष्मण तानबा गोल्हर, तुकाराम सोमला जाधव, शशिकला गोल्हर, जान्हवी गोल्हर, मंदा राजू गायधने रा. लोणी, अंबादास तळपदे, मंगेश डवले रा. पहापळ, प्रमोद खत्रे, वंदना खरतडे रा. आष्टी, लता तिडके रा. मांगलादेवी यांच्यासह अन्य प्रवाशी जखमी झाले.
मोर्शी-माहूर बस क्रमांक एम.एच. ४०/ एन ८९६७ आर्णीकडे जात होती. दरम्यान अर्जुनाघाट परिसरात बसच्या गिअरबॉक्समध्ये बिघाड झाला. यामुळे बसचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व ही बस दहा फूट खड्यात कोसळली. यामुळे बसमधील ३५ प्रवाशी जखमी झाले. जखमींना तत्काळ उपचारासाठी कै. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात चालकाविरुद्घ गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
Archive for February, 2015
0
बस खड्यात कोसळली, ३५ प्रवाशी जखमी
0
विद्यार्थ्याला मारहाण,शेंबाळपिंप्रीत तणाव

यवतमाळ, दि. १५ – जनरल नॉलेजची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याला पाच जणांनी मारहाण केल्याची घटना आज रविवारी शेंबाळपिंप्रीत येथे घडली. या घटनेने गावामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून दंगल नियंत्रण पथकाला पाचारण केले आहे.
संतोष ज्ञानबा कुलापे (२०) असे जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. आज येथील एका संगणक संस्थेकडून जनरल नॉलेजची रविवारी परीक्षा घेण्यात आली. सदर परीक्षा देण्यासाठी गेलेल्या संतोष सोबत हॉल तिकीट देण्याच्या कारणावरून पाच ते सहा जणांनी वाद केला. त्यानंतर मारहाण करून संतोषला गंभीर जखमी केले. त्याच्यावर पुसद येथील रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दंगल नियंत्रण पथक, पुसद शहर व ग्रामीण आणि खंडाळा येथील पोलीस ठाण मांडून बसले आहे. यावेळी पुसद येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली.
0
भारताने मिळवला पाकिस्तानवर ७६ धावांनी विजय

अॅडलेड- विश्वचषकातील सलामीच्या सामन्यात भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर ७६ धावांनी सहज विजय मिळवला. सलग सहाव्यांदा भारताने पाकिस्तानला विश्वचषकात धूळ चारली. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत झालेल्या पाच लढतीत भारताने बाजी मारली होती. धोनी ब्रिगेडने विश्वचषकातील हा इतिहास कायम राखला.
गेल्या काही दिवसांपासून भारतीय संघाच्या कामगिरीबाबत सर्वच स्तरातून चिंता व्यक्त केली जात होती. फलंदाजी ही भारताची जमेची बाजू. मात्र त्यातही गेल्या काही सामन्यांमध्ये सातत्य दिसून येत नव्हते. अशा परिस्थितीत पाकिस्तानला हरवणे तितकेसे सोपे नव्हते. मात्र धोनी आणि सहका-यांनी ही किमया साधली.
शतकवीर विराट कोहली, शिखर धवन आणि सुरेश रैना या त्रिकुटाने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करत भारताला तीनशे धावांचा टप्पा गाठून दिला. विराट कोहलीचे शतक सामन्यातील मोठे वैशिष्ट्य ठरले. विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावणारा विराट हा पहिला भारतीय फलंदाज ठरला. यासोबतच त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील २२ वे शतक पूर्ण केले. त्याने १२६ चेंडूत आठ चौकांराच्या मदतीने १०५ धावा केल्या. त्याला उत्तम साथ लाभली ती शिखर धवन आणि सुरेश रैनाची. त्यांच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर ३०१ धावांचे आव्हान ठेवले. मात्र पाकिस्तानला हे आव्हान पेलवले नाही आणि त्यांचा डाव २२४ धावांत संपुष्टात आला. पाकिस्तानचा कर्णधार मिसबा उल-हकने ७६ धावा करत पाकिस्तानला विजयाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे हे प्रयत्न अपुरे पडले आणि पाकिस्तानचा ७६ धावांनी पराभव झाला. मोहोम्मद शामीने पाकिस्तानच्या चार फलंदाजांना तंबूत धाडत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतीय फलंदाजांनी तो निर्णय सार्थ ठरविला. सराव सामन्यात बांगलादेशविरुद्ध सरस कामगिरी करणारा रोहित शर्मा या सामन्यात चमक दाखवू शकला नाही. तो १५ धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट आणि धवनने खेळपट्टीवर जम बसवत धावांची टांकसाळ उघडली. शिखरने सलामीला फलंदाजी करत ७३ धावांची खेळी केली. त्याने विराटसह १२९ धावांची भागीदारी केली. शिखर बाद झाल्यानंतर विराटने रैनासोबत तिस-या विकेटसाठी ११० धावांची भागीदारी साकारली. ४५ व्या षटकात विराट बाद झाला. त्यानंतर लगेचच रैनाही बाद झाला. हे दोघेही बाद झाल्यानंतर भारताचा डाव एकदम कोसळला. अखेरच्या पाच षटकात भारताने केवळ २७ धावा करत पाच गडी गमावले. पाकिस्तानच्या सोहेलने ५५ धावांत सर्वाधिक पाच बळी घेतले.
0
घर कोसळल्याने १२ जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेश – उत्तर प्रदेशमधील मुघलसराय भागातील दुल्हीपूर वस्तीत रविवारी बांधकाम सुरु असलेले घर कोसळल्याने मोठा अपघात घडला. यामध्ये बारा जण ठार तर दोन जण जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्यास सुरवात केली. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल कऱण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ३० हजार रुपयांची मदत जाहीर कऱण्यात आले असल्याची माहिती जिल्हा मॅजिस्ट्रेट एन.के.सिंग यांनी दिली.
0
संत सेवालाल जयंतीनिमित्त शोभायात्रा व मोटारसायकल रॅली

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते शुभारंभ
यवतमाळ – बंजारा समाजाचे जगतगुरू संत सेवालाल महाराज यांची २७६ वी जयंती आज रविवारी शहरात उत्साहात साजरी झाली. येथील बंजारा टिचर्स असोशिएशन व समाजबांधवांनी स्थानिक आर्णी मार्गावरील राजीवनगरमधून काढलेल्या शोभायात्रेस व मोटाससायकल रॅलीस जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी हिरवी झेंडी दाखवून उद्घाटन केले. यावेळी राजुदास जाधव, प्रा. पी.पी. पवार, शेखर राठोड, महेश राठोड, देवीदास राठोड, डी.एस.चव्हाण, प्रा. राजेश चव्हाण, शंकर आडे, ए.के. राठोड आदी उपस्थित होते.
आर्णी मार्गावरून निघालेल्या या शोभायात्रेत समाजबांधवांसोबत पालकमंत्री संजय राठोड हे स्वत: सहभागी झाले होते. ही रॅली जिल्हा परिषदेजवळ पोहोचल्यानंतर येथे असलेल्या माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यास ना. संजय राठोड यांच्यासह समाजबांधवांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. शोभायात्रेदरम्यान मार्गात असलेल्या सर्व महामानवांच्या पुतळ्यांस व प्रतिमेस माल्यार्पण करून अभिवादन करण्याचा नवीन पायंडा संत सेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त बंजारा समाजबांधवांनी पाडला. शोभायात्रेत स्त्री भ्रुण हत्या, शेतकरी आत्महत्या, व्यसनमुक्ती आदी विषयांवरील देखाव्यासंह बंजारा वेशभूषेतील चिमुरडे लक्षवेधी ठरले. जयंती उत्सवानिमित्त राजीव नगरमध्ये दिवसभर विविध कार्यक्रमांसह सायंकाळी महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले. संत सेवालाल जयंती उत्सवात शेकडो बंजारा समाजबांधव सहभागी झाले होते.
0
प्रियकराच्या घरी प्रेयसीची आत्महत्या , ‘व्हॅलेंटाईन डे’लाच माजलगावात थरार

माजलगाव : ‘तू लग्न करू नकोस, मी तुझ्यासाठी आयुष्यभर साथ देईन’ अशी विनवणी करूनही विवाहास नकार देणार्या प्रियकराच्या घरीच प्रेयसीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना माजलगाव येथील मंगलनाथ कॉलनी परिसरात घडली. या प्रकरणी प्रियकरास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. येथील कृषी कार्यालयातील कर्मचार्याची माजलगाव येथील तहसील कार्यालयातील लिपिक महिलेशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात होऊन प्रशासकीय कामाच्या निमित्ताने दोघेही तहसील कार्यालयात वारंवार भेटत असत. ही महिला विवाहित असून, तिचा पती बुलडाणा येथे नोकरीनिमित्त राहतो. कृषी कार्यालयातील कर्मचारी हा अविवाहित होता. दरम्यान, या महिलेची बदली काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयात झाली; परंतु या प्रेमवीरांच्या वारंवार माजलगाव येथील या तरुणाच्या घरी भेटी होत असत. काही दिवसांपूर्वी या तरुणाचा विवाह जुळल्याची माहिती प्रेयसीला कळाल्याने ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पूर्वसंध्येला (दि. १३) तिने थेट प्रियकराचे घर गाठले. दोघांमध्ये रात्रभर विवाह व प्रेमाबाबत चर्चा झाली. तिने तरुणास विवाह न करण्याची विनवणी केली, जीवनभर साथ देण्याचे वचन दिले; परंतु प्रियकराने स्पष्ट शब्दांत नकार दिल्याने नैराश्यातून प्रेयसीने शनिवारी सकाळी प्रियकराच्याच घरात तो मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर विषारी औषध प्राशन केले. तासाभरानंतर तो घरी परत आल्यानंतर प्रेयसी तोंडातून फेस आलेल्या अवस्थेत निपचित पडलेली दिसून आली. या प्रकरणी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात फोन करून हा प्रकार कळविण्यात आला. पोलिसांनी या तरुणास ताब्यात घेतले असून, महिलेचा मृतदेह
0
वेदना आणि सुंदरतेतून दज्रेदार साहित्याची निर्मिती – अशोक पवार


युवा साहित्य संमेलनाचे थाटात उद््घाटन
वर्धा – जीवनातील वेदना आणि सुंदरता कळली तर दज्रेदार साहित्याची निर्मिती होऊ शकते. त्याकरिता अंत:करणातून वाचन करावे लागते, असे प्रतिपादन बिर्हाडकार अशोक पवार यांनी केले.
यशवंतराव दाते स्मृती संस्था आणि विदर्भ साहित्य संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दोनदिवसीय युवा राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन अनेकांत स्वाध्याय मंदिरात करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून अशोक पवार बोलत होते. संमेलनाचे उद््घाटन संजय भास्कर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. व्यासपीठावर आ. डॉ. पंकज भोयर, विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष वामन तेलंग, डॉ. रवींद्र शोभणे, सरचिटणीस शोभा उबगडे, शाखाध्यक्ष व संमेलनाचे संयोजक संजय इंगळे तिगावकर, यशवंतराव दाते स्मृती संस्थेचे अध्यक्ष प्रदीप दाते, कार्यवाह राजेंद्र मुंढे, सरकार्यवाह डॉ. स्मिता वानखेडे यांची उपस्थिती होती.
बिर्हाडकार अशोक पवार म्हणाले, १९९५ साली परभणीतील अखिल भारतीय मराठी संमेलनातून माझ्या लेखनाची बीजे रोवली गेली. कसदार लेखक होण्यासाठी वैयक्तिक पातळीवर त्याची किंमत मोजावी लागते. अपार मेहनत आणि परिश्रम तसेच वाचनाच्या माध्यमातून कसदार साहित्याची निर्मिती करता येते. त्यासाठी प्रत्येकाने वाचन केले पाहिजे. उपेक्षित साहित्यानेच मराठी साहित्य समृद्ध केले आहे. भारतात कृषी साहित्य पहिल्यांदा प्रेमचंद यांनी लिहिले. महात्मा फुले यांनी शेतकर्यांचा आसूड लिहिले. परंतु वर्तमानात कृषी साहित्याचे लेखन अनुभवातून होत नसून ते शहरात बसून होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
जात, धर्म, पंथाच्या बाहेर जाऊन लेखकाने तटस्थपणे लिखान व विचार केल्यास, वेदनेची जाणीव ठेवून सुंदरतेचा संगम घातल्यास निश्चितच अस्सल साहित्याची निर्मिती होते, असा विश्वास अशोक पवार यांनी व्यक्त केला. प्रत्येक तरुणाने अभ्यासपूर्ण वाचन करावे, असा सल्ला देऊन समाजातील वास्तव चित्र त्यांनी मांडले.
संमेलनाचे उद्घाटक संजय भास्कर जोशी यांनी नेहमीप्रमाणे आपल्या भाषणाची सुरुवात ‘ताल’ने केली. त्यांनी संमेलनात तबल्याचा दादरा ताल यावर विश्लेषण करीत प्रत्येकाने उत्सव, अनुभव, अभ्यास, तटस्थ लेखन, उत्तम वाचन आणि दाद देणे हे सहा ताल नेहमीच लक्षात ठेवल्यास महान साहित्यकृती निर्माण होते, असे सांगून संमेलनाचे उद््घाटन झाल्याचे जाहीर केले. प्रास्ताविक रवींद्र शोभने व प्रदीप दाते यांनी केले. संचालन शुभदा फडणवीस यांनी केले. आभार संजय इंगळे तिगावकर यांनी मानले. संमेलनात प्रसिद्ध लेखक भालचंद्र नेमाडे यांचे ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करण्यात आले. प्रारंभी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला सूतमाला अर्पण करून दीपप्रज्वलनाने संमेलनाची सुरुवात करण्यात आली. आयोजकांच्या वतीने मान्यवरांचे रोपटे, स्मृतिचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले.? वर्धा – राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलनात बोलताना संमेलनाध्यक्ष बिर्हाडकार अशोक पवार. व्यासपीठावर उद्घाटक संजय भास्कर जोशी, आ. डॉ. पंकज भोयर, प्रदीप दाते, संजय इंगळे तिगावकर व इतर मान्यवर. बाजूच्या छायाचित्रात दीपप्रज्वलन करताना संजय भास्कर जोशी.
0
भारत ७ बाद ३००, पाकसमोर ३०१ धावांचे लक्ष्य

अॅडिलेड, दि. १५ – वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात विराट कोहलीचे शतक, रैना व धवन या डावखु-या फलंदाजांच्या अर्धशतकाच्या आधारे भारताने ५० षटकांत सात गडी गमावत ३०० धावांचा पल्ला गाठला. चांगली सुरुवात होऊनही शेवटच्या षटकांमध्ये भारतीय फलंदाजी कोसळल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही.
वर्ल्डकपमध्ये भारताची सलामीची लढत कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणा-या पाकिस्तानसोबत सुरु आहे. नाणेफेक जिंकून कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि रोहित शर्मा ही जोडी सलामीला आली. भारताच्या २४ धावा झाल्या असताना भारताची सलामीची जोडी फोडण्यात पाकच्या गोलंदाजांना यश आले. रोहित शर्मा १५ धावांवर बाद झाला. यानंतर फलंदाजीला आलेल्या विराट कोहलीने संयमी खेळी करत भारताचा डाव पुढे नेला. धवन – कोहली जोडीने मोठे फटके मारण्याऐवजी एकेरी धावा करत भारताचा फलक हलता ठेवला. खेळपट्टीवर स्थिरावताच या दोघांनीही फटकेबाजीला सुरुवात केली. शिखर धवन ७३ धावांवर असताना चोरटी धाव घेण्याच्या नादात बाद झाला. धवन – कोहली जोडीने १२९ धावांची भागीदारी केली. यानंतर विराट कोहलीने रैनाच्या मदतीने भारताला दोनशेचा टप्पा गाठून दिला. कोहलीच्या शतकानंतर सुरेश रैनानेही अर्धशतक ठोकले. कोहली १०८ आणि रैना ७२ धावांवर बाद झाला तेव्हा भारताची स्थिती ४७.३ षटकांत ४ बाद २८४ अशी होती. त्यानंतर पाकिस्तानच्या गोलंदाजांचा अचूक मा-यासमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्कारली. कर्णधार महेंद्रसिंग धोनी १८, रविंद्र जडेजा ३ आणि अजिंक्य रहाणे भोपळा न फोडताच माघारी परतला. लागोपाठ तीन फलंदाज बाद झाल्याने भारताने ५० षटकांत सात गडी गमावत ३०० धावाच केल्या. शेवटच्या पाच षटकांत भारताने फक्त २१ धावा केल्या. पाकिस्तानतर्फे सोहेल खानने १० षटकांत ५५ धावा देऊन ५ विकेट घेतल्या. तर वहाब रियाजने एक विकेट घेतली.
0
रागाच्या भरात इसमाचा खून

मारेगाव (यवतमाळ), दि. १४ – शाब्दीक वाद झाल्याने रागाच्या भरात काठीने मारहाण करून इसमाचा खून करण्यात आला. ही घटना मारेगाव तालुक्यातील देवाळा येथे आज दुपारी १ वाजता दरम्यान घडली. दिलीप जैतू येडमे (४०) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी गोपाळा रामचंद्र बोकडे (५०) यास अटक करण्यात आली.
दिलीप व गोपाळा यांच्यात शाब्दीक वाद निर्माण झाला. त्यामुळे रागाच्या भरात दिलीपच्या डोक्यावर काठीने प्रहार केला. डोक्याला गंभीर इजा झाल्याने घटनास्थळीच दिलीपचा मृत्यू झाला. या घटनेमुळे देवाळात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी गोपाळा यास दोराने बांधून ठेवले. तसेच घटनेची माहिती मारेगाव पोलिसांना देण्यात आली. पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मदने, मंगेश भोयर, श्री. एफ. पाटील, जमादार भांदीकर, चव्हाण, आडे, राठोड , मोहाडे यांनी घटनास्थळ गाठले. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून गोपाळा यास अटक करण्यात आली. मृतकाच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्त परिवार आहे.
0
बॅटºया चोरणारी टोळी जेरबंद , ११ लाखाच्या मुद्देमाल जप्त

वणी, दि़१४ – शहर तथा ग्रामीण भागात विविध कंपन्यांचे मोबाईल टॉवर आहेत़ गत काही दिवसापासून चोरट्यांनी त्या टॉवरमधील बॅटºया चोरीकडे लक्ष केंद्रीत केले होते़ १४ फेब्रुवारीला सकाळी ५ वाजताच्या दरम्यान रसोया फॅक्ट्रीजवळील आयडिया मोबाईल टॉवरच्या जनरेटर रुममधील बॅटºया चोरुन नेत असल्याची बाब गोपनिय माहितीच्या आधारे माहित होताच ११ लाख रुपयाच्या ऐवजासह चार आरोपींना वणी पोलीसांनी अटक करण्यात यश मिळविले आहे़
वणी शहरापासून ३ किमी अंतरावर नांदेपेरा मार्गावर आयडिया मोबाईल कंपनीचे टॉवर आहे़ यातून चोरट्यांनी २४ बॅटºया चोरुन क्रुझर वाहन क्ऱएम़एच़२९ डी़ एऩडी़२३९८ ने जात असल्याचे कंपनीत कामावर असलेल्या सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आले़ त्याने या बाबत वणी पोलीसांना तात्काळ सुचना दिल्या़ उपविभागीय पोलीस अधिकारी सविता तुरेकार व ठाणेदार असलम खान यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे स़पो़नि़ दिपक पवार यांनी आपल्या पथकासह क्रुझर वाहनाचा शोध घेण्यास सुरुवात केली असता सदर वाहन लालगुडा परिसरातून भरधाव वेगाने जात असल्याचे निदर्शनास आले़ त्या वाहनाचा पाठलाग केला असता प्रमोद ज्ञानेश्वर मनोहरे वय (३३), मंगेश विजय डूबे वय (२४), अमोल विजय वानखेडे वय (२३), सोहेल युसूफ सय्यद वय (२४) या चौघांसह २४ नग मोबाईल टॉवरच्या बॅटºया, काळ्या रंगाची इलेक्ट्रीक केबल १५० फुट, लोखंडी कटर, ड्रील, पेंन्चीस पाने संच व वाहनासह ११ लाख २७ हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला़
परिसरातील जिनींग प्रेसिंग मधील महत्वपूर्ण असणाºया रेचाचे ८ नग गिअर बॉक्स, साहित्य व वाहन असा एकूण ३ लाख ३१ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल वणी पोलीसांनी जप्त केला़ दि़१० फेब्रुवारी रोजी सकाळी गस्त करीत असतांना लालगुडा परिसरातून येणाºया पिकअप वाहन क्ऱएम़एच़३० ए़बी़११७१ या वाहनाला थांबविण्याचा प्रयत्न केला असता ते भरधाव वेगाने जत्रा मैदानाकडे पळाल्याने पोलीसांनी पाठलाग केला असता वाहन चालक वाहन सोडून पळून गेला़ पोलीसांनी वाहन जप्त केले असून भंगार चोरट्याचा शोध घेत आहे़ ही कारवाई गुन्हेशोध पथकाचे अरुण नाकतोडे, गोपाल वास्टर, सय्यद साजीद, सुधीर पांडे, विकास घडसे, प्रमोद जूनूनकर, वसंता चव्हान, शेख नफिस, मनोहर पवार, सुरेश राठोड, बाळू गवारकर यांनी सहभाग घेतला होता़
0
पवार व माझा मार्ग वेगळा पण ध्येय एकच – मोदी

बारामती, दि. १४ – शरद पवार आणि मी वेगवेगळी विचारधारा असलेल्या पक्षात असलो तरी देशाचा विकास हेच आमचे ध्येय आहे असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीमध्ये केले आहे. शरद पवार आणि माझ्यात महिन्यातून दोन ते तीन वेळा चर्चा होत असते असे मोदींनी उघड केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बारामती दौ-यावर आले आहेत. शरद पवारांच्या कृषी शाळेतील एका कार्यक्रमात नरेंद्र मोदी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीत बारामतीतील सभेत शरद पवारांवर तिखट शब्दात हल्लाबोल करणा-या नरेंद्र मोदींनी आज शरद पवारांचे कौतुक केले. शरद पवार केंद्रात कृषीमंत्री असताना मी त्यांच्याकडून गुजरात कृषी विकासाविषयी माहिती घ्यायचो, आमच्या कामात काही त्रुटी आहेत हे मी त्यांच्याकडून जाणून घ्यायचो असे मोदींनी सांगितले. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना केंद्र सरकारमध्ये माझी मदत करणारे शरद पवार हे एकमेव मंत्री होते अशी आठवणही त्यांनी याप्रसंगी सांगितली. शरद पवारांकडून खुप काही शिकण्यासारखे आहे असेही त्यांनी सांगितले. वादसंवादातूनच लोकशाही पुढे सरकते, पण दुर्दैवाने दोन विभिन्न पक्षाचे दिग्गज नेते एकत्र आले की ती बातमी ठरते असा टोलाही त्यांनी प्रसारमाध्यमांना लगावला. बारामतीत गती व मती असल्यानेच या शहराचा विकास झाला असे मोदींनी नमूद केले. साखर निर्याती आणि अॅंग्रो टेक्नोलॉजीवर भर देण्याची गरज असून ठिंबक सिंचन सारख्या पद्धतीद्वारे शेतीमध्ये पाण्याची नासाडी टाळून शेतीचा विकासही करता येईल असे मोदींनी स्पष्ट केले. तर राजकारण फक्त दोन दिवसांपुरते करायला हवे, उर्वरित ३६३ दिवस देशाच्या विकासाकडे बघायला हवे असे शरद पवार यांनी सांगितले.
0
अरविंद केजरीवाल यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

नवी दिल्ली -दिल्ली विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवणा-या आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी दिल्लीचे आठवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हजारो दिल्लीकरांच्या साक्षीने त्यांनी दिल्लीची सूत्रे हाती घेतली. नायब राज्यपाल नजीब जंग यांनी केजरीवाल यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली.
केजरीवाल यांच्यासह सहा मंत्र्यांनीही यावेळी शपथ घेतली. आपचे नेते मनीष सिसोदिया, असिम अहमद खान, संदीप कुमार, सत्येंदर जैन, गोपाल राय आणि जितेंदर सिंग तोमर यांनी यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर केजरीवालांनी जनतेला उद्देशून भाषणही केले. लवकरात लवकर जनलोकपाल विधेयक आम्ही आणू. तसेच सर्वप्रथम दिल्ली भ्रष्टाचारमुक्त कशी करता येईल याचा आम्ही प्रयत्न करु असे केजरीवाल म्हणाले. दिल्लीला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्याची वेळ आली आहे असे त्यांनी सांगितले.
बरोबर वर्षभरापूर्वी केजरीवाल यांनी याच दिवशी दिल्ली मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते पुन्हा एकदा दिल्लीच्या तख्तावर विराजमान झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत ७० पैकी ६७ जागा जिंकत ‘आप’ने अभूतपूर्व यश मिळवले. ऐतिहासिक रामलीला मैदानावर हा सोहळा झाला. य़ा सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही निमंत्रित कऱण्यात आले होते. मात्र महाराष्ट्राचा पूर्वनियोजित दौ-यामुळे ते या सोहळ्यास उपस्थित राहू शकले नाही. मोठ्या संख्येने नागरिक यावेळी उपस्थित होते.
मैदानावर तसेच परिसराबाहेर सर्वत्र पोलिसांचा कडेकोड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मैदानात सुरक्षेच्या कारणावरुन नऊ आणि मैदानाच्या बाहेर १० एलईडी स्क्रीन बसवण्यात आले आहेत. तसेच नागरिकांच्या सुरक्षा आणि सुव्यवस्थेसाठी शेकडो सीआईएसएफचे जवान तैनात कऱण्यात आले होते.
0
केजरीवालांचे मंत्रिमंडळ

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणा-या आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल शनिवारी ऐतिहासिक रामलीला मैदानावर दुस-यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
जनलोकपाल विधेयकाच्या मुद्यावरुन अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर बरोबर वर्षभराने केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्याबरोबर आणखी सहा जण मंत्रीपदाची शपथ घेतील.
वित्त, ऊर्जा ही महत्वाची खाती केजरीवाल आपल्याकडे ठेवतील अशी शक्यता आहे. केजरीवाल यांचे विश्वासू मनीष सिसोदीया उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. सार्वजनिक बांधकाम खाते, शहर विकास आणि शिक्षण ही महत्वाची खाती सिसोदीयांकडे येण्याची शक्यता आहे.
जितेंद्र सिंह तोमर – कायदा
संदीप कुमार – महिला आणि बाल कल्याण
मनीष सिसोदीया – सार्वजनिक बांधकाम खाते, शहर विकास आणि शिक्षण
सत्येंद्र जैन – आरोग्य आणि उद्योग
असीम अहमद खान – अन्न
गोपाळ राय – वाहतूक आणि कामगार
0
पेशावरमध्ये दहशतवादी हल्ला, १९ जण ठार

इस्लामाबाद – लष्करी शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी ताज्या असतानाच पेशावर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे. पेशावरमधील शिया मशिदीवर शुक्रवारी काही अज्ञात दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत १९ जण ठार तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत.
पेशावरमधील हयातबाद येथील शिया मशिदीमध्ये नमज पठण सुरु असताना हा हल्ला कऱण्यात आला. यावेळी तीन साखळी स्फोट घडवून आणले तसेच गोळीबारही कऱण्यात आला. यामध्ये १० भाविक ठार झाले तर ५० हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, मशिदीमध्ये अद्याप काही दहशतवादी असून सुरक्षा रक्षक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु असल्याचे वृत्त आहे.
याआधी गेल्या वर्षी १६ डिसेंबर रोजी पेशावरमधील लष्करी शाळेत दहशवातवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सुमारे १५० जण ठार झाले होते. यामध्ये १३६ विद्यार्थ्यांचा समावेश होता.
0
आसाराम बलात्कारप्रकरणातील साक्षीदारावर कोर्टाबाहेर हल्ला

जोधपूर, दि. १३ – एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या आसाराम बापूच्या एका भक्ताने साक्षीदारावर चाकूने हल्ला केल्याची घटना शुक्रवारी जोधपूरमध्ये घडली. या हल्यात साक्षीदार जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
बलात्कार प्रकरणाचा तपास सध्या जोधपूर कोर्टात सुरू आहे. शुक्रवारी सुनावणीनंतर राहुल के सच्चान हा साक्षीदार कोर्टाच्या बाहेर पडताच सत्यनरीन या तरुणाने हातातील चाकूने सच्चान याच्यावर हल्ला चढवला. सच्चान यांच्या पाठीत दोनदा चाकूने वार केल्याने सच्चान जखमी झाला. पोलिसांनी तात्काळ सच्चानला सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त (कायदा आणि व्यवस्था )कैलाश संधू यांनी दिली. आपल्यावर हल्ला करणारा हा आसाराम यांच्या आश्रमातील मदतनीस असल्याचे राहुल सच्चान यांनी सांगितले. हल्ला करणा-या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी करण्यात येत असल्याचे संधू यांनी सांगितले. दरम्यान, अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरुन आसाराम यांना सप्टेंबर २०१३ साली अटक करण्यात आली असून त्यानंतर जोधपूरच्या सेंट्रल जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
0
देहविक्रय अड्ड्यावर एलसीबीची धाड, दोन मुलीसह एक अटकेत

आर्णी, दि. १३ – शहरात सुरू असलेल्या देहविक्रय अड्ड्यावर धाड टाकून दोन मुलींसह एका जणाला अटक केली. ही कारवाई यवतमाळ येथील एलसीबीच्या पथकाने आज दुपारी ३.३० वाजता दरम्यान बसस्थानक परिसरात केली.
नगर परिषदेच्या मागील परिसरात मागील काही वर्षापासून देहविक्रय अड्डा सुरू आहे. याबद्दल स्थानिक पोलिसांकडे तक्रार करून देखील कोणतीही कारवाई करण्यात येत नव्हती. अल्पवयीन मुलींना या देहविक्रय अड्ड्यावर आणून त्यांच्याकडून व्यवसाय करून घेतल्या जातो. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली. यावेळी दोन मुलींसह मालक सुनिल वामनराव गायकवाड रा. गांधीनगर याला अटक करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे देहविक्रय अड्डा चालविणारा व्यक्ती दुसराच असून कारवाईची गंभीरता कमी करण्यासाठी दुसºयाच व्यक्तीला मालक म्हणून समोर करण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेने याप्रकरणाची सखोल चौकशी केल्यास मुख्यसूत्रधार हाती लागू शकले, अशी चर्चा आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई एलसीबीचे पोलीस निरीक्षक संजय पुज्जलवार, चंद्रशेखर कडू, गजानन अजमिरे, रुषी ठाकूर, आशीष भुसारी, किरण पडघण, अमोल चौधरी, अर्चना मेश्राम आदींनी केली.
प्रेमनगरात रात्री उशीरापर्यंत देहविक्रय व्यवसाय सुरू असल्याने १८ महिलांना मध्यरात्री अटक करण्यात आली होती. न्यायालयासमोर हजर केले असता जामिन मंजूर करण्यात आला. या कारवाईमुळे देहविक्रय अड्डा चालविणाºया मालकांचे धाबे दणाणले आहे.
0
जमादार एसीबीच्या जाळयात

अटक टाळण्यासाठी मागीतली लाच
महागांव, दि. १३ – विवाहीतेचा छळ करणाºया सहा आरोपींची अटक टाळण्यासाठी लाच ९ हजार रुपये लाच स्विकारणाºया जमादाराला आज रंगेहात पकडले. यवतमाळ येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज ही कारवाई केली.
जमादार विष्णू सखाराम कोरडे (४५), वसंता रामजी घोडेकर (५८) अशी लाचखोरांची नावे आहे. गजानन उत्तम राठोड रा. पिपरी इजारा याच्या भावाचे लग्न टाकळी येथील एका मुली सोबत एक वर्षापुर्वी झाले होते. काही दिवस संसार सुखात सुरू होता. दरम्यान शुल्लक कारणावरूण पती-पत्नीमध्ये भांडण होत होते. त्यानंतर सासरच्या सहा जणांनी शारीरीक व मानसिक छळही सुरु केला होता. याप्रकरणी महागाव पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणी गजानन राठोड यांचे आई-वडील, भाऊ, पत्नी यांना गुन्हयामध्ये लॉकअप मध्ये टाकत नाही, हातकडी लावुन न्यायालयात नेत नाही, जमानत करूण देतो या कामासाठी मुडाणा बिटचे जमादार विष्णू कोरडे यांनी तक्रारदार गजानन राठोड यांच्याकडे ९ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ठरल्याप्रमाणे आज शुक्रवारी जनता हाऊस जवळील रोहीदास टी सेंटर येथे वसंता घोडेकर यांच्या मार्फत रक्कम स्विकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचुन जमादारसह पैसे स्विकारणाºया इसमास रंगेहात अटक केली. ही कारवाई उपअधीक्षक सतिश देशमुख व पथकाने केली.
0
स्वाईन फ्ल्यू : भितीपेक्षा सतर्कता बरी

यवतमाळ दि.13 : एच 1, एन 1 या विषाणू पासून पसरणाऱ्या स्वाईन फ्ल्यू या संसर्गजन्य आजाराचे रुग्न गेल्यावर्षी प्रमाणे या वर्षीही राज्यात पुणे, औरंगाबाद, नागपूरसह अन्य काही भागात कमी अधिक प्रमाणात आढळून आले आहे. या आजाराची भिती न बाळगता सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
स्वाईन फ्ल्यू हा आजार संसर्गजन्य असल्यामुळे संसर्गापासून दुर राहण्यासाठी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. ताप, घसा दुखणे, खोकला, नाक गळणे, अंग दुखी, डोके दुखी ही या आजाराची लक्षणे आहेत. लक्षणानुसार अशा रुग्नांची तिन प्रकारे वर्गवारी करण्यात आली आहे. पहिल्या वर्गवारीत 38 डिग्री सेल्सीयसपेक्षा कमी म्हणजे सौम्य ताप, खोकला, घशाला खवखव, अंगदुखी, डोके दुखी, जुलाब, उलट्या या लक्षणांचा समावेश होतो. दुसऱ्या वर्गात वरील लक्षणाशिवाय तिव्र घसा दुखी, घशाला सुज व 38 डिग्री सेल्सीयसपेक्षा जास्त ताप तर तिसऱ्या लक्षणात वरील लक्षणाशिवाय धाप लागणे, छातीत दुखणे, खोकल्यावाटे रक्त पडणे, रक्तदाब कमी होणे, मुलांमध्ये चिडचीड, झोपाळूपणा, नखे निळसर काळी होणे या लक्षणांचा समावेश आहे. अशी लक्षणे आढळून आल्यास जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधने आवश्यक आहे. स्वाईन फ्ल्यू हा आजार होवू नये म्हणून वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धूने, शिंकतांना व खोकतांना नाका तोंडावर रुमाल धरणे, पौष्टीक आहार, लिंबु, आवळा, मोसंबी, संत्री, पालेभाज्या यासारख्या पदार्थांचा आहारात वापर आवश्यक आहे. याशिवाय धुम्रपान टाळून पुरेशी झोप आणि विश्रांती, भरपूर पाणी पिणे फायदेशिर आहे. शक्यतोवर हस्तांदोलन करु नये. सार्वजनिक ठिकाणी थूंकू नये तसेच वापरलेले मास्क इतरत्र फेकने टाळावे. डॉक्टरांच्या सल्याशिवाय औषधी घेवू नये. फ्ल्यूची लक्षणे आढळल्यास गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. हा आजार होवू नये म्हणून 5 वर्षा खालील मुले, 65 वर्षा वरील नागरीक, गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा हृदयरोग, मधुमेह, फुफुस, यकृत याने आजारी असणाऱ्या व्यक्ती प्रतिकार शक्ती कमी झालेल्या व्यक्ती, दिर्घकाळ स्टिरॉईड घेणाऱ्या व्यक्ती यांनी स्वाईन फ्ल्यू पासून विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. या आजारासाठी शासकीय रुग्नालयात औषधी उपलब्ध असून रुग्नांनी आजार झाल्यास घाबूरन न जाता त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांचा अवलंब करावा, असे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी कळविले आहे.
0
जिल्ह्यात 2 लाख 24 हजार शेतकऱ्यांना दुष्काळी मदतीचे वाटप

यवतमाळ दि.13 : गेल्या खरीप हंगामात चांगले पर्जन्यमान न झाल्याने जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट ओढवले. जिल्ह्याची उत्पादन क्षमता घसरली. पर्यायाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणवर नुकसान सोसावे लागले. शासनाने दुष्काळात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे जिल्ह्यातील 2 लाख 24 हजार शेतकऱ्यांना या मदतीचे वितरण करण्यात आले आहे. जिल्ह्याला पहिल्या टप्यात दि. 8 जानेवारी रोजी मदत वितरीत करण्यासाठी 122 कोटी 80 लक्ष रुपये प्राप्त झाले होते. गेल्या काही दिवसांपासून सदर निधींचे वाटप मोठ्या प्रमाणवर सुरु आहे. दुसऱ्या टप्यात जिल्ह्याला नुकतेच 121 कोटी 61 लाख रुपये प्राप्त झाले आहे. दोन्ही टप्पे मिळून जिल्ह्यास एकूण 244 कोटी 41 लाख रुपये प्राप्त झाले असून आतापर्यंत यातील 120 कोटी रुपये 2 लाख 24 हजार शेतकऱ्यांना वितरीत करण्यात आले आहे.
जिल्ह्यात एकूण 4 लाख 47 हजार इतके शेतकरी दुष्काळी मदतीस पात्र असून त्यांना मदत वितरीत करण्यासाठी 625 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. त्यापैकी बहुतांश निधी प्राप्त झाला असून त्याचे वाटप शेतकऱ्यांचा बँक खात्यात रक्कम जमा करुन सुरु आहे. आतापर्यंत यवतमाळ तालुक्यातील 14052 शेतकऱ्यांना 8 कोटी, कळंब 12178 शेतकऱ्यांना 6 कोटी 75 लाख, बाभुळगाव 10932 शेतकऱ्यांना 5 कोटी 91 लाख, आर्णी 12974 शेतकऱ्यांना 7 केाटी 80 लाख, दारव्हा 15278 शेतकऱ्यांना 9 कोटी 6 लाख, नेर 13552 शेतकऱ्यांना 7 कोटी 60 लाख, दिग्रस 10972 शेतकऱ्यांना 5 कोटी 98 लाख, पुसद 18443 शेतकऱ्यांना 9 कोटी 51 लाख रुपयांची मदत वितरीत करण्यात आली आहे. उमरखेड तालुक्यतील 15363 शेतकऱ्यांना 7 कोटी 17 लाख, महागाव 13658 शेतकऱ्यांना 6 कोटी 98 लाख, राळेगाव 15265 शेतकऱ्यांना 8 कोटी 34 लाख, घाटंजी 16042 शेतकऱ्यांना 8 कोटी 43 लाख, केळापूर 162777 शेतकऱ्यांना 6 कोटी 82 लाख, झरीजामणी 9280 शेतकऱ्यांना 5 कोटी 84 लाख, वणी 17720 शेतकऱ्यांना 9 कोटी 27 लाख तर मारेगाव तालुक्यातील 12234 शेतकऱ्यांना 6 कोटी 10 लाख याप्रमाणे 2 लाख 24 हजार शेतकऱ्यांना 120 कोटी रुपयांच्या मदतीचे वितरण करण्यात आले आहे.
0
५ फेब्रुवारीला ‘प्रयास’ संस्थेतर्फे सेवा संवाद सोहळा

साधना कुळकर्णी करणार मार्गदर्शन, व्यसनग्रस्तांचे होणार शंकासमाधान
यवतमाळ – एकवीसाव्या शतकात एकीकडे मुक्त व्यसन करणारी बळावलेली पिढी तर दुसरीकडे व्यसनमुक्तीसाठी आखुडते घेणारी पिढी अशी मोठी दरी तयार झाल्याने व्यसनांचे बळी वाढल्याची वस्तुस्थिती आहे. अत्याधुनिकतेच्या नावाखाली नाना व्यसनांना शरण जात असलेल्या युवापिढीला या गर्तेतुन बाहेर काढण्यासाठी लढणारी महिला यवतमाळकरांशी संवाद साधणार आहे. प्रयास सेवांकुर संस्थेच्या माध्यमातुन १५ फेब्रुवारीला सायंकाळी साडेसहाला नंदुरकर विद्यालयातील श्री सत्यसाई क्रिडारंजन सभागृहात
आयोजित आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडाना या कार्यक्रमात यवतमाळकरांशी पुणे येथील साधनाताई कुळकर्णी संवाद साधणार आहेत. अमरावती येथील डॉ.अविनाश सावजी देखील आपल्या सेवाकार्याच्या अनुभव कथनातुन व्यसनमुक्त चळवळीला बळ देणार
आहेत. युवापिढीला गिळंकृत करीत चाललेल्या व्यसनांच्या विरोधात दिर्घकाळापासुन लढा देत असलेल्या साधनाताईंचा कष्टप्रद जीवन प्रवास त्या स्वत: उलगडणार आहेत. आपल्या प्रतिभासंपन्न कलाकार पतीला जडलेल्या मद्यपानाच्या वाढत्या आजाराशी लढतांना त्यांना संसारात तथा समाजात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. ओढाताण, चिडचीड, त्रागा, नैराश्य, नकारात्मक भावनांनी जीवन व्यापले असतांना त्यांनी अॅल-अॅनॉन या जागतिक संघटनेच्या माध्यमातुन व्यसनमुक्तीवरील कार्यासाठी
केलेल्या प्रयत्नांची पराकाष्ठा त्या यवतमाळरांसमक्ष विषद करणार आहेत. व्यसनमुक्त होण्यासाठी व्यसनाधीन असलेल्यांनी, त्यांचे कुटुंबियांनी तसेच मित्रमंडळींनी काय करावे आणि काय करु नये यावर सर्वकष चर्चा होणार आहे. या निशुल्क संवाद सोहळ्यात व्यसनमुक्तीसाठी कार्य करणाऱ्यांनी, पिडीतांनी तसेच आपल्या नजीकच्या व्यक्तीला व्यसनमुक्त करु इच्छीणाऱ्यांनी उपस्थित राहावयाचे आवाहन प्रयास तर्फे करण्यात आले आहे.
साधनाताईंचा परिचय…
भुसावळ येथे शालेय तसेच पुणे येथे एमई पर्यतचे उच्चशिक्षण घेतलेल्या साधनाताई कुळकर्णी केंद्रीय जल तथा विद्युत संस्थेत ३० वर्षापासुन शास्त्रज्ञ म्हणुन कार्यरत आहेत. १९८५ मध्ये बाबा आमटे यांचेसमवेत भारत जोडो यात्रेत कन्याकुमारी ते काश्मीर सायकलने प्रवास केला असुन युरेका व लोकविज्ञानमध्ये सक्रीय सहभाग असतो. अॅल-अॅनॉन संघटनेच्या माध्यमातुन व्यसनमुक्तीसाठी अविरत कार्य सुरु आहे.









