पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for November, 2014

आयपीएल स्पॉट फिक्सिंग, सर्वोच्च न्यायालयाकडून नावे जाहीर 0

आयपीएल स्पॉट फिक्सिंग, सर्वोच्च न्यायालयाकडून नावे जाहीर

images
नवी दिल्ली – निवृत्त न्यायाधीश मुकूल मुदगल समितीने सादर केलेल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजीच्या चौकशी अहवालातील नावे शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने उघड केली.
आयसीसी आणि बीसीसीआयचे अध्यक्ष एन.श्रीनिवासन, त्यांचा जावई गुरुनाथ मय्यपन, शिल्पा शेट्टीचा नवरा आणि राजस्थान रॉयल्सचा सहमालक राज कुंद्रा, आयपीएलचे सीईओ सुंदर रमन यांची नावे या अहवालात आहेत.त्याशिवाय भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नी, वेस्ट इंडिजचा फिरकी गोलंदाज सॅम्युल बद्री, इंग्लंडचा माजी फलंदाज ओवेस शहा या क्रिकेटपटूंची नावेही या चौकशी अहवालात आहेत.ज्यांची नावे जाहीर झाली आहेत त्यांना आक्षेप असल्यास त्यांना चार दिवसांच्या आत सर्वोच्च न्यायालयात आक्षेप नोंदवावा लागणार आहे. हे सर्व मुद्दे निकालात निघत नाहीत तो पर्यंत निवडणूका घेऊ नका असे सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयला सांगितले. या अहवालातील अजूनही सहा नावे उघड झालेली नाहीत. यावर पुढील सुनावणी २४ नोव्हेंबरला होणार आहे.

November 14, 2014 in मुख्य पान
बदल्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण 0

बदल्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण

1414595499devendra-fadnavis
मुंबई-
बदल्यांचे अधिकार केंद्रीत झाल्यामुळे अनेक प्रशासकीय अडचणींना तोंड द्यावे लागत होते. मात्र, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राधान्याने काही विभागातील बदल्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्याची सुरुवात जलसंपदा आणि अन्न व औषध प्रशासन विभागातून केली आहे. Minimum Government, Maximum Governance या सूत्रानुसार शासनाचे काम पुढील काळात चालेल याची सुरुवात या निर्णयाने झाली आहे.
जलसंपदा विभागात मोठ्या प्रमाणावर अ आणि ब गटातील अधिकारी आहेत. त्यामधील कार्यकारी अभियंता यांच्या बदलीचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे होते ते आता जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांकडे देण्यात आले आहेत. तर उप अभियंत्यांच्या बदल्यांचे अधिकार जलसंपदा मंत्र्यांकडून मुख्य अभियंत्यांना देण्यात आले आहेत. शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहायक अभियंता श्रेणी-२ गट ब यांच्या बदल्या आता मुख्य अभियंता हे अधीक्षक अभियंता यांच्या सल्ल्याने करतील. हे अधिकार पूर्वी जलसंपदा राज्यमंत्र्यांकडे होते.
औषध निरीक्षकांच्या बदल्यांचे अधिकार आयुक्तांना
अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक, वैज्ञानिक अधिकारी, अन्न सुरक्षा अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांच्या बदल्यांचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहेत. यापूर्वी हे अधिकारी अन्न व औषध प्रशासन खात्याचे मंत्री यांच्याकडे होते. औषध निरीक्षकांची १६१ पदे असून अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची २६५ पदे आहेत.
बदल्यांचे अधिकार मंत्रालय स्तरावरून क्षेत्रिय स्तरावर देण्याची प्रक्रिया सुरु झाल्याने एकूणच प्रशासनामध्ये विकेंद्रीकरण होऊन त्याचा निश्चितच चांगला परिणाम दिसून येईल. तसेच प्रशासनामध्ये पारदर्शकता व गतीमानता येईल. मुख्यमंत्र्यांनी शपथविधीनंतर आपले सरकार हे पारदर्शक व गतीमान असेल असे सांगितले होते, त्याला अनुसरुन हा निर्णय घेण्यात आला आहे

November 14, 2014 in मुख्य पान
पवारांच्या हाती मोदींचा झाडू 0

पवारांच्या हाती मोदींचा झाडू

pawar1n
पुणे – भाजपचा हात हातात घेऊन महाराष्ट्राच्या सत्ताकारणाची सगळी गणिते उलटीपालटी करणाऱ्या शरद पवार यांनी आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातातील ‘झाडूच’ हाती घेतला आहे. मोदींच्या ‘स्वच्छ भारत’ अभियानात शरद पवारही सहभागी झाले असून त्यांनी आज पुण्यात सहकुटुंब साफसफाई केली. त्यामुळं पवारांच्या पुढच्या ‘चालीबद्दल’ तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
बारामती येथे समस्त पवार कुटुंब आज स्वच्छता अभियानासाठी रस्त्यावर उतरले होते. पवारांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वच्छता केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे, आमदार अजित पवार तसंच इतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी रस्त्यावर साफसफाई केली. शरद पवार यावरच थांबणार नाहीत. बारामतीच्या शेजारीच असलेल्या मूर्टी या गावात लवकरच पंतप्रधान आदर्श ग्राम योजनेचा शुभारंभ होणार आहे. राष्ट्रवादीचे राज्यसभेतील खासदार डी. पी. त्रिपाठी यांनी हे गाव दत्तक घेतलं आहे. त्यामुळं शरद पवार एनडीएची वाट चालू लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे.

November 14, 2014 in मुख्य पान
मराठा, मुस्लिम आरक्षणाला स्थगिती 0

मराठा, मुस्लिम आरक्षणाला स्थगिती

high-court
मुंबई -‘व्होट बँके’च्या राजकारणासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारनं विधानसभा निवडणुकीआधी मराठा समाज आणि मुस्लिम धर्मियांना दिलेल्या आरक्षणाला स्थगिती देऊन आज मुंबई हायकोर्टानं राजकारण्यांना मोठा झटका दिला आहे. आता या निर्णयाविरोधात नवं सरकार सुप्रीम कोर्टात जाणार आहे.
राज्यघटनेतील तरतूद आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांनुसार ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण देता येणं शक्यच नाही. तसंच, गेली अनेक वर्षं राज्यातील सत्ताकारणात प्राबल्य असलेला मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नसल्यानं त्यांना आरक्षणाची गरजच नसल्याचं स्पष्ट मत हायकोर्टानं नोंदवलंय. मराठा आरक्षणाची शिफारस करणाऱ्या नारायण राणे समितीसाठी ही चपराक मानली जातेय. दुसरीकडे, मुस्लिमांचं नोकरीतील आरक्षण कोर्टानं फेटाळलंय, पण सरकारी शैक्षणिक संस्थांमधील ५ टक्के आरक्षण कायम ठेवण्यास न्यायमूर्तींनी हिरवा कंदील दिलाय.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतांची बेगमी करण्यासाठी मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत १६ टक्के, तर मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळानं २५ जूनला घेतला होता. राज्यातील सध्याच्या ५२ टक्के आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिलं गेलं होतं. त्यामुळे राज्यातील आरक्षणाचं प्रमाण लोकसंख्येच्या ७३ टक्के झालं होतं. गेली अनेक वर्षं मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्यांनी या निर्णयाचं दणक्यात स्वागत केलं. मुस्लिम समाजही खुश झाला. परंतु, हे आरक्षण राजकीय हेतूनं प्रेरित असल्याची टीका करणारेही बरेच होते. त्यापैकी काहींनी कोर्टातच धाव घेतल्यानं, कायद्याच्या कसोटीवर हे आरक्षण टिकणार का, याबद्दल शंकाच होती.
महाराष्ट्राच्या स्थापनेपासून जो मराठा समाज सत्ताकारणात प्रबळ आहे, त्यांना आरक्षणाची काय गरज?, असा सवाल याचिकाकर्त्यांनी केला होता. तसंच, ५० टक्क्यांहून अधिक आरक्षण देता येत नाही, या राज्यघटनेतील कलमाकडेही त्यांनी लक्ष वेधलं होतं. धर्माच्या आधारावर आरक्षण देणं कितपत योग्य आहे?, असा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता. या संदर्भातील तीन वेगवेगळ्या याचिकांवर मुंबई हायकोर्टात आज एकत्रित सुनावणी झाली. तेव्हा, या आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे.
मराठा समाज आणि मुस्लिमांना आरक्षण दिल्यास राज्यातील ७३ टक्के लोकसंख्येला आरक्षणाचे कवच मिळेल. हे घटनेच्या विरोधात असून त्यानं सुप्रीम कोर्टाचा अवमान होईल, असं न्यायमूर्तींनी नमूद केलं आणि मराठा आरक्षणाला पूर्णपणे स्थगिती दिली. मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशानं त्यांना शिक्षणात पाच टक्के आरक्षण सुरू ठेवा, पण नोकरीत त्यांनाही आरक्षण देता येणार नाही, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिलेत.
राज्य सरकार कोर्टात जाणार!
दरम्यान, मराठा आणि मुस्लिम आरक्षणाला स्थगिती देण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय. हा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया शिवसंग्राम संघटनेचे प्रमुख विनायक मेटेंनी व्यक्त केली आहे. त्यांनी या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला होता. तसंच, राष्ट्रवादी काँग्रेसचाही भाजप सरकारला आधार असल्यानं फडणवीस यांनी ही भूमिका घेतल्याचं बोललं जातंय. नागपूर अधिवेशनात मराठा-मुस्लिम आरक्षणाबाबतच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करून सुप्रीम कोर्टात दाद मागण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

November 14, 2014 in मुख्य पान
धर्म आणि दहशतवादाची सांगड जगाने फेटाळावीः नरेंद्र मोदी 0

धर्म आणि दहशतवादाची सांगड जगाने फेटाळावीः नरेंद्र मोदी

index
वृत्तसंस्था, ने पी तॉ (म्यानमार)
‘धर्म आणि दहशतवाद यांची सांगड जगाने फेटाळली पाहिजे. त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी खरीखुरी आंतरराष्ट्रीय भागीदारी झाली पाहिजे,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
पूर्व आशिया परिषदेत ते बोलत होते. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्यासह १८ देशांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते. ते म्हणाले, ‘सायबर आणि अवकाश क्षेत्र ही दहशतवादाची नवी अवतारे न राहता संपर्काची साधने म्हणूनच राहिली पाहिजेत याची दखल घेतली पाहिजे. इस्लामिक स्टेटविरुद्ध (आयसिस) परिषदेने केलेल्या ठरावास आमचा पाठिंबा आहे. पण त्याचवेळी सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी खरीखुरी आंतरराष्ट्रीय भागीदारी झाली पाहिजे. ज्यांचा मानवतेवर विश्वास आहे त्यांनी एकत्र आले पाहिजे.’दहशतवाद आणि अतिरेकीवादाचे आव्हान वाढत असल्याचे सांगून मोदी म्हणाले, ‘या सर्वांचा अमली पदार्थांचा व्यापार, शस्रात्रांची चोरटी वाहतूक आणि हवाला व्यवहाराशी संबंध आहे.’
मोदी यांनी आपल्या भाषणात पूर्व आशियाला भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांचा उल्लेख केला. चीनचा उल्लेख न करता दक्षिण चायना समुद्रातील हालचालींवरही त्यांनी निवेदन केले. ते म्हणाले, ‘पूर्व आशियात अनेक न सुटलेले आणि गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. त्यावर विचार झाला पाहिजे. विभागातील देशांमध्ये समजूतदारपणे वातावरण आणि विश्वास कायम राहिण्यासाठी सातत्यपूर्ण चर्चा सुरू राहिली पाहिजे. परस्परावलंबी आणि जागतिकीकरणाच्या काळात आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियम पाळण्याशिवाय पर्याय नाही. सागरी सुरक्षेलाही ते लागू होते. त्यामुळेच दक्षिण चायना समुद्रात शांतता आणि स्थैर्य राहण्यासाठी आंततराष्ट्रीय नियमांचे पालन झाले पाहिजे. १९८२ मध्ये राष्ट्रसंघाने सागरी हालचालींबाबत कायदा केला आहे. त्याच्या आधारानेच हा प्रश्न सुटला पाहिजे. नियमांचे पालन करून एकमताने हा प्रश्न सोडविता येईल अशी खात्री आहे.’आर्थिक विषयावर बोलताना मोदी यांनी विभागीय व्यापक आर्थिक भागीदारी कराराचा आग्रह धरला. यामुळे विभागीय एकता आणि संपन्नतेला चालना मिळेल असे ते म्हणाले.

November 13, 2014 in मुख्य पान
चेन्नईत अडीच किलो सोने जप्त 0

चेन्नईत अडीच किलो सोने जप्त

index.jpeg1
वृत्तसंस्था, चेन्नई
दुबईहून चेन्नई विमानतळावर आलेल्या एका प्रवाशाकडून सुमारे अडीच किलो वजनाचे सोने पोलिसांनी जप्त केले. हा प्रकार गुरुवारी सकाळी घडला. या सोन्याची किंमत ८५ लाख एवढी आहे. अटक केलेल्याचे नाव मोहम्मद ओमर असे असून तो तमिळनाडू येथील रहिवाशी आहे. कस्टम अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत हा प्रकार उघडकीस आला. बुधवारी देखील एका महिलेला ताब्यात घेण्यात आले होते, तिच्याकडून अडीच किलो सोने जप्त करण्यात आले होते. या महिलेचे नाव शेख मुबारक असे होते. ही महिला सौदी अरेबियातून भारतात आली होती.

November 13, 2014 in अर्थ
रोहित शर्माने रचला इतिहास 0

रोहित शर्माने रचला इतिहास

index.jpeg2
कोलकाता- दुसरं द्विशतकं आणि सर्वाधिक २६४ धावा, असा विश्वविक्रमांचा ‘डबल धमाका’ करत भारताचा शैलीदार सलामीवीर रोहित शर्माने आज श्रीलंकेविरूद्धच्या लढतीत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. याआधी भारताच्याच विरेंद्र सेहवागच्या नावावर एकदिवसीय सामन्यांतील सर्वाधिक २१९ धावांचा विक्रम होता. आतापर्यंत सचिन तेंडुलकर, सेहवाग आणि रोहित असे तीन भारतीय फलंदाजच एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोनशे धावांची खेळी साकारण्याची किमया करू शकले आहेत.
कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर रोहित शर्मा नावाच्या वादळाने श्रीलंकेची गोलंदाजी आज उद्ध्वस्त करून टाकली. रोहितने शतक झळकावल्यानंतर लंकेच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवला. रोहितच्या आक्रमणापुढे कुलसेकरा, मेंडिस, मॅथ्यूज या अनुभवी गोलंदाजांचाही टिकाव लागू शकला नाही. रोहित षटकार आणि चौकारांची नॉनस्टॉप आतषबाजी करत सुटला होता. सलामीला आलेला रोहित ५० व्या म्हणजेच शेवटच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाला. तेव्हा त्याच्या नावार १७३ चेंडूत २६४ धावांचा ‘एव्हरेस्ट’ लिहिला गेला होता. या विक्रमी खेळीत रोहितने ३३ चौकार आणि ९ षटकार ठोकले. रोहितच्या द्विशतकी खेळीच्या जोरावर भारताने ५० षटकांत ४०४ धावांचा डोंगर श्रीलंकेसमोर उभा केला आहे. भारतीय संघाची ही वनडेतील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. याआधी भारताने सर्वाधिक ४१८ धावा वेस्ट इंडिजविरूद्ध केल्या आहेत. भारताच्या डावात कर्णधार विराट कोहलीनेही सुरेख अशी अर्धशतकी खेळी केली.

November 13, 2014 in क्रीडा
ममता कुलकर्णीला केनियात अटक 0

ममता कुलकर्णीला केनियात अटक

04aug_stars_4
नवी दिल्ली -बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामीला केनिया पोलिसांनी अटक केली आहे. अमली पदार्थांची तस्करी केल्याचा आरोप या दोघांवर असून पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत.
९०च्या दशकांत बॉलिवूडच्या पडद्यावर ‘बोल्ड’ दृश्यं दिल्यानं ममता कुलकर्णी प्रकाशझोतात आली होती. करण अर्जुन, क्रांतिवीर, बाजी, आशिक आवारा यासारख्या काही गाजलेल्या चित्रपटात तिनं भूमिका साकारल्या. पण नंतर तिला फार चित्रपट मिळाले नाहीत. ड्रग्स माफिया विकी गोस्वामीशी लग्न करून तिनं सगळ्यांनाच धक्का दिला होता. १९९७ मध्ये अमली पदार्थ तस्करीप्रकरणी विकी दोषी ठरला होता आणि त्याला आजन्म कारावासाची शिक्षाही सुनावण्यात आली होती. परंतु, चांगल्या वर्तनाच्या आधारावर २०१२ मध्ये त्याला सोडण्यात आलं होतं.
गेली काही वर्षं ममता कुलकर्णी केनियात राहत होती. तिथल्या अमली पदार्थविरोधी पथकानं ड्रग्ज तस्करीचं एक मोठं रॅकेट उद्ध्वस्त केलं असून त्यात ममता आणि विकीलाही अटक झाल्याचं समजतं. आता चौकशीत ते दोषी ठरतात का आणि त्यांना काय शिक्षा होते, हे लवकरच स्पष्ट होईल.

जयललितांची आमदरकी रद्द 0

जयललितांची आमदरकी रद्द

Jayalalithaa
नवी दिल्ली -बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात शिक्षा झालेल्या तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता ऊर्फ ‘अम्मा’ यांना दुसरा जोरदार दणका बसला आहे. जयललिता यांची आमदारकी रद्द करण्यात आली असून शिक्षेनंतरची ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी घालण्यात आली आहे. तामिळनाडू सरकारच्या सुधारीत राजपत्रात तसं स्पष्टपणं नमूद करण्यात आलं आहे.
तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष पी. धनपाल यांनी या संदर्भातील अधिसूचना जारी केली आहे. जयललिता या दोषी असल्याने, त्यांच्या शिक्षेच्या दिवसापासून म्हणजेच, २७ सप्टेंबर २०१४ पासून त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात येत आहे. तसेच, लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ८नुसार शिक्षा पूर्ण केल्याच्या दिवसापासून पुढील ६ वर्षे जयललिता निवडणूक लढवण्यास अपात्र असतील, असंही अधिसूचनेत म्हटलं आहे. अधिसूचनेद्वारे जयललिता यांचा श्रीरंगम विधानसभा मतदारसंघ रिक्त घोषित करण्यात आला आहे.
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात बेंगळुरू येथील विशेष न्यायालयाने जयललिता यांना ६ वर्षे तुरुंगवास व १०० कोटींच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने १७ ऑक्टोबर रोजी त्यांची जामिनावर मुक्तता केली आहे. मात्र, सक्रीय राजकारणाला ‘अर्धविराम’ लागल्याने अम्मांच्या सुटकेच्या आनंदावर विरजण पडले आहे.

November 13, 2014 in मुख्य पान
माचिल बनावट चकमक, सात दोषींना जन्मठेप 0

माचिल बनावट चकमक, सात दोषींना जन्मठेप

index.jpeg4
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील माचिल बनावट चकमकप्रकरणी लष्कराने दोन अधिका-यांसह सात जवानांना दोषी ठरवले आहे. या सात दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
३० एप्रिल २०१० मध्ये जम्मू-काश्मीरमधील माचिल येथे तीन घुसखोरांना ठार मारल्याचा दावा लष्कराने केला होता. हे तीनही घुसखोर पाकिस्तानी दहशतवादी असल्याचेही लष्कराकडून सांगण्यात आले होते. मात्र महम्मद शाफी, शहजाद अहमद आणि रियाझ अहमद हे तिघेही बारामुल्ला जिल्ह्यातील नंदीहाल भागातील नागरिक असल्याचे तपासादरम्यान आढळले होते.
चकमकीत मृत्युमुखी पडलेल्या या तिघांचे नोकरीचे अमिष दाखवून अपहरण करण्यात आले आणि कुपवाडाजवळील ताबारेषेवरील चकमकीत ठार मारल्याचा आरोप या अधिका-यांवर ठेवण्यात आला होता. त्यानंतर जानेवारी २०१४ मध्ये लष्कराच्या आदेशानंतर या प्रकरणातील आरोपींवर कोर्ट मार्शल कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत सात जवान, दोन नागरिक आणि एक प्रादेशिक जवान दोषी आढळले होते. माचिल येथील बनावट चकमकीनंतर काश्मीरमध्ये या घटनेचे हिंसक प्रतिसाद उमटले होते. काश्मीरमध्ये दोन महिने याविरोधात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात १२३ नागरिकांचा मृत्यू झाला होता.

November 13, 2014 in देश-विदेश
धूमकेतूवर मानवाचे यशस्वी पाऊल 0

धूमकेतूवर मानवाचे यशस्वी पाऊल

AP11_13_2014_000213Aphile
डार्मस्टॅण्डट – चंद्र, मंगळापर्यंत यशस्वी झेप घेणा-या मानवाने आता थेट फिरत्या धूमकेतूवर यशस्वी पाऊल उमटवले आहे. युरोपियन अवकाश संशोधन संस्थेने ‘फिली’ हा यंत्रमानव यशस्वीरित्या ६७ पी/ च्युरुयूमोव्ह-गेरासिमेन्का या धूमकेतूवर उतवरला आहे.
अवकाश संशोधन क्षेत्रातील ही अत्यंत महत्वाची घटना असून, या मोहिमेव्दारे युरोपियन अवकाश संशोधन संस्थेने एक नवी उंची गाठली आहे. रोसेटा या अवकाशयानातून ‘फिली’ला धूमकेतूवर उतरवण्यात आले. युरोपीयन प्रमाणवेळेनुसार पहाटे तीनच्या सुमारास फिली धूमकेतूवर उतरला.
जगभरातील अवकाश संशोधन संस्थांचे या मोहिमेकडे लक्ष लागले होते. कारण फिरत्या धूमकेतूवर यंत्रमानव उतरवणे एक आव्हान होते. विशिष्ट वेळेत फिली धूमकेतूवर पोहचू न शकल्याने युरोपियन अवकाश संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांच्या चेह-यावर चिंतेचे भाव उमटले होते. पण शास्त्रज्ञांनी यशस्वीरित्या फिलीला ६७ पी/ च्युरुयूमोव्ह-गेरासिमेन्काच्या बर्फाळ पृष्ठभागावर उतरवले.
Churyumov-Gerasimenko cometफिलीचा प्रवास दशकभरापूर्वी म्हणजे मार्च २००४ मध्ये सुरु झाला होता. २००४ मध्ये रोसेटा अवकाशयान ६७ पी/ च्युरुयूमोव्ह-गेरासिमेन्का धूमकेतूच्या दिशेने झेपावले होते. तब्बल पाच अब्ज किमीचा प्रवास करुन, दहावर्षांनी रोसेटा धूमकेतूनजवळ पोहोचले.
धूमकेतूपासून २२.५ कि.मी.अंतरावर असताना फिली रोसेटापासून वेगळे झाले आणि ६७ पी/ च्युरुयूमोव्ह-गेरासिमेन्काच्या दिशेने प्रवास सुरु केला. आतापर्यंत धूमकेतूच्या छायाचित्रामुळे केवळ त्याच्या बाहयअंगाचा अभ्यास करता येत होता.पण आता यंत्रमानवामुळे धूमकेतूचा सखोल अभ्यास करता येणार आहे. अवकाशातील अनेक घटकांचे उगमस्थान शोधण्यास मदत मिळणार आहे. फिलीवर विशिष्ट प्रकारची उपकरणे बसवण्यात आली असून, त्यातून धूमकेच्या आतील भागातील छायाचित्रे आणि तेथील अन्य घटकांचा अभ्यास करता येणार आहे. या मोहिमेतून सूर्यमालेच्या जन्मासंबंधी महत्वाची माहिती मिळू शकते.

November 13, 2014 in मुख्य पान
राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी फेटाळली 0

राज्य सरकार बरखास्त करण्याची मागणी फेटाळली

2458_vidhanbhavan
मुंबई- राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार घटनात्मक तरतुदीनुसार स्थापन झालेले नाही. त्यामुळे भाजप सरकार बरखास्त करुन राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भारीप बहूजन महासंघाची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली.
न्यायमूर्ती व्ही.एम.कानडे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाने प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. राज्यात राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्यानंतर ८ ते १० नोव्हेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत संवैधानिक यंत्रणाच अस्तित्वात नसल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी याचिकेत म्हटले होते. संवैधानिक यंत्रणा नसल्याने सरकार स्थापनेचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असा दावा अ‍ॅड. आंबेडकर यांनी याचिकेत केला होता.

November 13, 2014 in मुख्य पान
भाजपाच्या पापाला प्रायश्चित्त नाही - उद्धव ठाकरे 0

भाजपाच्या पापाला प्रायश्चित्त नाही – उद्धव ठाकरे

images
मुंबई – भाजपाने आवाजी मतदानाने सभागृहात ‘विश्वास’ संपादन केला असला तरी जनतेच्या मनात भाजवाविषयी असलेला विश्वास उतरंडीला लागला आहे. जनतेच्या विश्वासाचा गळा घोटणा-या भाजपाच्या या पापाला प्रायश्चित्त नाही अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.
बुधवारी विधानसभेत भाजपाने विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर करुन घेतला होता. यावरुन उद्धव ठाकरेंनी सामनामधून भाजपावर जोरदार टीका केली. जनतेसाठी सरकार चालवू, स्वच्छ कारभार करु असे दावे भाजपाने निवडणुकीत केले होते. पण प्रत्यक्षात भाजपाचे हे सर्व दावे पोकळ व दांभिक असल्याचे विधानसभेतील घटनेवरुन स्पष्ट होते असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. सत्तेसाठी तडजोडी कराव्या लागतात मात्र यासाठी घटना, नियम, परंपरा यांचा गळा घोटला जात नाही असे त्यांनी भाजपाला सुनावले आहे. सभागृहातील परंपरा आणि प्रथा धाब्यावर बसवून सभागृहात विश्वास जिंकणारी मंडळी उद्या जनतेचा विश्वास कसा जिंकणार असा सवालही उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे.

November 13, 2014 in मुख्य पान
जिल्हा माहिती अधिकारी राजू पाटोदकर यांना पीएच.डी. 0

जिल्हा माहिती अधिकारी राजू पाटोदकर यांना पीएच.डी.

wishesh-lekh
अलिबाग :- रायगड जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी पुरूषोत्तम (राजू) पाटोदकर यांना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक या विद्यापीठाने जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. राजू पाटोदकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील प्रोफेसर डॉ.वि.ल.धारुरकर यांच्या मार्गदर्शनात ‘श्री.अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातील सामाजिक वास्तवाचा संवाद : एक चिकित्सक अभ्यास (1975 ते 2005)’ या विषयावर संशोधन करुन आपला प्रबंध विद्यापीठास सादर केला होता. त्या प्रबंधास विद्यापीठाने मान्यता देऊन त्यांना पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे.
श्री.पाटोदकर यांनी जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विषयातील पदव्युत्तर पदवी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून 1991 साली पूर्ण केली. तद्नंतर त्यांनी नाट्यशास्त्र पदवी व एम.ए.(मराठी) पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी दैनिक लोकमत, दैनिक एकमत व चित्रपट विषयक मुक्त पत्रकार म्हणून अनेक दैनिकांसाठी लेखन कार्य केले. तसेच 1999 साली महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयात सहाय्यक संचालक म्हणून ते रुजू झाले. त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी रत्नागिरी व मंत्रालयात विभागीय संपर्क अधिकारी म्हणून विविध विभागांसाठी काम पाहिले व जून 2014 पासून ते जिल्हा माहिती अधिकारी म्हणून रायगड जिल्ह्यात कार्यरत आहे.
त्यांनी आपल्या कार्यव्यापातूनही शिक्षणाची कास धरुन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पीएच.डी. सारखी उच्च पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्यमान कुलगुरू डॉ.माणिकराव साळुंखे, माजी कुलगुरू डॉ.सुधीर गव्हाणे, रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे, जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.शशिकांत महावरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक अजय अंबेकर, अपर जिल्हाधिकारी प्रविण शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) किरण पाणबुडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.साळुंखे, माहिती संचालक (औरंगाबाद) राधाकृष्ण मुळी, माहिती संचालक (नागपूर) मोहन राठोड, प्राचार्य डॉ.अरुण भस्मे, दिलीप धूत, माजी प्राचार्य डी.एस.कुलकर्णी सर, डॉ.संजय पाटील-देवळाणकर, डॉ.नामदेव सानप (बीड), प्राचार्य डॉ.गणेश अग्निहोत्री (अलिबाग), डॉ.सुरेखा मुळे, अनिरुध्द अष्टपुत्रे,  अभिनेत्री डॉ.निशिगंधा वाड, अभिनेता शैलेश दातार (मुंबई), प्रा.सुरेश पुरी, डॉ.गनी पटेल, डॉ.जयंत शेवतेकर, डॉ.डी.एम.भोसले, डॉ.गणेश देसाई (औरंंगाबाद), डॉ.प्रताप पाटील (कोल्हापूर), प्रा.बाबा बोराडे (सांगली), डॉ.तुकाराम दौंड (जळगाव), डॉ.अरुण पाटील (नागपूर), डॉ.गणेश शिंदे, डॉ.अंबादास कांबळे, डॉ.दिपक शिंदे, (नांदेड), डॉ.राघवेंद्र टोपरे, डॉ.ओमप्रकाश मोतीपवळे (लातूर), डॉ.रमेश शेकोकार डॉ.किरण मोघे, (नाशिक), आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन आपला पीएच.डी. प्रबंध ग्रंथरुपात आणून तो सामान्य वाचकांसाठी उपलब्ध करुन द्यावा अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे

November 13, 2014 in महाराष्ट्र
विधानसभा अध्यक्षपदी हरीभाऊ बागडे 0

विधानसभा अध्यक्षपदी हरीभाऊ बागडे

pk-11-BJPs-Haribhau-Bagde.jpg00
मुंबई – महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि आमदार हरीभाऊ बागडे यांची एकमताने निवड झाली आहे. हंगामी विधानसभा अध्यक्ष जीवा पांडू गावित यांनी विधानसभा अध्यक्षपदी हरीभाऊ बागडे यांची निवड झाल्याची घोषणा केली.
बागडे औरंगाबाद जिल्ह्यातील फुलांब्री विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच पक्षाचे प्रमुख नेते हरिभाऊ बागडे यांना अध्यक्षाच्या आसनापर्यंत घेऊन गेले. विधानसभा अध्यक्षांची एकमताने निवड करण्याची परंपरा कायम राखल्याबद्दल फडणवीस यांनी सर्व पक्षांचे आभार मानले.
बागडे यांची विधानसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करुन, फडणवीस सरकारने पहिला अ़डथळा पार केला आहे. विधानसभा अध्यक्षांची निवड बिनविरोध व्हावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांसोबत चर्चा केली. त्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांनी आपले  अर्ज मागे घेतले.
राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपला अनुकूल असलेली भूमिका तसेच संख्याबळ पाहता काँग्रेस आणि शिवसेनेचा उमेदवार निवडून येणे कठिण होते तशीच शिवसेनेला काही मते फुटण्याचीही भिती होती. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेसने आपले उमेदवार मागे घेतले. विधानसभा अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून विजयाराज औटी आणि काँग्रेसतर्फे वर्षा गायकवाड यांनी अर्ज दाखल केले होते.

November 12, 2014 in मुख्य पान
अभिनेते अतुल अभ्यंकर यांचे निधन 0

अभिनेते अतुल अभ्यंकर यांचे निधन

index

मुंबई – प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेल्या झी मराठी वाहिनीवरील ‘जय मल्हार’ या मालिकेत हेगडी प्रधान यांची भूमिका साकारणारे अतुल अभ्यंकर यांचे बुधवारी पहाटे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते.
अभ्यंकर यांची जय मल्हारमधील हेगडी प्रधान ही भूमिका विशेष गाजली होती. आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. त्यांच्या या भूमिकेसाठी या मालिकेतील भूमिकेसाठी त्यांना नुकताच झी मराठी अॅवॉर्डस्२०१४ चा सर्वोत्कृष्ट पुरुष व्यक्तिरेखेचा पुरस्कार मिळाला होता.
त्यांच्यावर आज दुपारी साडेतीन वाजता शिवाजी पार्क येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. अभ्यंकर यांच्या अकाली निधनाने मराठी मालिकाविश्वावर शोककळा पसरली आहे.

November 12, 2014 in मनोरंजन
भाजपने लोकशाहीची हत्या केली - काँग्रेस 0

भाजपने लोकशाहीची हत्या केली – काँग्रेस

Maha CM presser
मुंबई -आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकणा-या भाजपने सरकार वाचवण्यासाठी लोकशाहीची हत्या केल्याची टीका काँग्रेसने केली आहे. आवाजी मतदानामुळे भाजपला बहुमत मिळाले हे सिद्ध होत नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही काँग्रेसने केली आहे.
‘वाजपेयी सरकार एका मतामुळे पडले होते. फडणवीसांचे सरकार हे अल्पमतातील सरकार आहे. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सांगितले. तसेच विश्वासदर्शक ठरावासाठी मतदान घेण्याची आमची मागणी विधानसभा अध्यक्षांनी जाणूनबुजून  फेटाळून लावल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. आवाजी मतदानाच्या आधारे विश्वासदर्शक ठराव जिंकून भाजपने लोकशाहीची हत्या केली आहे. अशा मतदानामुळे भाजप बहुमताने विजयी झाले हे सिद्ध होत नसल्याचे ते म्हणाले. तर ‘आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या इतिहासातील काळा दिवस आहे.  आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव मंजूर केला जावा हे दुखद आहे. आम्ही या विरोधात नक्कीच पाऊल उचलू. यावरुन सरकारच्या प्रामाणिकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे,’ असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

November 12, 2014 in मुख्य पान
दिग्दर्शक रवी चोप्रा यांचे निधन 0

दिग्दर्शक रवी चोप्रा यांचे निधन

index.jpeg0

मुंबई – बॉलीवूडमधील निर्माते आणि दिग्दर्शक रवी चोप्रा यांचे बुधवारी दुपारी ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. ते ६८ वर्षांचे होते. चोप्रा यांनी बागबान, द बर्निंग ट्रेन, बाबूल अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. तर छोट्या पडद्यावरील महाभारत आणि रामायण या मालिकांमुळे रवी चोप्रा प्रसिद्धीच्या झोतात आले होते.
दिवंगत सिने निर्माते आणि दिग्दर्शक बी.आर. चोप्रा यांचे पुत्र रवी चोप्रा यांना गेल्या नऊ वर्षांपासून फुफ्फुसाच्या आजाराने ग्रासले होते. मंगळवारी दुपारी प्रकृती खालावल्याने त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात भरती करण्यात आले. मात्र आज दुपारी तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. रवी चोप्रा यांनी निर्मिती केलेले भूतनाथ रिटर्न्स हा त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेला सिनेमा होता.

November 12, 2014 in मनोरंजन
राज्यपालांना धक्काबुक्की , काँग्रेसचे ५ आमदार निलंबित 0

राज्यपालांना धक्काबुक्की , काँग्रेसचे ५ आमदार निलंबित

2014-11-12~go2_ns
मुंबई, दि. १२ – राज्यपालांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी काँग्रेसच्या पाच आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. राहुल बोंद्रे, अब्दुल सत्तार, अमर काळे, जयकुमार गोरे आणि विरेंद्र जगताप अशी या पाच निलंबित आमदारांची नाव आहेत.
राज्यपाल विद्यासागर राव बुधवारी विधीमंडळात अभिभाषणासाठी आले होते. सकाळी विश्वासदर्शक ठरावात घटनेची पायमल्ली झाल्याचा आरोप शिवसेना व काँग्रेसने केला होता. राज्यपालांनी विधीमंडळात अभिभाषणासाठी येऊ नये अशी मागणी करणारे पत्रही काँग्रेसने राज्यपालांना दिले होते. मात्र दुपारी राज्यपाल विद्यासागर राव विधीमंडळात आले असता शिवसेना व काँग्रेस आमदारांनी त्यांची गाडी रोखून ठेवली. तसेच राज्यपाल विधीमंडळात प्रवेश करत असतानाही काँग्रेस आमदारांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या सर्व गदारोळात राज्यपालांच्या हाताला किरकोळ इजा झाली व राज्यपालांच्या ताफ्यातील एका अधिका-याला किरकोळ दुखापत झाल्याचा दावा भाजपाच्या वतीने करण्यात आला.
काँग्रेस आमदारांच्या या कृतीविरोधात महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान सभेत निलंबनाचा प्रस्ताव मांडला. विरोधी पक्षनेते एकनाथ शिंदे आणि काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी झालेल्या घटनेवर दिलगिरी व्यक्त करत प्रकरण मिटवण्याची विनंती विधानसभा अध्यक्षांना केली होती. मात्र राज्यपालांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार गंभीर असल्याचे खडसे यांनी सभागृहात सांगितले. अखेरीस या पाच आमदारांना दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले.

November 12, 2014 in मुख्य पान
फडणवीस सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला 0

फडणवीस सरकारनं विश्वासदर्शक ठराव जिंकला

devendra-fadanvis-cm3
मुंबई,- भारतीय जनता पक्षाने आवाजी मतदानाने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. फडणवीस सरकारने यासह पहिल्या भाजपा सरकारची पहिली बाजी मारली असून, शिवसेनेचा विरोध डावलत भाजपाने आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. आधी विरोधी पक्षनेतेपद जाहीर व्हावे असे सांगत शिवसेनेनं विश्वासदर्शक ठरावाला विरोध केला होता. परंतु, आशिष शेलार यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला आणि आवाजी मतदानानं भाजपाला तारून नेलं. विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी आवाजी मतदानानं भाजपाला बहुमत मिळाल्याचं जाहीर करत सभागृहाचं शिक्कामोर्तब केलं.
हा ठराव मंजूर झाल्यानंतर काही वेळासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. काल रात्रीपर्यंत खल झाल्यानंतर शिवसेनेनं विरोधात बसण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपानं बाजी मारल्याचं दिसत आहे. भाजपानं सध्यातरी विश्वासदर्शक ठराव रेटून नेला असला तरी यानंतर ज्यावेळी महत्त्वाचे प्रस्ताव सभागृहाच्या मंजुरीसाठी येतील त्यावेळी फडणवीसांना अनुकूल पाठिंबा मिळेल का आणि त्यावेळी राष्ट्रवादी काय भूमिका घेईल यावर या सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
दुपारी विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली त्यावेळी आधी विरोधी पक्षनेतेपदाची घोषणा आधी होईल असे ठरले होते. परंतु, विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्ष नक्की कोण आहे याबाबत संभ्रम असल्याचं सांगत, विश्वासदर्शक ठराव आशिष शेलार मांडतिल असं सांगितलं. शेलार यांनी लगेच ठराव वाचला आणि आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव मंजूर केला.
यामागोमाग शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्याचं विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी जाहीर केलं. या ठारावमुळे आता फडणवीस सरकार किमान सहा महिने सत्तेवर राही हे निश्चित झालं आहे. ठरावासाठी आवाजी मतदानाचा मार्ग का स्वीकारण्यात आलं, मतदान का घेण्यात आलं नाही, नक्की ठरावाच्या बाजुने किती आमदार होते विरोधात किती होते या सगळ्या गोष्टी गुलदस्त्यात राहिल्या आहेत.