
नवी दिल्ली, दि. १८ – माहिती तंत्रज्ञानासंबंधी महत्वपूर्ण माहिती उपल्बध करुन देणा-या गूगलने भारताचा चुकीचा नकाशा दाखविल्याने गूगलविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. देहराडूनमधील डालनवाला पोलीस ठाण्यात आयटी एक्ट अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्याचे अनिल कुमार जोशी यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय नकाशामध्ये भारताच्या अनेक सीमा या इतर देशांच्या नकाशामध्ये दाखविण्याचा प्रताप गूगलने केला आहे. भारतीय सर्वेक्षण विभागाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी गूगलविरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती. भारतीय सर्वेक्षण विभागाच्या तक्रारीनंतर देहराडूनमध्ये गूगलविरुध्द आयटी एक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Archive for December, 2014
0
भारताचा चुकीचा नकाशा दाखविणा-या गूगलविरूध्द गुन्हा
0
शाळेत चिमुरडीवर बलात्कार

मुंबई : चार वर्षांच्या विद्यार्थिनीवर शाळा अधिकाऱ्याने केलेले लैंगिक अत्याचार कुटुंबीयांनी लाजेखातर दडवून ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. भांडुपमधील एका खासगी शाळेत हा प्रकार घडल होता. याहून धक्कादायक बाब ही, की त्रास होऊ लागल्याने ही चिमुरडी भांडुपच्या सावित्रीबाई फुले व घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी आली. सर्व प्रकार समजूनही रुग्णालयाने या गुन्ह्याची माहिती पोलिसांना दिली नाही.
भांडुप पश्चिमेकडील तुलशेत पाडा परिसरात असलेल्या माउंट मेरी या खासगी शाळेत ९ डिसेंबर रोजी ज्युनिअर केजीत शिकणाऱ्या चार वर्षांच्या चिमुरडीसोबत हा प्रकार घडला. मधल्या सुटीत शौचालयात गेलेल्या चिमुरडीसोबत शाळेच्या प्रशासकीय विभागात पर्यवेक्षक म्हणून कार्यरत असलेल्या केसरीनंदन उपाध्याय (३२) ऊर्फ छोटू सर याने लैंगिक चाळे केले. आई, मावशीसोबत आजोळी राहणाऱ्या या चिमुरडीने संध्याकाळी घरी जाताच घडला प्रकार आजीच्या कानावर घातला. घाबरलेल्या आजीने कुटुंबाला या प्रकाराची माहिती दिली. मात्र या प्रकाराचा बोभाटा झाल्यास अब्रू जाईल, समाजात नाक कापले जाईल या विचाराने कुटुंबाने पोलीस ठाणे गाठून तक्रार देणे टाळले.
दरम्यान, रात्री उशिरा या चिमुरडीच्या पोटात वेदना होऊ लागल्या. दुसऱ्या दिवशी, १० डिसेंबरला आजीने चिमुरडीला भांडुपच्या सावित्रीबाई फुले प्रसुतीगृहात उपचारार्थ नेले. तेथील डॉक्टरांना घडला प्रकारही सांगितला. मात्र हे प्रसूती गृह आहे. येथे नातीवर उपचार होणार नाहीत असे सांगून डॉक्टरांनी आजीला राजावाडी रूग्णालय गाठण्याचा सल्ला दिला. सोबत प्रसुतीगृहाची रूग्णवाहिका जोडून दिली. राजावाडी रूग्णालयातही आजीने नातीवर घडला प्रकार सांगितला. राजावाडी रूग्णालयातून उपचार घेऊन त्याच दिवशी चिमुरडी घरी परतली.
मात्र १२ डिसेंबरला चिमुरडीचा त्रास वाढला. तिला असह्य वेदना होऊ लागल्या. त्यामुळे कुटुंबियांनी चिमुरडीला पुन्हा राजावाडी रूग्णालयात नेले. मात्र बाह्यरूग्ण विभागातील डॉक्टर निघून गेल्याने चिमुरडीला तसेच घरी आणण्यात आले.
दरम्यान, काल संध्याकाळी परिसरातील स्वयंसेवी संस्थेने चिमुरडीवर बलात्कार करणाऱ्या पर्यवेक्षकाविरोधात गुन्हा का दाखल करत नाही, असा जाब भांडुप पोलिसांना विचारला. तोवर भांडुप पोलिसांना असा काही प्रकार घडला असेल याची कल्पनाही नव्हती. अचानक झालेल्या या हल्ल्याने पोलीसही गांगरले. अखेर स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने भांडुप पोलिसांनी या चिमुरडीचे घर शोधून काढले. चिमुरडीला विश्वासात घेऊन बोलते केले. सोबत कुटुंबियांकडेही चौकशी केली. तेव्हा ९ डिसेंबरला घडलेला प्रकार समोर आला. सोबत कुटुंबियांना गुन्हा नोंदिवण्यास वाटलेल्या लाजेसोबत महापालिका रूग्णालयांचा भोंगळ कारभारही उघड झाला.
काल रात्री भांडुप पोलिसांनी या लहान मुलीचा, तिच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवून घेतला. त्यात मुलीने छोटू सरांनी (आरोपी केसरीनंदन उपाध्याय)केलेल्या अत्याचाराची माहिती दिली. पोलिसांना छोटू सर इतकेच आरोपीचे नाव माहिती होते. त्यामुळे आज सकाळी शाळा उघडताच पोलिसांनी तेथे कार्यरत असलेल्या सर्वच पुरूषांना पोलीस ठाण्यात आणले आणि चिमुरडीसमोर उभे केले. तेव्हा चिमुरडीने आरोपी उपाध्याय उर्फ छोटू सर याच्याकडे बोट दाखवताच पोलिसांनी त्याला अटक केली. उपाध्यायविरोधात भांडुप पोलिसांनी बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचारातील कलमांनुसार गुन्हा नोंदविला आहे. उद्या त्याला न्यायालयात हजर केले जाईल.
0
मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम , राज्य सरकारला धक्का

नवी दिल्ली, दि. १८ – मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणा-या राज्य सरकारच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने गुरुवारी नकार दिला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम राहणार असून सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे राज्य सरकारलाही जोरदार दणका बसला आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारने सरकारी नोकरी व शिक्षण क्षेत्रात मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ५२ टक्क्यांपेक्षा अधिक आरक्षण देता येत नसल्याचे सांगत मुंबई हायकोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती कायम ठेवली होती. तर मुस्लिम समाजासाठी शिक्षण क्षेत्रामध्येच आरक्षण देण्याची परवानगी दिली होती. या विरोधात नवनियुक्त भाजपा सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने या याचिकेवर सुनावणीसाठी नकार दिला आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात पुन्हा न्यायालयात जाण्याची भूमिका राज्य सरकारने घेतल्याची माहिती महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी विधान परिषदेत दिली.
0
भाजप नेत्यांनी काढली राजीव गांधी यांची कुंडली


नवी दिल्ली , दि. १८ – भारतीय शास्त्रज्ञ-संशोधक विज्ञानाच्या मदतीने जग कवेत घेणाऱ्या नवनव्या मोहिमा आखत असताना देशातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये ग्रहगोल आणि शकुनअपशुकनांचे ‘ज्योतिषयुद्ध’ रंगले आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती ईराणी यांच्या ‘भविष्यवेध’ कार्यक्रमामुळे गोत्यात आलेल्या भाजपने आता काँग्रेसवर पलटवार केला आहे. पंडित नेहरू यांच्या ज्योतिषश्रद्धेचा पुरावा म्हणून भाजप नेत्यांनी राजीव गांधी यांची कुंडलीच काढली आहे.
मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती ईराणी यांनी काही दिवसांपूर्वी एका ज्योतिषाला हात दाखवून भविष्य जाणून घेतल्यामुळं भाजपला टीकेचा सामना करावा लागला होता. काँग्रेसनं पंडित नेहरूंच्या विज्ञानवादाचा हवाला देत भाजपवर टीकेची झोड उठवली होती. काँग्रेसचा हा हल्ला भाजपने त्यांच्याच शस्त्राने परतावून लावला आहे. भाजपने बुधवारी एका पत्रकार परिषदेत पंडित नेहरू यांनी लिहिलेले पत्रच प्रसिद्ध केले. या पत्रातून नेहरू यांनी त्यांचे नातू व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जन्मकुंडली बनविण्याचा आग्रह धरल्याचे दिसत आहे.
राजीव गांधी यांच्या जन्मानंतर काही दिवसांनी म्हणजेच, २९ ऑगस्ट १९४४ रोजी नेहरू यांनी कृष्णा हाथीसिंग यांना लिहिलेल्या पत्रात राजीव यांची योग्य कुंडली बनविण्याचे निर्देश दिले होते. इंदिरा गांधी यांनाही त्यांनी कुंडली बनविण्यासाठी चांगल्या ज्योतिषाचा शोध घेण्यास सांगितलं होतं. तसं या पत्रात त्यांनी स्वत: नमूद केलं आहे. कुंडलीतील वेळ ही सौरवेळ असावी, सध्याची प्रचलित वेळ नसावी, असंही नेहरूंनी यात म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत नेहरूंचं हे पत्र भाजपने काल मीडियाला दिलं. भाजपच्या या खेळीमुळं काँग्रेस तोंडघशी पडली आहे.
0
बलात्कार पीडितेच्या घरी प्रदर्शन मांडणार नाही – मंत्री पंकजा मुंडे

नागपूर , दि. १८ – ‘बलात्कारामुळे त्या महिलेवर मोठा आघात झाला असतो. या आघातातून पीडितेला बाहेर काढणे गरजेचे आहे. पीडितेला मदत कशी करता येईल यासाठी हवे ते प्रयत्न करेल; मात्र बलात्कार पीडितेच्या घरी जाऊन प्रदर्शन मांडणार नाही’, असा निश्चय महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी केला.
राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने विधानपरिषदेच्या सभागृहात चालविण्यात येणाऱ्या संसदीय अभ्यासवर्गात पंकजा मुंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी आमदार प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. पीडित व्यक्तीच्या घरी मंत्री, नेते यांच्या भेटी वाढल्याने कशी स्थिती उत्पन्न होऊ शकते याचे चित्रण आमीर खानच्या ‘पिपली लाइव्ह’ या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. असे प्रकार घडू नयेत म्हणून पीडितेच्या घरी जाणार नसल्याचा निर्णय मुंडे यांनी घेतला.
मुंडे यांनी या चित्रपटाचा उल्लेख केला नसला तरी या चित्रपटाची आठवण अनेकांनी ताजी केली. पीडित महिलेला समाजात पुन्हा आत्मविश्वासाने जगण्यासाठी उभे करण्यासाठी तिची ओळख पटू नये ही खबरदारी घेण्याची गरज आहे. मात्र, मंत्री पीडित महिलेल्या घरी गेल्यास संपूर्ण ताफा घेऊन जातो. अशा स्थितीत त्या महिलेच्या वैयक्तिक अधिकारावर गदा येऊ शकते. त्यामुळे आपण हा प्रकार करणार नसल्याचे सांगत पीडित महिलेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
बलात्कारासारख्या संवेदनशील घटनेचेही भडक चित्रीकरण करणाऱ्या माध्यमांवर रोख कशी लावता येईल, हा प्रश्न एका विद्यार्थिनीने विचारून महिला नेत्यांपुढे कोडे निर्माण केले. प्रणिती शिंदे यांनी माध्यमे चौथा स्तंभ असल्याचे सांगून त्याचे महत्त्व स्पष्ट केले. मात्र, यावर सेन्सॉर कोण लावणार, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी त्यांनी माइक पंकजा यांच्याकडे सरकवला. प्रत्येकाचे वैयक्तिक जीवन जपले पाहिजे. बलात्कार, हत्याकांड या निर्घृण प्रकाराचे भडक चित्रीकरण नको, असा विचार मांडत चित्रपटांना सेन्सॉर आहे, मात्र माध्यमांवर का नाही, असा सवाल पंकजा यांनी उपस्थित केला. परदेशी माध्यमांपेक्षा भारतातील मीडिया संवेदनशील असल्याचेही त्यांनी यावेळी मान्य केले. बचतगटाचा उपक्रम महिलांना बळकटी देणारा आहे. मात्र, हा उपक्रम केवळ आर्थिक सक्षमीकरण ठरू नये तर महिलांना या उपक्रमाच्या माध्यमातून मानसिक सक्षमीकरणाचीही अधिक गरज असल्याचे शिंदे म्हणाल्या.
स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मात्र, महिलांऐवजी त्यांचे पतीच अधिकार गाजवितात, ही स्थिती पाहायला मिळते. पतीचे मार्गदर्शन घेण्यात काहीच हरकत नाही; मात्र पतीचे वर्चस्व निर्माण व्हायला नको. पुढील १० वर्षांत हे चित्र पालटेल आणि महिला स्वतःचे निर्णय स्वतः घेतील असा विश्वासही मुंडे यांनी व्यक्त केला.
0
खड्ड्यामुळे महिलेचा मृत्यू , संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा

मुंबई, दि. १८ -अहमदाबाद व्हाया मनोर, वाडा, भिवंडी मार्गे पनवेल हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा ठरू लागला आहे. या रस्त्यावरील खड्ड्यामुळे गुरुवारी शर्मिला राजेश पाटील (२५) या महिलेला प्राण गमावावा लागला आहे. याघटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने हा मार्ग तब्बल सात तास रोखून धरला होता. सार्वजनिक बांधकाम खात्यातील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केल्याशिवाय अपघातग्रस्त ठिकाणावरून मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेतल्याने वातावरणात तणाव निर्माण झाला होता. अखेर, संध्याकाळी जव्हारचे पोलिस उपअधिक्षक प्रदीप जाधव यांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला.
गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास शर्मिला पाटील त्यांच्यासमवेत दुचाकीवरून जात असताना, रस्त्यावरील खड्ड्यामुळे दुचाकीचा तोल गेल्याने त्या खाली पडल्या. त्याचवेळी समोरून आलेल्या ट्रकखाली त्या चिरडल्या गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच या परिसरातील संतप्त जमावाने सहा तासांहून अधिकवेळ हा मार्ग रोखून धरला होता. यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. या रस्त्याच्या दुरूस्ती वारंवार मागणी करूनही याकडे सार्वजनीक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांच्या संतापाचा भडका उडाला होता. बांधकाम विभागाच्या अभियंत्यांसह इतर अधिकाऱ्यांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याशिवाय शर्मिला यांचा मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका त्यांच्या नातेवाईकांसह अन्य नागरिकांनी घेतल्याने वातावरण तणावग्रस्त झाले होते.
संतप्त जमावाला वाडा येथील तहसीलदार संदीप चव्हाण व पोलिस अधिकारी संजय हजारे यांनी फिर्याद नोंदवून घेत असून, चौकशी झाल्यानंतर दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. मात्र, जमावाने प्रथम गुन्हा दाखल करण्याचा आपल्या मागणीवर ठाम राहिले होते. यानंतर संतप्त जमावाने वाडा येथील सार्वजनीक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोडही केली. दरम्यान, या महामार्गावरील वाहतूक सहा ते सात तास रोखून धरल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. संध्याकाळी सात पर्यंत मृतदेह घटनास्थळावरून न उचल्याने वातावरण अधिकच गंभीर होऊ लागले होते. अखेर जव्हार पोलिस उपअधिक्षक प्रदीप जाधव घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी संतप्त जमावाची समजूत घातली. तसेच, सार्वजनीक बांधकाम खात्यामधील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच येत्या तीन दिवसांत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर या जमावाने आंदोलन मागे घेत,शर्मिला पाटील यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे.
0
२६/११चा सूत्रधार लख्वीला जामीन

इस्लामाबाद, दि. १८ – दोनच दिवसांपूर्वी पेशावरमधील तालिबानी हल्ल्यानं हादरलेल्या आणि दहशतवाद संपवायची भाषा करणाऱ्या पाकिस्ताननं आपले खरे रंग लगेचच दाखवले आहेत. २६/११च्या मुंबई हल्ल्याचा प्रमुख सूत्रधार, लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या झकीउर रेहमान लख्वीला रावळपिंडीच्या कोर्टानं आज जामीन मंजूर केला आहे. त्यातून त्यांचा खोटेपणा आणि भारताबद्दलचा द्वेषच स्पष्ट होतो.
२६/११च्या मुंबई हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचा, माहिती पुरवल्याचा आरोप झकीउर रेहमान लख्वीवर आहे. मोहम्मद अजमल कसाबच्या कुटुंबाला त्यानं आर्थिक मदतही केली आहे. त्याच्याविरोधातील पुरावे सापडल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आणि रावळपिंडीच्या अडियाला जेलमध्ये त्याची रवानगी झाली. त्याचा ताबा देण्याची मागणी भारत सरकारनं अनेकदा पाकिस्तानकडे केली आहे. परंतु, एरवी मैत्रीची भाषा करणारं पाक सरकार त्याबद्दल काहीच बोलत नाही. त्यांच्या या कावेबाजपणा आज पुन्हा उघड झाला. रावळपिंडी कोर्टानं लख्वीला जामीन मंजूर केल्यानं त्याचा जेलमधील मुक्काम संपणार आहे. दहशतवाद संपवण्याच्या गर्जना करणारं पाकिस्तान दहशतवादाला खतपाणी घालत असल्याचंच या जामिनातून पुन्हा समोर आलंय. पेशावरमधील अमानुष हल्ल्यातूनही त्यांनी काहीच बोध घेतलेला नाही.
0
महसूल राज्यमंत्र्यांकडून विकास कामांचा आढावा, दारव्हा पाणीपुरवठा योजनेतील अडचणी दुर करू – संजय राठोड
यवतमाळ, दि. १८ : जिल्ह्यातील दारव्हा येथील पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी वितरण व्यवस्थेसह नवीन पाणीपुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला आहे. अडाण प्रकल्पावर आधारीत या योजनेला गती देण्यासोबत अस्तित्वास असलेली पाणी पुरवठा योजना सुरळीत सुरू ठेवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. श्री.राठोड यांनी यवतमाळ जिल्ह्यातील विविध विकास कामे तसेच प्रलंबित कामांचा आढावा नागपूर येथील रविभवनात आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.शरद कुळकर्णी, पोलिस अधिक्षक संजय दराडे, विज वितरणचे अधिक्षक अभियंता बाबासाहेब जाधव, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
दारव्हा येथील प्रस्तावित योजना 41 किमी अंतराची असून अडाण प्रकल्पावर ती आधारीत आहे. योजनेला तांत्रिक मान्यता प्राप्त झाली असून सुजल निर्मल अभियानांतर्गत सदर योजना घेण्यात आली आहे. या योजनेला शासनस्तरावर गती देण्यासाठी मुंबई येथे स्वतंत्र बैठक बोलाविली जाणार असल्याचे श्री.राठोड म्हणाले. दारव्हा येथील योजनेसह प्रस्तावित प्रशासकीय ईमारत, वणी येथील बाजार गाळे,नेर येथील वळण रस्ता, हरसूल-वनोली-मोरखेड रस्ता तसेच वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वेमार्गाच्या भूसंपादनाचा आढावाही त्यांनी घेतला. नेर येथे प्रशासकीय तथा पोलिस स्टेशनच्या ईमारतीसाठी प्रस्ताव सादर करण्याची सुचना त्यांनी केली. दारव्हा येथे मागासवर्गीय मुला-मुलींच्या वसतीगृहासाठी शासकीय जागा उपलब्ध नसल्यास बाजार भावाने जागा खरेदी करण्याची कार्यवाही करण्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील रस्त्यांची स्थिती, अंगणवाडीचे बांधकाम, चारा टंचाई, दृष्काळस्थिती, सिंचन आदींचा आढावाही त्यांनी घेतला.
0
तीन मुलांना टाकून मातेचे पलायन, पोलीस स्टेशन समोर घटना

यवतमाळ , दि. १७ – तीन मुलांना वाºयावर सोडून मातेने पलायन केल्याचा धक्कादायक प्रकार आज बुधवारी पुसद शहर पोलिस ठाण्यापुढे उघडकीस आला. ही बाब लक्षात येताच ठाणेदार व पोलीस कर्मचाºयांनी या तीनही मुलांना मायेची उब दाखवत न्यायालयात हजर करण्यापूर्वी महिला पोलिस शिपायाच्या अधिनस्त देखरेखीत ठेऊन मानवतेचा धर्म पाळला. या घटनेने शहरामध्ये खळबळ उडाली आहे.
पुसद येथील तुकारामबापू वॉर्डातील अनुसया रमेश आडे या मातेचे हे कृत्य आहे. दोन दिवसांपूर्वी या महिलेने ६ वर्षाची एक मुलगी, ४ वर्षाचा आणि दिड वर्षाचा असे दोन मुले चक्क पुसद शहर पोलिस ठाण्यापुढे बेवारस टाकून पलायन केले. ९ महिन्यानंतर अत्यंत कष्टप्रद परिस्थितीत जन्मलेली ही बालके चक्क आईनेच उघड्यावर टाकली. पुसद शहर पोलिस ठाण्यापुढे तीनही पोटच्या गोळ्यांना वाºयावर सोडून मातेने पलायन केले. अन्न, निवारा आणि थंडीचा प्रकोप यामुळे मेटाकुटीस येवून रडवेल्या स्वरात मातेसाठी झिंगलेली ही कोमल बालके पुसद शहर ठाणेदाराच्या दृष्टीस पडली. त्यांनी तात्काळ संबधित कर्मचाºयांना पाठवून या तीनही भावंडांना पोलिस ठाण्यात आणले. त्यांची जेवणाची, राहण्याची व्यवस्था करण्यासह थंडीपासून बचाव होण्याकरीता कपडेलत्ते घेतले. सध्या ही तीनही चिमुरडी पुसद शहर पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस शिपायाच्या देखरेखीत आहेत. यांच्या मातेने या तीनही मुलांना वाºयावर सोडून पलायन का केले हे अजूनही गुलदस्त्यात आहे. परंतु ‘खाकी’ ने या तीनही भावंडांना मायेची उब देवून दोन दिवसांपासून जोपासले. उद्या १८ रोजी या तीनही भावंडांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. त्यामुळे मातेपासून दुरावलेल्या या तीनही भावंडांची बालसुधारगृहात रवानगी होण्याची शक्यता पोलिस सुत्रांनी वर्तविली आहे.
0
मुख्यमंत्र्यांकडून यवतमाळ जिल्ह्याचा आढावा

यवतमाळ, दि. १७ : शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सिंचनाच्या सोई उपलब्ध करुन देणे आवश्यक असून यवतमाळ जिल्ह्यातील ज्या-ज्या धरणांमध्ये पाणीसाठा उपलब्ध आहे, तेथील पाणी वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल. उपलब्ध पाण्याचा जास्तीत जास्त वापर वाढविण्यासाठी वितरण व्यवस्थेला प्राधान्य देण्याचे धोरण असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. विधान भवनातील कॅबिनेट हॉलमध्ये मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील सिंचन, वीज, बांधकाम, पाणीपुरवठा यासह विविध विभागांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, महसुल राज्यमंत्री संजय राठोड, उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे, माजी मंत्री आ.मनोहर नाईक,
आ.माणिकराव ठाकरे, आ.संदिप बाजोरिया, आ.हरिभाऊ राठोड, आ.ख्वाजा बेग, आ.मदन येरावार, आ.राजू नजरधने, आ.संजीव रेड्डी बोदकुरवार, डॉ.अशोक उईके, आ.राजू तोडसाम यांच्यासह ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अजय मेहता, जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालीनी शंकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रविण परदेशी, रोहयो सचिव प्रभाकर देशमुख, मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलींद म्हैसकर, प्रविण दराडे, लाभक्षेत्र विकास सचिव श्री.मेंढेगिरी, यवतमाळचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शरद कुळकर्णी, पोलीस अधीक्षक संजय दराडे आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी यवतमाळ जिल्ह्यात सिंचनाच्या सुविधा निर्माण करण्यासोबतच विकास कामाला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगितले. अनेक प्रकल्पांमध्ये साठा उपलब्ध असतांनाही सिंचनासाठी हा साठा उपलब्ध होत नाही. त्यामुळेच जिल्ह्यातील ज्या-ज्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठी उपलब्ध आहे तेथे वितरण व्यवस्थेसाठी निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पाणी वापर वाढला पाहिजे त्यामुळे जिल्ह्यातील उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. निम्न पैनगंगा हा प्रकल्प जिल्ह्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने या प्रकल्पाच्याबाबतीत त्वरीत निर्णय होणे आवश्यक आहे. त्यामुळे या प्रकल्पाबाबत स्वतंत्र बैठक घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. बेंबळा प्रकल्पाचे भुसंपादन व मोबदल्याची अनेक प्रकरणे प्रलंबित आहे. याबाबत बोलतांना मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचे पैसे द्यावेच लागतात त्यामुळे विलंब न करता ही प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासोबतच बेंबळा प्रकल्प पुर्नवसनाच्या असलेल्या समस्यांची चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना बैठकीत केल्या. बेंबळा प्रकल्पावर डेहनी उपसा सिंचन प्रकल्प राबविण्यात येत आहे. निधीमुळे या प्रकल्पाचे काम थांबले आहे. काम तातडीने मार्गी लागावे म्हणून आठ कोटीचा निधी लवकरच दिला जाणार आहे. यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जिल्ह्यातील आमडापूर, अरुणावती, कोहळ या प्रकल्पांसह जिल्ह्यातील एकूणच सिंचन परिस्थितीची माहिती घेऊन सूचना केल्या. बैठकीत जिल्ह्यातील रस्त्यांच्या स्थितीवरही चर्चा झाली. विशेषत: वणी विभागात कोळशाच्या जड वाहतूकीमुळे अनेक रस्ते खराब झाले असल्याचे संबंधित विभागाने सांगितल्या नंतर ज्या-ज्या ठिकाणी जड वाहतूक होते अशा ठिकाणी काँक्रीटचे रस्ते घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या. या रस्त्यांवर जड वाहनांवर टोल लावा आणि अशा रस्त्यांचे प्रस्ताव तयार करुन सादर करा, असे ते म्हणाले. नागपूर-हैद्राबाद या महामार्गवरील यवमाळ जिल्ह्यातील रस्ता अतिशय खराब झाला आहे. रस्त्याची देखभाल दुरुस्तीही होत नाही. तसेच करंजी-वणी-घुग्गुस या रस्त्याचे कामही अतिशय संथ गतीने सुरु आहे. या कामाचीही चौकशी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या. बैठकीत कृषि पंपांना वीज जोडणी देण्याच्या विषयावरही सविस्तर चर्चा झाली. जिल्ह्यात प्रलंबित असलेल्या जोडण्या देण्यासोबतच ट्रान्सफार्मर बदलविण्याचे काम सुरु असून राहिलेले चाळीस ट्रान्सफार्मर त्वरीत बसविण्याच्या सूचना त्यांनी वीज विभागाला केल्या. बैठकीत ग्रामीण पाणीपुरवठा, जलयुक्त शिवार, जिल्ह्यातील पिक परिस्थिती, रब्बीतील पिके आदी विषयांवरही चर्चा झाली.
0
उसतोड न केल्याने शेतकºयांची आत्महत्या

यवतमाळ , दि. १७ – डेक्कन शुगर कारखान्याने उस तोड न केल्याने वादातून मारहाण झाल्याने लिंगी येथील शेतकºयाने आत्महत्या केली. मोतीलाल कुटे (४५) रा. लिंगी (सायखेडा) असे मृतक उस उत्पादक शेतकºयाचे नाव आहे.
डेक्कन शुगरन गेटकेनच्या परिसरात शंभर उस तोड करणाºया टोळ््या बसविल्या. त्यापैकी केवळ ५० टोळ््या या गेटमध्ये आहे. गेटकेनच्या बाहेरची उस तोड झपाट्याने सुरू असून परिसरातील उसावर दुर्लक्ष केल्या जात आहे. आपल्या शिवाय या शेतकºयांना पर्याय नाही अश्या तोºयात डेक्कनचे व्यवस्थापन राहत आहे. त्याचे हे धोरण शेतकºयांच्या जिवाशी खेळ करीत आहे. नोव्हेबर-डिसेंबरचा उस शेतात उभा आहे. पण गेटकेवर मेहरबानी होत आहे. डेक्कन शुगरच्या या कार्यक्रमणालीच्या शेतकºयाला फटका बसतो आहे. सायखेडा येथील रहिवासी असलेल्या आर्णी तालुक्याचे कृषी सहाय्यकाने फक्त याच शेतकºयांची उस तोड केली नाही. या बाबत जाब विचारण्या करीता शेतकरी मोतीलाल कुटे गेल असता तेथे वाद झाला. त्यानंतर रात्री कृषी सहाय्यकाने आपल्या सहकाºयांसोबत कुटे याच्या घरी जाऊन मारहाण केली होती. या मारहाणीचा व उस वाळत असून तोड होत नसल्याने हताश होऊन १३ डिसेंबर रोजी विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार कुटुंबीयाच्या निदर्शनास येताच सदर शेतकºयाला प्रथम आर्णी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शेतकºयाचा मृत्यू झाला. आज बुधवारी लिंगी येथे या शेतकºयांवर अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तहसीलदार गांगुर्डे याच्यासह नागरिक उपस्थित होते. त्याच्या मागे आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे.
0
वृद्ध महिलेवर अत्याचार

यवतमाळ , दि १७ – मनोरूग्ण असलेल्या वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची घटना बाभुळगाव तालुक्यातील दिघी येथे मंगळवारी घडली. गणेश फुंडे (३७) याने घरी कुणी नाही या संधीचा फायदा घेत सदर महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
दिघी (क्र.२) येथील वृद्ध महिला घरातील मंडळी बाहेरगावी गेल्याने घरी एकटीच होती. याच संधीचा फायदा घेत घरात घुसून गणेशने सदर महिलेवर अत्याचार केला. पिडीत महिलेच्या नातेवाईकांनी बाभूळगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून आरोपीविरूद्घ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तालुकाध्यक्ष वंदना होटे यांनी पिडीत महिला व तिच्या नातेवाईंना धीर देत मदत केली व आरोपीस तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे.
0
भारतावर दहशतवादी हल्ल्याचा कट

नवी दिल्ली, दि. १७ – मुंबईवर २६/११ रोजी करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफिज सईद पुन्हा एकदा भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचीत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे.
सेंट्रल इंटेलिजेन्स एजन्सी (सीआयए ) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार हाफिज सईदच्या रडारवर दिल्लीतील दोन हॉटेल्स आणि नवी दिल्ली-आग्रा हायवे रोड आहे. तसेच मेट्रो सुध्दा त्याच्या निशाण्यावर असल्याचे सांगण्यात आले आहे. देशातील सर्व राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. तसेच शहरातील शाळा आणि मॉल्सच्या परीसरातही सुरक्षा व्यवस्था कडक करण्याच्या सूचना राज्य सरकारांना देण्यात आल्या आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे येत्या २६ जानेवारी स्वातंत्र्यदिनी प्रमुख पाहुणे म्हणून भारतात येणार आहेत. बराक ओबामा यांच्या आगमनाआधी दहशतवादी भारतात हल्ला करू शकतात यासाठी देशभरात कडक सुरक्षा ठेवण्याचे आदेश सुरक्षा यंत्रणांना देण्यात आले आहेत.
0
अभिनेत्रीला किस करण्यासाठी बोली

नवी दिल्ली, दि. १७ – आपल्या आवडत्या व्यक्तीचा किस घेण्यासाठी एकाने तब्बल १५ लाख रुपये मोजले आहेत.
अमेरिकन टीव्ही अभिनेत्री डिएना अग्रोन ही एका सोशल नेटवर्किंग साईटच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. त्यावेळी डिएनाने एका चॅरिटेबल कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. यावेळी अभिनेत्रीला किस करण्यासाठी बोली लावण्यात आली. १ हजार रुपयापासून सुरू झालेली ही बोली २३ हजार डॉलरपर्यंत (१४,६३,४९०)थांबली. एका व्यक्तीने एका किससाठी जवळपास १५ लाख रुपये मोजले. १५ लाख रुपये मोजलेल्या व्यक्तीस अभिनेत्री डिएना अग्रोनने आपला किस दिला. ‘किस’मधून मिळणारी रक्कम युध्दग्रस्त असलेल्या मुलांच्या सहायत्तासाठी खर्च करण्यात येणार आहे.
0
तालिबान्यांना धडा शिकवण्यासाठी पाक सैन्यप्रमुख काबूलला रवाना

इस्लामाबाद, दि. १७ – तालिबानी नेता मुल्ला फजुल्लाह याला धडा शिवविण्यासाठी पाकिस्तानी सैन्य प्रमुख जनरल राहिल शरीफ हे अफगाणिस्तानला रवाना झाले आहेत. तेहरीक ए तालिबानी पाकिस्तानी या दहशतवादी संघटनेने पेशावरमधील आर्मी शाळेवर दहशतवादी हल्ला केला यामध्ये निष्पाप १४१ जणांचा मृत्यू झाला. मृत्यू पावलेल्यांमध्ये शाळकरी मुलांचा मोठा समावेश होता. दहशतवादी संघटनेने शाळकरी मुलांना टार्गेट केल्याने पाकिस्तानने आक्रमक भूमिका घेतली आहे. याचाच भाग म्हणून जनरल राहिल शरीफ यांनी काबूलला भेट द्यायची ठरविले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ गणी यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे. राहिल हे अफगाणिस्तानच्या राजकीय नेत्यांसोबत तसेच आंतरराष्ट्रीय सेक्यूरीटीज असिस्टंट फोर्स कंमाडर यांच्याशी चर्चा करणार आहेत अफगाणच्या सीमेवर लपून बसलेला तेहरीक ए तालिबान पाकिस्तान चा म्होरक्या फजुल्लाह याच्यावर अफगान व पाकिस्तान सैनिकांची संयुक्त कारवाई करण्यासाठी राहिल विनंती करणार आहेत.
0
मनोरुग्ण पत्नीकडून पतीची हत्या

मुंबई : मनोरुग्ण पत्नीने पतीच्या डोक्यात धारदार हत्याराने वार करीत त्याची हत्या केल्याची घटना सोमवारी गोवंडी येथे घडली. याबाबत शिवाजी नगर पोलिसांनी पत्नीवर हत्येचा गुन्हा दाखल करीत तिला अटक केली आहे.
गोवंडीच्या इंडियन ऑइल नगर येथे मृत देबासीस सेन (५६) हे त्यांच्या ४९ वर्षीय पत्नीसह राहतात. पत्नीला पाच वर्षांपासून स्क्रिझोफेनिया हा मानसिक आजार असल्याने त्यांनी तिच्यावर उपचार सुरू होते. अधूनमधून तिला झटके येत असल्याने देबासीस तिला एकटीला सोडून कुठेही बाहेर जात नव्हते. सोमवारी सकाळी देखील दोघेही झोपलेले असताना या महिलेला अचानक झटका आला. या वेळी तिने घरातील लोखंडी रॉडने पतीवर हल्ला केला. देबासीस यांच्या डोक्यावर, मानेवर आणि हातांवर गंभीर जखमा झाल्याने त्यांचा घरातच मृत्यू झाला. काही वेळानंतर याच परिसरात राहणारी त्यांची मोठी मुलगी घरी परतली. तिच्या हा प्रकार लक्षात येताच तिने देबासीस यांना राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र दाखल करण्यापूर्वी ते मृत झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले
0
पाक शोकमग्न, भारताने पाळले मौन

नवी दिल्ली – पाकिस्तानात सैनिकी शाळेवर तालिबान्यांनी केलेल्या हल्ल्यात प्राण गमावलेल्या निरपराधांना आज संपूर्ण भारतभर श्रद्धांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार दोन मिनिटं मौन पाळून शाळा-शाळांमधून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. दरम्यान, संसदेनेही या हल्ल्याबद्दल शोक व्यक्त केला.
तालिबानी सैतानांनी निष्पाप मुलांचे निर्दयीपणे प्राण घेतल्याने जगभरातून या भ्याड हल्ल्याचा निषेध होत आहे. या संकटात भारतानेही पाकिस्तानसाठी आपली सहवेदना दर्शविली आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी रात्रीच पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी फोनवरून चर्चा केली व तीव्र शब्दांत शोक व्यक्त केला. त्यानंतर पंतप्रधानांनी देशभरातील शाळांमध्ये दोन मिनिटं मौन पाळून मृतांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या आवाहनानुसार आज बहुतेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी मौन बाळगून या हल्ल्याचा निषेध केला. ‘या कठिण प्रसंगी आम्ही तुमच्यासोबत आहोत’ असा संदेश या माध्यमातून भारताने पाकिस्तानला दिला आहे.
संसदेच्या दोन्ही सभागृहात आज पेशावरमधील हल्ल्याचा निषेध करण्यात आला. दोन मिनिटं मौन पाळून सदस्यांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी लोकसभेत शोकसंदेशही वाचून दाखवला.
0
केंद्रीय पथकाकडून जिल्ह्यातील दुष्काळीसदृष्य परिस्थितीची पाहणी

गावकरी, शेतकऱ्यांशी साधला संवाद
यवतमाळ दि, 16 : खरीप हंगामात कमी पर्जन्यमान झाल्यामुळे उद्भवलेल्या जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी आज केंद्र शासनाच्या दोन वेगवेळ्या पथकाने केली. एका पथकाने उमरखेड, महागाव तर दुसऱ्या पथकाने बाभूळगाव, कळंब तालुक्यातील गावांना भेटी देऊन पाहणी करण्यासोबतच शेतकऱ्यांशी चर्चा करत परिस्थितीचा आढावा घेतला.
कमी पर्जन्यमानामुळे संपुर्ण जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे दोन पथके आज जिल्ह्यात दाखल झाले. अमरावतीहून जिल्ह्यात दाखल झालेल्या पथकामध्ये केंद्र शासनाचे कापुस विकास संचालनालयाचे संचालक आर.पी.सिंग, पशुसंवर्धन उपायुक्त चंद्रशेखर साहुकार, भारतीय खाद्य निगमचे सहसंचालक सुधीर कुमार, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सहाय्यक सल्लागार विजय कुमार बाथला या केंद्र शासनाच्या सदस्यांसोबतच राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव मंदार पोहरे, अव्वर सचिव श्रीरंग घोलप आदींचा समावेश होता. पथकासोबत विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, उपायुक्त रविंद्र ठाकरे, यवतमाळ उपविभागीय अधिकारी नरेंद्र टापरे, राळेगावचे मोहन जोशी, बाभूळगाव तहसिलदार किरण सावंत पाटील, कळंब तहसिलदार संतोष काकडे उपस्थित होते. या पथकाने कळंब तालुक्यातील नायगाव या गावातील शेतपिकांची पाहणी केली. शंकरराव नागोसे या शेतकऱ्याच्या शेताला भेट दिल्यानंतर पथकाने गावकऱ्यांशी संवाद साधला. गावकरी मोहनराव कापसे, सतिश मानलकर, कृष्णा महानूर यांनी शेतकऱ्यांच्या समस्या पथकासमोर विषद केल्या. पथकानेही गावकऱ्यांकडून शेत पिकांसाठी लागाणारा खर्च, दोन-तीन पिके घेतली जातात काय, सिंचनाच्या सोई, वीजेची उपलब्धता यासह एकूनच परिस्थितीची माहिती घेतली. त्यानंतर कळंब तालुक्यातील गांधा या गावाला पथकाने भेट दिली. गांधा शिवारातील श्रीराम कांबळे व रामाजी टेकाम या शेतकऱ्यांच्या शेतपिकांसह विहिरीचीही पाहणी केली. मागिल वर्षाची पिकपस्थिती व यावर्षीच्या परिस्थीतीची तुलनात्मक माहिती पथकाने शेतकऱ्यांकडून घेतली. गांधा येथून सदर पथक वर्धा जिल्ह्याकडे रवाना झाले. परभणी येथून जिल्ह्यात दाखल झालेल्या पथकाने उमरखेड तालुक्यातील नागेशवाडी व महागाव तालुक्यातील मुडाणा या गावांना भेटी दिल्या. येथेही शेतपिकांची पाहणी करून दृष्काळी परिस्थितीची माहिती घेतली. ठिकठिकाणी गावकरी, शेतकऱ्यांशी संवाद साधतांना परिस्थितीची पाहणी केल्यानंतर अहवाल केंद्र शासनास सादर करणार असल्याचे पथकातील सदस्यांनी सांगितले.
0
केंद्रीय पथकाची हुलकावणी ; उमरखेड येथे शेतकºयांचा रास्तारोको

उमरखेड, दि. १६ – तालुक्यातील नागेशवाडी येथे आज केंद्रीय पथकाचा दौरा होता. मात्र नागेशवाडीला भेट न देता हुलकावणी दिल्याने शेतकºयांनी सायंकाळी ७ वाजता यवतमाळ-उमरखेड महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.
केंद्राचे पथक नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी येणार म्हणून दुपारपासून आपल्या व्यथा मांडण्यासाठी शेतकरी सुरोशे यांच्या शेतात थांबून होते. आता येणार मग येणार म्हणून शेतकरी सायंकाळ पर्यंत थांबुन होते. तरीही पथक न आल्याने ३०० शेतकºयांनी यवतमाळ-उमरखेड मार्गावर रास्तारोको केला. अखेर सायंकाळी ७.३० वाजता नागेशवाडी येथील शोभा दादाराव सुरोशे या महिलेच्या शेतीला रात्री दरम्यान भेट देवून पाहणी केली. या पथकात वेणू नारायणनन, वंदना सिंगल यांच्यासह दोन अधिकाºयांचा समावेश होता. सारवासारव करता रात्री अंधारात शेतकºयांसोबत संवाद साधला. यावेळी काही शेतकºयांनी आपल्या व्यथा पथकासमोर मांडल्या. पथकाची पाहणी केवळ कागदीघोडे नाचविण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रीया शेतकºयांनी व्यक्त केली.
0
युवकाच्या मृतदेहासह पोलीस ठाण्यावर धडक

यवतमाळ , दि. १६ – आंध्र प्रदेशात कामासाठी गेलेल्या युवकाचा संशस्पद मृत्यू झाल्याची घटना आज घडली. संतप्त नातेवाईकांनी मृतदेह घेऊन पांढरकवडा पोलीस ठाण्यावर धडक दिली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपीवर कार्यवाही करावी अशी मागणी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.
शेख शाहरुख शेख कादर (१९) रा. गोंडवाकडी असे मृतकाचे नाव आहे. पांढरकवडा तालुक्यातील गोंडवाकडी येथील युवकला त्याचा नातेवाईक बुरान खान चाँद खान याने फॅकटरीमध्ये काम लाऊन देतो म्हणून नेले. गेल्या चार महिन्यापासून युवक आंध्रातील गुंटूर येथे होता. दरम्यान आज मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास बुरान खान युवकाचा मृतदेह घेऊन गोंडवाकडी येथे आला. यावेळी मुलाचा मृतदेह पाहुन त्याच्या आईवडीलांनी हंबरडा फोडला. काम करीत असताना, त्याचा मृत्यू झाल्याचे बुरान खान याने सांगितले. मात्र मुलाच्या मृत्यूवर शंका उपस्थित करीत युवकाच्या मृतदेहासह नातेवाईकांनी पांढरकवडा पोलीस स्टेशनवर धडक दिली. यावेळी पोलिसांनी संतप्त नातेवाईकांची समजूत काढून गुन्हा नोंद केला. मृतदेह शविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून, अधिक तपास पोलीस करीत आहे.










