

यवतमाळ, दि. 12 : येथील निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांचे आनंदी रहा-यशस्वी व्हा हे पुस्तक नुकतेच अमरावती येथे प्रकाशित झाले आहे. हे त्यांचे आतापर्यंतचे सहावे पुस्तक आहे. प्रशासनात जबाबदार अधिकारी म्हणून काम करत असतांनाच त्यांनी आपल्यातील लेखकही टिकवून ठेवल्यानेच त्यांचे सहावे पुस्तक प्रकाशित होवू शकले. या पुस्तकाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सदर पुस्तक अमरावती येथील मिशन आयएएसचे प्राध्यापक डॉ.नरेशचंद्र काठोडे यांनी प्रकाशित केले असून पुस्तकास त्यांचीच प्रस्तावना आहे.
श्री.खवले यांची आतापर्यंत एकूण सहा पुस्तके प्रकाशित झाली आहे. त्यात चला आपले गाव तंटामुक्त करू या, तंटामुक्त गावाची गिता वंदनीय राष्ट्रसंतांची ग्रामगिता, कौटुंबिक हिंसाचार अधिनियम-प्रश्नोत्तर स्वरूपात, प्रेरणा स्पर्धा परिक्षेची, विचारांची फुले व आता आनंदी रहा-यशस्वी व्हा या पुस्तकांचा समावेश आहे. यातील प्रेरणा स्पर्धा परिक्षेची हे पुस्तक राज्याचे मुख्य सचिव जे.पी.डांगे यांच्याहस्ते प्रकाशित झाले होते.आनंदी रहा यशस्वी व्हा हे पुस्तक जीवन जगतांना त्यात सकारात्मकता आणण्यासोबतच आयुष्यातील छोट्यामोठ्या प्रसंगांना कसे समोर जावे याबाबत विविध अंगाने प्रकाश टाकण्यात आला आहे. दैनंदिन धकाधकीचे जीवन म्हणजेच केवळ आयुष्य नव्हे. या आयुष्यासोबतच मुक्त आणि म्हणाला आनंद देणारे आयुष्य जगण्याचा टिप्स या पुस्तकातून वाचकांना सहजच कळेल या पध्दतीने देण्यात आला आहे. यापुर्वी त्यांची प्रकाशित पुस्तके महिन्याभराच्या आत संपल्याचा अनुभव आहे. हे पुस्तकही त्याच दिशेन वाटचाल करीत आहे. पुस्तकांच्या स्वरूपात मानधन मिळालेली रक्कम श्री.खवले हे गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांना स्पर्धा परिक्षेची तयारी करता यावी म्हणून चालविण्यात येत असलेल्या मिशन आयएस या संस्थेला दान देतात. या पुस्तकाचे मानधनही त्यांनी नुकतेच संस्थेला दिले आहे.
Archive for November, 2014
0
निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांचे सहावे पुस्तक प्रकाशित
0
डिजीटल प्रमाणपत्राच्या वितरणात यवतमाळ राज्यात दुसरा

यवतमाळ, दि. 12 : माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सर्वसामान्य नागरीकांना वारंवार लागणारे आणि महत्वाचे दाखले तातडीने देता यावे म्हणून शासनाने डिजीटल पध्दत अस्तित्वात आणली आहे. जिल्ह्यात जिल्हा प्रशासनाच्यावतीने या पध्दतीचा चांगल्या प्रकारे अवलंब करण्यात आल्याने अवघ्या काही महिण्यात या पध्दतीचा वापर करून अधिकाधिक नागरीकांना चांगली सुविधा देण्यात जिल्ह्याचे राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. लवकरच प्रथम क्रमांक पटकाविण्याकडे जिल्ह्याची वाटचाल सुरू आहे.
नागरीकांना घरबसल्या ई-पध्दतीने विविध प्रकारचे दाखले मिळावे तसेच दाखले वाटपातील विलंबता कमी होऊन त्यात पारदर्शकता यावी तसेच गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी शासनाने ई-सेतू, महाआँनलाईनमार्फत व्हीएलसी केंद्र सुरू करण्यात आहे. पुर्वी नागरीकांना आँफलाईन पध्दतीने दाखले दिल्या जायचे. आता डीजीटल पध्दत आल्याने नागरीकांना घरबसल्या आपल्या दाखल्याची स्थिती कळणार आहे. शासनाने विविध पाच प्रकारचे दाखले डीजीटल पध्दीने देण्यास प्रारंभ केला आहे. त्यात उत्पन्न दाखला, ॲफीडेव्हीट, रहीवासी दाखला आदी महत्वाच्या दाखल्यांचा समावेश आहे. या पध्दतीने दाखले वितरीत करावयास प्रारंभ झाल्यानंतर यवतमाळ जिल्हा हा अशा पध्दतीने दाखल वितरण करण्यात राज्यात 22 व्या क्रमांकावर होता. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी डीजीटल पध्दतीच्या वापरास प्राधान्य देऊन जिल्ह्याची या कामात प्रगती उंचवण्याचे काम हाती घेतल्यानंतर गेल्या महिण्यात जिल्हा 7 व्या क्रमांकावर आला होता. नुकतेच शासनाने संकेतस्थळावर जाहीर केल्यानुसार यवतमाळ जिल्ह्याने दुसरा क्रमांक पटकाविला आहे. चालु महिण्यात यवतमाळ जिल्ह्यात 2404 इतके दाखले डिजीटल पध्दतीने वितरीत केले आहे. यापेक्षा केवळ एका जिल्ह्याने म्हणजे अहमदनगर जिल्ह्याने 2589 इतके दाखले वितरीत केले. त्यामुळे या कामात सद्यातरी अहमदनगर जिल्हा राज्यात प्रथम आहे. परंतु जिल्ह्यात झपाट्याने होत असलेले काम पाहता अहमदनगरला मागे टाकून यवतमाळ प्रथम क्रमांक पटकावेल, असे निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सांगितले.
0
चंद्रशेखर ओक नवे माहिती महासंचालक
मुंबई(प्रतिनिधी)राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे नवे महासंचालक म्हणून श्री. चंद्रशेखर ओक यांनी आज पदभार स्वीकारला.
श्री. चंद्रशेखर ओक सध्या विशेष विक्रीकर आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयात सहसचिव म्हणून दीर्घकाळ काम पाहिले आहे. मुंबईच्या जिल्हाधिकारी पदासह अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. त्यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला असून आज त्यांनी श्री. अजय अंबेकर यांच्याकडून आपल्या पदाची सुत्रे स्वीकारली.
0
नगराध्यक्षांच्याच कक्षात तोडफोड

हिंगोली : मागील चार दिवसांपासून पालिकेत चकरा मारत असलेल्या एकाने सोमवारी दुपारी नगराध्यक्षाच्या दालनात तोडफोड केली. रागाच्या भरात काचाचा टेबल व कुंडीचा चुराडा केल्याने एकच खळबळ उडाली.
प्रत्यक्षदश्रींनी सांगितल्यानुसार, हिंगोलीतील शेख युसूफ हा दुपारी मद्यप्राशन करून पालिकेत आला. आरडाओरडा केल्यानंतर त्याला कर्मचार्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तो थेट नगराध्यक्षाच्या दालनात शिरला. तेथे कोणीही नसल्याने त्याने दालनातील काचेचा टेबल तोडला. त्यावरील रोपट्याची कुंडीही आदळली. परिणामी, दालनात खापराचे तुकडे विखुरले तर माती खाली पडली होती. पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी माहिती देताच शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
0
युवतीने केले ४० जणांसोबत लग्न

जयपूर, दि. ११ -‘ चट मंगनी और पट ब्याह’ ही हिंदी भाषेतली म्हण सर्वांना परीचित आहेच. पण या म्हणी प्रमाणे प्रत्यक्ष वागणारे थोडे थोडके नाही तर तब्बल ४० जण फसले आहेत. राजस्थानमधील दादीया गावात लग्नानंतर नववधू नैसर्गिक विधीकरता गेली असता परत आलीच नाही, वरपक्षातील मंडळी शोधून दमली आणि सरते शेवटी पोलिसात तक्रार करायला गेली. तिथे गेल्यावर लक्षात आले की आत्तापर्यंत “त्या नववधूने” तब्बल ४० जणांना लग्नकरून फसवले आहे.
या वधूचे तथाकथीत लग्न जमवण्यामध्ये इतर चार जण सामील होते. यात दोन महिलांचा समावेश आहे. त्यापैकी एक जण फरार असून वधूसह इतरांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. यातील एक व्यक्ती गावोगावी जाऊन लग्नाकरता वर शोधत असे लग्न ठरल्यावर रितसर लग्नाचे विधी पार पडल्यावर पैसे व दागिने घेऊन वधू पोबारा करत असे. दादीया गावातील वरपक्षाने तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी या गावाला घेरवा देऊन वधूसह इतर चौघांना अटक केली. ही मंडळी मुलीचे नातेवाईक असल्याचे दाखवत लग्नाची बोलणी करत आणि वरपक्षाला फसवून पसार होत. पोलिसांकडे या टोळीच्या फोटो व्यतिरिक्त कोणतीच ठोस माहिती उपलब्ध नव्हती. पण यावेळी पोलिसांना या टोळीला गजाआड करण्यात यश आले आहे.
0
स्वच्छतेसाठी प्रत्येक अधिकाऱ्यास एक गाव दत्तक

यवतमाळ: निर्मल भारत मिशन अंतर्गत विविध शासकीय कार्यालय व गावस्तरावर विशेष कृती आराखडा तयार करून त्याप्रमाणे स्वच्छतेची मोहिम निरंतर कशी सुरु राहतील यासाठी त्या त्या विभागाने नियोजन करून मिशन राबवावे, अशा सुचना जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन येथे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्व विभाग प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी या सुचना केल्या. यावेळी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उमरखेडचे उपविभागीय अधिकारी दिपक सिंगला यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. सदर स्वच्छ भारत अभियान शासकीय कार्यालयांसोबतच गाव व ग्रामपंचायत स्तरावरही राबवायचे आहे. त्यासाठी संबंधीत नियंत्रन अधिकाऱ्यांनी नियोजन करावे. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालयांसाठी उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत यांनी नियंत्रण अधिकारी म्हणून काम करतील अशा सुचना त्यांनी केल्या.
नगर परिषद स्तरावर राबविण्यात येणाऱ्या मिशनची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती जाणून घेतली. वैयक्तीक स्वच्छतेसोबतच परिसर व नंतर संपुर्ण गाव स्वच्छ करणे या मोहिमेचे उदि्दष्ठ असल्याने त्याप्रमाणे कृती आराखडा करून कामाला लागण्याचा सुचना त्यांनी केल्या.मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात दिनांक 14 नोव्हेंबर बालक दिन ते 19 नोंव्हेंबर जागतीक शौचालय दिन यादरम्यान सप्ताह राबविण्यात येणार आहे. अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये दिनांक 14 नोव्हेंबर रोजी विद्यार्थ्यांना स्वच्छतेची मते सांगुन परिसराची स्वच्छता. दिनांक 15 नोव्हेंबर रोजी वैयक्तीक स्वच्छता, हात धुणे, नखे काढणे, दातांची स्वच्छता याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते. 16 नोव्हेंबर रोजी स्वच्छतेबाबत कार्यशाळा घेण्यात येतील. 17 नोव्हेंबर रोजी घर, परिसर, गाव व शहराची स्वच्छता याचे महत्व पटवून दिल्या जातील. 18 नोव्हेंबर रोजी शाळेतील मुतारी, शौचालय, स्वच्छतागृह याच्या स्वच्छतेचे महत्व व त्यापासून होणाऱ्या रोगराईबाबत परावृत्त कसे राहायचे याबाबत सांगितल्या जाणार आहे. तर शेवटच्या दिवशी 19 नोव्हेंबर स्वच्छता या विषयावर निबंध, चित्रकला स्पर्धा, वर्गखोली स्वच्छता व सजावट स्पर्धा आदी स्पर्धा आयोजित केल्या जातील. यावेळी निरंतर स्वच्छतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सुचना केल्या.
0
डॉ. प्रकाश आमटे यांना ‘मदर तेरेसा पुरस्कार’ जाहीर

मुंबई – बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी केलेल्या कार्याचा वारसा पुढे चालवणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे आणि नेपाळच्या सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा कोईराला यांच्यासह १० जणांना हार्मोनी संस्थेचा सामाजिक न्यायासाठी दिला जाणारा प्रतिष्ठित ‘मदर तेरेसा आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
डॉ. बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी केलेलं कार्य सर्वश्रुत आहे. त्यांचाच वारसा पुढे चालवणा-या डॉ. प्रकाश आमटे यांनी पत्नी मंदाकिनी आमटे यांच्यासोबत हेमलकसा या दुर्गम ठिकाणी आदिवासींसाठी केलेल्या कार्यांची ओळख सर्वांनाच आहे. त्यांच्या या समाजकार्याचा गौरव म्हणून हार्मोनी संस्थेच्या या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
त्यासोबतच मानवी तस्करीच्या जाळ्यातून सुमारे १२ हजार महिलांची सुटका करणा-या अनुराधा कोईराला यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. गेल्या दोन दशकांपासून नेपाळ-भारत सीमेवर सुरु असलेल्या मानवी तस्करीविरोधात त्यांचा लढा सुरु आहे. ऐझवाल येथील डॉ. संगथनकिमा यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ईशान्य भारतात व्यसनमुक्तीसाठी त्या कार्यरत आहेत. तसेच लक्ष्मीधर मिश्रा, सुनिथा कृष्णन, वंदना शिवा, रिफत अब्दुल्ला यांचीही या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
0
जावखेड दलित हत्याकांड, संशयितांची नार्को टेस्ट

अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जावखेड गावात झालेल्या तिहेरी हत्याकांडातील पाचही संशयितांची नार्को चाचणी करण्याची परवानगी सोमवारी पाथर्डी न्यायालयाने दिली.
२१ ऑक्टोबर रोजी जवखडे खालसा या गावातील एका दलित कुटुंबातील तिघांची ह्त्या झाल्याच्या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली होती. जाधव वस्तीत राहणा-या संजय जाधव, जयश्री जाधव व सुनील संजय जाधव यांची अत्यंत क्रूरपणे हत्या कऱण्यात आली होती.या घटनेनंतर समाजातील सर्व स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील विविध ठिकाणी विविध संघटना तसेच राजकीय पक्षांकडून आंदोलनेही सुरु आहेत.
0
अक्कू यादव हत्येप्रकरणी सर्व आरोपींची सुटका

नागपूर- तब्बल दहा वर्षानंतर कुख्यात गुंड अक्कू यादव खून खटल्याच्या निकाल सोमवारी जाहीर झाला. या प्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.टी.सूर्यवंशी यांनी सर्व १८ आरोपींची सबळ पुराव्या अभावी निर्दोष सुटका केली.
विशेष म्हणजे या खटल्यात १८ पैकी सात महिला आरोपी होत्या. न्यायालयातच एका गुंडाची हत्या केल्यामुळे संपूर्ण देशाचे लक्ष या खटल्याकडे होते. ज्या जमावाने यादवची हत्या केली होती. त्यात महिलांची संख्या मोठी होती. सामूहिक बलात्कार, खून, जबरीचोरी, दरोडा, घरफोडी आणि खंडणी वसुली आदी गुन्हेगारी कृत्याने कस्तुरबानगर परिसराला वेठीस धरणा-या अक्कू यादव याला १३ ऑगस्ट २००४ रोजी जिल्हा न्यायालयात संतप्त जमावाने चाकू, भाल्याचे पाते, गुप्ती आणि काचेने भोसकून व दगडाने ठेचून ठार मारले होते. त्यानंतर जमावाने त्याचे घर देखील जाळून टाकले होते. या प्रकरणी पोलिसांनी २१ जणांना अटक केली होती. त्यापैकी तिघांचा खटल्या दरम्यान मृत्यू झाला.
0
स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादीचा पाठींबा- पवार

मुंबई- राज्यात स्थिर सरकार असावे म्हणून आम्ही भाजपाला पाठिंबा दिला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
आम्ही कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. खुशाल चौकशी करा. भाजप सरकार अस्थिर होऊ नये, राज्यात पुन्हा निवडणुका परवडणा-या नाहीत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला कोणतीही अपेक्षा न ठेवता पाठींबा देण्याचे जाहीर केले. मात्र आम्ही पाठींब्याबाबत कोणाशीही चर्चा केलेली नाही, सभागृहात मतदान करायचे की नाही, हे त्या दिवशी ठरवू, असे पवार म्हणाले. आम्ही कोणाला मतदान करावे आणि कोणाला पाठिंबा द्यायचा हा आमचा प्रश्न आहे, इतरांनी त्यात हस्तक्षेप करण्याची आवश्यकता नाही आणि यासाठी दुस-यांनी आम्हाला सल्ला देऊ नये, असे पवार यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांना टोला हाणला. तसेच होय, ‘भगवा दहशतवाद’ हा शब्द माझाच आहे, असेही पवार यांनी ठामपणे सांगितले.
भाजप सरकारला पाठिंबा दिला असला तरी एखाद्या विधेयकाला विरोध असला तर आम्ही विरोधातही मतदान करू, असेही ते म्हणाले.
0
शिवसेनेचा विरोधी पक्षनेतेपदावर दावा

मुंबई – राज्यात भाजप सरकारला पाठिंबा द्यायचा की नाही याबाबत गोंधळात असलेल्या शिवसेनेने आज सोमवारी विधानसभेतील विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकला. शिवसेनेने विधानसभा सचिवांना अशा आशयाचे पत्रही पाठविले आहे. मात्र शिवसेनेची भाजपसोबत चर्चा अद्याप सुरु असून कॉंग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला म्हणून आम्ही दावा केल्याचे स्पष्टीकरण उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेनेची सहनशीलता म्हणजे लाचारी समजू नका. राजकीय प्रादुर्भावाचा उपाय माझ्याकडे आहे असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
दरम्यान ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सहीचे पत्र आम्ही विधानसभा सचिवांकडे पाठविले असून विधानसभेतील शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांना विरोधी पक्षनेता म्हणून जाहीर करण्यात यावं अशी मागणी केली आहे.’ अशी माहिती नीलम गोऱ्हे यांनी दिली. २८८ सदस्यसंख्या असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत शिवसेनेचे ६३ आमदार असल्याने विधिमंडळात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. त्याखालोखाल कॉंग्रेसचे ४२ तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ४१ आमदार निवडून आले आहेत.
0
चांगली पिढी घडविण्यासाठी प्रत्येकाने विधी साक्षर होणे आवश्यक – न्या.सविता बारणे

यवतमाळ (प्रतिनिधी) – आजच्या काळात केवळ पुस्तकी शिक्षण घेऊन साक्षर होणेच महत्वाचे नाही तर प्रत्येकाने कायद्याच्याबाबतीत साक्षर होणेही तितकेच महत्वाचे आहे. पुढील पिढी सक्षम निर्माण करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक असल्याचे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सविता बारणे यांनी व्यक्त केले.
जागतिक विधी साक्षरता दिनानिमित्त जिल्हा न्यायालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने विविध संघटना, शाळांच्या सहकार्याने विधी साक्षरता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी रॅलीचा शुभारंभ करतांना त्या बोलत होत्या. यावेळी विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीस सचिन आगरकर, वकील संघाचे अध्यक्ष राजेश चव्हाण आदी उपस्थित होते.
कायद्याने प्रत्येक घटकाला संरक्षण दिले आहे. त्यामुळे आपणासही आपले कर्तव्य, अधिकार याची जाणीव असली पाहीजे. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होऊ नये आणि दुसऱ्याचा आपल्यालाही होऊ नये, असे प्रत्येकाचे वर्तन असावे यासाठी कायदे असल्याचा उल्लेख पुढे बोलतांना श्रीमती बारणे यांनी केला.यावेळी वकील संघाचे अध्यक्ष राजेश चव्हाण यांचेही भाषण झाले. विधी साक्षरता रॅलीमागची भूमिका प्राधिकरणाचे सचिव न्या.आगरकर यांनी विषद केली. त्यानंतर श्रीमती बारणे यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ केला. सदर रॅली पोष्ट आँफीस चौक, हनुमान आखाडा चौक, इंदीरा मार्केट, पोलिस स्टेशन, येरावार चौक, एलआयसी चौक अशी फिरत पुन्हा जिल्हा न्यायालयात विसर्जीत झाली. यात सहभागी विद्यार्थ्यांनी विधी साक्षरतेबाबत जनजागृती करणारे फलक घेऊन विधी साक्षरतेचा संदेश दिला.
या रॅलीत जयंत देशमुख, प्राचार्य अविनाश शिर्के यांच्यासह सर्व न्यायीक अधिकारी, वकील मंडळी, कर्मचारी तसेच शिवाजी विद्यालय, सावित्रिबाई समाजकार्य महाविद्यालय, नारायणराव माकडे शाळा, महात्मा फुले नगर परिषद शाळेचे विद्यार्थी व शिक्षक, कर्मचारी वृंद मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.
0
जवखेडे खालसा दलित हत्याकांड; हिवाळी अधिवेशनावर विराट मोर्चा

वाशीम – अहमदनगर जिल्हयातील जवखेेडे खालसा येथे २२ ऑक्टोंबर रोजी जाधव कुटुंबातील तीन व्यक्तींची अमानुष हत्या करण्यात आली. ही घटना अत्यंत संतापजनक असून मानवतेला काळीमा ङ्गासणारी आहे. या घटनेच्या तपास कामात पोलिसांना अजूनही यश मिळाले नाही. या अमानवीय घटनेला १९ दिवस होवून गेले तरी महाराष्ट्राचे पोलीस अंधारातच आहेत. पुरोगामित्वाचा टेंभा मिरविणार्या या राज्यासाठी ही घटना अतिशय लांछनास्पद आहे. या संदर्भात पिपल्स रिपब्लीकन पार्टीच्या वतीने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा लॉगमार्चचे प्रणेते आ. प्रा. जोगेंद्र कवाडे सर, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आयु. गोपाळराव आटोटे यांच्या नेतृत्वात नागपूर येथे १५ डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनावर दलित अत्याचार धिक्कार विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी संपूर्ण राज्यातून तमाम भिमसैनिकांनी लाखोंच्या संख्येने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन प्रदेश अध्यक्ष गोपाळराव आटोटे यांनी केले आहे.
0
मुलीला परप्रांतात नेऊन विवाह लावणारी टोळी गजाआड

आरोपीमध्ये वडीलांचा समावेश, आईच्या सतर्कतेने प्रयत्न फसला
माहुर – ( प्रतिनिधी) यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील साईबोरी येथील अल्पवयीन मुलीला परप्रांतात विक्री करण्याचा डाव तीच्या आईने हाणूण पाडला. माहुर पोलिसांनी मुलीच्या वडीलासह टोळीतील सदस्यांना जेरबंद केले असून या घटनेने खळबळ उडाली आहे.
इंदल मोहन राठोड (४०) रा. साईबोरी ह.मु. पापलवाडी जि. नांदेड, दलाल काळु तुकाराम जाधव (२७) रा. खंडवा जि. खैरगौन मध्यप्रदेश याच्यासह अन्य तीन जणांना ताब्यात घेतले. राठोड याने आपल्या अल्पवयीन मुलीला जाधव या दलालाच्या माध्यमातून मध्यप्रदेशातील व्यक्तीला ५० हजार रुपयात विकले. त्यानंतर तीचा जबरीने विवाह करून देण्यात येणार होता. हा प्रकार मुलीची आई कुनीबाई राठोड हीला माहीत होताच माहुर पोलिसांना माहीती दिली. त्यावरून पोलीसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना अटक केली असून क्रुझर चालकासह तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी दतात्र्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक डॉ. अरुण जगताप, सहा. पोलीस निरीक्षक अनिल जाधव, जगदिश गिरी, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका वासनिक यांनी केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून अधिक तपास सुरू आहे.
0
गोदेवरील पूल खचला, दोन तालुक्यांचा संपर्क तुटला

औरंगाबाद (प्रतिनिधी) – गोदापात्रतील बेसुमार अवैध वाळूउपशाचा फटका शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील पुलाला बसला. जायकवाडी धरणातून दोन बंधा:यांसाठी गोदापात्रत पाणी सोडताच पैठण तालुक्यातील आपेगाव आणि बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील कुरणपिंप्री या गावांना जोडणारा पूल अचानक खचला. थोडय़ाच वेळात पुलाला जागोजागी तडे गेले. त्यामुळे दोन्ही तालुक्यांचा संपर्क तुटला आहे.
महसूल विभाग आणि पोलिसांच्या आशीर्वादामुळे औरंगाबाद जिल्ह्यात सध्या वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. वाळूपट्टय़ांची मुदत संपूनही वाळूमाफियांनी उपसा सुरूच ठेवला आहे. अनेक ठिकाणी पुलांच्या पायथ्याची वाळूसुद्धा उपसली जात आहे. अशा वाळूउपशामुळे पैठण तालुक्यातील आपेगाव आणि गेवराई तालुक्यातील कुरणपिंप्री या दोन गावांना जोडणारा पूल कमकुवत झाला होता. त्यात शुक्रवारी जायकवाडी धरणातून आपेगाव आणि हिरडपुरी बंधा:यांसाठी गोदावरी नदीच्या पात्रत पाणी सोडण्यात आले. आधीच कमकुवत झालेला हा पूल पाण्याच्या प्रवाहामुळे खिळखिळा झाला. पाण्याच्या प्रवाहामुळे पायाजवळील भरावाचा आधार निखळला. त्यामुळे हा पूल मधोमध खचला असून, त्याला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. या घटनेनंतर काही गावक:यांनी वेळीच येथून येणा:या-जाणा:या वाहनांना सूचना दिली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
बारा वर्षापूर्वी झाले पुलाचे बांधकाम
सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत 2क्क्2 साली या पुलाचे बांधकाम झाले होते. हा पूल दोन तालुक्यांना जोडणारा असल्याने येथून वाहतुकीचे प्रमाण जास्त आहे. पूल खचल्यामुळे वाहनांची ये-जा आता बंद झाली आहे. या घटनेविषयी बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता निवृत्ती चौरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मी सध्या बाहेरगावी आहे; पण शाखा अभियंता बी.बी. जायभाये यांना ताबडतोब घटनास्थळी पाठवतो, असे सांगितले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांनीही बांधकाम विभागाशी संपर्क साधून खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या.
0
सुरेश प्रभू यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

मुंबई (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्या मंत्रिमंडळात स्थान पटकावणारे सुरेश प्रभू यांनी रविवारी सकाळी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपामध्ये प्रवेश केला.
व्यवसायाने चार्टड अकाऊंटन्ट सुरेश प्रभू हे शिवसेनेचे माजी खासदार आहेत. १९९६ मध्ये राजापूर मतदारसंघातून सलग चार वेळा लोकसभेवर निवडून गेलेल्या प्रभू यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात उद्योग, उर्जा, अवजड उद्योग, पर्यावरण अशा महत्त्वपूर्ण खात्यांचा कार्यभार सांभाळला होता. त्यावेळी प्रभू यांच्या कामाचे सर्वच राजकीय पक्षांनी कौतुक केले होते. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर प्रभू हे शिवसेनेचे सदस्य असले तरी ते सक्रीय राजकारणात नव्हते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात सुरेश प्रभूंसाठी आग्रह धरला होता. मात्र शिवसेनेने प्रभू यांच्या नावाला विरोध दर्शवला होता. मात्र मोदींनी शिवसेनेचा विरोध झुगारुन प्रभू यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. शपथविधीपूर्वी सुरेश प्रभू यांनी शिवसेनेचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला.
0
शिवसेना विरोधी बाकावर बसेल – उद्धव ठाकरे

मुंबई (प्रतिनिधी) – भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा घेणार की नाही हे स्पष्ट करावे, भगवा दहशतवाद म्हणणा-या शरद पवारांची भाजपाने साथ घेतल्यास शिवसेना विरोधी बाकावर बसेल असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. मंत्रिपदासाठी शिवसेना लाचार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले असले तरी सत्तेत सहभागी होणार की नाही याविषयी उद्धव ठाकरेंचे तळ्यात मळ्यात सुरु असल्याचे चित्र दिसत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये सहभागी होण्यास नकार देत शिवसेेनेने भाजपाला त्यांचा ‘स्वाभिमान’ दाखवून दिला होता. त्यामुळे राज्यातही शिवसेना विरोधी बाकावर बसेल का याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. यापार्श्वभूमीवर रविवारी संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. लाचारी पत्कारुन आम्हाला केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी व्हायचे नाही , राज्याचे चित्र स्पष्ट होईपर्यंत केंद्रातील मंत्रिमंडळात सहभागी होण्यात आम्हाला रस नव्हता त्यामुळे मी अनिल देसाईंना दिल्ली विमानतळावरुन परतायला सांगितले असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदा भगवा दहशतवाद हा शब्द वापरला होता. तसेच वाजपेयी सरकार अवघ्या १३ दिवसांमध्ये पाडण्यात शरद पवारांचाच हात होता, या पवारांची भाजपा साथ घेणार का हे त्यांनी स्पष्ट करावे असा खोचक सवाल त्यांनी भाजपाला विचारला.
आम्हाला मंत्रिपदाची आस नसून जनतेशी प्रतारणा करणार नाही असे सांगत हिंदूत्ववादी पक्षांनी एकत्र राहावे हीच आमची इच्छा असल्याचे त्यांनी नमूद केले. उद्या गटनेता त्यांच्या पदाची जबाबदारी स्वीकारतील, परवा विधानसभा अध्यक्षांची निवड होईल, यानंतरच पुढील चित्र स्पष्ट होणार असून विधानसभा अध्यक्षपदासाठी कदाचित आमचा उमेदवारही रिंगणात असेल असे सूचक विधान त्यांनी केले. भाजपाने भूमिका जाहीर केली नाही तर आम्ही विश्वासदर्शक ठरावात त्यांच्याविरोधात मतदान करु असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाला ४८ तासांचे अल्टिमेटमच दिले. तसेच केंद्राविषयी मात्र रविवारी सकाळी स्वाभिमानाची भाषा करणा-या शिवसेनेने पुन्हा एकदा ठोस भूमिका घेण्याचे टाळले आहे. केंद्रातील सत्तेतून बाहेर पडणार का हेदेखील आगामी दोन दिवसांत स्पष्ट होईल असे ठाकरेंनी म्हटले आहे.
0
सत्यमेव जयते – पुरुषांची ‘मर्दानगी’

मुंबई (प्रतिनिधी) – अनेकदा देशातील हिंसाचारांच्या घटनांना पुरुष कारणीभूत असतात. पौरुषत्वाच्या भावनेने हा हिंसाचार घडतो. मात्र कधी कधी हेच पौरुषत्व मात्र अनेकांना हानीकारक ठरते. याच विषयावर सत्यमेव जयतेच्या सहाव्या भागात चर्चा करण्यात आली. सत्यमेव जयतेचा तिस-या पर्वातील हा अखेरचा भाग होता.
यावेळी आमिरने हिंसाचारांच्या घटनांमध्ये बळी पडलेल्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. तसेच वाढते रॅगिंगचे प्रमाण या मुद्द्यावरही या भागात भाष्य करण्यात आले. पुरुषत्व सिद्ध करण्याच्या ईष्येने अनेकदा अॅसिड हल्ला, बलात्कार यांसारख्या भयानक घटना घडतात. अॅसिड हल्ला पिडीत लक्ष्मी या युवतीसोबतही आमिरने या भागात चर्चा केली. तसेच कंगना राणावत, दिपीका पदुकोण आणि परिणीती चोप्रा या तीन बॉलीवूड अभिेनेत्रींनीहीया भागात सहभाग घेतला होता.
0
केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार, २१ नव्या मंत्र्यांचा समावेश
नवी दिल्ली (प्रतिनिधी) – मनोहर पर्रिकर, जे.पी.नड्डा, मुक्तार अब्बास नक्वी यांच्यासह २१ नव्या चेह-यांचा मंत्रिमंडळात समावेश करत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार करण्यात आला आहे . १४ राज्यमंत्री, चार कॅबिनेट मंत्री आणि तीन राज्यमंत्र्यांनी(स्वतंत्र प्रभार) यावेळी शपथ घेतली.
राष्ट्रपती भवनामधील दरबार हॉलमध्ये रविवारी हा शपथविधीचा हा सोहळा पार पडला. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या सर्व मंत्र्यांना शपथ दिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्री, भाजपचे खासदार यावेळी उपस्थित होते.
गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह जे.पी.नड्डा, सुरेश प्रभू, वीरेंद्र सिंह चौधरी यांनी केंद्रीय कॅबिनेटमंत्रिपदाची शपथ घेतली तर बंडारु दत्तात्रय, राजीव प्रताप रुडी, महेश शर्मा यांनी राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार)पदाची शपथ घेतली. यासोबतच गिरीराज सिंग, मोहन कुंदारिया, सनवर लाल जट, हरिभाई पार्थीभाई चौधरी, राम कृपाल यादव, मुख्तार अब्बास नक्वी, हंसराज आहिर ,डॉ. रामशंकर कटेरिया , वाय.एस.चौधरी(इंग्रजीमध्ये शपथ घेतली) ,जयंत सिन्हा ,राज्यवर्धन सिंग राठोड , बाबूल सुप्रियो(इंग्रजीमधून शपथ घेतली), साध्वी निरंजन ज्योती, विजय सम्पला यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
कॅबिनेट मंत्री
मनोहर पर्रिकर,जे.पी नड्डा,सुरेश प्रभू,वीरेंद्र सिंह चौधरी
राज्यमंत्री
गिरीराज सिंग, मोहन कुंदारिया, सनवर लाल जट,हरिभाई पार्थीभाई चौधरी,राम कृपाल यादव, मुख्तार अब्बास नक्वी, हंसराज आहिर, डॉ. रामशंकर कटेरिया, वाय.एस.चौधरी ,जयंत सिन्हा, राज्यवर्धन सिंग राठोड, बाबूल सुप्रियो ,साध्वी निरंजन ज्योती, विजय सम्पला
राज्यमंत्री(स्वतंत्र प्रभार)
बंडारु दत्तात्रय, राजीव प्रताप रुडी, डॉ. महेश शर्मा













