
नवी दिल्ली – माध्यमांमध्ये केलेली परस्पर वक्तव्य परराष्ट्र सेवेतील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना भोवली आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना कामावरून हटवत त्यांच्याकडील काम काढून घेतलं आहे. न्यूयॉर्कमध्ये घारातील मोलकरणीचा कमी पगार आणि व्हिसातील गैरप्रकारामुळे देवयानी यांना गेल्या वर्षी अमेरिकेत पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
एनडीटीव्ही या वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत देवयानी यांनी न्यूयॉर्कमधील घटनेबाबत वक्तव्य केलं होतं. यावर परराष्ट्र मंत्र्यालयानं आक्षेप घेतला. देवयानी यांनी वक्तव्य करण्याआधी परवानगी घेतली नव्हती, असं परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. तसंच देवयानी यांनी आपल्या मुलांचे अमेरिकी पासपोर्ट असल्याची माहितीही परराष्ट्र मंत्रालयाला दिली नाही. त्यामुळे नाराज असलेल्या परराष्ट्र मंत्रालयानं देवयानी यांना हटवण्याचं हे ही एक कारण असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
१९९९ बॅचच्या आयएफएस अधिकारी असलेल्या देवयानी खोब्रागडे यांना व्हिसा अर्जातील खोट्या माहितीच्या आरोपावरून गेल्या डिसेंबरमध्ये अटक करण्यात आली होती. निवस्त्र करून देवायानी यांची तपासणी करण्यात आली होती आणि त्यांना गुन्हेगारांसोबत जेलमध्ये ठेवण्यात आलं होत. पण या घटनेमुळे अमेरिका आणि भारताचे संबंध ताणले गेले होते. अडीच लाख डॉलरच्या जातमुचलक्यावर त्यांना मुक्त करण्यात आलं होतं. यानंतर अमेरिकेतील भारतीय दूतावासातून गेल्या जानेवारीला मायदेशात परराष्ट्र मंत्रालयात देवयानी यांची संचालकपदावर बदली करण्यात आली होती.
Archive for December, 2014
0
देवयानी खोब्रागडेंना कामावरून हटवलं
0
केंद्रीयमंत्री गडकरी यांना १० हजार रु. दंड

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात केलेल्या फौजदारी अब्रुनुकसानीच्या प्रकरणात कोर्टाच्या आदेशाचे पालन न केल्याबद्दल दिल्लीतील स्थानिक कोर्टाने गडकरी यांना १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
या प्रकरणाची सुनावणी शनिवारी होती. या सुनावणीच्या तीन दिवस आधी याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने गडकरींना दिले होते. हे प्रतिज्ञापत्र केजरीवाल यांच्या वकिलाकडे तीन दिवस आधी पोहोचणे अपेक्षित होते, मात्र ते शनिवारीच मिळाले, असे सांगत कोर्टाने गडकरींना १० हजार रुपयांच्या दंडाच्या बदल्यात अखेरची संधी दिली आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ मार्च २०१५ रोजी ठेवली.
‘आप’च्या केजरीवाल यांनी देशातील सर्वाधिक भ्रष्ट व्यक्तींच्या यादीत आपले नाव समाविष्ट करून आपली प्रतिमा मलीन केली आहे, असे सांगत गडकरी यांनी केजरीवाल यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा दावा केला होता.
0
चार नगर परिषदमध्ये सभापतींची निवड

यवतमाळ, दि. २० – आर्णी नगर परिषदेसाठी विषय समिती सभापतींची निवड प्रक्रीया आज पार पडली. कॉंग्रेसचे बहुमत असलेल्या नगर परिषदेत जैसे थे स्थिती ठेवून एक वर्ष पूर्ण झालेल्या सभापतींना पुन्हा संधी देण्याचा निर्णय शिवाजीराव मोघे यांनी घेतला. नगराध्यक्ष आरीज बेग, कॉंग्रेसचे गटनेते अनिल आडे व शिवसेनेचे गटनेते प्रवीण मुनगीनवार यांनी संयुक्तरित्या सर्व सभापतीसह समिती सदस्यांची यादी अध्यासी अधिकारी म्हणून कामकाज पाहणारे उपविभागीय अधिकारी नरेंद्र टापरे यांच्याकडे दिली.
अविरोध व शांततापूर्ण झालेल्या या निवडीत उपाध्यक्ष निता ठाकरे यांची शिक्षण, नियोजन व विकास समितीपदी पदसिद्ध सभापती म्हणून तर शाईन अनवर पठाण सार्वजनिक बांधकाम सभापती, गणेश हिरोळे आरोग्य सभापती, श्रावण किसन मडावी पाणीपुरवठा सभापती, गौसिया अक्रम शहा महिला व बालकल्याण सभापती व अनिता भगत यांची महिला व बालकल्याण उपसभापतीपदी निवड करण्यात आली. यावेळी प्रभारी मुख्याधिकारी अशोक गराटे उपस्थित होते.
उमरखेड नगर परिषद
उमरखेड- येथील नगर परिषदेच्या विषय समिती सभापतीपदाची निवडणूक खेळी मेळीच्या वातावरणात पार पडली. उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण मानकर आणि नगराध्यक्षा उषा आलट यांच्या प्रमुख उपस्थितीत विषय समित्यांची निवड प्रक्रिया पार पडली.
पाणीपुरवठा सभापतीपदी बालाजी देशमुख, अरोग्य सभापतीपदी बालय्या दुर्गमवार शिक्षण सभापतीपदी गटनेते नंदकिशोर अग्रवाल, बांधकाम सभापती नगरसेविका वंदना धाडगे, तर महिला व बालकल्याण सभापतीपदी रंजना लांबटीळे आणि नियोजन समितीचा कारभार उपाध्यक्षा नजमाबी दौलत खान यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सत्ताधारी गटाने बांधकाम व पाणीपुरवठा या विषयाच्या सभापती पदावर बदलुन दोन नव्या चेहºयांना संधी देण्यात आली. विषय समित्या निवडीसाठी सभागृहात नगरसेवक संतोष जैन, शैलेंद्र मुंगे, भारत खंदारे, रामराव भुरके, साजीद जहागीरदार इनायत उल्ला खान, चंद्रशेखर जयस्वाल, सुरेश माहेश्वरी, माजी नगराध्यक्ष अर्चना नाईक, लक्ष्मी ठाकरे, गौसिया बेगम अहेमदखान, हुमेरानाज रिफत अन्सारी, पुष्पा चव्हाण उपस्थित होते. सभापती निवड प्रक्रियेदरम्यान शिवसेनेचे दोन्ही नगरसेवक अनुपस्थित होते.
नेर नगरपरिषदच्या महिलाराज
नेर – नेर नबाबपूर नगरपरिषदच्या विषय व स्थायी समितीची निवडणूक पार पडली. शिवसेनेने आपले वर्चस्व याही निवडीत दाखवले असून, महिला राजने आपले अस्तीत्व कायम ठेवले. समितीच्या अखेर आपला ठसा कायम ठेवून महिला राजचा झेंडा ठेवला. या निवडणूकीत चार जागावर महिला तर केवळ दोन जागेवर पुरूष उमेदवारांना स्थान मिळाले. मात्र अनेकांनी स्थान मिळवण्यासाठी केलेली धडपड मात्र शेवटपर्यंत कायम राहिली.
आज दुपारी ३ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी मोहन जोशी मुख्याधिकारी अतूल पंत यांच्या उपस्थितीत स्थयी व विषय समिती सभापतीची निवड अविरोध झाली यात बांधकाम समितीपदी शालि गुल्हाणे, शिक्षण सभापती रश्मी पेटकर, आरोग्य सभापतीपदी वनीता मिसळ, महिला व बालकल्याण सभापती पदी वैष्णवी गुल्हाणे, महिला व बाल कल्याण सभापती उपसभापती माया राणे तर पाणी पुरवठा सभापती पदी मोहन भोयर इत्यादीची निवड करण्यात आली. यावेळी स्थायी समितीच्या सभापती पदी नगराध्यक्ष पवन जयस्वाल यांनी आपल्याकडे कायम ठेवले विशेष म्हणजे प्रत्येक सभापतीला आपल्या न्यायपुर्ण हक्क देण्याची बाब नगराध्यक्ष पवन जयस्वाल यांनी कायम ठेवली. यावेळी नगरसेवक संजय दारव्हटकर, विनोद जयसींगपूरे, रुपाली दहेकर, संध्या चिरडे, भाऊराव ढवळे, शकील बानो नासी, प्रतिभा बगमारे, तनविर खा पठाण, दाऊद इब्राहीम नुर, सुनिल खाडे, इरफान अकबाणी, सुभाष भोयर इत्यादी उपस्थित होते. यानिवडणूकीत शिवसेना, राकाँ किंवा कॉग्रेस उमेदवाराला संधी देईल अशी चर्चा होती. तशा पध्दतीने काही नावेही येत होती मात्र शिवसेनेने आपल्या नगर सेवकांचे संख्याबळ लक्षात घेता इतर पक्षाला स्थान दिले नाही. या नगर परिषदे मध्ये शिवसेनेचे १० व अपक्ष २ असे १२ नगर सेवकांचे संख्याबळ असून, राकाँकडे ४ तर काँग्रेसचे दोन असे संख्या बळ असल्याने शिवसेनेने आपल्या वरचस्व ठेवला.
घाटंजीत विषय समितीची निवड अविरोध
घाटंजी – येथील नगर परिषदच्या विषय समिती सभापती निवड करण्यासाठी मतदान घेण्यात आले. यावेळी सर्वच सभापतीपदासाठी प्रत्येकी एक अर्ज असल्याने निवड अविरोध झाली.
बांधकाम सभापती म्हणून अकबर तंवर, आरोग्य सभापती किशोर दावडा, महिला व बाल कल्याण सभापती इंदु परतेकी, शिक्षण सभापती संदिप बिबेकार यांची अविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपविभागीय महसुल अधिकारी संदिप महाजन व प्रभारी मुख्याधिकारी विर यांनी काम पाहीले.
0
बियाणे कंपनीच्या मॅनेजरवर गुन्हा

यवतमाळ – शेतकºयाला बोगस बियाणे देणाºया औरंगाबादच्या व्हर्जीन सिड प्रा. लि. च्या जनरल मॅनेजरविरुध्द पोलिसांनी दोन वर्षानंतर गुन्हा नोंद केला आहे. विष्णू जोशी असे या जनरल मॅनेजरचे नाव आहे. सण २०१२ मध्ये जिल्हा नियंत्रण निरीक्षक कार्यालयाचे सुभाष उलेमाले (५३) यांनी याबाबत दिग्रस पोलीस स्टेशनला तक्रार केली होती. शेतकºयाने या कंंपीनचे कापूस बियाणे खरेदी केले होते. पेरणी केल्यानंतर ते उगवलेच नव्हते. त्यामुळे सदर बियाणे नित्कृष्ट असल्याबाबतची तक्रार शेतकºयाने केली होती. जिल्हा नियंत्रण निरीक्षक कार्यालयाने बियाण्याची तपासणी केली असता ते दोषपूर्ण आढळून आले. कंपीनने शेतकºयाची फसवणूक केल्याची तक्रार देण्यात आल्यानंतर दोन वर्षानी पोलिसांनी जनरल मॅनेजरविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.
0
कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, तीन जण जखमी

यवतमाळ,दि. २० – कारने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातामध्ये एक ठार तर तीन जण जखमी झाले. हि घटना आज शनिवारी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास भारी विमानतळाजवळ घडली. अविनाश शिवाजी कुकडे (२६) रा. आठवडी बाजार असे मृतकाचे नाव असून, निखील गुगरे (२०) रा. तारपूरा गंभिर तर विजय कुलसंगे रा. वरूड ता. देवळी व शेख इस्त्राईल अशी जखमीची नावे आहे.
अविनाश, निखील, विजय हे तिघे यवतमाळवरून एम. एच. २९ पी ६६७७ क्रमांकाच्या दुचाकीने चापडोह येथे जात होते. दरम्यान खडकीवरून भरधाव वेगाने येणाºया एम. एच. ३१ एयच १३०५ क्रमांकाच्या अॅल्टो वाहनाने समोरासमोर धडक दिली. या धडकेत अविनाश जागीच ठार झाला असून, निखील गंभिर तर विजय व अॅल्टो वाहनाचा चालक शेख इसराईल हे दोघे जखमी झाले. त्यांना येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना नागपूर हलविले. या अपघातामध्ये दुचाकी चकनाचूर झाली असून, अॅल्टोचेही नुकसान झाले आहे. याबाबत मृतकाचा भाऊ विश्वनाथ कुकडे (३९) रा. आठवडीबाजार यांनी शहर पोलीस स्टेशनला तक्रार नोंद केली असून, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.
0
शेतकरी विधवा मांडणार सरन्यायाधीश दत्तू यांच्या समोर व्यथा

यवतमाळ दि. २० – विदर्भातील अकोला जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील मनारखेडच्या अल्पभूधारक वृद्ध शेतकºयाने नापिकीमुळे ओढवलेल्या आर्थिक संकटाचा सामना करणे शक्य नसल्याने गेल्या २८ नोव्हेंबर रोजी स्वत:ची चिता रचून स्वत:च्याच हाताने ती पेटविली होती. काळजाचा थरकाप उडविणाºया या घटनेची सर्वोच्च न्यायालयाने आज गुरुवारी स्वत:हून दखल घेतली.
विदर्भ जनांदोलन समितीच्या प्रमुख मागण्या दुष्काळग्रस्त शेतकºयांना महाराष्ट्र सरकारने हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी आणि त्यांच्यावरील पीक कर्जही पूर्णपणे किंवा अंशत: माफ करावे, तसेच या शेतकºयांना मनरेगांतर्गत किमान १०० दिवसांचे वेतन अनुदान देण्यात यावे, दुष्काळग्रस्त शेतकºयांना अन्न, आरोग्य व शिक्षण सुरक्षा मिळावी यांची दखल घेत, विदर्भ जनांदोलन समितीच्या हवाला देत १ डिसेंबर रोजी पुण्याचे वकील राकेश उपाध्याय यांनी याचिका सादर केली. तेंव्हा सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांनी अॅड. राकेश उपाध्याय यांना आपण ही बातमी वाचुन व्यथित झालो असे म्हटले. इंदोरे या शेतकºयाच्या आत्महत्येची स्वत:हूनच दखल घेण्याची आमची इच्छा होती. तशी पावलेही आम्ही उचलली होती. पण, आता याप्रकरणी याचिका दाखल झाली असल्याने आम्ही हा मुद्दा विशेष सामाजिक न्याय पीठाकडे सोपविला आहे. सरन्यायाधीश एच.एल. दत्तू, न्या.ए.के. सिकरी आणि न्या.आर.के. अग्रवाल आदि पाठपुरावा करणार आहे. याबाबत अधिक तपशील द्यावा अशी सूचनाही सरन्यायाधीश दत्तू यांनी दिल्याचे अॅड. राकेश उपाध्याय यांनी विदर्भ जनांदोलन समितीचे निमंत्रक किशोर तिवारी यांना दिली आहे.
विदर्भ व मराठवाड्यातील शेतकºयांची दैनावस्था व शेतकºयांना खचवले मनोबल उंचावण्यासाठी आहे हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत जाहीर करावी, पीक कर्जही माफ करावे, शेतकºयांना मनरेगांतर्गत किमान १०० दिवसांचे वेतन अनुदान देण्यात यावे, या मागण्या सरकारने मान्य केल्या नाही. त्यासाठी केंद्र सरकार, केंद्रीय कृषी मंत्रालय आणि राज्य सरकारला निर्देश देण्यात दिले नाही तर विदर्भाच्या शेतकरी विधवा सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांची भेट घेऊन आपल्या अडचणी व दुख मांडतील अशी माहितीही किशोर तिवारी यांनी या वेळी दिली. याचिकाकर्त्याने यावेळी एका सर्वेक्षणाचाही हवाला दिला. दरवर्षी शेतकºयांवरील कजार्चा डोंगर वाढतो. यामुळे आर्थिक विषमता निर्माण झाली आहे. या व्यवस्थेत शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना उपासमार आणि अनैसर्गिक मृत्युलाही सामोरे जावे लागते. ही आर्थिक विषमताच आत्महत्यांसाठी कारणीभूत ठरली आहे. इतकेच काय, तर ज्या भागात दुष्काळ नाही आणि चांगले पीक होते, तिथेही अल्पभूधारक शेतकºयांपेक्षा बेकायेदशीर सावकार आणि मध्यस्थांचाच फायदा होतोे, याकडे याचिकाकर्त्याने लक्ष वेधले आहे.
0
आतंकवाद्याच्या प्रतिकात्मक पुतळ््याचे दहन

यवतमाळ , दि. २० – भारताविषयी गरड ओकणाºया कट्टर आतंकवादी हाफीज सईद याच्या विरोधात अभाविपने निदर्शने देऊन प्रतिकात्मक पुतळ््याचे दहन केले.
पाकीस्तान येथील पेशावर येथे सैनिकी मुलांच्या शाळेत झालेल्या आतंकवादी हल्ल्यात १६० जणाचा मृत्यू झाला आहे. भरतात दुसºया दिवशी शाळेमध्ये मौन ठेऊन श्रद्घांजली अर्पण केली. पाकीस्तानमध्ये मोकाट फिरत असलेला आतंकवाद्याने भारताकडून बदला घेऊ अशी धमकी दिली आहे. सदर हल्ल्याची जाबाबदारी तालीबानी संघटनेने घेतल्यानंतर हाफीज सईद हा भारताला जबाबदार धरत आहे. तसेच २६/११च्या हल्ल्यातील मुख्य सुत्रधार आतंकवादी लकवी व त्याच्या साथीदाराला पाकीस्तान सरकारने जामिन दिला आहे. या घटनांचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने निषेध करून आतंकवादी हाफीज सईद याच्या प्रतिक्रात्मक पुतळ््याचे दहन येथील दत्त चौकात केले. यावेळी विक्रमजीत कलाणे, मंजुषा खर्चे, संकेत कोल्हे, आकाश खांदवे, कार्तीक शिरे, प्रसन्ना कोसट्टीवार, अमन यादव, शुभम मोरे, अश्वजीत शेळके याच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
0
कोळपे मल्टीस्टेटचा उमरखेड मधून पोबारा, ९ ग्राहकांना गंडविले

उमरखेड, दि. २० – स्थानिक बसस्थानका समोरील कॉम्प्लेक्समध्ये पुणे येथील कोळपे पाटील मल्टी को-आॅपरेटीव्ह सोसायटीची शाखा उघडण्यात आली होती. मल्टीस्टेटने उमरखेडमधून पोबारा केल्याने गुंतवणूक दारात खळबळ उडाली आहे.
अन्य बँके पेक्षा अधिक व्याज दराचे प्रलोभन दाखवून ग्राहक तयार करण्यात आले. ग्राहकांना विश्वासात न घेता कोळपे मल्टीस्टेटच्या कर्मचाºयांनी पूर्व सूचना न देता या ठिकाणावरून पोबारा केल्याने ग्राहकात विविध चर्चेला उधाण आले आहे. अनिल कलाने यांनी ७१ हजार पाचशे रुपयाने फसवणूक करण्यात आल्याची तक्रार काल पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून बँक प्रतिनिधी अतुल अन्नदाते, व्यवस्थापक, अध्यक्ष कोळपे पाटील रा. पुणे यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा झाला आहे. मागील जवळपास दोन वर्षांपासून कोळपे पाटील या मल्टीस्टेट सोसायटीने शहरात बस्तान मांडले होते. व्याजदर अधिक देण्याचे प्रलोभन दिल्याने शेकडो गुंतवणुकदारांनी लाखो रुपयांची गुंतवणूक केली आहे, याचे बळी शहरातील गुंतवणुकदार ठरले आहे.
0
तीन नगर पालिका विषय समितीची निवड, वणीत निवड बारगळली

यवतमाळ : – नगर परिषदेचे राजकारण जिल्ह्याभोवती केंद्रीत असते. जिल्हा प्रशासन विभागाच्या वतीने निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर करण्यात आला होता. त्यानुसार यवतमाळ, वणी, पुसद व दिग्रस या राजकीयदृष्ट्या महत्वाच्या नगर पालिकेत विषय समिती सभापतीची निवड प्रक्रीया आज पार पडली. २० ला उमरखेड, घाटंजी, आर्णी, नेर या नगर पालिकेत विषय समित्यांची निवड करण्यात येणार आहे. तत्पुर्वी आज यवतमाळचे उपविभागीय अधिकारी नरेंद्र टापरे हे आजच्या बैठकीत पिठासीन अधिकारी होते. तसेच मुख्याधिकारी रविंद्र पांढरे आणि प्रभारी मुख्याधिकारी दिपककुमार मीना यांच्या उपस्थितीत दुपारी यवतमाळ नगर परिषदेच्या सभागृहात अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात निवड प्रक्रीया पार पडली. यावेळी नगराध्यक्ष सुभाष राय प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी भाजप समर्थीत प्रणीता खडसे बांधकाम सभापती, भाजपाच्या रेखा कोठेकर शिक्षण सभापती,राष्ट्रवादीच्या सौ.अरूणा गावंडे आरोग्य सभापती, भाजपाच्या नंदा जिरापूरे नियोजन सभापती, मीना राहुल मसराम महिला व बालकल्याण सभापती म्हणून अविरोध निवडून आल्या. स्थायी समितीचे पदसिध्द अध्यक्ष नगराध्यक्ष असतात. उर्वरीत स्थायी समितीत नगरसेवक सुमित बाजोरीया, माजी सभापती प्रविण प्रजापती आणि राधिका बोरेले यांचा समावेश करण्यात आला. विषय समिती सभापतींची एसडीओ टापरे यांनी घोषणा करताच कार्यकत्र्यांनी एकच जल्लोष केला. सर्व महिला सभापती नगर परिषद इमारतीच्या खाली आवारात येताच ढोल ताशाच्या गजरात कार्यकत्र्यांनी आंनदोत्सव साजरा केला.
वणी नगर परिषदेत आज विषय समिती सभापतींची निवड प्रक्रीया ठरली होती. परंतु कोरम अभावी ही सभा बारगळली.
दिग्रसमध्ये नगर परिषदेत माजी मंत्री संजय देशमुख यांच्या परिवर्तन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. मात्र याच मतदार संघातून राज्याचे महसुल राज्यमंत्री म्हणून संजय राठोड नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे खास करून दिग्रस नगर पालिकेतील विषय समिती सभापती निवडीवर जिल्ह्याचे लक्ष केंद्रीत झाले होते. शिवसेनेकडून परिवर्तन आघाडीला शह दिला जातो का? यावरही काथ्याकुट चालु होता. परंतु सहा समितीच्या सभापती निवड प्रक्रीयेत काँग्रेस समर्थीत परिवर्तन विकास आघाडीच्या सत्ताधारी नगर सेवकांची एक मताने निवड झाली. दारव्ह्याचे एसडीओ मनोहर कडू हे पिठासिन अधिकारी होते. दुपारी १ ते ३ च्या दरम्यान मुख्याधिकारी विठ्ठल कुमरे यांनी नामांकन अर्ज स्विकारले. ठिक ३ वाजता निवड प्रक्रीयेला सुरूवात झाली. त्यानुसार बांधकाम सभापती पदी शाम शंकर महिंद्रे, शिक्षण सभापती पदी रामप्यारी, उत्तम नरके, आरोग्य सभापती पदी रामुजी सुवालाल पवार, पाणी पुरवठा व जलनिस्सारण सभापती पदी नुरमहमंद खान, नियोजन सभापती पदी डॉ.मुस्ताक प्यार मोहम्मद शेख, महिला व बालकल्याण सभापती पदी सलमाबी अ.मोहसीन व उपसभापती पदी शबाना परवीन सै.मतीन यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या निवडणुक प्रक्रीयेत शिवसेनेचे गटनेते व नगरसेवक यांनी पाठ दाखविल्याने सत्ताधा:यांनी ठरल्याप्रमाणे निवड प्रक्रीया आटोपती घेतली. या सर्व नवनियुक्त सभापतींपुढे शहरातील विकासकामांचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.
पुसद नगर परिषदेत सभापतींचा कार्यकाळ पुर्ण झाल्यामुळे आज नविन विषय समितींच्या सभापतींची निवड करण्यात आली. पाणी पुरवठा सभापती म्हणून राजीव दुधे यांची पुन्हा निवड करण्यात आली. नगर परिषदेचे उपाध्यक्ष हेच नियोजन समितीचे सभापती असतात. बांधकाम सभापती पदी जाकी अन्वर, आरोग्य सभापती म्हणून अॅड.भरत जाधव, शिक्षण सभापती म्हणून प्रा.नामदेव फाटे आणि बालकल्याण सभापती पदी मिराबाई साहु यांची अविरोध निवड करण्यात आली. एसडीओ जाजु आणि प्रभारी मुख्याधिकारी मानकर यांनी निवडीची ही घोषणा केली. त्यानंतर नगरसेवक आणि कार्यकत्र्यांनी उत्स्फुर्त जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला.
0
मनसेचा जिल्हाकचेरीवर गाठोडे मोर्चा

यवतमाळ -केंद्रात व राज्यात भाजपचे सरकार स्थापन झाले असून, शेतकºयांना दिलेल्या वचननाम्याची अद्यापही पुर्तता झाली नसल्याने शेतकºयांच्या न्याय मागण्यांसाठी मनसेने आज शुक्रवारी शहरात गोठोडे मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या. जिल्हाकचेरीवर धडकलेल्या या मोर्चातील पदाधिकाºयांची निवेदनावरून पोलिसांसोबत धक्काबुक्की झाल्याने मोर्चेकरांनी जिल्हाधिकाºयांच्या कक्षासमोर ठिय्या मांडून संताप व्यक्त केला.
भाजपने सत्तेवर आल्यानंतर शेतकºयांना दिलेल्या आश्वासनाची पुर्तता करून शेतकºयांना दिलासा देण्याची गरज होती. मात्र सत्तेत आल्यानंतर भाजप शेतकºयांच्या हक्काच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. कापसाला ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव, कृषीपंपाचे वीज बिल माफी, उत्पादन खर्चावर आधारीत भाव, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे पुर्नवसन, सिंचनाची सुविधा आदी मागण्यांना घेऊन मनसेच्यावतीने नेताजी चौकातून गोठोडे मोर्चा काढण्यात आला. शहरातून मार्गक्रमन करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचलेल्या गाठोडे मोर्चाला निवेदन देण्यासाठी पोलिसांनी मज्जाव केला. यावेळी मोर्चेकरी पोलिसांना धक्काबुक्की करीत निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांच्या कक्षात शिरले. मागणीचे निवेदन व कापसाचे गाठोडे निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले. निवेदन देण्यासाठी पोलिसांनी अडवणूक केल्यामुळे संतप्त झालेल्या मोर्चेकरांनी जिल्हाधिकारी यांच्या कक्षासमोर ठिय्या मांडून निषेध नोंदविला. यावेळी अनिल हमदापूरे, संजय देठे, विकास पवार, संगिता घोडमारे, राजू बावणे, सुधाकर झोटींग, देवा शिवरामवार, अंजु चिल्लोकर, छबु आठवले, शंकर मोकळे, प्रवीण मोगरे, धनराज चव्हाण आदी उपस्थित होते.
0
नंदकुमार बुटे यांचा सत्कार

यवतमाळ दि. १९ – राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्यस्तरीय अधिवेशन औरंगाबाद येथे नुकतेच संपन्न झाले व यामध्ये राज्यस्तरीय कार्यकारीणीचे गठण करण्यात आले. राज्यस्तरीय कार्यकारीणीत यवतमाळ येथील कर्मचारी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार बुटे यांची उपाध्यक्षपदावर नियुक्ती झाली. या निमित्ताने जिल्हा राज्य सरकारी कर्मचारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना तसेच वाहन चालक व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटनेच्या वतीने बचत भवन मध्ये सत्कार करण्यात आला.
या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी कर्मचारी नेते रवींद्र देशमुख हे होते. तसेच आगामी काळात मध्यवर्ती संघटनेच्या वतीने घेण्यात येणाºया सर्व आंदोलनात जिल्हा मागे न राहता सर्व कार्यक्रम राबविणार असल्याचा एकमुखी ठरावही पारीत करण्यात आला. कर्मचारी नेते रवींद्र देशमुख यांच्या नेतृत्वात बांधणी करण्यात आलेले संघटन त्याच पद्धतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करेल असा विश्वासही या सत्कार समारंभाच्या निमित्ताने व्यक्त करण्यात आला. याच कार्यक्रमात संघटनेमध्ये कार्यरत असलेले व आता पदोन्नत तसेच सेवा निवृत्त झालेले राजाभाऊ चिंतकुटलावार, सी. के. गिरी, शेखर बारले, कैलास बोरकर, अजय गौरकार, दिलीप झाडे, के. डी. वायकोस या पदाधिकाºयांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र निफाडकर, बाबासाहेब कबाडे, श्रीरंग रेकलवार, किशोर पोहनकर, नंदकुमार नेटके, विजय साबापुरे, टी. के. चव्हाण, नरेंद्र राऊत, राजेंद्र गावंडे, सुभाष वानरे, राजाभाऊ चिंतकुटलावार, शीला पेडणेकर, अजय मिश्रा हे उपस्थित होते. यशस्वीतेकरिता जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी विजय कदम, कल्पेश वाडीवा, योगेश खरात, रवी चव्हाण, प्रकाश देशपांडे, शैलेश रापर्तीवार, रत्नदिप मेश्राम, गोपाल शेलाकार, स्वप्नील पानोडे, विलास वानखडे, आनंद भगत, आनंद कांबळे, अविनाश वाकोडे, धीरज डाखरे, मनोज मायले, दीपक पराते, दिलीप कोहळे, प्रवीण शिंदे, सचिन परचाके यांनी परिश्रम घेतले.
0
तीन बस चालकात ‘फ्री-स्टाईल’

बाभूळगाव, दि. १९ – बसमध्ये प्रवास करीत असलेल्या दोन बस चालक व गाडीचालवित असलेल्या चालकामध्ये वाद निर्माण होऊन फ्रीस्टाईल झाली. गुरुवारी सायंकाळी ही घटना धामणगाव-यवतमाळ बसमध्ये खडकसावंगा फाट्याजवळ घडली.या प्रकाराने प्रवाशामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
यवतमाळ आगाराची बस (एम.एच. ४०/ एन ९२९८) धामणगाव वरून प्रवाश घेऊन यवतमाळकडे निघाली होती. यामध्ये देवगाव येथून रामबरम किसन पतालीया (३९) रा. राणी अमरावती, संभा महादेव अंजनकर (३९) रा. पिंप्री हे बाभूळगाव येथे जाण्यासाठी बसले. ते दोघेही चांदुर रेल्वे आगारामध्ये बसचालक म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान त्यांनी बस वाहकाशी विानाकारण वाद करण्यास सुरूवात केली. त्यामुळे सदर बसवरील चालक रमेश रामकृष्ण ढाले (५२) रा. यवतमाळ यानी बस खडकसावंगा फाट्याजवळ थांबविली. दोन्ही बस चालकांना शांत राहण्यास सांगितले असता दोघेही ढाले याच्या अंगावर गेले. यावेळी एकाने बसमधील टामी काढून सदर चालकावर उगारली. वाद विकोपाला गेल्याने बस चालक ढाले यांनी सरळ बस बाभूळगाव पोलिस स्टेशनमध्ये लावली. बस चालक रमेश ढाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी पतालीया व अंजनकर याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
0
ऊस तोड एजंटची अपरहणकर्त्यांच्या तावडीतून सुटका

आर्णी – पैसे घेवून ऊस तोड कामगार पळून गेल्यानंतर कंट्राटदाराने एजंटचे अपहरण केल्याची घटना घडली होती. अपहरण कर्त्याने कर्नाटकातून स्वत:ची सुखरूप सुटका करून घेतल्याने पोलिसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
दिग्रस तालुक्यातील तुपटाकळी येथील सुभाष नारायण आडे (३०) याने कर्नाटकातील ऊस कारखान्याला मजूर पुरविण्याचे काम घेतले होते. त्यासाठी मजुरांचा शोध घेवून १० कामगारांना प्रत्येकी १० हजार रुपये प्रमाणे अॅडव्हांस देण्याचे ठरले होते. कमिशन म्हणून सुभाषला दहा हजार रुपये मिळणार होते. २ डिसेंबर रोजी सर्व मजूर आर्णी येथील दर्गाजवळ आले. दहाही कामगारांनी प्रत्येकी दहा हजार घेतले आणि पळून गेले. यामुळे बाळू देवानंद चव्हाण चांगलाच संतापला. त्याने सुभाषचे अपहरण करून कर्नाटकात नेले. याप्रकरणाची तक्रार नारायण तायडे यांनी आर्णी पोलीस ठाण्यात केली. त्यावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला. गणेश हिरूळकर, रमेश वीर यांचे पथक १५ डिसेंबर रोजी सुभाषच्या शोधात कर्नाटकात गेले. मात्र या पथकाच्या हाती काही लागू न शकल्याने रिकाम्या हाताने परत यावे लागले. विजापूर जिल्ह्यातील आलमेल पोलीस ठाण्यातंर्गत येणाºया गावातील पोलीस पाटील आरोपीच्या संपर्कात असल्याने आरोपी निसटल्याचे पोलीस सांगत आहे. मोठ्या शिताफीने सुभाषने अपहरणकर्त्याच्या तावडीतून सुटका करून घेतली. आरोपी माझ्या दोन्ही किडन्या विकणार होता, असे खळबळजनक बयान त्याने पोलिसांना दिले आहे. अपहृत व्यक्ती सुखरूप परतला असला तरी आरोपी मोकाट असल्याने त्याला जेरबंद करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
0
पतसंस्थेच्या विकासात कर्मचाºयांचे योगदान – राजूदास जाधव

यवतमाळ, दि. १९ – जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेने केलेल्या विकासामध्ये संचालक मंडळासोबतच कर्मचाºयांचे योगदान सुध्दा अत्यंत महत्वाचे आहे असे प्रतिपादन राजूदास जाधव यांनी केले.
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचा सध्या सुवर्ण महोत्सवी वर्षाचा सांगता सप्ताहात सर्व कर्मचाºयांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी सचिव राजेंद्र राऊ त, संचालक शेख लुकमान, सुमाला पुडके, वनमाला मेटे, डॉ. दिलीप चौधरी, संजय गावंडे, शरद घारोड, साहेबराव राठोड, गौतम कांबळे उपस्थित होते. याप्रसंगी सरव्यवस्थापक वसंत राठोड, दिपक पाटणे, अशोक पेटेवार, शालीक दानखडे यांनी आपले विचार व्यक्त आहे.
0
उत्तर भारत थंडीने गारठला

नवी दिल्ली – हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीची लाट आली असून, उत्तरेकडच्या राज्यांमध्ये तापमानाचा पारा कमालीचा घसरला आहे. दिल्ली, पंजाब आणि हरयाणामध्ये नागरीक कडाक्याच्या थंडीचा अनुभव घेत आहेत. या राज्यांमध्ये सकाळी असणा-या दाट धुक्यांमुळे रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतुकीवर परिणाम होत आहे. दाट धुक्यामुळे दिल्लीत विमान सेवेवर परिणाम झाला आहे.
हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशच्या डोंगराळ भागात झालेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे संपूर्ण राज्यात थंडीची लाट आहे तसेच बर्फवृष्टीमुळे अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. आठवडयाच्या सुरुवातीला सिमलामध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे काही भागात विद्युत पुरवठा खंडीत झाला आहे. पाणी पुरवठा करणा-या पाईपलाईन्स बर्फ जमा झाल्यामुळे बंद झाल्या आहेत.
प्रशासनाकडून या सेवा सुरु करण्याचे युध्द पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. कुलू-मनालीमध्ये मोठया प्रमाणावर बर्फवृष्टी झाली आहे. राज्यातील जवळपास २०० रस्ते बर्फवृष्टीमुळे बंद झाले होते. कुलू-मनालीमध्ये अडकून पडलेल्या अनेक पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून मोठया प्रमाणावर पर्यटक कुलू-मनालीला जातात. हिमाचलप्रदेशमध्ये थंडीमुळे आतापर्यंत तीस जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक भागात तापमान उणे अंश सेल्सिअसमध्ये आहे.
जम्मू-काश्मीर
जम्मू-काश्मीरमध्ये यंदाच्या हिवाळयाच्या मोसमातील गुरुवारची रात्र सर्वात थंड रात्र ठरली आहे. मायनस ४.२ तापमान होते. मागच्या आठवडयाभरापासून काश्मीर खो-यात किमान तापमान मायनस तीन ते मायनस सातमध्ये आहे. पंजाब आणि हरयाणा ही राज्येही थंडी बरोबर दाट धुक्यांच्या चादरीमध्ये लपेटली आहेत. यामुळे येथील रस्ते वाहतूकीवर परिणाम होत आहे.
0
तिहार तुरुंगाच्या सुरक्षेत वाढ

नवी दिल्ली -तिहार तुरुंगातील दहशतवाद्यांची सुटका करण्यासाठी लष्कर-ए-तोयबाचे दहशतवादी तुरुंगावर हल्ला करण्याची शक्यता आहे असा इशारा गुप्तचर यंत्रणेकडून मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर तिहार तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
पेशावरमध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत दौ-याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत यापूर्वीच हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
तुरुंगातील सुरक्षाव्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. तुरुंगाातील कैद्यांची सुरक्षा ही आमची पहिली जबाबादारी आहे. याबाबत आम्ही कोणताही धोका पत्करु शकत नाही, असे कारागृह उप महानिरीक्षक मुकेश प्रसाद यांनी सांगितले.
तिहारमधय्ये अनेक मोठमोठे दहशतवादी तसेच कैदी आहेत. हरयाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला आणि सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉयही तिहार तुरुंगात आहेत. तुरुंगातील सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली असून तुरुंगातील आणि तुरुंगाच्या बाहेरील प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांची तुरुंगातून सुटका कऱण्यासाठी हा हल्ला केला जाणार असल्याची माहिती आहे.
0
लख्वी तुरुंगातच रहाणार
नवी दिल्ली – भारताने नोंदवलेल्या तीव्र आक्षेपानंतर मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार झाकीउर रहमान लख्वी पाकिस्तानी तुरुंगातच रहाणार आहे. लख्वीला गुरुवारी पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने २६/११ हल्ला प्रकरणात जामीन मंजूर केला होता.
भारताने लख्वीला जामीन मंजूर होण्याच्या निर्णयाला जोरदार विरोध केला. त्यामुळे लख्वीची सुटका होताच त्याला कायदा व सुव्यवस्थेला धोका पोहोचवल्याच्या नव्या आरोपाखाली पुन्हा अटक करण्यात आली आहे. लख्वी तुरुंगातच रहाणार आहे.
भारताने शुक्रवारी सकाळी राजनैतिक अधिका-यांमार्फत लख्वीच्या सुटके विरोधात आपली नापसंती आणि चिंता पाकिस्तानला कळवली. लख्वीची सुटका पाकिस्तानच्या दहशतवादा विरुध्द लढण्याच्या कटिबध्दतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करत असल्याचे भारताने आपल्या संदेशात म्हटले होते.
मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ला प्रकरणात पाकिस्तानात लख्वीसह सात आरोपींविरोधात खटला सुरु आहे. मात्र कधी कायदा अधिका-यांच्या अनुपस्थितीमुळे तर कधी अन्य कारणांमुळे या खटल्याची सुनावणी वारंवार पुढे ढकलण्यात आली तसेच तहकूब करण्यात आली. भारताने वेळोवेळी या खटल्याचा मुद्दा पाकिस्तानकडे लावून धरला असून, पाकिस्तानने झटपट या खटल्याची सुनावणीपूर्ण करुन दहशतवादाविरुध्दचे आपले गांर्भीय दाखवून द्यावे अशी भारताची मागणी आहे.
पेशावरमध्ये लष्करी शाळेवर मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी बुधवारी समूळ दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा इरादा जाहीर केला होता. त्यानंतर लगेचच गुरुवारी लख्वीला जामीन मंजूर झाल्याने पाकिस्तानच्या मूळ हेतूबद्दल पुन्हा शंका उपस्थित झाली होती
0
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कोट्यवधी गैरव्यवहार

मुंबई – सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कोट्यवधी रुपयांच्या कंत्राटांमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या आरोपप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांचे पुत्र पंकज आणि पुतणे समीर यांची लाचलुचपत प्रतिबंधक खाते (एसीबी) व सक्तवसुली संचलनालय (ईडी) यांनी चौकशी करावी, असा आदेश गुरुवारी मुंबई हायकोर्टाने दिला.
तत्कालीन सार्वजनिक बांधकाममंत्री भुजबळ यांनी पदावर असताना खासगी कंत्राटदारांना नियमबाह्य कंत्राटे दिली व त्या बदल्यात त्यांच्या मुंबई एज्युकेशन ट्रस्टला मोठी रक्कम मिळाल्याचा आरोप आहे. या लाभार्थी कंत्राटदारांच्या वांद्रे आणि अंधेरी भागात मालमत्ता असल्याचे कळते. हा मनी लाँडरिंगचा गुन्हा असल्याचा आरोप असल्याने ईडी आणि एसीबी विभागाच्या संचालकांनी भुजबळ आणि त्यांचे पुत्र व पुतणे या तिघांची खुली चौकशी करावी, असा आदेश मुख्य न्या. मोहित शहा यांच्या खंडपीठाने दिला आहे. तसेच २८ फेब्रुवारीपर्यंत या सर्वांची चौकशी पूर्ण करण्यास बजावले असून या मुदतीत ती पूर्ण होऊ न शकल्यास आतापर्यंत झालेल्या चौकशीचा हंगामी अहवाल पुढच्या सुनावणीला सादर करावा, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.
हायकोर्टाचा निर्णय मला मान्य आहे. जे काही सत्य असेल ते चौकशीत उजेडात येईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.
0
भ्रष्ट शहरांच्या यादीत पुण्याचा पहिला नंबर

पुणे -पुण्याची शैक्षणिक, सांस्कृतिक आणि एकूणच शांत व समृद्ध पार्श्वभूमी या म्हणीतून अभिप्रेत आहे. पण आता ही म्हण केवळ सकारात्मक अर्थाने घेण्यासारखी परिस्थिती राहिलेली नाही. कारण, राज्यातील भ्रष्ट शहरांच्या यादीत पुण्याचा पहिला नंबर लागला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्यानं राज्यातील सर्वाधिक भ्रष्ट शहरांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली आहे. या यादीत पुण्यानं सर्वात पहिला क्रमांक पटकावला आहे. चालू वर्षात पुण्यात लाच घेतल्याप्रकरणी २१६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्या खालोखाल नाशिकचा क्रमांक असून इथं लाचखोरीच्या प्रकरणात २१० जणांना अटक करण्यात आली आहे.
शिक्षणाचं माहेरघर असलेलं पुणं गेल्या काही दिवसांत औद्योगिक व आयटी नगरी म्हणून उदयास आलं आहे. या भरभराटीमुळं लाचखोरीचं प्रमाण वाढलं असल्याचं एसीबीचं म्हणणं आहे. याप्रकरणी एसीबीनं आतापर्यंत तब्बल १३३ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.
राज्याची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला ही यादी काही प्रमाणात दिलासा देणारी आहे. गेल्या वर्षी पहिल्या तीन भ्रष्ट शहरांमध्ये असलेली मुंबई यंदा यादीत आठव्या क्रमांकावर आहे. यंदा मुंबईत फक्त ९० जणांना लाच घेताना अटक करण्यात आली आहे. मात्र, मुंबईतील अधिकाऱ्यांच्या हुशारीमुळं हा क्रमांक घसरल्याचं एसीबीला वाटतं. मुंबईतील अधिकारी धूर्त असून ते सहसा पकडले जात नसल्याचं एसीबीचं निरीक्षण आहे.
0
एकाच कुटुंबातील आठ मुलांची निर्घृण हत्या

केन्स (ऑस्ट्रेलिया), दि. १९ – ऑस्ट्रेलियातील केन्स येथे एकाच कुटुंबातील आठ लहान मुलांची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या हल्ल्यात एक महिलाही जखमी अवस्थेत आढळली असून ती या मुलांची आई असल्याचे समजते. सध्या त्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
केन्स परिसरात शुक्रवारी सकाळी एक महिला घराबाहेर रक्तबंबाळ अवस्थेत आढळल्याचा फोन स्थानिक पोलिसांना गेला होता. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घरात आठ लहान मुलांचे मृतदेह आढळले. या सर्वांची चाकूने वार करुन हत्या करण्यात आली होती. मृतांमध्ये १८ महिने ते १५ वर्षांपर्यंतच्या मुलांचा समावेश आहे. घरातील चित्र अत्यंत भीषणावह होते असे सर्वात पहिले घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिस अधिका-याने स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले. या हत्याकांडामागे दहशतवादाचा काहीही संबंध नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. जखमी अवस्थेत आढळलेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु असून पोलिस तिच्याकडून नेमका घटनाक्रम जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. ही हत्या कोणी केली, हत्येचे नेमके कारण हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले.










